डोळे

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:10 am

डोळे

अप्रतिम लावण्य लाभलेली आणि सागराच्या निळाईप्रमाणे डोळे असलेली सोनाली लहानपणापासून खूपच हुशार मुलगी होती. तिचे आई-वडील साधे मध्यमवर्गीय पालक होते. मात्र सोनालीची स्वप्नं खूप वेगळी होती. तिच्या आईची इच्छा होती की सोनालीने बी.एड. करावं आणि एखाद्या शाळेत चांगली नोकरी करावी. वडील तिला नेहमी म्हणायचे की मुलींनी बॅँकेत नोकरी केलेली चांगली. मात्र सोनालीने आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एक खूपच वेगळं करियर निवडलं होतं आणि त्या तिच्या निवडीचं फळ आज तिला मिळालं होतं. सुरुवातीला फारसं समजत नसल्याने, बी.एड. करू अशा विचाराने तिने बी.ए. करायला सुरुवात केली होति. पण कॉलेजमध्ये गेल्यावर तिला तिच्या आवडीचा विषय मिळाला आणि मग तिने क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. आणि पुढे पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. रानडे या अत्यंत नावाजलेल्या सायकॉलॉजिस्टकडे तिने पीएच.डी. पूर्ण केली होती आणि त्यानंतर ती डॉ. रानडे यांच्याचकडे असिस्टंट म्हणून जॉइन झाली होती. दोन वर्षांत तिने अनेक वेगळ्या केसेस यशस्वीपंणे हाताळल्या होत्या. समोरच्या व्यक्तीमधला कॉन्फिडन्स वाढेल आणि पेशंट म्हणून आलेली व्यक्ती स्वतःच योग्य तो निर्णय घेऊ शकेल हाच तिचा प्रयत्न कायम असायचा. डॉ. रानडे तिच्या कामावर खूप खूश असायचे. डॉक्टरांचं आता वय झालं होतं. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत तर त्यांनी तिच्यावर क्लिनिक पूर्ण सोडायलादेखील सुरुवात केली होती.

ते तिला अलीकडे म्हणायचे, "सोनाली, बाळा तू खरंच खूप हुशार आहेस. माझी खातरीरी आहे तू हे काम कायम चांगलंच करशील. तुला शिकवताना मला जितकं समाधान मिळालं, त्याहूनही तू माझं क्लिनिक चालवायला लागल्यावर मला जास्त आनंद झाला आहे." डॉक्टरांनी तसं तिच्या आई-वडिलांनादेखील अनेकदा सांगितलं होतं. एकदा सोनालीने डॉ. रानडेंना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. तिचं आमंत्रण आनंदाने स्वीकारून डॉक्टर त्यांच्याकडे जेवायला आले होते. जेवण आटपल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. "अहो सोनालीचे बाबा, तुमची सोनाली खरंच खूप हुशार आहे. माझा विश्वास आहे की ती या क्षेत्रात पुढे खूप नाव कमवेल. बघाच् तुम्ही." ते सोनालीच्या वडिलांना म्हणाले होते.

आणि त्यानंतर काही दिवसांतच सोनालीला एका खूप चांगल्या नोकरीची ऑफर आली होती आणि म्हणून सोनाली खूप खूश होती......

मुंबईपासून गुजराथला जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला डहाणूच्या थोडं पुढे एक लहानसं गाव होतं. आता राजे-रजवाडे उरले नव्हते. मात्र भारताला स्वतंत्र होऊन इतकी वर्षं होऊनही अजूनही त्या भागात पूर्वीच्या राजे-रजवाडयांचं अस्तित्व अजूनही टिकून होतं. आणि त्याच कारणदेखील तसंच होतं. तिथे त्या पंचक्रोशीत राजे उदयन आणि त्यांचे नातू राजे आदित्य यांना विशेष मान दिला जाई. कारण राजे म्हणून त्यांची कुठलीही जवाबदारी नसूनही, कुठल्याही प्रकारच्या राजकारणात न पडता आजही या घराण्याने प्रामाणिकपणे केवळ लोकांच्या भल्याची कामे केली होती आणि अजूनही करत होते.

त्या लहानशा गावात तरुण राजे आदित्य यांनी एक मोठं हॉस्पिटल उभारलं होतं. कारण त्या पंचक्रोशीत एकही हॉस्पिटल नव्हतं. लहान-सहान आजारांसाठीदेखील लोकांना बरंच लांब जावं लागत होतं. म्हणून मग आदित्यराजेंनी एखाद्या साध्या हॉस्पिटलपेक्षा एक संपूर्ण सुसज्ज हॉस्पिटल तिथेच उभं केलं होतं. आदित्यराजेंच्या आजोबांची... राजे उदयन यांची या कामात आदित्यराजे यांना संपूर्ण साथ होती. उदयनराजांची डॉ. रानडेंशी खूप चांगली ओळख होती. त्यामुळे या हॉस्पिटलच्या सायकॉलॉजी विभागाची जवाबदारी त्यांनी डॉ. रानडेंवर टाकली. परंतु वयपरत्वे रानडेंनी ही जबाबदारी स्वीकारायला नकार दिला. मग राजे उदयन यांनी डॉ. रानडेंना ही जवाबदारी सोपवण्यासाठी योग्य नाव सुचवायची गळ घातली आणि त्यांनी लगेच सोनालीचं नाव सुचवलं होतं.

डॉ. रानडेंनी सोनालीला याच नवीन कामाबद्दल सांगितलं, तेव्हा ती फारच खूश झाली. परंतु तिचे आई-वडील मात्र तिला इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते. मग तिच्या आई-वडिलांना डॉक्टर रानडेंनीच समजावलं, "अहो, का काळजी करता? सोनाली मला माझ्या मुलीसारखीच आहे. मी तिला असा कोणता अयोग्य जॉब सांगीन का? माझ्यावर विश्वास ठेवा, this is a very good offer for her to start with her own independent career. आणि अशी कितीशी लांब जाते आहे ती? तीन-चार तासांचा तर प्रवास. वीकएन्डला ती येत जाईल इकडे किंवा तुम्हीही जात जा तिला भेटायला. ते एक सुंदर गाव आहे. निसर्गाच्या सान्निध्यातलं. तुम्हालाही थोडा चेंज मिळत जाईल."

शेवटी तिच्या आई-वडिलांनी डॉ. रानडेंच्या भरवशावर हो म्हटलं आणि सोनालीचं जाणं पक्कं झालं.

आणि... आज सोनालीचा त्या हॉस्पिटलमधला पहिलाच दिवस होता. ती सकाळीच मुंबईहून निघून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती आणि तिला लागलीच तिच्या कामाचा चार्ज देण्यात आला होता. एकूण सर्व काम समजावून घेईपर्यंत कधी दुपार झाली ते तिला कळलंच नाही. तिला सगळं समजावून सांगणार्‍या हॉस्पिटलच्या स्टाफपैकी एकाने ती अजून जेवलेली नाही आहे याची तिला आठवण करून दिली आणि मग तिच्या लक्षात आलं की तिला खरंच खूप भूक लागली आहे.

ती कँटीनमध्ये गेली आणि लंचची प्लेट घेऊन एका कोपर्‍यात निवांत जाऊन बसली. तिचं लक्ष सहजच बाहेर गेलं आणि आश्चर्याने आणि आनंदाने तिचे डोळे विस्फारले गेले. स्टाफसाठीचं हे कँटीन हॉस्पिटलच्या इमारतीतच पण अगदी मागच्या बाजूला होतं, त्यापुढे केवळ आवाराची भिंत आणि त्या मागच्या आवाराच्या भिंतीपासूनच एका टेकडीची चढण सुरू होत होती.

निसर्गाचा एक अस्पर्श अद्भुत देखावा तिथे उभा होता. गर्द झाडीने बहरलेली टेकडी होती. ठरवलं तर अर्ध्या तासात वरच्या टोकापर्यंत पोहोचता येईल इतकीच मोठी आणि सहज चढणीची होती. सुरुवातीची चढण पार केल्यावर वडाच्या झाडांची एक रांगच रांग लागत होती. अनेक वर्षे जुने असावेत हे वड. कारण त्या प्रत्येक झाडाच्या बुंध्यांचा घेर किमान पाच माणसांनी वेढा घालण्याइतका मोठा होता. नजर वर करून बघितल्यावर लक्षात येत होतं की टेकडीच्या पार वरच्या टोकावरून एक कोसळता धबधबा होता, जो खाली वडाच्या झाडांच्या थोडं वर एका तलावात उतरत होता. तिथून एक सुळका बाहेर आला होता. त्यावर बहुतेक एक देऊळ किंवा तसंच काहीसं स्ट्रक्चर दिसत होतं. मात्र ते नक्की काय असावं ते कोसळत्या धबधब्यामुळे नीटसं दिसत नव्हतं. मात्र एकूण तो देखावा अत्यंत मनोरम होता.

आजवरचं संपूर्ण आयुष्य शहरात घालवलेल्या सोनालीला हा निसर्गाचा करिश्मा म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्काच होता. ती मंत्रमुग्ध होऊन त्या टेकडीकडे बघत होती. काही वेळाने तिचं तिलाच लक्षात आलं की ती नकळत कंपाउंडच्या टोकाला टेकडीच्या अगदी जवळ जाऊन उभी आहे. हे लक्षात येऊन ती ओशाळली. असं नकळत मंतरल्यासारखं बाहेर येऊन उभं राहणं तिचं तिलाच विचित्र वाटलं. उगाच कोणीतरी बघेल आणि हसेल म्हणून ती पटकन मागे फिरली. परंतु त्याच वेळी त्या टेकडीकडून एक निळी नजर सोनालीला निरखत होती... मात्र सोनालीला त्याचा पत्ताच नव्हता.

सोनाली मनापासून खूश झाली तिच्या इथे येण्याच्या निर्णयावर. आवडीचं काम, निसर्गरम्य परिसर आणि चांगला पगार यामुळे ती खुशीत होती. जेवण आटपून ती तिच्या केबिनमध्ये आली. इथे येण्याची गेले काही दिवस करत असलेली तयारी आणि आज सकाळी खूप लवकर उठून केलेला मोठा प्रवास, त्यात पोहोचल्यापासूनच तिचं कामाला लागणं यामुळे ती आता खूप दमली होती. तिने एकूण तिच्या कामाचा भाग समजून घेतला होता. पण ती कुठे राहणार ते तिला अजून माहीत नव्हतं. तिचा सायकॉलॉजी विभाग कँटीनच्या वरच येत होता. त्यामुळे जेवताना तिने बघितलेली सुंदर टेकड़ी तिच्या केबिनच्या खिडकीमधूनही दिसत होती. केबिनमधल्या सोफ्यावर बसल्या बसल्या ती त्या टेकडीकडे बघत होती.... आणि दमल्यामुळे असेल कदाचित, पण तिच्या नकळत तिला झोप लागली.

अचानक सोनाली दचकून जागी झाली. तिला एक स्वप्न पडलं होतं. त्यात एक तरुण आणि तरुणी हातात हात घालून हसत एक टेकडी चढत होते. तसे ते दोघे पाठमोरे होते आणि तरीही त्यांच्यात काहीतरी ओळखीचं होतं. सोनाली पुरती गोंधळून गेली होती. ती त्या स्वप्नामुळे इतकी गडबडली होती की ती नक्की कुठे आहे हे लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे केबिनमध्ये थोडासा अंधार झाला होता. तिने उठून दिवा लावला आणि तोंडावर पाणी मारलं आणि परत सोफ्यावर येऊन बसली. नक्की काय स्वप्न पडलं होतं आपल्याला? कोण होती ती दोघं? असे काहीसे विचार तिच्या मनात चालू होते आणि तिच्या लक्षात आलं की ती दचकून जागी झाली ते नवीन जागेमुळे नसून तिला पडलेल्या स्वप्नामुळे.

कदाचित ती अजून विचार करत बसली असती, परंतु केबिनचा दरवाजा नॉक करून एक प्यून आत आला आणि म्हणाला, "मॅडम, राजेसाहेब आले आहेत. त्यांनी तुम्हाला बोलावलं आहे."

ते ऐकून ती एकदम उभी राहिली. इतकी चांगली नोकरी तिला डॉक्टर रानडेंमुळे मिळाली होती हे जितकं खरं होतं, तितकंच डॉक्टरसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून राजेसाहेबांनी कोणताही इंटरव्ह्यू न घेता सोनालीची निवड केली होती, हेदेखील खरं होतं. ती तर अजून राजेसाहेबांना भेटलीदेखील नव्हती. त्यामुळे प्यूनने राजेसाहेब आले आहेत हे सांगताच ती उठली आणि केस, कपडे ठाकठीक करून त्यांना भेटण्यासाठी केबिनबाहेर पडली.

हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उदयनराजे आणि आदित्यराजे यांची स्वतंत्र केबिन होती. सोनाली तिथे येऊन पोहोचली आणि गोंधळून तिथेच उभी राहिली. पुढे काय करावं ते तिला कळत नव्हतं. उदयनराजे आले आहेत आणि त्यांनी भेटायला बोलावलं आहे हे जरी खरं होतं, तरी त्याक्षणी दरवाजावर कोणीच उभं नव्हतं. आणि असं अचानक त्यांच्या केबिनमध्ये कसं जायचं असा प्रश्न सोनालीला पडला होता.

"कोणाची वाट पाहात आहात का?"

सोनाली दचकून मागे वळली. एक अत्यंत हँडसम तरुण तिच्याकडे टक लावून बघत उभा होता. 'कोण असावा हा? चेहर्‍याच्या कॉन्फिडन्सवरून इथलाच कोणीतरी मोठया पोस्टवरचा असावा, असं दिसतं आहे...' सोनालीच्या मनात आलं.

ती हसली. "तुमचीच वाट पाहात होते. राजेसाहेबांनी बोलावलं आहे. पण नॉक करू की कोणीतरी आत घेऊन जाईल याचा विचार करत होते. आता तुम्ही आलाच आहात तर माझी गाठ घालून द्या ना राजेसाहेबांशी." सोनालीने उत्तर दिल.

"A smart answer. पण मी इथलाच आहे आणि तुम्हाला आत राजेसाहेबांकडे नेऊ शकतो असं तुम्हाला का वाटलं?" त्या हँडसमने डोळे मिचकावत विचारलं.

सोनालीला त्याच्या मिश्कील प्रश्नाने गंमत वाटली आणि त्याच्या बरोबरच्या या गप्पात मजादेखील वाटायला लागली. ती हसत म्हणाली, "का वाटू नये? तुमच्यासारखी हँडसम आणि कॉन्फिडंट व्यक्तीच मला राजेसाहेबांकड़े नेऊ शकते."

तो हसला म्हणाला, "अहो, मी भले हँडसम आणि कॉन्फिडंट असेन आणि माझी इथे ओळखही असेल. तुम्हीदेखील अत्यंत रेखीव आणि सुंदर आहात. पण हे काही कारण होऊ शकत नाही आणि एवढ्यासाठी मी तुमची राजसाहेबांशी ओळख करून द्यावी, हे मलाही काही पटत नाही."

सोनाली हसत म्हणाली, "अगदी बरोबर. पण माझं रूप हे माझं क्वालिफिकेशन नाही. मी या हॉस्पिटलच्या सयकॉलॉजी डिपार्टमेंटची हेड म्हणून आजच जॉइन झाले आहे. परंतु मी अजून राजेसाहेब किंवा त्यांचे नातू यांना भेटू शकलेले नाही. म्हणून म्हटलं पहिली भेट तुमच्यासारख्या इथल्याच व्यक्तीबरोबर झाली तर सोपं जाईल नं मला... तसं हरकत नसेल तर आपण कोण ते सांगाल का?"

