परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

खेडूत's picture
खेडूत in काथ्याकूट
10 Jun 2016 - 10:21 am
गाभा: 

दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत.

माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ? असं करणारे लोक माहीत आहेत का?
मला खरंच माहीत नाही - त्यानी विचार करायचं एकच साधं कारण- ते म्हणजे त्याची मुलगी रशियात डॉक्टर व्हायला गेलीय. मग मुलाला का नाही पाठवायचं ? शिवाय पदव्युत्तर शिकायला जाण्यापूर्वी इथे आधी बरेच पापड लाटावे लागतात, सगळीकडे नुसती स्पर्धा आहे, ते त्याला नकॊय.

त्याच्याशी बोलताना आणि अन्य देशातल्या अमिपाकर मित्रांशी बोलताना या प्रश्नाचे अनेक पैलू समोर आले. खफ वर याविषयी चर्चा सुरु होऊ घातली होती म्हणून म्हटलं धागाच काढू !

मुळात आज असा विचार करणारे माझ्या पिढीतले पालक कांही करणाने नव्वदच्या लाटेच्या दशकात परदेशात जाऊनही तिथे स्थायिक होऊ शकले नाहीत. तर काहीजणांना शक्य असून ते गेले नाहीत, गेलेले परतले, किंवा आजारी/ एकटे पालक, स्वत:चा व्यवसाय अथवा पूर्णत: वेगळ्याच क्षेत्रात काम करण्यामुळे वगैरे परदेशी जाण्याचा संबंध नव्हता.

२००० नंतर स्वत: फिरून आल्यावर आणि माहिती वाहू लागल्यावर अनेकांना असे वाटू लागले की शक्य असेल तर परदेशात विनासायास रहाणे बरे. इथे क्षुल्लक गोष्टीसाठी होणारी परवड त्यांना नको वाटते. त्यामुळे मुलांनी तरी परदेशी शिकावे आणि जमल्यास एका बऱ्या देशात स्थायिक व्हावे. याउलट काहीना वाटते इथेच भविष्यात संधी निर्माण होतील तर कशाला कुठे जायचे? तर काहींच्या बाबतीत फक्त मुलांनाच त्यांच्या मित्रपरिवारामुळे परदेशी राहू असे वाटत असते.

अलिकडे पाहिलेली कांही उदाहरणे:
एक वर्गमित्र अबु धाबीला काम करतो त्याने जाणीवपूर्वक मुलाला तिथल्या सी बी एस ई शाळेत बारावी करून अनिवासी कोट्यातून भारतात शासकीय अभियांत्रिकीला घातले. आता पुढे जर्मनी / अमेरिका…

दुसरा अमेरिकेत रहातो. त्याने आठवीपासून मुलाला भारतात पाठवले. अनिवासी कोट्यातून खासगी अभियांत्रिकी कॉलेजात भरपूर पैसे भरले . पुढच्या शिक्षणाला मात्र अमेरिकेत परत जाणार म्हणे. असे एकच उदाहरण पाहाण्यात आहे.

एकाने भरपूर ऑन साईट जाऊन आता पैसे जमवून माहिती तंत्रज्ञान विषयक व्यवसाय चालवला आहे. त्याने मुलाला इथे 'आय बी' करून थेट अनीमेशन शिकायला अमेरिकेस पाठवले. असे अजून दोन जण पालक बंगळूरू कार्यालयात माहितीत आहेत.
मुख्य कल भारतात पदवी आणि बाहेर पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा आहे, तरी हल्ली लवकर बाहेर पाठवण्याचा विचार होऊ लागलाय. त्यात नक्की काय चांगले? पैसा आहे म्हणून खर्च करायचा असा प्रकार आहे का?
नव्वदच्या दशकात अमेरिकादि देशांत गेलेल्या आणि आता पालक असलेल्या मंडळीना काय वाटते?

वरील प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हा काकू …
१. विविध देशांत फक्त पदवीपर्यंत शिक्षणाची माहिती इथे मिळावी. आपल्या परिचयात कुणी असं शिकायला गेलंय का?
२. अमेरिकेव्यतिरिक्त अजून कोणते देश अशा शिक्षणासाठी चांगले आहेत?
यामध्ये शिक्षण संपल्यावर तिथेच काम करण्याची आणि कदाचित नागरिकत्व/ साठीपर्यंत रहाण्याची मुभा कुठे असेल?
३. अभियांत्रिकी , तांत्रिक सोडून अजून कुठले अभ्यासक्रम चांगले आहेत ?
४. विविध देशांत पात्रता परीक्षा आणि भाषेच्या परीक्षा कुठल्या द्याव्या लागतात ?
५. परदेशात थेट व्यवस्थापनाला प्रवेश घेणे किती योग्य?

( कुशंका : बदलत्या जागतिक परिस्थितीत हे बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचे सगळे विचारच कालबाह्य किंवा आर्थिक नुकसानीचे होणार नाहीत ना?)

