फूसभाजी(कोवळ्या फणसाची भाजी).
मांसाहारी लोक शाकाहारी लोकांना ‘घासफूस खानेवाले’ म्हणतात हे अगदी म्हणजे अगदी खरंय.पण घास म्हणजे शब्दश: गवताच्या जातकुळीतली फोडशीची भाजी आणि शब्दश: फूसभाजी हेच नाव असलेली फणसाची भाजी खाताना मांसाहारी लोकही ‘घासफूस खानेवाले’च होतात हे विसरूनच जातात.
फूसभाजी फणसाची भाजी असते पण हा फणस इतका कोवळा असावा लागती कि त्यात गरे धरले नसले पाहिजेत.त्याला ‘कुवरी’ याच योग्य नावाने ओळखले जाते.म्हणतात.कुवरी म्हणजे कुमारी.ही कुवरी पण कोणी भेट दिली असेल तर त्याची चव अजूनच न्यारी असते.
माझ्याकडे अजूनही आजोळाहून रामनवमीनंतर पहिली कुवरी भेट म्हणून येते.पण यावर्षी एका सुहृदाकडून आधीच ही भेट आली नि मन पोचलं आजोळी.आजोबांनी बांधलेल्या राममंदिरात रामजन्माचा उत्सव साजरा होतो.लहानपणी.परीक्षा लवकर संपून आम्ही सगळी मामे, मावस भावंडं,लग्न झालेल्या मावसबहिणी ,मामेबहिणी,त्याच्या मुलांसह ,शिवाय सगळ्या मामीच्या बहिणी त्याच्या मुलासह,मामांचे मित्र सह्कुटुंबअसत आणि उत्सवानिमित्त होणाऱ्या श्रीराम प्रासादिक मंडळाच्या नाटकात जरी गावातलीच मंडळी काम असली तरीही मुंबईतून काम करणारे आणि मामाच्या मित्रपवारातले नाटकातून काम करणारे व्यावसायिक काही नट,नट्या आणि तेही सहकुटुंब,असा भला मोठा गोतावळा नजरेसमोर दिसायला लागतो.
मी लहान असताना या सर्व नटमंडळीना काका आत्या,मावशी अशा घरगुती संबोधनाने हाकारण्याचा शुभ योग माझ्या जीवनात होता.त्यात चित्तरंजन कोल्हटकर,शंकर घाणेकर,नीलम प्रभू,नीलप्रभा भरडकर अशा अनेक मान्यवरांसोबातच्या आठवणीही आहेत.
तिथे मोसामातली पहिली फूसभाजी खायला मिळत असे.त्याला म्हणायचं फणसाचा नवा केला.मग येताना आजी सोबतही कुवऱ्या देत असेच.आता आजीच काय पण दोन मामा,दोन मामी,तीन मावशा,आई,यापैकी फक्त एक मामी आहेत.आणि त्या आठवणीने दरवर्षी कुवरी पाठवतात आणि भाजी ताटत पडते.
आमच्याकडे या भाजीला लसूण फोडणीवर घालून त्यावर कांदा परतून भाजी टाकायची.वर मसाला घालून झाकण द्यायचे.एक दोन वाफा आल्या की, मीठ घालून उतरायची.वाढताना भरपूर ओले खोबरे घालून वाढायची.
ही पद्धत मात्र माझ्या एका एका महाविद्यालयीन मैत्रीण निमा महाडीकच्या आईची.ही भाजी नुसती बशीत घेऊन पोह्यांप्रमाणे खायलाही मस्त लागते नि मला तशी खायलाही आवडतेच. चला तर, तुम्हालाही खायची असेल तर साहित्य गोळा करा.बाकी सर्व साहित्य घरात असतेच फक्त कुवरी आणायला बाजारात जावे लागेल.
साहित्य:-
१. एक कुवरी(कोवळा फणस).
२. लसूणपाकळ्या गरजेप्रमाणे.
