होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

विटेकर's picture
विटेकर in काथ्याकूट
19 Jul 2016 - 5:51 pm
गाभा: 

नमस्कार !
२००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले.

मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या !
यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.

२०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात.
२०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती.
सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती )
या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या
या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ !

त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही !
दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते !
त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही )
५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१

डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती.
मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे !
मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत !

जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे !

पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे !

अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

24 Jul 2016 - 10:35 pm | सुबोध खरे

काही माझी निरीक्षणे आणि वैद्यकीय बाबी
मुळात तुमच्या शरीरात इन्स्युलिन स्रवण्याचे प्रमाण कमी झाल्याने जी औषधे दिली जातात(OHA) ती स्वादुपिंडाला चालना देऊन अधिक इन्स्युलिन तयार करायला भाग पडतात. आपले वजन जितके जास्त तितकी आपल्याला इन्स्युलिनची गरज जास्त. यामुळे असा लठ्ठ माणूस ज्याला नुकतेच मधुमेह आहे असे निदान झाले आहे त्याने वजन कमी केले तर त्याचा मधुमेह सुरुवातीला तरी आपणहून आटोक्यात येईल.
समजा एक किलो वजनाला एक युनिट इन्स्युलिन आवश्यक आहे. माणसाचे वजन १०० किलो आहे. तर त्याला १०० युनिट इन्स्युलिन लागेल.समाज त्याच्या स्वादुपिंडात १००० पेशी आहेत आणि त्या १०० युनिट इन्स्युलिन तयार करतात जशजश स्वादुपिंडातील पेशी काम करेनाशी होतील आणि त्या ८५० पर्यंत खाली येतील तेंव्हा त्याचे स्वादुपिंड ८५ युनिटच इन्स्युलिन तयार करू शकते मग अशा माणसाला जेवण झाल्यावर १५ युनिट कमी पडतात आणि जेवल्यानंतर त्याच्या रक्ता तील साखरेची पातळी वाढेल. आता याच माणसाने आपले वजन ६५ किलो केले तर त्याची इन्स्युलिनची गरज पूर्ण होऊन स्वादुपिंडावर ताण पडणार नाही आणि अशी व्यक्ती पुढची काही वर्षे औषधाविना आनंदात जगू शकते. जसजसे वय वाढत जाते तशीतशी त्याच्या( मधुमेही व्यक्तीच्या) स्वादुपिंडाची क्षमता कमी होत जाईल आणि ५-१० वर्षांनी अशी परिस्थिती येईल की स्वादुपिंड ( ६०० पेशी काम करीत आहेत) फक्त ६० युनिट इन्स्युलिन तयार करू शकते. अशा वेळेस त्या व्यक्तीच्या रक्तातील जेवल्यानंतरची साखर प्रमाणापेक्षा बाहेर जाईल आणि त्याला औषधे घ्यायला लागतील. यात तुम्ही गोळ्या घेतल्या की त्या गोळ्या तुमच्या स्वादुपिंडाचा चेतना देऊन ६० ऐवजी ६५-७० युनिट इन्स्युलिन तयार करू लागतील. पण जसा जसा काळ जाईल तशी स्वादुपिंडातील पेशी कमी होत जातील आणि त्या ६० ऐवजी ५० -४० युनिट इन्स्युलिन तयार करू लागेल तेंव्हा या गोळ्या आपल्याला वाढवाव्या लागतील(उरलेल्या पेशींकडून तेच काम करून घेण्यासाठी).