आयडीपी किंवा तत्सम संस्था यात मदत करतात पण त्यांच्या शाखा सगळ्या गावांत नसतात.
सरसकट माहिती न देता ते वेळ ठरवून भेटायला बोलावून प्रत्येकाला वेगळे मार्गदर्शन करतात. विविध शहरांत मेळावे आयोजित करतात. त्यासाठी तिकडची विद्यापीठे त्यांना आर्थिक मदत करतात आणि मेळाव्याला इथे येतात देखील.

दाड ही जर्मनीची सरकारी संस्था शिष्यवृत्ती अन बरेच कांही देते.

केनडा मध्ये शिकण्यासाठी हा दुवा

अजून माहिती, अनुभव, सावधानतेचे इशारे वगैरेंच्या प्रतीक्षेत …. !

- (जि. प. प्राथमिक शाळेत शिकलेला) खेडूत

प्रतिक्रिया

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

10 Jun 2016 - 1:21 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

माझ्या पहाण्यात तरी अशी उदाहरणं नाहीत,पदवीनंतर जर्मनी व युएसए वा ऑस्ट्रेलियात गेलेले अनेक मित्र आहेत.पण पदवीसाठी परदेशात पाठवने मला तरी अयोग्य वाटते.

गॅरी ट्रुमन's picture

11 Jun 2016 - 11:40 am | गॅरी ट्रुमन

मला वाटते की भारतातील शालेय शिक्षण चांगलेच आहे.पण दुर्दैवाने पदवी शिक्षणाच्या बाबतीत हीच गोष्ट लिहिता येणार नाही. सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कॉलेजे भारतात आहेत. उदाहरणार्थ इंजिनिअरींगमध्ये आय.आय.टी, एन.आय.टी इत्यादी, लॉ मध्ये नॅशनल लॉ स्कूल इत्यादी. पण देशातील कॉलेजांची संख्या आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अशा चांगल्या कॉलेजांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. पदवी शिक्षण हा खूप महत्वाचा टप्पा असतो. आणि अशा वेळी शिक्षणासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर मिळणे खूपच गरजेचे असते.

मी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील शिक्षणपध्दती बघितली आहे. अमेरिकेत मी पदवीचा विद्यार्थी नव्हतो तर पदव्युत्तर विद्यार्थी होतो पण पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी Teaching Assistant म्हणून दोन वर्षे होतो आणि त्यावरून त्या पध्दतीचीही बऱ्यापैकी माहिती मला झाली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. अमेरिकेत मी काही फार टॉपच्या विद्यापीठात नव्हतो तर एका मध्यम प्रतीच्या विद्यापीठात होतो. तरीही त्या विद्यापीठातील पदवी शिक्षणाचा दर्जा भारतातील माझ्या कॉलेजच्या दर्जाच्या नक्कीच कितीतरी चांगला होता हे नक्की. त्याविषयीची माझी काही निरीक्षणे:

१. अमेरिकन विद्यापीठांमध्ये नुसता घोकंपट्टीवर भर नसतो तर काहीतरी प्रोजेक्ट असतोच. भारतात डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट अनेकदा काहीतरी करायचा म्हणून केला जातो. तशी परिस्थिती तिथे नाही. माझ्या विद्यापीठातील undergraduate विद्यार्थ्यांनी सोलार कार बनवली होती. तसेच समरमध्ये बहुतांश विद्यार्थी इंटर्नशीप वगैरे करतात.त्याचा पुढे नोकरी मिळायला नक्कीच उपयोग होतो.

२. अमेरिकेत मध्यम प्रतीच्या विद्यापीठांमध्येही उत्कृष्ट संशोधन लॅब असतात. उदाहरणार्थ फ्लॉरीडातील माझ्या विद्यापीठात Advanced Aero Propulsion Laboratory, National High Magnetic Field Laboratory इत्यादी लॅब होत्या. या प्रयोगशाळांमध्ये मुख्यत्वे पी.एच.डी आणि एम.एस चे विद्यार्थी असले तरी चमक दाखविल्यास undergraduate विद्यार्थ्यांनाही संबंधित प्राध्यापक लॅबमध्ये घेतात. त्यातून खूप काही शिकायची संधी असते हे नक्कीच.

३. अमेरिकेतील विद्यापीठांच्या लायब्ररींना खरोखरच तोड नाही. मध्यम प्रतीच्या विद्यापीठामधील लायब्ररी सुध्दा प्रचंड समृध्द असतात.

४. विद्यापीठांमध्ये flexibility असल्यामुळे इतर विषयांवरील कोर्सेस घेणे किंवा आपला विषय सोडून दुसरा विषय आवडायला लागला तर आपले मेजरच बदलणे शक्य होते. अर्थात हे undergraduate पातळीवर सोपे आहे-- मास्टर्स डिग्रीला त्यामानाने कठिण आहे.

