पुस्तक वेल्हाळ (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)

सस्नेह's picture
सस्नेह in लेखमाला
26 Apr 2016 - 3:45 pm

Header

पु पुस्तकाचा आणि पुण्याचा माझ्या मते एकच. मराठी पुस्तकांची जास्तीत जास्त प्रकाशने पुण्यात आहेत.
पुण्याचा आणि पुस्तकांचा प्रथम परिचय करून दिला एका पुस्तक वेल्हाळाने. तसे तर वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचून काढायची हौस फार. शालेय पर्वात आसपासच्या सगळ्या लायब्रऱ्या घासून पुसून वाचलेल्या. अगदी चांदोबापासून ते सुशि, बाबा कदम पर्यंत. कॉलेजात गेल्यावर जरा दर्जेदार वाचनाची ओढ निर्माण झाली. पु.ल., गोनीदा, ना.सं. इनामदार, बाबा पुरंदरे यांनी वाचनविश्व व्यापले. मग काही दिवस कुसुम अभ्यंकर, योगिनी जोगळेकर, आशा बगे, इंद्रायणी सावकार, सुधा मूर्ती यांचा प्रभाव होता. नंतर जी.ए., जयवंत दळवी, व.पु., रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्यिक शैलीची गोडी लागली.
१९९१ साली नुकती नोकरी लागलेली आणि पुण्यात बदली झाली. चारी बाजूंनी उंच उंच कपाटांनी वेढलेल्या केबिनीत माझं एक टेबल आणि शेजारी एक टेबल. पहिल्या दिवशी बघितलं तेव्हा ते आणि त्यामागची खुर्ची रिकामीच होती. मागे नेमप्लेट तेवढी चमकत होती. ‘मोहन वेल्हाळ’. शेजारी कसा काय मिळतो याची उत्सुकता तर होतीच. पण दिवसभर ते रिकामंच राहिलं. आणि उत्सुकता अधांतरी.
दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा त्या टेबलावर एक बॅग होती. खुर्ची रिकामी. काही वेळाने एक उंच निंच धष्टपुष्ट ‘इसम’ डुलत डुलत आला आणि त्या खुर्चीत धपकन बसला. वय पंचावन्नच्या आसपास. सावळा वर्ण, डोक्यावर करडे तुरळक केस, मिरची भजी छाप नाक, साधासा चौकड्याचा शर्ट, ग्रे पँट आणि उग्र चेहेरा.
पण या सगळ्यापेक्षा लक्षात राहिले ते बारीक काळेभोर डोळे आणि त्यातली भेद्क नजर. आरपार वेध घेणारी. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून श्रीयुत वेल्हाळ कामात दंग झाले. काही वेळाने त्यांच्या हातातले काम संपले. मग त्यांनी माझी चौकशी केली. नाव, गाव, आधी कुठे होता वगैरे. हळूहळू ओळख झाली.
रोज दुपारी जेवणाची सुट्टी झाली की हा इसम शेजारच्या कपाटाचे कुलूप काढून त्यात डोके घाली आणि बरोबर आणलेल्या बॅगेत त्यातल्या सामानाची काढ घाल करी. जरा वेळाने पुन्हा नीट बंदोबस्तात कुलूप घालून ठेवी.
एकदा मी न राहवून काहीसे चेष्टेने विचारले, ‘का हो वेल्हाळसाहेब, कसला खजिना ठेवलाय तुमच्या कपाटात ? बघू तरी जरा !’
‘आज नाही, सोमवारी दाखवेन तुम्हाला.’ वेल्हाळ इतके गंभीरपणे बोलले की माझ्या चेहेऱ्यावरचे हास्य पळून गेले.
दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर ते मला म्हणाले, ‘वेळ कसा घालवता इथे संध्याकाळचा ?’
‘काही नाही, हो. कंटाळा येतो. एखादी लायब्ररी आहे का इथे ? पुस्तके तरी वाचीन म्हणते.’
वेल्हाळानी एक दोन मिनिटे माझ्याकडे शोधक नजरेने पाहिले आणि उठले. कपाटाचे कुलूप काढले आणि मागे वळून म्हणाले, ‘घ्या !’
मी उत्सुकतेने आत डोकावले, तर काय ! कोरी करकरीत पुस्तके हारीने मांडून ठेवलेली. कपाटात खरोखरच खजिना मिळाला की !
मी थक्क होऊन विचारले, ‘कुणाची ही पुस्तकं ?’
‘माझीच की ! तुम्हाला हवं तर रोज एक घेऊन जा वाचायला.’ वेल्हाळ शांतपणे म्हणाले.
मला हर्षवायूच व्हायचा बाकी राहिला. उत्साहाने मी पुस्तके चाळू लागले. चांगल्या दिग्गज साहित्यिकांची पुस्तकं. जरा खालीवर करून मी जयवंत दळवींचं ‘निवडक ठणठणपाळ’ निवडलं.
वेल्हाळांच्या चेहेऱ्यावर दांडगी उत्सुकता. ‘कुठलं घेतलंत , बघू ?’
आणि ठणठणपाळ पाहून चेहेरा इतका प्रसन्न झाला , की बोलून सांगवत नाही.
‘हेच का घेतलं ?’
‘आवडतं मला दळवींचं लेखन !’
वेल्हाळ हसले. ‘वाचा आणि मग तुम्हाला सांगतो दळवींचे किस्से एकसे एक.’
‘म्हणजे ?’ मला काही कळेना.
‘आज संध्याकाळी दळवींच्या साठी मासळी घेऊन जाणार आहे त्यांच्या घरी !’ डोळे मिचकावून ते बोलले.
‘त्यांच्या एका पुस्तकाचं पुनर्मुद्रण करतोय.’
‘तुम्ही?’ मी आ वासला.
‘मग ? माझा हाच खरा व्यवसाय. नोकरी हा उपजीविकेचा उपद्व्याप !’
म्हंजे हे वेल्हाळ खरोखरीचे पुस्तक वेल्हाळ होते तर !
आम्हा दोघांची ‘समानशीले...’ न्यायाने लगेच गट्टी झाली.
मग काय, सहा एक महिन्यात मी वेल्हाळांच्या खजिन्याचा फडशा पाडला. त्यांचा संग्रह हा उत्तम साहित्यकृतींचा खजिना होता. लेखनाचे साहित्यमूल्य कसे जाणावे हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. दळवींची बरीच पुस्तके त्यांनी मुद्रितशोधन केली होती. इतरही अनेक लेखकांच्या पुस्तकांना वेधक रंगरूप दिले होते. हस्तलिखिताचे काँप्युटरप्रतीमध्ये रुपांतर करतानाच मुद्रितशोधन करायचे. हे संपादनाचे काम किती किचकट होते ते मला त्यांच्याकडचे एक हस्तलिखित पाहिल्यावर समजले. शुद्धलेखनाच्या चुका, विस्कळीत मांडणी, लॉजिकल विसंगती या सगळ्याचा सूक्ष्म अभ्यास करून सुधारणा कराव्या लागत. दळवींसारख्या उच्च दर्जाच्या लेखनात फारच कमी मुद्रितशोधन करावे लागे. पण इतर बरेचसे काम डोकेदुखी आणि कटकटीचे असे. पण वेल्हाळ ते हौसेने करीत आणि इतके नीटस करीत की मूळ हस्तलिखित आणि मुद्रित पुस्तक यात कमालीचा कायापालट झालेला असे.

