नमस्कार !
म्युन्स्टरमध्ये मिपा भ्रमणमंडळाच्या स्थापनेच्या वेळी टोमॅटोचे सार केले होते. त्याची पाककृती देत आहे.
साहित्य :
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे
कांदे २ मध्यम आकाराचे
आले १ इंच
लसुण पाकळ्या ४ ते ५
तिखट पाव चमचा
नारळाचा चव अर्धी वाटी
साखर आणि मीठ चवीनुसार
फोडणीसाठी -
तूप २ चमचे, जिरे, हिंग, कढीपत्त्यची ७-८ पाने, सुक्या मिर्च्या २-३ तुकडे, कोथिंबीर,
३-४ लवंगा, ३-४ काळी मिरी, दालचिनी लहानसा तुकडा, २ वेलदोडे
कृती :
टोमॅटो, कांदे यांच्या मोठ्या फोडी करुन उकडाव्यात. उकडतानाच त्यात आले, लसुण घालावे.
उकडल्यानंतर टोमॅटोची साले काढावीत.
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचा गर, कांदे, आले, लसुण आणि नारळाचा चव घालून, त्याची पेस्ट करावी. त्यात गरजेनुसार पाणी घालावे आणि चवीनुसार साखर, मीठ, तिखट घालून मिश्रण उकळण्यास ठेवावे.
आता फोडणी करावी.
छोट्या कढल्यात तूप गरम करुन त्यात फोडणीचे साहित्य घालावे.
ती फोडणी उकळणार्या मिश्रणात एकत्र करावी आणि अजून एक उकळी काढावी.
टीप : फोडणी करतानाच त्यात कोथिंबीर घातल्यास ती हिरवी राहते.
--सौ. लिखाळ.
प्रतिक्रिया
23 Sep 2008 - 2:45 am | केशवसुमार
केकाचीपु.. एकदम जोरात प्रदार्पण..
एकदम जहबहराहा झाले होते सार.. अजुन चव रेंगाळते आहे..
फ्रँफूच्या दैर्यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले..
(टॉसा भक्त)केका
23 Sep 2008 - 11:52 am | स्वाती दिनेश
केकाचीपु.. एकदम जोरात प्रदार्पण..
एकदम जहबहराहा झाले होते सार.. अजुन चव रेंगाळते आहे..
फ्रँफूच्या दौर्यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले..
ह्योच म्हणते,केका सारखेच..:)
स्वाती
23 Sep 2008 - 4:53 pm | शाल्मली
फ्रँफूच्या दैर्यात ह्याचे प्रात्यक्षिक हवे..काय समजले..
फ्रँफूच्या दौर्यात स्वाती ताईच्या हातच्या पदार्थांची भली मोठी यादी आहे ते विसरलात का ?
त्या पदार्थातून वेळ मिलाला की टॉसा जरूर करुया.
अवांतर : स्वाती ताईला सारासाठी कोथिंबीर आणून ठेवायला सांगूया..
--(केकाचीपु) सौ. लिखाळ.
23 Sep 2008 - 9:19 am | धनंजय
मस्त वाटते आहे.
(पण याच्याबरोबर काळजाच्या आकाराचे कॉर्न कटलेट बहुधा करणार नाही. घरात कॉर्न नाही... डरांव!)
सार बनवले. आवडले!
23 Sep 2008 - 3:20 am | चतुरंग
हे सारं वाचून असार जीवनात सार असल्याची अनुभूती आली! ;)
(ह्या पेयाच्या समाधीसुखाचा अनुभव लगोलग घ्यायला हवा!)
चतुरंग
23 Sep 2008 - 3:52 am | रेवती
आले, आले, टॉ. सा. आले!
करून बघीन व कळवीन लवकरच.
आपल्याला धन्यवाद!
रेवती
23 Sep 2008 - 5:32 am | प्राजु
आधी नुस्ताच फोटो पाहिला होता आणि वर्णन ऐकलं होतं. आता प्रत्यक्ष कृती आली...
नक्की करून बघेन आणि कळवेन.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 5:34 am | बेसनलाडू
आज घरी जाऊन रात्रीच्या जेवणात हा 'आयटम्'करावा म्हणतो. याचा फोटोही टाकाच बुवा! जमला नाही,तर फोटोने उरलेली भूक भागवेन.