या गोष्टी लिहिल्या आहेत या साध्या विद्यापीठातील. हार्वर्ड, प्रिन्सटन, कॅलटेक, स्टॅनफर्ड, येल इत्यादी ठिकाणी जे काही काम चालते त्याला खरोखरच तोड नाही. माझ्या प्राध्यापक गाईडच्या दोन मुलींपैकी एक हार्वर्डमध्ये आणि दुसरी एम.आय.टी ला undergraduate ला होती. तिथे त्यांना शिकविणारे काही प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते होते. अशा गोष्टी भारतात आपल्या जीवनकाळात तरी बघायला मिळणे कठिण आहे.

हे मुद्दे शिक्षणाविषयीचे झाले. मला वाटते अगदी १८ व्या वर्षापासून परदेशी राहायचे इतरही अनेक intangible फायदे आहेत. एक तर स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी आपल्या जबाबदारीवर करायची सवय लागते. दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा. तसेच सगळ्या जगातून विद्यार्थी तिथे येत असतात त्यामुळे इतर देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलून इतर लोक कसे विचार करतात, कसे राहतात या गोष्टी शिकायला मिळतात. तसेच ऑन कॅम्पस पार्ट टाईम नोकरी करताना काही विद्यार्थ्यांना अगदी वॉशरूम साफ करायचीही कामे करावी लागतात. त्यातूनच पैसे मिळवायला किती घाम गाळावा लागतो हे त्यांना आपण होऊन समजून येते. त्यासाठी अन्य कोणी काही सांगायची गरज पडत नाही. या सगळ्या गोष्टी करता करता त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व नक्कीच विकसित होते यात अजिबात शंका नाही.

माणसाचा विकास हा comfort zone मध्ये कधीच होत नाही. त्या comfort zone मधून बाहेर पडायला परदेशातील शिक्षण अती उपयुक्त आहे. तेव्हा मला वाटते की जर परदेशात पदवीला जायची जरी संधी मिळाली तरी ती अजिबात सोडू नये.

दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या देशात प्रचंड संधी आहेत. पण त्या संधी बसल्या जागी कोणीच आणून देत नसते. तर त्या संधी मिळविण्यासाठी स्वत:हून धडपड करावी लागते, चार लोकांशी networking वाढवावे लागते. तसेच भारतात काही विद्यार्थी घुमे वगैरे असतात तसे अमेरिकेत राहून चालणारच नाही. विद्यार्थ्यांचे social skills तितकेच महत्वाचे आहेत आणि communication skills सुध्दा.

ये बात! अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षिला गेलेला पैलू.

चतुरंग's picture

11 Jun 2016 - 4:14 pm | चतुरंग

माझे दोन पैसे - मला स्वत:ला अमेरिकेतल्या शिक्षणाचा थेट अनुभव नाहीये परंतु इतरांशी बोलून बघून जे काही समजले आहे ते असे की इथली शिक्षणव्यवस्था रोखठोक आहे. तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आच किती आहे त्याप्रमाणे रिसोर्सेस मिळू शकतात, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही वर वर जाऊ शकता, शक्यतोवर अडथळे येत नाहीत. पाट्या टाकून फारसे काही हाताला लागण्याची शक्यता नाही.
संधींच्या बाबतीत वरती गॅरी भाऊ म्हणतात तसेच. संधी हुडकाव्या लागतात, पाठपुरावा करावा लागतो, स्वतःला सिद्ध करावं लागतं मग तुम्हाला चांगलं काहीतरी निश्चित मिळू शकतं.

इथे तुम्ही स्वतंत्र होता, स्वावलंबी होता हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणणं महाकठिण आहे. विशेषतः आपल्याकडच्या बर्‍यापैकी सुरक्षित कोषात वाढलेल्या मुलामुलींसाठी सगळ्या गोष्टी स्वावलंबनाने करणे हे महाकठिण होऊ शकते. १८ व्या वर्षी तुम्ही एक अ‍ॅडल्ट म्हणून इथल्या समाजात येता. तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे असतात. कोणी असे कर, तसे करु नकोस असे सांगेल असे नाही. तुम्ही विचारलेत तर सल्ला मिळू शकतो अन्यथा नाही. स्वयंपाक येणे, खाण्यापिण्याचे फालतू नखरे नसणे, शिस्त, वेळ पाळण्याची वृत्ती, मेहनत करण्याची तयारी असेल (संपूर्ण वर्षभर - फक्त परीक्षेच्या आधी दहा दिवस नव्हे :) ) आणि योग्य ती निर्णयक्षमता असेल तर यश नक्कीच मिळणार.
त्यामुळे मार्कांबरोबरच व्यक्तिमत्त्व किती विकसित करता येते आहे त्याप्रमाणे इथे रुळणे सोपे जाऊ शकते..

