माझा पहिला परदेश प्रवास (लंडन)

मेघना मन्दार's picture
मेघना मन्दार in भटकंती
28 Apr 2016 - 3:09 pm

भाग पहिला -

मिसळपाव वर हा माझा पहिलाच लेखनाचा प्रयत्न, त्यामुळे लेखनातल्या चुका सांभाळून घ्या मिपाकरांनो !!

माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं लंडन!! नवर्‍याबरोबरच जायचं असं ठरवलं होतं मी तेंव्हा :) खरं तर ४ वर्षांपूर्वी आई बरोबर UK ला जायची संधी आली होती मला, माझा भाऊ लंडन मध्ये होता त्यावेळी. तसं म्हणायला गेलं तर मला सहज शक्य होतं तिकडे जाणं पण मी नाही गेले. माझं स्वप्न होतं की लंडन ला जायचं तर ते मंदार बरोबरच :) आणि तसं मी माझ्या आईला सांगितलं होतं. आई सुद्धा काही म्हणाली नाही. लहानपणापासून आईला सगळं सांगायची सवय, त्यामुळे ह्याची कल्पना दिली होती आधीच, पण विश्वास होता की आपल्याला जायला मिळेल कधी ना कधी तरी. त्यामुळेच आईला तेंव्हाही हे कारण सांगू शकले. दादाला म्हणजे माझ्या भावाला सांगायची हिम्मत नव्हती त्यामुळे त्याला असच काहीतरी कारण सांगितलं.

तर आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल बहुदा की आमचा प्रेमविवाह. मंदार ला जेंव्हा मी हे सांगितलं तेंव्हा तो म्हणाला मला की एक ना एक दिवस तुला मी नक्की लंडन ला घेऊन जाईन. पण लग्नानंतर इतक्या लवकर जायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

असंच ऑफिस मध्ये एके दिवशी मला नवर्‍याचा फोन आला आणि तो मला म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आपण लंडन ला जातोय January मध्ये. मी खुर्चीवरून उडायची बाकी होते फक्त ही बातमी ऐकून. तपशिलात विचारल्यावर मग कळलं की त्याला ३ आठवडे कामासाठी लंडन ला जायला लागणार आहे. खूप खुश होते मी. ही ट्रिप प्लान करायचं अजून एक कारण म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ८ February २०१६ आणि आम्हाला तो लंडन मध्ये साजरा करायला मिळणार होता याचाही खूप आनंद होत होता.

आता मुख्य प्रश्न होता तो म्हणजे सुट्टीचा. एवढा खर्च करून जायचं म्हणजे ३ आठवडे तरी सुट्टी मिळाली पाहिजे सगळं पाहता आलं पाहिजे. त्यात माझी नोकरी नवीन, त्यामुळे एवढी सुट्टी मिळेल की नाही माहित नव्हतं पण Manager ला विचारल्यावर तो सुदैवाने लगेच तयार झाला आणि माझी सुट्टी मंजूर झाली. मग काय स्वारी खूष !! :) मग त्या दिवसापासून विसा च्या Application ची तयारी सुरु झाली . त्याचबरोबर विसा साठी लागणारे डॉक्युमेंटस , तिकडे लागणाऱ्या गोष्टी , खरेदी , तिकडे कुठे आणि कसं फिरायचं या सगळ्याची तयारी सुरु केली. तसं माझा नवरा आधी जाऊन आला असल्यामुळे त्याला सगळी माहिती होती पण तिकडे तो ऑफिस मध्ये गेल्यावर मला एकटीलाच फिरायचं होतं त्यामुळे मी याद्या करायला सुरुवात केली की काय काय बघायचं, कुठे जायचं कारण मला आणि माझ्या नवर्‍याला एकत्र फिरायला दोनच वीकेण्ड मिळणार होते म्हणून मग आम्ही ठरवलं की पैसे भरून ज्या जागा पहायच्या आहेत त्या एकत्र पहायच्या आणि ज्या जागा म्हणजे पार्क्स, संग्रहालयं आणि अजून काही अशी ठिकाणं आहेत जिथे एन्ट्री फी नाही आहे त्या जागा मी इतर दिवसांमध्ये बघायच्या. लंडन मध्ये ते एक बरं आहे की काही संग्रहालये, पार्क बघायला ते काहीही पैसे लावत नाहीत आणि ती इतकी मोठी आहेत कि आपला अख्खा दिवस जातो ते बघण्यात फक्त तुम्हाला आवड असली पहिजे. माझा अनुभव खूप छान होता संग्रहालये बघण्याचा, त्यावर नंतर सविस्तर लिहीनच.