"ओहो... So you are the one dynamic lady who is been appointed without any interview!" त्या तरुणाने सोनालीला निरखत म्हटलं. "तुम्ही बरोबर ओळखलंत. मी इथलाच... मात्र मी आता आत जात नाही आहे. तशी मला परवानगी नाही. पण तुमची सोय करतो हं" असं म्हणून त्याने रिसेप्शनधील एकाला हाक मारली.

"माधव, या आपल्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आहेत. त्या आजच आल्या आहेत. पण त्या त्यांच्या प्रोफेशनला शोभेलशा हुशार आहेत. मला बघताच यांनी ओळखलं की मी इथलाच आहे. आत्ता त्यांना राजेसाहेबांना भेटायचं आहे. पण मला आत्ता आत जाण्याची परवानगी नाही, हे तुला माहीत आहे नं? मात्र तुला आत जायला काही प्रॉब्लेम नाही. राजेंच्या जवळचा माणूस आहेस ना तू... मग जरा यांनादेखील आत ने हं तुझ्याबरोबर" असं सांगितलं आणि सोनाली आणखी काही बोलायच्या आत तो तिथून निघाला. अर्थात सोनालीचं लक्ष नाही असं बघून त्याने माधवकडे बघून डोळा मारला होता. आणि माधवदेखील त्याच्या त्या नाटकात सहभागी झाला होता.

सोनालीला आत घेऊन जा असं माधवला सांगणारा दुसरा कोणी नसून आदित्यच होता. सोनालीला बघूनच आदित्य मंत्रमुग्ध झाला होता. तिच्याशी आणखी थोडं बोलावं असं त्याला वाटत होतं आणि त्याच वेळी तिच्यापासून दूर जावं असंही वाटत होतं. तिचे ते निळेशार, हसरे आणि बोलके डोळे... तो अडकून गेला होता त्यात क्षणभर. पण पहिल्या भेटीत जास्त सलगी दाखवणं वाईट दिसेल, याची त्याला कल्पना होती. म्हणूनच स्वतःला सावरून त्याने माधवला पुढे केलं होतं आणि आपण दुसर्‍या केबिनमध्ये निघून गेला होता.

सोनालीला संशय आला की जाताना बहुतेक त्या तरुणाने माधव नावाच्या त्या माणसाकडे बघून डोळा मारला. पण तिला नक्की खातरी नव्हती. माधवला त्याच्याबद्दल विचारावं असं एकदा तिच्या मनात आलंदेखील, पण ती काही बोलायच्या आत माधवने आत जाऊन राजेसाहेबांना ती आल्याची खबर दिली होती. राजेसाहेबांनी तिला लगेच आत पाठवून देण्यास सांगितलं. त्यामुळे "राजेसाहेब तुमचीच वाट पाहात आहेत" असं बाहेर येऊन सांगितलं.

मग मात्र मघाशी भेटलेल्या त्या तरुणाचे विचार बाजूला ठेवून परत एकदा ड्रेस त्यातल्या त्यात ठीक करत सोनालीने त्या आलिशान केबिनमध्ये प्रवेश केला.

"नमस्कार राजेसाहेब" असं म्हणत तिने एका मोठ्या आलिशान टेबलाच्या मागे एका प्रशस्त खुर्चीवर बसलेल्या भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या वृद्ध व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केलं. त्यांची मान खाली होती आणि ते काही पेपर्स वाचत होते. राजेसाहेबांनी मान वर करून बघितलं. सोनालीला भास झाला की राजेसाहेब थोडे दचकलेच तिला पाहून, कारण सोनालीला पाहून राजेसाहेब उभे राहिले होते. खरं तर सोनाली त्यांच्या हॉस्पिटलमधली एक स्टाफ मेंबर होती. ती आली म्हणून राजेसाहेबांनी उभं राहण्याची काहीच गरज नव्हती. पण उभं राहून ते तिच्याकडे क्षण दोन क्षण टक लावून बघत राहिले आणि मग एकदम भानावर येऊन स्वतः बसत त्यांनी हसून तिलादेखील बसायला सांगितलं.

"नमस्कार सोनाली. डॉक्टरसाहेबांकडून तुझी खूप तारीफ ऐकली होती. पण आज तुला भेटण्याचा योग आला." राजेसाहेब म्हणाले. "कसं वाटलं एकूण हॉस्पिटल?"

"राजेसाहेब, सर्वात अगोदर मला तुमचे आभार मानायचे आहेत. आपण माझा इंटरव्ह्यू न घेताच इतक्या मोठ्या पोस्टवर घेतलंत. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कधी फोल होऊ देणार नाही. अर्थात हॉस्पिटल खूपच अद्ययावत आहे. आणि मला खरंच मनापासून आनंद झाला की तुम्ही सायकॉलॉजीसारखा विभागदेखील सुरू केला आहे. नाहीतर अनेक मोठ-मोठ्या हॉस्पिटल्समध्येदेखील हा विभाग नसतो. खरं तर या विभागाकडे वेड्यांचा विभाग म्हणूनच पाहिलं जातं. राजेसाहेब, मी असा गैरसमज इथे निर्माण होऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करीन आणि मला जमेल तितकं चांगलं काम करीन." सोनाली अत्यंत आदरपूर्वक उदयनराजांशी बोलत होती आणि राजे तिच्याही नकळत तिचं निरीक्षण करत होते.

"अगं, डॉक्टर रानडेंनी तुझं नाव सांगितल्यावर इतर काही प्रश्नच येत नाही. आणि आता तुला भेटल्यानंतर आणि बोलल्यानंतर मी त्यांच्या शब्दावर ठेवलेला विश्वास खरा आहे, हे मला पटलं आहे. बरं, तू हॉस्पिटलचा एकूण परिसर बघितलास का?" राजेसाहेबांनी आस्थेने तिची चौकशी केली.

तिला बघितल्यावर राजेसाहेबांना पटलं की ती चांगलं काम करेल, या त्यांच्या वाक्याचा अर्थ तिला समजला नाही. पण उगाच कशाला पहिल्या भेटीत काही प्रश्न विचारायचे असा विचार करून ती गप्प राहिली. क्षण-दोन क्षण थांबून ती म्हणाली, "नाही राजेसाहेब, एकूण सगळं परिसर बघण्याइतका वेळ नाही मिळाला. पण मी माझ्या विभागाची पूर्ण माहिती करून घेतली आहे. अर्थात त्याव्यतिरिक्त जे काही बघितलं, ते फारच सुंदर आहे. मी आजवर फक्त शहरात राहिले आणि वाढले आहे. त्यामुळे या निसर्गसुंदर ठिकाणी काम करायला मला खूप आवडेल." सोनाली म्हणाली.

अचानक राजेसाहेबांनी बेल वाजवली. माधव आत आला. "अरे माधव, ही सोनाली." त्यांनी तिची ओळख सांगितली. "ती आजच आली आहे. तिला क्वार्टर मिळाले की नाही, याबद्दल तुला काही माहीत आहे का? एक काम कर. तू स्वतः लक्ष घाल या विषयात. तिला वरच्या मजल्यावरचा पुढचे क्वार्टर्स अ‍ॅलॉट कर." राजेसाहेब अधिकारवाणीने माधवशी बोलत होते.

"जी... जसं आपण म्हणाल. परंतु मॉडमना मागच्या भागातील क्वार्टर्स अगोदरच देण्यात आले आहेत." माधव म्हणाला.

"माधवा, आम्ही सांगतो तसं होईल नं?" राजांच्या आवाजात अचानक थोडा कडकपणा आला होता. माधव गडबडला.

"जी... होय जी हुजूर जी. लगेच करतो तसं." असं म्हणून तो लगेच तिथून बाहेर पडला.

माधव केबिनबाहेर गेला आणि राजेसाहेबांनी सोनालीपुढे एक फाइल ठेवली. "सोनाली, ही एक केस आहे. अजून आपल्याकडे आलेली नाही, पण तू ही फाइल वाचून तुझं मत देऊ शकशील का?" राजेसाहेबांनी तिला विचारलं.

"जरूर राजेसाहेब." सोनाली म्हणाली. तिने ती फाइल हातात घेतली आणि चाळायला लागली. काही मिनिटांनी तिने मान वर केली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की राजेसाहेब तिच्या चेहर्‍याकडे टक लावून पाहत आहेत.

त्यांचं हे असं बघणं सोनालीला थोडं विचित्र वाटलं, पण ती राजेसाहेबांचा एकूण मूड बघून गप्प बसली. काही क्षणांच्या शांततेनंतर स्वतः राजेसाहेब उठले आणि त्यांनी सोनालीला विचारलं, "आमची पाय मोकळे करण्याची वेळ झाली आहे. आम्ही येतो. तू माधवला भेट. तो तुला तुझे क्वार्टर्स दाखवेल."

सोनाली चटकन उभी राहिली आणि म्हणाली, "धन्यवाद राजेसाहेब."

दोघेही केबिनच्या बाहेर पडले. राजेसाहेब बाहेर येऊन थेट हॉस्पिटलच्या गेटकड़े निघाले. सोनाली मागून त्याचं निरीक्षण करत होती.

'साधारण सत्तरीचे असतील राजेसाहेब. पण किती ताठ आहेत. केवढा रुबाब आहे. एकूणच छाप पडावी असं व्यक्तिमत्त्व आहे. अत्यंत आदब आहे त्यांच्या वागण्यात.' तिच्या मनात विचार आला आणि मग अचानक तिला आठवलं की ती जेव्हा फाइल बघत होती, तेव्हा राजेसाहेब तिच्या चेहर्‍याचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करत होते. 'असं का बरं करत होते ते?' तिच्या मनात प्रश्न डोकावला. पण दिवसभराचा प्रवास आणि इथे पोहोचल्यापासून करत असलेली कामं यामुळे त्या वेळी तिच्या अंगात आणि मनात आणखी काही विचार करण्याचे त्राण नव्हतं. ती माधवला शोधण्यासाठी रिसेप्शनच्या दिशेने वळली. तिथे तिला तो मघाचा तरुण दिसला. तो तिथे एका मोठ्ठयाशा आरामखुर्चीवर बसून काही कागदपत्रं बघत होता. ती त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्या दिशेने वळली. "अहो हँडसम... झाली बरं का माझी भेट." तिने हसत त्याला म्हटलं. समोरच्या फाइलमधून मान वर करून त्याने तिच्याकडे बघितलं आणि पुन्हा एकदा तो त्या निळाईमध्ये अड़कला. पण लगेच भानावर येत तो हसला आणि म्हणाला, "मला एक नावदेखील आहे हं मिस सोनाली." त्याला तिचं नाव माहीत आहे हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं आणि खातरीदेखील झाली की तो इथे काम करतो. "तुम्हीदेखील इथे काम करता?" तिने भाबडेपणे त्याला विचारलं. "हो." तो हसून म्हणाला.

"ओह! तरीच!" ती विचार करत म्हणाली.

"तरीच? म्हणजे?" त्याने विचारलं.

"अहो, तरीच तुम्हाला माझी सर्व माहिती आहे." सोनाली म्हणाली.

"नाही.... सर्व माहिती नाही. केवळ बायोडेटामध्ये आहे तेवढीच. पण आवडेल करून घ्यायला." तो हलकेच म्हणाला.

"काही म्हणालात का?" तिने आदित्यला विचारलं.

"छे हो. सहज मनात साठवत .... आपलं... आठवत होतो... काय काम बाकी आहे ते." आदित्य थोड़ा गडबडला. पण मग त्याने स्वतःला सावरून घेतलं आणि मग एकूण समोरचे कागद आवरून घेत तिथून काढता पाय घेतला.

सोनालीदेखील दमली असल्याने माधवकडून स्वतःच्या क्वार्टर्सची माहिती घेऊन त्या दिशेने निघाली.

चांदीची मूठ असलेली हातातील आपली काठी हलकेच हलवत राजेसाहेब हॉस्पिटलच्या बाहेर पडले. ते कुठल्याशा गहन विचारात गढले होते. त्यांच्याही नकळत ते हॉस्पिटलच्या मागील बाजूस, टेकडीच्या दिशेने निघाले. अचानक मागून त्यांचा अनेक वर्षांचा सोबती गोरक्ष धावत आला.

"राजे..... हुजूर..... हुजूर.... आपण.... टेकडी..... राजे....." त्याने मध्ये आडवं येत राजेसाहेबांना रोखलं. राजे भानावर आले. त्यांनी गोरक्षकड़े हरवलेल्या नजरेने वळून बघितलं आणि मग आजूबाजूला नजर फिरवली. राजे विचारांच्या नादात हॉस्पिटलच्या मागील अंगाला असलेल्या टेकडीच्या बाजूला वळले होते.

"हुजूर... आपण आणि टेकडीच्या दिशेने?" गोरक्षच्या आवाजात आश्चर्य होतं. "आज इतक्या वर्षांनंतर अचानक मी तुम्हाला असं अस्वस्थ आणि विचारात गढलेले पाहतो आहे. गोरक्ष असतानाही आपण अस्वस्थ आहात, याचा अर्थ खरंच विषय खूप गंभीर असावा. राजे, आपली हरकत नसेल तर आपण कोणती काळजी करत आहात ते सांगाल का मला?" गोरक्षच्या आवाजात काळजी होती.

राजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "काळजी नाही गोरक्ष. पण कालचक्राच्या महिम्याचं आश्चर्य वाटतं. उद्या परत इथे हॉस्पिटलमध्ये येऊ या. तू तुझ्या डोळ्यांनी बघ. मग बोलू. चल.... आज रपेट नको. थोडं थकल्यासारखं वाटतं आहे. चल, आपण वाड़यावर जाऊ." राजे म्हणाले आणि गोरक्षच्या आधाराने गाडीत जाऊन बसले. गोरक्ष पुढे बसला आणि ड्रायव्हरने गाडी सुरू केली.

गोरक्ष म्हणजे राजांचा डावा-उजवा दोन्ही हात. तो म्हणजे राजांची सावली बनून राहिला होता. त्याला त्याचं वय विचारलं की त्याचं ठरलेलं उत्तर असायचं, "हुजूरसाहेबांपेक्षा दोनने कमी-जास्त. बस, मला माझ्याबद्दल एवढंच माहीत आहे." आणि तिथून निघून जायचा. गोरक्षला आयुष्यभर कायम सर्वांनीच एकेरी नावाने हाक मारली होती आणि त्यात त्याला कधी काही वावगं वाटलंच नव्हतं.

हॉस्पिटल वाड्यापासून केवळ दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. राजे वाड्यावर आले आणि तडक लायब्ररीमध्ये गेले. आत जाताना मात्र त्यांनी गोरक्षला स्पष्ट बजावलं, "मी बाहेर येईपर्यंत कोणालाही आत पाठवायचं नाही. मला काहीही नको आहे, त्यामुळे तूही आत येऊ नकोस."

राजे लायब्ररीमध्ये साधारण सहाच्या सुमारास गेले होते. रात्रीचे अकरा वाजले तरी ते बाहेर आले नव्हते. दोन वेळा आदित्यराजांचा निरोप घेऊन नोकर येऊन गेला होता. पण गोरक्षने त्याला उलट पावली मागे पाठवलं होतं.

सरतेशेवटी स्वतः आदित्यराजे आले. त्यांना येताना बघून गोरक्ष उभा राहिला. "अरे, गोरक्ष, दादाजी अजून आतच आहेत का?" आदित्यने विचारलं.

"हो, कुमार." गोरक्ष उत्तरला.

"अरे रात्रीचे अकरा वाजले आहेत. आज दादाजींना काय झालं आहे?" आदित्यने थोडं स्वतःशी आणि थोडं गोरक्षशी असं म्हटलं.

