घरचा भेदी
मुंबईच्या ताज हॉटेलमधील ती डिनर पार्टी चांगली रंगली होती. कारणही तसेच होते. नॅशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शामकुमार यांच्या युनिटने उपग्रहातून जमिनीवरील हालचाली अधिक क्षमतेने आकलन करेल असे प्रोटोटाईप यशस्वीरित्या तयार केले होते आणि त्यांना भारत सरकारकडून पुढील कामासाठी फंडिंगसुद्धा मंजूर झाले होते. आज त्यांच्या युनिटचे हे यश साजरे करण्यासाठी सर्व जण जमले होते. शामकुमार यांनी एक छोटेखानी पण छान भाषण केले आणि टीममधील सर्वांचे आभार मानून ते घरी जाण्यासाठी निघाले. शामकुमार हे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी आणि रिसर्चचे सर्वेसर्वा. गेले काही महिने त्यांनी रिसर्चमध्ये स्वतःला अगदी झोकून दिले होते. गेले १५ महिने किती कष्ट घेतले, हे गाडीतून जाताना त्यांना आठवत होते आणि ह्या यशाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी असे त्यांना वाटले. आता रात्र बरीच झाली होती आणि दुसर्या दिवशी शनिवार (सुट्टी) त्यामुळे घरी पोहोचल्यावर समाधानाने त्यांनी पाठ टेकली.
सकाळी सकाळी त्यांच्या मोबाईल वाजला. आश्चर्य अधिक चिडचिड अशा भावनेने त्यांनी फोन उचलला. फोन त्यांच्या ऑफिसमधून होता. फोनवरून त्यांनी जे ऐकले, ते ऐकून त्यांची उरलीसुरली झोप खाडकन उडाली. "तू काही करू नकोस, मी आलोच" असे सांगून त्यांनी घाईगडबडीने फोन ठेवला आणि पटकन कपडे घालून बाहेर जायला निघाले. अर्ध्या तासात ते ऑफिसला पोहोचले. सिक्युरिटी डेस्कवर असलेल्या केशवने धावत जाऊन त्यांना सांगितले की प्रोटोटाईप चोरीला गेला! शामकुमारच्या पायाखालची जमीनच सरकली. कालपासून केशवच ड्युटीवर होता. आज सकाळी नेहमीच्या राऊंडला जाताना त्याला लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेला आहे. आता शामकुमारचे डोके गरगरायला लागले. कोणी चोरला, कसा चोरला..... शत्रूच्या हातात जर हा प्रोटोटाईप पडला तर अनर्थ होऊ शकतो, हे त्यांनी पटकन ताडले आणि लगेच पोलीस सबकमिशनर पाटील ह्यांना फोन लावला. कालच्या पार्टीत तेसुद्धा होते. फोनवर सगळी परिस्थिती सांगताच त्यातील गांभीर्य पाटील यांच्या लक्षात आले. हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न होऊ शकतो, हे त्यांनी झटकन ताडले. तेव्हा ह्या प्रकरणाचा गवगवा होऊ देण्यात अर्थ नव्हता. प्रकरण अतिशय गोपनीयतेने हाताळावे लागणार होते. पाटील ह्यांनी त्या भागातील इनचार्ज असणार्या इन्स्पेक्टर कदमला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली आणि हातातील बाकी सर्व केसेस सोडून फक्त ह्या प्रकरणावर लक्ष द्यायचे आदेश दिले. कदम आपल्या नेहमीच्या स्टाफसह घटनास्थळी आले आणि त्यांनी बॅरिकेट्स टाकून लोकेशन सील केले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करायला सुरुवात केली. कुठेही कसलीही तोडफोड दिसत नव्हती. ह्याचा अर्थ साफ होता की चोराला ह्या जागेची पूर्ण माहिती होती आणि प्रोटोटाईप ठेवलेल्या जागेपर्यंत तो सहज पोहोचू शकला. त्यांनी केशवला ताब्यात घेऊन काल रात्री काय काय घडले ते विचारायला सुरुवात केली. केशव नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ड्युटीवर आला होता. त्याला हँडओव्हर देऊन त्याच्या आधीचा गार्ड संदीप निघून गेला. आल्याबरोबर केशवने नेहमीप्रमाणे त्याचा राऊंड मारली. त्या वेळी प्रोटोटाईप नेहमीच्या खोलीत होता, हे केशवने अगदी शपथेवर सांगितले. साधारण रात्री १२:३०च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे, हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला. पहाटे ४ वाजता तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. पण पाहतात तर काय! १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते! ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, ती ४ वाजता केशवच्या लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही, तर CCTV फुटेजही डिलीट केले होते. ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हेदेखील माहीत होते. म्हणजेच चोर हा कोणीतरी कंपनीतीलच असण्याची शक्यता आहे, असा इन्स्पेक्टर कदमनी अंदाज बांधला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी तत्काळ संदीपला ताब्यात घेण्यासाठी कुमक पाठवली. संदीप त्याच्या बायकोबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करून लगेच इन्स्पेक्टर कदम यांच्या समोर हजार करण्यात आले. संदीपला त्यांनी "काल रात्री काय काय केलंस ते सांग" असे म्हटल्यावर संदीपने सांगितले की काल त्याची ड्युटी संपल्यावर तो घरी गेला आणि आज त्याच्या बायकोबरोबर कर्नाटकात जायचा त्याचा बेत होता. त्याच्या बायकोने तिथे कुठल्याशा देवाला नवस बोललेला होता आणि त्याकरिता म्हणून ते दोघे बाहेर जायला निघाले होते आणि तितक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर कदमनी संदीपच्या बायकोला वेगळ्या खोलीत घेऊन जाऊन पुन्हा तेच प्रश्न विचारले. तिनेही "आमचे हे ड्युटी संपवून परत आले आणि उद्या लवकर ऊठ, आपल्याला जायचे आहे असे सांगून झोपले" असे तिने सांगितले. साधारण किती वाजता संदीप घरी आला? असे विचारताच तिने "साधारण १:३० वाजला असेल" असे सांगितले. संदीपची ड्युटी तर ११ला संपते, मग १:३० वाजेपर्यंत तो काय करत होता? असे संदीपला विचारले, तेव्हा त्याने ओशाळून सांगितले की तो घराजवळच्या बारमध्ये जाऊन दारू पीत बसला होता आणि त्यामुळे त्याला यायला वेळ झाला. हे ऐकताच संदीपची बायको त्याचा तिथेच उद्धार करू लागली. "तरी मला वाटलंच दारूचा वास येतोय, उद्या देवाला जायचंय, काही काळ वेळ आहे की नाही? इतका प्रवास आहे उद्या, मी इथे घरी वाट बघतीये, कशाचा काही नाही ह्यांना.." इ. इ. संदीप शरमेने चूर झाला होता. इन्स्पेक्टर कदमनी तिला शांत केले आणि दोघांना दुसर्या खोलीत थांबायला सांगितले. मग इन्स्पेक्टर कदम यांनी ती इमारत आणि त्याचा परिसर पूर्ण पिंजून काढला, पण काहीच मिळाले नाही. अगदी शेवटी त्यांना इमारतीच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका ट्रॅशमध्ये, वरील कव्हर फुटलेला असा एक यूसबी पेन ड्राईव्ह मिळाला. त्यांनी घाईघाईनी तो कॉम्प्युटरला जोडला, तेव्हा तो करप्ट आहे असा मेसेज कॉम्प्युटरवर आला.
