पाडस- राम पटवर्धन यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या द येर्लिंग चा केलेला हा नितांतसुंदर अनुवाद! अत्यंत समर्थ अनुवादांपैकी एक! आपल्याला आवडत्या पुस्तकातला आवडलेला परिच्छेद निवडायचा ठरवल्यावर नक्की कोणते वेचे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे ठरवता येणं फार कठिण झालं. मग आपण अनुवादित पुस्तक वाचतो आहोत हे विसरायला लावण्याची ताकद असलेली भाषा दाखवणारे या पुस्तकातील काही परिच्छेद उद्धृत करावे असं ठरवलं.
नदीशी समांतर अशा एका रस्त्यानं ते उत्तरेकडे वळले. रस्त्याच्या कडेला मॅग्नोलियाचे ताटवे बहरले होते. नंतर त्यांना दोन्ही बाजूलाफुललेल्या कण्हेरी असलेली एक पाणंद लागली. त्यांच्या पुढंच पाणंदीतून लाल पक्षी उडत गेले. अणीदार,पांढर्या रिपांच्या एका कुंपणापाशी पाणंद थबकली. रिपांच्या पलिकडे रंगीबेरंगी तुकड्यांची दुलई जमिनीवर फेकल्यासारखी हुतोआजीची बाग चमकत होती. तिचं पांढरंशुभ्र टुमदार घर हनीसकल आणी जाई यांच्या वेलींनी जमिनीशी घट्ट बांधून ठेवलं होतं. तिथली प्रत्येक गोष्ट ज्योडीच्या आवडीची आणि ओळखीची होती. ज्योडी बागेतल्या पाऊलवाटेनं धावत गेला. वाटेच्या दोन्ही बाजूंना भुरभुरत्या निळ्या गुलाबी तुर्यांनी झाकलेले निळीचे वाफे होते.
ह्या वर्णनातून हुतोआजीचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. अशा चित्रदर्शी वर्णनांनी नटलेल्या ह्या पुस्तकातला हा अजून एक परिच्छेद - अगदी ते नृत्य डोळ्यासमोर उभं करणारा..
त्यानं करकोचे किती आहेत ते मोजले. सोळा होते एकंदर. हॉल्युशिया शहरात त्यानं एकदा 'कोटिल्यन नाच' बघितला होता, तसंच हे करकोचे सहीसही नाचत होते. दोन पांढरेधोप करकोचे बाजूला ताठ उभे होते. ओरडणं आणि गाणं यांचं मिश्रण त्यांच्या विचित्र संगीतात झालं होतं. नाचातल्या सारखीच त्यांची आड लय होती. इतर पक्षी मंडलाकार फिरत होते. त्या मंडलात आणखी एक मंडल होतं आणि ते उलट्या दिशेनं, उजवीकडून डावीकडे फिरत होते. गायक गात होते. नर्तक पंख उभारत होते. प्रथम एक पाय आणि नंतर दुसरा पाय उचलीत होते. आपल्या हिमशुभ्र वक्षभागात चोची लपवीत होते, मग माना वर करीत होते आणि चोची पुन्हा खाली बुडत होत्या. लांब केलेल्या हातांप्रमाणे पंख वरखाली होत फडफडत होते. बाहेरचं मंडल संथ लयीत सरकत होतं. मग आतल्या मंडलानं किंचित वेग घेतला.
अकस्मात सारे थांबले.ज्योडीला वाटलं की नृत्य संपलं असेल किवा आपली चाहूल करकोच्यांना लागली असेल. पण तेवढ्यात ते दोन गवई नर्तकांमध्ये सामील झाले, नर्तकातले दोन पक्षी गायकांच्या जागी उभे राहिले. सर्वजण क्षणभर सज्ज उभे राहिले आणि नाच पुन्हा सुरू झाला. दलदलीच्या नितळ पाण्यात त्यांच्या पडछाया दिसत होत्या. पाण्यातही सोळा करकोचे गोल फिरत होते. संध्याकाळच्या झुळुका गवतावरून वाहत गेल्या. ते झुकू लागलं, सळसळू लागलं, पाण्यावर तरंग उठले. मावळत्या उन्हानं नर्तकांच्या शुभ्र पंखांवर गुलाबी छटा चढवली. एका जादूच्या प्रदेशात जादूचे पक्षी नाचत होते. गवत त्यांच्याबरोबर हलू लागलं, जमीन थरारू लागली. करकोच्यांबरोबर जमीन, मावळता सूर्य, वारा, आभाळ सारी नाचात रंगली. करकोच्यांच्या पंखांप्रमाणंच ज्योडीचेही हात वरखाली होऊ लागले. सूर्य गवतात बुडत होता. सारी दलदल सोन्याने मढली होती. लिलीच्या पानांवर अंधार उतरला आणि पाणी काळवंडलं. मग अकस्मात सारे पक्षी आकाशात उडाले. सूर्यास्ताच्या वेळच्या उर्वरित उजेडाभोवती आभाळात त्यांची माळ तयार झाली.
किती चित्रदर्शी! तो सोळा करकोच्यांचा नाच आपल्यासमोर घडतो आहे असं वाटायला लावणारा..
असे परत परत वाचावेसे वाटणारे किती तरी वेचे ह्या पुस्तकात आहेत. अनुवादापलिकडे जाणार्या राम पटवर्धनांच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं पाडस !
मौज प्रकाशन -प्रथमावृत्ती १९६७ !
५० वर्ष होतं आली पहिल्या आवृत्तीला तरीही पाडस चा ताजेपणा आणि टवटवीतपणा आपल्याला ह्या वेच्यांतून अजुनही जाणवतो.
प्रतिक्रिया
26 Apr 2016 - 7:02 am | अजया
पाडस कितीही वेळा वाचा परत परत आवडत राहणारे पुस्तक आहे!
छान लेख.
26 Apr 2016 - 7:24 am | बोका-ए-आझम
मूळ कलाकृतीएवढाच समर्थपणे केलेला. श्री.म.माट्यांनी अनुवाद म्हणजे एक अत्तर एका बाटलीतून दुस-या बाटलीत ओतणं अशी उपमा दिली होती. त्याचं उत्कृष्ट उदाहरण असलेला अनुवाद.
26 Apr 2016 - 8:15 am | मितान
अगदी अगदी ! अत्तराची कुपी बदलली बस !
कितीही वेळा वाचते पाडस !
26 Apr 2016 - 11:14 am | पुंबा
अहाहा! काय सुंदर उपमा हो..
26 Apr 2016 - 8:13 am | सानिकास्वप्निल
प्रत्येकाच्या संग्रही असावे, वाचनाच्या यादित असावे असे हे पाडस. अप्रतिम अनुवाद केलाय पटवर्धनांनी. माझे लाडके पुस्तक आहे हे.
लेख छान परंतु आणखिन वेचे असते तर अजून आवडला असता. तुला बरे नसतानाही तू हा लेख दिलास हेच काैतुकास्पद आहे ताई त्याबद्दल अनेक आभार :)
26 Apr 2016 - 8:39 am | इडली डोसा
जुन हे पुस्तक वाचले नाही याची खंत वाटली. आता पुढच्या भारत वारीत नक्की मिळवुन वाचणार हे पुस्तक.
26 Apr 2016 - 10:55 am | प्रीत-मोहर
खरय अनुवादित वाटतच नाही हे पुस्तक. इतका सुंदर अनुवाद केलाय लेखकाने. मीही पारायणं करत असते ह्या पुस्तकाची
26 Apr 2016 - 10:56 am | सस्नेह
वाचायला हवे पाडस.
26 Apr 2016 - 11:16 am | पुंबा
किती तरी दिवस हे आणि पु. शी. रेग्यांचं सावित्री वाचायचं ठरवतोय. या आठवड्यात वाचनारच दोन्हिही. या परिचयाबद्दल धन्यवाद.
26 Apr 2016 - 11:23 am | पिलीयन रायडर
तुम्ही सगळ्यांनी इतकं कौतुक केलं आहे की केव्हाचं पाडस वाचायचं ठरवलय. खुप छान पुस्तक ओळख ताई!
अत्तराच्या कुपीची उपमा सुंदरच!
26 Apr 2016 - 12:56 pm | मनिष
खरंच मस्त आहे हे पुस्तक!
26 Apr 2016 - 12:58 pm | एस
अप्रतिम!
26 Apr 2016 - 4:42 pm | सविता००१
अप्रतिम आहे पाडस
26 Apr 2016 - 4:45 pm | पैसा
सुरेख!
26 Apr 2016 - 6:24 pm | Mrunalini
मी नाही वाचले पाडस अजुन. वाचायचे आहे.