"कुमार... आज हुजूर विचारांच्या नादात टेकडीकडे वळले होते." गोरक्ष म्हणाला आणि आदित्य एकदम चमकलाच. ज्या टेकडीने त्याला लहानपणापासून साद घातली होती... जिथे जाणंच काय, त्या दिशेने बाघण्याचीही आदित्यला परवानगी नव्हती, निसर्गाचा अद्भुत नमुना असलेली ती टेकडी असूनही जिथे आजवर कोणीही गेलं नव्हतं... इतकंच काय, स्वतः उदयनराजे - आदित्यचे दादाजी - कधी गेल्याचे त्याने ऐकलं नव्हतं, गावातली जुनी-जाणती मंडळीदेखील सहसा ज्या टेकडीचा उल्लेख टाळायचे... त्या टेकडीच्या दिशेने आज त्याचे दादाजी अनवधानाने वळले होते. त्याचा यावर विश्वासच बसत नव्हता.

आदित्यने त्याच्या आजवरच्या आयुष्यात किमान लाख वेळा गोरक्षला त्या टेकडीबद्दल विचारलं होतं, पण त्याने "मला माहीत नाही कुमार आणि तुम्हीदेखील या विषयाच्या फंदात पडू नका" असं शांतपणे उत्तर देऊन विषय संपवला होता.

आज दादाजी त्याच गूढ़शा टेकडीकडे अचानक आणि अजाणतेपणे वळले होते.... आणि त्यानंतर वाड्यावर आल्या क्षणापासून त्यांनी स्वतःला लायब्ररीमध्ये कोंडून घेतलं होतं.

आदित्यच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. गोरक्ष अडवत असूनही त्याने लायब्ररीचं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. दादाजी वाचनात गर्क झाले होते. त्यांच्या पुढ्यातल्या मोठ्या स्टडी टेबलावर पुस्तकांचा ढीग होता. आदित्यराजे आत आले आहेत हे त्यांना कळलंदेखील नाही.

"दादाजी," आदित्यराजांनी उदयनराजांना हलकेच हाक मारली. राजांनी मान वर करून आदित्यकडे बघितलं. ते वाचनात इतके गुंतले होते की त्यांना भानावर येऊन समोर त्यांचा नातू आहे हे लक्षात यायला काही सेकंद लागले. मग मात्र आदित्यकड़े पाहून त्यांनी मंद स्मित केलं.

"आदी बेटा, तू इथे लायब्ररीमध्ये काय करतो आहेस? गोरक्ष कुठे आहे? मी त्याला सांगितलं होतं कोणालाही आत सोडू नकोस." राजे म्हणाले.

"दादाजी, गोरक्ष बाहेर उभा आहे. मीच जबरदस्तीने आत आलो आहे. किती वाजले आहेत याची आपल्याला कल्पना आहे का? असं काय वाचत आहात आपण?" आदित्यने दादाजींना काळजीयुक्त आवाजात विचारलं.

समोरील सर्व पुस्तकं एका बाजूला सरकवत उदयनराजे उभे राहिले. "किती वाजले कुमार? फार उशीर झाला आहे का? बरं तर. चला, बाहेर पडू इथून. आम्ही जे काही वाचत होतो, ते कधी ना कधी तुम्हालाच सुपुर्द करणार आहोत. सध्यातरी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित ठेवा." ते म्हणाले आणि आदित्यराजांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना घेऊन लायब्ररीच्या बाहेर आले.

बाहेर आल्यावर राजांच्या लक्षात आलं की बराच उशीर झाला आहे. त्यामुळे आदित्यचं काळजी करणं त्यांना पटलं. "अरे, खरंच बराच उशीर झालेला दिसतो. वाचनाच्या नादात माझ्या लक्षातच आलं नाही. मीच गोरक्षला सांगितलं होतं कोणाला आत पाठवू नकोस. त्यामुळे माझी तंद्री भंग करायला कोणी आलं नाही. बरं झालं, तुम्ही आलात कुमार. चला कुमार, आपण भोजन उरकून घेऊ." राजे म्हणाले. गोरक्ष तिथेच उभा होता. त्याच्याकडे वळून राजे म्हणाले, "गोरक्ष, मी काही पुस्तकं काढली आहेत वाचायला. त्याचे संदर्भग्रंथही काढले आहेत. ते तू स्वतः जागेवर ठेव. बाकी कोणाला काही कळणार नाही." "जी हुजूर," गोरक्ष म्हणाला आणि लायब्ररीत गेला.

आज उदयनराजे शांत होते. एरवी हॉस्पिटल, राजकारण, अगदी नवीन येणारे सिनेमे सर्वच विषयांवर ते आदित्यशी रोज गप्पा मारायचे. आज मात्र त्याचं काहीतरी बिनसलं होतं... आणि आदित्यराजांना त्याची कल्पना आली होती. आदित्यराजांना त्यांचे आई-वडील आठवतही नव्हते. त्यांना त्यांच्या दादाजींनीच वाढवलं होतं. जरी ते आदित्यराजांचे आजोबा असले, तरी ते आदित्यशी सर्व विषयांवर बोलत. आजची शांतता मात्र आदित्यराजांना खटकत होती. परंतु त्यांनी जेवताना काहीच विचारलं नाही.

झोपण्याच्या अगोदर आदित्य त्याच्या दादाजींच्या दालनाकडे वळला.

"मी आत येऊ दादाजी?" आदित्यने आत डोकावत विचारलं.

"आदी बेटा, तुला कधीपासून माझ्याकडे येताना माझी परवानगी विचारायची गरज वाटायला लागली?" हसत दादाजी म्हणाले.

"तसं नाही. आज आपण खूप अस्वस्थ वाटलात आणि दमलेलेही आहात, म्हणून विचारलं." आत येत आदित्य म्हणाला.

"मी अस्वस्थ आहे आदी बेटा, पण इतका दमलेलो नाही की मी माझ्या लाडक्या नातवाशी गप्पाही मारणार नाही." दादाजी हसत म्हणाले आणि आदीच्या खांद्यावर हात ठेवून ते त्याला खिडकीपर्यंत घेऊन गेले. त्या खिडकीतून हॉस्पिटल दिसायचं आणि त्यामागची टेकडीदेखील... अंधुकशी.

"आदी बेटा, आपल्या घराण्यामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाहीत. कदाचित मी तुला त्या कधीच सांगितल्या नसत्या. कारण काही गोष्टी या मागील पिढीबरोबर संपाव्यात अशी माझी इच्छा होती. पण तसं दिसत नाही. पूर्वीच जे लिहून ठेवलं आहे, ते आपल्याला बदलता येत नाही हेच खरं, अशा विचारापर्यंत अलीकडे मी आलो आहे." आदित्यला आपल्या दादाजींचं हे कोड्यात बोलणं समजलं नाही. त्याने प्रश्नार्थक नजरेने दादाजींकडे बघितलं. दादाजींनी एकवार आदित्यकडे बघितलं आणि ते बोलायला लागले, "आज आपल्या हॉस्पिटलमध्ये सायकॉलॉजी विभागाची प्रमुख आली. मी तिला भेटलो. तिला पाहताक्षणी माझ्या लक्षात आलं की जे माझ्याबरोबरच संपावं असं मला वाटत होतं, ते संपणार तर नाहीच, परंतु कालचक्र कदाचित परत एकदा मागे फिरणार आहे. पुढे होणार्‍या अविश्वसनीय घटनांना मला सामोरं जावं लागणार आहे. जे विधिलिखित असतं, ते बदलत नाही आदी बेटा.... हे मला आता पटलं आहे." दूर हॉस्पिटलकडे बघत दादाजी बोलत होते. त्यांनी आदित्यच्या खांद्यावरचा हात काढून घेतला होता आणि बोलता बोलता हाताची घडी घालून ते स्वतःच्याच विचारांमध्ये गढून गेले होते. आदित्य बाजूला उभा आहे हेदेखील ते विसरून गेले.

दादाजींना इतके अस्वस्थ आदित्यने कधीच पाहिलं नव्हतं. 'असं काय बघितलं त्यांनी सोनालीमध्ये?' आदित्यच्या मनात प्रश्न आला. तिला पाहताच आयुष्यात पहिल्यांदाच आदित्यच्या मनाचीदेखील चलबिचल झाली होती. पण ती तारुण्यसुलभ भावना होती. त्याला ती खूपच आवडली होती आणि त्याला हे दादाजींबरोबर शेअर करायचं होतं. परंतु त्याच्या लक्षात आलं होतं की दादाजी काहीतरी कारणामुळे अस्वस्थ आहेत. ते कारण सोनाली असू नये आणि तिच्याबद्दल काही नकारात्मक विचार त्यांच्या मनात येऊ नयेत अशी त्याने मनोमन प्रार्थना केली. दादाजींची तंद्री लागली होती... त्यांना हाक मारावी असं क्षणभर आदित्यला वाटलं. परंतु विचार करून त्याक्षणी दादाजींना एकटं सोडणं योग्य वाटून तो हळूच त्यांच्या दालनातून बाहेर पडला आणि झोपायला म्हणून आपल्या दालनाच्या दिशेने गेला. आदित्य दालनाबाहेर पडला, तेव्हा गोरक्ष तिथेच बाहेर उभा होता. आदित्यने राजेसाहेबांच्या दालनाचं दार ओढून घेतलं याचा अर्थ आता राजेसाहेब झोपणार असतील हे गोरक्षच्या लक्षात आलं. संध्याकाळपासून हुजूर का अस्वस्थ आहेत ते अजूनही त्याला कळलं नव्हतं. परंतु दुसर्‍या दिवशी एकूण सर्व उलगडा होईल असं हुजूरच म्हणाले आहेत, हे लक्षात घेऊन गोरक्षदेखील त्याच्या खोलीकडे वळला. त्याची खोली राजेसाहेबांच्या दालनाच्या बाजूलाच लागून होती. एक साधासा बिछाना आणि एक जुनी लहान अलमारी याव्यतिरिक्त गोरक्षच्या त्या खोलीत कधीच काहीच ठेवलेलं नव्हतं. आदित्य आणि गोरक्ष निद्रेच्या अधीन झाले. मात्र आत स्वतःच्या दालनामध्ये खिडकीशी उभे उदयनराजे समोर दिसणार्‍या टेकडीच्या बाह्याकृतीकडे एकटक बघत होते.......

तो बाहेर आलेला सुळका आणि त्यावरील ते मंदिर..... उदयनराजे जेव्हा बावीस वर्षांंचे झाले आणि त्यांचं लग्न ठरलं, तेव्हा त्यांच्या वडिलांनी तेथे त्यांना नेलं होतं. ती त्या घराण्याची परंपरा होती, असं त्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं. बाहेरून अंदाज येत नसला, तरी ते मंदिर आतून अत्यंत भव्य होतं. एकूण सोळा खांबांवर उभी असणारी ती वास्तू किमान चौदाव्या शतकातील असावी असा अंदाज होता. उदयनराजे आणि त्यांचे वडील गाभार्‍यात गेले. उदयनराजांना थांबण्यास सांगून त्यांच्या वडिलांनी गाभार्‍याचा अतिप्रचंड आणि अत्यंत सुंदर कोरीव काम केलेला सोळा फुटी दरवाजा प्रयत्नपूर्वक लावून घेतला.

आता आत मिट्ट काळोख दाटेल अशी कल्पना करणार्‍या उदयनला धक्का बसला. कारण दरवाजा उघडा असताना जेमतेम उजेडात दिसणारा गाभारा दरवाजा बंद होताच लख्ख प्रकाशाने उजळून निघाला होता. उघड्या दरवाजातून आत आल्यानंतर उदयनने समोर काय दिसतंय आहे हे बघण्याचा डोळे ताणून प्रयत्न केला होता. आणि इतका वेळ आपण कोणत्या देवाच्या मंदिरात आहोत याचा अंदाज घेणार्‍या तरुण उदयनच्या समोर दरवाजा बंद होताच देवीची एक अतिभव्य मूर्ती एका सिंहासनावर बसलेली दिसली. गाभार्‍याची उंची इतकी होती की वर नजर केली तर वरचा घुमट खोल आकाशात शिरला आहे असं वाटत होतं. पण त्या मूर्तीकडे बघितलं असता ती घुमटाची खोली आवश्यक आहे हे लक्षात येत होतं. कारण मान कितीही वर केली तरी ती मूर्ती आणखीनच वर वर सरकते आहे की काय असं वाटावं इतकी उंच होती. 'कलाकृतीचा एक अत्यंत उच्च दर्जाचा नमुना....' परदेशात शिकून आलेल्या उदयनच्या मनात आलेला हा पहिला विचार!

खरोखरच ती मूर्ती जितकी भव्य होती, तितकीच सुंदर, सुबक आणि मोहक होती. तिचे अवयव, अंगावरील अलंकार वर्णनातीत होते. डोळे म्हणजे दोन निळे अप्रतिम हिरे होते. सोनपिवळ्या संगमरवरी मूर्तीवरील सोन्याचे दागिने झळाळत होते. त्या मूर्तीचा केशसंभार तिला घातलेल्या मुकुटातूनही लक्षात येत होता... आणि आश्चर्य म्हणजे तो केशसंभार खरा वाटत होता. खरं तर अवाढव्य असूनही ती मूर्ती सजीव वाटत होती. तिचे डोळे आपल्याकडेच निरखून पाहत आहेत असं उदयनला वाटायला लागलं. ती मूर्ती पाहून उदयन बुचकळ्यात पडला.

"पिताजी, ही कोणती देवी आहे? कोण तिची पूजा करतं? या टेकडीवर येण्यास सर्वसामान्यांना बंदी आहे, मलासुद्धा आजवर कधी कोणी येथे येऊ दिलं नाही. मग आताच असं काय झालं की आपण दोघेच इथे आलो आहोत?" तरुण उदयनचे प्रश्न थांबत नव्हते. पिताजींनी त्याचा हात धरला आणि त्याला मूर्तीच्या जवळ नेलं. मूर्तीच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात एक अंगठी होती. एक लाल माणिक त्यात चमकत होता. पिताजींनी देवीला नमस्कार केला आणि उदयनराजांकडे बघितलं. आपणही नमस्कार केला पाहिजे हे लक्षात येऊन उदयनराजांनीदेखील वडिलांचं अनुकरण केलं. मग मात्र उदयनराजांकडे न बघता आपल डोळे मिटून त्यांचे पिताजी एक श्लोक म्हणू लागले. मात्र तो श्लोक कुठल्याशा अगम्य भाषेतला असावा हे उदयनराजांच्या लक्षात आलं. कारण त्यांना त्या शब्दांचा अर्थच लागत नव्हता. त्यामुळे ते शांतपणे हात जोडून आपल्या पिताजींच्या शेजारी त्यांचं पठण संपेपर्यंत उभे राहिले. श्लोक म्हणून होताच उदयनराजांच्या पिताजींनी एकवार उदयन राजांकडे बघितलं आणि नजर वर करून देवीच्या नजरेत नजर अडकवत देवीला साकडं घातलं......