एक विशिष्ट पातळी नंतर आपले स्वादुपिंड अधिक इन्स्युलिन तयार करू शकत नाही मग आपल्याला साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्स्युलिनची इंजेक्शने घ्यावी लागतात. ज्यावेळेस आपले स्वादुपिंड अत्यंत कमी प्रमाणात इन्स्युलिन तयार करते तेव्हा आपल्याला इन्स्युलिनच्या इंजेक्शन शिवाय पर्याय राहत नाही
स्वादुपिंदात पेशी हळूहळू मृत्यू पावल्यामुळे कमी होत जातात यामुळे उरलेल्या पेशींवर ताण येतो. मूळ आपले स्वादुपिंड नीट काम करत नसेल तर ते पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत आणण्यासाठी (मृत पेशींचे पुनरुज्जीवन होण्यासाठी) कोणतेही औषध आजतरी उपलब्ध नाही.
माणसाला जितक्या कमी वयात मधुमेह होईल तितक्या जास्त गुंतागुंती त्याच्या आयुष्यात तुम्हाला पाहायला मिळतील कारण जसा जसा जास्त काळ जाईल तसे त्याचे स्वादुपिंड कमकुवत होऊन मधुमेहाचा जोर वाढत जातो. तरुणपणात मधुमेह झालेल्या माणसांना पथ्य पाळणे जास्त कठीण जाते कारण आजूबाजूला मित्र मंडळी आणि नातेवाईक खाऊन पिऊन ऐश करत असताना कडक पथ्य ठेवणेही तितके कठीण असते.
राहिली गोष्ट साईड इफेक्ट्सची -- व्यवस्थित डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेतल्या आणि पथ्य पाळले तर मधुमेही माणसाचे वजन वाढणार नाही. पण गोळ्या घेतोय म्हणून लग्नात ६ गुलाबजाम खाणारी माणसे मी पाहत आलो आहे.आपल्या वजन वाढीचा दोष "मधुमेहाच्या गोळ्या" आणि "संतती प्रतिबंधक गोळ्यां"वर ढकलणारी माणसे आणि स्त्रिया मी शेकड्याने पाहीली आहेत/ पाहतो आहे
(आयुष्यात असे कोणतेही संकट नाही ज्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत येत नाही)
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे डॉ त्रिपाठींची औषधे घेऊन एखादी व्यक्ती औषधाविना उत्तम राहू शकेल तसेच दुसरी व्यक्ती पूर्ण पथ्यपाणी पाळूनही औषध/इन्स्युलिन न घेतल्यामुळे मधुमेहाच्या गुंतागुंतींना बळी पडलेली दिसेल.
महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एक अत्यंत स्वतंत्र अशी व्यक्ती आहेत उत्पादन क्षेत्रात शेकड्यानी निर्माण होणारे यंत्र नव्हे की दुसऱ्याचा सूटा भाग किंवा दुसर्या उत्पादनाचा प्रॉब्लेम तसाच्या तसा तुम्हाला लागू पडेल. तुमच्या उजव्या अंगठ्याचा ठसा डाव्या अंगठ्याशी जुळत नाही. तेंव्हा एकाला लागू पडलेलं औषध दुसऱ्याला लागू पडेल असे नाही.
दुर्दैवाने मधुमेह हा इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसणारा आजार आहे की आजूबाजूला इतकी माणसे दिसतात त्यामुळे लोक हा आजार विकोपाला जाईपर्यंत गंभीरपणे घेतच नाहीत.
जुन्या काळात लोक जास्त निरोगी होते आणि आपले आजी आजोबा जास्त जगले हे मिथक आहे. स्वातंत्र्याच्या वेळेस आपली आयुर्मर्यादा ४८ होती यामुळेच माणसे फार काळ पेन्शन खात नसत म्हणूनच साठी शांत किंवा सहस्त्र चंद्र दर्शन(८० वर्षे) हे साजरे केले जात असत
क्रमशह

