जगप्रसिद्ध “पूना” पानाचे माहेरघर
तुम्ही जर पानाचे शौकीन असाल, तर कलकत्ता,मघई,बनारस ह्याप्रमाणे पूना पानही खूप प्रसिद्ध आहे-होते.मला लहानपणी आठवतं की मी वडिलांनी “जारे पानपट्टी वरून सगळ्यांना पानं घेऊन ये” म्हटलं की “पूना मसाला” च घेऊन यायचो.आताही मी पान खातो, पण कलकत्ता किंवा तत्सम. पूना किंवा “देशी” पान अभावानेच.पण सर्व छोट्या गावांमध्ये किंवा इथेही छोट्या छोट्या पान टपऱ्यावर साधं पान मागितलं तर ते “पूना”च असतं.मला आठवतं त्याप्रमाणे हे पान डबल (दोन पानांचे) लावलं जातं; त्यात फक्त कात-चुना-सुपारी आणि एखादा तामुल शौकीन असल्यास काही अंशी तंबाखू अशा पद्धतीने हे पान जास्त प्रमाणात खाल्लं जातं. अर्थात पूना हा पानाचा प्रकार झाला, त्यात तुम्हाला हवा तो माल-मसाला घालून तुमचा खास विडा तयार करायला पानवाला तयार असतोच.
ही पानं येतात तरी कुठून ?
बनारस आणि मघई बद्दल मी ऐकलं होतं , की ही पानं तिथून उत्तरेतूनच येतात म्हणे. कालकत्त्याचाही यथावकाश तपास लागेलच, पण “पूना” चा उगम अगदी ओघाओघानेच परवा अॅग्रोवन मध्ये सापडला , आणि माझी पावलं अगदी आपसूकच “निमगाव-केतकी” ह्या गावाकडे वळली.पुणे जिल्ह्यात ,पण थोडसं दूरवर म्हणजे सोलापूर-पुणे जिल्ह्याचा सीमेजवळ हे गाव आहे.येथे सविस्तर पोचायचं कसं हा उल्लेख येईलच, आधी इथल्या वैशिष्ट्याविषयी थोडंसं ...
निमगावचा पानाचा बाजार
पानं ही नागवेलीवर येतात, हे सर्वश्रुत आहे. पूर्वी म्हणे निमगावात भरपूर पान मळे होते. तेव्हापासून इथे पानांचा बाजार भरतो. काहींच म्हणणं ५०, तर काहींचं ७०, काही तर म्हणतात की १०० वर्षांहूनही जास्त जुना इथला बाजार आहे. सत्य काहीही असलं तरी हा बाजार “जुना-पुराणा” आहे हे नक्की. आजमितीला काही अगदी थोडेच मळे इथे-म्हणजे निमगावात शिल्लक आहेत, पण बाजार मात्र भरतो. आजूबाजूच्या खेड्या पाड्यातून, शेतकऱ्यांनी पानाची लागवड केलेली आहे, ते इथे पानं घेऊन येतात, किंवा पाठवतात, अडते त्यांचा लिलाव करतात, अशी ही पारंपारिक पद्धत आहे.काही मंडळी जीप-ट्रेलर मधून, काही बैल-गाड्यांतून , तर काही चक्क मोटार सायकलींवर देखील हे घेऊन येतात. त्यांचे अडते ठरलेले असतात.तिथे तिथे ते-ते डाग लावून ठेवले जातात.आवाज दिला जातो, खरेदीदार किंमती पुकारतात, १-२-३ पद्धतीनेच व्यवहार ठरतो. पैशांचा हिशोब होतो, सौदा पूर्ण.