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट - कोर्स बदलण्याची मुभा असल्यामुळे पहिल्या वर्षी विद्यार्थ्याने जो कोर्स निवडला आहे त्यातच पुढे शिक्षण चालू ठेवेल असे बर्‍याचदा होत नाही. माझ्या बघण्यात एका उदाहरणात मेडीसीनला जायचे असे ठरवून दुसर्‍या वर्षी इंग्लिश लिटरेचर पक्के करुन त्या मुलीने पदवी पूर्ण केली! त्यामुळे अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

अशा प्रकारे पालकांना स्वप्नभंगाला तोंड द्यायला लागू शकते! :)

पालकांचे स्वप्न गेले खड्ड्यात ! कुणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे? पालकांच्या की पाल्यांच्या? खरे तर अमेरिकेतील पदवीपूर्ण शिक्षणपद्धतीत कोर्स बदलता येतो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे, असे मी म्हणतो. माझ्याही पाहण्यात अशी अनेक उदाहरणे आहकी, की सुरूवात एका हेतूने ('ध्येय' हा शब्द मुद्दम टाळला आहे, सतराव्या- अठराव्या वर्षी बव्हंताशी मुलामुलींना ध्येय वगैरे काही नसते) मुले तिथे गेली व नंतर दुसरेच कोर्सेस केले. त्यांपैकी कुणाचेही पुढे नुकसान झाले असल्याचे माझ्या पहाण्यात नाही. आणि मी पाहिलेल्या सर्वच केसेस, मी रहातो तेथल्या असल्याने, पालक ओपन माईंडेड होते, व असे काही होऊ शकेल ह्याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.

बाकी ट्रुमन ह्यांच्या प्रतिसादाशी संपूर्ण सहमत आहे.

त्यात उपरोध आहे! ":)" आहे ना राव!
आपल्याकडे बहुतेकदा पालकांची स्वप्ने मुलांना वाहण्यास भाग पाडले गेले असण्याची शक्यता असते...
असो, मुद्दा पूर्णच समजलेला असल्याने जास्ती लिहीत नाही.

प्रदीप's picture

12 Jun 2016 - 8:31 pm | प्रदीप

समजले.

खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष काही अंडरग्रॅड्चा फायदा नसला तरिही वाचायला आवडलं.

आपल्या इथे पण मुलं अनेक प्रोजेक्ट्स करत असतात. मटा पुरवणीत बरेचदा अशा बातम्या येत असतात. आणि काही कॉलेजेस तर फारशी ऐकलेली पण नसतात. मला वाटतं मुळात त्या मुलाना आवड असायला हवी. हल्ली इन्टर्नेट मुळे आवड असल्यास ज्ञान मिळवणे अवघड नाही.

आता मूळ प्रश्नाला जनरल उत्तर -

जाण्यासाठी खालील मुद्दे पण विचारात घ्यावेत.
१. त्या पाल्याला स्वतःलाच जायचे आहे का? - कारण आपल्याकडे शिक्षणाच्या बाबतीत फोर्स केला जातो. पालक आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादताना दिसत असतात. केवळ प्रवाह आहे म्हणुन पाठवु नये. मुलाची आवड लक्षात घ्यावी.
२. तो मानसिक दृष्ट्या कणखर आहे का? - तिथे घरच्याना, देशाला सोडुन एकटे राहायचे असते. आपण बारावी पर्यंत लाडावलेलं बाळ तिथे अनेक शारिरिक कष्टाना सामोरे जाणार असते. त्यासाठी ते तयार आहे का? निव्वळ यु. एस.चं आकर्षण तर नाही ना? हेही विचारात घेतले पाहिजे.
३. पालकांची आर्थिक तयारी आहे का? - अन्डरग्रॅड साठी शिष्यवृती नसते असे ऐकुन आहे. नक्की माहीत नाही. कदाचित असुही शकेल. पण नाही असे गृहित धरुन खर्चाचा अंदाज घ्यावा. कारण प्रश्न एका नाही तर चार वर्षांचा असणार आहे. सगळीकडे वाढणार्‍या महागाईचा आणि आपल्या रुपयाची होणारी घसरण याचाही विचार करावा.

हे मुद्दे कशाही प्रकारे नकारात्मक नसुन फक्त निर्णय घेताना प्रत्येक बाबीचा विचार केला जावा म्हणुन आहेत.
सर्व बाजुनी नीट विचार करुन योग्य निर्णय पाल़क घेतील ह्याची खात्री आहे.
त्याना खूप खूप शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 7:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

उत्तम माहितीपूर्ण प्रतिसाद !