विटेकर's picture

25 Jul 2016 - 10:41 am | विटेकर

"इतकी टोकाची पथ्ये पाळण्यापेक्षा गोळ्या घेऊन आयुष्याचा आनंद का लुटु नये?" अश्या पद्धतीचे काही विचार आणि त्या अनुषंगाने डॉ. खरे यांचे अतिशय माहितीपूर्ण आणि संतुलित प्रतिसाद वाचण्यात आले. सर्वांचे मनः पूर्वक आभार !
-वरील वाक्य हे चार्वाकाच्या धर्तीने जाणारे आहे ..भस्मिभूत शरिरस्य... आणि यात काहीही वाईट नाही ! हा ज्याचा त्याचा वैयक्तिक वैकल्प आहे , आपण आपली जीवन पद्धती कशी स्वीकारावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे !
- अतिरेकी पथ्यपाणी वाईटच ! अर्थ आणि कामाचा उपभोग घ्यावा असेच आमचे शास्त्र सांगते , अर्थात धर्माच्या कक्षेत राहूनच ! त्यामुळे अर्थ- कामाचा अभाव आणि प्रभाव आम्हाला मान्य नाहीच !
- मूळात मधुमेह होतो ( टाईप २) तो अर्थ- कामाच्या प्रभावामुळे ! आता प्रश्न असा आहे की सहसा मधुमेही व्यक्ती हे मान्य करतच नाही ! आपले काही तरी चुकले आहे आणि ती चूक मान्य करून आपला अर्थ - काम नियंत्रणात आणावा ही जाणीवच होत नाही, किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन आमचे आजोबा मधुमेही असून ही ८० वर्षे जगले असली उदाहरणे दिली जातात. आणि मग पुन्हा गोळ्या घेत असून देखील खाण्यावर नियंत्रण राहात नाही ! विवेकच हरवलेला असतो !
- गोळ्या आणि नियंत्रित खाणे-पिणे ही शक्यता फार कमी लोकांच्या बाबतीत शक्य आहे. असा खाण्या पिण्याचा विवेक पाळ्णारा मनुष्य मधुमेही होतच नाही ! आणि झाला तर त्याला तो फार सतावत देखील नाही ! त्याच्या बाबतीत कोणतेही कोम्प्लिकेश्न होत नाही . प्रश्न आहे उरलेल्या ९० % लोकांचा आहे , ज्यांची जीवनपद्धती सैराट आहे !
- डॉ. त्रिपाठी त्या सैराटपणावर काम करायला सांगतात , मूळात मधुमेहीच्या मानसिकतेवर आघात करतात. गोळ्या . इन्शुलिइन बंद होणे हा एक मैलाचा दगड आहे पण त्याही पेक्षा माझे शरीर मलाच संभाळता येते आणि नियंत्रणात ठेवता येते हा मोठा आत्मविश्वास ते मिळवून देतात. हा अतिशय महत्वाचा भाग आहे ! मी कोर्स सुरु केला त्यापूर्वीच गोळ्या बंद झाल्या होत्या !
- खाण्या- पिण्याच्या सवयी या आपल्या मनावर अवलंबून आहेत, आपण जशी सवय लावू तशी ती लागते . स्मूदीची चव किती चांगली असते या त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही
- आणि मर्यादित प्रमाणात गोड खाता येतेच की ! ( गोळ्या न खाता ) मी लिहल्याप्रमाणे मी भरपूर आंबे खाल्ले , गुळाच्या पोळ्या खाल्ल्या , आइसक्रीम देखील खाल्ले जे मी गेली १० वर्षे गोळ्या खाऊन ही खाऊ शकत नव्हतो , कारण इअन्शुलिइन लागेल अशी सतत भिती असे !
- हा श्रेयस की प्रेयस असा खरा प्रश्न आहे , निर्णय ज्याचा त्याने करायचा आहे !

राजेश घासकडवी's picture

25 Jul 2016 - 11:10 am | राजेश घासकडवी

मूळात मधुमेह होतो ( टाईप २) तो अर्थ- कामाच्या प्रभावामुळे !

हे वाक्य पटलं नाही. पण एकंदरीत प्रतिसादाचा रोख समजला आहे. तो ठीकच आहे.

