'बाबूजी' म्हणजे सुधीर फडके हा साक्षात्कार मला साधारण वयाच्या सातव्या - आठव्या वर्षी झाला. शब्दकोडे सोडवताना प्रश्न होता,''गीत-रामायणाचे संगीतकार''. दादा काकांना विचारलं तर ते म्हणाले, '' सुधीर फडके''. मी म्हणालो, '' तीन अक्षरी शब्द आहे आणि तिसरं अक्षर जी आहे''. काका म्हणाले, '' बाबूजी''. प्रत्येक सर्वसामान्य मराठी कुटुंबाप्रमाणे आमच्याकडेहि सगळे बाबूजीभक्त होते. मी त्यांचं ऐकलेलं पहिलं गाणं म्हणजे ''विठू माउली तू माउली जगाची.....''. नंतर नंतर रविवारचे चित्रगीत आणी मराठी चित्रपट पहायला लागल्यावर मला जवळ जवळ ८० टक्के गाणी बाबूजींचीच दिसली. देहाची तिजोरी, नित्य वाचे प्रभूनाम, गौरिहरा दीनानाथा,कानडा राजा पंढरिचा, समधी साधन, तोच चन्द्रमा नभात, एकाच या जन्मी जणू इत्यादी गाणी नियामित कानावर पडत रहिली.
कॉलेजचे दिवस सम्पल्यावर तात्या अभ्यंकर ह्या मझ्या मित्राच्या हौशी गायन बैठकींना जाउ लागलो. त्यांतच बबूजींचे निधन झाले व नंतर गीत रामायणाचा सुवर्णमहोत्सव जवळ आला. तेव्हा सुद्धा मला फक्त ''स्वये श्री रामप्रभू..'' हेच गाणं माहित होते. एक दिवस अचानक, यमन रागावर बोलताना तात्या ''दैवजात दुःखे भरता...'' बद्दल बोलू लागला. त्यानंतर त्याने ''तात गेले माय गेली'' मधला पूरिया धनाश्री दाखवला. लगेचच ''येणार नाथ आता'' मधला भिमपलास बाहेर आला आणि मी मनाशी पक्कं केलं की बाबूजी नावाच्या रसायनाचा सखोल अभ्यास करायचा.
त्यातच मला माझ्या सासूबाईंकडून ''जगाच्या पाठीवर'' ची प्रत वाचायला मिळाली. त्यावर कळस म्हणून की काय, ''नक्षत्रांचे देणे'' चा त्या आठवड्यातला भाग बाबूजींवरच होता. 'जगाच्या पाठीवर' वाचून मी सुन्न झालो. स्वतःच्या आयुष्याचे इतके तटःस्थ आणि प्रामाणिक कथन करायला, तो माणूस हि तेवढाच मोठा असावा लागतो आणि बाबूजी तसे होते. त्यानंतर सावरकर चित्रपटाची सी.डी. निघाली. लगेच मी ती विकत घेतली आणि बघितली. पण तो चित्रपट बघून माझं मन जेवढं हेलावलं, त्याच्या कितीतरी पटीनी , बाबूजींच्या आवाजातलं ''सागरा प्राण तळमळ्ला...'' ऐकून मी स्तिमित झालो. तात्यारावांच्या शब्दांची प्रगल्भता आणि बाबूजींच्या स्वरांची आर्तता ह्यांच्या अद्भुत संगमाने घडलेली कलाकृती म्हणजे ते गाणं. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की, मंगेशकरांच्या 'सागरा..' शी तुलना करण्याचा हेतू इथे मुळीच नाही आहे. पण एक श्रोता म्हणून असं वाटतं की, बाबूजींची चाल ही, हे गीत लिहितानाचि तात्यारावांची परिस्थिती आणि भावना, अचूक दाखवते.
त्याच महिन्यात मला गीतरामायण.कॉम बद्द्ल कळले. मला त्याच्या सीडिज सुद्धा मिळाल्या. आणि मला कळलं की काहीतरी अद्भूत आणि अनमोल असं मला मिळालं आहे आणि ते जतन केलेच पहिजे.
तेव्हाच मी सुधीरफडके.कॉम बद्दल स्मिता मनोहर, महेश गोरे आणि तात्या अभ्यंकर यांचेकडे बोललो. महेश व तात्या लगेचच श्रीधर फडके व त्यांची कन्या प्रद्न्या हिच्याशी बोलले. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर काय? काम चालू.....
२९ जुलै रोजी बाबूजींचा स्मृतिदिन. त्याचे औचित्य साधून ही वेबसाइट सुरू करावयाची इच्छा आहे . बाबूजींच्या आठवणींचा अनमोल ठेवा माहिती महाजालाच्या माध्यमतून पुढ्च्या पिढ्यांसाठी जतन करणे हाच ह्या साइट मागचा उद्देश आहे. त्यासाठी वेबडिझायनरची गरज आहे जो लवकरात लवकर हे काम करायला मदत करेल. तॊ बाबूजीभक्त असेल तर उत्तमच.