३. लाल सुक्या किंवा ओल्या मिरच्या.माझी आवड ओल्या लाल मिरच्या.
४. कांदे
५. ओले खोबरे भरपूर
६. कोथिंबीर
७. तेल
८. चीनुसार मीठ आणि साखर.
९. हळद पूड
कृती:-
१. आधी हाताला आणि विळीला तेल चोळून घ्या.
२. फणसाच्या चकत्या कापा.
३. एका मोठ्या पातेल्यात त्यात फणसाच्या चकत्या बुडतील इतके पाणी घालून त्या उकडा.
४. पाणी वेळून थंड करा.
५. थंड झाल्यावर चकत्यांचा कडेची साल काढा.
६. आता पाट्यावर किंवा किचन कट्ट्यावर ठेवून एकेक चकती ठेचून मोकळी करावी किंवा हाताने पिंजून काढावी.
७. आता ही भाजी फोडणीवर टाकायला तयार झाली.(या टप्प्यावर ही भाजी हवाबंद करून फ्रीजरमध्ये साठवू शकता,हवी तेव्हा रूम टेम्परेचरला आणून पुढची कृती करू शकता.)
८. वाटीने मोजून घ्या.जितक्या वाट्या होतील त्या मापाने कांदे,मिरच्या व लसूणपाकळ्या घ्याव्यात.माझी भाजी चार वाट्या झाली.एका वाटीला अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी तेल,चार मध्यम लसूणपाकळ्या आणि चार मिरच्या हे निमाच्या आईचे प्रमाण.मी तेच वापरते,तुम्ही आवडीनुसार कमीजास्त घेऊ शकता.
९. मिरच्या आणि लसूणपाकळ्यांचे खसखशीत वाटण पाणी न घालता करा.
१०. गॅसवर कढई ठेऊन तेल घाला.
११. तेल तापले की,त्यात हे वाटण घालून परता.
१२. खरपूस परतून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता.
१३. त्यात हळदपूड घालून परता.
१४. आता ठेचलेली भाजी घालून परता.
१५. चवीनुसार मीठ व साखर घालून परतत रहा.
१६. खोबरे,कोथिबीर घालून सजवा.(कोथिंबीर माझी अॅडिशन आहे.)
१७.आता थांबू नका.भाकरी,पोळी,पुरी कशाहीसोबत किंवा नुसतीच खायला सुरुवात करा. माझी आवड कोणत्याही पिठाची भाकरी किंवा नुसतीच.
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 10:06 pm | विजय पुरोहित
खतरनाक रेसिपी!!!
31 Mar 2016 - 11:07 pm | स्रुजा
छ्या ! आम्हाला कधी खायला मिळणार हे? नवा फणस नावाचा काही प्रकार असतो हेच आत्ता कळलं. पुण्यात का होईना पण हे फणस मिळतात का?
1 Apr 2016 - 9:45 am | सामान्य वाचक
भाजीवाल्यांकडे दिसायला लागले सुद्धा
1 Apr 2016 - 9:56 pm | स्रुजा
हो? मग सुरंगी ताई या पाकृ साठी धन्यवाद :) ;)
1 Apr 2016 - 10:42 pm | नूतन सावंत
सुस्वागतम् सृजा.
31 Mar 2016 - 11:12 pm | प्रचेतस
फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ, निवगऱ्या, पानग्या हे अस्सल कोंकणी पदार्थ खायची खूप इच्छा आहे.
31 Mar 2016 - 11:52 pm | इशा१२३
नेहेमी काहितरी नवच देतेस तु सुरुगीताई.पहिल्यांदाच पाहतेय अशी भाजी . मस्तच!
1 Apr 2016 - 12:20 am | रेवती
भारी पाक्रु आहे.
1 Apr 2016 - 12:53 am | उगा काहितरीच
अत्याचार ...अत्याचार ... एवढा खटाटोप करायला जमणार नाही. आणी या उन्हाळ्यात बहुतेक घरी पण जायला जमणार नाही... :-( बाकी फणसाची भाजी म्हणजे आपली अॉल टाईम फेवरेट भाजी.
