साहित्य
७५० ते ८०० ग्राम चिकन लेग्स, स्किन काढून, चिरा मारून
शाकाहारी लोकांसाठी
पनीर
छोटे कांदे
रंगीत शिमला मिरच्या
अर्धवट उकडलेले छोटे बटाटे
मशरूम
मसाला क्र. १
१ चमचा हळद
१ मोठा चमचा लसूण पेस्ट
१ मोठा चमचा आल्याची पेस्ट
१ मोठा चमचा धणे पावडर
१/४ कप तेल
१ कप घट्ट दही
मीठ , चवीनुसार
मसाला क्र. २
६ ते ८ हिरव्या मिरच्या
१ हिरवी शिमला मिरची, चिरून
१ मोठी मूठ कोथिंबीर
६ ते ८ पालकाची पानं
२ माध्यम आकाराचे कांदे, उभे चिरून आणि कुरकुरीत तळून ( बिरीस्ता
२ चमचे व्हिनेगर
१ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर
मीठ , चवीनुसार
तूप (लागेल तसं, ऐच्छिक)
रणजित राय, ह्यांचं "तंदूर:- दि ग्रेट इंडियन बार्बेक्यू" हे एक अतिशय सुंदर संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक. मला भेट मिळालेले (बायको कडून) हे पहिले पाककृतींचे पुस्तक. पुस्तक मिळाल्यावर पहिली पाककृती जी करून बघितली तीच आज इथे देतोय.
नेहेमीचे तंदुरी चिकन खाऊन कंटाळला आला असेल तर हे एकदा करून बघाच. मूळ पाककृतीत तुपाचा सढळ हस्ते वापर आहे (कांदे तुपात तळून वगैरे), मी मात्र तेलात केलाय, शेवटी भाजताना मात्र वरून ब्रशने थोडं तूप वापरल्याने चव खुलून येते.
चिकन ब्रायनिंग करून घ्या. इथे ब्रायनिंग बद्दल धागा वाचा.
कृती
चिकन कोरडे करून घ्या. चिकन वर सुरीने चिरा मारून, मसाला क्र. १ लावून घ्या. चिकन १ ते २ तास झाकून मुरत ठेवा. भाज्या आणि पनीर वापरत असल्यास त्याचे तुकडे करून त्याला मसाला क्र. १ लावून घ्या आणि १ तास मुरत ठेवा.
पालकाची पानं मिठाच्या उकळत्या पाण्यात १ ते २ मिनिटे ब्लाँच करून मग गार पाण्याखाली धरा. पानं निथळून, मसाला क्र. २ मध्ये लिहिलेल्या इतर वस्तूं बरोबर मिक्सर मधून बारीक करून घ्या. पाणी अजिबात वापरू नका.
ह्या तयार मसाल्याचे ४ ते ५ मोठे चमचे चिकनला/भाज्यांना नीट लावून घ्या. चिकन किमान ६ तास फ्रीज मध्ये मुरत ठेवा. हिरवा मसाला थोडा उरला तर तो हवाबंद डब्यात ठेऊन फ्रीझर मध्ये ठेवा. साधारण १५ दिवस आरामात टिकेल.
हे चिकन ओव्हन मध्ये १८० डिग्री ला २० ते २५ मिनिटे ग्रिल मोड वर भाजून घ्या. बार्बेक्यू असेल तर त्यावर खमंग भाजून घ्या. एयर फ्रायर मध्ये २०० डिग्री ला २० ते २५ मिनिटे भाजून घ्या.
चिकन भाजताना, अधून मधून ब्रशने तूप लावा. तूप वापरणार नसाल तर कांदे ज्यात तळून घेतलेत ते तेल वापरा.
व्हेज लोकांसाठी, चिकन ऐवजी वर दिलेल्या भाज्या किंवा पनीर वापरून कृती करा. भाज्यांना शिजायला १० ते १५ मिनिटे पुरतील. बटाटे कच्चे किंवा कमी शिजलेले असतील तर ते वेगळे भाजून घ्या कारण त्यांना थोडा जास्ती वेळ लागेल.