खरी करमणूक होती ती त्यांच्या तोंडून साहित्यिकांचे किस्से ऐकण्यात. नारायण धारप माझे फेवरिट लेखक. त्यांचा एक किस्सा वेल्हाळांनी एकदा सांगितला.
धारप यांचे जंगली महाराज रोडला जुन्या फर्निचरचे दुकान होते. वेल्हाळ एकदा तिथे गेले असताना त्यांनी धारपांना विचारले, ‘तुमच्या भयकथांमधली पात्रे आणि प्रसंग खरे असतात का ?’
त्यावर धारपांनी मोठे अजब उत्तर दिले, ‘माझ्यासाठी शंभर टक्के खरेच असतात !’
गोनीदांच्या समवेत वेल्हाळ पुष्कळ फिरलेले. गोनीदा खूप भ्रमंती करीत. इतका महान साहित्यिक भ्रमंती करताना केवळ एक पिशवी घेऊन फिरत असे आणि कुणीशी दिलेली भाकर हातावर घेऊन खात असे, हे मी वेल्हाळांकडून ऐकले. आणखीही बरेच किस्से साहित्यिक विश्वाचे त्यांनी ऐकवले ज्यामुळे पुस्तकामागचा साहित्यिक नावाचा माणूस कसा असतो याची मनोरंजक माहिती झाली.
त्या दोन वर्षातले पुण्यातले वास्तव्य वेल्हाळांच्या पुस्तकांनी आणि त्यांच्या रसवंतीवर राहणाऱ्या साहित्यिक विद्वत्तेने अत्यंत सुखद झाले. मराठी साहित्य वाचण्याचा एक चिकित्सक चष्मा ही त्यांनी मला दिलेली विलक्षण देणगी आहे.
आता वेल्हाळ नाहीत. आजही मी जेव्हा कधी लायब्ररीत जाते तेव्हा पुस्तक निवडताना वेल्हाळांचा चष्मा माझ्या डोळ्यावर असतो. या चष्म्याने अनेक उच्च साहित्यकृतींचा आनंद लुटवला !
...वेल्हाळसाहेब, जिथे कुठे असाल तिथे या देणगीसाठी सलाम !
Footer

