दोडक्याचा भात.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
16 Sep 2008 - 2:39 pm

अर्धा किलो दोडकी. (शिराळी)
दोन वाट्या बासमती तांदूळ.
१ वाटी ताक
१ वाटी पाणी
४ हिरव्या मिरच्या
२" आलं
२ चमचे (टी-स्पून) धण्याची पावडर
१चमचा (टी-स्पून) जिर्‍याची पूड
मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी तेल आणि मोहरी.
ओलं खोबरं
कोथिंबीर.
साजूक तुप
प्रथम तांदूळ तासभर भिजत घालावेत, नंतर निथळवून घ्यावेत.
दोडक्याच्या शिरा काढून दोडकी किसून घ्यावीत.
आलं आणि मिरच्या वाटून घ्याव्यात. (मिक्सर मधून काढाव्यात)
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून मोहरीची फोडणी करावी आणि त्यावर दोडक्यांचा किस टाकून परतून घ्यावा.
चवीनुसार मिठ घालावे. एक वाफ येऊ द्यावी.
आता त्यावर निथळविलेले तांदूळ घालून परतावे.
आलं -मिरच्यांचं वाटण, धणे-जिर्‍याची पुड, ताक आणि पाणी घालून नीट एकत्र करावं आणि घट्ट झाकण लावून अतिमंद आंचेवर जवळ-जवळ अर्धा तास भात शिजवावा. (मधे एकदा हळूवार हाताने वरखाली करावा)
भात शिजला की त्यावर साजूक तूप घालावे.
वाढताना कोथिंबीर आणि नारळाने सजवावा.

शुभेच्छा.

प्रतिक्रिया

किट्टु's picture

16 Sep 2008 - 3:05 pm | किट्टु

रेसिपि तर छान दिसतेय... :)

आज करुन पहिल...

किट्टु

स्वाती राजेश's picture

16 Sep 2008 - 3:20 pm | स्वाती राजेश

अगदी मसाले भाता( वांगी घालून) सारखा दिसत आहे...:)
मस्त रेसिपी....दोडका किसून कधी केला नाही...नुसते चौकोनी तुकडे घालून करत होते..ही पण करून पाहिन....
बाकी, ताक कशासाठी? काय प्रयोजन असावे? का फक्त चवीसाठी?

रेवती's picture

16 Sep 2008 - 6:35 pm | रेवती

कि ताकामुळे थोडी आंबूस चव येते म्हणून वापरलयं!
मी मसालेभातातही चमचाभर दही घालते.

रेवती

स्नेहश्री's picture

16 Sep 2008 - 3:27 pm | स्नेहश्री

सुरेख. अस वाटत आहे कोणी तरी गरम गरम भात माझ्या समोर ठेवला आहे आणि काही क्षणात मला तो मिळणार आहे.
एवढी सोप्पी पाककृती नक्की करुन बघायलाच पाहिजे...!!!!
या विकांताला नक्की करणार.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 4:53 pm | विसोबा खेचर

सुंदर पाकृ..

सुरेख फोटू....

तात्या.

नीता's picture

16 Sep 2008 - 5:16 pm | नीता

मस्त.. खुपच छान.
नक्की करून बघेन.
फोटो पाहुन तोंडाला अगदी पाणी सुट्ले.

नीता.

मनस्वी's picture

16 Sep 2008 - 5:17 pm | मनस्वी

करून बघायला हवा!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

रेवती's picture

16 Sep 2008 - 6:32 pm | रेवती

दोडक्याचा भात मी पहिल्यांदा ऐकतीये. करून बघीन व नक्की कळवीन.
फोटो मस्त आलाय!

रेवती

शितल's picture

16 Sep 2008 - 6:44 pm | शितल

अरे वा छान पाककृती. :)
करून नक्की पाहिन.
काका,
राईसच्या मस्त पाकक्रुती अजुन असतील तरी ही सांगा मी राईसवर नेहमी वेगवेगळे प्रयोग करून पहात असते. :)