मालाचे इको-फ्रेंडली वेष्टण
ही पानं एका खास वेष्टणातून बाजारापर्यंत आणली जातात. त्यात मी पाहिल्याप्रमाणे प्लास्टिक अभावानेच सापडले. मला वाटतं, फक्त गुंडाळायला जो धागा किंवा रस्सी लागली तेवढीच बहुधा प्लास्टिक असावी. संपूर्ण पानांचे ढीग हे उसाच्या पाचटामध्ये गुंडाळलेले असतात. चांगलं जाड-जूड वेष्टण असतं हे. आतील तापमान थंड राहावं ह्याकरिता केलेली ही अगदी नैसर्गिक, अत्यंत कमी खर्चिक अशी “packaging system” आहे. शिवाय प्रत्येक डाग तयार झाला की त्यावर विक्रेता-खरेदीदार ह्यांची नावं टाकण्याकरिता एक पट्टी असते. तीही केळीच्या खोडाचा निरुपयोगी भाग वापरून केलेली असते.इथेही पुन्हा काटकसर-हिशोब हा आहेच! निमगाव हे इंदापूर-बारामती-अकलूज ह्या उस पट्ट्याच्या अगदी लागून असल्याने इथे उसाचे पाचट अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध असतंच. शिवाय केळी बागासुद्धा आहेत. आणि प्रथेप्रमाणे,आपला बळीराजा कमीत कमी पैसे खर्च करून काटकसरीने त्याचे packing करतो. ते सुद्धा कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाला हानिकारक असे waste न ठेवून !
दर्जानुसार किंमती
पानांच्या किंमती त्यांच्या दर्जाप्रमाणे ठरतात. मला काही विशेष नाही समजलं, परंतु मी एक पान खाल्ले. ते थोडे जास्त तिखट होते, हे पुढचे पान खाल्ल्यावर कळले. माझे निमगावातले मार्गदर्शक श्री.विठ्ठलराव जाधव ह्यांनी पुढे खुलासा केल्याप्रमाणे कमी तिखट पान अधिक चांगल्या दर्जाचे होते. ते लिलावात साधारण ४००० रु. डाग असे विकले गेले, तर जास्त तिखट वालं पान १७००-१८०० रु डाग याप्रमाणे.मुळात एका डागात ३०० कवळ्या असतात. एक कवळी म्हणजे ४०० पाने. म्हणजे एका “डागा”त सुमारे १२,००० पानं असतात. सर्वाधिक किमतीचं जे पान होतं त्याला “कळी” चं पान म्हटलं जातं.
निमगावातच हा बाजार का ?
नक्की काही कारण नाही कळू शकलं. पण आसपासच्या भागात इथे बरेच पान मळे आहेत. नागवेलीला जास्त कोरडं व उष्ण हवामान, तसेच तापमानात अचानक होणारे बदल मानवत नाहीत. ४० अंशाच्या वर तापमान गेलं , तर वेलीची वाढ खुंटू शकते , पानेही जळू लागतात. ह्या सर्व बाबी , असं वातावरण ह्या सर्व भागात पूर्वापार ह्या पिकाला ह्याच भागात मिळत असणार, म्हणून हा भाग. आणि सर्वात जास्त बागा निमगावात असतील एखादे वेळेस , म्हणून निमगाव. तसं भौगोलिक दृष्टीने बघितलं , तर निमगाव हे बारामती-इंदापूर-माळशिरस ह्या तीन तालुक्यांच्या हद्दीवर वसलेलं आहे. त्यामुळे व्यवहारही जास्त होत असतील.
असाच बाजार गोकाक (कर्नाटकातील) ह्या गावीसुद्धा भरतो , असं माझ्या आईने मला सांगितलं. ही बहुधा २० एक वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. आता गोकाक काय किंवा निमगाव काय, दोन्हीही “थंड” किंवा “आर्द्र” हवामानासाठी गणले जात नाहीत. खरं म्हणजे थोडं “उष्ण”च हवामान आहे ह्या दोन्ही ठिकाणांच , मग तरीही इकडेच का ? ह्याचं तार्किक उत्तर नाही मिळू शकलं.
हे असं वातावरण आपल्या कोकणात तयारच आहे की. मग कोकणात का नाही ? काही तरी शास्त्रीय कारण असेल. नसेलच, तर हे पिक कोकणात घ्यायला उत्तम वाव आहे !
गुटख्या मुळे पानांना अवकळा !