प्रतिक्रिया

पुस्तकांच्या निमित्ताने झालेली पुस्तकवेल्हाळ माणसाची छान ओळख!

सानिकास्वप्निल's picture

27 Apr 2016 - 8:41 am | सानिकास्वप्निल

फार सुरेख लिहिलेय, पुस्तकवेल्हाळाची ओळख आवडली.

मस्त लिहिले आहे , पण त्रोटक वाटले, अजून लिहा :)

प्रचेतस's picture

27 Apr 2016 - 9:28 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

लेख सुरु होण्याआधीच संपल्यासारखा वाटला.

जेपी's picture

27 Apr 2016 - 10:02 am | जेपी

+११
लेख आवडला..

एस's picture

27 Apr 2016 - 1:52 pm | एस

+ असेच. अजून लिहा हो.

असंका's picture

28 Apr 2016 - 3:37 pm | असंका

+१
फारच थोडक्यात आटोप्ला लेख..

+११

सुंदर लेख.. आणखी लिहा..

क्रेझी's picture

27 Apr 2016 - 10:07 am | क्रेझी

नशीबवान :)
लेख आवडला.

मित्रहो's picture

27 Apr 2016 - 10:40 am | मित्रहो

लेख आवडला
पुस्तक वेल्हाळ माणसाची छान ओळख करुन दिली

पियुशा's picture

27 Apr 2016 - 11:00 am | पियुशा

खुप खुप आवडला लेख :)

प्रीत-मोहर's picture

27 Apr 2016 - 11:29 am | प्रीत-मोहर

अजुन लिहि ग स्नेहांकितातै

मार्मिक गोडसे's picture

27 Apr 2016 - 11:39 am | मार्मिक गोडसे

लेख आवडला.
वेल्हाळांकडून ऐकलेले साहित्यिक विश्वाचे किस्से लिहा ना.

असेच म्हणते. अजुन लिही ना. प्रतिसादात लिही हवं तर.

स्मिता श्रीपाद's picture

27 Apr 2016 - 12:03 pm | स्मिता श्रीपाद

खुप मस्त लेख...
अशी माणसं भेटण्यासाठी नशीब लागतं

विशाखा पाटील's picture

27 Apr 2016 - 12:49 pm | विशाखा पाटील

आवडला. शक्य झाल्यास किस्से लिही.

मधुरा देशपांडे's picture

27 Apr 2016 - 1:52 pm | मधुरा देशपांडे

लेख खूप आवडला. अजून लिही.

पैसा's picture

27 Apr 2016 - 2:14 pm | पैसा

सुरेख ओळख!

सविता००१'s picture

27 Apr 2016 - 2:24 pm | सविता००१

सुरेखच लेख. स्नेहाताई, आमच्यापुढेही हा किश्शांचा खजिना रिता कर गं.
उघड ती अलिबाबाची गुहा........

विजय पुरोहित's picture

27 Apr 2016 - 3:26 pm | विजय पुरोहित

मस्तच लेख. काही किस्से पण अ‍ॅडवायला पाहिजे होते.
गोनिदांविषयी त्यांच्याकडून काही ऐकायला मिळेल का अधिक?

इशा१२३'s picture

27 Apr 2016 - 3:35 pm | इशा१२३

छान ओळख!

इशा१२३'s picture

27 Apr 2016 - 3:35 pm | इशा१२३

छान ओळख!

इडली डोसा's picture

27 Apr 2016 - 9:06 pm | इडली डोसा

असं पुस्तकांचं कपाट हातात येणं म्हणजे किती भाग्याची गोष्ट!

मस्त पण अगदीच त्रोटक. पुढचा लेख असा लिहा - पुस्तकामागचा साहित्यिक नावाचा माणूस, काही ऐकलेले किस्से.