समी's picture

11 Jun 2016 - 12:22 pm | समी

+१११११

धागा काढल्याबद्दल अनेक धन्यवाद.
परदेशी अंडरग्रॅड शिक्षणाबद्दल चांगले मुद्दे वर आले आहेत.याउलट काही सल्ले मला मिळाले आहेत.
१ परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
२ कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.
३ अंडरग्रॅड शिक्षणासाठी फारशी माहिती मिळत नाही.विशेषतः युनिव्हर्सिटी सिलेक्शन, शिष्यवृत्ती इ गोष्टी
४ मुलगा फक्त अठरा वर्षाचा असताना कसा लांब पाठवणार तू इतका! खरंच हा प्रश्न बरेच लोक विचारतात.तो होम सिक होईल, आजारी पडेल तर तुझ्याकडे अमेरिकन व्हिसा नाही.काय करशील अशा वेळी.मुलगा बघून घेईल हे उत्तर बरेचसे इतरांना पटत नाही.मग मलाही शंका यायला लागते!

मुळात अमेरिकेत अंडरग्रॅडला जाणे ही मुलाची इच्छा आहे.आम्हाला काय करावे हे कळत नाही याबाबतीत! तसा तो दहावीला ९५% सिबिएसईत मिळवलेला मुलगा आहे.पण जेईई, सिइटी आदि परीक्षांतून जाऊन निदान शासकिय इंजिनिअरींग काॅलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग काॅलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.मुलाला फक्त पदवी मिळेल ज्ञान नाही याचे नक्कीच वाईट वाटेल.म्हणून हा माहिती मिळवण्याचा खटाटोप करत आहोत.

कोणी सॅट परीक्षेबाबत तसेच अमेरिकेतील अंडरग्रॅड शिक्षणाबाबत लिहिल्यास फार उपयोगी होईल.

उल्का's picture

11 Jun 2016 - 4:00 pm | उल्का

Khan Academy

ऐकुन माहिती असेल ना?
नसल्यास, बघ ही लिंक.

परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.
हो महाग आहे. पीजीचा खर्च त्याने पैसे मिळवून करण्याबद्दल मुलाचे मत आजमावावे असे वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 7:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात करायची इच्छा असेल तर (खर्च सोसण्याची तयारी असल्यास) विचारपूर्वक निवडलेल्या त्याच (कदाचित् इतर पाश्चिमात्य) देशातील विद्यापिठात पदवी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते...

१. उत्तम शिक्षणपद्धती व व्यवसायाभिमुख शिक्षण.
२. पदवी करताना शिक्षणद्धती आणि जीवनपद्धतीची झालेली ओळख पदव्युत्तर शिक्षणात बरीच फायद्याची होते.

बाकि इतर मुद्दे इतरत्र आले आहेतच.

गॅरी ट्रुमन's picture

11 Jun 2016 - 9:26 pm | गॅरी ट्रुमन

परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग आहे.परत त्यानंतर पिजीचा खर्च आहे.

नक्कीच. Undergraduate ला स्कॉलरशीप बहुतेक नसतात त्यामुळे चार वर्षाचा खर्च एखाद कोटी पेक्षा जास्तही होऊ शकतो. आणि मधल्या काळात डॉलरचा दर वाढल्यास अजून जास्त. काही वेळा विद्यार्थ्यांना वेव्हर वगैरे मिळतात. त्यामुळे खर्च कमी होतो.

कुठल्याही देशातल्या अंडरग्रॅड डिग्रीमुळे शिक्षणात किंवा पुढे पिजीसाठी फरक पडत नाही.

नाही. कुठल्यातरी अबक कॉलेजमधून undergraduate केले तर पीजीसाठी चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळणे खूप कठिण असते. आज स्टॅनफर्डमध्ये भारतीय विद्यार्थी आहेत त्यापैकी ९५% IIT किंवा बिट्स पिलानी अशा संस्थांमधील असतात. अर्थातच स्टॅनफर्ड वगैरे विद्यापीठे सगळ्यांसाठी नाहीत.पण स्टॅनफर्डमध्ये प्रवेश मिळवेल तितकी क्षमता असलेला विद्यार्थी केवळ या कारणामुळे पीजीसाठी बर्‍याच खालच्या विद्यापीठात दिसला तर मात्र वाईट वाटेल.

निदान शासकिय इंजिनिअरींग कॉलेज तरी मिळावे असे वाटते.न मिळाल्यास आमच्या गावापासून पूर्ण नवी मुंबईपर्यंत दर स्टेशनवर एक इंजिनिअरींग कॉलेज आहे.पण त्यांच्या दर्जाबाबत साशंकता आहे.

नवी मुंबईतील दर स्टेशनवरील कॉलेजांचा दर्जा नक्कीच चांगला नाही.

