दिनांक २२ जानेवारी २०१६
रात्रीचे सव्वा दहा वाजलेत, केदार, श्रीहास, अमोल आणि विशाल पुण्याला पोहचत आहेत. मी सुद्धा दुकान वाढवून घरी पोहोचलोय. इतक्यात केदारचा फोन आलेला,
केडी :- निघालास का रे?
मी :- आत्ताच घरी पोहोचलोय, जेवनार आणि निघणार.
आणि ..........
धप्प. धडाम.
केडी :- का रे कसला आवाज येतोय?
मी :- काही नाही. बारा वाजता निघेन, सकाळी ६ वाजेच्या आसपास शिवाजीनगरला घ्यायला या.
फोन बंद.
च्यामारी असा कसा पडलो? दिवे लावून बघितल, पायात मोज़े आणि गुळगुळीत फरशीवर पडलेल्या कपड्या वरुण पाय सटकला आणि जोरात पडलो. ठीक आहे, पडलो आणि उठलो. काय झाल? काहीच नाही.
जेवण करून १२ वाजताची येष्टी घेउन पुण्याला निघालो. ३ वाजलेत आता थोड्फार त्रास जाणवायला लागलय. ५ वाजलेत आता जरा जास्त त्रास होतोय. ६ वाजता शिवाजीनगर ला उतरलो श्री ला बोलवल, घ्यायला येतोय. चला चहा घेऊ. बाहेर होटेलात बसलोय चहा घेतला गाड़ी आली......
पण उठता कुणाला येतय? बापरे, हे काय अजुन. कसा बसा जोर लाउन उठलो. श्री सोबत रूम वर गेलो. सगळा किस्सा सांगितला. सुदैवाने, श्री, अमोल आणि विशाल तिघेही डॉक्टर आहेत. त्यानी निदान केल की नुसता फटका बसला असणार आणि मासपेशिला मार लागलेला असावा.
श्री :- पाठीच हाड मोडल असत तर तू घरातून बाहेर आलाच नसतास.
(मी:- हुश्श... वाचलो बुआ.)
वेद्नाशामक गोळ्या घे, २-३ दिवसात सूज उतरली की बर वाटेल. काहीही काळजी करू नकोस. पुढील ४ दिवस आम्ही सोबत आहोत की.
आणि सकाळी साडे आठ वाजता पुण्याहून दिवेआगार कड़े प्रस्थान केल,
गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ति मोरया.
सर्वात पुढे मी, मागे चाश्म्यावाला श्री, बाजूला फोनवर बोलणारा विशाल, मागे काळा गोगल वाला केदार आणि बाजूला अमोल.
आरामशीर टाईम पास करत दिवेआगार ला पोहोचलो. होटल मध्ये ब्याग टाकल्या, थोडा आराम करुन संध्याकाळी पाण्यात मनसोक्त भिजुन घेतल. पहिला दिवस संपला. त्रास काही कमी झालेला नाही. परंतु, गोळ्या घेतल्यावर बर वाटतय.
दिवेआगर सगळ्याना माहित आहे. कस जायच, काय खायच, काय बघायच आणि कुठे रहायच याचे स्वतंत्र धागे आहेत, म्हणून दिवेआगर बाबत जास्त काही नाही. दिवेआगार आता खुप म्हणजे खुपच कमर्शियल झालय. खुप जास्त गर्दी. होटेलच्या सुद्धा काही च्या कही किमती झाल्यात. पण ते जाऊ दया.
दिवस दूसरा:-
पहिला समुद्र किनारा :-
किना-यावर खुपच जास्त गर्दी झाल्यामुळे आणि बोट फेरीवाले यांच्या कलकलाटा पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. होटलवाल्या व्यक्तीलाच विचारून निघालो.
गावाच नाव :- कोंड्विले.