टुरिस्ट विसा (६ महिने) ला अर्ज करण्यासाठीची किंमत साधारण ८००० रुपये आहे. आता कदाचित बदल झाले असतील. विसा साठी अर्ज करून ऑनलाईन Appointment नवर्‍याने घेऊन ठेवली होती. सगळ्या डॉक्युमेंटस ची जमवाजमव केली आणि गेले विसा ऑफिस मध्ये Appoitment च्या दिवशी. ऑफिस मध्ये आत गेल्यावर आधी सुरक्षा तपासणी झाली मग पुढे गेल्यावर प्राथमिक माहिती घेऊन त्यांनी एक टोकन दिले आणि थोडा वेळ वाट पाहायला सांगितली. आत गेल्यावर आधी ते विचारतात की तुमचा विसा नॉर्मल प्रोसेस ने अप्लाय केला आहे कि अर्जंट? कारण नॉर्मल असेल तर २१ दिवसाच्या आत येतो आणि अर्जंट असेल तर ३ दिवसाच्या आत येतो. झाल्यावर मग माझा टोकन नंबर उच्चारला आणि मी गेले तिथल्या एका खिडकीच्या इथे. माझ्याकडून एक फॉर्म भरून घेतला आणि सगळी डॉक्युमेंटस जमा करून घेतली. ते झाल्यावर बायोमेट्रिक चाचणी झाली आणि हे सगळे सोपस्कार पूर्ण झाल्यावर मी बाहेर आले. UK विसा प्रोसेस करण्यासाठी VFS Global नावाची एजन्सी आहे जी आपले डॉक्युमेंटस UK कौन्सुलेट ला पाठवते पण विसा साठी चा अर्ज आपल्याला UK Govt. च्या https://www.gov.uk/check-uk-visa या वेबसाईट वरच करावा लागतो. याबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तर व्यनि करावा .

मला तसं थोडं टेंशन होतं की वेळेत विसा मिळतोय कि नाही कारण आमच्याकडे बरोब्बर २१ दिवस च होते हातात . माझ्या नवर्याला तसा विश्वास होता की विसा मिळेल, म्हणून त्याने तर तिकीट पण बुक केलं. आम्हाला दोघांना एकत्र जाऊन एकत्रच यायचं होतं आणि तिकीट खूप महाग होत होती आणि तोपर्यंत विसा आला नव्हता त्यामुळे करून टाकलं बूक. मला एका आठवड्यातच VFS global मधून मेसेज आला की विसा आला आहे पण हे समजलं नव्हतं कि विसा मिळाला आहे की नाही ते. मेसेज आला तेंव्हा मी ऑफिस मध्ये होते. Manager ला विचारून तडक BKC गाठलं आणि जाऊन पार्सल घेतलं . धडधडत्या मनाने उघडलं आणि पाहिलं तर विसा ची मोहोर लागली होती :) ते पाहिल्यावर इतका आनंद झाला म्हणून सांगू ! लगेच नवर्याला फोन करून कळवून टाकलं मग तोही खूष. आणि आता खऱ्या अर्थाने मी माझ्या पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाला आणि माझ्या ड्रीम ट्रिप च्या तयारी ला सुरुवात केली. आता मी फक्त दिवस मोजत होते आणि तो दिवस आला २३ January २०१६.

क्रमश:

प्रतिक्रिया

देश's picture

28 Apr 2016 - 3:45 pm | देश

चांगला प्रयत्न. पुलेशु

देश

अजया's picture

28 Apr 2016 - 3:51 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Apr 2016 - 4:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता तुमच्या नजरेतुन लंडन बघायला मिळणार तर....पुलेशु.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2016 - 5:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान सुरुवात!

पुढचे भाग लवकर लवकर टाका.