आता काय करावे हे इन्स्पेक्टर कदमना सुचेना. त्यांनी विचार करायला सुरुवात केली. एकच इमारत, त्यातून आत येण्यासाठी हा दरवाजा, आल्या आल्या फ्रंट डेस्क, तिथे एक कॉम्प्युटर आणि तिथेच गार्ड बसतो. इमारतीत कुठेही जायचे असल्यास गार्डसमोरूनच जावे लागते. रात्रीची वेळ त्यामुळे ऑफिसमध्ये कोणी कर्मचारी नाही, कुठेही तोडफोड अगर मोडतोड नाही. अगदी अलगद प्रोटोटाईप चोरीला गेला होता आणि बरोबर फुटेजदेखील. मिळाला तो फक्त एक यूसबी ड्राईव्ह, जो उपयोगाचा नाहीये. केशवला आणि संदीपला तर ताब्यात घेतले आहे, पण दोघेही काहीच सांगत नाहीयेत. शिवाय त्यांच्याविरुद्ध असे काही पुरावेही मिळत नाहीयेत. पाटील साहेबांचा फोन आल्यावर काय सांगायचे आता? मदतीसाठी आणखी कुमकही मागवता येत नाहीये, कारण ही केस गुप्तपणे हाताळण्याचे आदेश आहेत. जसाजसा वेळ जात होता, तसे चोराला पकडणे कठीण होत जाणार हे स्पष्ट दिसत होते. ह्यात चोराने तो प्रोटोटाईप देशाच्या शत्रूला विकला तर? शत्रू तर हवी तेवढी किंमत देऊन ते विकत घेईल आणि असे खरोखर झाले, तर भारताच्या सुरक्षिततेला एक मोठे आव्हान निर्माण झाले असते. कदम यांच्या आयुष्यातील ही सर्वात क्रिटिकल केस होती. त्यांच्या डोळ्यात निराशा दाटून आली. आता काय करावे हा विचार करत असतानाच कदम यांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना. पलीकडून थेट दिल्लीहून भारताचे संरक्षणमंत्री श्री. भट बोलत होते! कदम क्षणभर जागेवरून उडालेच, पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बोलायला सुरुवात केली. पाटील साहेब आणि त्याच्या वरिष्ठांकडून प्रकरण कळल्याचे भट ह्यांनी सांगितले. हे प्रकरण किती महत्त्वाचे आहे, हे भट ह्यांनी कदम ह्यांना पुन्हा एकदा सांगितले आणि हे गोपनीय ठेवण्याविषयी आदेश दिले, परंतु त्याचबरोबर मदत करायचीदेखील तयारी दाखवली. स्वतःचा थेट फोन नंबर दिला आणि पुढे काय करणार आहे असे विचारले. कदम यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हतेच. केशव आणि संदीप यांना ताब्यात घेतले आहे आणि एक यूसबी मिळाला आहे इतकेच ते बोलले. बोलता बोलता त्यांना आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र विश्वजीतची - म्हणजेच जित्याची आठवण झाली. कदाचित तो ह्या प्रकरणात आपल्याला मदत करू शकेल असे त्यांना वाटले. कदमनी श्री. भट यांना विश्वजीतबाबत सांगितले आणि त्याला ह्या केसमध्ये सहभागी करण्याविषयी सुचवले. भट यांना ह्या केसमध्ये जितकी कमी माणसे गुंततील तितके हवे होते. कदमनी पूर्ण परिस्थिती सांगितली आणि सध्या विश्वजीतची मदत घेण्यावाचून पर्याय नाही हे निक्षून सांगितल्यावर श्री .भट यांनी तशी परवानगी दिली. पण विश्वजीतला गोपनीयतेची शपथ देणे आणि आणखी कोणालाही सामील करायचे असल्यास प्रथम श्री. भट यांना सांगणे ह्या बोलीवर! श्री.भट यांच्याशी फोन होताच क्षणभर कदम यांनी आपल्या कपाळावरील घाम टिपला. ताण असह्य होत होता. एक ग्लास पाणी प्यायल्यावर मग जरा त्यांना जरा बरे वाटले. लगेच त्यांनी कॉम्पुटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट जित्या उर्फ विश्वजीतला फोन लावला .