कसे जावे :- दिवेआगर ते श्रीवर्धन ह्या सुप्रसिद्ध “शेखाडी” मार्गावर वसलेले गाव आहे कोंड्विले. दिवेआगार वरुण निघाल्यावर शेखाडी गावाच्या पुढे जिथे हा रास्ता समुद्र किनारा सोडून देतो तो शेवटचा किनारा म्हणजेच कोंड्विले गाव. अजुन एक निशानी म्हणजे आपण टेकडी उतरून समतल जमिनीवर येतो. तेथे एका बाजूला समुद्रकिनारा व दुस-या बाजुस वसलेल गाव म्हणजे कोंडविले.
दिवेआगर ते श्रीवर्धन मार्गावरून होणारे (कोंडविले गावातील) समुद्रकिनार-याचे पाहिले दर्शन.
हे रस्त्यात भेटलेले सायकलस्वार. चढ़ चढताना यांच्या सोबतचे सगळे लोक सायकलला धक्का मारत होते तेव्हा हे एकटेच सम्पूर्ण चढ सायकल चालवत चढून आले. याना पहिल्या पहिल्या मोदक रावांची आठवण झाली होती, आणि काय योगायोग मोदकराव (परवा फोटो बघितलेला) सुद्धा असेच गुबगुबीत आहेत.
या समुद्रिकिना-या वर पाण्यात जास्त आत जाता येत नाही. दुस-या दिवसाची पूर्ण दुपार आम्ही तेथेच घालवली, एक ते दिड किलोमीटर चा शांत समुद्रकिनारा. किना-यावर जास्तीत जास्त ४०-५० लोक्स असतात.
चेंडू फलीचा खेळ खेळायला मस्त जागा आहे.
त्या सम्पूर्ण समुद्र किनार्यावर एकच घरगुती खानावळ आहे. वक्रतुंड खानावळ. खानावळी समोर एक छोटा बेंच, एक मोठ्ठ जेसीबीच रबरी चाक ठेवलेल आहे. पुढील २-३ तास त्या बेंच आणि चाकावर झाडाच्या सावलीत फक्त बसून घालवले. वाह एकदम झक्कास वेळ गेला. समोर शांत समुद्रकिनारा, सोबत मित्र, आणि फक्त बसून रहा. वाह. मुड एकदम फ्रेश.
वक्रतुंड खानावाळीतिल पुसाळकर काकानाच जेवान्याबाबत विचारपूस केली. जेवायला मस्त पैकी सुरमई / पापलेट (माझ्या मते पापलेटच होता) कोलंबि (झींगे) असा झक्कास मेनू होता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरचे जेवन (एकदम कोंकणी पद्धतीने बनवलेले / होटल सारखे नाही) मिळाले. वाह. क्या बात. मस्त दिवस गेला. मनसोक्त खादाडी केली.
जेवन झाल्यावर सूर्यास्त बघत तिथेच बसायचे ठरवले, आणि दिवस सत्कारणी लावला.
चाकावर बसल्यावर दिसणारे संध्याकाळचे दृश्य.
तीसरा दिवस:-
दूसरा समुद्र किनारा :-
तीसरा दिवस उजाडलाय. (पाठीचा त्रास जनवतोच आहे.) आज काय करायच? आज पण होटलवाल्या बंधुला विचारून घेऊ.
गावाच नाव :- आद्गाव (आङगाव).
कसे जावे :- दिवेआगार कडून दिघी बंदराकड़े जाण्यास निघावे. ८-१० किलो मीटर वर एक फाटा आद्गाव साठी लागतो. तिथून पुढे फार तर फार २ किलो मीटर वर आहे हे छोटस खेड गाव. थोड़ी विचारपूस करावी लागते. लोक्स सुद्धा नीट पत्ता सांगतात.
आँ?
हे काय पाहतोय मी?
बब्बो
मी भारतात आहे???
माझ्या महाराष्ट्रात आहे?
हे कस शक्य आहे?
इतक स्वच्छ पाणी? एक सेल्फी तर घ्यावीच लागेल.
ईतक स्वच्छ पाणी? ते पण महाराष्ट्रातल्या समुद्रकिनारी. क्या बात. वाह. अरे, पण हे शापित सौन्दर्य आहे. वाळू खुपच अस्थिर आहे. ठीक आहे. आज पाण्यात नाही जायच नुसती समुद्राची मजा बघायची.
