---------------------------------------------------------------------------------
मोदक उर्फ मनोजने घाटवाटांवरच्या सायकलिंगचा पहिला भाग टाकला आहेच ! त्याच्या पूर्वपरवानगीने आमच्या सायकलिंग चा पहिला भाग माझ्या शब्दात
---------------------------------------------------------------------------------
अशीच एक संध्याकाळ….
असेच तीन मित्र…
अन रंगलेली बैठक ....
“ चला आता लै झालं ! हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही.”
“एखादी पावसाळी राईड होऊनच जाऊद्या !”
तसेही बरेच दिवस झाले होते उन्हाळ्यामुळे आणि कंटाळ्यामुळे कुठे जाणं झालं नव्हतं. 1 जानेवारी ला केलेली एक नववर्षाची तापोळा राईड आणि एप्रिल मधल्या उन्हात केलेली शिरकाई ची राईड सोडली तर ह्या वर्षी सायकलिंगला म्हणावा तसा कंठ फुटला नव्हता.
२ दिवस राईड ला उरले तरी हॉटेल बुकिंगचा पत्ता नव्हता. ते काम मनोजवर होत. त्याला विचारल तर म्हणाला कि त्याच्या एका मित्राला त्याने हे काम outsource केलय. कपाळावर हात मारला अन् पटापट फोन फिरवले. सातारा हायवे वरचा हॉटेल्स एव्हाना बूक झाली होती. मग उंब्रज परिसर मॅपवर धुंडाळला. एकाने दुसर्याचा रेफरन्स देणे न् त्याने तिसर्याचा अस करत नशिबाने चिपळूण फाट़्याजवलच एक तद्दन टिंपाट हॉटेल मिळून गेंल. त्याची आधी खात्रीच पटेना. पण जरा विनवल्यावर तयार झाला अन् आमचं confirm बुकिंग घेतलं. त्यानंतरपण २दिवस मी त्याला फोन करत राहिलो.
13 ऑगस्टच्या शनिवारी घरगुती कार्यक्रम आटोपून मी हॉल सोडला; तडक घरी आलो. सगळं सामान भरून सॅक तयार होती ती उचलली आणि हायवेकडे चालत निघालो. मध्ये इतर जुजबी सामान म्हणजे पतंजली energy bars, कँडी, skin care क्रिम वगैरे घेतलं. फोनाफोनी केली तेव्हा समजलं कि सामान बांधून साएकली टांगून केड्याचा ‘ट्रक’ डिझेल प्यायला पंपावर निघालाय. यथावकाश सगळे आले; गाडीमध्ये बसलो आणि मी काय काय खरेदी केली ते ऐकताना किरण सिरीयस होऊन म्हणाला "आयला ..." त्याचा चेहरा पाहून कोणीही सांगितलं असत कि हा काहीतरी महत्वेच विसरलाय. झालं तसच होत. त्याने आदल्यादिवशी त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी स्पेअर Tyre ट्यूब घेतल्या होत्या त्या घरीच राहिल्या होत्या. आता ट्रक परत नेण्यात काहीही पॉईंट नव्हता. "चिपळूण ला काहीतरी जुगाड होईल"…"अरे आपली सायकल puncture नाय होणार" असे बरेच दावे करून आम्ही शांत झालो. अधे मध्ये वाटेत थांबून आम्ही स्टॅन्ड वरच्या सायंकाळी चेक करत होतो. ठीक 1:45 ला आम्ही उंब्रज ला पोचलो.
केड्याला इथुन मागे फिरण आता अनिवार्य होत. इथे केदार दिक्षीतचा आवर्जुन उल्लेख करायला हवा. ह्या राईड मध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याला आता पुण गाठुन सकाळी लवकर Airport ला जायच होत. आमची गरज ओळखून पट्ठ्या ऐनवेळेला स्वतः:हुन यायला तयार झाला. जड अंत:कारणाने त्याच्या TATA ला (सफारी उर्फ ‘ट्रक’) बाय बाय करून आम्ही तिन्ही सायकली हॉटेल च्या गोडाऊन मध्ये ठेवल्या आणि रूम वर येऊन झोपी गेलो.
