गारभेंड्यांची भाजी

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in पाककृती
27 Aug 2016 - 7:10 pm

सद्ध्या सर्वत्र रानभाज्यांची चर्चा सुरु आहे. त्यातलीच ही "गारभेंड्यांची भाजी". 
इतकी वर्षं जांभळी नाक्यावर जातेय पण कधी ही भाजी विकायला दिसली नव्हती. हिची ओळख झाली एका येऊरच्या ट्रेकमध्ये. ट्रेक संपला तेव्हा आमच्या बरोबर आलेल्या आदिवासी वाटाडयाची  पोतडी भरपूर रानभाज्यांची भरली होती. अळू (तेरं), बांबूचे कोंब याबरोबर होती ती लाल लाल देठांची गारभेंडी. दिसायला पटकन लाल माठ वाटते पण याची जातकुळी  वेगळी. पानं फुलं यायच्या आधी लाल मोठा कोंब उगवतो तो तोडायचा. उकडून साल काढून आणि मीठ लावून पण ही खातात. आमच्या कामवाल्या मावशी पण येऊरच्याच असल्यानं त्यांनी मला ही भाजी आणून  दिली.
.
.
.
तर त्यांनी  सांगितलेल्या कृतीत थोडाफार बदल  करून केलेली भाजी.  
साहित्य 
१० -१२ गारभेंड्यांचे कोंब 
दोन वाट्या मोड आलेले कडधान्य ( मी  मसूर घेतले.) 
२ कांदे बारीक चिरून 
५-६ पाकळ्या लसूण
१ वाटी नारळाचा रस ( optional) मी नारळाचा  रेडिमेड रस घातला.)
फोडणीसाठी तेल, हिंग , मोहरी , हळद आणि तिखट 
मीठ 
.

१ आधी  आपण अळूच्या देठांची जशी साल काढतो तशी हाताने छोटे छोटे (एक दीड इंचाचे )  तुकडे करत गारभेंडीची साल काढायची. (या भाजीला बिलकुल खाज नसते.)  
२ भाजी आणि कडधान्य वाफवून घ्यायचे. ( मी स्टीम इट मध्ये वाफवले पण कुकरला लावले तरी चालेल. ) 
३ कढईत तेल तापवून , हिंग मोहरीची फोडणी करायची. त्यावर चिरलेला कांदा, लसूण आणि हळद, तिखट  घालून चांगलं  परतायचं. 
.

४ त्यावर वाफवलेलं कडधान्य आणि गार भेंडी  घालून जरा परतायची. 
५ मग त्यात  मीठ आणि थोडे पाणी घालून झाकण ठेवून दरदरून वाफ काढायची. ( दरदरून हा शब्द सर्व आज्ज्या मावश्या ई सुग्रणींकडून उधार घेतलाय.)  
.
६ शेवटी नारळाचा रस घालायचा. ( रस घातल्यावर भाजी उकळायची  नाही.) जरा भाजी हलवून गॅस बंद करायचा . 
लुसलुशीत शिजलेल्या शेंगांची भाजी पोळ्यांबरोबर किंवा भाताबरोबर छान लागते. 
.
.
  (बऱ्याच रानभाज्यांना आपापला  एक विशिष्ट गंध किंवा स्वाद असतो.  सवय नसेल तर तो उग्र वाटू शकतो. गूळ किंवा नारळ वापरला की तो कमी होतो. मी यावेळी नारळ वापरला. पण तो न घालताही भाजी चांगलीच लागेल कारण या भाजीला मला तरी  उग्र वास जाणवला नाही. ) 
 

प्रतिक्रिया

सुखी's picture

27 Aug 2016 - 7:13 pm | सुखी

फोटो दिसत नाहीत!

प्राची अश्विनी's picture

27 Aug 2016 - 7:14 pm | प्राची अश्विनी

हो, सासं ना सांगितलेय.

प्राची अश्विनी's picture

27 Aug 2016 - 8:18 pm | प्राची अश्विनी

फोटो जोडल्याबद्दल धन्यवाद._/\_

फोटो दिसताहेत. नवीन प्रकार आहे.येऊरला आतमध्ये पाटणेपाडाकडून जाऊ देत नाहीत आता.

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2016 - 7:46 am | प्राची अश्विनी

हो का? आम्ही स्थानिक लोकांबरोबर होतो म्हणून असैल, पण कुणी अडवलं नाही.

चविष्ट. तोंपासु. येऊरला जायला हवे एकदा.

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2016 - 7:44 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

अनवट भाजीची पाकृ आवडली.आमचा भाग पण अशा रानभाज्यांसाठी प्रसिद्ध आहे.पण कधी करुन बघणे होत नाही.कारटं खाणार नाही.एकटीसाठी कशाला व्याप करत ;)
असे धागे अाले की वाटतं करुन पहायलाच हवी!

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2016 - 7:44 am | प्राची अश्विनी

__/\__

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Aug 2016 - 9:51 am | कैलासवासी सोन्याबापु

गारभेंड्या म्हणजे ferns चे कोंब वाटत आहेत, सही लागतात चवीला, नुसत्या मिठाच्या पाण्यात उकडले तरी, इथे तर फर्मास रेसिपी आहे! उत्तमच लागणार चवीला.

प्राची अश्विनी's picture

28 Aug 2016 - 1:54 pm | प्राची अश्विनी

हो का? कुणी यातील तज्ञच त्याचे शास्त्रीय नाव सांगू शकेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Aug 2016 - 8:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

माफ करा ताई मी तज्ञ नाही खचितच, फक्त लाल रंग अन वरती असलेली गोल घडी ह्यावरून ओळखले, आमच्या सर्वायवल ट्रेनिंग मध्ये मी असले कोंब पाण्यात उकडून खाल्लेले आठवले होते, इतकेच.

पैसा's picture

28 Aug 2016 - 7:48 pm | पैसा

हे झाड दुसऱ्या काहीतरी नावाने पाहिले आहे, आता आठवेना पण.

राही's picture

28 Aug 2016 - 8:31 pm | राही

ही रान भेंडी तर नव्हे? पण रान भेंडीची पाने अशी नसतात बहुधा. जंगली भेंडी अ‍ॅबेलमॉस्कस फिकुल्निअसच्या देठातला गर अगदी भुसभुशीत असतो. पण चित्रातले झाड Abelmoschus ficulneus नाही.
दादर बाजारात हे देठ पाहिले आहेत.

ही रानभेंडी नाहीत. आमच्या इथे या भाजीला भाना असे म्हणतात. चिकट असल्याने गारभेंडीपेक्षा आमच्याइथे अळूच्या देठींना प्राधान्य दिले जाते.

मी तरी ही भाजी कधी खाल्ली नाही. तळोजा - धानसर ह्या पट्ट्यात असणार्या तुरळक जंगल भागात ही भाजी मुबलक मिळते, पण चिकटपणामुळे घरी कधी बनवली गेली नाही.

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2016 - 7:43 am | प्राची अश्विनी

बरोबर, चिकट असते असं मीपण ऐकले होते. पण भाजी चिकट नव्हती झाली.

मावशीला सांगून भाजी मिळवायचा प्रयत्न करतो.