सर्व प्रथम सगळ गाव बघून घेऊ आणि मग ठरवू की कुठे पाण्यात उतरायचय. संपूर्ण गाव फिरून बघितल. एकदम छोटस टूमदार गाव. दिघी बंदर जवळच अस्ल्याने गावात बरीच ठिकाणी जाळे वाळत घातलेल दिसत होत. लोक सुद्धा निवांत दिसत होते. गावाच्या पुढील टोकाला गेलो तर तिथे किना-याला तीव्र उतार होता, आणि वाळू खुपच अस्थीर होती. तिथे बसायचा विचार सोडून दूसरी जागा शोधायला निघालो. ज्या रस्त्याने आलोत त्या रस्त्यात अमोलनी एक दोन ठिकाणी मस्त जागा बघून ठ्वेल्यात. तिथे जान्याच ठरल.
जागा शोधली. मस्त सुरूच बन आहे. सावली आहे. मोठा समुद्र किनारा, किना-यावर कुणीच नाही. वाह. कालच्या समुद्र्किना-यावर तरी ४०-५० लोक्स होते, आज इथे तर कुणीच नाही. आम्हिच ५-६ लोक आहोत. वाह. कुनी पाण्यात बसलय, कुणी फोटो काढतय, कुणाला सावलीत बसायला मजा वाटतेय.
संपूर्ण समुद्र किनारा फिरून काढला. इथे तर खाड़ी सुद्धा आहे. काही पक्षी बसलेत. शांत वातावरण आहे. आद्गावात ४-५ तास मनसोक्त टाईम पास केला. कही खेकडे पकडले, सोडून दिले. धिंगाना घातला. कुणीच नाही. वाह.
मध्येच ह्ये साहेब सुद्धा भेटले.
इथे मात्र एक धोका आहे. खाडी. समुद्राला ओहोटी आहे. पाणी वेगाने वाहतय. आणि खाड़ी पाशी कोरड्या वाळूत सुद्धा फुट भर पाय आत जातोय. बापरे पळा. आज बिलकुल पाण्याशी पंगा घेतला नाही.
दुपार टळायला लागलिये. जेवण?
परत कोंड्विले गाव, वक्रतुंड खानावल. आज सुद्धा कालच्या सारखाच फक्कड बेत. आज सुद्धा सांध्यकाल येथेच घालवली.
मध्येच ह्ये साहेब भेटून गेले.
थोडा फार क्लिक्काट करून घेतला.
.
दिवस चौथा:- सकाळी किनार्यावर एक फेरी मारून टूर संपवला. आवरा आवर करुण, औरंगाबादला प्रस्थान केले. येताना सुद्धा त्रास झालाच.
वापस आल्यावर १५ दिवस झालेत तरी त्रास कमी झाला नाही म्हणून स्पेशलिस्ट डॉक्टर ला दाखवल, एक्स-रे काढला, तेव्हा कळाल की माकड हाड मोडलय. ३ महीने गाडी चलवने बंद. जमेल तितका आराम.
सध्या सर्वकाही व्यवस्थित झालय. पाठ व्यवस्तिथ आहे.
जर छोटीशी टूर काढायची आहे, गर्दी, गोंधळ ई. पासून दूर जायच असेल तर दिवेआगार च्या आस पास ची ही दोन्ही ठिकाने उत्तम आहेत. परंतु, पाणी कितपत सुरक्षित आहे सांगता येत नाही. माझी कंबर मोडल्याने मी काही व्यवस्तित फोटो काढू शकलो नाही. या लेखातील बरेचसे फोटो अमोल आणि विशाल या दोघानी काढलेले आहेत. मला या ठिकानच सौन्दर्य शब्दात मांडता आलेल नाही. परन्तु या ठिकाणी एक भेट दयायला हरकत नाही.
प्रतिक्रिया
21 May 2016 - 9:31 pm | कंजूस
भारी ट्रिप. वेगळी मजा.आवडलं वर्णन आणि फोटो.