आज शनिवार सकाळ म्हटल्यावर विश्वजीतची स्वारी अजून बेडमध्येच होती. इकडे इन्स्पेक्टर कदमचे तीन फोन येऊन गेले आणि विश्वजीतला ह्याचा पत्ताच नव्हता. आता शेवटचा प्रयत्न, नाहीतर थेट विश्वजीतच्या घरी जायचे असे ठरवून कदमनी पुन्हा फोन केला. विश्वजीतने आळसावलेल्या आवाजात फोन उचलला. "तुझ्या मदतीची गरज आहे, ताबडतोब नॅशनल इन्स्टिट्यूटला निघून ये" असे कदमनी सांगितल्यावर त्याने चक्क नाही म्हणून फोन ठेवून दिला. कदमची तळपायाची आग मस्तकात गेली. पण रागावर नियंत्रण ठेवून त्यांनी पुन्हा विश्वजीतला फोन लावला आणि आर्जवे करत आपल्या दोस्तीची शपथ घातली. शेवटी कुरकुरत उद्याच्या रविवारी रात्री मस्त जेवण आणि डबल ब्लॅकचा खंबा देण्याच्या बोलीवर विश्वजीतची स्वारी तयार झाली.
विश्वजीत आपल्या फॉरेन्सिक किटसह नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आला. इन्स्पेक्टर कदम त्याचीच वाट बघत होते. येताच काही मिनिटात कदमनी विश्वजीतला परिस्थिती सांगितली आणि त्याबरोबर भारत सरकारचे आपल्याला पूर्ण पाठबळ आहे हेदेखील सांगितले. विश्वजीतने तो यूसबी ताब्यात घेतला आणि फ्रंट डेस्कच्या कॉम्प्युटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली. बाजूच्या खोलीत त्याने माहितीच्या पृथक्करणासाठी फॉरेन्सिक टूल्स सेट केली आणि तो सांगेपर्यंत अजिबात डिस्टर्ब करायचे नाही असे सांगितले. फॉरेन्सिक अॅनालिसिस प्रोग्रॅमने विश्वजीतच्या शक्तिशाली कॉम्प्युटरच्या साहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करायला सुरुवात केली.
सर्वात प्रथम विश्वजीतने शोधून काढले की ह्या कॉम्प्युटरवर चार यूजर्स आहेत. संदीप, केशव, आणखी दोघे जण. म्हणजे चार जणांमध्ये हा कॉम्प्युटर वापरला जात होता. विश्वजीतने विचारणा केली असता कळले की इतर दोघे दोन दिवस सुट्टीवर आहेत, त्यामुळे केशव आणि संदीप हे दोघेच आलटून पालटून ड्युटी करत आहेत. मग विश्वजीतने सिस्टिमची लॉगइन इन्फॉर्मेशन चेक करायला सुरुवात केली आणि बिंगो ... १२:३३ला संदीपच्या प्रोफाइलने लॉगइन केलेले दिसत होते. आणि १२: ५५ला लॉगआउट! ह्यामुळे संदीपवरचा संशय बळावला. पण संदीपचा अकाउंट वापरून दुसर्या कोणीतरीदेखील लॉगइन केले असण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्वजीतने आणखी विश्लेषण करायला सुरुवात केली. त्या मोडक्या यूसबी ड्राईव्हवरून माहिती रिकव्हर करण्यात विश्वजीतला यश आले. त्या यूसबीमध्ये फक्त एक फाईल होती, ज्यात एक की आणि पासवर्ड होता. विश्वजीतने त्याच्या अनुभवावरून ताडले की हा बिटलॉकरचा पासवर्ड आहे. बिटलॉकर हे सॉफ्टवेअर पार्टिशन एन्क्रिप्ट करायला वापरले जाते, हे त्याला माहीत होते. त्याने लगेच ह्या कॉम्प्युटरमध्ये बिटलॉकरशी संबंधित पार्टिशन आहे का हे पाहायला सुरुवात केली. पण थोड्या वेळातच त्याला कळले की अशी कोणतीही माहिती अगर पार्टिशन कॉम्प्युटरवर नाहीये. ह्याचा अर्थ नक्कीच एखादा दुसरा कॉम्प्युटर आहे, ज्याचा हा बिटलॉकर पासवर्ड आहे. पण असा दुसरा कॉम्प्युटर कोणता? विश्वजीतने आणखी माहिती शोधायला सुरुवात केली.
त्याने संदीपचे ई-मेल चेक करायला सुरुवात केली. बरेच शोधल्यावर त्याला असे लक्षात आले की सॅमन्था म्हणून कोणीतरी आहे, जिने संदीपला अनेकदा भेटायला बोलावले आहे. थोडी चौकशी केल्यावर लक्षात आले की सॅमन्था ही त्याच कंपनीत टेक्निकल विभागात कामाला आहे. मग विश्वजीतने संदीप आणि सॅमन्था ह्या दोघांमधील ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. काही ईमेल्स संशयास्पद होत्या, ज्यात सॅमन्थाने 'तुझी आता आयुष्यभराची चिंता दूर होईल, तुला तुझे भाग्य उजळायचे आहे का?' अशी विचारणा केली होती. ह्यावरून विश्वजीतचा संदीपवरील संशय अधिक पक्का झाला आणि आता पुरेसा पुरावादेखील हातात होता. त्याने लॉगइनची माहिती आणि ते ईमेल्स ह्यांची प्रिंट काढून इन्स्पेक्टर कदमना माहिती दिली. कदम ह्यांच्याकडे आता पुरेशी माहिती आली होती आणि आता त्यांच्या डोळ्यातील निराशेची जागा एकदम नव्या उमेदीने घेतली. कदम यांनी संदीपला एका खोलीत बोलावले आणि काल रात्री काय झाले हे पुन्हा खडसावून विचारले. संदीपने आधीचीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केल्यावर इन्स्पेक्टर कदम यांनी संदीपच्या श्रीमुखात दोन भडकावल्या आणि त्याच्या समोर ईमेल्सच्या प्रिंट आउट्स आणि लॉगइनची माहिती ठेवत पुन्हा खडसावून विचारले आणि खोटे बोलल्यास किती वाईट परिणाम होऊ शकतात ह्याची धमकी दिली. तेव्हा संदीप पोपटासारखा बोलू लागला.
