कॅलिफोर्निया मधील काही अनवट जागा

मानसी१'s picture
मानसी१ in भटकंती
13 Apr 2016 - 8:45 pm

नमस्कार,

उसगावातील एक लोकप्रिय राज्य म्हणजे कॅलिफोर्निया. बरेच लोकांना (यात पर्यटक देखील आले) कॅली म्हणजे फक्त सॅन फ्रान्सीस्को ,एल ए ही शहरं आणी योसेमीटी नॅशनल पार्क, नापा व्हॅली ह्याच ठळक जागा माहीत असतात. पण या शिवाय तिथे अनेक अतिशय सुरेख बघण्या सारखी स्थळं आहेत. मला नैसर्गिक सौंदर्य शहरांपेक्षा जास्त आवडते. अशीच काही मला आवडलेली स्थळं मी खाली देते आहे.

टीप:- सर्व फोटो जालावरुन साभार.

१. लेक टाहो (lake Tahoe) - आम्ही उन्हाळ्यात येथे प्रथम आलो आणी याच्या प्रेमात पडलो. कॅली आणी नेवाडाच्या सीमांना लागून असलेला अती प्रचंड तलाव. चारी बाजूंना डोंगर आणी मध्ये हा अती खोल तलाव. फेरी मारायला गाडीने एक सव्वा तास लागतो. तलावाला ३ पब्लिक बीचेस आहेत. एका टोकावरून दुसरे टोक दिसत नाही, त्यामुळे समुद्राचा भास होतो. पाणी अगदी नितळ स्वच्छ. २० फूट देखील सहज तळ दिसतो.

आजूबाजूला ३-४ गावं आहेत. एके ठिकाणी वर डोंगरावर जायला केबल कार आहे. वरून तलावाचे विहंगम दृश्य दिसते. शिवाय बोटिंग ची सोय आहे.

सगळीकडे मस्त हिरवाई.
 

दुसऱ्यांदा येथे हिवाळ्यात आलो. आता एकदम वेगळ्या ठिकाणी आल्या सारखे वाटले. सगळीकडे बर्फाच्या पांढर्‍या भिंती. सगळ्या झाडांवरून ओघळणारा शुभ्र चुरा. आयुष्यात पहिल्यांदा स्की चा आनंद घेतला. बरेच वेळा आपटून देखील उत्साह कायम होता. दुसरा साधा आणी मजेदार प्रकार म्हणजे ट्युबींग. रबराच्या मोठ्या ट्यूब मध्ये बसवून वर ओढत नेतात आणी मग आपण बर्फा वरून घसरत खाली यायचं. नुसती मज्जा.

मग मात्र या ठिकाणी येत राहिलो. दर वेळेला वेगळा अनुभव व तलाव पहिले पेक्षा सरस वाटायचा. कोणी चुकूनही चुकवू नये असे ठिकाण.

२. रेडवुड नॅशनल पार्क- कॅली आणी ओरेगॉन च्या सीमेवर असलेलं पार्क. आपलं अस्तित्व किती नगण्य आहे याची प्रचीती ठळक करणारी ही जागा. इथे येई पर्यंत मी फक्त नारळ पोफळी किंवा सुरू ची झाडं उंच बघितली होती. पण आपण मुंगी वगैरे झालो की काय असे वाटायला लावणारे ही अती महाकाय वृक्ष बघितली आणी एकदम वेगळ्याच दुनियेत आलो. अक्षरश: 'हनी आय श्रंक द कीड्स' पिक्चर मध्ये घुसल्या सारखं वाटलं. ३-४ लोकांनी हात धरून रिंगण केले तरीही त्या वृक्षांना मिठी मारण शक्य नाहीये. मान वर करून पाठीला टेकली तरी त्यांची उंची संपत नाही. हजारो वर्षा पासून अस्तित्वात असलेलं ते जंगल बघितलं की डोळ्याचं पारणं फिटतं. काही काही वृक्ष इतके मोठे आहेत की अख्खी कार त्याच्या खोडाच्या बोगद्यातून आरपार जाते. आणी ते महावृक्ष अजूनही जिवंत आहे. काही जुन्या पडलेल्या खोडांपासुन पूर्णं १२-१३ फूट बाय ३०-४० फुटाचे सलग घर केले आहे.

ठणठणीत दुपार असताना जेमतेम खाली पोचणारी उन्हं. एक विलक्षण अनुभव होता.