21 May 2016 - 9:37 pm | कानडाऊ योगेशु
बाब्बौ.. अशा अवस्थेत चार दिवस प्रवास केलात? धन्य आहे राव.
बाकी फोटो वगैरे छान आले आहेत.ट्रीपही मस्तच झाली आहे असे दिसतेय.
आता पावेतो बरे झालेलेच असाल!
22 May 2016 - 12:43 pm | बाबा योगीराज
आता सगळं काही व्यवस्थित आहे. आता गाडी सुद्धा चालवू शकतोय.
21 May 2016 - 9:47 pm | प्रचेतस
हे इकडचे दोन्ही किनारे पाहिलेत. प्रचंड सुंदर आहेत. तो दिवेआगर ते श्रीवर्धन हा रस्ता विलक्षण नेत्रसुखद.
इकडील प्रांती बऱ्याच काळांत जाणे झालेले नाहिये. दिवेआगरचा रूपनारायण पाहिलात का? हल्ली कपडे घातलेले असतात.
22 May 2016 - 12:46 pm | बाबा योगीराज
दिवेआगरचा रूपनारायण पाहिलात का?
खूप सुंदर मंदिर आहे. नंबर 2 चा फोटो त्याच मंदिराचा आहे.
22 May 2016 - 11:43 pm | प्रचेतस
हो. ते गेल्या चार / पाच वर्षात जीर्णोद्धारित झालंय. आधी एक घुमटीवजा लहानसं मंदिर होतं त्यातच ही जांभ्याच्या तांबड्या धुळीनं माखलेली अतीसुंदर मूर्ती होती.
आता गणेशमुखवटा नाहीसा झाल्यानंतर सहारा रूपनारायणाचाच.
21 May 2016 - 9:49 pm | जव्हेरगंज
बाबाजी!!
काय हे? चक्क!!
बाकी प्रवासवर्णानाची स्टाईल मलातर आवडली !!
21 May 2016 - 11:15 pm | मुक्त विहारि
जरा तब्येतीची काळजी घ्या...
21 May 2016 - 11:42 pm | चतुरंग
लिहिते रहा..
(किंचित अवांतर - बरोबर तीन तीन डॉक्टर असताना एकालाही तुम्हाला लागलेला मार हा कदाचित गंभीर स्वरुपाचा असू शकतो हे तपासून घ्यावेसे वाटले नाही हे काळजी करण्यासारखे वाटले..इथे त्यांच्या वैद्यकीय ज्ञानाविषयी शंका घ्यायची नसून लागलेल्या माराकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाने "अरे, काही होत नाही चल!" असं ट्रिपच्या उत्साहात म्हणणं आणि एखाद्या डॉक्टरने तरीदेखील "अरे तपासून घे, एक्सरे काढून मग ठरवूयात." असे म्हणणे हा फरक असायला हवा असे वाटते...)
22 May 2016 - 7:07 am | त्रिवेणी
मस्त लिहिल आहे.पुढच्यावेळी नक्की भेट देणार या ठिकाणी.
22 May 2016 - 8:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाबा, दिवेआगर सफर आवडली. मला दिवेआगर आवडतं. माकड़हाड़ाला मार लागलेला असतांनाही प्रवास करणे आवडलं नाही. माणूस फिट असला पाहिजे प्रवासात. त्रास वाढला असता तर काय ? बाकी लिहित राहा. लेखन आवडले.
अवांतर : मिपाकर अमृता जोशी यांना आपल्याला भेटायला जायचं आहे, विसरु नका ;)
-दिलीप बिरुटे
22 May 2016 - 1:29 pm | बाबा योगीराज
अवांतर : मिपाकर अमृता जोशी यांना आपल्याला भेटायला जायचं आहे, विसरु नका ;)
सर तुम्ही आवाज द्या, मी तय्यार आहे.
22 May 2016 - 11:20 pm | नीलमोहर
'मिपाकर अमृता जोशी यांना आपल्याला भेटायला जायचं आहे, विसरु नका ;)
- या व्यक्तीला कधी खरेच भेटलात तर मलाही सांगा, उत्सुकता आहे.
