सर्व वाचकांना पुस्तकदिनाच्या शुभेच्छा!
पुर्वीच्या काळी पोथ्या ,पुस्तके तयार करण्यासाठी लिथोग्राफी तंत्राचा वापर करत असत. हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम असे .तसेच कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक असे. या तंत्राने पुस्तक निर्मितीला अनेक मर्यादा येत.चित्रशाळा प्रेस ,निर्णयसागर प्रेस तसेच राजा रवीवर्मांची मळवली येथील प्रेस ही काही उदाहरणे आहेत.
नंतरच्या काळात शिसाच्या अक्षरांचे टाईप तयार करून अक्षरजुळणी केली जात असे. यात अनेक सुबक वळणदार छापाची अक्षरे तयार होऊ लागली.यात देखील अनुभवी टाईपसेटर्सची गरज असे . तासन् तास अत्यंत बारकाईने शुद्धलेखनाचा विचार करून काम केल्यावर ही पुस्तके तयार होत.दिवसाकाठी ४ते८ पाने तयार होत असत. या दोन्ही प्रकारांत चुकीला माफी नव्हती. अत्यंत काळजीपुर्वक पुस्तक निर्मिती केली जात असे. त्यावरच पुस्तकाचा ,अनुषंगाने प्रकाशकाचा दर्जा सिद्ध होत असे.
संगणकायुगात इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे या व्यवसायात देखील आमूलाग्र बदल झालेत.
डीटीपीच्या उदयाबरोबर काम कमी माणसांत होऊ लागले. तसेच प्रिंटींग, बाईंडिंगच्या तंत्रात सुधारणा झाली . पुस्तक निर्मिती जलद होऊ लागली.आतातर प्रिंट ऑन डिमांड( pod) ने अगदी कमीतकमी ५ -२५ प्रती देखील छापु शकता येते.स्पेलचेकच्या सुविधेमुळे मुद्रितशोधन देखील कमी कष्टाचे झाले आहे.
पुस्तक निर्मितीतले महत्वाचे टप्पे-
● लेखकांकडून पुस्तकाचे हस्तलिखीत फुलस्केप कागदावर स्वच्छ लिहून घ्यावे.
● डीटीपी करीता पूर्ण सुचना लिहीलेल्या असाव्यात. टाईप (फॉंट) ,साईज यांचा विचार केला असावा. एक प्रकरण टाईप करून त्याचा लेआऊट , लेखनात आकृत्या असल्यास त्यांचा विचार करून पुस्तक अधिकाधिक आकर्षक ,सुटसुटीत व ग्राहकाभिमुख करण्याचा प्रयत्न करावा.पुस्तकाच्या विषयानुरुप त्याला साजेसे मुखपृष्ठ तयार करणे. हल्ली संगणकाच्या मदतीने व अनेक नवनवीन प्रोग्रॅम्समुळे मुखपृष्ठ रचना ,रंगसंगतीत नावीन्य आले आहे.
● डीटीपी व मुद्रित शोधन पूर्ण झाल्यावर महत्वाचा टप्पा म्हणजे पुस्तकछपाई.छपाईसाठी सर्वात महत्वाचा कच्चा माल हा कागद - तो स्वच्छ ,उत्तम दर्जाचा ,टिकाऊ असेल यावर भर दिला गेला पाहीजे. अर्थातच हे पुस्तकाच्या उपयुक्ततेवर अवलंबून असते. मोठमोठे संदर्भग्रंथ, कोश यांचे निर्मितीमुल्य हे कायमच उच्च दर्जाचे असते .त्यासाठी उत्तम कागदाची निवड केली जाते.पुस्तकाच्या आकारानुसार कागदाच्या आकाराची निवड केली जाते ,त्यानंतर पुस्तक छपाईसाठी जाते.
● या नंतर येतो तो बाईंडिंगचा टप्पा पृष्ठसंख्येवर कोणत्या प्रकारचे बाईंडिग करायचे ते अवलंबून असते. बाईंडिंग करत असतानाच पुस्तकाला त्याचा चेहरा म्हणजे अर्थातच त्याचे मुखपृष्ठ लावले जाते. अश्या प्रकारे लेखकाच्या मनातले विचार पुस्तकरुपाने मूर्त स्वरूपात येतात.
