प्रो.देसायांबरोबर Q & A

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
23 Sep 2008 - 10:34 pm
गाभा: 

काल माझी प्रो.देसायांबरोबर Q & A ची जुगलबंदी झाली.मी त्याना पहिला प्रेश्न विचारला,
"भाऊसाहेब मनात कल्पना निर्माण करायला आपल्या अंगात कोणते गूण असायला हवेत?"
ते म्हणाले,
"तुम्ही हा चांगला प्रश्न विचारलात.मी ह्या विषयावर पुर्वी माझ्या क्लासमधे सवित्स्रर लेक्चर पण दिलं होतं.पण आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मनात कल्पना निर्माण व्हायला आश्चर्य,मनातला संदेह आणि कसल्यातरी विषयाचं वेड असणं ह्या तीन गुणाची प्रथम आवश्यक्यता आहे.तसंच मनाची व्याकुळता आणि सदाची असमाधानी वृत्ति असणं हे पण आवश्यक आहे."
हे ऐकून मी त्यांना पुढे म्हणालो,
"पण भाऊसाहेब,कल्पना आल्यानंतर त्याला मुर्तस्वरूप द्यायला भावना नकोत कां?"
प्रो.देसाई हंसून म्हणाले,
" भावना नाही तर आयुष्य कसलं?नुसत्याच भावना असून चालणार नाही तर त्या भावना प्रखर असाव्या लागतात.आणि तसं व्हायला आपल्याला भरपूर अनुभव असावा लागतो, आणि जर का आपल्याकडून आयुष्यात काही हाल अपेष्टा भोगल्या गेल्या असतील तरच त्यामुळे भावना प्रखर होतात.प्रखरता कमी झालेल्या भावना कधीच कामाला येत नाहीत."
मी त्याना म्हणालो,
"मी पाहिलंय,की काही माणसं निराळ्याच जगात राहिल्या सारखी वागत असतात.ह्याचं कारण काय असावं?"
थोडा विचार करून भाऊसाहेब म्हणाले,
"एखाद्दा गोष्टीचं वेड लाऊन घेण्याचा ज्यांचा स्वभाव असतो,आणि ज्यांच्या मनात सतत प्रश्न असतात,ते असे वागतात.आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या हृदय आणि मनाशी सारखेच बांधलेले असतात."

मी दुसरा प्रश्न विचारण्या पुर्वीच प्रो.देसाई म्हणाले,
"असे लोक ज्ञानी असतात.पण नुसतं ज्ञान असून चालणार नाही.त्याला शिस्तीची पण जोड हवी. नाहीतर एखाद्दाच्या अंगात उत्साह आणि कुवत असते आणि अशावेळी तो जर प्रबळ झाला तर त्याला त्या प्रबलतेची किंमत मोजावी लागते"
असं म्हणून ते माझ्याकडे जरा कुतुहलतेने बघत राहिले.
ते पाहून मी भाऊसाहेबाना म्हणालो,
"किंमत मोजावी लागते म्हणजे एकझॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं आहे?"

"मला माहित होतं तुम्ही हा प्रश्न मला करणार म्हणून."
असं म्हणून मग मिष्कील हंसून लगेचच म्हणाले,
" ही किंमत अशा व्यक्तिला व्यथे मधे मोजावी लागते.आणि त्याचं मुख्य कारण घाई घाईने घेतलेल्या निर्णयामुळे,उतावळेपणाने घेतलेल्या निर्ण्यामुळे तसं होतं."
त्यांच बोलून झाल्यावर मी त्याना म्हणालो,
"मग याचा अर्थ अशी व्यक्ती आपली मनःशांती गमावून बसणार नाही काय"?
हा माझा प्रश्न ऐकून अगदी गंभीर होऊन भाऊसाहेब म्हणाले,
"प्रत्येक व्यक्ति मनःशांतीसाठी नेहमीच इच्छूक असते.अश्या व्यक्ति दुसर्‍याच्या जीवनात डोकाऊन पाहून त्यांच्या जीवनातल्या सुखसमाधानाकडे पाहून त्यांचा हेवा करतात. तरीपण त्यांना सुखसमाधानी मिळावी की काय हे सांगता येत नाही."
हे ऐकून मी त्याना विचारलं,
"हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असणार नाही काय?"
प्रोफेसर म्हणाले,
"प्रत्येक जण आपल्या स्वभावाशी चांगलाच परिचीत असतो.आणि आपल्या जीवनातून मार्ग काढीत असतो.जे निसर्गाने दिलंय ते ओळखणं,त्याचा स्विकार करणं,आणि निरनीराळ्या स्वभावातल्या अनेकताची प्रशंसा करणं हे त्याने मान्य करणं उत्तम होईल.मनात उदासीनता आल्यानंतर जर का मनात उल्हास आणि उत्साह आला,तर त्याची मनावर दूरवर छाप राहते."
मी भाऊसाहेबाना विचारलं,
"तुम्ही तुमच्या कारकीर्दीत हे कसं काय हॅन्ड्ल केलंत?"
हे ऐकून त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाची छटा आली आणि ती माझ्या नजरेतून निसटली नाही.
"माझ्या मनातलं तुम्ही विचारलंत"
असं म्हणून ते पुढे म्हणाले,
"माझ्या स्वभावाच्या भावूकपणामुळे मी फक्त पुस्तकं वाचून शिकवीत नव्हतो.माझ्या अनुभवाचा पण उपयोग करीत होतो.
त्यासाठी शिस्त आणि थंड स्वभाव ठेवून मग जर का मनात काही भ्रम आल्याने तुमच्याकडून काही झालं तर ती काही वाईट गोष्ट नाही.असं सांगून मी माझ्या विद्दार्थ्यांच्या मनावर छाप आणण्याचा प्रयत्न करीत असे.

जर का कुणाला लक्षात राहणारं असं नीरस आयुष्य घालवायचं असेल तर आपल्या आयुष्यातल्या दुर्बोध बाजूकडे आणि कमजोर कुवतीकडे जरा डोकाऊन पहावं लागेल.
त्या पलिकडे जाऊन आपल्या आयुष्यातल्या व्यथा आणि खळबळीतून शिकलं पाहिजे की आपल्या आनंदाची भागिदारी- ज्यांच्याकडे तो आनंद कमी आहे- त्यांच्याकडे करावी आणि तसं करायला प्रोत्साहीत होत रहावं जेणेकरून सर्वांच कल्याण होईल.हे मी माझ्या विद्दार्थ्यांना निक्षून सांगत असे."

हे सर्व ऐकून मी प्रो.देसायांना म्हणालो,
" शेवटी काय ज्ञान अद्भुतच आहे पण बुद्धिचातुर्य त्याही पेक्षा आहे."
अगदी खूष होऊन माझी पाठ थोपटत मला भाऊसाहेब म्हणाले,
"अगदी लाख मोलाचं बोललात"

श्रीकृष्ण सामंत