1 Apr 2016 - 8:51 am | नूतन सावंत
उगा काहीतरीच,
अत्याचार तर खराच.एवढा खटाटोप करताना ' जिभली ' नावाचा अवयव असतो ना तो हा सर्व खटाटोप आनदाने,उत्साहाने करायला लावतो.पण खरा अत्याचार तर पुढेच असतो.विळी किंवा सुरी,आणि चकत्या उकडलेले भांडे साफ करताना हात नावाचे अवयव "अत्याचार....अत्याचार..." असेच ओरडत असतात.
1 Apr 2016 - 9:11 am | स्नेहश्री
वा मस्तच. ही नवी पद्धत... लगेच वापरण्यात येईल
आमच्याकडे फणसाची भाजी म्हंटली की गुळ, लाल मिरची मेथीची फोडणी हवीच. ओला नारळ ही हवाच.आणि ओले काजु ही हवेच.
1 Apr 2016 - 9:40 am | नूतन सावंत
तुमच्या पद्धतीने कधी करणार आहेस ते कळव.
1 Apr 2016 - 9:43 am | यशोधरा
सुरंगीतै, येवाली आणि तुझीवाली भाजी ऑलमोस्ट सेम वाटतेय.
1 Apr 2016 - 5:46 pm | नूतन सावंत
यशो, बदल मूळ फणसातच आहे.या भाजीत अगदी कोवळा फणस ज्याची पावही वापरता येते.शिवाय इतर मसाले किंवा फोडणीलाही दुसरे काहीच नाही.व्यंजन म्हणूनही काही वापरत नाही.
1 Apr 2016 - 11:14 am | सविता००१
सुरंगीताई, करणारच ही भाजी
तू ओल्या मिरच्या म्हणालीस. हल्ली तर हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या असं म्हणण्यात हे अस्सल ओल्या मिरच्या खूप दिवसांनी ऐक्लं. मस्त वाटलं अगदी.
1 Apr 2016 - 11:20 am | नन्दादीप
आत्तापर्यंत फक्त दोनच भाज्या आवडीने खातो... त्यात एक ही आणि दुसरी बटाटा..
बाकी भाजीच्या पाक्रु चे कोकणस्था नी (कोकणात रहाणारे) पेटंट घ्यायला हरकत नाही...टिपीकल कोकणी पाक्रु. तों.पा.सू. माझी आजी यात किंचीत गूळ घालते.
फक्त एकच सुधारणा : "फूसाची" भाजी नसून "पुसाची" भाजी असावी, असे वाटते. कारण सर्वसाधरणपणे फणसाच्या कुवर्या या पौष महिन्यात तयार होतात. त्यामुळे या भाजीचे नामकरण पौषातली - पौषाची - पुसाची भाजी असे झाले..
2 Apr 2016 - 11:45 am | नूतन सावंत
नंदादीप,असेलही तुम्ही म्हणता तसं.पण मी तरी आजपर्यंत फाल्गुन आणि चैत्रातच इतका कोवळा फणस पाहिलंय.तुम्ही म्हणता तसा अजून दोन महिने आधी मिळाला तर बरंच आहे की.
1 Apr 2016 - 12:28 pm | अजया
ही भाजी कोकणी लोकांनाच जमते आणि त्यांच्या हातची छान लागते असे अनुभवसिद्ध मत आहे ;) तुझ्याकडे येऊनच खावी लागेल मला!!
1 Apr 2016 - 12:41 pm | नूतन सावंत
ये ग.ठरवा कट्टा.कृतीत अनु.सातमध्ये लिहिलंय तसे हवाबंद डबे आहेत आता फ्रीजमध्ये.शुभस्य शीघ्रम्.