माझी ताई शास्त्रीय संगीत गाते. तिच्याकडचा आणि माझ्याकडचा संगीत संग्रह पाहून वाटतं की विसाव्या शतकात जी काही कलाकार मंडळी होऊन गेली ती पुन्हा होणे नाही. आणि माझी पिढी त्या कलेचा आस्वाद प्रत्यक्ष घेऊ शकली नाही हे दुर्दैव.
पोटतिडकीने गाणं गाणं म्हणजे नक्की काय, हे मला बाबूजींचं गाणं ऐकल्यावर कळलं. आणि ते तसं का गाऊ शकले ते 'जगाच्या पाठीवर' वाचल्यावर कळले. एक गायक आणि संगीतकार सोडला तर बाबूजींसारख्या हिऱ्याचे इतरही अनेक पैलू मला ह्या अभ्यासात दिसून आले.
पांडुरंगाची भजने व अभंग गाणारे बाबूजी मला संत तुकाराम, द्न्यानेश्वर, चोखा मेळा, एकनाथ, नामदेव ह्या सगळ्यांच्या भक्तिभावाचे वेग-वेगळे आणि उत्कट दर्शन घडवतात. 'ऊठ पांडुरंगा आता...' ह्या 'दाम करी काम' चित्रपटातील गीतात, सुरूवातीला, बाबुजी '' पांडुरंगा!! तुला का इथे नाही जागा?'' असा प्रश्न देवाला विचारतात तेव्हा डोळ्यासमोर एका साध्या भोळ्या विठ्ठलभक्ताचे चित्र क्षणांत उभे रहाते. तेच बाबूजी जेव्हा ''माना मानव वा परमेश्वर...'' म्हणतात तेव्हा ते एका झटक्यात श्रीक्रुष्णाचे दर्शन घडवतात..
''जे वेड मजला लागले..'' मधे प्रथम प्रेमात पडलेला प्रेमी दाखवताना, तेच बाबूजी 'प्रिया आज माझी, नसे साथ द्याया' मधला प्रेमभंगही तितक्याच ताकदिने दाखवतात आणि 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली...' मधे तोडी रागाचा अप्रतीम वापर करून हेच बाबूजी, केलेल्या चुकांची उजळणी करणाऱ्या नायकाचे एक हृदयद्रावक चित्र उभे करतात.
ह्या सगळ्यावर कळस चढतो तो गीतरामायणात. त्यांतली गाणी तर सोडाच, पण मधल्या निवेदनातसुद्धा त्यांनी इतका जीव ओतला आहे के वर्षानुवर्षे अभ्यास करूनसुद्धा ते कोणा व्यावसयिक निवेदकाला जमेल असं वाटत नाही. कुश-लवांच्या गाण्याचे वर्णन करणारा आश्चर्यचकित सूत्रधार, वेलीवरची फुले पाहूनसुद्धा हळवी होणारी अपत्यसुखवंचित कौसल्या, कौसल्येची उदास मुद्रा ना पाहवल्याने तिला समजवणारा दशरथ, श्रीविष्णूच्या आद्न्येने दशरथाला पायस देणारा अग्नीदेव, रामजन्माचे दिलखुलास वर्णन करणारे अयोध्यावासी,रामाच्या बाललीलांचा आनंद घेणारी कौसल्या, रामाच्या सामर्थ्याची दशरथाला ओळख पटवणारे विश्वामित्र, त्राटिकावधाची आद्न्या देणारे गुरू विश्वामित्र, सीता स्वयंवराचे मनसोक्त वर्णन कर्णारे मिथिलेचे भाक आणि चारण, रामासाठी वनवास मागणारी कैकै, त्यामुळे प्रचंड धाक्का बसलेले दशरथ व कौसल्या, ह्या निर्णयावर क्रुद्ध झालेला लक्ष्मण,दुःखी सीता, दुःखसागरात बुडालेली अयोध्येची जनता, अहल्या, शबरी, हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, वाली, अंगद, गुरु वाल्मिकी आणि स्वतः मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, ही सगळी मंडळी एकट्या बाबूजींच्या गळ्यातून बाहेर आली आहेत आणि प्रत्येक गाण्याला बाबुजींनी आवाजात जो फरक आणला आहे त्यातून ती व्यक्तिरेखा आपल्याला जाणवते. हे फक्त आणि फक्त तेच करू शकतात.
मोहन रानडे व मास्कारेन्हांस ह्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधानांपर्यंत जाणारे आपले बाबूजी, देश स्वतंत्र झाला तरी दमण-सिल्वास-गोवा पारतंत्र्यात आहे हे बघून प्रसंगी हातात पिस्तूल सुद्धा घेऊ शकतात. तेच बाबूजी, सावरकर चित्रपटाच्या चित्रिकरणात वापरलेल्या कबुतरांच्या देखिल जेवणा खाणाची स्वतः जातीने दखल घेतात.