पण प्रक्रिया इथेच थांबत नाही . तयार झालेले पुस्तक प्रकाशित करून कधीकधी प्रकाशन संमारभ करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते . हल्ली वेबसाईटच्या माध्यमातून प्रकाशक आपली नवी पुस्तके बाजारात प्रदर्शित करतात. योग्य वितरकाकडे पुस्तक सुपुर्द करून सर्वत्र पुस्तक उपलब्ध करून दिले जाते.
सध्या बाजारात अनेक प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात फंक्शनल पुस्तके आणि नॉन फंक्शनल पुस्तके असे साधारण प्रकार असतात. फंक्शनल पुस्तकांत शैक्षणिक , पाककला बागकाम इ. कलाकौशल्यांवर आधारीत पुस्तके येतात ज्यायोगे ग्राहक काहीतरी शिकू शकतो. नॉन फंक्शनल पुस्तके - ज्यात ललीत, कथा कादंबऱ्या, आत्मचरित्रे अशी मनोरंजन व माहितीपर पुस्तके येतात.
साधारणपणे पुस्तकांचे प्रकार-
● धार्मिक पुस्तके- यात अचूकता हवी , किंमत माफक हवी .
● कथा कादंबऱ्या - दर्जा चांगला व लेखन चांगले असेल तर किंमतीचा विचार न करता वाचक खरेदी करतो. काहीजण नवीन लेखकांना मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घेऊन पुस्तके छापतात पण त्याचा दर्जा चांगला असेलच असे नाही.
● दिवाळी अंक - दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत जवळ जवळ १५०० अंक निघतात. त्यामध्ये किंमती जास्त परंतु जास्तीतजास्त जाहिराती मिळवून त्याचा खर्च नियंत्रित करता येतो.
● सगळ्यात अवघड काम शालेय अभ्यासक्रमावर आधारीत शैक्षणिक पुस्तके छापणे. यात शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचा विचार करावा लागतो. भाषा शहरी व ग्रामीण भागातले विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून निवडावी लागते.तसेच पुस्तकाची किंमत वाजवी ठेवावी लागते जेणेकरून ती सर्वच स्तरातील लोकांना परवडेल.तारेवरची कसरत करून पुस्तक छपाई करावी लागते.
पाऊस ,वाळवी, उंदीरघुशी या सारख्या संकटांना सामोरे जावे लागते. कधीकधी यामध्ये फायद्यापेक्षा तोटा जास्त अशी परीस्थिती देखील येते. परंतु समाजासाठी काही चांगल्या गोष्टी करतो हे समाधान आणि निर्मितीचा आनंद महत्त्वाचा ठरतो. हा ज्ञानाचा वसा आहे. नवीन पिढी घडवण्यात पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे.
चला तर मग या पुस्तकदिनाच्या निमीत्ताने आपण सुद्धा नियमित वाचनाचा संकल्प करू!
प्रतिक्रिया
23 Apr 2016 - 6:37 am | अजया
प्रकाशन व्यवसायाची ही बाजू प्रथमच कळली लेखामुळे.छान लेख.
23 Apr 2016 - 8:38 am | सानिकास्वप्निल
उत्तम माहिती प्रकाशन व्यवसायाची. लेख आवडला.
23 Apr 2016 - 9:13 am | एस
लेख छान परंतु थोडा त्रोटक वाटला. प्रकाशनव्यवसायात अजूनही बर्याच बाबी असतात. उदा. चांगले लेखक शोधणे, टिकवून ठेवणे, अनुवादासाठी हक्क मिळवणे, इ-बुकसारख्या नवीन माध्यमाशी स्पर्धा, पायरसीशी झगडा इ. बरेच काही. यावर खरेतर स्वतंत्र लेखमाला होऊ शकेल.
23 Apr 2016 - 9:34 am | जेपी
सहमत.
बाकी लेख आवडला..
24 Apr 2016 - 5:09 am | आदूबाळ
+1
असंच काहीसं अपेक्षित होतं. लेखातली बरीचशी कामं - महत्त्वाची असली तरी - रूटीन प्रकारची वाटतात.
23 Apr 2016 - 12:18 pm | अभ्या..
बराच त्रोटक लेख. मुद्रकाचा रोल वेगळा. त्यासंदर्भातली माहीती द्यायची असेल तर अजून देता आली असती.