माझा मुद्दा चार्वाकीय नाही. मी इंजिनियर असल्यामुळे ऑप्टिमायझेशनचा विचार करतो. श्रेयस की प्रेयस असा काळापांढरा चॉइस नसतो. थोडं श्रेयस वाढवावं, थोडं प्रेयस कमी करावं - त्याने प्रेयस उपभोगण्यासाठी आपण जास्त काळ जगतो असं गणित असतं. जर रोज चार तास चालल्यामुळे माझं आयुष्य ८० ऐवजी ८५ होणार असेल तरी ते चार तास घालवणं फायद्याचं ठरतं का? कारण मला चालणं आवडत नसेल तर ती पाच वर्षं वाढवण्यासाठी पुढच्या चाळीस वर्षांतल्या मोकळ्या वेळापैकी दहा वर्षांचा मोकळा वेळ मी चालण्यात फुकट घालवेन. म्हणजे हिशोब तोट्याचाच झाला. (हे आकडे केवळ उदाहरणासाठी, मुद्दा समजावून देण्यासाठी मानलेले आहेत)

कारण इअन्शुलिइन लागेल अशी सतत भिती असे !

ही भीती का? हाच माझा मुळात प्रश्न होता. मला तर 'मला दररोज पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम लागेल, आणि दूध-साखर-पावावर बंदी लागेल' अशी भीती जास्त वाटते.

असो. आपण आता तेच तेच म्हणत आहोत. मला आणि तुम्हाला दोघांनाही खरे, आनंदी गोपाळ, साती यांचे प्रतिसाद पटलेले आहेत. या कॉमन ग्राउंडवरच थांबता येईल. नाहीतर पुढची चर्चा फारच फिलॉसॉफिकल होण्याची भीती आहे.

विटेकर's picture

25 Jul 2016 - 12:14 pm | विटेकर

मुद्दा फक्त तुम्ही किती काळ जगता असा नसून असे जगता हा ही आहे. गोळ्या खाऊन व्हील चेयरवर आयुष्य काढ्णे हे ही अपेक्षीत नाहीच ! ( क्वालिटी ऑफ लाइफ) . मधुमेहाने माणूस दीन पतित होतो , तो कसा होतो याचा मी अनुभव घेतला आहे! आणि मधुमेह शरीराइतकाच मनावर आघात करतो, तुमचे जगणे मर्यादित करतो ! कदाचित मी मनाने कमकुवत असेन म्हणून मला माझी औषधापासून मुक्ती , तो विजय अधिक महत्वाचा वाटला.

आर्थ - कामाचा प्रभाव

अधिकतर पैसे मिळू लागली की शारीरीक श्रम कमी होत जाण्याकडे कल असतो , आयुष्य अधिक ऐषारामी होते . आणि काहींच्या बाबतीत अधिक पैसे मिळवणे हे अधिक तणाव वाढवणारे असू शकते. आपल्या गरजा नियंत्रित करणे हा ताण व्यवस्थापनाचा गाभा आहे. ताणाचा आणि टाईप २ चा जवळचा संबंध आहे. अर्थात हे जनरालायझेश्न झाले , अपवाद असतीलच.

मला तर 'मला दररोज पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम लागेल, आणि दूध-साखर-पावावर बंदी लागेल' अशी भीती जास्त वाटते.

हा वैयक्तिक वैकल्प आहे हे मी मान्य केलेच आहे.

मला आणि तुम्हाला दोघांनाही खरे, आनंदी गोपाळ, साती यांचे प्रतिसाद पटलेले आहेत. या कॉमन ग्राउंडवरच थांबता येईल.

चोक्कस !

nanaba's picture

25 Jul 2016 - 1:23 pm | nanaba

You have not seen a person go from 'looking normal' to 'terrible'
My mom's cousin expired last week. She was in her early fifties.. her attitude was somewhat similar.. her kidneys failed and so she was in bad shape for 4-5 months and then on dialysis for 3 months or so.. she could not eat many things, could not sit on her own. She had become so thin that I was shocked and I just stood watching her for complete 5 mins with my mouth literally open.. (Luckily, she was not awake.. she didn't have energy to remain awake).
She was beautiful before and when she expired she was a skeleton..
she could not do many things that she loved .. it was very painful to see all that. Very difficult for her family too - emotionally, financially and overall.
That's why if one is already on path - one should care.