"देवी... आज माझ्या मुलाचं उदयनचं लग्न ठरवलं आहे. तो झाल्यापासून मी रोज रात्री 'त्या' स्वप्नाची वाट पाहिली आहे. परंतु मला ते स्वप्न कधीही पडलेलं नाही. त्यामुळे त्याची वयाची एकवीस वर्षं पूर्ण होताच मी त्याचं लग्न ठरवलं आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे यापुढील जवाबदारी मी माझा मुलगा उदयन याला सोपवतो आहे. तू जशी आजवर माझ्या पूर्वीच्या पिढीच्या आणि माझ्या पाठीशी उभी राहिली आहेस, तसंच माझ्या मुलाचं, उदयनचं आणि पुढे येणार्‍या सर्व पिढ्यांचं संरक्षण कर." असं म्हणून ते देवीसमोर नतमस्तक झाले. चालू असलेला प्रकार अजूनही लक्षात न आलेला उदयनराजे पिताजींच्या त्या बोलण्याने आणखीनच गोंधाळून गेले. पण मग उदयनराजांनीदेखील आपलं मस्तक देवीसमोर टेकवलं. त्यानंतर उदयनराजांचा उजवा हात घेऊन त्याच्या पिताजींनी अचानक त्यांचा उजवा अंगठा कापला. त्याच्या अंगठ्याला लाल रक्ताची धार लागली. पिताजींनी ती त्या अंगठीतील माणकावर सोडली. तरुण उदयनराजांना हे सर्व थोडं विचित्र वाटत होतं आणि त्याहीपेक्षा अजिबात पटत नव्हतं. उदयनराजांचा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नव्हता. प्रत्येक गोष्ट विज्ञानाला धरून असावी असं त्यांचे मत होतं. परंतु त्याच्या पिताजींवर त्याचं प्रचंड प्रेम होतं. त्याच्या पिताजींच्या न्यायी आणि चांगल्या स्वभावामुळे पंचक्रोशीत त्यांच्या घराण्याला खूप आदर दिला जात असे, याची उदयनराजाना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे आपले पिताजी आता जे काही करत आहेत, त्याला तसंच काहीतरी कारण असेल याची उदयनराजांना कल्पना होती. त्यामुळे पिताजींना कुठलाही उलट प्रश्न विचारण्याची इच्छा त्यांना झाली नव्हती. जे होईल ते पाहणं तेवढं त्याच्या हातात होतं. सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि उदयनराजे आणि आणि त्यांचे पिताजी देवीकडे पाठ न करता दरवाजाकडे चालू लागले. उदयनराजांनी तो अतिप्रचंड दरवाजा उघडला आणि काय आश्चर्य... इतका वेळ लख्ख प्रकाशात उजळलेला तो गाभारा आणि ती अतिप्रचंड आणि अत्यंत सुंदर, सुबक ... जिवंत वाटावी अशी देवीची मूर्ती दोन्ही अंधारात दिसेनासे झाले.

उदयनराजे आणि त्यांचे पिताजी गाभार्‍यातून बाहेर आले आणि मंदिरातून बाहेर पडण्यासाठी चालू लागले. बाहेर येताच उदयनराजांनी प्रश्नार्थक नजरेने आपल्या पिताजींकडे बघितलं. त्यावर उदयनराजांच्या खांद्यावर थोपटत पिताजींनी "वाड्यावर जाऊन बोलू" एवढंच उत्तर दिलं आणि वडाच्या झाडांच्या रांगेच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. घोडे तिथेच बांधून ठेवलं होतं. त्या वडाच्या झाडांच्या पुढे सहसा घोडे नेणं अशक्य होत असे. कारण त्या वडांपासून पुढे एका शक्तीची हद्द सुरू होत होती, असं मानलं जात होतं. अनेकदा पुढे घातलेले घोडे उधळल्याप्रमाणे पळू लागल्याचा अनुभव मागील पिढीतील काहींनी घेतला होता, याचं उदयनराजांच्या पिताजींना स्मरण झालं. त्यामुळे वडाच्या झाडापर्यंत चालत येऊन मग घोड्यावर बसून पिताजींनी त्यांच्या घोड्याला टाच दिली. उदयनराजांनीदेखील त्यांच्या घोड्याचा लगाम आवळला आणि घोडा वाड्याच्या दिशेने भरधाव निघाला. दोघेही वाड्यावर पोहोचताच पिताजींनी उदयनराजांना घेऊन आपली लायब्ररी गाठली. आज सकाळपासून नक्की काय चालू आहे ते उदयनराजांच्या लक्षात येत नव्हतं. त्यांना आदल्या रात्रीच पिताजींकडून निरोप होता की सकाळी लवकर उठून तयार राहावं. कारण त्यांना घेऊन त्यांचे पिताजी बाहेर पडणार होते. परंतु कुठे जाणार या संदर्भात त्यांना काहीच सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळे टेकडीवरील त्या मंदिराची भेट, तेथे घडलेलं सर्व काही उदयनराजांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. उदयनराजे पिताजींबरोबर लायब्ररीमध्ये येऊन त्यांच्या समोर बसले. ते त्याच्या पिताजींच्या मुद्रेचं निरीक्षण करत होते. आजवर त्यांनी त्यांच्या पिताजीना इतकं चिंतेत कधीच पाहिलं नव्हतं. त्याचे पिताजी एक अत्यंत लोकप्रिय राजे होते. त्यांच्या प्रजेवर त्यांचं मुलाप्रमाणे प्रेम होतं. तो पारतंत्र्याचा काळ असूनही त्यांनी त्यांच्या प्रजेचा खूप नीट सांभाळ केला होता. यामुळे उदयनराजांना त्यांच्या पिताजींबद्दल मनात प्रचंड आदर होता.

उदयनराजे काही न बोलता शांतपणे पिताजी बोलण्याची वाट बघत होते. काही वेळ डोळे मिटून बसल्यानंतर त्यांच्या पिताजींनी बोलण्यास सुरुवात केली. "उदयनराजे, तुम्ही आता बावीस वर्षांचे झाला आहात. तुमचं लग्न ठरलं आहे आणि म्हणूनच आता तुम्ही या घराण्याच्या एका गुपिताचे रक्षणकर्ते होण्याच्या लायकीचे झाला आहात. आपल्या घराण्याचा इतिहास खूप जुना आहे. अगदी शेकडो वर्षांपूर्वीचा म्हणा ना. त्या काळात आपल्या घराण्याचे आद्यपुरुष निसर्गाला देव मानत असत. त्यांनी कधीच मूर्तिपूजेला महत्त्व दिलं नाही. लोकांची सेवा करणं आणि निसर्गाचं संरक्षण करणं हे दोनच धर्म त्यांनी कायम पाळले. असं म्हणतात की ते इतके रूपवान होते की त्यांना पाहून मदनालाही लाज वाटली असती. मात्र त्यांचा स्वभाव अत्यंत सेवाभावी, कर्तव्यदक्ष आणि कनवाळू होता. केवळ मनुष्य नाही, तर ते निसर्गातील प्रत्येकाचा आदर करायचे आणि संरक्षण करायचे. त्या काळातील लोकांची वस्ती जंगलातच असे. त्यामुळे एकदा जंगलात विहार करणारी एक अमानवी रूपसुंदरी आपल्या आद्यपुरुषाच्या पौरुषावर भाळली. तिने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्यासाठी ती तिच्या सर्व शक्ती आणि दिव्यत्वदेखील त्यागायला तयार होती, अशी वंदता आहे.

परंतु आपले आद्यपुरुष अगोदरच विवाहित होते. त्या काळात द्विभार्या असणं चुकीचं नव्हतं. परंतु ते त्यांना मात्र मान्य नव्हतं. त्यांच्या पत्नीवर त्यांचं नितांत प्रेम होतं. त्यामुळे त्या रूपसुंदरीनेदेखील त्यांचा नकार मान्य केला. परंतु तिचं त्यांच्याविषयीचे प्रेम कमी झालं नाही. त्यामुळे तिने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, "पुढील जन्मी आपण माझ्याशी विवाह करण्याचं वचन द्या." तिच्या त्या बोलण्याने आपले आद्यपुरुष विचारात पडले. मात्र त्यांना विचार करताना बघून तिने त्यांना असा शब्द देण्याची गळ घातली. त्या वेळी आपल्या आद्यपुरुषांनी त्यांच्यासमोरचा पेच तिच्यासमोर मांडला. ते म्हणाले, "देवी, तुला माझ्याशीच विवाह करायचा आहे. परंतु माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्यामुळे मी परत याच घराण्यात जन्म घेईनच की नाही ते मी कसं सांगू? आणि मी जन्म घेतलाच, तरी मला या जन्मीचं काही आठवेल हेदेखील शक्य नाही. बोलूनचालून मी एक मानव आहे." त्या वेळी ती शक्तिरूप सुंदरी म्हणाली, "मी तुमच्यावर प्रेम केलं आहे. तुमच्या घराण्यावर माझं कायम लक्ष असेल. तुम्ही जाणताच की माझ्यात प्रचंड मोठी शक्ती वास करते. मी तुम्हाला शब्द देते की मी माझी शक्ती कायम तुमच्या घराण्याच्या पाठीशी उभी करीन. यापुढे तुमच्या घराण्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, आणि मी माझ्यातील शक्तीमुळे तुमचा जन्म झाला की तुम्हाला ओळखीन. योग्य वेळ येताच आपल्या या वचनाची आठवण करून देईन. तुमच्याशी विवाह करून मानवी जीवन स्वीकारून संसार करेन. यापुढे माझ्या अस्तित्वाचा हा एकच उद्देश असेल."

आद्य पुरुषाने विचारलं, "ती योग्य वेळ माझ्या घराण्यातील त्या वेळच्या व्यक्तीला कशी समजावी?" तेव्हा ती म्हणाली, "तुमच्या घरात मुलगा जन्मल्यापासून बावीस वर्षांपर्यंतच्या काळात एकदा कधीतरी त्या मुलाच्या वडिलांच्या स्वप्नात येऊन मी माझी ओळख पटवीन. त्यानंतर मात्र त्या मुलाचं लग्न माझ्याशी करण्यास तुमचं घराणं बांधील राहील." आद्यपुरुषाने त्या वेळी त्या रूपसुंदरीचं म्हणणं मान्य केलं. परंतु त्या वेळीच त्यांच्या लक्षात आलं होतं की ही शक्ती संरक्षणाच्या नावाखाली आपल्या घराण्यावर गारुड करून बसण्याच्या विचारात आहे. आपल्यावरील प्रेमापेक्षाही हिला मनुष्यजन्मात येऊन स्वतःची दुष्ट प्रजा वाढवण्याची इछा आहे. अर्थात त्या वेळी त्या शक्तीशी लढण्याची आपली कुवत त्या क्षणी नाही, हेदेखील आपल्या आद्यपुरुषाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे जेव्हा योग्य वेळ येईल त्या वेळी आपल्या घराण्यातील पुढील पिढीतील पुरुष तिला योग्य उत्तर देतील हा त्यांच्या मनात विश्वास होता. मात्र यानंतर आपल्या घराण्यात असा अलिखित नियम झाला की जन्मलेल्या मुलाचं लग्न वयाच्या बाविसाव्या वर्षापर्यंत करायचं नाही.

त्यानंतर ते दोन कालातीत आत्मे जिथे भेटले होते, तिथे त्यांच्या भेटीची आठवण म्हणून ते मंदिर उभारण्यात आलं. परंतु कुठलीही मूर्ती तिथे स्थापन केली गेली नव्हती. आपल्या आद्यपुरुषाचा मृत्यू झाला, त्यानंतर अनेक दिवसांनंतर त्या मंदिरात त्यांचा मुलगा गेला असता त्याला त्या अतिभव्य आणि सुंदर मूर्तीचं दर्शन झालं. त्या मूर्तीचे ते निळे डोळे खरोखरच आपल्यावर नजर ठेवून आहेत असा त्या मुलाला भास झाला आणि तो तिथून निघून आला.

अर्थात आपल्या घराण्यातील कोणीही कधीही त्या मूर्तीचं पूजन केलं नाही. त्यामुळे त्या वास्तूला मंदिर का म्हटलं जातं हादेखील एक प्रश्नच आहे. कदाचित प्रचलित भाषेत तशा वास्तूला मंदिर म्हणतात म्हणूनही असेल. अर्थात हे मंदिरही सर्वसामान्यांसाठी खुलं केलं गेलं नाही. कोणी तिथे त्या मंदिरातच काय, पण त्या टेकडीवरदेखील जाऊ नये म्हणून त्या संदर्भात कथा-दंतकथा प्रसवित केल्या. कारण शेवटी ती एक अमानवी शाक्ती होती. वडाची अनेक झाडं मुद्दाम लावून एक प्रकारे ती शक्ती आणि सामान्य मानव यांच्यात एक सीमारेषा बांधण्यात आली.

पिढ्यांमागून पिढ्या गेल्या, परंतु आजवर कोणालाही असा कोणताही दृष्टान्त मिळाला नाही. त्यामुळे ही आपल्या घराण्याची दंतकथा आहे की खरंच कधीकाळी असं घडलं होतं, ते सांगता येत नाही. परंतु बावीस वर्षांपर्यंत मुलाच्या लग्नाचा विचारही आपल्या घराण्यात केला जात नाही." पिताजी बोलायचे थांबले. एकूण ही कथा ऐकून उदयनराजे शांत झाले होते. नवीन विचारांच्या उदयनराजांचा या कथेवर अजिबात विश्वास बसला नाही. परंतु त्यांनी पिताजींशी कोणताही वाद घातला नाही.

बोलून पूर्ण होताच पिताजी उठले आणि त्यांनी त्यांच्या खुर्चीमागील एक कळ दाबली. तेथील कपाट आवाज न करता सरकलं आणि तेथून आत जाण्याचा मार्ग दिसू लागला. पिताजींनी खूण करताच उदयनराजे उठून त्यांच्या मागोमाग चालू लागले. तो एक भुयारी मार्ग होता. आत साधारण पाच-सात मिनिटं चालून गेल्यावर उजवीकडे एक दरवाजा लागला. पिताजी दरवाजा उघडून आत गेले. त्यांच्यापाठोपाठ उदयनराजेदेखील खोलीत प्रविष्ट झाले.

आत अनेक संदुकी विविध खजिन्याने भरलेल्या होत्या. ती हिरे-माणकं, रुप्ये-मोती बघून उदयनराजांचे डोळे दिपले. मात्र पिताजींनी इथे तिथे न बघता त्यांना घेऊन एका संगमरवरी कपाटाकडे गेले. ते उघडून त्यांनी आतून एक मोठी वही काढली. ती वही अत्यंत जीर्ण वाटत होती. परंतु तरीही त्यातील कागद अत्यंत दर्जेदार होते, हे उदयनराजांच्या लक्षात आलं. पिताजींनी तिथेच असलेली लेखणी उचलली आणि शाईची दौत उघडून लिहायला सुरुवात केली. तारीख, वर्ष आणि वेळ लिहून झाल्यानंतर त्यांनी मुख्य मसुदा लिहायला घेतला....

....माझा पुत्र उदयनराजे यांच्यासाठी विक्रमराजे यांच्या कन्येचं स्थळ सांगून आलं आहे. उदयनराजे यांनी वयाची बावीस वर्षं पूर्ण केली आहेत. मला या काळात शक्तिरूप सुंदरींनी कोणतीही ओळख पटवून दिली नाही. त्यामुळे मी हा विवाह ठरवीत आहे. त्यांचा मसूदा लिहून झाला आणि त्यांनी त्यावर मोहोर उठवली. त्यानंतर त्यांनी हे सर्व उदयनराजे यांना दाखवलं. उदयनराजे यांनी पिताजींची परवानगी घेऊन मागील काही पिढ्यांची नोंद बघितली. सर्व पानांवर साधारण सारखीच नोंद होती. त्यानंतर ती नोंदवही बंद करून दोघेही बाहेर आले. पिताजींनी दार ओढून घेतलं.

"पिताजी, या दाराला कड़ी नाही?" उदयनराजांनी पिताजींना विचारलं.

"बेटा, इथे फ़क्त आपल्या घराण्यातील व्यक्तीच येऊ शकतात. त्यामुळे कडीकोयंड्याची गरज नाही. हा गुप्त मार्ग अनेक वर्षांपूर्वी बनवला गेला आहे. त्यामुळे आजवर हा मार्ग फ़क्त मलाच माहीत होता आणि आता माझ्याकडून तो तुला माहीत झाला आहे. या मार्गाची माहिती अशा प्रकारे पुढच्या पिढीला दिली जाते. आपल्या घराण्याव्यतिरिक्त याची माहिती कोणालाही कधीही होणं शक्यच नाही. त्यामुळे इथे कडीकोयंड्याची गरजही नाही. हे भुयार पुढे मंदिराच्या दिशेने जातं, असा आपल्या घराण्याच्या पुस्तकात उल्लेख आहे. परंतु मी कधीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या पिढीतील पुरुष कधीतरी मंदिरात जात म्हणे. ती शक्ती त्यांना बोलावून घेत असे, असा उल्लेख आहे त्या नोंदवहीत. परंतु माझ्या पिताजींना कधी असं बोलावणं आलं नाही आणि मलादेखील नाही. त्यामुळे त्या मार्गाने मी कधीच गेलो नाही."