ब़जरबट्टू's picture

28 Apr 2016 - 5:19 pm | ब़जरबट्टू

छान लिहताय.. अजून येऊ द्या..

आदूबाळ's picture

28 Apr 2016 - 5:22 pm | आदूबाळ

येऊ द्या...

मला एका आठवड्यातच VFS global मधून मेसेज आला की विसा आला आहे पण हे समजलं नव्हतं कि विसा मिळाला आहे की नाही ते.

हा एक व्हीएफएसचा महान छपरीपणा आहे. उगाच ग्यासवर ठेवतात लोकांना.

व्हीएफएसच्या दारात "व्हिसा मारुती" काढला तर चांगला धंदा होईल.

एस's picture

28 Apr 2016 - 5:34 pm | एस

=)) गुड आयडिया!

स्रुजा's picture

28 Apr 2016 - 11:04 pm | स्रुजा

लोल..

खरंय पण व्हीएफएस वाले फार वैताग आणतात. दर वेळी हटकुन आणि व्हिसा कितीतरी आधीच येतो.

मेघना, मिपावर स्वागत. छान लिहीले आहे, पुढचा भाग लवकर टाका.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2016 - 1:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

VFS global ही खाजगी संस्था अनेक देशांच्या एंबॅसींसाठी केवळ "बायोमेट्रीक डेटा गोळा करणे आणि / किंवा कुरियर सेवा देणे" एवढेच काम करते. तिला व्हिसा देण्या-/न देण्या- संबधात कारवाईचे अथवा त्या कारवाईची वेळ बदलण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. किंवा ती देत असलेली सेवा सोडून इतर कोणताही सल्ला देण्याचेही अधिकार नाहीत. एंबॅसीकडून आलेले तुमचे पारपत्र असलेले सीलबंद पाकीट उघडण्याचा हक्क VFS global ला नसतो, त्यामुळे तुम्हाला विसा मिळाला की नाही हे त्यांना समजण्याची शक्यता नसते.

आपल्या व्हिसासंबंधी माहिती मिळविण्यासाठी आणि आपले व्हिसाचे काम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ते त्या त्या देशाच्या एंबॅसीच्या संस्थळावर असलेली सुविधा वापरून व्हिसा ट्रॅक करणे.

अजया's picture

29 Apr 2016 - 5:34 pm | अजया

हेच लिहायला आले होते!
परवाच व्हिएफेसची वारी करुन आलेय.स्विसव्हिसाची वाट बघतेय.
या लोकांनी अगदी पटापट काम केले.कुठेही निष्कारण वेळ गेला नाही.माहिती द्यायला कर्मचारी तत्पर होते.

मुक्त विहारि's picture

30 Apr 2016 - 9:29 am | मुक्त विहारि

आणि आम्हाला पण स्विसची परत एकदा वाचनीय फेरी घडो....

राजकुमार१२३४५६'s picture

28 Apr 2016 - 5:43 pm | राजकुमार१२३४५६

चांगली सुरुवात !! फोटोची आतुरतेने वाट बघतोय.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

28 Apr 2016 - 5:43 pm | चंद्रनील मुल्हेरकर

कोहिनूर हिरा पाहून या

उल्का's picture

28 Apr 2016 - 6:57 pm | उल्का

पुभाप्र.

किलमाऊस्की's picture

28 Apr 2016 - 7:46 pm | किलमाऊस्की

प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणं शक्य नाही पण वाचतेय. पुभाप्र.

छान लिहले आहे. पुभाप्र.

रेवती's picture

28 Apr 2016 - 7:59 pm | रेवती

वाचतिये.

मेघना मन्दार's picture

28 Apr 2016 - 10:30 pm | मेघना मन्दार

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून लिहिण्याचा उत्साह वाढला आहे :)

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2016 - 11:23 pm | श्रीरंग_जोशी

अनुभवकथनाची सुरुवात उत्तम झाली आहे.
पुभाप्र. मिपावर स्वागत.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 8:25 am | मुक्त विहारि

पुढला बाग जरा लवकर टाकलाअ तर उत्तम

उगा काहितरीच's picture

29 Apr 2016 - 7:17 pm | उगा काहितरीच

वाचायला सुरूवात केलीय ...