सकाली लवकर उठणे हा शत्रू क्र १. आता ती चिंता नव्हती तरी रिस्क नको म्हणून मनोज न् किरण ह्या छळवाद्यांनी मला पहाटेपासून हाका मारायला सुरूवात केली. राईड साठी झोप पाहिजेच अशा सबबी सांगून मी उसनी ५-७ मिनट मागत होतो तरी शेवटी चादर झटकावी लागलीच. मी आवरायला गेलो न् चहा सांगतो अस म्हणून किरण रूमवरून सटकला. सगल्यांच आवरून झाल तरी चहा आला नव्हता. किरण परतला तस आम्हि त्याला चहाबद्दल विचारलं तर "आत्ताच स्टँडवर जाऊन घेऊन आलो" हे उत्तर ऐकून आमची आम्हालाच दया आली. परत चहाची ऑर्डर दिली अन खाली उतरून चहा घेतला. बाहेर आलो तसा पाण्याच्या बाटल्या अडकवून सायकली सज्ज होत्या.
हवा चेक
पाणि चेक
हेल्मेट चेक
ब्रेक चेक
सेल फोन चेक
....
असे एकेक चेकलिस्ट आयटम cross करताना लक्षात आल कि मनोजच्या सायकल च्या stand चा नट् गेलाय. गाव अजून जाग होत होत; आजूबाजूची दुकान उघडायची होती. तेव्हा वाटेत एखाद सायकलिंग च दुकान दिसलं कि बघू असा ठरवून आम्ही निघालो. ऊंब्रज-चिपलून पहिला १००किमी चा टप्पा तसा ठिकठाक वाटत होता. 5 मिन वरच चिपळूण फाट्याला राईट घेतला आणि राईडचा श्रीगणेशा झाला. हवा आल्हाददायक होती गोड गारवा होता आभाळ झाकोळून होत पण पाऊस नव्हता.
यावर्षी मस्त पाऊस झालाय त्याच्या हिरवट खुणा चोहुकडे पसरल्या होत्या.
एखाद्या रंगतदार लावणी दरम्यान रागिणीने हळूच लाजत डोक्यावरून पदर घ्यावा तस आमच्या वाटेने डोक्यावरून हिरवाई ओढून घेतली
राईड करत असताना कधीही सेल्फी काढू नये पण मोह टाळता येत असता तर सायक्लिन ऐवजी घरचीच बसलो असतो ना !
उंब्रज चिपळूण रास्ता वाई फाट्याची आठवण करून देतो. आम्ही ताजे तवाने होतो आणि वेग मस्त पकडला होता.
उंब्रजकडून येणारे आमचे सायकलस्वार मनोज व किरण
शीतलवाडी मग टाकुन आम्ही मल्हारपेठ कडे कूच केलं. लहान लहान वाड्या वस्त्या मागे टाकत आम्ही उरुळ चा घाट उतरलो. सुरुवातीला हलका चढ लागला पण मनोज ने प्रेडिक्ट केल्याप्रमाणे थोड्याश्या चढानंतर मस्त उतार होता. त्यातच एका मस्त झोकदार वळणाच्या बाजूला एका बंधाऱ्याचा पाणी एका घळीतून वाहत होतो. तिथे थांबून केलेलं थोडं फोटोसेशन
ह्या बंधार्याचे पाणी पुढे कोयनेच्या जाऊन मिळत
सेल्फी टाईम
इथंच कोकणातला पहिला पाऊस माच्या भेटीसाठी आला अन एका सरीत आम्हाला चिंब करून निघून पण गेला. आम्ही स्वारांनी पातळ विंडचीटर मुद्दाम हाताशी ठेवले होते ते आता उपयोगी पडले. आभाळातून पडणाऱ्या पाण्याशी त्याचा काही संबंध नाही बर का ! त्याचा मेन उपयोग म्हणजे रस्त्यावरचा चिखल पाणी आपल्या अंगावर उडू नये एव्हढाच. वरून झोडपणारा पाऊस कशाला जुमानत नाही. कोकणातल्या पावसापासून स्वात:चा बचाव करायचा तर एकाच उपाय असतो.........न लाजता मनसोक्त भिजा ! बघता बघता मल्हारपेठ अली. उंब्रज-पाटण रोडवरून इथे आम्ही कराड चिपळूण रोडवर उजवीकडे वळलो. गावातली पोरंटोरं कुतूहलाने बघत तर कधी आमच्या कडे बघून हसत. एकूणच हि ध्यान इकडे कुठे आलीत असं म्हणत असावीत. काहींनी तर माझ्यासोबत रेसिंग पण केलं. येरफळ, म्हावशी अशी मजेदार गाव मागे टाकीत हिरव्या शेतात कोरलेल्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरु होता. ह्या रस्त्यावर उजवीकडे दातेगड दिसत राहतो. 2-3 फ्रेम्स क्लीक करून मी फोन ठेवला आणि अगदी दुसऱ्या सेकंदाला माझ्या समोरून एक मोर डाव्याबाजुच्या शेतातून उडत उजवीकडे झाडीत गेला. अशा घोर फसवणुकीची आता सवय झालीय त्यामुळे फार वाईट वाटून ना घेता मी मार्गक्रमण सुरु केलं. इथे एक सांगायचं राहील कि मनोज ने पुण्याहून निघताना आठवणीने एक शिट्टी घेतली होती. मनोज एव्हाना पुढे निघून गेला होता कारण त्याला जाऊन त्याच्या सायकल चा स्टॅन्ड नीट करून घ्याचा होता. मी गावच्या बाजारातून पुढे गेलो तरी ह्या बाबाचा पत्ता नव्हता.