३. मॅक वे फॉल, बिग सर (Big Sur) - एक दिवसाची छोटेखानी ट्रीप करायला मस्त जागा. दणादण पडणारा धबधबा सगळ्यांना आवडतो. तसेच पांढरी शुभ्र वळू असलेला समुद्र किनारा देखिल. आता कोणी सांगितला की ह्या दोनही गोष्टी एकत्र केल्या तर !!! मज्जाच मज्जा.

बिग सर ला एक मस्त धबधबा डायरेक्ट ८० फूट खालच्या बीच वर पडतो. दोन लाडक्या गोष्टी अश्या अनपेक्षित एकत्र आल्या म्हणून ही जागा आमची लाडकी होती. दुर्दैवाने त्या बीच ला थेट रस्ता नाही. पण स्वतःची बोट असेल तर समुद्र मार्गे बीच वर जाता येतं.

४. पॉइंट रेयस (Point Rayes) - मैलोंनमैल लांब बऱ्यापैकी सरळ असलेल्या पॅसिफिक चा किनारा मध्येच एका ठिकाणी आत शिरला आहे. जुन्या काळी तेथे हमखास बोटी आपटायच्या. म्हणून तिथे एक लाइट हाउस बांधले. समुद्राचा नीळा रंग आणी खडकाळ किनार्‍यावर आपटणार फेसाळ पांढरं पाणी. सण सण वाहणार थंड बेभान वारा. एकूणच फार रमणीय आणी आल्हाददायक वातावरण. वरून ते छोटंसं लाइट हाउस एकदम गोंडस दिसतं. काहीशे पायऱ्या उतरून लाइट हाउसला जाता येत. सुरेख जपलं आहे. मूळ पितळी दिवा, एकट्या गार्ड ची खोली, इतर काही अवजारं, सगळं जसं च्या तसं.

पण दिवसा उजेडी ती जागा कितीही सुंदर दिसली तरी रात्री च्या काळोखात, रोरावणाऱ्या वाऱ्यात आणी प्रचंड उसळणाऱ्या लाटा झेलत तो एकटा गार्ड कसा राहायचा ते देवाला ठाऊक.

५. सॉलव्ह्यॅंग (Solvang) - मानव निर्मीत असली तरी एकदम गोड जागा. इथे एका डॅनिश गावाची हुबेहूब प्रतिकृती उभी केली आहे. युरोपियन गावाचा फील देणारी छोटी छोटी घरं, गल्ली बोळ, कॉफी शॉप्स, दुकानं इतकंच काय मस्त छोट्या पवनचक्क्या देखील आहे. अप्रतिम कॉफी, पेस्टरीज आणि चॉकलेटं. शिवाय जेवणात विविध Sandwiches आणी Pie. इथे टिणुकले डॅनिश जोडे व अतिशय गोड बाहुल्या आपले लक्ष वेधून घेतात.तसेच अप्रतिम क्रॉस स्टीच नी भरलेली पेंटिंग्ज. पर्यटकांसाठी खास जुन्या काळ च्या घोडे गाडी आहेत. नक्की चक्कर मारावी. मस्त दणकट उंच आणी उमदी जनावरं. छोट्या छोट्या उपाहारगृहांसमोर त्यांची वाद्य व नृत्य पण सादर केली जातात. आवर्जून भेट द्यावी अशी जागा.

टीप:- सर्व फोटो जालावरुन साभार.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

13 Apr 2016 - 9:19 pm | खटपट्या

खूप मस्त फोटो आणि माहीती.

रेवती's picture

13 Apr 2016 - 9:29 pm | रेवती

माहिती व फोटू आवडले.

श्रीरंग_जोशी's picture

13 Apr 2016 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी

थोडक्यात वर्णन आवडले. जालावरच्या फोटोंची निवड छानच.

लेक टाहो येथे एकदा गेलो आहे. खूपच रमणीय ठिकाण आहे. कॅलिफोर्नियामध्ये खूपच वैविध्य आहे.

जुइ's picture

14 Apr 2016 - 12:11 am | जुइ

सुंदर फोटो आणि थोडक्यात केलेले वर्णन आवडले. कॅलिफोर्नियामध्ये बरेच काही पाहायचे राहिले आहे त्यात लेक टाहोचा देखिल समावेश आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2016 - 12:29 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं जागा, मस्तं फोटो.

यातल्या एका जागेला, लेक ताहोला, भेट दिली आहे... तेथे डिनर क्रूझ केली होती :) व कसिनोत काही डॉलर हारून झाले आहे :(

पण इतर जागांची नावे पहिल्यांदाच ऐकली आहेत.

