भारतास मिळालेले स्वातंत्र्य हे अहिंसावादी लढ्याने मिळाले असे शालेय इतिहासात वाचल्याचे स्मरते, याउलट हिंदवी स्वराज्याच्या अग्नीकुंडात अनेकांनी प्राणांतिक आहुत्या दिल्या. त्यापैकीच दोन वीर बाजीप्रभू देशपांडे नि शिवा काशीद ! जिजाऊ प्रतिष्ठान गेली सतत ९ वर्षे "पन्हाळा - विशाळगड पदभ्रमंती - एक दिवसीय मोहीम (P2V2016 ) " त्या शूरवीरांच्या स्मृती प्रितर्थ्य आयोजित करते. या वर्षी ही मोहीम ९ जुलैला यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत एकूण ५ मिपाकर सहभागी झाले होते , ते पुढीलप्रमाणे - शिवाजी ( वाचनमात्र मोड ) , आशिष ( वाचनमात्र मोड ) ,मी (अवाकले मोड) नि इतर २ मिपाकर ( वाचनमात्र मोड) . या मोहिमेत एकूण ७२ जण सहभागी झाले होते. त्यापैकी २४ जणांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. अभिमानाची गोष्ट म्हणजे यात ३ मिपाकरांचासुद्धा सहभाग होता.
ही मोहीम ऐतिहासिक आहे. त्यामुळे या मोहिमेची सुरुवात बाजीप्रभूंच्या दिमाखात उभ्या असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्यापासून होते. मोहिमेची सुरुवात आम्हा सर्वांचे स्फूर्तीस्थान साटम सर यांच्या इतिहास कथनाने झाली. तो माझ्या अल्पमतीस जितपत समजला , तो असा -
अफझल खानाच्या वधानंतर , अदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्दी जोहरास महाराष्ट्रात धाडले. सिद्दी जोहरने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला, राजे गडावरच होते. वेढा फारच कडक होता. दर ५० फुटावर शिपायांचा बंदोबस्त होता. ( हा वेढा नोव्हेंबर ते जुलै म्हणजे जवळपास सहा महिने - साटम सर संदर्भ , परंतु इतर ठिकाणी ४-५ महिने सुद्धा वाचण्यात आले आहे ). महाराजांचा अंदाज होता , या कोकणात होणाऱ्या नभभेदी पावसात वेढा फार काळ तग धरू शकणार नाही. परंतु झाले विपरीतच , वेढा अजून आवळला गेला. " बाहेर मोगल स्वराज्यात धुमाकूळ घालत आहे , मला गड सोडून निघालेच पाहिजे " असे शिवाजी महाराजांनी मावळ्यास निक्षून सांगितले. योजना ठरली. महाराजांनी आपल्या वकीलास सिद्दी जोहरच्या भेटीस धाडले. उद्या सकाळी राजे शरण येणार अशी बातमी सिद्दी जोहरच्या तळावर पोहोचताच सर्वत्र आनंद पसरला , वेढा थोडा ढिला पडला. हीच ती वेळ !!!!!!! मावळ्यांनी वेढ्यातून पलायनाची जागा ठरवली. दर ५० फुटावर असणारा बंदोबस्त एके ठिकाणी १५० फुटापर्यन्त सैलावला होता. १२ जुलै १६६० - आषाढ पौर्णिमेच्या कालरात्री, स्वराज्यावर पडलेल्या काळछायेच्या ग्रहणातून स्वराज्यसूर्य बाहेर पडणार होता. साक्षात मृत्युच्या मगरमिठीत जाण्यासाठी शिवा काशीदांची पालखी निघाली ,ही पालखी मलकापूरास जाणार होती तर महाराज गजापूर च्या वाटेने ( पावनखिंड) विशाळगड गाठणार होते. शिवा काशींदाबरोबर २० मावळे , तर महाराज ६०० मावळ्यांसह वेढ्यातून निसटले. " शिवाजी भाग गया " अशी खबर सिद्दी पर्यंत पोहोचली. युक्ती कामास आली. शिवाजी म्हणून " शिवा काशिद " यांस अटक झाली. पहाटे ५.० वाजता सिद्दी जोहरच्या शामियान्यात शिव काशिदास हजार करण्यात आले , सिद्दी जोहरास सत्य कळताच शिवा काशिदांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. गनीम सावध झाला , शोधाशोध सुरू झाली. टापांचा आवाज जवळ येऊ लागला. तेव्हा बाजी प्रभू देशपांडे नि ३०० मावळे यांनी गजापूरची खिंडीतच हजारोने येणाऱ्या गनिमास रोखण्याचे ठरविले. शिवाजी महाराज नि इतर मावळ्यांसह विशाळगडाकडे कूच केले. तोफांचा आवाज कानी पडेस्तोवर बाजींनी खिंड लढवली , अश्या शूरांच्या रक्ताच्या अभिषेकाने ती खिंड पावन झाली. राजांचा विशाळगडावर जाण्याचा मार्ग सुद्धा जोखमीचा होता , कारण १६-१७ तासांच्या पायदौडी नंतर विशाळ गडाचा वेढा फोडून गड गाठणे , म्हणजे महाजिकिरीचे काम !!!! परंतु " काळोखातुनि विजयाचा हे पहाटचा तारा , प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युन्जय वीरा ll ( संदर्भ - अनामवीरा - कुसुमाग्रज )
