बरेच दिवस कोकणातील तीन लेण्या पाहण्याचे मनात घाटत होते. शेवटी कुड्याची लेणी, गांधारपाले लेणी व पन्हाळे काज़ी या लेण्यांना भेट देण्याचे ठरवले. लेण्यांना भेट देण्यापूर्वी त्या कुठल्या दिशेला तोंड करुन आहेत व त्याच्यावर किती वाजता कसा उजेड पडतो याची अभ्यास करणे छायाचित्रे काढण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक. गुगल मॅप्समधे यासाठी अप्रतीम सोय आहे. अर्थात तुम्हाला ती माहिती असेलच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खाली एक छायाचित्र दिले आहे. यातील स्लायडर सरकवला की आपल्याला त्यावेळी असलेल्या सावल्या व उन्हे प्रत्यक्ष दिसू शकतात.
आता प्रश्न उरला होता रस्त्याचा. त्यासाठी नुकतेच जाऊन आलेल्या श्री विनीत दाते यांना त्रास दिला. त्यांनी मोठ्या आनंदाने रस्त्याबाबत मार्गदर्शन केले व आमची ट्रीप सुखरुप पार पडली.
कुड्याची बौद्ध लेणी.
अक्षांश/रेखांश
पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून कुड्याला जायला निघालो. नेहमी लवकर निघण्याने फायदा होतो पण यावेळेस मात्र एवढ्या लवकर निघण्याने थोडा तोटाच झाला. कुड्याला फारच लवकर पोहोचल्यामुळे सूर्य अगदी डोक्यावर आला होता आणि लेण्यांमधे अंधार. तेथे बराच वेळ काढला व सूर्य जरा कलल्यावर छायाचित्रे काढली. ताम्ह्णीतून जाताना घाट संपल्यावर लगेच इंदापूर - तळ्याचा रस्ता पकडायचा आहे हे विसरु नये. हो ! येथेही एक इंदापूर आहे.
छायाचित्रांवरुन ही लेणी बौद्धलेणी आहेत हे तुम्हाला समजेलच. या समुहात सव्वीस खोदलेल्या लेण्या आहेत. राजापूर खाडीच्या समोर असलेल्या एका डोंगरात अंदाजे २५० फुट उंचावर ही लेणी व विहार खदलेले आहेत. यातील काहीतर माझ्या अंदाजे ख्रिस्तपूर्व काळातील असावीत. जवळजवळ लेण्यांपर्यंत गाडी जाते. फारतर १० ते १५ मिनिटे चालावे लागत असेल.
याच लेण्यांच्या माथ्यावरुन घोसळा व तळ्याचे किल्ले दिसतात. खाडीवरुन येणारे खारे वारे व कोकणातील प्रचंड पावसाला तोंड देत ही लेणी अजूनही उभी आहेत. यातील शिलालेख आता बरेच झिजले आहेत पण काहींचे वाचन झालेले आहे.
जेव्हा जेव्हा मी बौद्ध लेणी पाहतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात त्या काळातील बौद्ध भिख्कूंबद्दल अपार आदर निर्माण होतो. ही मंडळी कुठे कुठे पोहोचली होती, त्यांच्या धर्माचे व संघाचे नियम पाळून या जागेत धर्माचा अभ्यास करीत. मला तरी सगळेच अद्भूत वाटते. या सर्वांना त्यांच्यावरच एक लेखमाला लिहून ती त्यांनाच अर्पण करण्याची तीव्र इच्छा मला दरवेळेस असल्या जागा पाहिल्यावर होते. पण हा विषय एवढा मोठा ही की कितीही केला तरी अभ्यास कमीच पडतो.