26 Apr 2016 - 6:46 pm | राजाभाउ
वा: नितांत सुंदर पुस्तक. अक्षरशा: वेड लावणारं आता हे वाचताना पाडस मधल्या अनेक प्रसंग अगदी धबधब्या सारखे कोसळत आहेत. ज्योडीची पवनचक्की,थोट्या अस्वलाची शिकार, फॉरेस्टर, कुन पक्ष्याच्या कातडी पासुन बनवलेली थैली, स्पॅनियार्ड, हुतो अज्जीचे घर, पेनीला खुळखुळ्या साप चावतो तो प्रसंग, ज्योडीचे पळुन जाणे आणि मग परत येणे असे कितीतरी. आणि ज्योडी परत येतो तेंव्हा पेनीचे ते वाक्य "त्याचे बालपण पाडसा सार्खं पळुन जाताना मी पाहीले" हे वाचताना प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यात पाणी येते.
हे सर्व पुन्हा आठवण करुन दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यवाद.
27 Apr 2016 - 12:04 am | भंकस बाबा
अतिशय अप्रतिम,
यावर एक सिनेमा पण आला होता हॉलीवूडमधे,
ग्रेगरी पेक होता बापाच्या भूमिकेत,
सिनेमा काही जमला नव्हता खास.
27 Apr 2016 - 11:14 am | राजाभाउ
सिनेमाचे नाव सांगु शकाल काय ?
27 Apr 2016 - 12:20 pm | राजाभाउ
सापडल. द येर्लिंग असेच नाव आहे सिनेमाचे पण.
27 Apr 2016 - 12:10 am | यशोधरा
माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक स्वाती ताई. अजून लिहायला हवे होतेस ह्या पुस्तकाबद्दल गं. :)
27 Apr 2016 - 12:12 pm | स्मिता श्रीपाद
मी नाही वाच॑लय हे पुस्तक...आता नक्की वाचणार...
27 Apr 2016 - 12:13 pm | स्मिता श्रीपाद
अनुवादीत पुस्तकांपैकी असंच एक शांताबाई शेळकेंचं चौघीजणी पण मला अतिशय आवडतं
अनुवाद न वाटता, एक मूळ कलाकृती वाटते
27 Apr 2016 - 4:33 pm | Mrunalini
मी वाचलय चौघीजणी.. मस्त आहे ते पण पुस्तक.
27 Apr 2016 - 12:29 pm | अभ्या..
वॉव. मस्त. भारीच पुस्तकाची ओळख स्वातीताई.
माझे अत्यंत आवडते पुस्तक आहे हे. कमीतकमी ७-८ वेळा तरी वाचलेले. अप्रतिम निसर्गवर्णन अन निसर्गाचाच भाग झालेल्या एका कुटुंबाची भावपूर्ण कथा. त्या काळातले वनस्पती, फुले, घरे, प्राणी, खाद्यपदार्थ अन राहण्याची पध्धती याचा जणू कोष अस्ल्यासारखे समृध्द पुस्तक आहे हे.
अप्रतिम मुखपृष्ट अन वुडकट स्टाइलची इल्स्ट्रेशन्स हा पुस्तक आवडण्यातला सर्वात मोठा भाग.
धन्यवाद.
27 Apr 2016 - 4:12 pm | इशा१२३
आवडते पुस्तक. छान लिहिले आहेस स्वाति ताइ.
27 Apr 2016 - 4:12 pm | इशा१२३
आवडते पुस्तक. छान लिहिले आहेस स्वाति ताइ.
1 May 2016 - 2:35 pm | अभिजीत अवलिया
अतिशय सुंदर पुस्तक आहे. माझ्या संग्रहात असलेले एक रत्न.
2 May 2016 - 5:49 pm | पद्मावति
सुरेख!
3 May 2016 - 10:03 am | नूतन सावंत
स्वाती,मस्त,मस्त.
माझे वडील वर्तमानपत्र विक्रेता असल्याने दरमहा न विकल्या गेलेल्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा रद्दीत जात असे.आणि येताना ते तिथून माझ्यासाठी पुस्तके आणत असत. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी या पुस्तकाची गाठ पडली. कुणा चि.राजूला त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्याच्या मावशीकडून मिळालेलं हे पुस्तक होतं.म्हणायला रद्दीवाल्याकडचं,पण नवं कोरं,चिकटलेल्या पुस्तकाची पानंही न सोडवलेलं असं ते पुस्तक माझ्यासाठी अमूल्य भेट ठरलं,माझी वाचनाची आवड जोपासणाऱ्या माझ्या पपांकडून.त्यांनी ते दहा नव्या पैशाला खरेदी केलं होतं.
मग त्याची पारायणांवर पारायणं चालू झाली.कधीही, कोणत्याही पानापासून चालू केलं तरी चालत असे,कारण आधीचा कथाभाग म्हाहीत असेच पण पुढच्या कथाभागातली रंगतही तितकीच कायम असे.हे पुस्तक वाचलं की,सुरुवातीला माझ्या मनात येत असे,”आपल्याला का नाही अशी मस्त पुस्तकं भेट देणारी मावशी?” पण नंतर नंतर मात्र त्या राजूची कीव यायला लागली.त्याला पत्ताच नव्हता की,तो कोणत्या आनंदाला मुकला ते.
गेल्या वर्षापर्यंत हे पुस्तक माझ्याकडे होतं.गेल्या वर्षी माझ्या भाचीच्या दहाव्या वाढदिवसाला ते अमूल्य पुस्तक मी तिला भेट म्हणून दिलं.जेव्हा ती माझ्याकडे यायची तेव्हा मी तिला या पुस्तकातले वेचे वाचून दाखवत असे.मग ती घरी जाऊन माझ्या भावाला जसे आठवेल तसे सांगत असे.माझा भाऊही माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान,त्याच्या बालपणी त्याने हे पुस्तक माझ्याकडून कितीतरीवेला ऐकलेले आणि मग स्वत: वाचलेले असल्याने ही भेट पाहून तिच्यापेक्षा तोच हरखला.
पुस्तकांवर प्रेम कसे करावे हे शिकवणाऱ्या माझ्या ममांनी,त्यांच्या प्रेसमध्ये पाच सहा वेळा बाईंडिंग करून झाल्यावर,प्रत्येक पानाला पांढरा जिलेटीन पेपर लावून केलेल्या बाईंडिंगमुले ते आजही टिकून आहे.आणि माझ्या पपांच्या तिसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाले आहे.एकाच अटीवर,नीट जपून वापरायचे आणि मला हवे तेव्हा वाचायला द्यायचे.तेवढी काळजी माझा भाऊ नक्कीच घेतो. मी त्या डोक्याला डोकी लावून वाचत बसलेल्या बापलेकीकडे पाहते अन् मला मी आणि पपा दिसत राहतात.
3 May 2016 - 10:27 am | राजाभाउ
वा: पुस्तक तर भारी आहेच पण तुमच्या कडच्या पुस्तकाचा प्रवास पण भारी आहे. मी माझ्या मुलाला पण यातल्या अनेक गोष्टी लहानपणी सांगीतल्या आहेत. बघु कधी वाचायला घेतो ते.
9 May 2016 - 6:57 am | जुइ
खासकरून करकोचा नृत्य खूपच भावले. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला.
30 Jun 2016 - 6:31 pm | स्मिता श्रीपाद
२ दिवसांपूर्वी पाडस अखेर हातात पडलं माझ्या....
ईतके दिवस बुकगंगा वर आउट ऑफ स्टॉक होतं....
अक्षरशः वेद लावलय या पुस्तकाने मला...किती सुंदर पुस्तक...ईतके दिवस का नाही वाचलं मी.....पण असो..आता मिळालय ना....
स्वातीताई म्हणते तसं पुस्तकात पावलोपावली ईतके सुरेख उतारे आहेत ना...की बस...मी तर दोन दोन वेळा वाचतेय आत्तासुद्धा आवडलेला उतारा...
ज्योडीची पवनचक्की, पेनी ला साप चावतो तो प्रसंग, करकोच्यांचा नाच, थोट्या ला मारायचा प्रसंग, पेनी आणि फॉरेस्टर मिळुन कोल्यांना मारायला जातात तेव्हा त्यांचा जंगलातला मुक्काम...वाचताना असं वाटतं की आपण तिथेच शेजारी उभे राहुन हे पाहातोय....अतिशय चित्रदर्शी....
स्वाती ताई या पुस्तकाशी ओळख करुन दिल्याबद्दल तुला माझ्याकडुन बॅक्स्टर बेटाजवळची १० एकर जमीन बक्षीस ;-)