प्रतिक्रिया
16 Sep 2016 - 10:02 pm | वामन देशमुख
काय किलिंग रेसिपी आन् फोटू हैत भौ !
16 Sep 2016 - 11:54 pm | कविता१९७८
मस्त रेसीपी
17 Sep 2016 - 11:48 am | पिंगू
शाकाहारींची पण सोय मस्त केली आहे..
18 Sep 2016 - 9:18 pm | केडी
बायको शाकाहारी असल्यामुळे तो देखील विचार करावा लागतोच!
:-)
17 Sep 2016 - 12:23 pm | महासंग्राम
तोंडाला पाणी सुटलं ना राव
17 Sep 2016 - 12:43 pm | चंपाबाई
छान
17 Sep 2016 - 12:45 pm | चंपाबाई
छान
17 Sep 2016 - 1:16 pm | चाणक्य
हा केडी फटु लई टेम्टिंग टाकतो राव.
17 Sep 2016 - 3:24 pm | अजया
बेस्ट!
17 Sep 2016 - 7:43 pm | नूतन सावंत
केडी_/\_
17 Sep 2016 - 7:54 pm | टवाळ कार्टा
ओ किती जळवताय...कट्त्याला येउन करुन दाखवा मग विश्वास ठेउ
18 Sep 2016 - 11:40 am | पियुशा
कहर रेसेपि कहर फोटु :)
18 Sep 2016 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केवळ झकास.
-दिलीप बिरुटे
18 Sep 2016 - 9:17 pm | केडी
प्रतिसादांनबद्दल सगळ्यांचे आभार!
20 Sep 2016 - 10:13 am | उदय के'सागर
व्वा, कधीपासून व्हेज तंदुरी करायचच होतं. धन्यवाद रेसिपी बद्दल. काही प्रश्न (जर ह्याची उत्तरं पाकृ मध्ये असतील आणि वाचताना माझ्या नजरेतून निसटली असतील तर आगाऊ माफी :
1. मसाला क्रमांक 2 मध्ये भाज्या मॅरीनेट केल्यानंतर ते देखील फ्रिज मध्ये मुरत ठेवायचा आहे का ? असल्यास किती वेळ. (जसं तुम्ही चिकन 6 तास म्हणाला आहात).
2. जर ओव्हन मध्ये तंदुरी करत असू तर भाज्या देखील ग्रील मोड वरच ठेवायच्या आहेत का? आय होप ग्रिल्डच असेल पण एकदा कन्फर्म करावं वाटतंय.
3. साहित्यात दिलेल्या 1/4 कप तेलाचा वापर व्हेज तंदुरी मध्ये कसा आणि कधी करायचा आहे? ग्रील होताना भाज्यांवर मध्ये तेलाचा ब्रश फिरवण्यासाठी का ?
बाकी तुम्ही फोटो मध्ये दाखवलेलं व्हेज तंदुरी बार्बेक्यू वापरून केलेलं दिसतंय असं वाटतं :)
20 Sep 2016 - 11:47 am | प्रफुल्ल
हे काय नवीन उपकरण आहे काय ? माझा पण तोच प्रश्न आहे तंदुर कसा केलाय - गॅस वर/ मा.ओ. मध्ये कि अजुन ग्रिल वापरुन...
बाकि कातिल फोटु!! आणि टेस्टी असणार!!
20 Sep 2016 - 12:15 pm | केडी
मी व्हेज आधी भाजून मग चिकन लावतो, त्यामुळे भाज्या सुद्धा ५ ते ६ तास मुरत ठेवलेल्या. अर्थात त्याची गरज नाही. भाज्यांसाठी २ तास पुरे
हो ग्रील मोड मध्येच.