कुड्यामधील एक लेणे सोडले तर बाकी सर्व बहुदा मुक्कामासाठी खोदलेली असावीत. कारण फक्त एकाच लेण्यात सुंदर मुर्ती काम आहे. एक शिलालेखही आहे. जवळजवळ सगळ्याच खोल्यांना व्हरांडा आहे. व त्याच्या कठड्यावर त्या काळातील साधीसुधी पण सुंदर नक्षीही कोरलेली आहे. त्यावरील अंधूकसा दिसणारा लाल रंग तुम्हाला क्षणभर उदास करतो. सर्व दरवाजांना फळ्यांचे दरवाजे बसविण्याची सोय दिसते व झोपण्यासाठी दगडाचे ओटेही दिसतात. त्या काळी सर्व भिंती या माती व भाताच्या तुसांनी सारवलेल्या असाव्यात. काही ठिकाणी अत्यंत फिकट असे रंगही दिसतात बहुदा ती चित्रे असावीत. काहींच्या मते ही लेणी पाचव्या किंवा सहाव्या शतकातील असावीत. या लेण्यांच्या समुहात बरेच शिलालेख आहेत. ते सर्व ज्यांनी दानधर्म केला आहे किंवा ही लेणी खोदण्यासाठी देणग्या दिल्या आहेत त्यांच्या संधर्भात आहेत. त्यातील एक ज्यात शिल्पे आहेत त्या लेण्याकडे आपण वळू.
लेण्यामधे शिरताना डाव्या बाजूला एक अंदाजे बारा फुट उंचीचा हत्ती दिसतो. त्याचा उजव्या बाजूचा साथीदार पूर्णपणे नष्ट झालेला दिसतोय पण त्याच्या पायातील खडकावरुन तो तेथे असावा असे अनुमान काढण्यास हरकत नाही.
याही हत्तीची सोंड भंगलेली आहे.
त्याच्याच मागे व्हरांड्याच्या भिंतीवर एक बुद्धाचे कोरीव शिल्प आहे ज्यात बुद्ध एका सिंहासनावर बसलेला असून त्याचे पाय एका कमळावर ठेवलेले दिसतात.
एकूणच या लेण्यांमधे कमळाचा वापर जास्त केलेला दिसतो. या मूर्तीची उंची साधारणत: अठरा एक इंच असावी. बाजूला हरणे आहेत आणि नागा भक्तांनी त्या कमळाला आधार दिलेला दिसतोय. बुद्धाच्या दोन्ही बाजूला चवरी ढाळणारे दिसत असून त्यातील एक अवलोकितेश्र्वर असावा अशी शंका आहे. व्हरांड्यात जाणाऱ्या पायऱ्या आता मोडकळीस आलेल्या आहेत पण एके काळी त्या नीट बांधलेल्या असणार. हत्तीच्या मागे शिल्प आहे, साधाराणत: तसेच आत शिरताना डाच्या बाजूला दिसते.
व्हरांड्यात डाव्या बाजूला एक सात ओळींचा सुस्थितीतील शिलालेख दिसतो. हा जुन्या पाली लिपीतील शिलालेख काय म्हणतो ते बघुयात...
याचे भाषांतर गॅझेटमधून घेतले आहे. ( मी मराठीत केलेले फक्त अर्थासाठी वापरावे)
हे निवासस्थान खोदण्यासाठी सुलासदाता व उत्तरादता यांच्या सिवामा (शिवम ?) पूत्राने देणगी दिली आहे. याचा मोठा भाऊ शिवभूती हा एक मोठा ग्रंथकार आहे. महाभोज सदागेरी व विजयाचा मुलगा महाभोज मांडव खंदपलित याच्या पदरी सिवामा चाकरी करतो. कोरीव कामासाठी सिवामच्या पत्नीने व त्यांच्या सुलसदाता (सुलसद्त्त) , शिवपलित, शिवदाता (शिवदत्त) यांनी देणगी दिली. खांबांसाठी त्यांच्या मुली सापा, शिवपलिता, यांनी देणगी दिली.’’
यात उल्लेख झालेला स्कंदपलित हा कोंकणाचा त्यावेळचा राजा किंवा सेनापती असावा. बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतरही हे सर्व शिवाचे भक्त असावेत. त्या काळात स्त्रीयांना समाजात दुय्यम स्थान नसावे उलट पुरुषांच्या बरोबरीने त्यांना समाजात स्थान असावे हे या लेखातील स्त्रीयांच्या उल्लेखांवरुन सहज दिसून येते. थोडक्यात या विहाराचा सर्व खर्च या कुटुंबाने वाटून घेतलेला दिसतो.