त्यानंतर एक सुस्कारा सोडून उदयनराजांच्या वडिलांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली, "मी स्वतःला खूपच सामान्य मानतो उदयनराजे. त्यामुळे माझं असं मत आहे की ती जी काही शक्ती त्या वेळी जर खरोखरच आपल्या आद्यपुरुषावर भाळली असेल आणि पुढे घडलेल्या घटना खर्‍या असतील, तर मग हा खजिना तिनेच आपल्याला दिला असेल. परंतु आपल्या मागील पिढीतील कोणीही या खजिन्याला हात लावलेला नाही. तसं करू नये असं कुठेही लिखित स्वरूपात नाही. परंतु ती शक्ती अमानवी असल्याने ती संपत्तीदेखील शापित असेल असं आपण मानतो. अर्थात आजवर आपल्या मागील सर्व पिढ्यांमध्ये कधी कोणी अय्याशी केली नाही. आपल्या आद्यपुरुषाने प्रामाणिकपणे घेतलेला समाजसेवेचा आणि निसर्ग संरक्षणाचा वसा आपल्या घराण्यातील प्रत्येकाने चालू ठेवला. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला कधी काही कमी केलं नाही आणि हा अमानवी खजिना वापरण्याची गरज कधीही आपल्याला पडली नाही." असं म्हणून पिताजी उदयनराजांना घेऊन त्या भुयारातून परतीच्या मार्गाला लागले.

पिताजींच्या मागून चालताना मात्र उदयनराजांचं लक्ष मागील भुयारी मार्गाकडे लागलं होतं. त्यांना त्या मार्गाने मंदिराच्या दिशेने जाण्याची इच्छा होती. परंतु त्यांनी ती इच्छा त्या वेळी मनात दडपून टाकली.

परत लायब्ररीमध्ये येऊन आपल्या आसनावर स्थानापन्न होताना पिताजींनी सुटकेचा एक हलका सुस्कारा टाकला आणि उदयनराजे यांच्याकडे बघून त्यांनी पाणी देण्याची खूण केली. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी उदयनराजांना जवळ बसण्यास सांगितलं.

"उदयन, बेटा, आज मी तुला जे जे सांगितलं आहे, ते गुपित प्राणपणाने जप आणि पुढे तुझ्या पुढील पिढीकडे सुपुर्द कर." असं म्हणत त्यांनी उदयनराजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. उदयनराजांनी मंद स्मित करत होकारार्थी मान हलवली.

"बेटा, आता मी तुला आणखी एक गोष्ट. मात्र तिचा संबंध आपल्या मागील पिढीशी अजिबात नाही. ती फक्त तुझ्या-माझ्यातली...." असं म्हणून पिताजी क्षणभर थांबले. त्यांनी डोळे मिटून घेतले. जणू काही ते काही क्षणांसाठी भूतकाळात गेले होते. उदयनराजे शांतपणे आपल्या पिताजींकडे बघत होते. त्यांच्या मनात आलं - आजचा दिवस बहुतेक आपल्या स्मरणात आपल्या अंतापर्यंत राहणार आहे. आतापर्यत आपल्याला पिताजींनी इतकं काही सांगितलं आहे की ते सर्व सांभाळणं आपल्याला अवघड वाटतं आहे. आणि तरीही पिताजींना आपल्याला आणखीही काहीतरी सांगायचं आहे. याचा अर्थ आपल्या वडिलांनी हे सर्व स्वतःच्या मनात गेली अनेक वर्षं जपलं आहे. इतका तणाव मनात घेऊनदेखील त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्यांनी कधी याचा परिणाम होऊ दिला नाही. याचा अर्थ आपल्यालादेखील त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊन चालणार नाही. विचार करताना उदयनराजांची तंद्री लागली होती. त्यांना त्यांच्या विचारातून जागे करत त्यांचे पिताजी परत बोलायला लागले. "उदयन, तुला एक माझ्या मनातला विचार सांगतो. ज्याप्रमाणे या पुरातन शक्ती आपल्याला मदत करतात, त्याप्रमाणे जर त्या कोप पावल्या, तर आपल्याला कायमचं संपवून टाकण्याची ताकदही त्यांच्यात असते." पिताजींच्या या वाक्याने उदयनराजे थोडे गोंधळले. पिताजी आपल्याच विचारात गर्क होते. "तुम्हाला असं का वाटतं पिताजी?" उदयनराजांनी विचारले.

"उदयन, मला कधीच तुझ्या बाबतीत कुठलंही खुणेचं स्वप्न पडलं नाही. परंतु तरीही मी गेल्या काही रात्री खूप अस्वस्थ आहे. तुला मंदिरात नेण्याअगोदर एकदा मी एकटाचदेखील जाऊन आलो होतो. त्या अतिप्रचंड 'स्वयंभू' मूर्तीसमोर उभा राहून मी माझी अस्वस्थता मांडली. मला कसा कोण जाणे, पण संकेत मिळाला की मी तुझ्यापासून काही लपवू नये. त्यामुळे आता मी तुला काय सांगतो आहे ते नीट ऐक. उदयन, तुला एक भाऊ आहे.... किंवा होता... खरं सांगू? तो या जगात आता आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. माझ्या तारुण्यातली ती चूक होती.... परंतु त्याला चूक तरी कसं म्हणू? असो! माझ्या तरुणपणी माझ्या माँसाहेबांच्या सेवेसाठी एक खूप सुंदर दासी होती. माझं मन तिच्यावर आलं. एकवीस वर्षांचा होतो मी. आम्ही जवळ आलो आणि तिला दिवस राहिले. ही बातमी कळताच माँसाहेब घाबरल्या. माझ्या वडिलांच्या कानावरही न जाऊ देता त्यांनी तिला नाहीसं केलं. मी खूप प्रयत्न केला माहिती काढायचा. माझं तिच्यावर खरंच मनापासून प्रेम होत. मी तिला तिचा मान-सन्मान देणार होतो. एक अंगवस्त्र ठेवण्याची मुभा मला मिळाली असती असा त्या वेळी माझा समाज होता. कारण मला आपल्या घरण्याची ही कथा माहीत नव्हती. परंतु माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटपर्यंत मला तिच्याबद्दल काहीच कळलं नाही, किंबहुना माँसाहेबांनी कधीही काहीही कळू दिलं नाही. त्याच्या पुढच्या वर्षी मी बावीस वर्षांचा झालो आणि आज जसं मी तुला मंदिरात आणि नंतर त्या गुप्त भुयारात नेलं, तसंच मला माझ्या वडिलांनी नेलं. आपल्या घराण्याची कहाणी कळल्यानंतर मात्र मी खूप घाबरलो होतो. मी पुन्हा एकदा तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु काहीही हाती लागलं नाही. मी बावीस वर्षांचा होण्याअगोदर माझ्या मातोश्रींचा देहान्त झाला असल्याने त्यांच्याकडूनही काही समजणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा अंत झाला असेल असा विचार करून तो विषय तिथेच सोडून दिला.

आणि आता मला मागील वर्षी एक दृष्टान्त झाला. आपल्या आद्यपुरुषाचा अंश माझ्या त्या अनौरस पुत्रात आहे... होता... असं ते स्वप्न होतं. काय म्हणू मी? पण माझ्या स्वप्नात ती शक्ती आली होती. तिने मला सांगितलं की माझ्या प्रथम पुत्राशी लग्न करण्याची तिची इच्छा आहे. परंतु मी माझी हतबलता तिला सांगताच ती संतापाने लाल झाली. 'या तुझ्या कर्माची फळं तुझी पुढील पिढी भोगेल', असं सांगून निघून गेली. त्या वेळी माझ्या असं लक्षात आलं की माझा पहिला पुत्र बहुतेक जिवंत असू शकतो. परंतु त्याला कसं शोधावं हे मला कळत नाही. आज तुला हे माझ्या आयुष्यातलं सत्य सांगून मला खूप हलकं वाटतं आहे. उदयन, मी तुझा, त्या कधीही न बघितलेल्या माझ्या प्रथम पुत्राचा आणि येणार्‍या प्रत्येक पिढीचा गुन्हेगार आहे, हे मला माहीत आहे. परंतु माझ्या हातून जे झालं, ते नकळत झालं आणि माँसाहेबांनी जे केलं, त्यावर तर माझा काहीच ताबा नव्हता."

पिताजी बोलायचे थांबले. त्यांचा चेहरा दुःखाने काळवंडला होता. उदयनराजे उभे राहिले आणि पिताजींसमोर गुडघे टेकून बसले आणि त्यांनी पिताजींचा हात हातात घेतला. "पिताजी, तुम्ही काळजी करू नये. मी सर्व सांभाळून घेईन." ते म्हणाले.

मंद स्मित करून पिताजी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांच्या दलनाकडे गेले. त्याच रात्री पिताजींचं देहावसान झालं. पुढे उदयनराजांच्या माँसाहेबांनी पुढाकार घेऊन उदयनराजांचं ठरलेलं लग्न लावून दिलं.

उदयनराजे कधीच त्यांच्यात आणि त्यांच्या वडिलांच्यात झालेला शेवटचा संवाद विसरू शकत नसत. एकदा त्यांनी हे दुःख त्यांच्या पत्नीकडे - पद्मिनीकडे बोलून दाखवलं.

सर्व ऐकून घेतल्यानंतर पद्मिनीदेवींनी उदयनराजांना सुचवलं की आपण एक मोठा निसर्गोत्सव आयोजित करा. निसर्गाचे आणि प्रजेचे पालक अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळे आपण आयोजलेल्या उत्सवाबद्दल कोणी आश्चर्य व्यक्त करणार नाहीच. या उत्सवाच्या सांगता समारोहाला वाड्यावर आजवर काम केलेल्या सर्व जुन्या लोकांना बोलवा आणि जर ते नसतील तर त्यांच्या नातेवाइकांना बोलवा. कदाचित आपल्या वडिलांच्या मोठ्या पुत्राला तुमच्या मनात असलेल्या इच्छेचा अर्थ लागू शकतो आणि त्याचा काही पत्ता लागू शकतो. हीच तुमच्या पिताजींना दिलेली आदरांजली असेल.

उदयनराजांना हा विचार पटला आणि त्यांनी निसर्गोत्सवाची घोषणा केली. उत्सव यथासांग पार पडला. कुठून कुठून सर्वदूर पसरलेले सर्व नवे-जुने लोक, वाडयाशी कधी ना कधी नाते जुळलेले सर्व जण येऊन गेले. परंतु उदयनराजे ज्यांची वाट पाहत होते, ते मात्र आले नाहीत. त्यांच्या मनाने तसं त्यांना सांगितलं नाही. सरतेशेवटी सांगता समारोह झाला आणि उत्सव संपला. उदयनराजे जड़ अंत:करणाने त्यांच्या महाली बसले होते. ज्या मनीषेने त्यांनी हा उत्सव केला होता, ती पूर्ण नाही झाली याचं त्यांना खूप दुःख झालं होतं. परंतु हळूहळू राजांनी ते दुःख मागे टाकलं. आपलं राज्य आणि संसार यात ते रमले.

यथावकाश उदयनराजांना एक मुलगा झाला.... भास्कर! हुशार भास्करला वकील व्हायचं होतं. परदेशातही जाऊन शिकण्याची त्याची इच्छा होती आणि उदयनराजेदेखील त्याला खूप शिकवणार होते. भास्कर वकील झाला आणि त्याने पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याची इच्छा व्यक्त केली. उदयनराजांनी त्याला जाण्याची परवानगी दिली.

त्याच रात्री त्यांना स्वप्न पडलं... स्वप्नात ते त्या भव्य मंदिराच्या गाभार्‍यात उभे होते. समोर ती प्रचंड मूर्ती होती आणि तिचे ते निळे पाणीदार डोळे उदयनराजांवर रोखलेले होते. त्यांना अचानक खर्जातील एक आवाज ऐकू आला. "राजे, आपल्या पिताजींच्या हातून एक गुन्हा घडला. त्याचं प्रायश्चित्त तुम्ही घेणार का? जर ते मान्य असेल तर ठीक. नाहीतर पुढे घडणार्‍या दुर्दैवी घटनांची जवाबदारी तुमची."

राजे क्षणभर गोंधळले. परंतु नंतर ठामपणे त्यांनी उत्तर दिलं... "आपण जी कोणी शक्ती आहात, त्या शक्तीला माझा सादर प्रणाम. परंतु मला असं अजिबात वाटत नाही की माझ्या पिताजींच्या हातून जाणूनबुजून कोणता गुन्हा झाला आहे. त्यांनी प्रेम केलं होतं. परंतु त्या प्रेमाला त्यांनी जगासमोर स्वीकारण्याअगोदरच सर्व घटना त्यांच्या हाताबाहेर गेल्या. जो गुन्हा घडलाच नाही, त्याचं प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला असंही वाटतं की आपण जे काही आजवर या घराण्याला दिलं आहे, ते एकतर्फी आहे. आम्ही ते काहीच कधीच मागितलं नाही किंवा स्वीकारल्याचा उल्लेखही नाही. आपण आमच्या आद्यपुरुषाकडे आपली इच्छा व्यक्त केलीत. त्या वेळीही आपणास स्वीकारण्यातील असमर्थता त्यांनी आपणास सांगितली होती. आमच्या कुठल्याही पिढीने आपली कोणतीही मदत स्वीकारलेली नाही. त्यामुळे आम्ही आपले बांधील नाही."

येणारा आवाज आणखीनच उग्र झाला. "राजे, आपण माझा अपमान करीत आहात." त्या आवाजाने क्रुद्ध होऊन म्हटलं.

राजे तेवढेच शांत होते. ते म्हणाले, "हे शक्ती, मी उदयनराजे तुझं आमच्या वंशावर असणारं गारुड आज झुगारून देतो. तू आमच्या आद्यपुरुषावर भाळली होतीस अशी दंतकथा आहे. परंतु आम्ही कधी तुझा स्वीकार केलेला नाही. आम्ही आणि आमच्या मागील सर्व पिढ्यांनी कायम प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज आमचं घराणं नावारूपाला आलं आहे. आजवर तुझी विवाहेच्छा जर ईश्वराने पूर्ण केली नाही, तर मग मी हा त्या सर्वव्यापी ईश्वराचा संकेत समजतो. सामान्य मानव आणि अशी बाह्य शक्ती एकत्र येऊ नये अशी त्याची इच्छा असावी. त्यामुळे यापुढे मी तुला आणि तुझ्या शक्तीला मानत नाही."

राजांचं बोलणं पूर्ण होतं न होतं, तोच अचानक प्रचंड गडगडाट झाला आणि राजांना जाग आली.

परंतु त्या दिवसानंतर उदयनराजांना कधीही कोणतंही स्वप्न पडलं नाही. भास्कर लंडन येथे गेला आणि त्याने तेथे उच्च शिक्षण घेतलं. त्या दरम्यान त्याचं आणि त्याच्याबरोबर वकिलीचं शिक्षण घेणार्‍या लॉर्नाचं प्रेम जुळलं आणि त्यांनी तेथेच लग्नही उरकलं. तसंही भास्करने इथे यावं असं उदयनराजांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनीदेखील कोणतीही हरकत घेतली नाही. यथावकाश आदित्यराजांचा जन्म झाला आणि ही गोड बातमी घेऊन आणि पत्नी आणि नवजात अर्भक घेऊन भास्कर इथे येण्यास निघाला. त्याने उदयनराजे किंवा आपल्या मातोश्री यांना त्याची कल्पना दिली नव्हती.