22 May 2016 - 11:51 pm | बाबा योगिराज
सर आपण दोघे 22 फेब्रुवारीला भेटलो होतो. तेव्हां बरोबर 1 महीना झाला होता. मला पूर्णपणे नीट व्हायला 3 महिने लागले. आपण भेटलो होतो तेव्हा तुमच्या लक्षात आलं होत का, की माझी कंबर मोडलीये?
माझी अवस्था पहिल्या दिवशी पण तशीच होती, जशी तुम्हाला भेटताना होती.
22 May 2016 - 8:10 am | उगा काहितरीच
प्रवासवर्णन , फोटो आवडले. पण आता तब्येतिची काळजी घ्या बहुतेक छोटासा क्रॕक असेल माकडहाड मोडल्यावर नाही चालता येणार बहुतेक! तरीही काळजी घ्या.
22 May 2016 - 11:24 am | बोका-ए-आझम
फोटो तर इनो फॅक्टरी आहेत!
22 May 2016 - 11:42 am | कानडाऊ योगेशु
निर्मनुष्य वाटणार्या समुद्रकिनार्यांचे फोटो पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. किनार्यावर लाटा अजिबात दिसत नाहीत आहेत. बहुतांश जणांना फेसाळणार्या व कधी कधी धडकी भरवणार्या लाटा येणारा किनारा आकर्षित करतो.म्हणजे एका मोठ्या तलावाचा फिल येतो.त्यामुळे कदाचित हा किनारा इतका लोकप्रिय नसावा. असाच फरक गोव्याला मिरामार बीच वर गेलो तेव्हा व नंतर कलांगुटे व बाघा बीच्वर गेलो तेव्हा जाणवला.
22 May 2016 - 12:51 pm | टवाळ कार्टा
भारी :)
बाकी ते गुबगुबीत मोदक वाचून फुटलो =))
22 May 2016 - 1:05 pm | एस
हे दोन्ही किनारे फारच सुंदर आणि जवळजवळ निर्मनुष्य आहेत. सुंदर.
22 May 2016 - 8:20 pm | सिरुसेरि
छान लेखन आणी फोटो . दिवे आगार ची गणपतीची सोन्याची मुर्ती एकेकाळी खुप प्रसिद्ध होती .
22 May 2016 - 9:47 pm | पद्मावति
खूपच मस्तं!
22 May 2016 - 11:11 pm | पैसा
छान लिहिलत आणि फोटोही आवडले. फ्रॅक्चर असताना कसे गेलात एवढा प्रवास करून?
22 May 2016 - 11:23 pm | नीलमोहर
मस्त फोटो आणि वर्णन.
22 May 2016 - 11:32 pm | बाबा योगिराज
सर्व प्रथम सर्वांचे धन्यवाद.
मला आजही ह्या गोष्टीच आश्चर्य वाटत की तर चार दिवस प्रवास कसा काय करू शकलो. परंतु, मला सगळं कळल्यावर जेव्हढा त्रास झाला, तेव्हडा फिरायला गेलो होतो तेव्हा जाणवला नाही. मला फक्त टेकून बसता येत नव्हतं. बाकी मी व्यवस्थित हिंडू-फिरू शकत होतो.
मला पडल्या पडल्या जाणवलच नाही कि काही नुकसान झालय. आणि सोबतच्या मित्रांनी पण (पुण्यात असताना) कमीत कमी अर्धा तास घालवला पण मला फक्त एका विशिष्ट पोसिशन मध्येच (बसल्यावरच) त्रास जाणवत होता. बाकी काही नाही. वापस आल्यावर सुद्धा मी गाडी चालवणे सोडून सगळं काही करू शकत होतो.
जर पडल्या पडल्या मला जाणवलं असत तर मात्र मी घराबाहेर देखील पडलो नसतो.
असो.
.
.