आत सभागृहात शिरल्यावर डाव्या भिंतीवर जे शिल्प दिसते ते खालीलप्रमाणे.
१ सगळ्यात वरती ज्ञानमुद्रेत बसलेल्या बुद्धाच्या चार मुर्ती आहेत ह्या वेगवेगळ्या कोनाड्यात दिसतात. त्याच्या खाली दोन भागात दोन बुद्धाच्या मुर्ती दोन कोनाड्यात दिसतात. यात वर अवकाशात विद्याधर हातात मुकुट घेऊन उडत येतान दिसत आहेत तर बुद्धावर मकरतोरणे दिसत आहेत.
शेजारीच बुद्धाची एक त्याच मुद्रेतील मुर्ती आहे. शेजारी चवरी ढाळणाऱ्याच्या हातात चवरी आहे तर दुसऱ्याच्या हातात कमळ. वर विद्याधर बहुदा पुष्पवृष्टी करताना दिसतात.
बुद्ध कमळावर बसलेला दिसतो तर त्या कमळाच्या देठाला दोन नागा राजांनी आधार दिलेला दिसतो. एका बाजूला दोन तर दुसऱ्या बाजूला तीन भक्तगण हात जोडलेल्या स्थितीत बसलेले दिसतात. त्याच्या शेजारी ध्यानमुद्रेत बसलेल्या बुद्धाच्या मुर्तीवर एक डागोबा दिसतो.
या भिंतीसमोरच्या भिंतीवर साधारणत: याच प्रकारचे शिल्प दिसते.
सगळ्यात एक अस्पष्ट असा लेख दिसतो. पूर्वी तो वाचता येत असावा. ‘‘शाक्य धर्मगुरु बुद्धसिंघाने या कामासाठी उदार देणगी दिली आहे. त्याच्या मातापितरांना सर्वज्ञान होवो....’’ उजव्य्या बाजूला अजून एक लेख आहे त्यात शापवाणीही आहे. ‘‘या शिल्पासाठी शाक्यगुरु संघदेव याबे उदारपणे देणगी दिली आहे. तसेच चेंदिना येथील जमीन तेलदिव्यांच्या खर्चासाठी दान दिली आहे. यात फेरफार करणाऱ्याला पाचीही पापांचे धनी व्हावे लागेल.’’
गृहाच्या सगळ्यात मागे एक दागोबा आहे व पायऱ्यांवर काही प्राणी कोरले आहेत.
एका बाजूच्या भिंतीवर एक चिन्ह आहे. ते कसले आहे ते कळले नाही. काही जण म्हणतात ते वाळूचे घड्याळ आही पण मला ते पटत नाही. बौद्ध चिन्हांच्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा.
या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पाच फुट उंचीची शिल्पे आहेत जी कार्ल्याच्या शिल्पांसारखी वाटतात.
सगळे पाहून झाल्यावर बाहेर पडलो. उद्या पन्हाळेकाजीला जायचे. रस्ता खराब व सामसूम आहे असे कळले आहे...बघू काय होते ते असे म्हणून मार्गस्थ झालो. पण रस्त्यात एके ठिकाणी एका स्टुडिओला भेट दिली ती अवचितपणे... हा माणूस पॉट तयार करतो... त्याने केलेल्या भांड्याचे मी काढलेले एक छायाचित्र...
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
8 Apr 2016 - 7:07 pm | तुषार काळभोर
लेणी, शिल्पे, त्यावरील तुमचं भाष्य... सर्व अद्भूत!!
8 Apr 2016 - 7:34 pm | बोका-ए-आझम
चला. आता रशियन आघाडी आणि आणीबाणीतल्या दिवसांनंतर अजून एक क्लेम लावून ठेवलेला आहे!
8 Apr 2016 - 8:09 pm | मोदक
सुंदर धागा..!!
तो पॉटरीचा स्टुडीओ म्हणजे "आकार पॉट आर्ट" असावे. मातीच्या वस्तूंमध्ये इतके पर्फेक्शन आणखी कोठेही पाहिलेले नाही. राजेश कुलकर्णी नामक एक अवालिया व्यक्ती इंदापूरला राहतात. त्यांचाच स्टुडीओ आहे.
