आंबा इडली

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
8 Jun 2016 - 9:39 am

मिपावर आंबा पाककलाकृतींचा बराच पूर आलाय त्यात माझी ही एक लाट..हमखास यशस्वी कालाकृती.

सगळी भाचरुंडं लहान असताना रत्नागिरीला माहेरी गेलं की,न्याहारी ,जेवणात काहीतरी नवं करावं लागायचं.त्याआधी एक ट्रिप आजोळी गुहागरला व्हायचीच.तिथे आंबे महामूर.येताना आंब्या-फणसाची भेट ठरलेलीच. अजूनही माझ्याकडे आजोळाहून आंब्याची पेटी येतेच,गेले तरी आणि नाही गेले तरी.

भाचरुंडं माझ्या घरी आली कि मी माहेरी गेले कि माझा खवय्या भाचा मेन्यूकार्ड तयार करत असे,त्यात,सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यांचे बेत ठरवलेले असत. कधी मला हवे ते बनवण्याची सूटअसे.नेहमी तेच खायला मुलांना अगदी आवडत नाही.तोच पदार्थ रूप बदलून पुढे ठेवला की,त्याचा चट्टामट्टा झालाच म्हणून समजा.

नेहमीच्या सांदणाचे नवे रूप म्हणजे ही इडली.तिथे खोबऱ्याचीची रेलचेल,कारण नारळ घरचेच. नारळाचे खोबरे आणि नारळाचे दूध वापरून तिथे भरपूर प्रयोग स्वयंपाकघरात केले जायचे,त्यातलाच हा हातखंडा प्रयोग.दर हंगामाला एका दोनदा होणारच.आता पुढच्या पिढीतही ही सिद्ध झालेली पाककृती संक्रमित झाली आहे.(आयते खायची सोय.)
साहित्य:-
१. एक वाटी आमरस.
२. एक वाटी दही.
३. एक वाटी रवा.(तांदूळ आणि गहू मिसळून घेतला तरी चालतं.)
४. एक वाटी साखर.
५. अर्धी वाटी दूध.
६. अर्धी वाटी ओले खोबरे.
७. एक चहाचा चमचा खायचा सोडा.(ऐच्छिक.दही आंबट असेल तर गरज नाही.)
८. पाव वाटी तूप.
९. नारळाचे घट्ट दूध लागेल तसे.तसेच किंवा साखर किंवा गूळ घालून गोड केलेले.(माझी आवड तसेच)
कृती :-
१. अनुक्रमांक एक ते सहापर्यतचे साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढावे.
२. त्यात खायचा सोडा मिसळून(हवा असला तर) तूप लावलेल्या इडलीपात्रात घालून नेहमीप्रमाणेच इडल्या उकडाव्या.
३. नारळाच्या दुधासोबत वाढाव्यात.

.

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 9:52 am | किसन शिंदे

अरे देवा!!!

जेपी's picture

8 Jun 2016 - 9:59 am | जेपी

+11

सविता००१'s picture

8 Jun 2016 - 10:01 am | सविता००१

सकाळी सकाळी अन्याय आहे इतका सुंदर पदार्थ फक्त पहायचा म्हणजे.

पियुशा's picture

8 Jun 2016 - 10:03 am | पियुशा

लय भारी !!!

नीलमोहर's picture

8 Jun 2016 - 10:25 am | नीलमोहर

भारी पाकॄ आहे, फक्त त्याची इडली करणे नको वाटतेय, शिरा किंवा खांडवी टाईप काहीतरी करून पहावा लागेल.

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 12:04 pm | किसन शिंदे

शिरा ठीकाय एकवेळ, पण इडली!?

कविता१९७८'s picture

8 Jun 2016 - 10:52 am | कविता१९७८

मस्त

उल्का's picture

8 Jun 2016 - 11:07 am | उल्का

सुरंगीताई आंबा पाकृ महोत्सवात आम्हाला साथ दिल्याबद्दल प्रथम तुझे अभिनंदन! :D
पाकृ खूपच मस्त दिसतेय.
कधी कल्पनेत पण आंबा इडली सुचली नव्हती.
वाह वाह!

अजया's picture

8 Jun 2016 - 11:59 am | अजया

मस्त दिसतोय फोटो.
पण आंबा आमरस किंवा फारतर शिरा सोडून कशासाठी वापरावा वाटतच नाही.उगाच राजा प्रजेचे कपडे घालुन फिरल्याचा फिल येतो ;)

सस्नेह's picture

8 Jun 2016 - 12:05 pm | सस्नेह

राजा प्रजेचे कपडे घालुन फिरल्याचा फिल येतो

अगदी अगदी !
आंब्याचे आमरस आणि आईस्क्रीम याशिवाय इतर कोणत्याही पदार्थात अस्तित्व 'रुची'त नाही. अगदी शिऱ्यातसुद्धा, असे आण्भविक मत आहे.