“तरी बी आता पूर्वीसारखा बाजार न्हाय!” जाधव सांगत होते. कारण ? एक म्हणजे सतत तिसरं सलग वर्ष दुष्काळ , शिवाय लोकांच्या बदललेल्या सवयी. सोयीस्कर असा गुटखा लोकांना अधिक पसंत.खिशात पुडी ठेवली, टाकली तोंडात, काम संपलं. पानाची झंझट कोण करणार ? अर्थात ही मतं झाली. पण पूर्वीपेक्षा निम्मासुद्धा बाजार आता नाही , असं मात्र अनेक लोकं म्हणत होती. म्हणता म्हणता जाधवांनी एक-दो-तीन ठिकाणांहून पानं घेऊन माझ्या पोतडीत नको-नको म्हणत असतानाही कोंबलीच. वर परत “आजच्याला थांबून उद्या गावाचा कुस्तीचा आखाडा बघूनच जावा” असा स्नेहांकित आग्रहही केला. ही खरी श्रीमंती! कृत-कृत्य वाटलं !
निमगावात कसं जाल ?
पुणे-मुंबई-नाशिक कडून आलात, तर पुणे-सोलापूर रस्ता.इंदापूर पर्यंत यायचं.पुढे इंदापूर बारामती रस्त्याने निमगाव-केतकी (एसटीने फक्त २० मि).टमटम अर्थात शेअरिंग रिक्षाही बस स्थानका बाहेरून चालतात.
दुसरा मार्ग पुणे-बारामती-निमगाव. स्वारगेट हून बारामती नॉन stop एसट्या सतत चालूच असतात. पुढे बारामती-इंदापूर.
सोलापूर कडून आलात तर अकलूज किंवा इंदापूर मार्गे, सातारा-कोल्हापुरातून आलात, तर सातारा-बारामती, पुढे बारामती-इंदापूर रस्त्यावर निमगाव-केतकी.
बाजाराची वेळ, दिवस साधा
आठवड्यात ४ दिवस हा बाजार भरतो. रविवारचा दिवस खास असतो, बाजार दुपाराहून भरतो. साधारणत: ५ च्या पुढे. माझ्यासारखेच एसटीने जाणार असाल, तर साधारणत: ४-४.५ तास आधी निघा-म्हणजे स्वार-गेट हून एसटी पकडा. स्वत:च्या वाहनाने जाणार असाल, तर ३-३.५ तासांत सहज पोचाल.साधारण १५० किमी अंतर असेल.
क्षमस्व : मोबाईल वरून फोटो घेतलेत, काही काही चांगले नसतील आलेले !
प्रतिक्रिया
24 Apr 2016 - 4:15 pm | mugdhagode
..
24 Apr 2016 - 4:33 pm | तर्राट जोकर
सुंदर लेख. आवडला. असं काहीतरी हटके यायला पाहिजे.
24 Apr 2016 - 5:49 pm | १००मित्र
तुमचे हटके user name ही खूप आवडले ... तर्राट जोकर .... भारी !
24 Apr 2016 - 5:01 pm | कैलासवासी सोन्याबापु
लेख फारच सुंदर आहे! आमच्या जन्मगावच्या उत्तरेला सातपुडा डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेल्या आकोट (जिल्हा अकोला), अचलपुर, परतवाङा (जिल्हा अमरावती) इकडे ही नागवेलीची शेती भरपुर होते, अर्थात मला तुम्ही जितके डिटेल दिले आहेत तितकेसे ज्ञान नाही, कुठली पाने लागवड केली जातात ती पण कल्पना नाही, पानमळ्यात उन्हाळ्याच्या दिवसात खुप गार गार वाटते, तरीही इकडे खाट टाकून झोपायला कोणी येत नाही कारण मळ्याच्या गारव्यामुळे साप किरडु भरपुर सापड़तात मळ्यात. जुन्याकाळी बलुतेदारी व्यवस्था असताना एक जात फ़क्त पानमळे कसणारी म्हणून प्रसिद्ध होती आमच्याकडे, ती म्हणजे "बारी समाज" , अर्थात आजकाल जातीपाती तुटल्या वगैरे म्हणले तरी आजही बारी समाजातले लग्न असले की पत्रिकेवर श्री गजानन महाराज व श्री गणपती प्रसन्न सोबत मानाने श्री नागवेली प्रसन्न असे मानाने लिहून ह्या वनस्पतीचा आदर केला जातो,
जात अन वेलीचा पत्रिकेवरील उल्लेख हा फ़क्त एक वेगळी सांस्कृतिक ओळख म्हणून दिला आहे, तो देण्याचा उद्देश्य जातीयवादी नाही
24 Apr 2016 - 5:47 pm | १००मित्र
प्रिय सोन्याबापू ...
