खरतरं 'वन डिश मील' यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या जास्त योग्य समजते. विविध भाज्या, वेगवेगळ्या डाळी तसेच कधी दलीया तर कधी ओटस वापरून मी खिचड्या करते. पण हि स्पर्धा आहे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण हवा. असंही बऱ्याचदा माझ्याकडे अप्पे असतातच. कमी वेळात आणि कमी तेलात होणारा हा पोटभरीचा प्रकार, माझ्या घरात खूपच प्रिय आहे.
एकच पदार्थ करायचा तर तो पूर्णान्न हवा. कर्बोदके, प्रथिने खनिजे इत्यादी गोष्टींचा समतोल असणारा हवा. मुख्यत: रात्रीच्या जेवणासाठी आपण 'वन डिश मील' चा पर्याय स्वीकारतो. त्यामुळे हा पदार्थ फारसा कटकटीचा नको. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे पौष्टीकते बरोबर चटपटीतही हवा. रात्रीची वेळ असल्यामुळे पचण्यास हलका हवा. मसाले सुद्धा अतिशय कमी लागतात. अश्या सगळ्या बाबींचा विचार केल्यावर मी 'पूर्णान्न अप्पे' हाच पदार्थ करायचे निश्चित केले.
साहित्य:
- मुग डाळ- १ टीस्पून
- मसूर डाळ- १ टीस्पून
- चणा डाळ- १ टीस्पून
- तूर डाळ- १ टीस्पून
- उडीद डाळ- १ टीस्पून
- लसूण पाकळ्या- २
- हिरवी मिरची- ३ ते ४
- आल- १ इंच
- जिरे- १/२ टीस्पून
- बारिक चिरलेला पालक - १/२ कप
- गाजर, सोलून व किसून- १/२ कप
- उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४ कप
- रोल ओटस- १/२ कप
- रवा- १/२ कप
- हिंग- १/४ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- दही- १/४ कप
- खाण्याचा सोडा- १/२ टीस्पून
- पाणी- अंदाजे १/२ कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
- मीठ- चवीप्रमाणे
- तेल- जरुरीप्रमाणे
कृती:
- सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
- सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे.
- वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
- दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
- ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे.
- अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
- त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे.
- एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
- छान टम्म फुगतात. टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.
मी इथे चटणी वेगळ्या प्रकारची केली आहे:
काळ्या मनुकांची चटणी: १०-१२ काळ्या मनुका, १ आमसुल, काळ मीठ-मिरची पूड-जीरे पूड चवीप्रमाणे घेवुन जरासे पाणी घालून वाटावे.
टीपा :
- मी इथे सजावटीसाठी अप्पे मधून कापून त्याचे दोन तुकडे केले आहेत आणि टूथपिकमध्ये टोचले आहेत.
- जर अप्पे पात्र नसेल तर या मिश्रणाचे उत्तपे करू शकता.
- हे अप्पे गरम असतानाच खावे. पारंपारिक अप्पे फारसे खरपूस भाजून घ्यावे लागत नाहीत परंतु यात ओटस असल्यामुळे खरपूस भाजून घ्यावेत, नाहीतर गिळगिळीत लागतात.
प्रतिक्रिया
20 Apr 2016 - 5:27 pm | विजय पुरोहित
सजावट फार मस्त केलेली आहे. काळ्या मनुक्याच्या चटणीची कल्पना पण एकदम भारीच!!!
20 Apr 2016 - 5:41 pm | विवेकपटाईत
मस्त करून बघेन
20 Apr 2016 - 6:29 pm | पिलीयन रायडर
खुपच मस्त पाकृ! नक्की करुन पाहिन!
20 Apr 2016 - 6:57 pm | उल्का
मस्त पाकृ! सजावट तर अप्रतिम!
21 Apr 2016 - 12:23 am | श्रीरंग_जोशी
वाह फारच दिलखेचक सजावट.
अप्प्यांचा हा प्रकार एकदम पौष्टिक वाटत आहे. तपशीलवार पाककृतीसाठी धन्यवाद.
21 Apr 2016 - 1:25 am | एस
ओट्स हा प्रकार अजिबात आवडत नसल्यामुळे पास. पण सजावट काय केलीये!
21 Apr 2016 - 2:03 am | स्रुजा
फार च सुरेख ! तुझ्या सजावटीबद्दल नेहमीच कौतुक वाटतं. काळ्या मनुकांची चटणी तर क्या केहने ! या वीकांती करुन बघेन.
21 Apr 2016 - 2:35 am | जुइ
खूप पौष्टिक दिसत आहे.
21 Apr 2016 - 10:46 am | सविता००१
छानच पाकृ.
आणि सजावटही उत्तम
21 Apr 2016 - 1:02 pm | बरखा
खुप दिवसांपासुन अप्पे बनवायचे होते. आता करुन बघेन. खास करुन काळ्या मनुकाची चटणी ह प्रकार आवडला.
सजावट मस्त...:)
21 Apr 2016 - 5:37 pm | अनन्न्या
मस्त दिसतायत आप्पे.
21 Apr 2016 - 5:43 pm | अजया
छान पाकृ.