पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.
हा चिरल्यावर आतून असा दिसतो.
साहित्यः
एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, चार पाच चमचे साखर, दोन चमचे तूप, हिंग , जीरे.
कृती:
बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. दह्यात मीठ, साखर घालून सारखे करावे. तूप गरम करून जीरे, मिरची तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर घातल्यास पाणी सुटते, म्हणून आयत्यावेळी सारखी करावी.
याला एक प्रकारचा वास असतो, काहींना तो आवडत नाही. पण ज्यांना आवडतो ते वाट बघत असतात, कधी मिळतोय चिबूड याची! या कोशिंबीरीला साखरेची पुढे चव चांगली वाटते. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या.
प्रतिक्रिया
23 Sep 2016 - 11:48 am | मार्मिक गोडसे
अगदी अशीच डांगराची कोशिंबीर आमच्या घरी करतात. अगदी चवदार लागते.
23 Sep 2016 - 1:20 pm | त्रिवेणी
मस्त दिसतेय. आमच्या इथे असच काहितरी असत त्याला वाळक म्हणतात बहुतेक.
23 Sep 2016 - 4:30 pm | अभ्या..
वाळकं हे नसावं ते राउंड छोट्या काकड्या टैप असते , ह्याला बहुधा शेंदाड म्हनतात.
23 Sep 2016 - 1:33 pm | विशाखा राऊत
चिबुड.. खुप आवडतो. मस्त आहे रेसेपी :)
23 Sep 2016 - 1:33 pm | अत्रुप्त आत्मा
मससससससस्त! लै दिसानी पहाण्यात आली .
@चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.››› हो.. तसाच खाल्लाय बय्राचदा.
23 Sep 2016 - 8:48 pm | सही रे सई
मी पण खूप दिवसांनी पाहिला.
माहेरची आठवण आली.
23 Sep 2016 - 4:03 pm | अजया
मस्स्त!
बघितलंय चिबुड पण कधी आणलं नव्हतं. आता आणुन बघेन.
23 Sep 2016 - 4:13 pm | सूड
आमच्याकडे साखर लावूनच संपतो बर्याचदा. आता असं करुन पाह्यलं पाहिजे.
23 Sep 2016 - 4:38 pm | यशोधरा
सेम.
23 Sep 2016 - 4:44 pm | आदूबाळ
भीषण लागतं चिबूड!
26 Sep 2016 - 2:49 pm | दिपक.कुवेत
"भीषण" पण वेगळ्या अर्थाने...चिबूड कुठल्याही स्वरुपात आवडत नाहि. पोळिबरोबर तर हि कोशिंबीर डोक्यात जाते.
26 Sep 2016 - 8:11 pm | आदूबाळ
तुमच्याच अर्थाने भीषण म्हणत होतो.
23 Sep 2016 - 5:35 pm | मनिमौ
ऊर्फ शेंदाड मला आवडत फार
कोशिंबीर छान दिसतेय
23 Sep 2016 - 5:47 pm | अनन्न्या
मी आधीच सांगितलं ज्यांना आवडतो त्यांना खूप नाही त्यांना अजिबात नाही.
23 Sep 2016 - 6:52 pm | Nitin Palkar
मस्क मेलन
23 Sep 2016 - 7:34 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्क मेलोन वेगळे. फॅमीली/कुळ मेलोनचेच पण ह्याला बहुतेक मॅश मेलोन किंवा चिबुड मेलोन असे म्हणतात.
23 Sep 2016 - 10:14 pm | अनन्न्या
चिबुड मेलॉन किंवा मॅश मेलॉन!
23 Sep 2016 - 10:27 pm | अभ्या..
मस्क मेलन म्हणजे खरबुज. आतून अबोलीच्या रंगाचे असते ते. वरुन पांडरेटेक्शर्ड
23 Sep 2016 - 11:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
बहुतेक बटरनट स्क्वॅश
24 Sep 2016 - 2:31 am | विशाखा राऊत
नाही नाही.. स्क्वॅश म्हणजे भोपळा.
बटरनट स्क्वॅश हा भोपळा कॅटिगरीमध्ये आहे.
