महिला दिनानिमित्त अनाहितामध्ये वन डिश मिल या संकल्पनेवर आधारित "अनाहिता अन्नपूर्णा स्पर्धा "आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतली ही उपविजेती पाककृती.
पूर्ण जेवण म्हणून पदार्थ करताना तो सर्व घटक असणारा आणि दिसण्याबरोबर चवीलाही चांगला हवा म्हणून गुजराती/राज्स्थानी प्रकारात थोडे बदल करून ही पोटभरीची डीश चटपटीत करण्याचा प्रयत्न केलाय.
साहित्यः
१) हांडवोसाठी:
तांदूळ २०० ग्रॅम, मूगडाळ ५० ग्रॅम, तूरडाळ ५० ग्रॅम, उडिदडाळ ५०ग्रॅम, चणाडाळ ५० ग्रॅम, दही १०० मिली., आलंपेस्ट
एक टेबलस्पून, लसूणपेस्ट एक टेबल्स्पून, मिरची पेस्ट एक टेबलस्पून, मीठ दीड टीस्पून, साखर एक टीस्पून, तेल दोन
टेबलस्पून, खायचा सोडा एक टीस्पून, हळद एक टीस्पून.
भाज्या: गाजर किसून अर्धी वाटी, कोबी किसून अर्धी वाटी, दुधी किसून अर्धी वाटी, कांदा बारीक चिरून अर्धी वाटी, पाव
वाटी कांदापात चिरून, पाव वाटी कोथिंबिर बारीक चिरून. भाज्या सर्व मिळून २००ग्रॅम.
२) फोडणीसाठी:
तेल दोन टेबलस्पून, पांढरे तीळ एक टीस्पून, मोहरी अर्धा टीस्पून, हळड अर्धा टीस्पून, कढीलिंब १० पाने.
३) हिरवी चटणी:
तीन हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबिर, अर्धा टीस्पून शेंदेलोण, अर्धा टीस्पून पादेलोण, लागल्यास साधे
मीठ, एक टीस्पून जिरे.
४) चिंच खजूर चटणी:
१५ खजूर, १२ काळ्या मनुका, एक टेबलस्पून गूळ, एक टेबलस्पून चिंच, एक टीस्पून जिरे, एक टीस्पून धने, अर्धा
टीस्पून शेंदेलोण, अर्धा टीस्पून पादेलोण, एक टीस्पून लाल तिखट, लागल्यास साधे मीठ.
५) सजावटीसाठी:
बारीक पिवळी शेव, चीज दोन क्युब, सॉस.
कृती:१) डाळी आणि तांदूळ धुऊन रात्री भिजत घालावेत. सकाळी दोन्ही गोष्टी रवाळ वाटाव्यात. वाटताना त्यात दही घालावे,
इडलीच्या पिठाइतपत सैल हवे. पाणी लागल्यास घ्यावे, नाहीतर जादाचे पाणी वापरू नये.
२) मिश्रण उबदार जागी सात्/आठ तास ठेवावे.
३) करायच्या आधी अर्धा तास तयारी करावी कोबी, गाजर, दुधी किसून घ्यावा. आलं लसूण मिरची यांची पेस्ट करावी.
कांदापात, कोथिंबिर बारीक चिरावी.
४) हिरव्या चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे.
५) चिंच, खजूर बिया काढून, मनुका थोड्या पाण्यात शिजवून घ्याव्या. बाकी साहित्य एकत्र करून चिंचखजूराची
चटणी वाटून घ्यावी.
६) दोन टेबलस्पून तेलाची मोहरी, तीळ, कढीलिंबाची पाने, हळद घालून फोडणी करावी.
७) वाटलेल्या मिश्रणात. आलं, लसूण, मिरची पेस्ट, साखर, मीठ, खायचा सोडा, तेल, हळद आणि सर्व भाज्या मिक्स
कराव्या.
८) फ्रायपॅनमध्ये केलेल्या फोडणी पैकी थोडी फोडणी घालावी. तयार मिश्रण ओतावे. थोडी फोडणी वरून घालावी.
९) फ्रायपॅन मंद गॅसवर ठेवावे. दहा मिनिटांनी उघडून पहावे. बाजू उलट करावी, परत ७/८ मिनिटे ठेवावे. सुरीचे टोक
घालून चिकटत नाही ना ते पहावे. तयार हांडवो गार करण्यास ठेवावा.