पाटण अजून 7-8 किमी दूर होत. अंतर फार वाटत नसल तरी सायकल मारायचं म्हणजे चढ उतार लक्षात घेतले तर अर्धा तास जातोच. मी सर्वात मागे होतो म्हणून सायकल बुंगवली. थोडंसं समोर एक लहानसा बाजार दिसत होता तिथे कदाचित मनोज भेटेल असं वाटलं. इतक्यात वाटेत कोणीतरी शिट्टी वाजवली तस मी डावीकडे वळून पाहिलं पण गावातली पोर सोडली तर मला बाकी कोणीच नाही दिसलं. पुढे पाटण ला पोचल्यावर मनोज मागून आला आणि नाराज होऊन म्हणाला काय राव पंत तुम्ही शिटी मारली तरी थांबत नाही :). त्यानंतर उदासपणे त्याने शिट्टी गुंडाळून ठेवून दिली ती परत बाहेर काढली नाही. पाटण ला आलो तेव्हा 10 वाजले होते आता भूक लागली होती. पाटण ची फार माहिती कोणालाच नव्हती. शेवटी एक बऱ्यापैकी दिसणार हाटेल/खानावळ शोधली. मालकाने आस्थेने कुठून आलात कुठे जाणार किती दिवस वगैरे विचारपूस केली. तिथे मस्तपैकी राजगिरा लाडू दूध, मिसळ, वडापाव- नारळाची चटणी अशी मेजवानी झोडली. खर सांगतो इतकं सायकलिंग केल्यावर जे काही समोर येईल ती मेजवानीच असते. अर्थात नाश्ता खरोखरच उत्कृष्ट होता. नारळाच्या चटणीला तर तोड नव्हती.
जास्त खायचा मोह टाळून 20 मिनटात तिथून बाहेर पडलो आणि कोयना नगर कडे कूच केलं.क्षणात येणारे सरसर शिरवे अन फिरून पडणार ऊन असा बालकवींनी वर्णिलेला श्रावणी खेळ खेळत सायकलिंग करायला खूप मजा येत होती. मी आणि मनोज जे काही सुंदर दिसत होत ते कॅमेऱ्यात बंदिस्त करत होतो त्यामुळे आम्हाला वेळ लागत होता पण आमचा तिसरा शिलेदार किरण बराच पुढे गेला होता.
वाटेत 2 पोर टायर घेऊन खेळात होती. अन बालपण जाग झालं
इतका वेळ आम्हाला कोयना नदीची सतत सोबत होती तिथेच एका जुन्या पंपिंग स्टेशन वर जाऊन आम्ही थोडा क्लीकक्लीकाट केला.
सायकल टांग टाकलीच होती इतक्यात कोयनानगर ला जाणारी एक सरकारी स्कार्पिओ आली आणि काही बड्या धेंड्यांची छोटी देठं (PA वगैरे) खाली उतरली अन गप्पा मारू लागली. कुठून आलो ते ऐकल्यावर त्यांच्यातल्या एकाने हात जोडले आणि म्हणाला “चला आता इतक्या लांबून आला आहात तर 30-30 होऊनच जाऊदे”. आग्रह इतका टोकाचा कि तो मला पायाला धरून सायकल वरून उतरवायला लागला. मला तत्क्षणी शंकर पाटलांची पाहुणचार गोष्ट आठवली. शेवटी श्रावण, देव-धर्म करत आम्ही आमची सुटका केली. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी रस्त्याच्या बाजुला बैठक मांडली आणि कार्यक्रम सुरु केला. थोड्यावेळाने हि फटावळ परत मागून आली आणि आम्हाला उगीच हिंदीतून "आ जाओ " वगैरे आमंत्रण देऊन निघून गेली.
थोडाच वेळात आम्ही कोयनानगर परिसरात प्रवेश केला. हा परिसर पावसात स्वर्गीय भासतो. येथेच कोयना नदी उजवीकडे वळून कोयनानगर कडे निघून जाते समोर विस्तीर्ण सपाट भातशेती, त्यात काम करणारी माणसं, लहान लहान टेकड्या, पर्वत आणि त्यावर उतरलेले काळे पांढरे ढग. डांबरी वाट एका टुमदार घराला बगल देऊन पुढे वळण घेते अन धुक्यात नाहीशी झालेली.. साठलेल्या धुक्यातून जायला सुरुवात करावी तर ते नाहीस होऊन पावसाने गाठावं बर पाऊस एन्जॉय करावा तेव्हढ्यात उन्ह यावं. इथेच डावीकडे दूरवर एक प्रपात डोंगरावरून खाली कोसळतो. (जाणकारांनी त्याच नाव सांगितलं तर बर होईल) नितांत सुंदर परिसराची झलक टिपायचा मोह अनावर होत होता. माझा SLR कॅमेरा आणता आला नाही ह्याचा मला प्रचंड खेद आहे.
तिथे अजून थांबायचं मोह टाळून निघालो तस किरण दुसऱ्या एका 'स्मॉल(30-30)' गॅंग शी गप्पा मारत होता. त्याला उठवला आणि कोयनानगर चा फाटा उजवीकडे सोडून आम्ही चिपळूण कडे मार्गस्थ झालो. दुपारचे 12:30 वाजलेले उंब्रज सोडून आम्हाला 4 तास उलटले होते आणि आम्ही @50-60 कमी आरामात पार केलं होत. नशिबाने एक टपरी दिसली तिथे डबल ऑम्लेट सारून कडक चहाची फोडणी दिली.
आता थोडाच वेळात कुंभार्ली घाटाला सुरुवात होणार होती आणि हा वेळ खूप महत्वाचा होता. चिपळूण ला वेळेत म्हणजे अंधार पडायच्या आत पोहोचायचं होत. इतक्यात मनोजची हाक ऐकू आली म्हणून माघारी आलो. तेव्हा समजलं त्याच मागचं टायर मेजर आऊट आहे. हे थोडं टेन्शन च काम झालं कारण छोटी मोठी दुरुस्ती किंवा puncture आम्ही काढू शकतो पण हा प्रकार कठीण होता. तसही त्याक्षणी करता येण्यासारखं काहीही नव्हतं म्हणून थोडं काळजीपूर्वक चालवत चिपळूण मध्ये काय ते बघू असं ठरलं. कुंभार्ली घाटाच्या सुरुवातीलाच 2 सुंदर धबधबे 1-2 वळणाच्या अंतराने आहेत. किरण आमची वाट पाहत तिथे थांबला होता. इथून घाट माथा साधारण 5 कमी वर आहे. चढ असला तरी फार ताण जाणवला नाही आणि काहीच वेळात आम्ही घाटमाथ्याला पोचलो. इथेच एक रिसॉर्ट आणि बाजूला पोलीस चौकी आहे. इथे आलो मात्र आणि संपूर्ण परिसर दाट धुक्यात हरवून गेला. अगदी काही फुटांवरच पण दिसत नव्हतं.
सेल्फी टाईम: बॅकड्रॉप ला जे व्हाईट दिसत आहे ते धुक्यामुळे
धुक्याचा पदर बाजूला झाला नि आजुबाजुंच्या परिसराचं अद्वितीय सौन्दर्य अनुभवायला मिळालं. सगळं भाग गर्द हिरव्या डोंगरांनी वेढलेला आहे आणि घाटात जागोजागी धबधबे कोसळतात. आम्ही तिघेही सायकलिंग विसरून घाटात वेगवेगळ्या अँगल ने फ्रेम्स मिळवायचा प्रयत्न करत होतो. साधारण एक दीड तास घाटात कसे गेले तेच नाही समजलं. वळणावळणावर चित्र बदलत होत. कधी डोंगर धुक्याने माखायचे आणि पुढच्याच वळणावर दुपारच्या उन्हात चमकू लागायचे. उंचावरून खाली दिसणारा डांबरी रस्ता त्या उन्हात चमकून अधिकच छान वाटायचा.
देशावरून कोकणात जाताना कुंभार्ली उतरावा लागतो. आता आम्हाला 15-20 कमी मस्त अराम होता फक्त उतारांवर काळजी घेणं भाग होत. घाट उतरताना अंतिम टप्प्यात पोफळी गाव लागलं. तिथल्या एका सुंदर धबधब्यापाशी मी काही फोटो काढले.
मनोज आणि किरण मागे होते म्हणून उतारावर हळू पुढे निघालो. इतक्यात एका बाईक वाल्याने "मागे एकाच टायर पुंकतुरे झाल्याची" सुवार्ता दिली. आता पुढे जाऊन उपयोग नव्हता म्हणून मी उलट वर जायचं ठरवलं. मी घाट चढू लागलो आणि 1-2 कमी नंतर दोघे साईड ला बसून Puncture काढत होते.
हे दोघे puncture काढेपर्यंत मला वेळ होता. परिसरच इतका सुंदर कि आता मी डोळे मिटून पण चांगले फोटो क्लीक केले असते
इथे आमचा थोडा वेळ गेला पण सर्व ठीकठाक झाल्यावर साधारण 4:30 ला तिथून निघालो. रस्ता सोपा होता आणि पोफळी शिरगाव अलोरे सुसाट मागे टाकत खेर्डी मार्गे चिपळूण मध्ये डेरे दाखल झालो.
चिपळूण मध्ये मनोज त्याच्या सायकलच काम करायला मागे थांबला. मी आणि किरण हॉटेल च्या शोधात पूढे गेलो. थोडाच वेळात मनासारखं हॉटेल मिळाल रूम पण छान होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनोच्या सायकल च काम झालं आणि तोदेखील थोडाच वेळात रूम वर आला.
इतक्या श्रमानंतर गरम गरम पाण्याने आंघोळीचं स्वर्गसुख आणि नंतर रात्रीला खमंग भाजलेला पापलेट आणि बांन्ग्ड्याच कालवण म्हणजे पर्वणीच. उदंड जेवून पाठ टेकली आणि कधी डोळे मिटले हे कळलं सुद्धा नाही.
प्रतिक्रिया
25 Aug 2016 - 1:20 pm | मोदक
झकास रे...!! :)
25 Aug 2016 - 1:26 pm | पाटीलभाऊ
अहाहा...नितांत सुंदर..! मोदकरावांच्या शब्दांत पहिल्या भागाचे वर्णन वाचले होते..आता तुमच्या शब्दांत. मस्त...आणि फोटोदेखील सुंदर.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत..!
25 Aug 2016 - 1:30 pm | केडी
वाचून मज्जा आला. दोघांचे धागे वाचून मज्जा येत आहे. दोघांनी पुढचा भाग लवकर टाकावा हि विनंती.
25 Aug 2016 - 3:43 pm | जगप्रवासी
डबलबारी चालू आहे, छान आलेत फोटो आणि वर्णन देखील.
25 Aug 2016 - 7:11 pm | बाबा योगिराज
क्या बात. हि तर डबल मेजवानी झाली. दोघांचे फोटो वेग-वेगळे आहेत आणि लिखाणाची पद्धतही वेग-वेगळी आहे. वाचायला मजा येत आहे.
पुलेशु पुभाप्र.
बाबा योगीराज
25 Aug 2016 - 7:51 pm | झेन
एक जखमेवरची खपली काढतोय दुसरा मीठ चोळतोय. तुमच्या फोटोंचा विशेष त्रास होतो आहे नोंद असावी.
तुम्हि अशक्य लोक आहात. इथे कधीतरी सायकल वर आठ दहा किलोमीटर जाताना मोबाईल संभाळायला नको वाटतो, तुम्हाला सायकलवर पावसात SLR आठवतो ?
25 Aug 2016 - 10:08 pm | एस
सायकलचा घाटातला फोटो प्रचंड आवडलाय. एकच नंबर.
25 Aug 2016 - 10:39 pm | पैसा
मस्त लिहिलंय! फोटो सुंदर आले यात विशेष ते काय! आमचं कोकण आहेच्च तसं! ;)
6 Sep 2016 - 7:11 pm | शलभ
मस्तच लिहिलय..:)