सामान्य वाचक's picture

25 Jul 2016 - 11:16 am | सामान्य वाचक

पूर्ण सहमत

औषध बंद झाल्यावर , वजन कमी झाल्यावर स्वतःबद्दल जो विश्वास आणि feeling of achievement असते, ते खूप मोलाचे असते

आणि यात कुठे हि अतिरेकी जीवनशैली नाहीये
पोळीच्या ऐवजी भाकरी, भाज्यांची smoothy या एवढ्या वाईट किंवा खडतर गोष्टी नाहीयेत

नि आजी आजोबा या जीवन शैली ने मजेत जगले, हा उल्लेख केला होता तो दीर्घयुष्य बद्दल नव्हता, तर अशी जीवनशैली तुम्हाला वाटते तेव्हडी खडतर नाही, या साठी होता

डायबेटिस ची औषधे घेऊन हि पत्थ हे पाळावेच लागते
मग पथ्य करून औषध बंद झालेले केंव्हाही चांगलेच ना

आणि सगळे डॉ सांगतातच कि खाण्यावर कंट्रोल ठेवा। अतिरेक करू नका

साधारण 12 आठवडे हे डायट कडक पाळले कि विटू काका नि सांगितल्याप्रमाणे अन्य गोष्टी प्रमाणात खाण्याचा आनंद घेता येतो
मग ते आंबे असोत किंवा मिठाया असोत

अर्थात डॉ त्रिपाठी गोळ्या बंद करायचा सल्ला देत नाहीत
तो सल्ला तुमचे नेहमीचे डायबेटॉलॉजिस्टस च पूर्ण आणि दुर्घकाल तपासण्या करून देतात

डॉ त्रिपाठी कुठल्याही वेगळ्या गोळ्या किंवा औषध देत नाहीत
ते फक्त आहार आणि विहार याचा सल्ला देतात
आम्ही त्यांचे 1500 रुपये चे वोर्कशॉप अटेंड केले होते आणि त्याप्रमाणे आहार व्यायाम ठरवला
त्यामुळे फारसे खर्चिक कि नाहीये

अर्थात हि 3 वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे। आता काही बदल असल्यास माहित नाही

आमच्या डायबेटिलॉजिस्ट ने 3 महिने दर आठवड्याला शुगर चेक करून औषधाचे प्रमाण कमी करत नेले

दर 8 15 दिवसांनी ग्लुकोमिटर वर टेस्ट आणि 1 ते 2 महिन्यात लॅब मध्ये टेस्ट हे मात्र करत आहोत आणि आयुष्यभर करावे लागेल

आता नॉर्मल माणसाने खावे, त्या प्रमाणात गोड, आंबे, मिठाया, दुधाचे पदार्थ इ सुरु आहे आणि तरीही साखर कोंट्रोल मध्ये आहे

हाच अनुभव आमच्या नात्यातल्या कमीतकमी 7 लोका ना आमच्या नंतर आला

अर्थात हे सगळे पूर्ण पणे डॉ च्या देखरेखीखाली करावे आणिआपण स्वतःच्या मनाने काहीही ठरवू नये
कारण डायबेटिस या प्रकारामध्ये कायमस्वरूपी डॅमेज होते

रेग्युलर चेकिंग आपण भूतलावर असेपर्यंत केलेच पाहिजे
आणि रिपोर्ट्स डॉ ना दाखवलेच पाहिजेत
आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागले पाहिजे

विटेकर's picture

25 Jul 2016 - 12:22 pm | विटेकर

यात कुठे हि अतिरेकी जीवनशैली नाहीये
पोळीच्या ऐवजी भाकरी, भाज्यांची smoothy या एवढ्या वाईट किंवा खडतर गोष्टी नाहीयेत