मी परतवाड्याला गेलेलो आहे. तो भाग संत्र्याकरता जास्त प्रसिद्ध आहे.
उत्कृष्ट संदर्भ दिलात !
भारतीय समाजव्यवस्थेत निसर्गाला असाधारण महत्त्व दिलेलं आहेच, माता पिता तोच असतो. देवही तोच. श्री नागवेल प्रसन्न ...वा वा !
25 Apr 2016 - 10:56 pm | ईश्वरसर्वसाक्षी
इधर खालि कपुरी अउर पट्टी (कलकत्ता) हि मिलेगा भाई !
१२० एकदम प्युअर है साब. सुपारी भुज्जि मिडियम
समझा क्या बापु
24 Apr 2016 - 6:59 pm | अभ्या..
मस्त लेख. माझ्या वडीलांच्या आजोळी (सुर्डी, माढा वैराग रोडवर) येथे पानमळे असत. बार्शीत पण पानकट्टे असायचे.
नागवेलीच्या रानात गारव्यामु़ळे नाग फिरतात हे लहानपणापासून ऐकलेले.
अवांतर : त्यांच्या घरी एकदम अॅन्टीक कारच्या आकाराचा पितळी पानाचा डबा होता. लहानपणी त्याचे फार कौतुक होते मला. लाख प्रयत्नानी तो मिळाला नाहीये मला. :(
25 Apr 2016 - 8:59 am | १००मित्र
सुर्डी म्हटल्यावर आमचे एक मित्र आठवताहेत. प्रशांत सुर्डीकर.
ते तुमचे कोण ? असा प्रश्न आगाऊ असल्याने मी विचारणारच !
#माणसांमध्येप्रचंडinterest
26 Apr 2016 - 4:48 pm | अभ्या..
सौमित्रा प्रशांत कुणी नाहीत रे नात्यात. सुर्डीकर नाव पण आता पाटील लावले गेलेय.
25 Apr 2016 - 11:55 am | पुंबा
सोलापूर जिल्ह्यातच मंगरूळ नावाचे गाव आहे. त्या गावाला पानमंगरूळ म्हणतात आणि निमगावला देखील पानाचे निमगाव असच म्ह्णतात. दोन्ही गावात पानाचे मळे असत आणि निमगावच्या पान बाजारामुळे दोन्ही गावात बराच संपर्क असे. पान हा दोन्ही गावांना जोडणारा दुवा आहे. सुर्डी आणि मंगरूळ जवळच आहेत ना?
26 Apr 2016 - 4:34 pm | १००मित्र
व्वा ! पानाची गावं यायला लागली समोर !
धन्यवाद मिपा !
26 Apr 2016 - 4:47 pm | अभ्या..
सुर्डी बार्शी साईडला. पानमंगरुळ अक्कलकोट साइडला. सोलापुर जिल्ह्याला लागून तुळजापूर तालुक्यात एक मंगरुळ आहे पण ते वेगळे.
24 Apr 2016 - 7:41 pm | जव्हेरगंज
वा वा वा ! मस्त लेख! मन प्रसन्न झाले ! आता एखादा तोबरा भरून घ्यावा कि काय असे वाटले !
25 Apr 2016 - 9:00 am | १००मित्र
पिंकही टाका .. फकस्त डब्यात !
धन्यवाद ...!
