कोकोनट पुलाव विथ जिंजर-गार्लिक डॅश अँड क्रिस्पी रोस्टेड स्वीटकॉर्न

सपे-पुणे-३०'s picture
सपे-पुणे-३० in पाककृती
19 Aug 2016 - 2:50 pm

नेहमीप्रमाणे नारळीपौर्णिमेला नारळाच्या वड्या केल्या. आता पुढचा नंबर नारळीभाताचा होता. पण वड्यांच्या गोड वासामुळे अजून काही गोड पदार्थ करण्याची इच्छाच राहिली नाही आणि त्यातूनच हा पदार्थ सुचला. पदार्थाच्या नावावरूनच लक्षात आलं असेल की, ह्याचं स्फूर्तिस्थान 'मास्टरशेफ' चे वेगवेगळ्या देशांतले कार्यक्रम आहेत. त्यामुळे वाचताना पाककृती ओळखीची वाटणे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर ही पाककृती स्वयंपाकातील एकसुरीपणा कमी करण्याचा एक प्रयत्न आहे आणि तो स्वयंपाक करणारीला डोळ्यासमोर ठेऊन केलेला आहे.

कोकोनट पुलाव विथ जिंजर-गार्लिक डॅश अँड क्रिस्पी रोस्टेड स्वीटकॉर्न

तर सर्वप्रथम ....
भातासाठी- लांब दाणा असलेला कोणताही जुना तांदूळ. अख्खा बासमती असेल तर उत्तम. मी १ वाटी घेतलेला आहे.
पाऊण वाटी खवलेलं ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याचं प्रमाण तांदळाच्या निम्म्यापेक्षा कमी नसावं कारण 'ओलं खोबरं' हा या पुलावातला एक मुख्य घटक आहे.
खडा मसाला - दालचिनी १-१.५ इंचाचे दोन तुकडे, ८ ते १० काळ्या मिऱ्या, २ तमालपत्रं, ४ लवंगा, ४ हिरव्या वेलच्या, २ मोठ्या काळ्या वेलच्या (बडी इलायची),२ स्टार ऍनिस (star anise) आणि जिरं. हे जिन्नस दोन सारख्या गटांमध्ये विभागायचे. यामध्ये आवड आणि उपलब्धतेनुसार बदल केला तरी चालेल.
काजू,
आलं -लसूण पेस्ट,
स्वीट कॉर्न चे दाणे. वाफवलेले किंवा कच्चे कसेही.

साहित्य

तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे ; त्यामध्ये पाणी,आवडीनुसार मीठ व ओलं खोबरं घालायचं आणि आपल्या खड्या मसाल्याच्या दोन भागांमधील एक भाग घालायचा. आता हे भांडं कुकरला लावायचं. आपल्याला हे तांदूळ कणी राहील इतकेच शिजवायचे आहेत त्यामुळे पहिली शिट्टी होतेय असं वाटलं की लगेच गॅस बंद करायचा. ओलं खोबरं घालून तांदूळ शिजवल्याने खोबऱ्याची चव आपोआप भातात उतरते.
tandul

कुकर होईपर्यंत भाज्यांची तयारी करायची. मी कॉलीफ्लॉवर, फरसबी, मटार आणि ढब्बू मिरची या भाज्या घेतल्या आहेत(कारण इतर भाज्या घरात नव्हत्या).ह्या सगळ्या भाज्या चिरून घ्यायच्या. एक मध्यम आकाराचा कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा. कोथींबीर आणि पुदिना धुवून बारीक चिरून घ्यायचा. आलं -लसूण पेस्ट करून घ्यायची.
कुकर गार झाल्यावर, शिजलेल्या भातातील मिरी,दालचिनी वगैरे मसाल्याचे पदार्थ वेगळे काढायचे व भात मोकळा करून ठेवायचा.
गॅस वर कढई किंवा पॅन ठेऊन त्यात अंदाजे तूप घालून उभा चिरलेला कांदा थोडा गुलाबी होईपर्यंतच परतायचा. मग त्यात आपण चिरून ठेवलेल्या भाज्या घालायच्या. ह्या भाज्या गॅस मोठा करून परतायच्या. त्यांवर थोडं मीठ भुरभुरवून मंद गॅस वर, झाकण ठेऊन वाफेवर शिजवून घ्यायच्या. भाज्या शिजल्यावर बाजूला काढून ठेवायच्या. इथे दोन गोष्टींची काळजी घ्यायची - कांदा सुरवातीला खूप गुलाबी होऊ द्यायचा नाही, नाहीतर शेवटी तो खरपूस न होता काळा होतो आणि भाज्या एकदम मऊ शिजवायच्या नाहीत.
bhajya

