टोचणी-२ (अंडरटेकर)

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
20 Sep 2008 - 4:43 pm
गाभा: 

टोचणी १ अर्धवट होता. तेव्हा पुर्ण करायला धीर झाला नाही. आज तो पुर्ण करत आहे.
मला पायलट व्हायचे होते. ९वी १०वी व ११वी त सुट्टीत काम करुन ऍड्मिशनचे सुरुवातीचे पैसे जमा केले होते. त्यात ११वी च्या घशघशीत स्कॉलरशीप चा समावेश होता. आई गेली आणि स्वप्न कोमेजले.
आई २ एप्रिल १९७२ ला पहाटे गेली. वडिलांच्या मांडीवर प्राण सोड्ले गीता वाचता वाचता. वडिल गेले बरोबर १२ वर्षांनी २ एप्रिलला बरोबर त्याच वेळी. आम्ही भावंडे हा योगायोग मानत नाही.
जाणकारानी प्रकाश टाकावा.
आई गेल्याचा निरोप आला स़काळी ७ वाजता. मी झोपेत होतो. हॉस्पिटलला पोचेपर्यंत ती सिरियस आहे एव्ढेच मला सांगण्यात आले होते. आईने आदल्यादिवशी काही सुचना दिल्या होत्या वडिलांना . त्यात हातातल्या पाटल्या माझ्या बायकोकरता न मोडता आहेत तशा घालाव्यात अशी इच्छा होती. किडनी फेल्युअरने हाताला प्रचंड सुज आली होती. पाट्ल्या काही निघेनात. दुर्धर प्रसंग ओढ्वला. ३ तासाच्या प्रयत्नानंतर पाट्ल्या निघाल्या. मामा आयुष्यात प्रथमच ओक्साबोक्क्शी रडला. सर्व सोपस्कार होइपर्यंत दुपारचे १२ वाजले. शववाहिनी आली. मला गेट वर उभे करुन सगळी शिवा़जी पार्क ला रवाना झाले. माझ्यावर अंडरटेकरला स्मशानात आणायची जबाबदारी आली.
सकाळ्पासुन पाण्याचा थेंब नाही. एप्रिल च्या उन्हात जीव कासाविस झाला. सुर्याजी राव चागलेच पिसाळ्लेले होते. नेमकी हॉटेल पण बंद कसल्याशा संपाने. बाजुला नारळ पाणी वाला दिसला. नाइलाजाने एक नारळ घेतला. वाटलं पाणी तरी प्यावे. घोट घेतल्यावर जरा बरे वाटले. सवयीने त्या केरळियाने खोबरे काढुन दिले. आणि ते मी खायला सुरु केले प्रतिक्षिप्त क्रियेने. अर्धवट खाल्ले न खाल्ले तितक्यात खांद्यावर हात आणि मस्तकात बंदुकीची गोळी. " काय, आई गेल्याची पार्टी चालली आहे वाट्ते? मागे बघतो तर अंडरटेकर उभा. स्मशानात सुद्धा सोड्ल नाही ***व्याने.
अंडरटेकरच्या टुम्ब स्टोनची जखम ३६ वर्षे बाळगली. टोचणी १ ने दुर झाली.
जायच्या आधी ४ दिवस आईने पुढ्च्या वाटचालीची विचारणा केली होती माझ्याकडे. मी पायलट होणार असे सांगितल्यावर खिन्नसे हसुन म्हणाली, " बाबु, तू पायलट होशील ह्यात शंकाच नाही. पण वेगळ्या प्रकारचा. तेंव्हा कळले नाही. आज बोर्डावर चढल्यावर मुलांशी बोलताना त्याचा अर्थ कळतो.
जाता जाता : अंडरटेकर = कुस्ती पैलवान, मर्तिक स्पेशालिस्ट
टूम्ब स्टोन = पैलवानाचा शेवट चा विजयी पेच

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

20 Sep 2008 - 6:27 pm | अभिज्ञ

वि.प्र.जी,
मन हेलावून टाकणारी टोचणी.

अभिज्ञ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2008 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा प्रसंगात तहान-भूक कसलेच भान राहात नाही. बरं ! नारळ पाणी पिलं तर पिलं, त्यातलं खोबरं खायची इच्छा झाली, म्हणजे तुम्हीही जरा कळसच केला ना राव !!! आता झालं ते झालं, त्यात आपला काहीही दोष नाही. तेव्हा ही टोचणी काढून टाका.

आनंद's picture

20 Sep 2008 - 7:27 pm | आनंद

मला वाटतय ही च खरी टोचणी होती. तुम्हीच उत्तर दिलय, त्या प्रमाणे ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती.
अश्या वेळेला डोक्यात वेगळेच विचार चालू असल्या मुळे खोबर्‍या साठी हात पुढे जाणे स्वाभाविकच आहे.
अजुन काही टोचण्या नाहीत ना एकदाच टोचुन टाका (ह.घ्या.)