26 Sep 2016 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरबूज (Cantaloupe, मेलन प्रजातीतील एक फळ)...
आणि
बटरनट स्क्वॅश (भोपळा प्रजातीतील एक फळभाजी)...
26 Sep 2016 - 6:57 pm | अनन्न्या
किती वेगवेगळे प्रकार असतात.
23 Sep 2016 - 5:55 pm | सूड
बाय द वे, या वेळचे फोटो कोणी काढलेत? फार सजावट नसल्याने, साहित्य आणि तयार पदार्थ अधोरेखित होऊन सुंदर दिसतंय.
23 Sep 2016 - 6:37 pm | अनन्न्या
मायक्रोमॅक्स ए १०७ या माझ्या मोबाईलने. सगळे फोटो मोबाईल कॅमेय्रानेच काढते मी!
थँक्स!!!!!
23 Sep 2016 - 6:06 pm | पिलीयन रायडर
चिबुड पहिल्यांदाच पाहिला. छानच लागत असेल. फोटो मस्त आलाय ह्याची सहमत!
23 Sep 2016 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
चिबुड आतापर्यंत पूर्ण पिकलेला असल्यास तसाच किंवा फारतर मीठ कावून खाल्ला आहे. हा नवीन प्रकार करून बघायला हवा.
23 Sep 2016 - 6:44 pm | कविता१९७८
मस्तच
23 Sep 2016 - 7:09 pm | कंजूस
फोटो,पाकृती दोन्हीही चांगले आहेत॥
23 Sep 2016 - 8:53 pm | सही रे सई
आमच्या कडे याच चिबुडाचा शिकरण टाईप पदार्थ पण केला जातो.
चिबुड कापून त्यच्या फोडी कोमट किंवा गार दुधात मिक्स करायच्या. त्यात साखर आणि भरपूर ओलं खोबरं घालून तो खायचा. चिबुड कापला कि लगेच संपवावा लागतो. नाहीतर कडवट चव होते त्याची.
23 Sep 2016 - 8:54 pm | रेवती
ग्रेट ग्रेट ग्रेट!
लहान असताना असं काय काय खाल्लेलं आठवतय.
23 Sep 2016 - 10:23 pm | रुपी
चिबूड कध्हेच ऐकलं/ पाहिलं नाही. फोटो मस्त दिसत आहे.
23 Sep 2016 - 10:49 pm | इशा१२३
चिबुड पहिल्यांदाच बघतेय. अपरिचित पदार्थ फोटो पाहुन छान वाटतोय.
23 Sep 2016 - 11:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी पण चिबूड पहिल्यांदाच ऐकलं पाहिलं
24 Sep 2016 - 6:26 am | प्रभास
कोकणात असताना आणत असे अधूनमधून... साखर लावून छान लागतं... पण ही पाकृ नवीनच... फोटो एकदम छान आलाय
24 Sep 2016 - 11:33 am | अनन्न्या
म्हणूनच साधी पाकृ असूनही मी चिबडाच्या फोटोसहित दिलीय.
मी लहानपणापासून बघतेय मला हा कोणाला माहित नसेल असं वाटतच नव्हतं.
25 Sep 2016 - 2:36 pm | पियुशा
हे मी पहिल्यान्दाच ऐअकलय अख्ह्या जल्मात !
25 Sep 2016 - 4:28 pm | प्रीत-मोहर
ह्याचं रसायन पण मस्त होतं. दुपारवेळी वाटीभर रसायन म्हणजे झोप आलीच समजा.
रेसिपी इथेच देते. पाकृ करताना फोटो काढायचा पेशन्स नसल्याने ही पाकृ इथेच देते.
चिबडाची सालं काढून अगदी पातळ फोडी करुन घ्यायच्या आणि त्याला गुळ लावायचा. मग पाणी सुटु लागत. तोवर खोबर््याचा रस आणि वेलची पूड करुन घ्यायची आणि त्यात घालायची. आणि एकजीव करुन घ्यायचं. रसायन तयार.
25 Sep 2016 - 10:41 pm | पैसा
मस्त!