1 Apr 2016 - 1:48 pm | विशाखा राऊत
ताई मस्तच.. लाल मिरची ठेचुन आई करते भाजी.. अप्रतिम होते, किती वषर् झाली ही भाजी खावुन. ह्याच कोयरीच्या भाजीमध्ये कोलीम घालायचा अहाहा मस्तच
1 Apr 2016 - 5:54 pm | नूतन सावंत
विशाखा,ही भाजी बहुतेक शाकाहारी जेवणातच आवडते ,पण उरली तर कोलिम,सुकट,सोडे तेलावर परतून त्यापुरतेच तिखट,हळद,मीठ घालून त्यावर ती भाजी परतली की बस.
1 Apr 2016 - 9:23 pm | नूतन सावंत
विशाखा,ही भाजी बहुतेक शाकाहारी जेवणातच आवडते ,पण उरली तर कोलिम,सुकट,सोडे तेलावर परतून त्यापुरतेच तिखट,हळद,मीठ घालून त्यावर ती भाजी परतली की बस.
1 Apr 2016 - 4:46 pm | अनन्न्या
आमच्याकडे मधला भाग ज्याला फणसाची पाव म्हणतात तो भागही काढून करतात भाजी. म्हणजे फणस पिकल्यावर ज्याच्या भोवती गरे दिसतात तो भाग. शिजत पण नाही ना ही पाव.
बाकी पाकृ मस्त!! आता नियमित सुरू झालीय ही भाजी, ओले काजूगर घालून आणखी मजा येते.
1 Apr 2016 - 5:38 pm | नूतन सावंत
अगदी कोवळ्या फणसाची पाव काढायची गरज नसते.ती शिजते आणि ठेचून घेता येते.
1 Apr 2016 - 4:52 pm | एस
स्लर्र्र्र्र्र्र्प!
1 Apr 2016 - 6:43 pm | उल्का
मी गेल्या आठवड्यात केली ही भाजी. अतिशय आवडीची.
कोकणी भाषेत माझी सासू ह्या कोवळ्या फणसाला 'कुइलो/कुयलो' म्हणते.
आमच्याकडे ह्यात तूर डाळ घालतात आणि हिंग, मोहरी, ओल्या हिरव्या मिरच्या ठेचून आणि भरपूर लसूण पण ठेचून फोडणीत घालतात. कांदा नाही घालत.
कित्ती छोटे छोटे फरक असतात नै?
तुम्ही खूप छान पद्धतीने लिहिली आणि दाखवली आहे.
2 Apr 2016 - 12:05 pm | भिंगरी
सुरंगीताई,तो फणस कोवळा आहे ( बीन बियांचा )आहे हे कसं ओळखायच?
2 Apr 2016 - 1:23 pm | नूतन सावंत
भिंगरी,या दिवसांत कोवळेच असतात.आणि दुसरी खूण म्हणजे बाहेरचा भागही हाताला मऊसर लागतो.काटे फार कडक नसतात.हाताने सहज दाबली जाते.
2 Apr 2016 - 1:58 pm | नीलमोहर
ही भाजी नेहमी करावीशी वाटते, मंडईत छोटे फणस असतातही, पण पूर्ण कृती माहीत नसल्यामुळे करायची राहून जात होती, आता हे बघून प्रयत्न करावा.
धन्यवाद :)
3 Apr 2016 - 11:00 pm | नूतन सावंत
जरुर कर नीमो आणि इथे फोटो टाक.
3 Apr 2016 - 11:16 pm | मदनबाण
मस्त... :)
माझी आवडती भाजी ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज कुणीतरी यावे... :- मुंबईचा जावई
6 Apr 2016 - 8:28 am | दीपा माने
सुरंगी, तुमच्या सर्वच पाकृ आणि लिखाण मी नेहेमीच आवडीने वाचत असते. तुमची लिहीण्याची ओघवती शैली आणि पारंपारिक पाककृती वाचून एक वेगळाच आनंद मिळत असतो. आपण सतत लिहीत रहा. अनेक शुभेच्छा!
8 Apr 2016 - 10:37 am | पियुशा
वा झकास दिसतए भाजी :)