23 Apr 2016 - 1:05 pm | त्रिवेणी
चांगला प्रयत्न भुमि.तुझ्याकड़े भरपूर माहिती आहे या विषयावर. नंतर सवडीने आणि विस्ताराने लिही अजुन.
23 Apr 2016 - 1:26 pm | पैसा
प्रकाशनातले ठळक टप्पे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद. लेख आवडला!
24 Apr 2016 - 7:32 am | सस्नेह
पुस्तकाच्या मूर्त रूपामागची प्रक्रिया दिल्याबद्दल धन्स !
25 Apr 2016 - 5:55 am | मितान
हेच लिहायला आले होते.
अजून सविस्तर लिहायला आवडेल.
25 Apr 2016 - 5:56 am | मितान
लिहायला नाही गो... वाचायला ;)
सविस्तर वाचायला आवडेल. :)
23 Apr 2016 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा
लेख आवडला.
23 Apr 2016 - 2:41 pm | कविता१९७८
मस्त लेख, प्रकाशनाबद्दलची माहीती ईथे दिल्याबद्दल धन्यवाद
23 Apr 2016 - 2:44 pm | सविता००१
छान लेख आणि प्रकाशनाची कितीतरी माहिती कळाली. अजून लिही गं.
23 Apr 2016 - 4:07 pm | पियुशा
वा ताई ,मस्त माहिती :)
23 Apr 2016 - 6:45 pm | स्रुजा
महत्त्वाचे सगळे टप्पे स्पर्शुन लिहीलेला लेख आवडला. यावर तुझ्याकडुन अजुन सविस्तर वाचायला आवडेल. लेखमाला लिहायचं मनावर घे .
23 Apr 2016 - 7:52 pm | Maharani
छान लेख..प्रकाशन व्यवसयात्ल्या नव्या बाबी समजल्या.
23 Apr 2016 - 8:27 pm | सतिश गावडे
पेपरबैक की हार्डकव्हर हा निर्णय कोण घेते? काय निकष असतात. बरेच वेळा एखाद्या चांगल्या पुस्तकाची हार्डकव्हरमुळे किंमत अव्वाच्या सव्वा वाढते आणि इच्छा असूनही पुस्तक विकत घेता येत नाही.
24 Apr 2016 - 2:52 am | तर्राट जोकर
अभ्याशी सहमत. माफ करा पण भयंकर चुकलेला लेख. उपरोक्त सगळे छपाई तंत्रज्ञानाबद्दल, छपाईच्या प्रक्रियेबद्दल लिहिले आहे. पुस्तकछपाई (बुकप्रिटिंग) म्हणजे प्रकाशन (पब्लिकेशन) नाही.
24 Apr 2016 - 8:47 am | स्वामी संकेतानंद
प्रकाशनव्यवसाय म्हटले की आमचे काही मित्र आठवतात आणि वाटतं की आधी प्रकाशन व्यवसायातील धोके यावरच एक लेख लिहिला जावा.
24 Apr 2016 - 9:39 am | वैभव जाधव
मित्र आणि त्यांना जाणवलेले धोके
की
मित्र आणि त्यांच्याकडून असलेले धोके?
24 Apr 2016 - 10:10 am | स्वामी संकेतानंद
मित्र आणि त्यांच्याकडून असलेले धोके.
24 Apr 2016 - 9:33 am | जव्हेरगंज
छान लिहिलयं, म्हणूनच तर सविस्तर वाचायला आवडेल.
24 Apr 2016 - 12:17 pm | माहितगार
माहितीपुर्ण लेख अर्थात आमच्या सारख्या या विषयाची पुरेशी माहिती नसलेल्या वाचकांना/ लेखकांना अ़जून माहिती मिळावी म्हणून काही शंका विचारून ठेवतो.
मला वाटते हे संगणकावर लिहू न शकणार्या जुन्या पिढीसाठी असावे, संगणकावर अथवा संस्थळांवरुन युनिकोडातून लिहू शकणार्या लेखकांकडून काही विशीष्ट अपेक्षा असतात का ?
२) युनिकोड लेखन डीटीपी वर वापरताना काही विशीष्ट प्रक्रीया कराव्या लागतात का ?