(मराठी अंतर्जालावर खळबळ माजवणारे राकु ते हे नव्हेत.)
9 Apr 2016 - 8:06 am | प्रीत-मोहर
वाह मस्त धागा. खूप दिवसांनी काहीतरी छान वाचले
9 Apr 2016 - 9:42 am | प्रचेतस
कुड्याची लेणी ही हीनयान आणि महायान अशा दोन्ही कालखंडात मिळून कोरलेली आहेत. इसपू १ ते इस सहावे शतक ह्या दरम्यान.
मला आठवतं त्याप्रमाणे कुड्याच्या लेणीत एका ब्राह्मण उपासकाचा पण शिलालेख आहे. उपासकस ब्रह्मनस असा काहीतरी संदर्भ आहे.
ते वाळूच्या घड्याळ्यासारखे डिजाईन इतर समकालीन महायान लेण्यांतही मी पाहिलेले आहे. कान्हेरी, वेरुळमधली दोन ताल (क्र. ११) अशा लेण्यांमध्ये ते आहे. मला वाटतं हे डिजाईन म्हणजे वज्र असावे. वज्रपाणीच्या प्रतिमेमधल्या वज्राची ह्या आकाराचे साधर्म्य आहे. हे वाळुचे घड्याळ म्हणजे जन्म मृत्युचे प्रतिक अशीही तिबेटी वज्रयानांमध्ये समजूत आहे बहुधा.
9 Apr 2016 - 10:03 am | महासंग्राम
एकदम सुंदर लेख झालाय काका ३ वर्षापूर्वी मे महिन्यात कोकण सफर केली होती तेव्हा पन्हाळेकाजी चा रस्ता अत्यंत खराब होता पण तिथे पोहचल्यावर त्या रस्त्यावरून आल्याचे सार्थक झाले, तिथली आमराई मस्तच आहे. आणि तिथले झिरपणारे पाणी बाहेर जाण्यासाठी जी व्यवस्था केली आहे ती पण पाहण्यासारखी आहे
पन्हाळे काजी लेणी
9 Apr 2016 - 10:43 am | इरसाल
पण,
जर डोरेमॉन कडे असणार्या टाईममशीनने या लेण्या बनुन पुर्ण झाल्या त्याकाळात परत जाता आले तर अस्सल बनलेल्या लेण्या पाहुनच भान अगदीच हरपुन जाईल नाही?
अश्या खुप सार्या जागा, वस्तु आहेत ज्या त्यांच्या ओरिजिनल रुपात त्या त्या काळात पहायचा आनंदच वेगळा असेल.
11 Apr 2016 - 10:18 am | प्रचेतस
ज्ञानमुद्रा का धम्मचक्रप्रवर्तन मुद्रा?
अर्थात धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेचा अर्थ बुद्ध इतरांना धर्माची ज्ञानप्राप्ती करुन देतोय असाच होतो.
11 Apr 2016 - 12:21 pm | विजय पुरोहित
लेख आणि छायाचित्रे अगदी अप्रतिम...
11 Apr 2016 - 3:27 pm | अनंत छंदी
पन्हाळेकाजीच्या महाचंडरोषणाचा फोटो डकवावा ही विनंती
11 Apr 2016 - 4:16 pm | एस
अतिशय सुंदर छायाचित्रे आणि वर्णन.
11 Apr 2016 - 8:20 pm | उगा काहितरीच
सुंदर लेख, सुंदर फोटो. रच्याकने असे काही अद्भुत बघितले की त्या काळातील लोकांबद्दल अतिशय आदर वाटतो. आणी कुतूहल वाटते की एवढे प्रचंड शिल्प उभारण्यामागे प्रेरणा काय असावी. आजच्या काळातही एवढे तंत्रज्ञान पुढारलेले असूनही अतिशय अवघड असणारे शिल्प त्या काळात उभारणे खरंच किती अवघड असेल. इरसालजी, तुम्हाला मिळाली ती मशीन तर मलाही सोबत घेऊन जा. ;-) न
11 Apr 2016 - 9:24 pm | प्रचेतस
प्रेरणा हीच धर्मप्रसार :)
12 Apr 2016 - 12:59 pm | अजया
कुलकर्णी काकांचे लेख कोणत्याही विषयावर असोत, वाचायला मिळाल्याने मिपाकर असण्याचे सार्थक वाटते.