24 Apr 2016 - 8:24 pm | विद्यार्थी
विड्याच्या पानांबद्दल एवढी माहिती नव्हती मला आजवर. माहितीपूर्ण लेखाबद्दल मनःपूर्वक आभार.
25 Apr 2016 - 9:02 am | १००मित्र
शप्पथ.
पण फिरण्याच्या आणि आगळ्यावेगळ्या ठिकाणी फिरण्याच्या नादानं हे सगळं घडलं !
धन्यवाद
24 Apr 2016 - 8:51 pm | अजया
नवीच माहिती कळली लेखामुळे.छान आहे लेख.आवडला.मिपावर स्वागत.
25 Apr 2016 - 9:03 am | १००मित्र
मिपावर पूर्वी ल्ह्यायचो.
आता परत ल्ह्यावेसे वाटले !
24 Apr 2016 - 11:13 pm | एस
उत्तम लेख. आजकाल पानमळे कमी होऊ लागले आहेत कारण गुटखा तर आहेच. शिवाय पाण्याची व मजुरांची अनुपलब्धता हेही आहे. पानांमध्ये सध्या कलकत्ता व बनारसच जास्त मिळतेय. मघईसुद्धा कमीकमी होऊ लागलेय. अर्थात याबद्दल गुर्जींसारखे जाणकारच जास्त सांगू शकतील म्हणा.
25 Apr 2016 - 9:06 am | १००मित्र
येईलच बहुधा ओघाने.
धन्यवाद !
24 Apr 2016 - 11:41 pm | दा विन्ची
मस्त लेख आणि माहितीपण. आमच्याकडे मिरजेजवळ आरग - बेडग म्हणून अशीच पान मळ्यासाठी प्रसिध्द गावे आहेत. तीन चार वर्षापूर्वी गावातल्या तरुण पोरांच्यात बुलेट ३५० ची क्रेझ आली होती. तीन महिन्यात एका गावात १२० बुलेट घेतल्या म्हणे पान मळ्याच्या पैशावर. गावातल्या कारभारी मंडळींनी समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाहीं. चक्क चेन्नई मधून रॉयल enfield ची माणसे गाव बघायला आली होती अशी चर्चा होती.
25 Apr 2016 - 9:07 am | १००मित्र
वाह ! ह्याला म्हणतात अपडेट्स !
गाव पहायला नक्कीच आवडेल !
25 Apr 2016 - 10:05 am | नीलमोहर
छान वेगळी माहिती मिळाली.
आमच्या ऑफिसच्या जागेतील बागेत बर्याच नागवेली आहेत, ती पानेही खूप सुंदर आणि तिखटपणा कमी.
तिथे अजूनही बरीच जुनी झाडे आहेत, रबर, आंबा, दुर्मिळ कवठी चाफाही आहे. मात्र साप येत असतात हे खरंच.
25 Apr 2016 - 3:48 pm | १००मित्र
धन्यवाद
25 Apr 2016 - 11:09 am | प्रचेतस
लेख भारीच.
25 Apr 2016 - 11:15 am | एस
बादवे, ही नागवेल घरी एखाद्या कुंडीत लावायची झाल्यास कशी लागवड करायची, काय काळजी घ्यावी इ. मार्गदर्शन कुणाकडून मिळाल्यास आभारी असेन.
26 Apr 2016 - 6:16 pm | राजेंद्र मेहेंदळे
फार काही काळजी घेत नाही मी. फक्त माती चांगली असेल आणि रोज पाणी घालत रहिले की मस्त पाने येत राहतात. वेल नाजुक असल्याने आधार देउन वर चढवावा लागतो. मात्र घरच्या वेलीची पाने बाहेरच्या पानाप्रमाणे मोठी नाहित.
25 Apr 2016 - 11:25 am | पुंबा
मी निमगाव केतकीचाच आहे.. माझ्या गावाबद्दल मिपात वाचताना काय वाटले हे कसे सांगू.. आता निवांत प्रतिक्रिया देतो.