ही मोहीम एकूण ६२ किमी ची आहे. अनेक संस्था ही मोहीम २ दिवसात सुद्धा पूर्ण करतात. परंतु, इतिहासास स्मरून ही मोहीम जिजाऊ प्रतिष्ठान एक दिवसात पूर्ण करते. ही मोहिम भर पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्यातच मुख्यतः करण्यात येते. ऐकिवात आले की, सध्या पन्हाळा - पांढरपाणी अशी मॅराथॉन सुद्धा असते , जी १० तासात पूर्ण करण्यात येते. पांढरपाणी - नावाप्रमाणेच हे गाव आपल्या मोहिमेत तोंडाचे पाणी पळवते. पन्हाळा - पांढरपाणी हा ४० किमीचा हा पहिला टप्पा , नंतर ६ किमी अंतरावर पावनखिंड हा दुसरा टप्पा तर अखेरचा टप्पा हा विशाळगडाचा पायथा जो पावनखिंडीपासून १६ किमीवर आहे.
बाजीप्रभूंच्या पुतळ्यास वंदन करून मोहिमेची सुरुवात होते. शक्यतो सर्व मंडळी पुणे मुंबईची असल्याने शुक्रवारी संध्याकाळपासून पन्हाळा यात्रेस सुरुवात होते. सर स्वतः बोरिवलीत राहत असल्याने , बसचे निर्गमन तेथून होते व वाटेत ट्रेककरी जुडत ( गुरगावी मराठी) जातात. मोहिमेस सुरुवात सकाळी ७. वाजता झाली. बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ तिठा आहे. पुतळ्याकडे तोंड करून उभे राहिले असता या पुतळ्याच्या डाव्या बाजूस पाण्याची टाकी आहे, येथे पाणी भरू शकता. आपली वाट ही उजव्या बाजूची आहे. थोड्या अंतरावरच अवकाश संशोधन केंद्र लागेल. येथील गेट ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या हातास एक पायवाट लागेल ती पकडून जंगल भ्रमण सुरू करावे. वाटेत पुन्हा डांबरी रस्ता लागल्यावर थोडे पुढे चालले असता , एक शेतातून मसाईच्या पठारावर जाणारी वाट आहे .त्या वाटेने तास दीड तासात आपण मसाईच्या पठारावर पोहोचाल. मसाईचे पठार हे ७ मैल पसरलेले आहे. अनेक पायवाटा नि धुक्यामध्ये रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. अश्या वेळेस सर्वांनी एकत्र राहणे फार गरजेचे असते. मसाईचे पठार पार केल्यावर ठराविक अंतरावर आपणास गावे लागत जातात, त्यामुळे पाणी ही कधी आणीबाणी होत नाही. वाटेत अनेक वाड्या , शाळा लागतात. आम्हापैकी काही जणांनी शाळकरी मुलांसाठी गोळ्या नि चॉकलेट्स आणली होती ( आठवण - मागील मोहिमेत रा मे शिसपेन्सिल घेऊन आले होते, यावर्षी ते अपरिहार्य कारणाने येऊ शकले नाहीत.) यावर्षी पूर्ण मोहिमभर वरुणराजांचा आशिर्वाद असल्याने , थकवा जाणवत नव्हता. मजल दरमजल करत आम्ही पाटेवाडीपर्यंत पोहोचलो. पाटेवाडीच्या अलीकडे दुपारी २-३ च्या सुमारास असाल , तर मंजिल अब दूर नाही और आपना स्पीड भी कम नाही असे मानावे.पाटेवाडी नंतर जंगल पार केल्यावर दीड दोन तासात पांढरपाणी लागते. या जंगलात " हाच त्यो " आद्याक्षरे लिहिलेला एक ओढा लागेल हा ओढा पार केला असता शेपूट राहिले असे समजावे. परंतु , सध्या उत्तम पाऊस झाल्याने "हाच त्यो "का " मागचा त्यो" का "पुढचा त्यो " असे अनेक ओढे खळाळून वाहत होते. भरीस भर म्हणजे येथे भातशेती व ऊसशेती दोन्ही होते. त्यामुळे काहीवेळेस नडगी भर चिखलातून चालवायची वेळ येते. ते कमी म्हणून की काय जळू आपला जलवा दाखवितात.