कोणाला नेमके काय अतिरेकि वाटेल हा ज्याचा त्याचा विकल्प आहे , पण असे पथ्य पाळणे देखील आनंददायी असू शकते हे मी अनुभवाने सांगतो

डॉ त्रिपाठी कुठल्याही वेगळ्या गोळ्या किंवा औषध देत नाहीत
ते फक्त आहार आणि विहार याचा सल्ला देतात

हीच खरी गंमत आहे ! त्यांच्याकडे कसलेही औषध नाही , त्यात कुठेही , कसलेही मार्केटिन्ग नाही , आणि कसलेही क्विक फिक्स नाही ! होय , त्यांची कन्सल्टेशन फी जरा जास्त वाटू शकते पण आयुष्य बदलू शकणार्‍या या जीवनशैलीसाठी ते खूप कमी पैसे आकारतात असे मला वाटते . आणि वरती डॉ. खरे म्हणाले त्याप्रमाणे आपले पैसे गेले आहेत तर करुन तरी पाहू अशामुळेही अधिक यश मिळत असेल.

ग्युलर चेकिंग आपण भूतलावर असेपर्यंत केलेच पाहिजेआणि रिपोर्ट्स डॉ ना दाखवलेच पाहिजेत आणि ते सांगतील त्याप्रमाणे वागले पाहिजे

हे तर भूतलावरच्या सर्वच व्यक्तिना सारख्या प्रमाणात लागू आहे , तुम्ही मधुमेही असा अथवा नसा!

रंगासेठ's picture

26 Jul 2016 - 3:10 pm | रंगासेठ

मधुमेह नियंत्रणात आणल्याबद्दल तुमचे अभिनंदन. हा लेख आणि चर्चा अतिशय माहितीपूर्ण आहे.

LCHF Diet - Low Carb High Fat
या लिंकवर पण 'रिवर्स डायबेटिस' ची माहिती आणि करावे लागणारे उपाय आहेत. या डॉक्टरंनी पण आहारात बदल करुन कित्येक लोकांचा मधुमेह नियंत्रणात आणलाय. पण काही काही आहार हे 'हाय फॅट' असल्याने वैद्यकीय सल्याशिवाय न घेतलेलच बरं असं वाटतय, कारण कदाचित भारतीय आणि परदेशातील जीवनशैली/आहारातील फरक.

स्वराजित's picture

30 Jul 2016 - 2:50 pm | स्वराजित

डॉ सुबोध खरे, डॉ आनंदी गोपाळ, डॉ. साती, डॉ. म्हात्रे
आपल्या सर्वांचे आभार.
विटेकर काका आणि काकूचे अभिनंदन.
या लेखासाठी विटेकर काका तुमचा खुप आभारी आहे.

मला एक शंका आहे. मधुमेह लक्षात येतो तो बराच उशिरा, हे बरोबर आहे का? आणि रक्तात साखरेचे वाढलेले प्रमाण हीच एक चाचणी आहे का मधुमेह झाल्याची? की अजून कुठल्या मार्गाने निदान करता येते? आणि नियमित तपासण्यांमध्ये साखर आढळली नाही तरी मधुमेह नाहीये असे ठामपणे सांगता येणार नाही, हे बरोबर आहे का?

दोन-तीन प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे.
१. मधुमेह अानुवंशिक असतो पण तो भिन्नलिंगी स्वरूपात - म्हणजे आईकडून मुलाला किंवा वडिलांकडून मुलीला. यात कितपत तथ्य आहे?
२. बालमधुमेह किंवा Juvenile Diabetes साठी अशी जीवनशैली उपयुक्त होऊ शकते का?
३. Diabetes Mellitus हा काय प्रकार आहे?