25 Apr 2016 - 3:50 pm | सविता००१
मस्त लेख. याबद्दल काहीही माहिती नसल्याने ह लेख वाचून बरंच काही कळालं.
26 Apr 2016 - 4:23 pm | १००मित्र
सविता ००१ हे अगदि ००७ सारखं वाट्तं ...!
27 Apr 2016 - 10:40 am | सविता००१
म्हणूनच तर घेतलंय ना हे नाव... :))
25 Apr 2016 - 10:22 pm | बोका-ए-आझम
छत्तीसगड राज्यात, बहुतेक राजनांदगाव जिल्ह्यात पानगार म्हणून गाव आहे. तिथे नागवेल हेच गावातलं मुख्य पीक आहे. एकदा कामानिमित्त त्याच्या जवळून जायचा योग आला होता. तेव्हा हे पाहायला मिळालं होतं. तिथे उन्हाळ्यात येणारा ताप, सर्दी, खोकला या सगळ्यांवर पान हेच औषध म्हणून वापरलं जातं. पानगारची हवा विदर्भाप्रमाणेच आहे. थंडी आणि उन्हाळा - दोन्हीही अफाट आणि पाऊस ठीकठाक. पण तुमच्याएवढी सखोल माहिती देणारा तेव्हा कोणी भेटला नाही.
- (१०१वा मित्र) बोका-ए-आझम
26 Apr 2016 - 4:32 pm | १००मित्र
पानगार ...व्वा मिया ! क्या नाम है !
नाम मेईच पान भी और "गार" भी !
ही सगळी सखोल माहिती फक्त २० मिनिटात मिळाली. एकमेव कारण म्हणजे आमचे निमागावातले (तिथेच झालेले) मित्र श्री विठ्ठलराव जाधव आणि माझे फाटके ( विंग्रजीत ह्याला ice breaker असं म्हणतात ) तोंड.
25 Apr 2016 - 11:32 pm | कंजूस
असाच एक लेख देण्यासाठी पडघा येथे जा.आता मे महिन्यातले चारपाच रविवार सुकटाचा ( सुकवलेली मासळी )मोठा बाजार भरतो.शिवाय भातशेतीसाठी लागणारी पानं शिवलेली डोरली वगैरे विकली जातात.खरा गावठी बाजार.फोटोग्राफरना पर्वणी आहे.टिटवाळाच्या पुढच्या खडवली स्टेशनवरून ओटो/बस असतात.साताठ किमी.कल्याण बस डेपोतून पडघा बस असतात सतत.भिवंडीवरूनही नाशिक रोडवर आहे.रविवार दुपारनंतर बाजार उठतो.
26 Apr 2016 - 4:38 pm | १००मित्र
पुढच्याच रविवारी .. पडघा . फिक्स !
कंजूस ने माहितीत अजिबात कंजूस पणा केलेला नाय !
धन्यवाद !
26 Apr 2016 - 4:45 pm | सूड
डोरली नसेल हो, इरलं (अनेकवचन: इरली) असेल. डोरलं म्हणजे घाटवळणाचे लोकात मंगळसूत्राला पर्यायी शब्द!!
26 Apr 2016 - 9:08 pm | मार्मिक गोडसे
इरलंच म्हणतात.
धन्यवाद कंजुसकाका. इरलं खरेदीसाठी एखाद्या रविवारी पडघ्याला जावूनच येतो.
मस्त थंडगार धागा.