ताई तुम्हाला दर्जाबाबत साशंकता वाटते मी खात्री देतो ही सर्व काॅलेज फालतु आहेत. शक्य तर मुलाला शासकिय काॅलेजमध्येच प्रवेश घेउदे. कराड, सांगली, अमरावती ही दूर व मुंबईकरांसाठी मागास गावे असली तरी तिथले शिक्षण व एकंदर वातावरण फारच उत्तम आहे. मुंबई, पुणे मिळाले तर प्रश्नच नाही.

सांगली चा विचार करावा, उत्तम दर्जा आहे.

धन्यवाद उल्का.लिंक उपयुक्त वाटते आहे.

पुस्तिकाही बरीच माहितीपूर्ण दिसते आहे. संपूर्ण वाचून बघायला हरकत नाही असे वाटते.

http://www.educationusa.info/pdf/study/english1.pdf

नगरीनिरंजन's picture

11 Jun 2016 - 7:09 pm | नगरीनिरंजन

दहा-वीस वर्षांपूर्वीचं अमेरिकन जॉबमार्केट आणि आताचं जॉबमार्केट ह्यात फरक पडलेला असणार. त्यामुळे लाखो रुपये खर्च करण्यापूर्वी स्वतःचा रिसर्च करणे आवश्यक आहे. किमान गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण केलंय अशा तीन-चार मुलांशीतरी संपर्क पाहिजे.
अमेरिका/युरोपमध्ये सध्या जिथे फार स्किल्सची गरज नाही अशी कामे आशियाई देशात पाठवली जातात. अगदी सिटीबँक, जेपीमॉर्गन पासून गुगल, फेसबुक, ॲपल व जॉनडीर वगैरे सारख्या कंपन्यांनी आशियाई देशांमध्ये मोठमोठी कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे परदेशातच राहायचे असल्यास हायली स्पेशलाईज्ड काम करण्याचे स्किल मिळवण्याची अपत्याची कुवत असेल तरच पाठवावे.
शिवाय युनिव्हर्सिटी/कॉलेजही चांगले असणे आवश्यक आहे. शिवाय शिक्षणाला व्हिजा मिळाला पण पुढे नोकरी करताना व्हिजा रिन्युअल न झाल्याने परत यावे लागल्याचीही उदाहरणे आहेत (असे प्रकार ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होतात जास्त नॉन-टेक्निकल क्षेत्रात).
बाकी भरमसाठ लोकसंख्या वाढतीये हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असूनही पोरांना जन्म द्यायचा आणि नंतर स्पर्धा नको म्हणायची प्रवृत्ती असलेले लोक कितपत स्वतःचा रिसर्च करु शकतील व भविष्यातल्या ट्रेंड्सचा अशांना कितपत अंदाज असेल ही शंकाच आहे.

चौथा कोनाडा's picture

11 Jun 2016 - 7:17 pm | चौथा कोनाडा

अगदी सही मुद्द मांडलाय ननि.
जॉब मार्केट मध्ये खुप फरक पडलाय
लेयर २, ३,४ ची कामे इथूनच आउटसोर्स होताहेत.
इथल्या या स्कील च्या लोकाना इथेच रहावे लागतेय. परदेशी संधी अत्यंत कमी झालायात.

सुबोध खरे's picture

11 Jun 2016 - 8:44 pm | सुबोध खरे

"माझ्या माहितीप्रमाणे" --अमेरिकेत शिक्षणाचा खर्च हा वर्षाला २५ लाख एवढी फी आहे आणी जाणे येणे राहणे आणी खाणे यात १० लाख म्हणजे दर वर्षी ३५ लाख रुपये खर्च होतात. अभियान्त्रिकी शिक्षणासाठी सव्वा कोटीच्या आसपास खर्च येतो. शिवाय पदवी करत असताना दुसरी नोकरी अधिकृतपणे करता येत नाही आणी शिष्यवृत्ती मिळण्याचे प्रमाण नगण्य आहे. एवढा खर्च करून तुम्हाला परत पदव्युत्तर शिक्षणासाठी SAT/ GRE द्यायलाच लागते.
त्यामुळे अमेरिकेचे स्वप्न आता अजून कठीण होते आहे असे वाटते.
भारतात SAT चे शिक्षण देणाऱ्या संस्था अशा तर्हेचे चित्र उभे करतात कि तुम्ही नुसते या आणी आम्ही तुम्हाला डॉलर्सच्या राशीवर उभे करतो. प्रत्यक्ष हे मृगजळच ठरते.
बबाबे ( बडे बाप के बेटे) यांसाठी ते ठीक आहे. मध्यमवर्गीय माणसासाठी हे फार महाग स्वप्न असू शकते. कारण एवढे करून आपले मुल तेथे जेमतेम बर्या परिस्थितीत राहत असेल तर एवढा प्रचंड खर्च करणे शहाणपणाचे आहे का? हा विचार करावा लागेल. कारण एके काळी(सन २०००) ५००० डॉलर्स महिना कमावणारा इंजिनियर मुलगा दर महा १००० डॉलर्स वाचवून दोन तीन वर्षे काम करून २० लाख रुपये वाचवत असे आणी हिरव्या कार्डाचे स्वप्नभंग झाले तरीही परत येऊन तेवढ्या पैशात मोठे घर घेऊ शकत असे. आज अमेरिकेत पगार तेवढेच आहेत आणी हिरवे कार्ड मिळवणे हे अजूनच कठीण होत चालले आहे
दुर्दैवाने भारतात महागाई मुळे २० लाखात फार काही चांगले घर येत नाही( मुंबईत तर चाळीतले घरसुद्धा येत नाही) कि आपल्याला धंदा करण्यासाठी भांडवल पण फारसे नाही.
ज्यांना हे स्वप्न पहायचे आहे त्यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहावे
कोण रे तो विचारतोय उघड्या डोळ्यांनी स्वप्न कसे पाहणार?