मागील वर्षी पहिल्यांदा दिवेआगारला गेलो होतो तेव्हा मिपाकरांना विचारून गेलो होतो. तेव्हा मी नवीन असताना सुद्धा मला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला होता की, मलाच अस डोक्यावर ओझं असल्यासारखं वाटत होत. पण आज मात्र सगळं ओझं उतरलं आहे. तुम्हाला मी माझ्या तर्फे काही देऊ शकलो याच समाधान आहे. दिवेआगार खूप गर्दीच ठिकाण झालय. म्हणून मी हि आजूबाजूची दोन्ही ठिकाण एकदम मस्त ऑप्शन आहेत. नक्की भेट देऊन या, आणि भरपूर फोटो टाका.
23 May 2016 - 9:06 am | नाखु
फोटो चुस्त आणि रहा तंदुरुस्त.
लवकरात लवकर बरे होऊन नव्या सफरीसाठी सज्ज व्हा.
घरकोंबडा नाखु
23 May 2016 - 11:43 am | पक्षी
अतिशय छान, वाखू साठवत आहे.
23 May 2016 - 12:33 pm | मोदक
भारी सफर केलीत. तब्बेतीची काळजी घ्या.
बाकी आरवी-कोंडीवली सारखा निवांत समुद्रकिनारा दर दोन वर्षांनी शोधावा लागतो. हा किनारा थोड्या वर्षांनी व्यावसायीक होईल, मग याचेही दिवेआगार-हर्णे-नागांव होईल. :(
23 May 2016 - 12:43 pm | सतिश पाटील
योगी भाऊ .. दिवेआगार बद्दल दिलेल्या नवीन माहितीबद्दल आभार.
एक आठवडा अगोदर दिली असती माहिती तर आम्हाला उपयोगी पडली असती न राव.
तिकडच हुतो मागच्या आठवड्यात. असो.
तुमचं मोडलेलं कंबरड आता ठीक असेल अशी अशा करतो.
बाकी ते तुम्ही बुलेट इकायचं ठरवलंय ते खरं हाय का?
23 May 2016 - 1:33 pm | बाबा योगिराज
बाकी ते तुम्ही बुलेट इकायचं ठरवलंय ते खरं हाय का?
तुला तुझं कम्बरड मोडून घ्याच हाय काय?
23 May 2016 - 12:47 pm | सतिश पाटील
दिवेआगरच २-३ वर्षात मजबूत व्यावसायीकरण झालाय हे मात्र खरं आहे.
बेशिस्त गाड्यांची लागलेली रांग, बीचवर दारूच्या बाटल्यांचा खच, उष्टी पत्रावळ्या,कचराकुंडी झालीये त्या बीचची. माणसांची अक्षरश जत्रा पाहून आता ते पूर्वीच दिवेआगर राहिलेलं नाही याची खंत वाटते.
23 May 2016 - 12:50 pm | सतिश पाटील
कोंड्विले चा किनारयावर भुताटकी आहे असं ऐकलय, म्हणन प्रत्येकवेळी हा किनारा टाळलाय आम्ही.
बाकी खर खोट भूतच जाणो.
23 May 2016 - 1:17 pm | अभ्या..
योगीबाबा, धुरळाच उडीवला की पार.
च्यायला चार जिगरयार आणि जेसीबीचा टायार.
संगतीला शांत किनारा अन मनसोक्त खाया प्याया.
.
जन्नतच की
23 May 2016 - 2:15 pm | स्पा
लवकर बरे व्हा भाऊ
धागा आणि फोटो एकदम फ्रेश
23 May 2016 - 6:01 pm | बाबा योगिराज
सध्या सगळं व्यवस्थित आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा सोबत आहेत.
23 May 2016 - 3:57 pm | सूड
दिवेआगर श्रीवर्धन दोन्ही आवडते, त्यातल्या त्यात आंजर्ले पण चांगला आहे!!
23 May 2016 - 8:52 pm | आनंदी गोपाळ
शुभेच्छा आहेतच.
तुमच्या सोबत काही डॉक्टर्सही होते म्हणताहात.
तरीही, https://en.wikipedia.org/wiki/Coccydynia डोळ्याखालून घाला.