३) टायपींगचा खर्च नसेल तर डिटीपीचा खर्च किती येतो
४) कुणाला जुन्या हस्त लिखीतांचे टायपिंग करून घ्यायचे असेल तर सध्या बल्क टायपिंगचे दर काय आहेत ?
४) संगणक आधारीत मुद्रीत शोधनासाठी सहसा किती पैसे आकारले जातात ?
५) ज्या लेखकांचे अथवा त्यांच्या मित्रांचे शुद्धलेखन / प्रमाण लेखन चांगले असते त्यांना डिटीपीचे काम स्वतःचे स्वतः करुन घेता येऊ शकते का ?
कोणत्या स्वरुपात सूचना लिहून लागतात.
४) पुस्तक कव्हर डिझाईनसाठी सहसा किती खर्च होतो
५) पुस्तक कव्हरसुद्धा प्रिंट ऑन डिमांड( pod) तत्वावर छापणे शक्य असते का ?
६) कागदावर छपाईच्या खर्च + बाईंडींग्चे खर्च आणि ब्रेक इव्हन माहिती देऊन एखादी एक्सेल शीट ज्यात आकडे भरुन पाहता येतील अशी ऑनलाईन कुणि उपलब्ध करु शकेल का ?
७) पुस्तकांचे किंमत निर्धारण कसे करावे ? केले जाते ?
७) छापिल पुस्तके, इ पुस्तके आणि ऑडीओ अथवा ऑडीओ व्हीज्युअल (मराठी) पुस्तकांचे आधूनिक काळातील वितरण कसे साधता/ वाढवता येऊ शकेल ?
24 Apr 2016 - 12:31 pm | नूतन सावंत
भूमी,तुला याविषयाची,खूप माहिती आहेच.आमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी अजून लिहिण्याचे मनावर घे. पुलेशु.
24 Apr 2016 - 1:12 pm | इशा१२३
छान! सोप्या शब्दातील माहितीपुर्ण लेख .बर्याच गोष्टी समजल्या.
24 Apr 2016 - 3:02 pm | भाते
लेख आवडला. यावर सविस्तर लेखमाला वाचायला आवडेल.
हा धागा वाखू म्हणून का साठवता येत नाही आहे?
24 Apr 2016 - 3:23 pm | विशाखा पाटील
लेखात पुढचे महत्त्वाचे टप्पे दिले आहेत. याला लेखक म्हणून माझ्या तुटपुंज्या अनुभवाचे २ पैसे जोडते -
प्रकाशक आणि लेखक यांच्यातला संपर्क हा पहिला टप्पा म्हणता येईल. प्रकाशनसंस्था कोणत्या प्रकारातली पुस्तके छापते, लेखनाचा दर्जा कसा लागतो यावर कोणाशी संपर्क साधावा हे लेखक ठरवतात. काही वेळेस प्रकाशक स्वत:हून उत्तम लेखकांशी संपर्क साधतात. लेखन आवडले की मग करार केला जातो. वर एस यांनी लिहिल्याप्रमाणे उत्तम प्रकाशक लेखकाच्या कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. दूरदृष्टी आणि संवाद कौशल्य हे या व्यवसायाला लागणारे महत्त्वाचे गुण. पहिला मसुदा तयार झाल्यावर लेखक आणि संपादक त्या लेखनावर (बराच काळ) काम करतात.
वर माहितगारांनी हस्तलिखीताविषयी विचारले आहे. मी संगणकावर आणि तेही कृतीदेव ०२५ मध्ये लिहिते. पण software वापरून convert होत असावे. याबाबतीत माझे तांत्रिक ज्ञान इथेच सुरु होते आणि संपते. :)
अंतिम मसुदा तयार झाल्यावर मुखपृष्ठ, ब्लर्ब, आतली मांडणी, छायाचित्रे ही कामे होतात. त्याविषयी भूमीने विस्तृत लिहावे, ही विनंती.
साधारणपणे एक रुपया- एक पान अशी पुस्तकाची किमत ठरते, असे माझे निरीक्षण आहे. ते बरोबर आहे का? तेही सांग.
24 Apr 2016 - 3:37 pm | आदूबाळ
आणि लेखकाची रॉयल्टी साधारणपणे १०% असते ना? हम्म...
24 Apr 2016 - 6:02 pm | माहितगार
आपण चांगली माहिती दिलीत.