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2016 - 10:25 pm | टवाळ कार्टा

+१११११११

माझा मुलगा ज्या विद्यापिठात शिकतो तिथे अंडरग्रॅडसाठी बरेच भारतीय विद्यार्थी आहेत. बहुसंख्य विद्यार्थी खूप श्रीमंत घरातील आहेत. आईवडील गल्फमधे नोकरीला वगैरे किंवा भारतात व्यवसाय वगैरे. काहींच्या बाबतीत अमेरीकेत जन्म त्यामुळे अनिवासी कोट्यातून भरपूर फी भरुन भारतात शिक्षण घेण्याचा खर्च विचारात घेता अमेरीकेत अ‍ॅडमिशन मिळत आहे तर तिथे शिक्षण घेणे योग्य वाटले. यातील बर्‍याच जणांनी अमेरीकेत रहात असतानाच मुलाच्या इथल्या शिक्षणाच्या खर्चाची तरतुद करुन परतले.
अमेरीकेत पुढे नोकरी मिळेल आणि मग खर्च वसूल होईल असे गणित मांडणार असाल तर अंडरग्रॅडसाठी इथे येण्याचा विचार करू नये. खरोखर परवडणार असेल तरच विचार करावा. आपली रिटायरमेंट पणाला लावून अजिबात रिस्क घेवू नये. युनिवर्सिटीने रिक्रुट केले असेल्/स्कॉलरशिप दिली असेल तर गोष्ट वेगळी. अंडरग्रॅड इंटर्नशिपसाठी बरेचदा इथले सिटिझन / ग्रीनकार्ड नसेल तर विचार केला जात नाही. अपवाद- डोळ्यात भरेल अशी बौद्धिक कामगिरी. पुढेही नोकरीसाठी वर्क विसा लागणार असेल तर एकंदरीत परिस्थिती अनिश्चित! कंपन्यांमधे लेऑफ झाले तर त्यांना नियमानुसार वर्क विसे प्रोसेस करता येत नाहित. माझ्या मुलाच्या ओळखीच्या भारतीय विद्यार्थ्याला कंपनीने दिलेली ऑफर या कारणास्तव नुकतीच रद्द केली.

स्वाती२'s picture

11 Jun 2016 - 9:40 pm | स्वाती२

अमेरीकेत अंडरग्रॅड अ‍ॅडमिशनसाठी सॅट आणि टोफेल लागते. काही विद्यापिठात सॅट सबजेक्ट टेस्ट देखील लागते. हा अभ्यास क्लास न लावता घरी करणे सहज शक्य आहे.

प्रदीप साळुंखे's picture

11 Jun 2016 - 10:24 pm | प्रदीप साळुंखे

छान!!!
एकंदरीतच भारताला ब्राईट फ्युचर आहे तर!!!

अनुप ढेरे's picture

12 Jun 2016 - 12:23 pm | अनुप ढेरे

भारत माता की!

माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
भारतातल्या आजच्या शिक्षणाची पूर्ण कल्पना आहे म्हणूनच अन्य पर्याय विचारात घेतले.

दिलेले दुवे, माहिती उपयुक्त आहेत, आणि स्वतःचा अनुभव असलेले सभासद इथे आल्याने खूप आनंद वाटला.
आता असे निर्णय अधिक डोळसपणे घेता येतील. अद्याप इतर देशांतले असे अनुभव माहीत नाहीत.
इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.पण तिथली किंवा अन्य युरोपातली व्यवस्थापन पदवी अजूनही चांगली आणी जगभर चांगल्या संधी देऊ शकतात.

प्रदीप's picture

12 Jun 2016 - 8:35 pm | प्रदीप

इंग्लंड्ला तीनच वर्षे पदवी आणी एकच वर्ष पदव्युत्तर हे आकर्षक होते, पण आता काम करायला परवानगी नसल्याने तो पर्याय राहिला नाही.

