गेल्या काही वर्षांत झालेल्या भटकंतीत मला भावलेली, कॅमेऱ्यातून क्लिकलेली काही दृष्ये या लेखमालिकेत देण्याचा विचार आहे. सुरुवात रोम पासून करतो.
गेल्या वर्षी नोव्हेंबरात रोम बघायला जायचे ठरल्यावर रोममधील सुप्रसिद्ध ठिकाणांखेरीज काही जुने व्हिलाज , टायबर नदीच्या पलिकडला भाग, जुनी चर्चेस, व्हॅटिकन संग्रहालय , रोममधील जुन्या वस्त्या वगैरे सर्व फिरायला किमान पाच दिवस तरी हवेत असे वाटून airbnb.com मधून रोमच्या मध्यवस्तीतले एक घर आरक्षित करून आम्ही रोमला पहुचलो. रहायला मिळालेले घर छानच होते, आणि हॉटेलच्या एका लहानश्या खोलीच्या किंमतीत स्वतंत्र घर ( बैठकीची खोली, दोन बेडरूमा, सर्व उपकरणासहित स्वयंपाकघर वगैरे ) समोरच उत्तम भारतीय रेस्तराँ, जवळच मेट्रो स्टेशन, पहाटे तीनला उघडणारी भाजी- फळे- खाद्यपदार्थांची उत्कृष्ट मंडई , कोलोसियमादि जागा पायी पंधरा मिनिटाच्या अंतरावर हे सर्व बघून खूपच आनंदलो.
स्वयंपाकघर असल्याने घरगुती उकळलेल्या चहाचा विरह सहन करावा लागला नाही, शिवाय घरून भाजलेला रवा, खिचडीचे सामान वगैरे घेऊन गेलो होतोच. ताजी फळे आणून रोज ज्यूसही काढता येत होते.
तीन दिवसाचा रोमा पास घेऊन (यात अमर्याद मेट्रो, बस प्रवास आणि दोन संग्रहालयांची तिकिटे एवढे होते) भटकंतीला लागलो.
रोमच्या प्रसिद्ध, टुरिस्टाळलेल्या जागांना धावत्या भेटी देऊन इतर कमी प्रसिद्ध, शक्यतो निर्मनुष्य जागा हुडकण्यासाठी भरपूर पायपीट केली.केंव्हा कुठे गेलो, त्या त्या जागांचा इतिहास वगैरेत न शिरता आता रोममध्ये क्लिकलेली दृश्ये देतो:
गर्द सावलीतील झाडांचे आकार आणि मागे छाया- प्रकाशाने नटलेल्या प्राचीन इमारती:
'जिधर देखो कयामत ही कयामत' हा फिल्मी डायलाक मला इथे आठवला:
प्राचीन संगमरवरी स्तंभ आणि उंच झाडांच्या बुंध्यांची जुगलबंदी:
उत्कृष्ट संगमरवरी मूर्ती रोममध्ये ठाई ठाई नजरेस पडतात:
चुकून भलत्याच वाटेला लागल्याने झालेल्या पायपिटीबद्दल मिळालेले बक्षीस दृष्य :
कोलोसियमचा एक लहानसा कोपरा :
रोममधील जुना रहिवासी भाग:
.
पंधराव्या शतकातील अनेक भव्य व्हिला अजून आपली आब राखून आहेत. त्यात अजूनही त्या त्या कुटुंबांचे वंशज रहातात किंवा संग्रहालये केलेली आहेत. सुप्रसिद्ध फार्नेसी घराण्याचा असाच एक व्हिला :
काराकेला ने बांधलेले विशाल स्नानगृह (इ.स. २१२ -२१७): सातत्याने सहा वर्षे दररोज २००० टन साहित्य वापरून ही स्नानगृहे बांधली गेली.
पॅलेटाईन टेकडीवरील एका घरासमोर बूड टेकवून थोडासा विश्राम
वरील घराची आतील बाजू:
त्याच घराचे आणखी एक दृश्य:
प्राचीन रोम सात टेकड्यांवर वसलेले होते, त्यापैकी पालातीनो (पॅलेटाईन) टेकडीवर बरेचसे अवशेष आहेत.
पॅलेस ,पलाझो, पाले वगैरे शब्दांचे मूळ 'पॅलेटाईन' या शब्दात आहे म्हणे.