नेमकं त्याच रात्री पद्मिनीदेवींना स्वप्न पडलं. त्या दचकून जाग्या झाल्या आणि त्यांनी उदयनराजांना उठवलं. आजवर घराण्यातील कोणतीही स्त्री त्या मंदिरात गेली नव्हती. परंतु पद्मिनीदेवींनी स्वप्नात ती मूर्ती बघितली होती. त्यांनी राजांना त्या मूर्तीचं हुबेहुब वर्णन केलं आणि पुढे म्हणाल्या की त्यांनी खर्जातील एक क्रुद्ध आवाज ऐकला की पद्मिनीराजे कधीही आपल्या सुनेला, मुलाला आणि नातवंडाला बघू शकणार नाहीत. उदयनराजांनी त्यांना शांत केलं आणि सकाळ होताच भास्करला ट्रंककॉल लावून देण्याचं वचन दिलं. परंतु उगवता सूर्य बातमी घेऊन आला की आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी त्यांना न सांगता पत्नी आणि आदित्यराजे यांना घेऊन इथे येण्यास निघालेले भास्करराजे आणि त्यांची पत्नी विमान अपघातात मृत्युमुखी पडले. आदित्यराजांचा अजूनही पत्ता नव्हता. ही बातमी एकताच पद्मिनीदेवी कोसळल्या, त्या परत कधीच उठल्याच नाहीत. उदयनराजांना इथे आड तिथे विहीर असं झालं. तरुण उमदा पुत्र आणि त्याची पत्नी गेल्याचं दुःख करावं की आपली सावली म्हणून आयुष्यभर साथ दिलेल्या सुविद्य पत्नी गेल्याचं दुःख करावं हे त्यांना उमजेना. परंतु सर्व दुःख बाजूला सारून ते त्वरित आदित्यराजांचा शोध घेण्यास निघाले. आकाशपातळ एक करून त्यांनी आदित्यराजांचा शोध लावला आणि त्याना घेऊन ते वाड्यावर आले.

त्या दु:खद बातमीनंतर आदित्यराजे मिळेपर्यंत अनेक रात्री उदयनराजे झोपले नव्हते. त्यामुळे परतल्यानंतर आदित्यची नीट व्यवस्था लावून ते नुकतेच त्यांच्या दालनात विश्रांतीसाठी आले होते. तेवढ्यात वर्दी घेऊन त्यांचा ख़ास माणूस आला की कोणी खूप जुनी ओळख सांगून आत्ता भेटण्याची वेळ मागत आहे. खूप जुनी ओळख या शब्दांनी उदयनराजे हेलावले आणि त्याच पावली कोण आलं आहे ते बघण्यास आले. जवळपास राजांच्याच वयाचा पुरुष एक त्यांना दिसला. त्याने राजांना मुजरा केला आणि कमरेचा एक लाखोटा काढून त्यातून एक खूप जुना कागद काढून राजांपुढे ठेवला. तो कागद उघडून राजांनी मजकूर वाचला आणि राजे त्यांला घेऊन लायब्ररीमध्ये गेले. राजांनी त्याला समोर बसवलं आणि खूण केली, तसं तो बोलू लागला. "हुजूर, मी गोरक्ष. आपला मोठा बंधू. अर्थात हे सत्य मला गेल्या वर्षीच समजलं. माझ्या माईकडून. आम्ही आपल्याच राज्यातील एका लहान खेड्यात राहतो. आपल्या पिताजींच्या मृत्यूनंतर मला माझ्या माईने माझ्या जन्माचं रहस्य सांगितलं. परंतु त्याचबरोबर शब्द घेतला की मी कधीही कोणालाही माझ्या जन्माचं रहस्य सांगणार नाही. मी आजवर तिला दिलेला शब्द पाळला. मी एक सामान्य जीवन जगतो आणि त्यात सुखीदेखील आहे. परंतु काही दिवसांपूर्वी माझी माई स्वप्नात आली आणि मी तुम्हाला भेटून माझ्या जन्माची हकीकत सांगावी असं म्हणाली. केवळ म्हणून मी इथे आलो आहे. हुजूर, मी एकटा जीव आहे. मला कोणताही मोह नाही. मी लहानपणापासून माईकडून आपल्या घराण्याबद्दल खूप ऐकलं आहे. त्यामुळे आज जर मी आपल्या कोणत्या कामी येणार असलो, तर मला खूप आनंद होईल."

राजांनी त्याच्याकडे टक लावून बघितलं. त्यानंतर परत एकदा हातातल्या त्या जुन्या कागदावर लिहिलेलं वाचलं. त्यावर असं नमूद केलं होतं की वाड्यावरील 'राजसी' या दासीला राज्याच्या वेशीकडील एका लहान गावातील एक जमिनीचा तुकडा शेतीसाठी देण्यात आला होता आणि तिला कधीही वाड्यावर येण्यास बंदी घालण्यात आली होती. उदयनराजांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि ते गोरक्षचं निरीक्षण करू लागले. राजांच्या अनुभवी नजरेला गोरक्षच्या प्रामाणिकपणाची ओळख पटली आणि मग मात्र जिवाभावाच्या मित्राप्रमाणे त्यांनी गोरक्षला आजवरची संपूर्ण कहाणी सांगितली. सरतेशेवटी गोरक्षच्या खांद्यावर डोके ठेवून राजे म्हणाले, "खूप दमलो आहे रे गोरक्ष मी. आता अजून एकट्याने नाही झेपत."

त्यांना थोपटत आणि एकूण सर्व ऐकून आश्चर्यचकित झालेला गोरक्ष म्हणाला, "राजे, यापुढे आपण एकटे नाही आहात. हा गोरक्ष तुमची सावली बनून आजन्म राहील. आदित्यराजेंना मोठं करण्याची जवाबदारी आहे आपल्यावर. मागे जे काही घडलं तेव्हा मी नव्हतो, ना ते आपण कोणी बदलू शकत. परंतु यापुढे घडणार्‍या प्रत्येक घटनेत मी तुमच्या बरोबरीने असेन आणि हे माझं आपणास वचन आहे की जे रक्त माझ्या नसातून खेळतं आहे, त्याला मी आयुष्यभर प्रामाणिक राहीन. फ़क्त एकच परवानगी द्या. मी एकदाच जाऊन त्या मंदिराला भेट देऊन येईन म्हणतो." राजांनी काही वेळ त्याच्याकडे बघितलं आणि मग होकारार्थी मान हलवली. दुसर्‍या दिवशी गोरक्ष एकटाच या मंदिरात जाऊन आला. परंतु त्याविषयी उदयनराजे किंवा गोरक्ष यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. तो दिवस आणि आजचा दिवस गोरक्ष त्याच्या वचनाला जागला आहे!

खिडकीशी उभे उदयनराजे समोर दिसणार्‍या टेकडीच्या बाह्याकृतीकडे बघत होते. आज संपूर्ण जीवनपट त्यांच्या डोळ्यासमोरून सरकला होता......

हा सर्व इतिहास परत आठवण्याचं कारणही तसंच फार विचित्र होतं. उदयनराजांनी ड़ॉ. रानडेंच्या सांगण्यामुळे इंटरव्ह्यूही न घेता जिला अपॉइंट केलं होतं, त्या सोनालीला पाहताच त्या मंदिरातील अप्रतिम सौंदर्य असलेल्या मूर्तीची आठवण होत होती. मुख्य म्हणजे सोनालीचे निळे डोळे त्या नीलहिर्‍यांची आठवण करून देत होते. स्वतः उदयनराजांनीच शेवटचा असा त्या शक्तीशी ज्या वेळी संवाद साधला होता, त्या वेळी एकूणच तिचा त्यांच्या घराण्याशी असणारा अनेक पिढ्यांचा संबंध नाकारला होता. आणि आज एक काही वेगळीच गोष्ट त्यांच्या समोर येऊन ठाकली होती, ज्याच्यावर त्यांचा नातू आदित्य किंवा ती मुलगी सोनाली यांनीदेखील विश्वास ठेवला नसता. केवळ गोरक्ष हा एकच असा होता की त्याला सर्व केवळ माहीत होतं असं नाही, तर तो साक्षदेखील होता काही प्रमाणात. उदयनराजांनी एक सुस्कारा सोडला.

बाहेर हलकीशी किलबिल ऐकू येऊ लागली आणि उदयनराजांचं सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. सकाळचे चार वाजत आले होते. अकरा वाजता हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफची मीटिंग त्यांनी स्वतः बोलावली होती. त्याअगोदर थोडी विश्रांती आवश्यक होती. राजांनी त्या टेकडीच्या दिशेने एक दृष्टिक्षेप टाकला आणि ते मंचकावर जाऊन स्वस्थ पडले.

त्याच वेळी सोनाली मात्र झोपेतच अस्वस्थपणे सारखी कूस बदलत होती. तिला काल संध्याकाळी बघितलेलं स्वप्नच परत दिसत होतं. तिला स्वप्नात एक तरुण आणि एक तरुणी हसत एक टेकडी चढ़ताना दिसले. जरी ते स्वप्न होतं, तरी सोनालीच्या खोल जागरूक मनाने ती टेकडी ओळखली. तिला काल जे क्वार्टर्स अ‍ॅलॉट झाले होते, त्याच्या खिडकीतून तिला ती टेकडी दिसली होती. एक सुळका बाहेर आलेली..... मोडकं मंदिर असलेली.

अचानक त्या तरुणीने मागे वळून बघितलं आणि सोनाली किंचाळून जागी झाली. तिने घाईघाईने आरशात जाऊन स्वतःला न्याहाळलं. ती परत आपल्या बेडवर येऊन बसली. तिने घड्याळ बघितलं. सकाळचे चार वाजले होते. तिला ते स्वप्न परत आठवलं. ती हसता हसता मागे वळून बघणारी तरुणी कोणी दुसरी-तिसरी कोणी नसून स्वतः सोनाली होती. आणि जरी ते स्वप्नच होतं, तरीही त्या तरुणीने वळून आपल्याकडेच... थेट आपल्या डोळ्यात... बघितलं, याची सोनालीला खातरी होती. त्या नजरेत एक आव्हान.... एक छद्मी हास्य होतं, असा सोनालीला भास झाला होता आणि म्हणूनच ती दचकून जागी झाली होती.

'स्वप्न झालं म्हणून काय झालं, मीच माझ्याकडे कशी बघत असेन? किती खरी वाटली ती नजर.... काय आहे हे एकूण प्रकरण? काल मला बघताक्षणी उदयनराजेदेखील थोडे दचकले होते, असा माझा अंदाज आहे. आज सकाळी मीटिंग झाली की या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायचीच. आणि मग ठरवायचं की इथे काम करायचं की नाही. इथे आल्यापासून एक प्रकारचा अस्वस्थपणा जाणवतो आहे. तो दूर झाला नाही, तर कितीही उत्तम पॅकेज असलं तरी आपण परत जायचं.' सोनाली विचार करत होती. ती निर्णयापर्यंत आली आणि तिला बरं वाटलं. मग ती बेडवर पडून सकाळ व्हायची वाट बघत राहिली.

अकरा वाजताची मीटिंग अगदी वेळेत सुरू झाली. हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. उदयनराजे धीम्या गतीने चालत कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करते झाले. त्यांच्यामागून आदित्यराजेदेखील आले. त्यांना पाहून सोनालीला आश्चर्य वाटलं. तिने बाजूलाच उभ्या असलेल्या माधवला विचारलं, "ते राजेसाहेबांच्या मागून आले ते कोण?" "अहो.... तेच तर आदित्यराजे आहेत." माधव हसत म्हणाला.

सोनाली अगदी चक्रावून गेली. सर्व स्थानापन्न होताना तिने आदित्यकड़े बघितलं. तोदेखील तिच्याचकडे बघत मिश्कीलपणे हसत होता. एव्हाना सोनालीला माधवने आपली ओळख सांगितली असेल हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे नजरानजर होताच त्याने तिला डोळे मिचकावून चिडवलं. तिनेदेखील आपले निळे निळे डोळे मोठ्ठे करून आदित्यकडे स्वतःची ओळख न दिल्याची नाराजी व्यक्त केली.

त्या दोघांचा हा नजरेचा खेळ मागे उभ्या गोरक्षच्या लक्षात आला. कारण हॉलमध्ये आल्यापासून आणि सोनालीला बघितल्यापासून तोही थोडा अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झाला होता आणि सावधदेखील. आदित्यराजांना अजून काहीच माहीत नाही, हे त्याला माहीत होतं. म्हणून तर तो जास्त सावध होता.

मीटिंग अत्यंत व्यवस्थित पार पडली. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होता. सर्वांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि मोकळेपणा यावा या उद्देशाने हे जेवण ठेवलं होतं. मीटिंग आटपल्यानंतर उदयनराजांनी सहज बोलावतो आहे असं दाखवून सोनालीला शेजारी बसवून घेतलं. आदित्यराजेदेखील तेथेच होते.

"हे आदित्यराजे. आमचे नातू." उदयनराजांनी आदित्यची ओळख करून दिली. आदित्य हसला. "चांगलीच ओळखते यांना." सोनाली आदित्यकडे बघत म्हणाली. आदित्य आणि सोनाली यावर खळखळून हसले. परंतु तिच्या त्या वाक्याने उदयनराजे आणि मागे उभा असलेला गोरक्ष दचकले. "काय म्हणालीस तू?" उदयनराजांनी अडखळत तिला विचारलं. त्याचं उत्तर मात्र आदित्यने दिलं. त्याने काल झालेला एकूण प्रकार राजेसाहेबांच्या कानावर घातला. बोलताना आदित्यचे डोळे सोनालीवर लागले होते आणि तिची नजर लाजेने झुकली होती.

सर्व ऐकून घेऊन उदयनराजे हसले. "बरं बरं! असा प्रकार आहे होय. आम्ही विचार करतो आहोत की सोनाली तर कालच आली, तरी ती तुम्हाला चांगली ओळखते कशी? ठीक! तुम्ही तरुण मंडळी मोकळेपणे जेवून घ्या. आम्ही आमच्या दालनात बसतो." असं म्हणून राजेसाहेब उठले. ते गेले आणि आदित्य आणि सोनाली एकमेकांशी गप्पा मारायला लागले.

"आपणच आदित्यराजे तर! मग काल आपण आपली ओळख का लपवलीत?" उदयनराजे जाताच सोनालीने विचारलं.

"कुठे लपवली? वेळच आली नाही नाव सांगायची." हसत आदित्य म्हणाला. त्यावर ती काहीतरी बोलणार होती. पण तिला अडवत आदित्य म्हणाला, "ते जाऊ दे. चला, आपण जेवून घेऊ. मला जाम भूक लागली आहे." तो म्हणाला.

सोनालीदेखील हसत हो म्हणाली आणि दोघे आपापली प्लेट घेऊन आले.

"आपण मागे कँटीनमध्ये बसायची सोय आहे तिथे जाऊ या का?" सोनालीने सहज विचारलं. आदित्यने हो म्हणताच दोघे तिथे जाऊन बसले. तिथून मागील बाजूचा टेकडीचा सुंदर निसर्ग दिसत होता. सोनाली आदित्यला तिचा आजवरचा एकूण आयुष्याचा प्रवास सांगत होती आणि तो तिच्याकडे बघत ऐकत होता.

आदित्यच्याही नकळत तो तिच्या डोळ्यात गुंतत चालला होता. आता त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हत,. बस, ते निळेशार डोळे त्याला दिसत होते. सोनालीदेखील बडबड करता करता एकदम गप्प झाली. तिने मागे वळून त्या टेकडीकडे आणि तिच्यावरच्या त्या मंदिराकडे बघितलं. मग आदित्यकडे वळून ती हलकेच फक्त "चल" म्हणाली. दोघेही सहज पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडावे तसे बाहेर पडले. मात्र त्यांची नजर हरवलेली होती. कोणाच्याही ते लक्षात आलं नाही. थोडं अंतर चालून गेल्यावर दोघे मंत्रमुग्ध झाल्यासारखे हातात हात घालून टेकडीवरील मंदिराच्या दिशेने निघाले.