26 Sep 2016 - 10:25 am | अनन्न्या
नविन समजलं तुझ्यामुळे,चिबूड खूप आवडतो म्हणजे हेही आवडेलच.
26 Sep 2016 - 10:46 am | पैसा
केळ्याचे आंब्याचे, फणसाचे कसली कसली करतात. थोडक्यात नारळाच्या दुधात शिकरण केल्यासारखे.
26 Sep 2016 - 11:11 am | स्नेहल महेश
आमच्याकडे साखर लावूनच खातात
मस्त आहे रेसेपी
26 Sep 2016 - 2:53 pm | उल्का
मस्त वाटतेय पाकृ.
26 Sep 2016 - 3:10 pm | सूड
अरे वा रसायन पण कळलं!!
26 Sep 2016 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असे वाटते. आई म्हणते हे सेंदाड आहे. :(
पण पाककृती भारी. चिभूड आणून ट्राय करायला हरकत नाही.
धन्स.
-दिलीप बिरुटे
26 Sep 2016 - 6:55 pm | अनन्न्या
भाषा बदलली की नाव बदलते. रेसिपी ट्राय करा हे महत्त्वाचे.
26 Sep 2016 - 7:40 pm | भ ट क्या खे ड वा ला
कोशिंबीर माहीत आहेच रसायन नव्याने समजले करावे लागेल.
यातील कोशिंबिरीचा अजुन एक प्रकार सांगतो ,अशीच कोशिंबीर करुन त्यात थोडी मोहरी पावडर फेसुन टाकायची .
चिबडाचा स्वताचा स्वाद आणि मोहरीचा झणझणित पणा वेगळीच लज्जत आणतो .
कोकणातल्या ग्रामिण भाषेत याला चिबडी म्हणतात.
26 Sep 2016 - 10:55 pm | शिद
मस्त रेसीपी. करून पहायला हवी.
आम्ही ह्याला "शिबूड" म्हणतो व नेहमी असंच किंवा वरून साखर/मध टाकून खातो.
7 Oct 2016 - 4:09 pm | अलका सुहास जोशी
नाहीतर अगदीच अनुल्लेखाने मारण्यातले फळ हे.
साखरेची पुढे चव चांगली वाटते......हे मस्त. आमच्याकडे हेच वाक्य “साखर थोSSSड़ी अधिक करायची “ असं म्हणायची श्टाईल आहे.
26 Oct 2016 - 2:23 pm | दक्षिणा
मी परवा गोव्याला गेले होते, तिथे नाश्त्याला खरबुजाचे तुकडे होते, पण तीथली मुलगी म्हणाली. चिबूड. पण हे वेगळं दिसतंय आकाराला
27 Oct 2016 - 10:38 am | अनन्न्या
हा वर फोटो आहे तो चिबूड.
27 Oct 2016 - 10:45 am | सुबोध खरे
मी ऐकलेली आख्यायिका म्हणजे खरखरीत सालीचे म्हणजे खरबूज आणि गुळगुळीत सालीचे ते चिबूड. बाकी चिबूडच्या तुकड्यात थोडी साखर मीठ आणि सैंधव घालून फार छान लागते. चिबुडचा रस पण उत्तम लागतो.
त्यात फ्रिज मधील घट्ट फुल क्रीम दूध आणि साखर घालून "मस्क मेलन स्मूथी" छान लागते. असं इंग्रजी शब्द वापरले कि आपणही अद्ययावत आणि अत्याधुनिक ( सॉफीस्टिकेटेड ) झाल्यासारखे वाटते.
27 Oct 2016 - 10:50 am | सुबोध खरे
आज मी होल व्हीट पॅन केक अँड बनाना स्मूथी खाल्ले ( म्हणजे शिकरण पोळी) म्हटले कि कसे सॉफीस्टिकेटेड झाल्यासारखे वाटते.
4 Nov 2016 - 4:43 pm | त्रिवेणी
मला खरबूज खाल्ले की डायरेक्ट डायरिया होतो.मग चिबूड खाल्ले की होईल बहुतेक.