क्रिसमसच्या दिवशी मुंबई ते उरण साई मंदिर हे ३५ किमी पदयात्रा करताना पायाच्या तळव्याला दुखापत झाली होती त्यामुळे या ट्रेकला कितपत चालता येईल याची शंका होती. तसाच दुखरा पाय घेऊन २५ डिसेंबरला मुंबईहून आम्ही निघालेलो २६ डिसेंबर ला सकाळी गडहिंग्लज येथील महागाव येथे उतरलो. शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवलेला एक तिशीचा मुलगा आमची सगळी व्यवस्था पाहत होता. अंगाने काटक, हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्याशी ओळख होऊन गप्पा देखील सुरु झाल्या. संतोष हासुरकर त्याचे नाव. संतोष दुर्गवीर संस्थेतर्फे गडांच्या संवर्धनाचे काम करतात. आम्ही त्यांच्याच सासुरवाडीत उतरलो होतो. संस्थेच्या साईट वर ट्रेकची माहिती वाचून संतोषने त्याच्या सासुरवाडीत उतरण्यास भाग पाडले आणि आदल्या दिवशी स्वतः येऊन आमची व्यवस्था पाहत होता. तिथेच फ्रेश झालो, नाश्ता केला. नंतर सुरु झाली ओळख परेड, त्यात दुर्गवीर संस्थेबाबत अधिक माहिती कळाली. त्यांच सामानगडावर संवर्धनाच काम चालू आहे.
संतोष दुर्गावीर बद्दल माहिती देताना
संतोष आणि कुटुंबीय डाव्या बाजूला
पहिला टप्पा होता नेसरी खिंडीतील प्रतापराव गुजरांच स्मारक. आपल्या स्वराज्याचे तिसरे सरनोबत प्रतापराव गुजर. कुडतोजी गुजरांना मिर्झा जयसिंघा सोबतच्या लढाईत गाजवलेल्या अतुल्य पराक्रमाबद्दल शिवाजी महाराजांनी "प्रतापराव" ही पदवी बहाल केली.
नाश्ता करून चार वडाप मध्ये बसून नेसरी स्मारक पाहण्यास निघालो.
नेसरी स्मारकाच्या वाटेवर
नेसरी चौकातच प्रतापराव गुजरांचा घोड्यावरील युद्धाच्या आवेशातील देखणा पुतळा आहे.
नेसरी स्मारकात प्रवेश करताना अंगावर त्या शुरवीरांचा पराक्रम आठवून काटा आला. आतमध्ये डाव्या बाजूस शिवाजी महाराजांचा १८/२० फुट उंच सिंहासनारूढ पुतळा आहे. महाराजांसमोर नतमस्तक होऊन मधोमध असणारा स्तंभ पाहायला गेलो. त्यावर त्या युद्धाची माहिती लिहून ठेवली आहे. आणि स्तंभासमोर शुरतेचे प्रतिक म्हणून एक ढाल आणि तलवार आहे. आता वेळ होती स्मारकातील महत्वाची वास्तू पाहायची. त्या सात शूरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले एक देखणे शिल्प. खाली सहा ढाली त्यावर खांबासारख्या सात तलवारी आणि त्या तलवारींवर एक ढाल. शार्दुलने नेहमीप्रमाणे ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र म्हटला.
तिथेच राखणदारी साठी असलेले काका सांगत होते की अजूनही त्या ओढ्याच्या पाण्याचा रंग त्या दिवशी लाल होतो. जणू काही त्या शूरांचा रक्त त्यात मिसळले असावे.
नेसरी स्मारक
शिव-मंदिर
७ वीरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले शिल्प - ७ ढाली आणि ७ तलवारी
त्या समाधीला वंदन करून सामानगडाकडे निघालो. सामानगडाचा आवाका बराच मोठा आहे. सामान गडाच वैशिट्य म्हणजे जमिनीतील गुहेत असलेल्या कैद्यांना ठेवायच्या कोठड्या आणि सात कमानी असलेली विहीर. विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा या किल्ल्यांच्या मधोमध सामानगड असल्याने रसद पुरवण्याच्या दृष्टीने एकदम चांगला असा हा किल्ला. त्यामुळेच याच महत्व अनन्य साधारण. यावर रसद, दारुगोळा वगैरे ठेवत असत त्यामुळे या गडाला सामानगड हे नाव पडले असावे.
कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
सामानागडाचे प्रवेशद्वार
एका बांधीव चौकोनात आत खोदलेली विहीर
चौकोनात उतरण्यासाठी पायऱ्या
सात कमानी असलेली विहीर
दुर्गवीर प्रतिष्ठान
मंदिरातील अंबाबाईची मूर्ती
अंधार कोठडी - अंधार कोठडीत अपुऱ्या उजेडामुळे नीट फोटो काढता आले नाहीत
तिथे एक मुलगा बाईक वरून आला होता, अंगात पिवळ्या टी शर्ट वर दुर्ग संस्कार छापलेलं होत. त्याने देखील शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवली होती. त्याच नाव विसरलो. त्याच्याशी बोलायला लागल्यावर कळल की तो दर शनिवारी पाच गडावरील पाणी घेऊन जाऊन शिवा काशीद यांच्या समाधी धुवायचा, म्हणजे एक प्रकारे अभिषेक करायचा. त्याच्या या कामाबद्दल विचारलं तर तो म्हणाला "शिवा काशीद यांच्या कार्याची आठवण म्हणून करतोय. जेणेकरून त्या शूराच
विस्मरण होऊ नये. मी माझ्या तालुक्यातले, माझ्या जवळपास च्या किल्ल्यांची काळजी पहिली घेईन मग बाहेरच्या किल्ल्याचं बघेन. सुरुवात माझ्या घरापासून करेन मग बाहेर जाईन."
सामान गडावर जागोजागी साफसफाईचे दुर्गवीरचे काम चालू होते. दर रविवारी त्यांचा हा कार्यक्रम चालू होता.
तिथे असलेल्या मंदिरात जरा निवांत बसलो. त्या गरम वातावरणात थंडगार लादीवर बसून जीव शांत झाला. ट्रेकच्या पुढल्या टप्प्याबद्दल सर्वांना सांगितलं. तिथून निघून जवळच असलेल्या हनुमान मंदिराला भेट द्यायला निघालो.
मारुतीराया
रामदास स्वामी आजारी असताना, त्यांना शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याची इच्छा झाली. त्यांच्या आजारावर फक्त वाघीणीच दुधाने फरक पडेल अस सांगून शिवाजी महाराजांना ते आणण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. शिवाजी महाराजांनी ज्या गुहेतून वाघीणीच दुध काढून आणले ती गुहा या हनुमान मंदिरापासून १० मिनिटावर आहे अस कळल्यावर ती गुहा पाहायला गेलो. अजूनही तिथे वाघाची डरकाळी ऐकू येते अस गावकऱ्यांकडून कळाल. आम्ही देखील वाघाच्या पायाचे ठसे दिसताहेत का हे बघत होतो पण काहीच आढळून आले नाही.
गुहा
तिथे जवळच प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना वास्तव्य केलेला वाडा आहे.
तिथून निघून उत्तूरच्या मार्गी लागलो. उत्तुरला खानावळीत जेवून पाटगाव ला निघालो. रांगण्यावर जाण्याआधी एक छोटस सरप्राईज असल्याच मंदिरात शार्दुलने सांगितलं होत. नकाशाप्रमाणे रांगण्याच्या पायथ्याच गाव म्हणजे भटवाडी मग आपण पाटगावला का चाललोय याचा अर्थ लागेना. विचारल्यावर शार्दुलने तेच सरप्राईज असल्याच सांगितलं.
सामानगडावरून निघताना
गाडी एका प्रशस्त लाकडी वाड्याबाहेर थांबली. तो वाडा म्हणजे मौनी महाराजांची समाधी.
वाड्याच प्रवेशद्वार
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाल्यावर मौनी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले होते. हेच या जागेचे ऐतिहासिक महत्व. मौनी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन वाडा फिरायला बाहेर पडलो. आता अंधार पडू लागला होता आणि आम्हाला लवकर भटवाडीत पोहोचायचं होत त्याकरिता शार्दुल सर्वांना हाकलवत होता.
वाडा १
वाडा २
वाडा ३
वाडा ४
वाडा ५
खांबावरील नक्षीकाम-१
खांबावरील नक्षीकाम-२
खांबावरील नक्षीकाम-३
खांबावरील नक्षीकाम-४
खांबावरील नक्षीकाम-५
नरसिंह अवतार
मौनी महाराज समाधी
आता रांगण्याच्या दिशेने निघालो. रांगण्याचे मार्गक्रमण अंधारातच करायचे हे पूर्वनियोजित होते. पण ट्रेक मध्ये गडबड झाली नाही तर तो ट्रेक कसला? महाराज सुद्धा मावळ्यांची परीक्षा घेत असतात. भटवाडी हे रांगण्याच्या आधीचे गाव, जिथे डांबरी रस्ता संपतो आणि कच्चा रस्ता चालू होतो हे माहित होते. पण भटवाडी येउन गेली हे कळलीच नाही आणि डांबरी रस्ता संपला आणि आम्ही कच्च्या रस्त्याने आमच्या गाड्यांचा ताफा हाकत राहिलो. कच्चा रस्ता जंगलातून चालूच होता. ओळखीच्या खुणा दिसत नव्हत्या. शंकेची पाल चुकचुकली तरीही काही अंतर गाड्या नेल्या. मग रस्ता चुकलो याची खात्री पटली आणि पुन्हा गाड्या माघारी वळवल्या. भटवाडीत येउन थांबलो. त्यावेळी आमचे स्थानिक मित्र ज्यांनी आमच्या जेवणाची सोय रांगण्यावर केली होती ते आमची भटवाडीत वाट बघत होते. भटवाडी नंतर रांगणा किल्ल्यासाठी उजव्या बाजूला रस्ता गेलाय तो अंधारामुळे दिसला नाही आणि आम्ही एक्स्ट्रा जीप सफारी करून आलो. ज्या ठिकाणी रस्ता चुकलो होतो तिथे संस्थेतर्फे दिशादर्शक बोर्ड लावायचा ह्याचा निर्णय झाला.