नाही ते तेल मसाला क्र १ मध्ये घालून चिकन/भाज्यांना लावायचे आहे. हे करायचे असेल तर चक्क, सगळं मिक्सर मधून फिरवून घ्या.
काही वर्षांपूर्वी, त्या होम प्रॉडक्ट्स वाल्या प्रदर्शनातून मी मिनी शेफ इलेक्ट्रिक तंदूर विकत घेतलेलं. हे फोटो त्यात केल्याचे आहेत.
तो तंदूर अजूनही वापरात आहे, आणि बऱ्याच वेळेला मी तो वापरतो. त्यात तापमान नियंत्रित करायची सोय नाही, म्हणून थोडं काळजीपूर्वक करावं लागतं. पण त्यात सुद्धा बऱ्यापैकी रिझल्ट्स मिळतात.
तुम्हाला हे अगदी गॅस वर सुद्धा करता येईल. पॅन मध्ये चिकन ठेवून दोन्ही बाजूने माध्यम आचेवर भाजून घ्या ( साधारण १० ते १५ मिनिटे).
मग गॅस लावून चिकन ची तंगडी डायरेक्ट गॅस वर उलट सुलट करून भाजा. २ ते ३ मिनिटे. ह्याने तो चार्र्ड (charred) इफेक्ट येईल.
अजून ऑथेंटिक हवे असल्यास, ह्या अश्या भाजून घेतलेल्या चिकन ला एका भांड्यात ठेवून, त्यात एक गरम कोळसा ठेवून, कोळशावर एक चमचा तूप घालून धुरी द्यायची. भांडे लगेच झाकून ठेवायचे. ह्याने तो मस्त स्मोकी फ्लेवर मिळेल.
21 Sep 2016 - 10:04 am | उदय के'सागर
धन्यवाद केदार शंकानिरसन केल्याबद्दल आणि बाकी माहिती बद्दल बहुत आभार्स...
मी हे ओव्हन मधेच करणार आहे. ग्रील मोड वर करेन. बनवून झालं कि तुम्हाला कळवेनच :)
मी आंजावर एक रेसिपी वाचली होती आलू-तंदूर ची, त्यात ते मॅरिनेटेड बटाटे त्यांनी 'convection' मोड वर ठेवण्यास सांगितले होते. तंदूर साठी convection मोड मला जरा ठीक वाटलं नाही म्हणून इथे ग्रील मोड बद्दल पुन्हा एकदा कन्फर्म करावं वाटलं. धन्यवाद.
20 Sep 2016 - 6:23 pm | पिलीयन रायडर
नेहमीप्रमाणेच झकास!
शाकाहारी लोकांचा विचार केल्याबद्दल धन्यवाद!
21 Sep 2016 - 4:05 pm | बाबा योगिराज
वो कॆडी भौ,
नको ना यार, प्लिज, असले कातिल फोटो नका हो टाकत जाऊ. दुकानात बसून जळजळ होती वो.
रच्याकने,
फोटो लै म्हणजे लगे लैच भारी आहेत. पहिल्याच फोटूला तोंपासु.
आपला फ्यान
बाबा योगीराज
21 Sep 2016 - 4:26 pm | केडी
धन्यवाद, तुमच्या प्रतिसादांनबद्दल!
21 Sep 2016 - 5:25 pm | llपुण्याचे पेशवेll
ए ओव्हन म्हणजे मायक्रोव्हेव ओवन काय केदार?
22 Sep 2016 - 7:04 am | केडी
मायक्रोवेव्ह पण ज्यात कन्व्हेक्षन, ग्रिल मोड आहेत असा. मायक्रोवेव्ह मोड मध्ये चिकन वातड आणि ड्राय होईल इतका वेळ ठेवले तर. ह्याला अपवाद आहेत, मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा झटपट चिकन करी करता येते. त्या बद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन.
22 Sep 2016 - 8:31 am | यशोधरा
मस्त पाककृती!