करार करताना प्रस्थापित प्रकाशक त्यांना सोइस्कर करार लादत असतील हे शक्य पण तरीही कॉपीराईट आणि रॉयल्टीबाबत शक्य तेवढी लेखकाच्या हिताची लेखकांनी काळजी कशी घ्यावी ह्या बाबत अनुभवी लेखकांनी अधिक माहिती दिल्यास आणि गोपनीयतेची अट नसलेल्या करारांचे मसुद्यांचे सर्वसाधारण स्वरुप ऑनलाईन उपलब्ध केल्यास सर्वंनाच उपयूक्त ठरु शकेल असे वाटते.
24 Apr 2016 - 9:20 pm | उल्का
मला लेख खूप आवडला. खास करून इतिहासातील आणि आताच्या पद्धतीतील फरक सांगत लिहिल्याबद्दल धन्यवाद.
अजून आम्हाला ह्यात सज्ञान करा. तुमचे वेगवेगळे अनुभव पण सांगा. पुभाप्र.
25 Apr 2016 - 10:22 am | पिलीयन रायडर
एका विगळ्या विषयाची सुरवात म्हणुन छान आहे हा लेख भुमी! तू अजुन विस्ताराने लिहीलंस तर खुप आवडेल. अर्थात सगळी व्यवधाने सांभाळुन तू हा लेख लिहीलास ह्याचेही कौतुक आहेच :)
25 Apr 2016 - 10:29 am | क्रेझी
+१
25 Apr 2016 - 10:25 am | प्रीत-मोहर
विस्ताराने लिही भूमीताई. तुझ्याजवळ खूप माहिती आहे हे नक्की.
25 Apr 2016 - 2:25 pm | मधुरा देशपांडे
लेख आवडला. यानिमित्ताने तू लिहिती झालीस हे विशेष आवडले, अजून सविस्तर नक्की लिही.
26 Apr 2016 - 2:42 pm | नाखु
प्रकाशनापुर्वीच कसे "गाजवले" जाते,लेखकांची पळवापळव्/गळेकापू स्पर्धा, वाचकांना जमेस धरणे (जे जालावरही आहे) आणि सर्वात महत्वाचे किंमती आवाक्यात ठेऊन जास्ती नफा मिळवणे शक्य असताना काही किंमती अव्वाच्या सव्वा असतात असे का?
बरेच प्रश्न आहेत वाचकांचेही. लेखक उत्तर देणार नाहीत किमान प्रकाशक्/मुद्रक देतील अशी भाबडी अपेक्षा..
मिपा वाचक नाखु (फुटकळ)
26 Apr 2016 - 2:45 pm | अस्वस्थामा
मस्तच..
26 Apr 2016 - 5:58 pm | Mrunalini
माहितीपुर्ण लेख. :)
27 Apr 2016 - 9:16 pm | इडली डोसा
प्रकाशन व्यवसायातील बदलाचा चांगला आढावा घेतला आहे. अजुन वाचायला आवडेल.
6 May 2016 - 1:06 am | जुइ
लेख आवडला. अजून विस्तारीत स्वरूपात वाचायला आवडेल.
10 May 2016 - 12:57 pm | पिशी अबोली
+१
असेच.
4 Sep 2020 - 7:23 am | OnShree Graphicd
माहिती खूपच छान लिहिली आहे. धन्यवाद!
मला दोन प्रश्न विचारायचे आहेत.
१) दुसरीकडे प्रकाशीत केलेले पुस्तक (pdf) आपण amezon/google books वर विक्रीसाठी ठेवू शकतो काय ?
२) मला digital publication सुरु करायचं आहे, त्याची सरकारकडे नोंदणी करणं आवश्यक आहे काय ? असेल तर, Online नोपणी कुठे करावी ? कृपया माहिती दयावी. धन्यवाद!
माझा Whatspp no -9156 650677
4 Sep 2020 - 9:23 am | चौकस२१२
छान माहिती..
दोन तीन प्रश्न
- प्रकाशकाचे मुद्रक हे प्रमाण पूर्वी आणि आता कसे आहे?
- लेख स्वतःच लिहताना संगणकावर ( मराठी भाषिक) लिहिणे हे प्रमाण वॉडगळे आहे का? कि अजूनही हस्तलिखितच जास्त?
- आय एसबीएन हा क्रमांक कसा मिळवला जातो, त्याचे फायदे? खर्च?