बाबूजींच्या आठवणी गोळा करताना मला त्यांची किती रूपं दिसली म्हणून सांगू. महारष्ट्रात राहून मराठी न बोलणाऱ्या टॅक्सीवाल्याशी भांडणारे बाबूजी, अरूणाचल प्रदेशा मधल्या एका गरीब मुलाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालनपोषण करतात काय, आणि तो मोठा झाल्यावर, मोहात न पडता त्याला त्याच्या प्रांताच्या विकासाचे व्रत देउन परत काय पाठवतात, सगळंच अजब.
एकेकाळी ज्या फुटपाथवर झोपून बाबूजींनी रात्री काढ्ल्या, त्याच्याच समोरच्या फुटपाथवरील थेटरात त्यांच्या चित्रपटाची जुबिली होते आणि त्यांचं नाव मुख्य अतिथिंमधे असतं हे फक्त परदेशांत सिंड्रेलाच्या गोष्टीत होतं आणि इथे आमच्या बाबूजींच्या बाबतीत होतं.
शून्यापासून अनंतापर्यंत बाबूजींचा हा जो प्रवास आहे, तो ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जास्तित जास्त लोकांसमोर यावा आणि पुढ्च्या पिढीसाठी एक अनमोल ठेवा तयार व्हावा हाच आमचा अल्पसा प्रयत्न आहे.
देवपूजा केल्यावर जसं आपण "आवाहनं न जानामी ....." म्हणतो , तसच इथे मी म्हणू इच्छितो की, मी कोणी लेखक नाही. पण माझ्या अल्पमतीला जे रुचले आणि मला बाबूजी जसे भावले, त्यानुसार मी ही प्रस्तावना लिहिली आहे.
इच्छुकांनी मला Mandar.Dharap@unilever.com वर मेल करावा अथवा ९३२२०१२४१४ / ०२२-२५४००४५५ वर संपर्क साधावा.
मंदार धारप
प्रतिक्रिया
21 Sep 2008 - 6:53 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
लिखाण आवड्ले. लिहित रहा.
इथे कोणी बुकर बक्षिसासाठी लिहित नाही.
वि.प्र.
21 Sep 2008 - 10:12 pm | गणा मास्तर
चांगला उपक्रम आहे, शुभेच्छा !!!
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
22 Sep 2008 - 12:01 am | प्राजु
पोटतिडकीने लिहिणं... हे ज्याला म्हणतात ना तेच तुमच्या लेखनातून जाणवलं..
मी तुम्हाला लागेल ती मदत करायला तयार आहे. मी कोणी वेब डिझायनर नाही पण तरिही बाकी इतर बाबतीत आपल्याल कही मदत लागली तर हक्काने सांगा.
बाबूजी हे एक संगित क्षेत्रातलं सुंदर स्वप्न आहे....
तुमच्या लेखनातून तुमच्यातल्या बाबूंजींच्याबद्दल असलेल्या प्रेम आणि आदराचे जे दर्शन घडले ते मी वर्णू शकत नाही.
माझ्या या उपक्रमास शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 9:10 am | मंदार धारप
आपला ई-मेल आयडी कळला तर मला आपली मदत घ्यायला आवडेल.
22 Sep 2008 - 12:28 am | विसोबा खेचर
मंदार,
सुंदर लिहिलं आहेस रे..
जियो...!
महारष्ट्रात राहून मराठी न बोलणाऱ्या टॅक्सीवाल्याशी भांडणारे बाबूजी,
ह्या संदर्भातली एक आठवण इथे वाचता येईल. मी स्वत: हा अनुभव घेतला आहे! :)
अरूणाचल प्रदेशा मधल्या एका गरीब मुलाचे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालनपोषण करतात काय, आणि तो मोठा झाल्यावर, मोहात न पडता त्याला त्याच्या प्रांताच्या विकासाचे व्रत देउन परत काय पाठवतात, सगळंच अजब.
त्या मुलाचं नांव दिपक. त्याला मी दिपकमामा असं संबोधतो. एकदम मस्त अन् रॉयल मनुष्य आहे हा! :)
बाबूजीं आणि ललितामावशी यांनी पोटच्या पोराप्रमाणे त्याला लहानाचा मोठा केला याची दिपकमामाला खूप जाण आहे. आज दिपकमामा अरुणाचल प्रदेशात एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहे.
असो,
बाबूजींच्या पायाशी बसून चार गोष्टी शिकायला मिळाल्या हे आमचं भाग्य!
आपला,
(बाबूजीभक्त) तात्या.
22 Sep 2008 - 2:48 am | नंदन
उपक्रम. भावी संकेतस्थळाला मनःपूर्वक शुभेच्छा.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी