एकेकाळी वैभव उपभोगलेल्या, पण आता केवळ त्याच्या खुणा मिरवणाऱ्या एखाद्या गावात जावं. संध्याकाळची कातर वेळ असावी. त्या वातावरणात आपलं मनही नकळत भूतकाळात शिरतं. काळ निसटून चालल्याची हुरहूर मनाला लागते. उदासवाणी छटा आसमंतापासून मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत व्यापून राहते. मृत्यूचं वाटतं तसं ते भीतीदायक दु:ख नसतं, तर भावव्याकूळ होणं असतं. ती व्याकुळता जीवनाच्या क्षणभंगुरतेसाठी असते. कालचे आज तसेच उरले नाही, आताचे पुढच्या क्षणाला तसेच राहणार नाही, ही भावना मनाला अस्वस्थ करते. सगळं असूनही जीवनात काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. ही उदासी केवळ आपल्यापुरती मर्यादित नसते, तर ती सर्वाना कवेत घेते. तर्की भाषेत त्याच्यासाठी खास शब्द आहे – ‘हुझून’. त्यात आध्यात्मिक पोकळीमुळे येणाऱ्या अस्वस्थतेची छटाही आहे. हा शब्द आपल्याला ओऱ्हान पामूक यांच्या ‘इस्तंबूल: मेमरीझ अँड द सिटी’मध्ये भेटतो, भिडतो आणि पुस्तक खाली ठेवल्यावरही आपला पिच्छा सोडत नाही. (पुस्तकाचे दहावे प्रकरण हुझून या शब्दाच्या अर्थावर आहे.)
ओऱ्हान पामूक हे साहित्याचे नोबेल पारितोषिकप्राप्त तर्किश लेखक. त्यांच्या नजरेतून दिसणाऱ्या इस्तंबूलवर ही ‘हुझून’ची सावली आहे. एकदा ‘इस्तंबूल’ वाचलं की कायम पामूकनी रंगवलेलं उदासवाणं शहर डोळ्यापुढे उभं राहतं. हळूहळू ते चित्र केवळ इस्तंबूलपर्यंत मर्यादित राहत नाही. आपण ज्या ठिकाणी वाढलो, काही काळ वास्तव्य केलं त्या गावाकडेही आपण तसेच बघू लागतो. त्याचा भूतकाळ आपल्याला आठवू लागतो. आपल्या मनात रुतलेल्या त्या गावाच्या खाणाखुणा आपण शोधू लागतो. त्यातला बदल आपल्याला अस्वस्थ करतो. आपल्या मनातलं गाव इस्तंबूल होतं अन नकळत आपण ओऱ्हान!
पामूक म्हणतात तसे काही लेखक स्थलांतरित अनुभवविश्वावर, मुळापासून तुटून दुसरीकडे रुजण्याच्या अनुभवांवर लिहितात. पण पामूक वर्षानुवर्ष एकाच शहरात, एकाच रस्त्यावर, एकाच घरात राहिले. त्यांना दिसणारं शहर त्यांनी टिपलं. त्यात काळाच्या ओघात झालेला बदल त्यांना अस्वस्थ करत गेला. या पुस्तकाचा नायक ओऱ्हान सुरुवातीला म्हणतो, “इस्तंबूलची नियती माझी नियती आहे.“ ओऱ्हानचा हात धरून आपण या शहरात फिरतो. कधी गतवैभवाच्या खुणा शोधतो, कधी बोस्फोरसवरचा वारा खातो, कधी हिवाळ्यातल्या गोठवून टाकणाऱ्या थंडीत त्याच्यासोबत अंधाऱ्या रस्त्यावरून एकटेपणाला सोबत घेऊन चालतो, या शहरातल्या गल्ल्या धुंडाळतो. पर्यटक हे शहर दिवसाउजेडी बघतात, पण तो रात्री आपल्याला इथल्या गल्ल्यांमधून फिरवून आणतो.
‘इस्तंबूल’मध्ये ओऱ्हानची आत्मकथा आणि जोडीला त्याच्या शहराचं चित्रण अशी घट्ट वीण आहे. ही इस्तंबूलची सफर आहे, तशीच ओऱ्हानच्या जीवनातल्या वीस वर्षांची सफर आहे. त्याच्या बालपणापासून ते तरुणपणापर्यंतच्या जीवनाचा पट उलगडत तो आपल्याला शहराचा प्रवास घडवतो. ही सफर एका रेषेत चालत नाही. नायक आणि त्याचं शहर यांची गुंफण करत हे आत्मकथन पुढे सरकतं. इस्तंबूलमधल्या वळणावळणाच्या रस्त्यांसारखी वळणं घेत पुढे जाते. त्याचं भावविश्व, त्याचं एकटेपण, तुटलेपण, मनातली तगमग, स्वप्न हे सारं उलगडत जातं तेव्हा शहर कायम सोबतीला असतंच. त्याचं अनुभवविश्व आणि शहराची दृश्य यांची सरमिसळ होऊन एक वेगळंच तरल रसायन तयार होतं.
ओऱ्हानचं इस्तंबूल आधी बलाढ्य रोमन बायझन्टाईन साम्राज्याच्या राजधानीचं शहर होतं. त्यावेळी त्याचं नाव होतं कॉनस्टंटीनॉपोल. एक पाय युरोपात अन दुसरा पाय आशिया खंडात टाकून दिमाखात बसलेलं हे शहर. पूर्व आणि पश्चिमेकडच्या जगाला जोडणारं व्यापाराचं केंद्र म्हणून ते भरभराटीला आलं. दोन्ही संस्कृतींचा संगम इथे घडला. पुढे पंधराव्या शतकाच्या मध्यावर तुर्कांनी त्याच्यावर कब्जा केला आणि कॉनस्टंटीनॉपोलचे इस्तंबूल झालं. (आठवा तो शाळेत असताना अभ्यासलेला कॉनस्टंटीनॉपोलचा पाडाव!) तुर्की ऑटोमन साम्राज्याची राजधानी असताना ते साडेचारशे वर्षं समृद्धीच्या शिखरावर पोहोचलं. युरोप आणि आशिया खंडात ऐसपैस पसरलेल्या ऑटोमन साम्राज्याच्या कारभाराची सूत्र इथून हलत होती. पहिल्या महायुद्धापर्यंत ऑटोमन साम्राज्य तगलं आणि शेवटी महायुद्धानंतर पूर्णपणे लयाला गेलं. त्यानंतर उरला फक्त तुर्कस्तान.
१९२३ मध्ये अतातुर्क केमाल पाशांनी प्रजासत्ताक राज्य स्थापन केल्यावर तुर्कस्तानने कात टाकली. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती करत तुर्कांनी आधुनिकतेचा मार्ग धरला. तुर्कस्तानची राजधानी अंकाराला गेली आणि इस्तंबूलचं महत्त्व संपलं. सोळा शतकं सत्तेचं केंद्र असलेल्या या शहराचं वैभव ओसरलं. इस्तंबूलप्रमाणेच ‘इस्तंबुलूस’ जनतेचं जीवनही पालटलं.
प्रजासत्ताक स्थापन झाल्यावर सरंजामशाही संपली. घराण्याचा मानमरातब, त्याचा बडेजावपणा उरला नाही . हळूहळू इस्तंबूलप्रमाणेच या वर्गाच्या श्रीमंतीलाही उतरती कळा लागली. ओऱ्हानचा जन्म अशाच एका उच्च मध्यमवर्गातला. जुन्या खुणांना कवटाळणारा, पण युरोपिअन बनण्याची आस असणारा हा वर्ग. परंपरागत कट्टर इस्लामी तत्त्वांना मागे सारत खुलेपणे जगणारा. पण तरीही जुनं वैभव लयाला गेल्याचं दु:ख तर होतंच. ती खिन्नतेची छटा इस्तंबूलप्रमाणे ओऱ्हानच्या घरावरही पसरली.
ओऱ्हानचं घर म्हणजे पामूक कुटुंबाची पाच मजली हवेली होती. एका मजल्यावर ओऱ्हानचं कुटुंब, इतर मजल्यांवर काका आणि आजी असा पसारा. तो प्रत्येकाच्या बैठक खोलीचं वर्णन ‘म्यूझीयम’ असं करतो. अवजड फर्निचर, पिआनो (त्याचा उपयोग फक्त फोटो फ्रेम ठेवण्यासाठी), लहानमोठ्या शोभेच्या वस्तू ठिकठिकाणी ठेवलेल्या, कुटुंबियांचे मढवलेले फोटो, काचेचं सामान, चिनी मातीच्या वस्तू... आपण युरोपिअन वळणाचे आहोत हे दाखवण्यासाठी हा उच्चवर्गीयांचा सगळा अट्टहास..
पाश्चात्यांसारखं राहण्या- वागण्याची धुंदी चढलेला तो काळ होता. पौर्वात्य आणि पाश्चात्य, नवं आणि जुनं यांच्यातला समन्वय आणि संघर्षही सुरु होता. त्याचे पडसाद बालपणापासून ओऱ्हानच्या मनावरही उमटू लागले. या आत्मकथनावर उदासीची छटा असली, तरी ओऱ्हान अधूनमधून सूक्ष्म विनोदी शैलीतही आपली निरीक्षणं नोंदवतो. लहानपणच्या घरातल्या वातावरणाविषयी तो लिहितो, “बैठकीच्या खोलीत तुम्ही आरामात लोळू शकत नव्हता; कुणी काल्पनिक पाहुणा आला तर आम्ही किती पाश्चात्य आहोत हे दाखवण्यासाठीचं ते छोटं म्युझियमच असायचं.” पुढे तो लिहितो, “...१९७० च्या दशकात टेलीव्हिजनचा प्रवेश झाल्यावर ती फॅशन बदलली. संध्याकाळच्या बातम्या एकत्र बसून बघण्यातला आनंद कळल्यावर, या लहानशा म्युझियमचे लहानसे सिनेमागृह झाले.”
ओऱ्हानचं मन त्याच्या पोकळ हवेलीत, त्याच्या कुटुंबात रमत नाही. वडलांचं दिवसेंदिवस घराबाहेर राहणं, त्यांचं दुसरं घर असणं, आईचं एकटेपण, नातेवाईकांच्या गप्पा, मित्रमंडळीच्या ठराविक गप्पा यापासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. लोकांमध्ये रहाणं त्याला आवडत नाही. पण त्यांच्यापासून पूर्ण तुटून राहणंही त्याला शक्य नाही. मोकळा श्वास घेण्यासाठी तो इस्तंबूलच्या जुन्या गल्ल्यांमध्ये भटकतो. गतवैभवाच्या खाणाखुणा शोधतो. कधी स्वत:च्या नजरेतून त्याच्याकडे बघतो, तर कधी परदेशी कलाकारांच्या. त्यातून आपल्याला इस्तंबूल विविध अंगांनी उलगडत जातं. त्याच्या प्रिझममधून आपणही इस्तंबूल बघत जातो.
पण हे माझं शहर आहे, असं म्हणताना मध्येच तो अलिप्त होतो. हे जगही त्याला आपलं वाटत नाही. उदासीची काजळी त्याच्या मनापासून शहरापर्यंत पसरते. ओऱ्हान स्वत: कडे अलिप्तपणे बघत फिरतो. त्याच्या शहरात जसं जुनं आणि नवं असे दोन जग वसलेले आहेत, तसेच त्याच्यामध्येही लहानपणापासून दोन ओऱ्हान आहेत. तो इथला असूनही इथला नसतो. घरात राहूनही घरातला नसतो, बाहेर राहूनही बाहेरचा नसतो. त्याच्या शहराकडे तो आपलं म्हणूनही बघतो आणि परकं होऊनही. त्याचा देश, त्याचं शहर आणि तो असे सगळेच दुहेरी जगात वावरत असतात. जुनं आणि नवं, धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष, गरीब आणि श्रीमंत, पौर्वात्य आणि पाश्चात्य असं त्याच्या शहराचं दुभंगलेपण आहे. तेच दुभंगलेपण त्याच्या मनातही झिरपतं. अवतीभवतीची बदलती सामाजिक आणि सांस्कृतिक परीस्थिती त्याला अस्वस्थ करते. त्याचमुळे तो वणवण भटकतो. ही त्याची भटकंती त्याच्या शहरापुरती सीमित आहे. त्यातही रात्री बाहेर पडला की त्याची पावलं पहाटे पुन्हा घराकडे वळतात. दिवसा बोस्फोरसचा वारा खाऊन, बाजारात फिरून तो पुन्हा घरात येतो.
या शहराचं द्वंद्व आणि ओऱ्हानचं द्वंद्व समांतर चालतं. तो संभ्रमात सापडतो तेव्हा तो शहराच्या वेड्यावाकड्या गल्ल्यांमध्ये फिरतो. आर्किटेक्चरचं शिक्षण घेण्यात त्याला रस वाटत नाही. तरुणपणी तो चित्रकलेत गुंततो तेव्हा त्यातून पैसा मिळत नाही असं त्याची प्रेयसी आणि आई त्याला पुन्हापुन्हा सांगतात. पुढे प्रेयसी त्याच्यापासून लांब जाते. स्वत्वाच्या शोधात तो ‘गोल्डन होर्न’वर फिरण्यासाठी बोटीत चढतो. दुतर्फा उभे असलेले डोंगर, त्यावरचे जुने राजवाडे, हवेल्या, उजाड चर्चेस, भव्यदिव्य ऑटोमन मशिदी, गरीब वस्त्या हे त्याच्या ओळखीचंचं जग. लहानपणपासून तो ते बघत आलाय. पण तेच पुन्हापुन्हा बघताना त्याची तडफड कमी होते. मनातल्या कल्लोळातून बाहेर पडण्यासाठी तो शहराचा आत्मा शोधत फिरतो. इस्तंबूलचं ‘हुझून’ त्याच्या एकटेपणात सोबतीला असतं, त्यात त्याचं मन रमतं.
त्याच्या चित्रकलेच्या वेडामुळे त्याच्या आईला त्याची काळजी वाटू लागते. चित्रकाराला फ्रान्समध्ये पैसा मिळेल, पण इस्तंबूलमध्ये नाही, असं ती त्याला सारखं सांगते. त्यातून दारिद्र्य येईल, सामाजिक उपेक्षा येईल या वास्तवाची ती त्याला जाणीव करून देते. कलाकाराला बाहेरच्या जगात किंमत नसते, त्याला स्थैर्य लाभत नाही हे ती त्याला आईच्या मायेने पोटतिडकीने समजावते. ओऱ्हानलाही ते कळत असतंच. तो जगापासून पूर्ण तुटलेला, आपल्याच धुंदीत जगत स्वत:ची फरफट करून घेणाराही कलाकार नाही. पण त्याला शिक्षण घेण्यातही रस नाही. आर्किटेक्चरच्या शिक्षणात त्याला कला सापडत नाही, त्यामुळे तो शिक्षण सोडण्याचा विचार करतो. आपल्या मुलाकडून चांगल्या कमाईची स्वप्न बघणाऱ्या त्याच्या आईला त्याचं शिक्षण सोडणं पटत नाही. ओऱ्हान तिच्याशी वाद घालतो. आईच्या तगाद्याला कंटाळून रात्रीच्या वेळी शहरात भटकतो. ही त्याची आत्मशोधाची सफर असते. शेवटी त्याला त्याचं ध्येय गवसतं. तो शेवटी लिहितो, “मी चित्रकार होणार नाही. मी लेखक होण्याचं ठरवलंय” (तुर्कस्तानमध्ये लेखकाला चित्रकारापेक्षा जास्त पैसा मिळत असावा ) इथे त्याची ही सफर संपते. एका ‘इस्तंबूलूस’ला इस्तंबूलमध्ये फिरताना जीवनाचा मार्ग सापडतो. शहराचा आत्मा शोधताना त्याला त्याचा आत्मा सापडतो.
या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. पुस्तकाचं कोणतंही पान उघडावं अन त्यावरचं छायाचित्र निरखावं. जवळजवळ प्रत्येक पानावर असलेलं छायाचित्र आपल्याला त्याची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या शहराची वेगवेगळ्या कोनातून ओळख करून देतं. छायाचित्रांप्रमाणे हे जग पूर्ण काळे नाही की पूर्ण पांढरे नाही. या दोघांमधली धूसर छटा त्याच्यावर पसरलेली आहे. इथल्या जीवनाचा ताल थांबलेला नाही. परिस्थितीशी झगडत जीवन पुढे जातं आहे.
साधारण साडेतीनशे पानांचे हे पुस्तक आत्मकथा, शहराचं दर्शन, काळाचं चित्रण, संस्कृतीचा पट अशा अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. पामूकचं इस्तंबूल गेल्या काही दिवसांमध्ये बदलू लागलंय. शेजारच्या देशांमध्ये घडणाऱ्या उलथापालथीचे परिणाम त्याच्यावरही होतायेत. या बदलाकडे ओऱ्हान आता नक्कीच दु:खी होऊन बघत असेल. त्याच्या शहराचं ‘हुझून’ अजूनच दाट झालं असेल.
प्रतिक्रिया
23 Apr 2016 - 6:34 am | अजया
अप्रतिम ओळख करुन दिली आहे पुस्तकाची.नक्की वाचणार.
23 Apr 2016 - 8:27 am | सानिकास्वप्निल
झकास पुस्तक परिचय, वाचायची उत्सुकता वाढलिये.
पामुकचे स्नो वाचले आहे, इस्तंबुल लवकरचं वाचायला सुुरू करते.
23 Apr 2016 - 9:05 am | एस
फारच छान लेख. तुमची शैली डोकावतेय.
23 Apr 2016 - 1:18 pm | त्रिवेणी
खुप छान लेख.
23 Apr 2016 - 1:18 pm | त्रिवेणी
खुप छान लेख.
23 Apr 2016 - 1:23 pm | जेपी
लेख आवडला..
23 Apr 2016 - 2:44 pm | कविता१९७८
मस्त पुस्तक माहीती,
23 Apr 2016 - 5:41 pm | पद्मावति
फारच सुरेख!
23 Apr 2016 - 6:13 pm | पैसा
अतिशय सुंदर! "ते हि नो दिवसो गता:" ही भावना वैश्विक म्हणावी अशी. भूतकाळाचा शोध घेता घेता आपणही एक दिवस भूतकाळात जमा होणार आहोत ही भावना फार अस्वस्थ करणारी आहे.
23 Apr 2016 - 6:47 pm | यशोधरा
आवडलं लिखाण. सुरेख ओळख, धन्यवाद.
23 Apr 2016 - 6:53 pm | स्रुजा
फार च सुरेख. खास विशाखा टच. हे पुस्तक नक्की मिळवुन वाचणार.
23 Apr 2016 - 8:57 pm | बोका-ए-आझम
नक्की वाचणार!
23 Apr 2016 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
अतिशय सुंदर रसग्रहण !
24 Apr 2016 - 2:29 am | आदूबाळ
फार छान!
24 Apr 2016 - 3:10 pm | नूतन सावंत
सुरेख ओळख करून दिली आहेस.ऊत्कंठा वाढलीय वाचनाची.
24 Apr 2016 - 9:18 pm | अभ्या..
पामुक. ..............आह्ह भारीच.
मस्त लिहिलय एकदम
24 Apr 2016 - 9:56 pm | उल्का
धन्यवाद. नक्की वाचणार. गुड्रीड्स वर लगेच मार्क केले. :)
24 Apr 2016 - 10:46 pm | मारवा
धन्यवाद !
या सुंदर परीचयासाठी
25 Apr 2016 - 5:53 am | मितान
खूपच छान ओळख विशाखाताई !
इथल्या ग्रंथालयात शोधते हे पुस्तक.
25 Apr 2016 - 11:15 am | क्रेझी
पुस्तकाची ओळख करून देण्याची पद्धत आवडली
26 Apr 2016 - 7:37 pm | Mrunalini
एका मस्त पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दक धन्यवाद. मीना प्रभुंचे इस्तांबुलचे प्रवास वर्णन वाचले आहे. हे सुद्धा पुस्तक वाचायला पाहिजे.
27 Apr 2016 - 3:06 pm | मधुरा देशपांडे
सुरेख ओळख. खूपच छान लिहिलंय.
28 Apr 2016 - 7:41 pm | किलमाऊस्की
मागच्या वर्षी लायब्ररीमधे हे पुस्तक मिळालेलं. या पुस्तकाबद्दल माहिती नव्हती. मृपुवर नोबेल पारितोषिकाबद्दल लिहिलेलं पाहून घेतलं. वाचायला हातात घेतलं आणि पुस्तकाने गुंगवून टाकलं.
अगदी हेच वाटलं.
सुंदर पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय.
11 May 2016 - 3:35 am | जुइ
लेख आवडला. पुस्तक अवश्य वाचणार.
11 May 2016 - 4:39 am | रेवती
पुस्तकाची ओळख आवडली.
ते वाचलेलं नसल्यानं डोळ्यासमोर मी पाहिलेली अशी गावं येत गेली. सुरेख लिहिलयस.
11 May 2016 - 7:25 am | वैभव जाधव
बऱ्याचदा alien असल्याची भावना येत असते. अरे हे माझं कार्यक्षेत्र नाही, मला इथे घरी असल्यासारखं वाटत नाही, काही वेगळं करायला, शोधायला हवं. कदाचित हा अंतरशोध प्रत्येकाचा असतो. काहींना जाणवतो काही त्यावर जाड गालिचे अंथरतात.
पुस्तक वाचायला हवं. छान ओळख.