चालताना आदित्यची पावलं अडखळत होती. पण सोनाली मात्र रोजच्या सवयीचा मार्ग असल्याप्रमाणे चालत होती. आदित्य आणि सोनालीने वडाच्या झाडांची रांग ओलांडली आणि सोनालीच्या चेहर्‍यावर मंद छद्मी हास्य पसरलं. तिने हलकेच मागे वळून हॉस्पिटलच्या दिशेला नजर टाकली आणि परत समोर बघून ती चालू लागली. नजर मागे टाकताना मात्र सोनालीची चलबिचल झाली होती. एव्हाना त्या अमानवी शक्तीने तिचा पूर्ण ताबा घेतला होता. पण सोनालीने मनावर ताबा ठेवण्याचं शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे तिच्या खर्‍या अस्तित्वाला जरी त्या शक्तीने जखडून टाकलं असलं, तरी ते अस्तित्व जागं होतं खोल मनात कुठेतरी. आदित्य मात्र तिच्या बरोबरीने मंतरल्यासारखा चालत होता.

सोनालीच्या त्या प्रामाणिक अस्तित्वाने आतून एक क्षीणशी साद घातली.... "दादाजी.... आम्हाला वाचवा." आणि मग मात्र तिचं अस्तित्व म्हणजे शरीरात राहून एक प्रेक्षक बनलं.

उदयनराजांचं जेवण झालं होतं. पण आज जेवताना त्यांचं लक्ष नव्हतं. जेवणानंर ते त्यांच्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेर्‍या मारत होते. त्यांनी गोरक्षला बोलावलं आणि त्याच वेळी त्यांना "दादाजी, वाचवा" असं सोनालीने हाक मारल्यासारखं वाटलं.

गोरक्ष केबिनमध्ये आला. "गोरक्ष... दोघं मुलं कुठे आहेत?" राजांनी अस्वस्थपणे त्याला विचारलं.

"हुजूर, चिंता नसावी. दोघेही आत कँटिनच्या दिशेने जेवण्यासाठी गेले. मी स्वतः बघितलं आहे." गोरक्षने उत्तर दिलं.

"बरं! गोरक्ष, बघितलंस सोनालीला तू? काय वाटत रे तुला? गोरक्ष... तिचा चेहरा...." राजेसाहेब बोलायचे थांबले.

"हुजूर... आहे खरं प्रचंड साम्य त्या मूर्तीशी. पण तो योगायोग समजावा. त्या मुलीच्या वागण्यात किती सहजता होती. तिचा काही वाईट हेतू नसावा." गोरक्ष म्हणाला.

"अरे, मला तिच्या हेतूविषयी शंकाच नाही. ती या पिढीतली आणि शहरात वाढलेली मुलगी आहे. माझं मन साशंक आहे ते त्या शक्तीच्या अस्तित्वाबद्दल. गोरक्ष, अनेक वर्षांपूर्वीच मी त्या शक्तीचं अस्तित्व नाकारलं होत. पण त्यानंतर मी माझ्या मुलाला, सुनेला आणि माझ्या प्राणप्रिय पत्नीला गमावलं होतं. अरे, काल मी परत एकदा भुयरात जाऊन आलो. गोरक्ष..... आपल्या घराण्याच्या त्या नोंदवहीमध्ये चार नवीन अक्षरं उमटली आहेत. माझ्या पिताजींच्या लिखाणाखाली." राजे म्हणाले. गोरक्ष हा उल्लेख एकून दचकला, परंतु काहीच बोलला नाही. फक्त ऐकत उभा होता. राजे पुढे म्हणाले, "ती अक्षरं म्हणजे..... मी येईन....... मी आले" राजे एवढं म्हणाले आणि त्याच वेळी त्यांना दुरून सोनालीने परत एकदा हाक मारल्याचा भास झाला. ते दचकले. आणि गोरक्षदेखील काही तरी जणवल्यासारखा ताठ झाला.

"गोरक्ष...."

"हुजूर... मलाही जाणवलं... मी मुलं कुठे आहेत ते बघून येतो." गोरक्ष म्हणाला.

"अंहं... नको... तू कुठे शोधत बसतोस... चल, मीही येतो तुझ्याबरोबर." असे म्हणून राजे कँटीनच्या दिशेने चालूदेखील पडले.

कँटीनकडे गेलेले आदित्य आणि सोनाली सगळीकडे शोधूनही कुठेही दिसत नव्हते. उदयनराजे अस्वस्थ व्हायला लागले. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांना खातरी होती की त्यांनी सोनालीची हाक ऐकली होती. तो भास नव्हता. त्या दोघांनाही कँटीनच्या दिशेने जाताना अनेकांनी बघितलं होतं. पण मग अचानक असे दोघेही दिसेनासे कसे झाले, ते कळत नव्हतं. दोघांचेही मोबाइल फोन्स अनरीचेबल होते. बंद नव्हते की वाजतही नव्हते. विचार करत उदयनराजे उभे होते आणि अचानक त्यांचं लक्ष टेकडीकडे गेलं. मनात काहीसा विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला आणि मागे फिरले. त्यांनी माधवला हाक मारून पोलिसांना वर्दी देण्यास सांगितलं. मग ते त्यांच्या केबिनमध्ये आले. गोरक्षदेखील त्यांच्याबरोबर होता. त्यांनी तिजोरी उघडली. आतून पिस्तूल काढलं आणि कमरेला खोचलं. हातात नेहमीची गुप्ती घेतली आणि गोरक्षकडे बघून म्हणाले, "चल गोरक्ष. वेळ आली."

गोरक्ष काय ते उमजला आणि आज पहिल्यांदा उदयनराजांच्या एक पाऊल पुढे तो चालू लागला. दोघेही झपाझप चालत टेकडीच्या दिशेने निघाले. वडाच्या रांगेला पार करताना राजेसाहेब थोडे अडखळले. त्यांनी मान वर करून मंदिराच्या दिशेने बघितलं. क्षणभर विचार केला आणि थोडं पुढे गेलेल्या गोरक्षला हाक मारली. "गोरक्ष..."

"जी हुजूर?" पुढे गेलेला गोरक्ष परत मागे येत म्हणाला.

"गोरक्ष... आम्ही वाड्याकडे जातो. तू मंदिरात जाऊन काय प्रकार आहे ते बघ. पण मला सारखं वाटत आहे की मी एकदा भुयाराकडे गेलं पाहिजे." उदयनराजे म्हणाले.

"ठीक आहे हुजूर. मी एकदा मंदिरात जाऊन येतो. कदाचित आदित्यराजे आणि सोनाली तिथे गेलेही नसतील. पण मला राहवत नाही आहे..." गोरक्ष म्हणाला. त्याने स्थिर नजरेने उदयनराजांकडे बघितलं आणि तो म्हणाला, "राजे... मी निघतो... फ़क्त एकच.. तुमच्यावर मी कायम धाकल्या भावाप्रमाणे प्रेम केलं आहे. आदित्य तर मला माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय आहे. यानंतर तुम्ही जे बघाल, त्याला तुमच्या मनाचा कौल लावा. नजरेवर किंवा घडण्यार्‍या घटनांवर किती विश्वास ठेवायचा आणि माझ्या असण्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा आहे हुजूर... फ़क्त जे दिसतं आहे त्यावर विश्वास ठेवू नका. जोवर आपला आपल्या मनावर ताबा असतो, तोवर कोणीही आपल्याला इजा करू शकत नाही. स्वानुभवावरून सांगतो आहे." असं म्हणून राजेसाहेब काही म्हणायच्या अगोदरच तो त्या मंदिराच्या दिशेने चालू पडला.

राजेसाहेबांनी एकदा तो जात असलेल्या दिशेने बघितलं आणि मग ते मागे फिरले. घाईघाईने वाड्यावर लायब्ररीमध्ये येऊन त्यांनी आतून दार लावून घेतलं आणि भुयाराच्या दाराची कळ दाबली. इथून आत पाऊल ठेवताना राजे अस्वस्थ नव्हते. आता त्यांचं मन स्थिर झालं होतं. ते भराभर चालत तिजोरीच्या खोलीपर्यंत पोहोचले.

चालताना त्यांना त्यांचं शेवटचं स्वप्न आठवत होतं, ज्यात ती शक्ती त्यांच्या स्वप्नात आली होती आणि त्यांनी त्या शक्तीचं अस्तित्व अमान्य केलं होतं. 'आदित्य आणि सोनाली ठीक असतील ना? त्या शक्तीला मी दुखावलं आहे... मी आव्हान दिलं आहे... पण त्याचा राग माझ्या मुलांवर निघायला नको.' उदयनराजांच्या मनात आलं. ज्या वेळी स्वप्नातील शक्तीला अमान्य केलं होतं, त्या वेळी त्या मानाने त्यांचं मन आणि शरीर खंबीर होतं. परंतु आता ते वृद्ध झाले होते. मुख्य म्हणजे जर आदित्यला किंवा सोनालीला काही झालं असतं, तर ते स्वतःला कधीच माफ करू शकले नसते.

ते दरवाजा उघडून खोलीत प्रवेश करणार, तेवढ्यात त्यांना एक मंत्रोच्चार ऐकू आला... पुढे.... मंदिराच्या दिशेने जो भुयारी रस्ता गेला होता, त्या दिशेने... राजे थबकले आणि त्यांनी नीट अंदाज घेतला. आवाज ओळखीचा होता. पण काही केल्या अंदाज लागत नव्हता. कारण तो खूप दुरून घुमत घुमत येत होता. राजांनी क्षणात निर्णय घेतला आणि खोलीत जाण्याचा विचार बदलून ते भुयारात आणखी आत, मंदिराच्या दिशेने भराभर चालू लागले. जसजसे ते पुढे जात होते, तसतसा आवाज आणखी स्पष्ट येत होता.

अचानक समोर एक भिंत उभी राहिली. उदयनराजे अडखळले. आवाज भिंतीच्या पलीकडून येत होता. अत्यंत स्पष्टपणे मंत्रोच्चार होत होता. परंतु भाषा अगम्य होती. त्यांनी भिंतीला कान लावला... आवाज गोरक्षचा होता. राजे गोंधळले. त्यांनी नीट ऐकायच्या प्रयत्नात दोन्ही हात भिंतीवर ठेवले. त्यांच्या नकळत कुठलीशी कळ दाबली गेली आणि अचानक ती समोरची भिंत सरकली आणि राजे मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करते झाले. समोरचा देखावा आश्चर्यचकित करणारा होता. गाभार्‍याचा दरवाजा बंद होता. समोर सिंहासनावर बसलेली ती प्रचंड मूर्ती एका वेगळ्याच तेजाने लकाकत होती. तिचे नीलवर्णी डोळे जिवंत वाटत होते. एक प्रकारचं मंद पण क्रूर हास्य तिच्या चेहर्‍यावर होतं. समोर एक वेदी होती. तिच्यावर आदित्यला बसवलं होतं. त्याचे डोळे बंद होते. कुठल्याही प्रकारे त्याला जखडलं नव्हतं. तरीही तो गच्च दोरखंडाने बांधल्यासारखा बसून होता. राजांनी सोनालीला शोधण्यासाठी इथे तिथे बघितलं आणि ते अवाक झाले. सोनाली मूर्तीच्या उजव्या पायाजवळ हाताची घडी घालून शांतपणे समोर एकदा आदित्यकडे आणि एकदा गोरक्षकडे बघत उभी होती आणि गोरक्ष..., त्यांचा गोरक्ष... खाली आसन घालून आणि डोळे मिटून अगम्य भाषेत मंत्रोच्चार करत होता.

राजांचं पाऊल आत पड़ताच संपूर्ण वातावरण जणू ढवळून निघालं. एक हलकासा धक्का बसल्यासारखा होऊन आदित्यने डोळे उघडले. मंत्रोच्चारामुळे भारित झालेला गाभारा डचमळला. गोरक्षने वळून राजांकडे बघितलं. गोरक्षचा मंत्रोच्चार थांबला. राजे पुरते गोंधळले होते.

"गोरक्ष... अरे काय करतो आहेस तू? आदित्य, ऊठ, उभा राहा. माझ्याजवळ ये. सोनाली... बेटी... तूही इथे ये माझ्याजवळ." राजे संतापाने कडाडले. त्यांच्या आवाजाने अचानक थोडा फरक पडला. सोनालीच्या डोळ्यात क्षणभर बावरलेले, गोंधळलेले भाव दाटून आले. वातावरणातील भारितपणा अचानक थोडा कमी झाला. गोरक्षचं मंत्र उच्चारण थांबलं. आदित्य भानावर आला. तो उठून उभा राहिला आणि त्याने राजांच्या दिशेने पाऊल उचललंदेखील. इतक्यात त्या शक्तीने परत एकदा सोनालीचा ताबा घेतला आणि सोनाली अत्यंत क्रुद्ध आवाजात कडाडली, "आदित्य, बस त्या वेदीवर. राजा, तुझा नातू माझा बंदी आहे. ही मुलगीदेखील माझ्याच ताब्यातील खेळणं आहे. हा तुझा गोरक्ष... हा तुझा राहिलेला नाही. खरं तर तो तुझा कधीच नव्हता. तो योग्य वेळेची वाट पाहत तुझ्याकडे होता. बरं झालं, तू स्वतः इथे आलास. माझं अस्तित्व तू अमान्य केलं होतंस नं? आता बघ... तुझ्या या आदित्यला मी माझा दास करणार. या मुलीच्या मानवी शरीराचा ताबा कायमचा घेऊन माझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार."

असं म्हणून सोनालीने आपला उजवा हात आदित्यच्या दिशेने हलवला. इच्छा असूनही आदित्य जणू काही अडकून गेला त्याच्या जागेवर. उदयनराजे हतबल झाले. त्यांना काय करावं सुचेना. सोनालीला ताब्यात घेतलेली ती शक्ती छद्मी हसत हळूहळू उदयनराजांच्या दिशेने येऊ लागली. तिच्या निळ्या डोळ्यांचं गारुड राजांवरही होऊ लागलं आणि अचानक राजांना आतून खोल मनातून एक आवाज ऐकू आला..... " हुजूर.... जागे व्हा. स्वतःवर विश्वास ठेवा. जोवर आपला आपल्या मनावर ताबा असतो, तोवर आपल्याला कोणीही इजा करू शकत नाही... विसरू नका. मी मनाने तुमच्याचसोबत आहे." राजे त्या आतल्या आवाजाने जागे झाले. त्यांनी चमकून गोरक्षकड़े बघितलं. परंतु त्याचे डोळे बंद होते आणि मान झुकलेली होती. एका क्षणात राजे जागे झाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आदित्य आणि सोनाली यांच्या मनाचा ताबा जोवर त्या शक्तीकडे आहे, तोवर इथून बाहेर पडणं अशक्य आहे.

राजांनी जोरात आपली मान हलवली आणि सोनालीने काही करण्याच्या आत स्वतःच्या कमरेला खोचलेलं पिस्तूल काढून तिच्या खांद्यावर जखम केली. क्षणात सोनाली मागे सरली. त्या एका क्षणाचा फायदा घेऊन चपळतेने राजांनी वेदीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी आदित्यला तेथून खेचून उठवलं. तो आता पूर्ण शुद्धीत आला होता. त्या एका धक्क्याने तोदेखील त्या भारित वातावरणातून बाहेर पडला. त्याच्या हातात पिस्तूल देत राजे हलकेच पुटपुटले, "मनावर ताबा ठेव आदी. कसंही करून सोनालीला घेऊन इथून बाहेर पड." राजांनी आदित्यला जोरात ढकललं.