विनायक प्रभू's picture

20 Sep 2008 - 9:43 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
हे ह. घ्या म्हण्जे काय? सागा बाबा एकदाचे
वि.प्र.

गणा मास्तर's picture

20 Sep 2008 - 10:33 pm | गणा मास्तर

ह घ्या म्हणजे हळु घ्या
आनंदशी १००% सहमत
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

वेलदोडा's picture

22 Sep 2008 - 1:09 pm | वेलदोडा

खोबरे खाण्याचा तुमचा हेतू नक्किच पार्टी करण्याचा नव्हता. जे झाले ते भुकेल्या पोटी झाले. त्यामुळे आईवरील प्रेम तर कमी झाले नाही ना. टोचून बोलणार्‍याच्या कडवट बोलाकडे दुर्लक्ष केले असते किंवा त्याला एकदाच ठणकावून आपल्या हेतूबद्द्ल वा कृतीबद्द्ल सांगितले असते म्हणजे आयुष्य भराची टोचणी लागली नसती.

बाकी ह.घ्या म्हणजे टेक इट लाईटली - हलकेच घ्या

सखाराम_गटणे™'s picture

22 Sep 2008 - 1:43 pm | सखाराम_गटणे™

>>त्याला एकदाच ठणकावून आपल्या हेतूबद्द्ल वा कृतीबद्द्ल सांगितले असते म्हणजे आयुष्य भराची टोचणी लागली नसती.

काही फायदा नाही, असल्या लोकांना जोडे मारले तरी काही फायदा नाही.
सवयीचा परीणाम

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

मीनल's picture

20 Sep 2008 - 9:03 pm | मीनल

ब-याचदा आपण कळत नकळत काहीतरी बोलून ,वागून जातो.
समोरचा माणूस कदाचित विसरून ही जात असेल .
पण आपण कालांतराने सूज्ञपणे विचार करतो आणि आपली चूक आपल्याला समजते.
आपलच मन आपल्याला टोचायला लागतं.
कधी तरी तर रक्त बंबाळ होईपर्यंत टोचत.

म्हणून आपणच आपल्या विरूध्द उभा ठाकतो.

मीनल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2008 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका,
मीही आता माझ्या मनातली टोचणी सांगते. मी तेव्हा आत्याकडे गेले होते चार दिवस आणि निघायच्या आदल्या दिवशी फोन केला. आईला म्हटलं, "तू नाहीस तर किती बरं आहे, कोणी ओरडत नाही, नावडत्या भाज्या खायला घालत नाही." आणि दुसर्‍या दिवशी घरी गेले तर समजलं की आता यापुढे कोणीही कधीही नावडत्या भाज्या खायला घालणार नाही.
संध्याकाळी अर्थात घरी खूप गर्दी होती. मला भूक लागली होती. बाबा शेजारी बसले होते, त्यांनाही ते माझ्या पोटातल्या आवाजांमुळे लक्षात आलं. मला म्हणाले, "कालच आईनी रवा-कणकेचे लाडू बनवले आहेत, जा एखादा तोंडात टाक. नाहीतरी पुन्हा कधी खाणारेस?". बाबा नावाचा घरात असणारा माणूस माझी किती काळजी करतो हे समजायला मला खूप मोठी किंमत द्यावी लागली.

चतुरंग's picture

21 Sep 2008 - 12:25 am | चतुरंग

यापुढे कोणीही कधीही नावडत्या भाज्या खायला घालणार नाही.

होत्याचे नव्हते! नकळत काय बोललीस आणि काय झाले!
असले प्रकार आयुष्यभर छळत रहातात, जाईल तिथे पाठलाग करत रहातात! टोचणी बोललीस ते बरे केलेस चित्त जरा शांत होईल.

चतुरंग

विनायक प्रभू's picture

21 Sep 2008 - 11:36 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
अदिती -वेलकम टू क्लब. पू निघाल्याशिवाय जखम बरी होत नाही.
वि.प्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं वाटतं आपला गाढवपणा, चुका एकदा मान्य केल्या की! :-)

अवांतरः काय झकास असायचे ते लाडू कणीक-रव्याचे! कोणाला पाकृ येत असेल तर जरा टाका ना इथे!