त्याच कढईत /पॅनमध्ये परत तूप घेऊन त्यात खड्या मसाल्यांमधील न वापरलेले मसाले टाकायचे. थोडे परतल्यावर काजू व आपण शिजवलेल्या भातातून बाजूला काढून ठेवलेले मसालेही त्यात घालायचे (वाया कशाला घालवायचे) आणि छान परतून घ्यायचे. सर्वांत शेवटी जिरं घालायचं.आता त्यात आलं -लसूण पेस्ट घालायची. ही पेस्ट घातल्यावर लसणाचा वास आला कि लगेच आपण परतून ठेवलेल्या भाज्या घालायच्या व एक-दोनदा मसाल्यांबरोबर परतायच्या. इथे महत्त्वाचं म्हणजे, आलं-लसूण पेस्ट जास्त परतायची नाही. आता आपला शिजवलेला भात घालून त्यावर चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून सगळं चांगलं एकत्र करायचं. झाकण ठेऊन मंद गॅस वर वाफ काढायची.
पुलाव पूर्ण शिजेपर्यंत दुसऱ्या गॅसवर थोडंसं तूप घेऊन त्यात आपले स्वीट कॉर्न घालायचे. वरून थोडंसं मीठ घालून चायनिज प्रमाणे मोठा गॅस करून परतायचे. बाहेरून नीट भाजले गेल्यावर गॅसवरून काढून ठेवायचे. कॉर्न तयार होईपर्यंत आपला पुलाव शिजून तयार असतो. आपण तांदूळ शिजवताना व भाज्या परतताना मीठ घातले असल्याने शक्यतो वरून पुन्हा मीठ घालायची गरज नसते.

corn

पुलाव ताटात वाढून त्यावर हे परतलेले कॉर्न घालून दही किंवा दह्यातल्या टोमॅटोच्या कोशिंबिरींबरोबर खायचा. नंतर गोड म्हणून नारळाची वडी आहेच.

ह्या पुलावाच्या साहित्यात आपण आपल्या आवडीनुसार बदल केले तरीही पदार्थ बिघडणार नाही, त्यामुळे बिनधास्त करून पहा आणि आवडला की नाही ते सांगा.

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

19 Aug 2016 - 3:55 pm | संजय पाटिल

एक वेगळाच पदार्थ, प फोटो दीसत नाहित..

संजय पाटिल's picture

19 Aug 2016 - 3:55 pm | संजय पाटिल

एक वेगळाच पदार्थ, प फोटो दीसत नाहित..

इरसाल's picture

19 Aug 2016 - 4:02 pm | इरसाल

गणेशा !

bhaktipargaonkar's picture

19 Aug 2016 - 4:26 pm | bhaktipargaonkar

फोट गायब ????

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 7:05 pm | पिलीयन रायडर

फक्त पहिला फोटो दिसतोय, सुंदर आलाय!!

बाकीच्या फोटोंना पब्लिक अ‍ॅक्सेस नाहीये का?

नूतन सावंत's picture

20 Aug 2016 - 9:50 am | नूतन सावंत

Hech sangayache hote,

सविता००१'s picture

20 Aug 2016 - 9:57 am | सविता००१

मस्त लागेल हा पुलाव
पण इतरांसारखंच म्हणते. फोटो?????????

सपे-पुणे-३०'s picture

20 Aug 2016 - 2:31 pm | सपे-पुणे-३०

खरंतर पहिल्या फोटो प्रमाणेच बाकीचे टाकलेत. परत टाकून पहाटे.

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 2:38 pm | किसन शिंदे

फक्त पहिलाच फोटो दिसला आणि तो ही टेम्प्टींग आहे.!

सपे-पुणे-३०'s picture

20 Aug 2016 - 2:40 pm | सपे-पुणे-३०

sahitya

bhat

bhajya

corn

अभ्या..'s picture

20 Aug 2016 - 4:16 pm | अभ्या..

रेसिपी भारी.
फक्त ते फोटोतला तांदूळ लांब्/बासमती वाटत नाहीये हो. ;)

सपे-पुणे-३०'s picture

21 Aug 2016 - 11:17 am | सपे-पुणे-३०

:) तो अख्खा नाही, पण बासमती आहे.

पैसा's picture

20 Aug 2016 - 5:25 pm | पैसा

पण एकच फोटो दिसला! सौधिंडियन खाऱ्या नारळीभाताची आठवण झाली.

विवेकपटाईत's picture

20 Aug 2016 - 10:55 pm | विवेकपटाईत

फोटो दिसले नाही तरी पदार्थ निश्चित छान झाला असेल. नुसते खोबर टाकलेला फोडणीचा भात हि मला आवडतो.

सपे-पुणे-३०'s picture

21 Aug 2016 - 11:23 am | सपे-पुणे-३०

माझ्या पहिल्याच लेखनाला दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
पण फोटो का गंडले ते अजून कळलं नाही. असो.

छान दिसतेय पाकृ.पहिला फोटो छान दिसतोय.

छान दिसतेय पाकृ.पहिला फोटोही छान दिसतोय.

स्मिता चौगुले's picture

22 Aug 2016 - 11:10 am | स्मिता चौगुले

छान दिसतेय पाकृ