आनंदयात्री's picture

14 Apr 2016 - 12:57 am | आनंदयात्री

रेड्वुड फॉरेस्ट सारखाच सक्वोया नॅशनल पार्कही जायंट झाडांसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथेच जगातला सगळ्यात मोठा वृक्ष जनरल शर्मन आहे (वय वर्ष अदमासे २२००). तिथे वावरणे हा खरेच विलक्षण अनुभव होता.

आंतरजालावरचे काही फोटो -

Sherman

Sherman

सोल्वांग सिटीला भेट दिली आहे. बाकीची ठिकाणे बघण्याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. बघू कधी योग येतो.

सुंदर जपलेलं सुंदर ठिकाण!

गोंडस बाळ's picture

14 Apr 2016 - 1:41 pm | गोंडस बाळ

वा, मस्त रिफ्रेशिंग वाटलं..

वा! मस्त नेत्रसुखद जागा.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

14 Apr 2016 - 1:59 pm | चंद्रनील मुल्हेरकर

छान ,

अहाहा काय निसर्गसौंदर्य !

बोका-ए-आझम's picture

15 Apr 2016 - 12:54 am | बोका-ए-आझम

जनरल शेरमनबद्दल ऐकून आहे. कधीतरी आयुष्यात या वृक्षराजाला भेटायचंय.

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2016 - 8:43 pm | श्रीगुरुजी

१९९१ मध्ये हा महाप्रचंड वृक्ष पाहिला होता. तेव्हा त्याचे वय २५०० वर्षे होते असे सांगण्यात आले होते. म्हणजे गौतम बुद्धाच्या काळात त्या वृक्षाचा जन्म झाला. त्याच्यापासून जवळच एक दुसरा महाकाय वृक्ष होता. त्याचे खोड इतके मोठे होते की त्याच्या खोडात बोगदा करून कार जाण्याकरीता रस्ता काढला होता.

आनंदयात्री's picture

15 Apr 2016 - 8:52 pm | आनंदयात्री

तो बोगदा असणारा वृक्ष रेडवुड फॉरेस्ट मध्ये आहे, आणि तसे ४-६ टनेल तिथे बनवलेत.
त्यापैकी हा एक फोटो आंजावरुन साभार-

redwood

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2016 - 8:58 pm | श्रीगुरुजी

मी पाहिलेला हा वृक्ष नाही. तो यापेक्षा बराच मोठा होता आणि जनरल शेरमन वृक्षापासून जेमतेम १५० मीटर अंतरावर होता.

पैसा's picture

15 Apr 2016 - 7:03 pm | पैसा

सुंदर!

श्रीगुरुजी's picture

15 Apr 2016 - 8:40 pm | श्रीगुरुजी

सुंदर लेख व प्रकाशचित्रे!

जवळपास २५ वर्षांपूर्वी ७-८ महिने कॅलिफोर्नियात होतो. त्यावेळी लेक टाहो व रिनोतील कॅसिनोला भेट दिली होती. कॅलिफोर्नियातील अजून काही सुंदर जागा म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोच्या उत्तरेला असलेले शास्ता लेक, सॅन होजे जवळील साराटोगा हिल्स आणि सॅन डिएगोजवळील एन्सिनीटास येथील समुद्रकिनार्‍यावर असलेला परमहंस श्री श्री योगानंद यांचा अत्यंत सुंदर आश्रम! बाकी योसेमिटी राष्ट्रीय उद्यान, डिस्ने लँड, सी वर्ल्ड, युनिव्हर्सल स्टुडिओ इ. नेहमीची ठिकाणे सुंदर आहेतच.

काका, माउंट शास्ता आणी क्रेटर लेक ऑरेगान मधे आहेत. खरचं सुरेख. तलावात कॅमल रॉयल ब्लू शाई टाकली आहे असे वाटिन जाते.

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

माऊंट शास्ता वेगळा आणि शास्ता लेक वेगळे. शास्ता लेक साधारणपणे फ्रिस्कोच्या उत्तरेला/ईशान्येला २-३ तास ड्रायव्हिंगच्या अंतरावर आहे.

ओकेके. आमचं मिस् झालं वाटते. नविन ठीकाणासाठी धन्स. :-)

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2016 - 8:22 pm | श्रीगुरुजी

ही शास्ता लेकची माहिती

https://en.wikipedia.org/wiki/Shasta_Lake,_California

फ्रिस्कोपासून साधारण २२० मैलावर आहे.