सखाराम_गटणे™'s picture

21 Sep 2008 - 8:59 pm | सखाराम_गटणे™

नाइलाजाने एक नारळ घेतला. वाटलं पाणी तरी प्यावे. घोट घेतल्यावर जरा बरे वाटले. सवयीने त्या केरळियाने खोबरे काढुन दिले. आणि ते मी खायला सुरु केले प्रतिक्षिप्त क्रियेने. अर्धवट खाल्ले न खाल्ले तितक्यात खांद्यावर हात आणि मस्तकात बंदुकीची गोळी. " काय, आई गेल्याची पार्टी चालली आहे वाट्ते? मागे बघतो तर अंडरटेकर उभा. स्मशानात सुद्धा सोड्ल नाही ***व्याने.
तुम्ही तुमच्या प्रतिक्षिप्त क्रियेने नारळाचे खोबरे खाल्ले, ह्यात मला काय व्यक्तीश: काही चुकीचे वाटत नाही.
माणसाचे प्रेम जीवंत असताना कसे संबध ठेवले होते, किती काळजी घेतली होती यावरुन ठरवावे.
उगाचच किती दु:ख प्रदर्शीत केले याला महत्व नाही.
जसा जसा माणुस मोठा होत जातो तसा त्याला दु:ख नियंत्रणात ठेवण्याची सवय होते म्हणजे तो अनुभवानुसार परीपक्व होतो.
आणि जन्म - म्रुत्यु हा जीवनाचा भाग आहे, यातुन कोणी चुकलेले नाही. जे होते ते परमेश्वराच्या क्रुपेने होते.

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.

चतुरंग's picture

21 Sep 2008 - 10:09 pm | चतुरंग

लहान वय, एप्रिलचे ऊन, हॉस्पिटलच्या सगळ्या दिव्यातून पार पडताना येणारा थकवा ह्या सर्वातून थोडा दिलासा देणारे शहाळ्याचे पाणी आणि खोबरे खाणे हे अगदी स्वाभाविक वाटते.
त्यावर त्या अंडरटेकरचे बोलणे हे त्यावेळी मनाला लागणे शक्य आहे. पण पुढे ती बोच कमी व्हायला हवी होती ती काही कारणाने झालेली दिसत नाही. आता बोलला आहात त्यामुळे होईल.

(सखाराम्_गटणे याच्यासाठी अवांतर - नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे हे खरे पण तरीही एक नाडी खिशात ठेवावी कारण इलास्टिक तुटले तर?)

चतुरंग

टारझन's picture

22 Sep 2008 - 1:19 pm | टारझन

नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे हे खरे पण तरीही एक नाडी खिशात ठेवावी कारण इलास्टिक तुटले तर?

आयला आज काही खरं नाही .. जो लेख उघडतोय त्यात नाडी,इलॅस्टिक , बोळा मोरी आणि .... आज मरतय हसून हसून .. एक तर काल पासून पुन्हा यायाम सुरू केलाय .. पोटाचे याम केल्याने आधीच पोट दुखतय ... त्यात रंगोजी आणि गटणे बाबा नाही नाही ते लिहून आमचे वाईट्ट हाल करत आहेत
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

विनायक प्रभू's picture

22 Sep 2008 - 10:05 am | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
गटणे साहेब,
नाडी नंतर आता इलास्टीक. सर्व सोडुन एकदाचे संपूर्ण शास्त्र एकदा प्रसवा बघु. सर्व अज्ञानी लोकांचा सहारा व्हा.
वि.प्र.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 3:14 pm | प्रभाकर पेठकर

लाहनपणी प्रसंगाचे गांभिर्य लक्षात येत नाही आणि भूकही आवरत नाही.
माझ्या आजोबांची गोष्ट त्यांनीच सांगितलेली....
त्यांचे वडील (माझे पणजोबा) गेले तेंव्हा माझे आजोबा ८-१० वर्षाचे होते. सर्व नातेवाईक जमून स्मशनात जायला खूप उशीर झाला. स्मशानात आजोबांनी वडीलांच्या चितेला अग्नी दिला आणि कोपर्‍यात बसून रडू लागले. लोकांना वाटले वडील गेले म्हणून ते रडताहेत. पण, शेवटी तेच जवळच्या कोणातरी नातेवाईकाला म्हणाले, 'मला खूप भूक लागलीए.' स्मशानाच्या शेजारच्याच किराणा मालाच्या दुकानात तेंव्हा चिवड्याचे पाकिट मिळाले. (तेंव्हा बिस्किटेही परवडायची नाहीत.) ते कोणीतरी आणले आणि आजोबांनी वडीलांची चिता जळत असताना स्मशानात बसून चिवडा खाल्ला.
त्यांनाही मोठेपणी ही टोचणी खूप दिवस छळत होती. मला म्हणायचे, 'प्रभ्या, अरे 'बाप मेला' म्हणजे काय हे समजण्याचे माझे वयच नव्हते.' असो.
असे प्रसंग येतात. ते विसरून जायचे आणि गेलेल्या माणसाचे आदर्श आठवून ते अंगीकारण्याचे प्रयत्न करायचे.