सॅमन्था ही अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती. ड्युटीवर असताना संदीप तिला रोज बघायचा. तिच्यावर खरे तर तो फिदाच होता. काही आठवड्यांपूर्वी सॅमन्थाने संदीपशी ओळख वाढवली. तिने त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले होते. तिथे तिने प्रोटोटाईप चोरून तिच्या स्वाधीन करण्याची कल्पना त्याला दिली. त्याबदल्यात खूप मोठी रक्कम देण्याचे कबूल केले. तिचे ते सौंदर्य, मधाळ आवाज आणि भलीमोठी रक्कम ह्या सर्वांनी संदीपला भुरळ घातली. रक्कम इतकी मोठी होती की इथून पुढे संदीप आरामात बसून खाऊ शकला असता. सॅमन्थासाठी संदीपने हे कबूल केले आणि त्या दिवशी ड्युटी संपल्यावर तो बाजूच्याच बारमध्ये दारू पीत बसला. ठरल्याप्रमाणे सॅमन्था १२ वाजता आली आणि ते दोघे कंपनीकडे जायला निघाले. लांबून केशववर संदीप लक्ष ठेवून होता. एक घोगडे पांघरून मागच्या पार्किंगच्या तिथे सॅमन्थाने खुडबूड सुरू केली. अपेक्षेप्रमाणे केशव तिकडे जायला निघाला, तेव्हा संदीपने सॅमन्थाला मिस्ड कॉल दिला आणि लगेच इमारतीत प्रवेश करून प्रोटोटाईप चोरला, फ्रंट डेस्कच्या कॉम्प्युटरवर लॉगइन केले आणि CCTV फुटेज डिलिट केले, लॉगआउट करून केशव यायच्या आत तिथून पोबारा केला. इकडे संदीपचा मिस्ड कॉल आल्यावर सॅमन्थानेदेखील पोबारा केला. केशव तिकडे येत असल्याची ही खूण होती. संदीप आणि सॅमन्था ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि संदीपने तो प्रोटोटाईप सॅमन्थाला दिला आणि त्या बदल्यात मिळणारी निम्मी रक्कम सॅमन्थाने त्याला दिली आणि उरलेली उद्यापर्यंत त्याच्या कर्नाटकातील पत्त्यावर पोहोचेल, असे सांगितले. संदीपला खर्चाला थोडे पैसे देऊन आणि प्रोटोटाईप घेऊन सॅमन्था निघून गेली आणि संदीप घरी आला. नवस पूर्ण करण्याच्या बहाण्याने कर्नाटकात जायचे आणि पूर्ण पैसे मिळाले की दक्षिणेच्या एखाद्या राज्यात कायमचे जायचे, असा संदीपचा विचार होता. सॅमन्था कुठे गेली असेल, काय करेल ह्याचा मात्र संदीपला अजिबात अंदाज नव्हता.
इन्स्पेक्टर कदम यांना पहिले यश मिळाले ते म्हणजे चोर सापडला. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटोटाईप अजून मिळाला नव्हता. त्यांनी लगेच पाटील ह्यांना ही सर्व माहिती दिली आणि पुढील तपासाला सुरुवात केली. सॅमन्थाच्या घराला कुलूप होते आणि फोन स्विच ऑफ येत होता. शेजारी चौकशी केली असता ती कालपासूनच घरी आलेली नाही असे कळले.
विश्वजीतला आता ऑफिसमधील सॅमन्थाच्या कॉम्प्युटरचा अॅक्सेस देण्यात आला. विश्वजीतने आता सॅमन्थाच्या कॉम्प्युटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली आणि माहितीचे विश्लेषण करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने सॅमन्थाचे ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. तिच्या कॉम्प्युटरवर जवळजवळ १,२०,००० ईमेल्स होते आणि तिने जवळजवळ ४३ जणांशी ई-मेल संभाषण केले होते. आता इतक्या ईमेल्समधून हवा तो ई-मेल कसा शोधून काढायचा? विश्वजीतने त्याच्या फॉरेन्सिकच्या अनुभवाचा वापर करायला सुरुवात केली. प्रथम त्याने टाइम लाईन ठरवली आणि फक्त गेल्या ६ महिन्यांतील ईमेल्सवर भर द्यायचे ठरवले. त्यामुळे एकूण इमेल्स राहिले ४०,०००. मग त्याने संदीप आणि सॅमन्था ह्यांच्यातील ईमेल्सचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली आणि काही कीवर्ड शोधून काढले. मग त्या ४०,००० ईमेल्समधून त्या कीवर्डशी संबंधित असे जवळजवळ २०० ईमेल्स मिळाले आणि त्यात त्याला कळले की सॅमन्था निकी नावाच्या व्यक्तीशी प्रोटोटाईप संदर्भात बोलत आहे. विश्वजीतने मग सॅमन्था आणि निकी ह्यांच्यातील ईमेल्सवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ते ईमेल्स वाचून त्याला कळले की निकीदेखील ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. निकी हा कंट्रोलिंग युनिटचा प्रमुख होता आणि त्याचे आणि सॅमन्थाचे जवळचे संबंध होते. निकी आणि सॅमन्था यांच्या ईमेल्समध्ये हे कळून चुकले की निकीने सॅमन्थाला 'ते टोकन पाठव' असे सांगितले होते आणि त्यानंतर 'आपले स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ येत आहे, टोकन आवडले, आता मुख्य पाककृतीची वेळ जवळ आली' अशा पद्धतीचे ईमेल्स पाठवले होते. मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप, हे जवळजवळ निश्चित होते.. पण टोकन म्हणजे काय? ह्याचा अर्थ आणखी काहीतरी चोरीला गेले आहे काय? ते कदाचित प्रोटोटाईपशी निगडित असेल काय? हा विचार आता विश्वजितच्या डोक्यात सुरू झाला आणि तितक्यात त्याला त्या यूसबीची आठवण झाली. त्याने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवर पहिले, तर त्याला अनअॅलोकेटेड सेक्टर्स आढळून आले. घाईघाईने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवरील अनअॅलोकेटेड सेक्टर्स रीकन्स्ट्रक्ट केले आणि यूसबीवरील बिटलॉकर पासवर्ड टाकला आणि बिंगो! तिच्या कॉम्प्युटरवरील डिलीट केलेल्या पार्टिशनवरील डेटा आता दिसू लागला. विश्वजीतने तपासामधील एक अतिशय महत्त्वाची पायरी गाठली होती. तो आता रिकव्हर केलेल्या पार्टिशनवरील डेटाचे विश्लेषण करू लागला. तिथे त्याला scan.file अशी एक फाईल दिसली, जिला पासवर्ड देऊन एन्क्रिप्ट केले होते. आता दोन गोष्टी गरजेच्या होत्या - ही फाईल कशी एन्क्रिप्ट केली (कोणता प्रोग्राम वापरून) आणि पासवर्ड काय असेल? ज्या अर्थी फाईल एन्क्रिप्ट केली, त्या अर्थी एन्क्रिप्ट करणारे एखादे सॉफ्टवेअर नक्की ह्या कॉम्प्युटरवर असले पाहिजे. विश्वजीतने प्रोग्रॅम फाइल्स चेक करायला सुरुवात केली, तर तिथे एन्क्रिप्ट करणारे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते. त्याने इतर कोणते प्रोग्रॅम्स (stand alone) होते, हे चेक केले. पण तिथेही काही संशयास्पद नव्हते. विश्वजीतने आता फॉरेन्सिकचे आपले ज्ञान पणाला लावले. विंडोजच्या रेजिस्ट्रीमध्ये जाऊन त्याने चेक करायला सुरुवात केली. आणि तिथे त्याला एक लिंक फाईल दिसली, ज्यामुळे हे कळले की डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स डिलीट केले गेले आहेत. विश्वजीतने मग रिकव्हरी प्रोग्रॅम सुरू केला आणि डिलीट केलेला डेटा परत मिळवला. त्यात त्याला असे दिसून आले की तिथे Truecrypt नावाचे सॉफ्टवेअर होते, जे डिलीट करण्यात आले आणि हे सॉफ्टवेअर डेटा एन्क्रिप्ट करायला वापरतात. चला, म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ही फाईल Truecrypt वापरून एन्क्रिप्ट करण्यात आली आहे, पण पुढे काय? पासवर्ड कसा मिळवणार? पासवर्ड क्रॅक करणार्या सॉफ्टवेअरला ती एन्क्रिप्टेड फाईल दिली असता 'पासवर्ड कॉम्प्लेक्स आहे आणि हा क्रॅक करायला ७ दिवस लागतील' असा संदेश आला. साहजिकच विश्वजितकडे तितका वेळ नव्हता. त्याने पुन्हा निकी आणि सॅमन्था ह्यांच्यातील संभाषणावर लक्ष द्यायला सुरुवात केली, कदाचित तिथे काही क्लू मिळेल...?
त्या दोघांच्या संभाषणात अनेकदा बाहेर जेवायला जाण्याचे ईमेल्स होते. बर्याचदा ते इटालिया ह्या हॉटेलमध्ये जातात हे विश्वजीतला कळले. सॅमन्थाला Alfredo पास्ता खूप आवडतो, हेही तिने ई-मेलमधून निकीला सांगितले होते. बर्याचदा ती Alfredoच्या उल्लेख my favorite असा करत असे. विश्वजित अक्षरशः डोळ्यात तेल घालून प्रत्येक ई-मेल वाचत होता आणि त्याला अचानक एक ई-मेल मिळाला, ज्यात निकीने सॅमन्थाला 'टोकन मिळाले, धन्यवाद आणि टोकन खूप आवडले' असा उल्लेख केला होता आणि त्याबरोबरच टोकन सुरक्षित ठेव असा सल्लाही सॅमन्थाला दिला होता. त्यावर 'सॅमन्थाने काळजी नको निक, इट इस my favorite' असा रिप्लाय दिला होता. विश्वजीतच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली आणि त्याने चटकन truecrypt त्याच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केले आणि ती फाईल उघडून Alfedro, AlfredoPasta, Alfrdo_Pasta, alfredoPasta PastaAlfredo असे कॉम्बिनेशन पासवर्ड म्हणून वापरून पाहायला सुरुवात केली आणि बिंगो.... त्यातील एका पासवर्डने फाईल ओपन झाली. ह्यात नशिबाचा भाग खूप होता, पण म्हणतात ना की प्रयत्न करणार्याला नशिबाची साथ असते! खालील फोटो त्या फाईलमध्ये होते. प्रोटोटाईपच्या ह्या ब्लूप्रिंट होत्या. टोकन म्हणजे ह्या ब्लूप्रिंट्स आणि मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप, हे कळले. ह्या ब्लूप्रिंट्स सॅमन्थाने निकीला पाठवल्या होत्या.
विश्वजीतने आता निकीच्या ऑफिसकडे मोर्चा वळवला. त्याच्या ऑफिसमधील कॉम्प्युटरचे आता फॉरेन्सिक अॅनालिसिस करायला त्याने सुरुवात केली. सुरुवातीलाच त्याने प्रोटोटाईप आणि त्याच्यासंबधीचे ईमेल्स ह्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की स्वित्झर्लंडमधील स्टारलाईट कंपनीच्या CEOनी - म्हणजे निकोलसनी निकीला प्रोटोटाईपविषयीची ऑफर दिली होती. निकीने त्याला आश्वासन दिले आणि टोकन देण्याच्या मोबदल्यात म्हणून काही पैसे द्यायला सांगितले आणि त्या बदल्यात त्याला टोकन म्हणजेच त्या ब्लूप्रिंट्स पाठवल्या. म्हणजे आता खरेदीदार कोण हेदेखील कळले आणि ह्या सर्व कटात कोण कोण सहभागी आहे हेदेखील. तथापि अद्याप प्रोटोटाईप कुठे आहे आणि तो कसा मिळवता येईल ह्याची काहीच माहिती नव्हती. इन्स्पेक्टर कदम यांनी विश्वजीतला सॅमन्था घरी नसल्याची बातमी दिली, तेव्हा त्याने निकीविषयी सांगितले. कदमनी घाईने निकीच्या घराकडे साध्या वेषातील पोलीस पाठवले, तेव्हा निकीदेखील घरी नसल्याचे कळले आणि त्याचाही फोन स्विच ऑफ येत होता. ह्यावरून सॅमन्था आणि निकी हे सोबतच कुठे तरी पळून गेले असावेत, असा इन्स्पेक्टर कदमना संशय आला. तपास पुढे सरकत होता, पण अजून प्रोटोटाईप कुठे आहे ह्या विषयीची काहीच माहिती मिळत नव्हती.
इतक्यात दिल्लीवरून इन्सपेक्टर कदम यांना फोन आला. श्री. भट यांनी तपासाच्या प्रगतीची चौकशी केली. चोर कोण आहेत हे कळल्याचे समजताच त्यांना खूप आनंद झाला, पण प्रोटोटाईपविषयी अजून काही माहिती नाही हे कळताच त्याचा स्वर थोडा चिंतेचा झाला. Time is of essence inspector, असे म्हणून त्यांनी विश्वजीतला फोन द्यायला सांगितले. विश्वजीतला त्यांनी आतापर्यंतच्या कामासाठी शाबासकी दिली आणि लवकरात लवकर प्रोटोटाईपचा शोध लाव, तुला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल ती मिळेल असे सांगितले. विश्वजीतने त्यांचे आभार मानून पुन्हा कामाला सुरुवात केली. आणि इतक्यात तिथे पाटील साहेब आणि शामकुमारदेखील आले. शामकुमार ह्यांना आपली सिक्युरीटी इतकी तकलादू कशी, फ्रंट डेस्कच्या लोकांना प्रोटोटाईपपर्यंत जायला कशाला अॅक्सेस ठेवले, साधा फ्रंट डेस्कचा माणूस CCTV फुटेज डिलीट करतो म्हणजे काय? फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का? असे अनेक प्रश्न पडले होते. पण वेळ तो विचार करण्याची नव्हती. प्रोटोटाईप परत मिळताच पूर्ण सिक्युरिटीची पुनर्रचना करण्याचे त्यांनी ठरवले.
तर शेवटच्या मिळालेल्या धाग्यानुसार निकोलसने निकीला पैसे दिले होते. त्यामुळे विश्वजीतने त्या दिशेने अॅनालिसिसला सुरुवात केली. मनी, बँक, क्रेडिटेड अशा की वर्ड्सनी आणि निकोलसशी निकीचे बोलणे झाले त्या कालावधीच्या आसपासचे त्याने निकीचे ईमेल्स शोधायला सुरुवात केली आणि बिंगो ..... बँक ऑफ बेस्टोनियाकडून निकीच्या अकाउंटमध्ये साधारण १,०००,००० डॉलर्स जमा झाल्याचा ई-मेल त्याला मिळाला. त्याने ही बातमी लगेच इन्स्पेक्टर कदम यांना सांगितली आणि बँक ऑफ बेस्टोनियाशी तत्काळ संपर्क करून देण्याविषयी सुचवले. कदम यांनी श्री. भट यांना फोन लावला आणि लगेच चक्रे फिरली. बँक ऑफ बेस्टोनियामधील एका बड्या पदाधिकार्यांशी विश्वजीतचा फोन जोडून देण्यात आला. विश्वजीतने त्या १,०००,००० डॉलर्सच्या व्यवहाराविषयी चौकशी केली, तर ते निकीच्या नवीनच उघडलेल्या अकाउंटमध्ये अमुक अमुक तारखेला जमा झाले आहेत असे त्या अधिकार्याने सांगितले. विश्वजीतने ह्या खात्याविषयी इतर माहिती विचारताच हे कळले की बेस्टोनिया देशातमध्ये निकीने बीच हाऊस विकत घेतले आहे आणि त्यासाठी निकीने बँकेकडून ५,०००,००० डॉलर्सचे गृह कर्ज घेतले आहे. विश्वजीतने त्या अधिकार्याचे आभार मानून फोन ठेवला आणि त्याच्या लक्षात आले की निकी आणि सॅमन्था बेस्टोनियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असू शकतील आणि त्याने लगेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे भारतातून बेस्टोनियाला जाणार्या गेल्या दोन आठवड्यांपासूनची आणि आजची अशी प्रवाशांची यादी पाहून त्यात निकी आणि सॅमन्था यांचे नाव आहे का हे पाहायला सांगितले. श्री. भट ह्यांच्या प्रभावामुळे लगेच उत्तर आले आणि त्यात असे कळले की आजच्या सकाळच्या मुंबई-बेस्टोनिया विमानात ह्या दोघांचे आरक्षण होते. विश्वजीतने लगेच मुंबई एअरपोर्टला फोन लावला आणि एअरपोर्टच्या अधिकार्याकडून उत्तर आले की विमानाने कधीच टेक ऑफ केला आहे आणि आता विमान भारतीय हवाई हद्दीच्या बाहेर आहे, त्यामुळे ते आता काहीच करू शकत नाहीत. हे कळताच इन्स्पेक्टर कदम यांची भयंकर चिडचिड झाली. जवळजवळ हातात आलेली केस आता निसटून जाते कि काय, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पुन्हा श्री. भट यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. श्री. भट यांनी "मी पाहतो काय करता येते ते" असे सांगून फोन ठेवला. पुढील ३० मिनिटे कदम, पाटील आणि विश्वजीत यांच्यासाठी अतिशय तणावपूर्ण गेली. विश्वजीतने जितके करता येईल तितके सगळे केले होते, आता श्री. भट काय करतात ह्यावर सगळे अवलंबून होते. खोलीत कोणीच काही बोलत नव्हते, एकमेकांचे श्वास ऐकू येतील इतकी शांतता! आणि इतक्यात इन्स्पेक्टर कदमचा फोन वाजला. त्यांनी घाईघाईने तो उचलला आणि त्यांच्याभोवती पाटीलसाहेब, विश्वजीत, शामकुमार ह्यांनी गर्दी केली. सगळे जण श्री. भट कदम ह्यांना काय सांगत आहेत ह्याकडे प्राण कानात ओतून ऐकू लागले. श्री. भट यांनी एक ई-मेल अॅड्रेस दिला आणि विश्वजीतला प्रोटोटाईपच्या ब्लूप्रिंट त्या ई-मेलवर पाठवायला सांगितले आणि फोन ठेवून दिला. विश्वजीतने लगेच ते पाठवले आणि सगळे जण आता अधीर होऊन पुढे काय होणार ह्याची वाट पाहू लागले. श्री. भट ह्यांनी नक्की काय केले, आता पुढे काय होणार ह्याची काहीच कल्पना नसल्याने वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले. अशीच काही मिनिटे गेली आणि थोड्या वेळात पुन्हा इन्स्पेक्टर कदम यांचा फोन वाजला. निकी आणि सॅमन्था ह्यांना बेस्टोनिया पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्याकडून प्रोटोटाईपदेखील जप्त केला. सगळ्यांनी आनंदाने 'हुर्रे' असे ओरडायला सुरुवात केली. मनावरचा सगळा ताण अचानक कमी झाला होता. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले होते. श्री. भट ह्यांनी बेस्टोनियातील भारतीय वकिलातीकडून निकी आणि सॅमन्थासाठी वॉरंट जारी केले होते आणि तिथल्या पोलिसांना प्रोटोटाईपचे फोटो पाठवून तो प्रोटोटाईप निकी / सॅमन्था ह्यांच्या सामानात शोधायला सांगितला होता. बेस्टोनिया पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि बेस्टोनिया एअरपोर्टवरच निकी आणि सॅमन्थाला अटक केली, सामानाच्या झडतीमध्ये तो प्रोटोटाईप मिळाला!
यथावकाश निकी आणि सॅमन्थाला भारतात आणले आणि चौकशीत निकीने गुन्हा कबूल करत सांगितले की हा सर्व त्याचा प्लॅन होता. निकोलसकडून विचारणा झाल्यावर हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला सॅमन्थाची मदत घ्यावी लागली. अर्धी रक्कम देण्याच्या बोलीवर सॅमन्था तयार झाली. सॅमन्था तांत्रिकदृष्ट्या प्रवीण होती आणि तिने ह्या कामासाठी संदीपला तयार करण्याचे ठरवले. प्रथम निकोलसचा विश्वास संपादित करण्यासाठी सॅमन्थाने ब्लूप्रिंटचे फोटो काढले. ते एन्क्रिप्ट करून आपल्या कॉम्प्युटरवरून निकीला पाठवले आणि निकीने ते निकोलसला पाठवले आणि सॅमन्थाने फोनवरून निकोलासला ते कसे बघायचे हे सांगितले. निकोलसने खूश होऊन ठरलेले पैसे निकीला पाठवले आणि प्रत्यक्ष प्रोटोटाईपसाठी डील फायनल केले. सॅमन्थाने मग तिच्या कॉम्प्युटरवरील ते एन्क्रिप्ट केलेले फोटो ज्या बिटलॉकरने एन्क्रिप्ट केलेल्या पार्टिशनवर होते, त्या पार्टिशनची की यूसबीवर कॉपी केली आणि ते पार्टिशन डिलीट केले. एन्क्रिप्शन सॉफ्टवेअर Truecryptदेखील uninstall केले. बिटलॉकर पार्टिशनची की यूसबीमध्ये होती, पण बेस्टोनियाला जायचा प्लॅन झाल्यावर तिने तो युसबी आपटून नष्ट करायचा प्रयत्न केला, त्यात यूसबीचे बाहेरचे कव्हर तुटले, कंपनीतून बाहेर जाताना तिने घाईघाईत तो यूसबी ट्रॅशमध्ये टाकला आणि ती निघाली. चोरी झाल्यावर तो प्रोटोटाईप संदीपकडून घेऊन ती निकीला ठरलेल्या ठिकाणी भेटली आणि तिथून दोघांनी एअरपोर्टकडे प्रयाण केले. जसे विमान सुटले आणि भारतापासून लांब लांब गेले, तसे दोघांनी विमानात चिअर्स केले आणि भविष्याची स्वप्ने पाहू लागले. बेस्टोनियात लँड होताच त्यांना वाटले कि आपण बाजी जिंकली. परंतु भारत सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि विश्वजीतसारखे लोक हे देशासाठी काय करू शकतात, ह्याची त्यांना कल्पना नव्हती. लँड होताच पाहतात तर काय, बेस्टोनिया पोलीस त्यांच्या स्वागतासाठी उभे! तिथून पुढे काय झाले, हे सर्वांना माहितच आहे.
पुढे निकोलसच्या नावाने वॉरंट निघून त्यालाही अटक करण्यात आली आणि ह्या पूर्ण प्रकरणावर पडदा पडला. विश्वजीत आणि त्याच्या डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने आणखी एक गुन्हा उघडकीला आला होता आणि देशाचे फारसे नुकसान न होता गुन्हेगार जेरबंद झाले होते. इन्स्पेक्टर कदम ह्यांचा जित्या आता डिटेक्टिव्ह विश्वजीत झाला होता!
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 1:27 am | राघवेंद्र
विश्वजीत aka jack _bauer कथा आवडली. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या.
2 Nov 2016 - 8:01 am | अरुण मनोहर
कथा आवडली. संगणकी क्षेत्रातली नवीन माहिती कळली.
2 Nov 2016 - 12:34 pm | सस्नेह
सायबर सिस्टीम वापरून गुन्हेअन्वेषण करण्यातले बारकावे छान.
कथा म्हणून मांडणी अधिक सुटसुटीत हवी होती.
2 Nov 2016 - 3:28 pm | चांदणे संदीप
विश्वजीत काय!! संदीपचा पार कचराच करून टाकला न राव!
जोक्स अपार्ट, कथा आवडली!
मिपाचा हा दिवाळी अंक घेऊन मिपाच्या यूट्यूबवर एक चित्रमालिका करायची आयडिया कोणाच्यातरी डोक्यात येवो हीच त्या वरच्याला पार्थना! ;)
Sandy
3 Nov 2016 - 11:37 am | नूतन सावंत
सायबर क्षेत्रातले गुन्हे शोधान्बाबत बरेच बारकावे समजले,कथा आवडली.