यू. के.मधील शिक्षणव्यवस्थेत एकदा एक अभ्यासक्रम घेतल्यानंतर तो तसाच पूर्ण करावा लागतो, अमेरिकेत तो पहिल्या वर्षानंतर बदलण्याची मुभा असते, हाही फरक लक्षात घ्यावा.

अजया's picture

12 Jun 2016 - 11:52 am | अजया

+१००
अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद वाचायला मिळत आहेत.आम्हाला विचार करताना या धाग्याचा फार उपयोग होणार आहे.

जर मुलाला पाठवायचे नक्की केलेत तर खालील गोष्टी माहित असाव्यात म्हणून देत आहे. खास अशा पालकांसाठी एका परिचिताकडून मिळवलेली माहिती त्यांच्याच शब्दात देत आहे. बघा उपयोगी ठरते का ते...

१. विद्यापीठानुसार फी कमी जास्त होऊ शकते. तरीही कमीत कमी 15 व जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत वार्षिक खर्च येऊ शकतो.
जितका सॅट स्कोअर जास्त तितका खर्च कमी.
स्कोअर चांगला असल्यास कदाचित शिष्यवृत्ती मिळू शकते.
२. पहिले वर्ष कॅम्पस मधेच राहणे अनिवार्य असते. परिचितांकडे राहता येत नाही.
३. सर्वात महत्वाचे हे की ह्यासाठी एखादया कॉउंसेलर कडे जाणे. 35-40 हजार फी घेतली तरीही हातात व्हिसा मिळेपर्यंत सर्व बाबतीत मोलाचे मार्गदर्शन करतात. त्यांना ह्या क्षेत्राचा चांगलाच अनुभव असतो.
४. सॅट आणि टॉफएल साठी वेगळे मार्गदर्शम घेता येते. अर्थात त्यासाठी वेगळी फी आकारली जाते. पण ह्या दोन्ही परीक्षा देणे जरुरीचे असल्याने असा क्लास लावणे फायद्याचे ठरते.

कोणालाही ह्या माहितीचा फायदा झाल्यास मला आनंदच वाटेल. :)

ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर नक्की बाहेरच पाठवा. बिचार्‍या मुलांना हवे ते शिक्षण तरी घेता येईल. आरक्षण आड येणार नाही. पण आरक्षण असलेल्या कॅटेगरी मध्ये येत असाल तर भारतासारखा दुसरा देश नाही. दुसर्‍या देशात जायचा विचारही मनात आणू नका.

हेमन्त वाघे's picture

14 Jun 2016 - 10:52 am | हेमन्त वाघे

आणि ते ऎक दीड करोड रुपये कोठून आणायचे ?? कि अमेरिका ओपन लोकांना सर्व फी माफ करते ??

विजुभाऊ's picture

15 Jun 2016 - 8:48 pm | विजुभाऊ

हे करुन पुढे काय करायचे?
तुम्ही अमेरीकेत/ साऊथ अफ्रीकेत / सिंगापूर मधे शिकलाय म्हणून सहजासहजी नोकर्‍या उपलब्ध होत नाहीत.
परदेशी शिकून तेथेच स्थाईक व्हायचे असेल तर ठीक पण भारतात परत यायचे असेल तर नोकरीसाठी पुन्हा त्याच गर्दीत सामील व्हावे लागते.
इथे तुमच्या परदेशी डिग्री चा उपयोग होत नाही. काही वेळा तर परदेशात शिकलेले कोर्सेस/डिग्री इथे मान्य असेलच असे नाही. परदेशी कॉलेजेस/ युनिव्हर्सिटीज सगळ्याच चांगल्या असतात असे नाही. खूपदा फसवणूक होण्याची शक्यता असते.
अक्षरशः एका खोलीत असलेलेही कोलेजेस आहेत असे ऐकून आहे.

अर्थातच स्थायिक होण्यासाठी जायचे. (पैसा खर्च करायची तयारी असेल तर चांगल्या विद्यापीठात जायलाच हवे.)
अपवादात्मक परिस्थितीत कांही क्षेत्रात किंवा कांही काळ परत यायला हरकत नाही.
अनुभवानंतर व्यवसायाची संधी तर भारतातही मिळूच शकेल, शिवाय तिकडून गुंतवणूकदार आणणेही शक्य होईल.
तसेच कुठल्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यावर अन्य कुठे कुठे जाता येईल याचाही विचार व्हावा.

बाकी विद्यापीठे चांगलीच असायला हवीत हे खरंच, ते सध्या तिथे असलेल्या मंडळींकडून माहीत करून घ्यावे लागेल.
मागे पाचेक वर्षांपूर्वी तुमच्या तिथे वेम्बलीमधे कुणा पंजाब्याने एम बी ए साठी प्रत्येकी १५ लाख घेतले आणि मुलांना वार्‍यावर सोडले.मग एका मराठी उद्योजकाने ते कॉलेज चालवायला घेऊन मुलांना आधार दिला असं वाचलं होतं.