प्रीत-मोहर's picture

8 Jun 2016 - 12:08 pm | प्रीत-मोहर

पण आंबा सांदण यम्म लागते. आजच केलेय आणि आईने :)

ते काय असतं ? टाक ना रेसिपी. आंबा महोत्सव चालू आहेच.

sandan

हे आम्ही फारा वर्षांपूर्वी केलेलं सांदणं!!

कृती आठवत असलेली येणेप्रमाणे: एक वाटी तांदूळ भरड दळून घेणे. पातेलीत कोरडेच अगदी वरचेवर परतणे, त्यानंतर त्यात पाणी ओतणे. पाचेक मिनीटांनी पाणी वेळून काढून त्यात एक वाटी आंब्याचा रस आणि एक वाटी साखर घालून मिसळून तासभर ठेवणे. नंतर वाफवून नारळाचे दूध, साजूक तूप इत्यादिंसोबत खाणे.

स्रुजा's picture

8 Jun 2016 - 8:19 pm | स्रुजा

वेळुन काढणे म्हणजे काय?

प्रीत-मोहर's picture

8 Jun 2016 - 8:51 pm | प्रीत-मोहर

पाणी गाळुन काढणे. म्हणजे शब्दशः गाळण्यातुन नाही. तोपावर स्वच्छ भातवाळणं(भात वाळायच फडकं) बांधुन तोप कलता धरायचा की त्यातलं पाणी निघतं

सूड's picture

9 Jun 2016 - 11:02 am | सूड

+१

पिलीयन रायडर's picture

9 Jun 2016 - 8:53 pm | पिलीयन रायडर

काय? भात वाळवायचं फडकं??

मला वाटायचं वेळुन काढणे म्हणजे पाण्यात समजा मटकी भिजवली असेल तर आपण पाण्यातुन हात गोल फिरवुन ती बाहेर काढतो त्याला वेळणे म्हणतात.

ओ तै गरम गरम वाफाळत्या पेजभ-या भातात हात घालून भात वेगळा करायची हिंमत कुणात आहे हो. :p

स्रुजा's picture

9 Jun 2016 - 9:56 pm | स्रुजा

बर्र !! धन्यवाद :)

नन्दादीप's picture

8 Jun 2016 - 12:42 pm | नन्दादीप

आपल्याला ब्वॉ आंब्याचे सांजण आवडते.. ते पण ईडली सारखेच असते. दाक्षिणात्य ईडली ला कोकणी पर्याय - सांजण..मग ते फणसाचे असूदे की आंब्याचे...

पद्मावति's picture

8 Jun 2016 - 1:53 pm | पद्मावति

सही!!

हटके रेशिपी!! यावेळी आलेले आंब्याचे मेनु बघता ब्रेकफास्ट ते डिनर निव्वळ आंब्याच्या पदार्थांचं करता येणं शक्य आहे.

सूड's picture

8 Jun 2016 - 2:09 pm | सूड

हो, ते वीकांंताला करुन बघेन राह्यलं. हल्ली तसं नाही लिहीलं तर मिपासमाज आपल्याला स्वीकारेल का हा प्रश्न पडतो.

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 2:21 pm | किसन शिंदे

=))

पैसा's picture

8 Jun 2016 - 2:24 pm | पैसा

इडली म्हणा की सांदण म्हणा!

दिपक.कुवेत's picture

8 Jun 2016 - 2:35 pm | दिपक.कुवेत

ईडली??? आज मिपा धन्य झाले!!!

विशाखा राऊत's picture

8 Jun 2016 - 3:20 pm | विशाखा राऊत

इडली / सांदण मस्तच दिसते आहे.

इशा१२३'s picture

8 Jun 2016 - 7:47 pm | इशा१२३

मस्त दिसतेय!

दिसतीये छान. सांदण म्हणुन करुन पाहेन :)

भारीये! एकदम मस्त आयडिया. आंब्याच्या मोसमात करून पाहीन.

अनन्न्या's picture

9 Jun 2016 - 5:45 pm | अनन्न्या

अजून आहेत रेसिपी त्या आता पुढच्या वर्षीच्या महोत्सवात!!

पिलीयन रायडर's picture

9 Jun 2016 - 8:54 pm | पिलीयन रायडर

वेगळीच रेसेपी..!! आवड्ली! तू खाऊ घाल!

निवेदिता-ताई's picture

24 Jun 2016 - 8:22 am | निवेदिता-ताई

खुप छान