3 Nov 2016 - 5:05 pm | भटकंती अनलिमिटेड
कथा आवडली.
पण सिस्टीम (व्यवस्था, नॉट कॉम्प्युटर सिस्टीम) रेफरन्सेसमध्ये बरीच गडबड आहे.
6 Nov 2016 - 5:11 am | Jack_Bauer
भटकंती अनलिमिटेड, धन्यवाद.
म्हणजे काय ते समजलो नाही. कृपया थोडे विस्ताराने सांगाल का ?
7 Nov 2016 - 9:27 am | भटकंती अनलिमिटेड
सिस्टीमची गडबड म्हणजे...
१) राष्ट्रीय सुरक्षाविषयक संशोधन संस्थेला एकच गार्ड असणे.
२) कंपाउंडजवळ कसलाच पहारा नसणे.
३)गार्डला एकदम सर्व्हेलिअन्स सिस्टीमचा रीड/राईट ऍक्सेस असणे.
४) एवढ्या महत्त्वाच्या केसचा तपास उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवला जातो. तो एकदम निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याकडे सोपवणे.
५) केंद्रीय मंत्र्याने एकदम पोलीस निरीक्षकाला फोन करणे.
६) राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या कॉंप्युटरवर थर्डपार्टी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सरसकट परवानगी असणे.
७) त्या नेटवर्कमध्ये सरसकट पेन ड्राईव जोडता येणे.
८) साध्या एम्प्लॉईच्या अकाऊंटमधून एक्स्टर्नल डोमेनला मेल पाठवता येणे.
सध्यातरी एवढे दिसलेत.
7 Nov 2016 - 6:39 pm | अनुप ढेरे
हपिसच्या ईमेलवरून असले धंदे कोण करेल?
8 Nov 2016 - 3:02 am | Jack_Bauer
भटकंती अनलिमिटेड, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अनेक वेळा एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल केले जातात. इथे तसेच काहीसे असू शकेल. शिवाय स्वतः सिक्युरिटीचाच माणूस आणि कंपनीमधीलच कॉम्पुटर एक्स्पर्ट हे ह्यात सामील असल्याने असे होऊ शकले.
लेखात
हा उल्लेख ह्याकरिताच केलेला आहे. पण आपण मांडलेले मुद्दे अतिशय ग्राह्य आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद.
3 Nov 2016 - 5:27 pm | आतिवास
पण..
माझं संगणकाचं ज्ञान मर्यादित असल्याने तांत्रिक बाबी डोक्यावरून गेल्या.
कदाचित ही कथा नंतर शामकुमार किंवा कदम कोणालातरी सांगताहेत अशी कल्पना करून लिहिल्यास (उदाहरणार्थ शेरलॉक होम्सच्या कथा) माझ्यासारख्या वाचकांची सोय होईल.
4 Nov 2016 - 9:40 pm | बोका-ए-आझम
थोडी खुलवायला हवी होती.
4 Nov 2016 - 10:40 pm | ज्योति अळवणी
कथा छान आज. पण अजून थोडी खुलवली असती तर मजा आली असती.सगळं खूप घाईघाईत झाल्यासारखं वाटलं. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आणि केवळ इन्स्पेक्टर कदम हाताळतात. पाटील देखील उशिरा येतात घटनास्थळी हे पटलं नाही.
पण कथा संकल्पना छान आहे
10 Nov 2016 - 5:28 pm | पैसा
संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून लिहिलेली रहस्यकथा आवडली.
21 Nov 2016 - 12:53 am | अनिता
आणि बिंगो ...आताच वाचन सम्प्व्ले. छान कथा आहे.
21 Nov 2016 - 2:17 am | निओ१
ह्याकर्स कथा, किवा किमा त्यावर आधारित विदेशी चित्रपट तरी पहा, जेणे करुन तुम्हाला बेसिक गोष्टीतरी समजतील. अतीशय दर्जेदार झाली असती ही कथा जर तुम्हाला व्यवस्था, गुप्तता, संगणक आणि सुरक्षायंत्र कसे कार्य करते हे माहिती असते तर.
विदेशी चित्रपट म्हणजे फक्त अमेरिकन चित्रपट नाहीत.
21 Nov 2016 - 2:29 am | निओ१
आणि हो एक राहिले म्हणून परत..
"हे केशवने अगदी शपथेवर सांगितले. साधारण रात्री १२:३०च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे, हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला. पहाटे ४ वाजता तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेलाय"
१. *शपथ
अहो, कायदा असा शपथ इत्यादीवर चालला असता तर याची फक्त कल्पना मी हिल्टलर सरकार सोबत करु शकलो असतो.
२. "हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला."
३. हा सुरक्षा तंत्र मधील एक व्यक्ती आहे ना? अलर्ट, व्हेरिफिकेशन, अपडेट टू हाय लेव्हल.. (त्याच्या वरच्या) इत्यादी प्रकार असतात हे तरी किमान माहिती हवे तुम्हाला.
४. "ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला"
का ?
५. "प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. पण पाहतात तर काय! १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते! ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, ती ४ वाजता केशवच्या लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही, तर CCTV फुटेजही डिलीट केले होते. ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हेदेखील माहीत होते"
आता माझी हिंमत होत नाही आहे, किंवा हसू एवढे येत आहे की काय लिहावे / रडावे हेच समजत नाही आहे.
21 Nov 2016 - 2:40 am | निओ१
संपादक,
येथे माझी चू़क झाली आहे, काही कारणामुळे माझ्या उत्तराच्या समोर देखील नंबर्स आले आहेत.
३. ४. (नंतर "का" हे उत्तर आहे)
21 Nov 2016 - 2:36 am | निओ१
व सॉरी,
पण येथे छान, आवडली असे लिहणार्या वाचकांचे प्रतिसाद वाचले व समजले की आपल्याकडे अल्पसंतुष्टी किती आहे, सारासार विचार देखील करत नाही आहोत आपण.
21 Nov 2016 - 6:54 am | असंका
मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, हळुहळु!