खरं तर हा तयार हांडवो असाचही छान लागतो. पण त्यावर चटण्या शेव किंवा सॉस लावून आणि चीज किसून
घातल्यास मुलेही अगदी आवडीने खातात.
१०) हांडवो गार झाला की त्याचे पिझ्झ्याप्रमाणे तुकडे करा. प्रत्येक तुकड्याला सॉस लावा. त्यावर चीज पसरा, आणि
द्या मुलांना!
११) किंवा चिंच खजूर चटणी, हिरवी चटणी लावा आणि त्यावर बारीक शेव घालून खा.
१२) हांडवो ओव्हनमध्ये करायचा झाल्यास २०० डिग्रीला प्रिहीट करून २०० डिग्रीवर ३५ ते ४० मिनिटे ठेवावे.
१३) हांडवो इडलीप्रमाणे उकडूनही करता येतो.
१४) झटपट होण्यासाठी सर्व डाळी आणि तांदूळ यांचे रवाळ पीठ करून ठेवावे. रात्री दही घालून ठेवल्यास भाज्या
मिसळून सकाळी डब्यालाही करता येईल. भाज्या आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेता येतील.
प्रतिक्रिया
21 Mar 2016 - 2:47 pm | सूड
भानोळीचे भाऊबंद असल्यासारखं दिसतंय. सुंदर!!
21 Mar 2016 - 2:51 pm | गवि
काय प्रेझेंटेशन आहे. वाह..!!! टाळ्या.
गिट्सचं पाकीट आणून दोनदा प्रयत्न केला. दोन्हीवेळेला चुरारुप कडक आणि कोरडं ठणठणीत काहीतरी बनलं. पहिल्यावेळी आपलं काहीतरी चुकलं असेल म्हणून दुसर्यावेळी केलं तेव्हाही अर्धं जळकट आणि अर्धं कडक कच्चं असं ठिसूळ वडीसारखं काहीतरी बनलं.
म्हणून या पदार्थात आता परत हात घालायचा नाही असं ठरवलं.
22 Mar 2016 - 10:23 am | अत्रुप्त आत्मा
@काय प्रेझेंटेशन आहे. वाह..!!! टाळ्या. >> +++ १११
21 Mar 2016 - 2:53 pm | सविता००१
मस्तच.
मी नेहमी करते.
पण तुझं प्रेझेंटेशन लाजवाब
21 Mar 2016 - 3:22 pm | मधुरा देशपांडे
सुंदर सादरीकरण. पाकृ पण मस्त.
21 Mar 2016 - 3:25 pm | सस्नेह
सुरेख प्रेझेंटेशन !
डिशमधला हांडवो हा उकडून केला आहे की धिरड्यासारखा ? तो इतका जाड कसा ? उकडून कसा करायचा ?
21 Mar 2016 - 3:34 pm | निशांत_खाडे
पाक्रु नेहमी प्रेमाने जबराट, फोटो तोंपासू..
ते शेवटच्या फोटोतले फुलझाड दुधी, गाजर, मटार, शेवगा वैगेरे वापरून बनवले आहे काय?
एक स्वतंत्र धागा आला पाहिजे त्यावर!
21 Mar 2016 - 3:34 pm | अनन्न्या
तो फुगतो ना ढोकळ्यासारखा, ढोकळ्याइतपत आहे.
21 Mar 2016 - 4:12 pm | पियुशा
व्वा भारी पाक्रु . सादरिकरण झक्कास ! मला ते गाजर मटार फुल खुप्प्च आवड्लेय :)
21 Mar 2016 - 4:23 pm | पलाश
छान पाककृती व सादरीकरण!!!
21 Mar 2016 - 4:29 pm | रेवती
अनन्या, सजावट मस्त जमलीये. पदार्थ आवडला. चांगला प्रोटीनयुक्त व पोटभरीचा आहे.
21 Mar 2016 - 4:56 pm | वेल्लाभट
सारू छे भाय!
21 Mar 2016 - 5:06 pm | स्वाती दिनेश
झकास दिसतोय हांडवो..
स्वाती
21 Mar 2016 - 5:20 pm | पिलीयन रायडर
काय प्रेझेंटेशन!!!! मस्त!!
नक्की करुन पाहिन, सोप्पा वाटत आहे.
21 Mar 2016 - 5:31 pm | अनन्न्या
@ गवि, आता या कृतीने करा, खात्रीने सांगते मस्त होते.
@ स्नेहांकिता, इडलीप्रमाणेच उकडायचे, किंवा ढोकळ्यासारखे एका भांड्यातही होईल.