26 Apr 2016 - 11:13 am | पुंबा
कुस्ती आणि पानमळे ही निमगाव केतकीची मानचिन्हे. या गावालाच पानाचे निमगाव या नावाने ओळखले जावे, यातच पानाचे महत्व जनजीवनात किती असावे याची साक्ष मिळते. सबंध राज्यातील कुस्तीगीरांत इथला आखाडा प्रसिद्ध आहे आणि पानाच्या व्यापार्यांत पानबाजार. घटते पर्जन्यमान, पाने खुडन्यासाठी लागणार्या कुशल कामगारांची घटती संख्या आणि म्हणूनच वाढती मजूरी, शेतीचे विखंडीकरण, आणि असल्या प्रचंड खाटल्याला लागणार्या मोठ्या कुटुंबांची झालेली फूट अश्या अनेक कारणांंमुळे पानमळ्यान्ची संख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. असे असले तरी पान बाजार मात्र आपला आब टिकवून आहे आणि कुस्तीदेखील. पानासारखे नगदी पीक हातातून गेले तरी या भागातील शेतकरी डाळींबासारख्या, ऊसासारख्या नगदी पिकांकडे वळले आहेत. अक्षरशः करोड रू. कमावनारेही शेतकरी इथे आहेत त्याचप्रमाणे सलग ३ वर्षे पाऊसच न पडल्याने कंगाल झालेले देखील आहेत. ते थंडगार पानमळे, ती प्रचंड मोठी एकत्रीत कुटुंबे, पानाचे गाव अशी ओळख हे सर्व नाहीसं होतंय याचा विशाद वाटावा का असा प्रश्न पडतो कधी कधी. माझ्या गावाबद्दल बोलायला मिळालं याचा आनंद केवळ तुमच्यामुळे मिळतोय १००मित्र, धन्यवाद.
26 Apr 2016 - 4:42 pm | १००मित्र
प्रिय सौरा
पाण्याचे संकलन हा एकमेव पर्याय राहिलाय आपल्यासमोर आता !
online बाजारांत हे असे विशेष बाजार नामशेष होणार नाहीत ना ह्याची काळजी आपणच घ्यायला हवीय !
कुस्तीच्या आखाड्याबद्दल विठ्ठलराव हेच म्हणत होते !
26 Apr 2016 - 11:17 am | पैसा
उत्तम लेख! आवडला.
26 Apr 2016 - 11:24 am | सस्नेह
माहितीपूर्ण लेख.
पानामध्ये 'ई' व्हिटॅमिन भरपूर असते. ताजे हिरवे मघई पान गोडीला सरस.
27 Apr 2016 - 12:37 am | बॅटमॅन
पानावरचा लेख आवडला. मिरजेहून नरसोबावाडीला जाताना शिरोळच्या जरा आसपास पानमळे पाहिलेत. आरगबेडगकडे तर आहेतच.
अवांतरः तांबूलमंजरी या नावाचा २००-३०० वर्षांपूर्वीचा एक संस्कृत ग्रंथ आहे. लेखक अज्ञात असला तरी बहुधा मराठीच असावा. त्यात पानाचे अनेक प्रकार, विडे बनवण्याच्या पद्धती, त्यातले घटक, आणि एकूणच त्याचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून सांगितलेले गुणधर्म इ. ची रोचक चर्चा आहे.
जिज्ञासूंना हा ग्रंथ इथे पाहता येईल. बडोदा येथील ओरिएंटल इन्स्टिट्यूटने १९५८ साली प्रकाशित केलेला आहे.
http://www.dli.ernet.in/handle/2015/367527
27 Apr 2016 - 12:47 am | तर्राट जोकर
क्या बात है, ह्याला म्हण्तात रसिक. व्वा!
29 Apr 2016 - 11:28 am | १००मित्र
रसिक आणी व्यासंगी !
27 Apr 2016 - 3:49 am | जुइ
उत्तम माहितीपूर्ण लेख!
27 Apr 2016 - 8:37 am | दत्ताभाऊ गोंदीकर
आणखी एक निमगावला मटण लय झ्याक मिळतं.
27 Apr 2016 - 8:50 am | सुनील
बोकडांना पानं खायला देत असतील!!
बाकी पानाचा फारसा शौक नाही पण माहिती आवडली.
वर कंजूस यांनी म्हटल्याप्रमाणे पुढील महिन्यात पडघ्याला जाऊन सुक्या मासळीचा बाजार बघायची इच्छा आहे!
27 Apr 2016 - 9:56 pm | अभ्या..
हिरव्या मटणाची रेसिपी भौतेक निमगावलाच मिळेल. ;)
एखादे रसिक बोकडाची कदाचित जाफरानी मटन बिर्यानी सुध्दा असेल. ;)