व्हॅटिकन भोवतालाची तटबंदी:
व्हॅटिकन मधील एक जुनाट पाण्याचा नळ (कुणास ठाऊक, मायकेलअँजेलो काम करता करता मधेच छिन्नी हातोडा बाजूला ठेऊन या नळातून येणारे पाणी ओंजळीतून प्याला असेल):
व्हॅटिकन मधील एक काच-चित्र:
व्हॅटिकन संग्रहालयातील अनेक दालनांची छते अशी खच्चून सजवलेली आहेत:
मायकेलअँजेलोने डिझायनलेला सेंट पीटर्स चर्चचा भव्य घुमट. फोटोत जे पांढरे बारकेसे भोक दिसते आहे, तिथवर पोचायला या घुमटातून ३२० पायऱ्यांचा अरुंद जिना चढावा लागला.
घुमटावरून टिपलेले व्हॅटिकन संग्रहालयाचे विहंगम दृश्य. खालच्या उजव्या कोपऱ्यात दिसणारी लांबट छताची इमारत म्हणजे मायकेलअँजेलोच्या अद्वितीय चित्रासाठी जगद्विख्यात असलेले सिस्टीन चॅपेल:
सेंट पीटर्स चौक.
कोणत्याश्या पोपची कबर : अश्या जागोजागी आहेत.
कशासाठी पोटासाठी -- टायबर नदीच्या एका पुलावर बसलेला पर्णमानव.
पुलावरून टायबर नदीचे दृष्य (दूर सेंट पीटर्सचा घुमट )
(क्रमशः)... पुढील भागात वर्सायची सफर करूया.
प्रतिक्रिया
24 Sep 2016 - 12:07 am | चित्रगुप्त
पाच दिवस भ्रमन्ती करूनही अजून खूप काही बघायचे राहून गेले ही हुरहूर बाळगून परतलो .. पुन्हा कधीतरी नक्की रोमला यायचेच, असा निश्चय करून.
24 Sep 2016 - 12:26 am | सही रे सई
तुमच्या या लेखामुळे आणि एकसे एक फोटोंमुळे मला पण आता रोम सिटी पहावीशी वाटू लागली आहे.
24 Sep 2016 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !!!
रोमचे सहसा न दिसणारे दर्शन तुमच्या अप्रतिम फोटोंतून झाले.
24 Sep 2016 - 1:03 am | रुपी
सुंदर! कधी रोमला जायचा योग आला तर अशीच भटकंती करणार!
24 Sep 2016 - 6:38 am | निशाचर
छायाप्रकाशाचा खेळ आवडला. गॅलेरिया बोर्गेसीला तुम्ही भेट दिली असेल असं वाटतंय. त्याबद्दलही लिहावं, ही विनंती.
वर्सायच्या प्रतिक्षेत!
25 Sep 2016 - 6:55 pm | चित्रगुप्त
नाहीना, यादीत असूनही ते राहूनच गेले. आणखीही संग्रहालये राहिली आहेत. ते सर्व बघायला पुन्हा जाण्याची इच्छा आहे.
26 Sep 2016 - 3:50 am | निशाचर
ओह... पुन्हा रोमला जाणं होईल तेव्हा अवश्य जा. तिथल्या बर्निनीच्या शिल्पांसाठी आणि कारावाज्जिओसाठी तर नक्कीच! मला चित्र किंवा शिल्पकलेत अजिबात गती नाही. पण रोमला आणि विशेषतः गॅलेरिया बोर्गेसीला भेट दिल्यापासून पाहण्याची आवड मात्र लागली आहे.
24 Sep 2016 - 8:52 am | प्रचेतस
अहा....!!!
जबरी आहे हे अनोखे रोम.
24 Sep 2016 - 9:33 am | अजया
आह रोम!
रोम काही बघुन संपत नाही.किती दिवस राहिलं तरी! तुमच्यासारख्या कलावंताच्या नजरेला व्हॅटिकन तर न संपणारा खजिनाच.
24 Sep 2016 - 5:25 pm | स्वाती दिनेश
रोम कितीही पाहिलं तरी दशांगुळे उरतंच.
सर्व फोटोज फारच सुरेख!
स्वाती
24 Sep 2016 - 9:59 am | अभ्या..
प्रत्येक फोटो म्हणजे एकेक अप्रतिम काम्पोझीशन आहे.