चौकटराजा's picture

1 Aug 2016 - 7:25 am | चौकटराजा

पुनमराऊत's picture

9 Aug 2016 - 3:30 am | पुनमराऊत

खुपच छान लेख व प्रतिसादही माहितीपुर्ण !

फार चांगला धागा लिहिला आहे , प्रतिसाद हि सर्वच चांगले आहेत. preventive health check up
सबंधि आधि धागा लिहिला गेला आहे का?

विटेकर's picture

10 Aug 2016 - 9:56 pm | विटेकर

Reposting the appeal....

Something interesting...

Dr Pramod Tripathi has been nominated for the prestigious *WOCKHARDT FOUNDATION* - "YOUTH" POPULAR AWARD 2016 - in *DOCTORS CATEGORY!*

Top 5 doctors have been chosen by the foundation across the country from hundreds. If you would like Dr Pramod to win this award, please *GIVE A MISSED CALL* from your *MOBILE* and *LANDLINE* to 7097198358 immediately. Let us all enjoy this win and gain more visibility for FFD!

धर्मराजमुटके's picture

23 Dec 2019 - 8:02 pm | धर्मराजमुटके

अ‍ॅमझॉनवर मधुमेहींसाठीचे गहू पिठ, तांदूळ वगैरे विकले जातात. त्यातल्या काही पदार्थांसोबत लॅब टेस्ट चे रिपोर्ट जोडले जातात ते कितपत खरे मानावेत ?

उदा :
दुवा १
https://www.amazon.in/Aashirvaad-Sugar-Release-Control-Atta/dp/B077T7NZT...
दुवा ३

आपण घरी गहू विकत घेऊन गिरणीतून दळून आणतो त्यात दुसरे काही धान्य टाकून त्याचा जी.आय. इन्डेक्स कमी करणे शक्य आहे काय ?

जालिम लोशन's picture

24 Dec 2019 - 12:48 am | जालिम लोशन

आपण गव्हात ज्वारी मका मिसळुन त्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करु शकतौ. रेशनचे गहु आणले तर त्या पिठात कोंड्याचे प्रमाण जास्त असते, जितके कोंड्याचे प्रमाण जास्त तितका त्या पिठाचा GI कमी. आणी मधुमेह हा एक व्याधी नसुन किमान पाच प्रकार आहे. आपल्याला त्यातील फक्त type 1 आणी type2 माहित असतात.

ते invitro report असतात. in vivo म्हणजे प्रत्यक्ष वापरातले ह्यात फरक असतौ. आशिर्वाद हा unilever ह्या ब्रिटीश कंपनीचा ब्रॅड आहे. हि तीच कंपनी आहे जी गोरे होण्यासाठीची क्रिम विकते. आणी त्यासाठीचे लॅब रिपेर्ट दाखवते. प्रत्यक्षात तुम्ही केरळचा कश्मिर झालेला बघितला आहे का? त्यावरुन तुम्ही ठरवा.

कोहंसोहं१०'s picture

24 Dec 2019 - 4:37 am | कोहंसोहं१०

आशिर्वाद हा unilever ह्या ब्रिटीश कंपनीचा ब्रॅड आहे. हि तीच कंपनी आहे जी गोरे होण्यासाठीची क्रिम विकते >>>>>>> आशिर्वाद हा ITC कंपनीचा ब्रँड आहे आणि ITC ही भारतीय कंपनी आहे.

जेविद्वि व्रताचे पालन केले तर वजनाबरोबर मधुमेह देखील कमी होतो असे ऐकिवात आहे.

धर्मराजमुटके's picture

24 Dec 2019 - 9:43 am | धर्मराजमुटके

जेविद्वि व्रत म्हणजे काय ?

जेविद्वि व्रत म्हणजे डॉ. J. V. दीक्षितांचे दोन वेळा जेवायचे व्रत.
त्यामुळे वजन कमी होण्याबरोबर मधुमेहापासून मुक्ती मिळते म्हणे.

त्या निमित्ताने आमची झैरात
http://misalpav.com/node/43814