12 Apr 2016 - 1:29 pm | पैसा
कोकणात म्हणजे अगदी जवळ एवढा मोठा ठेवा आहे, पण तिथे काय कधीही जाऊ म्हणत नेहमी बघायचे राहून जाते.
:(
हे त्रिरत्नच आहे. आडवा ठेवलेला त्रिशूळ जसा दिसतो तसे वाटते. या चिन्हाबद्दल मिपावर एक छान चर्चा झालेली आठवते. चित्राचा लेख होता बहुतेक.
12 Apr 2016 - 3:42 pm | प्रचेतस
नाही. त्रिरत्न वेगळे असते आणि मुख्य म्हणजे उलट सुलट असे नसते.
12 Apr 2016 - 3:56 pm | पैसा
तू म्हणतोस ते स्वरूप उशीरा मिळालेले आहे. मी वाचलेले आठवते त्याप्रमाणे त्रिशूल, सिंधु संस्कृतीतील पशुपतीसारख्या देवाचे चित्र आणि त्रिरत्न हे सगळे मुळात एक प्रकारचे सिंबॉल आहेत. आणि त्रिरत्नाचा उपयोग अनेक ठिकाणी अनेक प्रकाराने केलेला आहे.
12 Apr 2016 - 4:08 pm | पैसा
http://www.misalpav.com/node/19737
12 Apr 2016 - 5:23 pm | प्रचेतस
हो. सांकेतिक चिन्हे तर आहेतच. पण का कोण जाणे मला हे त्रिरत्न वाटत नाही. जरा अधिक शोध घ्यायला हवा. हे चिह्न वज्रयान पंथाकडे जास्त झुकणारे वाटते.
आणि ही मुख्यतः लेट अॅडिशन आहे. (६ व्या शतकानंतर)
वेरूळ

कान्हेरी

12 Apr 2016 - 3:20 pm | विलासराव
सगळेच अद्भुत.
चिन्हाबद्दल मला माहीत नाही. पण त्रिरत्न म्हणजेच बुध्द, धम्म आणि संघ. हे सगळे गुणवाचक शब्द आहेत. त्रिपिटकात हे गुण वर्णन केलेले आहेत. हेहे गुण असतील तरच ती व्यक्ती बुद्ध, नाहीतर नाही. तसेच धम्म आणि संघाचेही.
ज्या साधनेने सिद्धार्थ गौतमाला भगवान् बुद्ध केले ती साधना म्हणजे विपश्यना साधना.
गुरुशिष्य परंपरेने अनेक भिक्षु लोकांनी ही साधना जतन केली. तीच साधना आज विपश्यना केंद्रात शिकवली जाते. या भिक्षु परंपरेने ती जतन केल्यामुळेच ती आपल्याला
शुद्ध स्वरुपात मिळाली. यामुळे या भिक्षुसंघाबद्दल अपार कृतद्न्यतेचा भाव जागतो अशी ठिकाणे पाहिली की.
बुद्धांनी सारनाथला धम्मचक्रपरिवत्तन केले आणि जे प्रथम ६० अरहंत झाले. त्यांना आदेश दिला की जी प्राप्ती तुम्हाला झाली ती लोकांपर्यत पोहोचवा.
चरित भिक्कवे चारिका
बहुजन हिताय
बहुजन सुखाय
लोकानुकंपाय !!!!
19 Apr 2016 - 1:20 pm | स्वच्छंदी_मनोज
हा धागा निसटला होता वाचनातून. व्वा मस्त माहीती आणी प्रतीसादही उत्तम. आता गांधारपाले आणी पन्हाळेकाजीच्या लेण्यांवर लवकर पुढचा भाग येऊद्यात.
गांधारपालेच्या समोरच्या डोंगरावर महाडच्या पलीकडे कोळ गावात पण लेण्या आहेत. मी त्या बघीतल्या आहेत.
तसेच पन्हाळेकाजीला जर खेडवरून गेलो तर खुद्द खेड शहरामधे पण एका खोलीचे एक लेणे आहे :)