नीरस वीणावर्ल्ड टाईप प्रवासवर्णनं पाहण्या/वाचण्यापेक्षा ही अस्सल कलावंताकडून त्याच्या नजरेतून पाहिलेली दुनिया अप्रतिमच. अप्रतिम छायाप्रकाशाचा खेळ.
24 Sep 2016 - 2:32 pm | चौकटराजा
म्हून शान म्या रोमाला भेट आपाल्या गावाकल्ड्ल्या स्टाईलनी द्याच ठरीवल हाय !
@ चित्रगुप्त , पॅलेटाईन हिल व आतून कलोसियम ही चूकवू नये अशी आहेत काय ? की त्या बदल्यात रोमा पास मधे दुसरे ठिकाण निवडले तर अधिक बरे...... ? रहायला जे घर निवडले ते कोणत्या मेट्रो स्टेशन शेजारी होते ??
24 Sep 2016 - 5:46 pm | चित्रगुप्त
ज्या घरात रहात होतो, त्याचा पत्ता: 24 Via Foscolo 00185 Roma.
जवळचे मेट्रो स्टेशनः Vittorio Emannuale.
रोम हे पायी फिरण्याचे शहर असल्याने दिवसभर मेट्रो वा बसची फारशी गरज पडत नाही, त्यामुळे रोमा पासचे पैसे वसूल होत नाहीत. दोन म्युझियमांची तिकिटे जी त्यात अंतर्भूत असतात, त्यात व्हॅटिकन नाही. अन्यत्र तिकिट काढणे मुश्किल नाही. दहा टिकिटांचा जुडगा घेऊन फिरणे सुद्धा वाईट नाही.
25 Sep 2016 - 6:28 pm | चौकटराजा
तुम्ही राहिलेल्या घरासमोरच "क्रिष्णा रेस्तरॉ " हे भारतीय दुकान पाहिल्याचे स्मरते आहे का ... ?
24 Sep 2016 - 10:01 am | यशोधरा
सुरेख!
24 Sep 2016 - 12:51 pm | जव्हेरगंज
ह्याला म्हंतेत फोटोग्राफी!!!
एक नंबर!!!
(तुमच्याबरुबर आम्ही पण त्या रोमातुन फिरलो.!!!)
24 Sep 2016 - 5:04 pm | वरुण मोहिते
एक आठवडा होतो तिथे पण तुमच्यासारख निवांत काहीच पाहता आला नाही ह्याची खंत आहे. फ़ोटो पाहून थोडी खंत भरून निघाली
25 Sep 2016 - 2:47 pm | पियुशा
जबराट !!
25 Sep 2016 - 3:08 pm | मारवा
सुंदर आहे रोम.
तुम्ही टुरिस्ट नसुन ट्रॅव्हलर आहात.
त्यामुळे फोटोत मजा आली.
रोमनांचा इतिहास अदभुत आहे.
Rome was a poem pressed into service as a city.
मस्तय.
25 Sep 2016 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर रोम. अशीच भटकंती चालू ठेवा. छायाचित्रही झकास आली आहेत.
-दिलीप बिरुटे
26 Sep 2016 - 1:20 am | बॅटमॅन
अफाट आहे रोम. फोटोही एकदम देखणे आहेत. खूप आवडले. कधी तिथे जायचा योग येईल ते एक ज्यूपिटरच जाणे.
26 Sep 2016 - 10:33 am | धर्मराजमुटके
एक लंबर ! क्लिकक्लिकाते रहो और इदर पेश करते रहो ! हम दुध की तहान ताक पे भागवते रहेंगे !
26 Sep 2016 - 10:45 am | नंदन
सगळे रस्ते जरी रोमला जात असले, तरी अशा न विटलेल्या वाटा प्रत्येक शहराप्रमाणे रोमारोमात असणारच. (एक राह तो वो होगी इ.)
फोटो खास आहेतच, शिवाय ते पाहून अशाच अन-वाट भटकंतींच्या आठवणीही पुन्हा जाग्या झाल्या. पुढील रस्त्यांची वाट पाहतो :)
29 Sep 2016 - 12:45 am | अमित खोजे
तुमची फोटोग्राफी सुद्धा तुमच्या चित्राप्रमाणेच येते. फोटोमधील मांडणी छान करता!
रोमला जाणे आता तर नक्कीच आले.