अचानक झालेल्या या हालचाली त्या शक्तीच्या लक्षात नाही आल्या. कारण जरी त्या शक्तीने सोनालीचा ताबा घेतला होता, तरीही सोनाली खोल मनातून सारखी त्या शक्तीला प्रतिकार करत होती. त्यामुळे सोनालीवर ताबा ठेवण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे त्या अमानवी शक्तीच्या लक्षात काही येण्याच्या अगोदरच आदित्यने जखमी सोनालीचा हात धरला आणि तिला गाभार्‍याच्या दाराच्या दिशेने ओढलं. परंतु गोरक्ष अचानक आदित्यला आडवा आला. त्याने सोनालीला दाराकडे नेणार्‍या आदित्यची वाट अडवली. सोनाली जखमी झाल्याने आता ती त्या अमानवी शक्तीच्या काहीच उपयोगाची राहिली नव्हती. त्यामुळे सोनाली आता पूर्ण शुद्धीत आली होती. परंतु तरीही तिला जे काही चाललं होतं, ते कळत नव्हतं.

"गोरक्ष, रस्ता सोड. नाहीतर मी कोणताही विचार करणार नाही. अरे, संपूर्ण आयुष्य माझ्या दादाजींच्या जिवावर जगलास आणि आज आमच्याविरुद्ध उभा ठाकलास?" आदित्यने चिडून पिस्तूल गोरक्षवर ताणलं. त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षने परत एकदा आदित्यच्या दिशेने पाऊल उचललं. आदित्यने सोनालीचा जखमी हात धरला आणि तिला आपल्या पाठीशी घालून तो एक एक पाऊल मागे सरकू लागला. अचानक गोरक्ष मोठ्याने ओरडला, "आदित्य....." आदित्य दचकला आणि काही कळण्याच्या आत आदित्य आणि सोनाली धडपडत भुयारात येऊन पडले आणि गाभार्‍यात उघडणारा तो भुयारी मार्ग बंद झाला.

आता गाभार्‍यात फ़क्त उदयनराजे, गोरक्ष आणि मूर्तीत सामावलेली ती अमानवी शक्ती तेवढे उरले. जणू काही त्या मूर्तीचे डोळे आता गोरक्षवर खिळले होते. "गोरक्ष, काय केलंस हे?" एक हताश, खर्जातला आवाज उमटला.

"मी जे केलं, तेच योग्य आहे. तुला मर्त्य लोकांचं आयुष्य जगण्याची इच्छा आहे ना? मग मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी आणि माझं संपूर्ण आयुष्य तुला देण्यासाठी तयार होतो ना? सर्व वृत्तान्त राजेसाहेबांकडून समजल्यानंतर मी स्वतः इथे तुझ्याकडे आलो होतो. इथेच या गाभार्‍यात तुला आवाहन केलं होतं. मी स्वतःला अर्पण करायला तयार आहे हे तुला सांगितले होतं. तू आमच्या पिताजींकडे माझी मागणी केली होतीस याची आठवणदेखील तुला करून दिली होती. परंतु त्या वेळीदेखील तू ते मान्य केलं नाहीस. कारण मुळात तुला कधीच एक सामान्य मर्त्य जीवन नको होतं. तुला तुझा बळी हवा होता आणि मर्त्य लोकांवर हुकमत हवी होती. कधीतरी एके काळी एका मनुष्याला बघून तुझ्या मनात एक इच्छा प्रकट झाली. ती जर त्याच वेळी पूर्ण झाली असती, तुला तुझा बळी तेव्हाच मिळाला असता... तर तू इथे हे असं वास्तव्य केलं नसतंस. परंतु मुळात तू दाखवलेल्या आमिषाचा मोह त्या वेळीदेखील आम्हाला नव्हता आणि आजही नाही. परंतु मी हेदेखील ओळखून आहे की तू तुझा बळी मिळवल्याशिवाय येथून जाणार नाहीस. केवळ म्हणूनच मी त्या वेळी इथे आलो होतो, तेव्हा माझ्या उजव्या हाताच्या अंगठ्यातील रक्ताचा अभिषेक मी त्या माणकावर केला होता. त्या रक्ताभिषेकामुळेच तू कायम या घराण्याच्या पुरुषांच्या मनावर... किंवा अस म्हणू या, स्वप्नांवर - राज्य केलंस. पण तू हे विसरलीस कशी की मीदेखील याच घराण्यातील पुरुष आहे. आणि त्या माणकावरील शेवटचा रक्ताभिषेक माझा आहे. त्यामुळे तुला बांधील असा मी शेवटचाच आहे, हे लक्षात घे...." गोरक्ष गंभीर आवाजात बोलत होता. संपूर्ण गाभारा शांत होता. केवळ त्याचाच आवाज घुमत होता.

गोरक्षने बोलता बोलता उदयनराजांना गाभार्‍याबाहेर जाण्याची खूण केली. उदयनराजांना वाटलं, गोरक्षदेखील त्यांच्यामागून गाभार्‍याबाहेर येतो आहे. त्यामुळे ते झटकन गाभार्‍याबाहेर आले आणि अचानक गोरक्षने आतून गाभारा बंद करून घेतला. काय करावं... राजांना क्षणभर सुचलं नाही. त्याना तो अजस्र दरवाजा उघडणं शक्य नव्हतं. परंतु गाभार्‍यात जाण्यासाठी आणखीही एक रस्ता आहे हे आता त्याना माहीत होतं. त्यामुळे ते तडक मागे फिरले आणि भराभर चालत निघाले. त्यांनी काही मिनिटांतच वडाच्या झाडांची रांग पार केली आणि त्याच क्षणी अचानक मंदिर कोसळण्याचा आवाज आला. राजांनी वळून मागे बघितलं. "गोरक्ष....... गोरक्ष......." एक आर्त हाक राजांच्या तोड़ून बाहेर पडली.

राजे जवळजवळ धावतच वाड्यावर पोहोचले आणि लायब्ररीमध्ये दाखल झाले. समोरच त्यांना सोनाली वेशुद्धावस्थेत दिसली. आदित्य तिच्या शेजारीच बसला होता. त्यांच्याकडे न जाता उदयनराजे त्या भुयारी रस्त्याकडे वळले.

"दादाजी....." आदित्यने उठून राजांना हाक मारली. उदयनराजे त्याच्याकडे न बघता भुयाराकडे जात म्हणाले, "आदी, गोरक्ष..... आदी."

"दादाजी, गोरक्षने आम्हाला भुयारात ढकललं आणि कसं कोण जाणे, पण ती भिंत पूर्ववत बंद झाली. मी ती उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या तो उघडेना. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला दादाजी आणि मी काही करण्याच्या आत वरचं छत पडायला सुरुवात झाली. माझ्याबरोबर जखमी सोनाली होती. ती बेशुद्ध पडली. मग मात्र मी तिला घेऊन तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि तिला उचलून मागे फिरलो. वरून छत पडत होतं आणि तो रस्ता कुठे जाईल याचा मला अंदाज नव्हता. मात्र तुम्ही याच रस्त्याने मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत आला असाल असा मी अंदाज बांधला आणि सोनालीला उचलून घेऊन मी धावायला सुरुवात केली. शेवटी मी इथे या आपल्या लायब्ररीमध्ये पोहोचलो. तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होतो आणि तुम्ही आलात." आदित्य म्हणाला.

आदित्यच्या बोलण्यामुळे उदयनराजांच्या लक्षात आलं की भुयारातून मंदिराकडे जाणारा तो मार्गदेखील बंद झाला आहे. ते म्हणाले, "आदित्य.. आदी.... आपला गोरक्ष... तो गेला रे... त्याने स्वतःला संपवलं रे... माझ्यासाठी... आपल्यासाठी..." आणि ते रडू लागले.

उदयनराजांच्या त्या बोलण्याने आदित्य गोंधळून गेला. त्याच्या मते गोरक्षने त्याला आणि त्याच्या दादाजींना शेवटच्या क्षणी धोका दिला होता. तो आणि सोनाली यांना दादाजी मंदिराच्या गाभार्‍याबाहेर काढायचा प्रयत्न करत असताना गोरक्षने त्यांना अडवलं होतं आणि मागे ढकललं होतं. कर्मधर्मसंयोगाने तो भुयारी मार्ग उघडा असल्याने आदित्य आणि सोनाली वाचले होते. त्याने त्याचे हे विचार उदयनराजांना बोलून दाखवताच उदयनराजांनी नकारार्थी मान हलवली आणि ते आदित्यला म्हणाले, "आदित्य बेटा, काही क्षणांसाठी माझादेखील गैरसमज झाला होता. परंतु नंतर माझ्याही लक्षात आलं की वडाच्या झाडांपर्यंत त्या अमानवी शक्तीचा जोर असणार होता. त्यामुळे जरी तुम्ही दोघे गाभार्‍यातून बाहेर पडला असतात, तरी तुम्ही टेकडी उतरेपर्यंत कदाचित तिने तुम्हाला दोघांना परत अडवलं असतं. अर्थात एकदा तुम्ही या भुयारी मार्गामध्ये आल्यावर तुम्हाला काही धोका नव्हता. त्यामुळे गोरक्षने तुम्हाला या दिशेने ढकललं होतं. त्याने मला मात्र मुख्य द्वारातून बाहेर काढलं, जेणेकरून त्या शक्तीचं लक्ष मला अडवण्यात लागलं असतं आणि बहुतेक त्याच दरम्यान त्याने मंदिर आणि गाभार्‍यासकट स्वतःचा अंत करून घेतला. कारण मी मुख्य दारातून बाहेर पडत असताना त्याचे शेवटचे शब्द होते की 'या घराण्यातील तो शेवटचा पुरुष आहे, ज्याने त्याचं रक्त त्या अमानवी शक्तीच्या पायावरील माणकावर वाहिलं आहे.' याचा अर्थ गोरक्ष स्वतःहून त्या शक्तीला स्वाधीन झाला." उदयनराजे बोलायचे थांबले, परंतु त्यांचे डोळे अजूनही गोरक्षसाठी पाझरत होते.

त्यांचं दु:ख बघून आदित्यचे डोळेदेखील पाणावले. "दादाजी...." असं म्हणत आदित्यने त्यांचा हात प्रेमभराने आपल्या हातात घेतला.

तेवढ्यात सोनालीने हालचाल केली. ती जागी झाली होती. समोर उदयनराजांना आणि आदित्यला बघून ती गोंधळली. पण तिचं डोकं खूप दुखत होतं. उदयनराजे तिच्याजवळ आले आणि त्यांनी तिला प्रेमाने थोपटलं. "कशी आहेस बाळा? खूप त्रास झाला ना तुला?" त्यांनी तिला विचारलं.

"हे सर्व काय होतं राजेसाहेब?" तिने त्यांना विचारलं.

"बेटा, तू मला दादाजी म्हणू शकतेस..." असं म्हणून उदयनराजांनी आजवरच्या सर्व घटना आणि एकूणच या घराण्याचा इतिहास त्या दोघांना थोडक्यात सांगितला.

"दादाजी, केवळ तुम्हीच सांगता आहात आणि मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी यावर विश्वास ठेवू शकणार आहे. नाहीतर या काळातही अमानवी शक्ती... मनाचा घेतला जाणारा ताबा.... हे असं भुयार.... त्यातील तो खजिना..... ते मंदिर... तो गाभारा आणि नील डोळ्यांची ती अतिप्रचंड आणि तरीही सुंदर, सुबक मूर्ती.... ह्या केवळ काल्पनिक गोष्टी वाटल्या असत्या मला." आदित्य म्हणाला. सोनालीनेदेखील हसून त्याला दुजोरा दिला. त्यावर काही न बोलता उदयनराजांनी त्या दोघांच्या पाठीवर थोपटलं आणि लायब्ररीचा दरवाजा उघडून त्या दोघांना घेऊन ते बाहेर पडले.

यथावकाश सोनाली आणि आदित्य जे यांचा विवाह झाला. उदयनराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली लायब्ररीमध्ये काही बदल करून घेतले. ते भुयार कायमचं बंद करण्यात आलं. हॉस्पिटलमागील टेकडीवरील वडाची झाडं तोडण्यात आली. तिथे बकुळ, चाफा, पारिजात अशी सुगंधी झाडं मुद्दाम लावण्यात आली. मंदिर असणारा सुळका मंदिरासकट तोडण्यात आला. धबधबा ज्या बाजूला होता, तिथे मात्र एक सुंदर बगिचा केला गेला. 'गोरक्ष पार्क' असं त्याचं नामकरण करण्यात आलं.

आजही हे हॉस्पिटल सोनाली आणि आदित्य यशस्वीपणे चालवत आहेत आणि त्यांच्या घराण्याचा वसा पुढे चालवत आहेत.

प्रतिक्रिया

कथा आवडली. गुहेचे रहस्य छान खुलवले आहे.
देवी मानवाशी विवाह कसा करणार असते ते मात्र कळले नाही.

कथा आवडली. गुहेचे रहस्य छान खुलवले आहे.
देवी मानवाशी विवाह कसा करणार असते ते मात्र कळले नाही.

ज्योति अळवणी's picture

30 Oct 2016 - 11:11 pm | ज्योति अळवणी

ती एक शक्ती आहे जंगलात वास करणारी. त्या जुन्या काळातली. पुढे तिला एक मूर्त स्वरूप दिल गेलं. त्यामुळे हळू हळू तिला देवी मानलं गेलं. पण मानव आणि देव असा विचार प्रचलित नस्तानाच्या काळातील सुरवात आहे. त्यामुळे ती एक स्रीस्वरूप शक्ती आहे इतकंच!

नाखु's picture

31 Oct 2016 - 9:47 am | नाखु

थोडी लांबली आहे पण मस्त.

मितान's picture

31 Oct 2016 - 2:26 pm | मितान

कथा आवडली !

सिरुसेरि's picture

31 Oct 2016 - 6:26 pm | सिरुसेरि

खिळवुन ठेवणारी कथा .

ज्योति अळवणी's picture

1 Nov 2016 - 1:12 am | ज्योति अळवणी

धन्यवाद

स्रुजा's picture

1 Nov 2016 - 1:33 am | स्रुजा

सहीच. आवडली खूप !

आवडली.. मस्त जमली आहे कथा!

प्राची अश्विनी's picture

1 Nov 2016 - 8:01 am | प्राची अश्विनी

+१

अनन्त अवधुत's picture

1 Nov 2016 - 3:01 am | अनन्त अवधुत

रात्री एक वाजता बोर्डावर कथा दिसली. लेखकाचे नाव वाचून हि कथा रात्री वाचू नये असे ठरवले :). ठरवले ते योग्यच होते असे कथा वाचल्यावर लक्षात आले.

मनिमौ's picture

1 Nov 2016 - 10:27 pm | मनिमौ

वेलकम बॅक मला आवडली कथा.

ज्योति अळवणी's picture

3 Nov 2016 - 12:26 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

निओ's picture

3 Nov 2016 - 5:26 pm | निओ

भयकथा, गूढकथा...भारी जमतात तुम्हाला.

पैसा's picture

8 Nov 2016 - 10:26 am | पैसा

मस्त जमली आहे कथा! गेल्या काही दिवसात याप्रकारच्या कथा छान लिहिता आहात.

स्वाती दिनेश's picture

8 Nov 2016 - 9:27 pm | स्वाती दिनेश

कथा खिळवून ठेवणारी आहे.
स्वाती

विअर्ड विक्स's picture

10 Nov 2016 - 4:20 pm | विअर्ड विक्स

कथा आवडली..... फक्त शीर्षक थोडे भारी असायला पाहिजे होते असे वाटले
" रुद्र नीलाक्षी " चंद्रकांता व चंद्रनंदनी टाईप्स