(स्वयंपाकी)बेसनलाडू
23 Sep 2008 - 8:48 am | विसोबा खेचर
टॉमॅटोच्या साराची पाकृ लै भारी...
धन्यवाद लिखाळकाकू. अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात प्लीज... आणि जमल्यास फोटूही सोबत जोडल्यास बरे होईल...
तात्या.
23 Sep 2008 - 2:59 pm | शाल्मली
बेसनलाडू, तात्या,
पुढल्या वेळेस फोटो नक्की..
-- सौ. लिखाळ.
23 Sep 2008 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लय भारी ....
आज मी पण टोमॅटोचं सार भुरकणार!
अदिती
23 Sep 2008 - 3:18 pm | ऋषिकेश
वा! मस्त पाकृ
घरी आईला दाखवतो.. तिचंही मस्त होतं सार पण कृती वेगळी आहे बहुतेक
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
23 Sep 2008 - 6:14 pm | दिनेश
टॉमॅटोच्या साराची पाकृ लै भारी...
दिनेश (प्रथमच टो. सा. मनापसून चाखलेला )
25 Sep 2008 - 7:04 pm | रेवती
शाल्मली,

टो. सा. केले होते. टेस्टी झाले होते. त्याचा फोटू.
रेवती
25 Sep 2008 - 7:08 pm | विसोबा खेचर
साराचा रंग अंमळ फिका का वाटतो आहे?
तात्या.
25 Sep 2008 - 7:29 pm | रेवती
कारण टोमॅटोंचा रंग तसाच होता (त्याला काय करणार?) ~X(
हा फोटो माझ्या साडेसहा वर्षाच्या मुलाने काढलेला आहे (अतिउत्साह, दुसरे काय?) :)
जर फोटो मी काढला असता तरी साधारण असाच आला असता (मला फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही) :(
रेवती
25 Sep 2008 - 9:34 pm | शाल्मली
रेवती,
फोटो छान आला आहे.
कारण टोमॅटोंचा रंग तसाच होता (त्याला काय करणार?)
बरोबर आहे.बरेचदा साराचा रंग टोंमॅटोच्या रंगामुळे फिका येतो. म्हणून रंग येण्यासाठी सार उकळताना त्यात थोडासा टोमॅटो सॉस घालावा. साराचा रंग थोडासा गडद होतो.
बाजारातली तयार टोमॅटो प्युरी वापरुन सार केल्यास रंग चांगला येतो. त्याला थोडा प्रिसरवेटिवचा वास येईल अशी भीति वाटते पण कांदा-लसूण घातल्याने तो वास मरतो.
--शाल्मली.
25 Sep 2008 - 9:51 pm | प्रभाकर पेठकर
त्या पेक्षा अर्धा किंवा एक इंच बीट रूटचा तुकडा घालून पाहा.
26 Sep 2008 - 12:17 am | शाल्मली
त्या पेक्षा अर्धा किंवा एक इंच बीट रूटचा तुकडा घालून पाहा
बीट रुटची कल्पना छानच आहे. करुन पहायला पाहिजे..
स्वयंपाकघरात नव्यानेच प्रवेश झाल्याने अशा सूचनांचे स्वागत आहे.
-- शाल्मली.
27 Sep 2008 - 5:34 pm | प्रभाकर पेठकर
अशा वेळी वेगळी साखर घालू नये. बीटात साखर असतेच.
27 Sep 2008 - 9:55 pm | शाल्मली
बरं . पुढच्या वेळेस नक्की करुन बघीन. :)
--शाल्मली.
25 Sep 2008 - 10:12 pm | विसोबा खेचर
बरेचदा साराचा रंग टोंमॅटोच्या रंगामुळे फिका येतो. म्हणून रंग येण्यासाठी सार उकळताना त्यात थोडासा टोमॅटो सॉस घालावा. साराचा रंग थोडासा गडद होतो.
आमच्या इथे छान लालचुटुक पिकलेले टोमॅटो मिळतात, त्यामुळे साराचा रंगही छान गडद येतो...
तात्या.
26 Sep 2008 - 3:20 pm | शाल्मली
आपल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार ! :)
--शाल्मली.