@निशांत, हो शक्यतो पाकृमध्ये वापरलेल्या भाज्या वापरून डेकोरेशन करायचे डोक्यात होते. दुधी, गाजर, कांदापात झावळ्यांच्या हिरात घालून देठ आणि पांढरी फुले मुळ्याची आहेत. चटणी बाऊल जवळची कांद्याची आहेत.
सर्वांना परत एकदा धन्यवाद!
अनाहिताने व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे स्पर्धेचा अनुभव मिळाला. त्यासाठी अनाहिता संपादकांचे विशेष आभार!
21 Mar 2016 - 5:52 pm | कविता१९७८
मस्त ग,
21 Mar 2016 - 6:31 pm | नूतन सावंत
अनन्या,कसला दिसतोय ग हांडवो.न खाता नुस्ता बघूनच पोट भरेल.
21 Mar 2016 - 7:02 pm | दिपक.कुवेत
हांडवो करायचा खुप मनात आहे पण का कोण जाणे अजून मुहुर्त लागला नाहिये. बाकि सादरीकरण खल्लास...सजावट एकदम भारी झाली आहे.
22 Mar 2016 - 8:58 am | अनन्न्या
तुमच्या कार्व्हींगच्या धाग्यातून प्रेरणा घेतली,आता पुढचे भाग येऊदेत!
21 Mar 2016 - 9:05 pm | भुमी
उत्तम सादरीकरण!
22 Mar 2016 - 2:17 am | अमृता_जोशी
वावावा! खूप भारी!
अनन्या ताई, तुमच्या पाककृती या बऱ्याच दिवसांपासून वाचतीय. बऱ्याच ट्रायही केल्या आहेत. आज खाते मिळाल्याच्या आनंदात, गुरे जशी कुरणावर इकडे तिकडे तोंड मारत भटकतात तशी साईटभर फिरतेय. या सगळ्या आनंदात तुम्हाला धन्यवाद म्हणणे विसरूनच गेले, मनापासून धन्यवाद!
(आनंदी आणि आभारी)
अमृता जोशी
22 Mar 2016 - 3:13 am | विशाखा राऊत
ताई अभिनंदन. खुप सुरेख पदार्थ आणि त्याहुनही सुंदर सजावट. मस्तच
22 Mar 2016 - 3:45 am | रुपी
मस्तच! हांडवो खूप आवडतो, पण करायला वेळ लागतो म्हणून याच्या वाटेला कधी गेले नाही.
सजावटीवर फारच मेहनत घेतली आहे, पण फोटो तितका न्याय देणारे नाही आले बहुतेक, प्रत्यक्ष जास्त छान दिसत असेल.
22 Mar 2016 - 8:55 am | अनन्न्या
@अमृता, आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यु गं!
@रूपी, खरय सजावटीवर मेहनत घेतली पण माझ्याकडे कॅमेरा नाही म्हणून मोबाईलवर काढते फोटो!
22 Mar 2016 - 9:14 am | क्रेझी
अनन्याताई मी तयार इडलीचं पीठ आणून त्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून बघितलं तर जमेल का?
आणि कढईमधे सगळ्या भाज्या परतून घेऊन मग इडलीपात्रात लावलं तर होईल का १५मिनीटांमधे?
22 Mar 2016 - 11:04 am | अनन्न्या
भाज्या घालून इडली, आप्पे असं लागेल
22 Mar 2016 - 9:23 am | अजया
मस्त पाकृ.
22 Mar 2016 - 10:47 am | नीलमोहर
सुंदर पाकृ आणि सादरीकरण.
हे करायची इच्छा कधीपासून आहे पण कठीण वाटत असल्यामुळे राहिलंय आता परत बघेन.
22 Mar 2016 - 2:29 pm | Mrunalini
मस्तच दिसतोय हांडवो. मी कधी खाल्ला नाहिये, त्यामुळे एकदा नक्की करायचाय. आता तु दिलेल्या पाकृने करुन बघेन.
22 Mar 2016 - 3:26 pm | रंगासेठ
गजब प्रेझेंटेशन! एकदम मस्त दिसतोय हांडवो.
23 Mar 2016 - 4:47 am | पद्मावति
मस्तं पाककृती. सादरीकरण अफाट आहे.
25 Mar 2016 - 11:26 am | पूर्वाविवेक
पौष्टिक, अतिशय सुदर आणि सोप्प्या भाषेत लिहिलेली पाककृती. सजावट उत्तम केली आहे.