या मार्गावर पिवळ्या नि भगव्या रंगाच्या बाणांचे मार्किंग आहे. परंतु अंधार पडावयास लागल्यावर हे मार्किंग कामी येत नाही. त्यामुळे पांढरपाणी हे संध्याकाळी ७. ० च्या अगोदर गाठण्याचे उद्दिष्ट ठेऊनच मार्गक्रमण करावे.पंढरपणीच्या अगोदर म्हसवड गावाची शाळा लागेल. या शाळेच्या डावीकडून सरळ पुढे मार्गक्रमण करावे. वाटेत एक उजव्या हातास बैल गाडीचा कच्च रस्ता लागेल.तो शक्यतो फार अंधार झाला असेल तरच पकडावा , अन्यथा ती दूरची वाट आहे. पांढरपाणीला पोहोचल्यावर खरे द्वंदव सुरू होते ! एक तरफ ऐषोआरामकि जिंदगी !!!! ( आपली बस ) और एक तरफ अपनी मंझिल !!! थोडेसे फिल्मी वाटले असेल , पण मित्रांनो ज्याने हा ट्रेक केलाय नि पांढरपाण्याचा हा क्षण अनुभवलाय तोच ही परिस्थिती समजू शकतो. सकाळी ७.० वाजता पन्हाळ्याहून सुटलेले ७२ मावळे पंढरपाण्यास एकत्र जमण्यास संध्याकाळचे ८. वाजले. म्हणजे जवळपास ३.० किमी/ताशी चा वेग. जो फारच चांगला होता. पांढरपाण्यात थोडीशी न्याहारी करून आम्ही २४ मार्गस्थ झालो ते पुढील २२ किमीच्या शेवटच्या टप्प्यासाठी !!!! रात्रौ १०. ० वाजता सुरुवात करून आम्ही सव्वा - दीड तासातच पावन खिंड गाठली. पावसाचा रतीब चालूच होता. पांढरपाणी ते पावनखिंड हा २२ किमीचा पत्ता मुख्यतः पक्का रस्ता असल्याने मार्गक्रमणास सोपा आहे. परंतु , संततधार पाऊसाने खिंडीच्या आधी च आमची वाट अडवली, वाटेतच दोन वृक्ष पडलेले होते. परंतु " संघटन में शक्ती है" म्हणत आम्ही तो अडथळा लीलया पार केला. पावन खिंडीपर्यंत एकत्र असलेले "स्पेशल २४ " हे पुढे शोएब अख्तर , श्रीनाथ नि सौरव गांगुली अश्या आपापल्या वेगाच्या हिशेबाने विभागले गेले. मी आपला सौरव गांगुली गटातील असल्याने ६-७ जणाबरोबर मागे राहिलो.परंतु मी हे विसरलो होतो की माझ्याबरोबर स्वतः साटम सर आहेत. शेवटचे आठ किमी राहिले असता रात्रीचे २. वाजता सरांनी अजून दोंघांसोबत उसेन बोल्टचा पावित्रा घेतला. माझ्याबरोबरचा सवंगडी माझ्याकडे पाहून आपण सुद्धा धावायचे का अश्या प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले, मला उत्तर देण्याची गरज भासली नाही. विशाळगडाच्या ८ किमी अलीकडे एक शेवटचा अंतर दाखविणारा दगडानंतर मधले ४-५ किमी एकही अंतर्दर्शक दगड नाही. येथून एक्दम विशाळगड ४ किमी नि २. किमी असेच दगड लागतील. रस्त्यावर पूर्ण काळोख वरून सतत कोसळणारा पाऊस , नि रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्यांचा आवाज. आश्चर्य म्हणजे पहिला पाऊस होऊन गेल्यानंतरसुद्धा