मितान's picture

28 Apr 2016 - 5:42 am | मितान

लेख आवडला.

कविता१९७८'s picture

28 Apr 2016 - 7:53 am | कविता१९७८

मस्त लेख,छान परीचय दिलायस

बोका-ए-आझम's picture

28 Apr 2016 - 8:25 am | बोका-ए-आझम

पण स्पा आणि प्रचेतसभौ यांच्याशीही सहमत. खूपच छोटा वाटला लेख.

सस्नेह's picture

28 Apr 2016 - 10:47 am | सस्नेह

लेख लिहायला घेतला आणि ऑफिसात लिंक डाऊन भानगड उपटली. ती निस्तरण्यात ४-५ दिवस गेले आणि लेख पळवावा लागला. आता सवडीने 'पुस्तकामागचा साहित्यिक नावाचा माणूस' टंकेनच टंकाळा झाडून :)

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2016 - 11:08 am | पिलीयन रायडर

अजुन लिहा अजुन लिहा!!

इतका छान लेख चालु होता.. एकदम संपला..

नीलमोहर's picture

28 Apr 2016 - 12:20 pm | नीलमोहर

'कोरी करकरीत पुस्तके हारीने मांडून ठेवलेली. कपाटात खरोखरच खजिना मिळाला की !'

- हेवा वाटला तुमचा, आम्हाला भेटणार्‍या लोकांना जर विचारले सध्या कोणते पुस्तक वाचताय, तर 'पुस्तक, ते काय असतं?' असे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त ;)
अशी वेल्हाळ लोकं भेटणं, त्यांच्याकडून इतके काही शिकण्यास मिळणे हा किती आनंददायी अनुभव असेल.

पूर्वाविवेक's picture

28 Apr 2016 - 3:30 pm | पूर्वाविवेक

छान व्यक्तीचित्रण

उल्का's picture

28 Apr 2016 - 3:38 pm | उल्का

जागतिक पुस्तक दिनानिमित्त इतक्या लेखांची मेजवानी आहे तरी पण 'दिल मांगे मोर' अशीच गत झालीय खरी.
'पुस्तकामागचा साहित्यिक नावाचा माणूस' च्या प्रतिक्षेत आहोत. :)

वैभव जाधव's picture

28 Apr 2016 - 3:56 pm | वैभव जाधव

एवढाच लेख??? ट्रेलर बघितला असं वाटलं. अजून लिहा.

नूतन सावंत's picture

28 Apr 2016 - 4:26 pm | नूतन सावंत

स्नेहा,खूप सुरेख लेख.चांगली पुस्तके वाचायला मिळण्याबरोबर पुस्तकांवर,लेखकांवर प्रेम करणारी माणसे ज्याच्या आयुष्यात आली तो धन्य.मोहन वेल्हाळ वाचताना माझे मामा श्री रामनाथ भोसले आठवले.नंदादीप नावाचा दिवाळी अंक ते काढत आसत.एलोरा प्रिंटर्स नावाच्या त्यांच्या प्रेसमध्ये तो छापला जाई.पण कार्यालय घरीच असल्याने शालेय वयातच कितीतरी मोठया लेखक/लेखिकांना त्या काळात जवळून पाहिले आहे.गप्पा मारताना/ मामीच्या हातचे सामिष जेवताना जयवंत दळवी,शरद किराणे,वंदना विटणकर,रत्नाकर मतकरी.इ.इ.खूप आठवणी जाग्या झाल्या.

पर्ण's picture

29 Apr 2016 - 5:43 pm | पर्ण

खूप छान लिहिले आहे... अजून वाचायला आवडेल :D

किलमाऊस्की's picture

30 Apr 2016 - 12:52 am | किलमाऊस्की

आवडला.

जुइ's picture

4 May 2016 - 7:10 pm | जुइ

असे एक अवलिया माझ्याही परिचयाचे आहेत. बँकेत नोकरी करून स्वतःची लायब्ररी चालवायचे. मोठ्या साहित्यीकांबरोबर असाच स्नेह आणि संपर्क बाळगून होते.

सुधीर कांदळकर's picture

5 May 2016 - 11:42 am | सुधीर कांदळकर

वेगवान लेख केव्हा संपला कळले नाही.

धन्यवाद.

पिशी अबोली's picture

8 May 2016 - 5:05 pm | पिशी अबोली

सुन्दर! असं रसिकतेला कोंदण देणारं माणूस सापडणं ही भाग्याचीच गोष्ट!