रस्त्यात अनेकदा काजव्यांच्या दिव्यांची साथ होती. हा रस्ता निर्जन आहे तसेच वाहनांची रहदारीही फार कमी असते. त्यामुळे चालण्यास फार सोपे जाते. दरमजल करीत असतांना वाटेत उजव्या हातास एक साईबाबांचे २४ तास उघडे मंदिर लागेल. साईंचा आशीर्वाद घेऊन मजल दरमजल करत आम्ही अखेरच्या २ किमी च्या पत्त्यासाठी सरसावलो. २ किमी म्हणजे जास्तीत जास्त ३० -४० मिनिटे असा मनाला विश्वास देत मार्गक्रमण करत होतो. परंतु , विजेरीच्या टीचभर प्रकाशात या रस्त्याची चढण नाही कळत व उतरण ! शेवट्चे २ किमी हा चांगलाच चढ असल्याने दमछाक झाली. पण आयुष्य म्हणजे काय तर ऊन - सावल्यांचा खेळ , कधी दुःख ,तर कधी आनंद. याचप्रमाणे ही चढण संपल्यावर पुढील उतारावर एक वाटत बघत उभी असते आपली प्रिय सखी ९९९ ( आमचा बस नं.).अशी ही ६२ किमीची प्रवासगाथा अत्यंत आनंदात सफल झाली रविवारी सकाळी ४ . वाजता ! तब्बल २१ तासांच्या पायदौडीनंतर .
ट्रेकसाठीची पथ्ये
१. बूट चांगल्या दर्जाचे असावेत. शक्यतो ऍक्शन ट्रेकर " स्वस्तात मस्त "
२. कपडे - पूर्ण शरीर झाकणारे ( जळवा , काटे , डास यापासून बचाव करीता )
३ . chaffing - हा कमीत कमी १८-२० तासाचा high endurance ट्रेक असल्याकारणाने शक्यतो " compression shorts" वा " no inners" हा एप्रोच ठेवावा
४. रकसॅक - पाणी वाटेवर मिळते. खाणे हे ओझे बनू देऊ नये त्यामुळे शक्यतो फलाहार वा electrol ठेवावे. येथील पाऊस हा वादळी असल्याने रेन प्रोटेक्शन असावे. ( मी स्वतः पॉन्चो न वापरता , साध्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो)
५. सर्व गुणकारी मीठ लिंबू - जळवा लागले असता त्यावर उपाय. salt plus energiser
स्वगत - मागच्या वर्षी रा. मे. आमच्या सोबत होते. त्यांच्या लेखावरूनच मला या ट्रेकची माहिती झाली. मागील वर्षी पूर्ण करू शकलो नव्हतो. या वर्षी पूर्ण केला. आता पुढील वर्षी सुद्धा जाण्याचा प्लॅन आहे , पण गेलो तर शेवटचे ८ किमी धावत जाण्याचा प्लॅन आहे. तयारी सुरू करतोय. बाकी श्रींची इच्छा.
स्वगत २ - खरेतर प्रकाशचित्रे डकविणे हे माझ्यादृष्टीने सर्वात कंटाळवाणे काम ! परंतु लेख वाचून आमच्यातील एक साथीदाराने "काय अप्पा " वर स्वतःच गूगल ड्राईव्ह ची लिंक दिली, तेव्हा आळस झटकून विनंतीचा मान राखणे भाग होते. त्यासाठी प्रवीण व स्व . म . चे आभार.
प्रकाशचित्रे - सौजन्य ( रितेश ,प्रवीण , स्वप्नाली,महेश P2V2016 चे सवंगडी)
प्रतिक्रिया
18 Jul 2016 - 4:45 pm | वेल्लाभट
गेली तीन वर्षे सातत्याने हा ट्रेक
मिसतोय.
तेंव्हा तुमचं कौतुक आणि अनुभवकथनाबद्दल मनापासून धन्यवाद
18 Jul 2016 - 5:11 pm | एस
तुमचं जबरदस्त कौतुक. हा खायचा ट्रेक नाही.
18 Jul 2016 - 5:27 pm | राजाभाउ
मी जवळपास २० वर्षापुर्वी हा ट्रेक केला होता. पण आम्ही पांढरपाणी ला रात्री मुक्काम केला होता. तुम्ही सलग केलात खरच कौतुक आहे.
18 Jul 2016 - 5:35 pm | किसन शिंदे
_/\_
दंडवत घ्या मालक
18 Jul 2016 - 7:02 pm | मुक्त विहारि
फक्त दंडवत.
19 Jul 2016 - 6:32 am | रातराणी
सुरेख अनुभवकथन!
19 Jul 2016 - 11:29 am | नाखु
माहीती दिल्यास बरे होईल.
अनुभवकथनाबद्दल अत्यंत आभार आणी एक रोमहर्षक घटनेचा सहभागी साक्षीदार झाल्याब्द्दल कौतुक.
19 Jul 2016 - 11:34 am | निळूभाउ
फारच मस्त अनुभव लिहिलात.वर्णन वाचून सगळे स्वतः पाहिल्याचा फिल आला.
19 Jul 2016 - 11:41 am | स्वच्छंदी_मनोज
जबरदस्त! हॅट्स ऑफ..
फार भारी काम.. फोटोंची जोड आली असती तर लेखाला चार चांद लागले असते.
(रचाकने.. माझा हा ट्रेक राहीलाय. कधी होणार देव जाणे.)
19 Jul 2016 - 4:31 pm | शिवाजी नाठे
विअर्ड विक्स , ट्रेक चे वर्णन खूपच छान व तपशीलवार केले आहे. वाचताना परत ट्रेक करत आहे असे वाटते .
यावर्षी ट्रेक पूर्ण करायचाच असे ठरवून सायन हून मी व माझा एक ऑफिस मित्र बस मध्ये बसलो . शनिवारी सकाळी ७ वा. ट्रेक चालू केल्यानंतर संध्याकाळी ७ वा. अंदाजे ४० कि .मी चालत गेल्यावर ट्रेक चा पहिला टप्पा पांढरपाणी ला पोहचल्या वर शरीराने पांढर निशाण दाखवण्यास सुरवात केली . मी मागच्या वर्षी पण एवढाचा ट्रेक पूर्ण केला होता . आता आपण यावर्षी पण ट्रेक पूर्ण करू शकत नाही असे वाटत असताना मनाने परत उचल खाल्ली व थोडा आराम करून परत पावन खिंडी च्या दिशेने प्रयाण केले . पांढर पाणी ते पावनखिंड हा ६ कि . मी . टप्पा आरामात पार झाला . पावनखिंड ते विशाळगड हा १६ कि . मी . टप्पातील शेवटचे २ कि . मी . अंतर २० कि . मी . आहे असे जाणवत होते व फक्त शरीर पाय ओढत पुढे चालत होते . अश्या प्रकारे शारीरिक व मानसीक क्षमते चा कसोटी पाहणारा ६२ कि . मी . चा ट्रेक सलग २१ तासात चालून पूर्ण झाला आणि इतिहासात वाचलेल्या बाजी प्रभू व मावळ्या बद्दल चा आदर मनात हजारो पटीने वाढला . काही फोटो (ग्रुप मधील ट्रेकर्स ने शेअर केलेल्या फोटो मधून साभार.)
मसाई पठार
मसाई पठारा वर चढाई
मसाई पठार हून मार्गक्रमण करणारे ट्रेकर्स
--शिवाजी नाठे
19 Jul 2016 - 4:48 pm | अजया
_/\_
19 Jul 2016 - 11:36 pm | पद्मावति
_/\_
20 Jul 2016 - 2:31 am | अभिजीत अवलिया
जबरदस्त. एकदा करायचा आहे हा ट्रेक. मसाईच्या पठारावर पावसाळ्यात गेलो आहे. साक्षात स्वर्गच.