आता आम्ही आमच्या गाड्यांना टाटा केला आणि पाठीवर सामान चढवून रांगण्याच्या जंगलातून किल्ल्याच्या दिशेने निघालो. वाटाडे असल्यामुळे आता चुकण्याचा प्रश्नच नव्हता. पौर्णिमा दोनच दिवसांपूर्वी होऊन गेली असल्यामुळे मस्त चांदण्याचा उजेड होता. निशब्द शांतता, मस्त चंद्र प्रकाश, थंड वातावरण आणि सोबत हातात हात घालून चालणारी बायको, मस्त एकदम रोमांटिक माहौल. बायको एकदम खुश, मला थ्यांक्स म्हणाली या ट्रेकला आणल्याबद्दल. शेजारच्या टेकडीवर वणवा पेटला होता त्याची धग आम्हाला इतक्या दूर असताना देखील जाणवत होती.
सर्व मंदिरे आणि मोक्याच्या जागा आधीच बुक असल्यामुळे आम्ही उघड्यावर थांबायचा निर्णय घेतला. खालीच तळ्याकाठी घोटगे कणकवली येथील १० मित्रांनी गरमागरम वरण भात लोणचे जेवू घातले. प्रचंड भूक आणि कडाक्याच्या थंडीतील त्या लज्जतदार जेवणाची सर कशालाच येऊ शकत नाही. जेऊन झाल्यावर झोपण्यासाठी पथारी पसरली तर वारा चारी बाजूने उडवून देत होता. एका ठिकाणी पकडलं तर वारा दुसऱ्या बाजूने उडवून लावी. कसेबसे स्लीपिंग ब्यागेत घुसलो आणि झोपेची आराधना करू लागलो. वरती चांदण्यांनी भरलेलं आकाश, त्याचा पडलेला प्रकाश. घोंघावणारा वारा, प्रचंड थंडी यामुळे झोप लागेना.
सकाळच्या नाश्त्याची तयारी
रविवारी पहाटे फटफटल्यावर एक एक जण उठत होता. आन्हिक उरकून किल्ला फिरून येत होता. दुखऱ्या पायामुळे हा गड पूर्ण पाहता आला नाही, पण बाकी सर्व सकाळी उठून पूर्ण गड फिरून आले. रांगणा किल्ल्याचे स्वराज्यातील महत्व हे की शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना स्वतः जिजाऊनी मोहीम आखुन हा किल्ला आदिलशहा च्या ताब्यातून स्वराज्यात सामिल करून घेतला. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगणा किल्ल्याचा प्रथम क्रमांक लागतो.
दीपमाळ आणि मागे दिसणारे रांगणाई देवीचं मंदिर
सर्वांनी चहा नाश्ता घेऊन ९.३० वाजता गड सोडला. तिथल्याच चिकेवाडीत या ४-५ घरांच्या वाडीत आम्ही शिवशौर्य तर्फे काही कपडे आणि लहान मुलांसाठी खेळणी भेट दिली
कालच्याच मार्गाने trek करत भटवाडीच्या पुढील आडे गावात आलो. जंगला नंतर डांबरी रस्त्याने चालून सर्वचजण कंटाळले. वाटेत दोन ठिकाणी आपुलकीने चहा झाला. आडेगावातून आम्ही डावे वळण घेत सरळ उतरणीला लागलो. दुपारचे १ वाजले आहेत हे जराही जाणवत नव्हते इतक्या घनदाट मोठ्या वृक्षांच्या गर्दीत आम्ही घाटावरून कोकणात उतरत होतो. डांबरी रस्त्यावर आलेला कंटाळा कुठच्या कुठे पळाला.
अस्मादिक
ओळख पाहू काय आहे
कोकणात उतरताना
साधारण तासाभराने आम्ही कोकणातील घोटगे गावात पोहोचलो. हे आमच्या नितीन पन्हाळकरचे गाव. गेल्या गेल्या घरच्या अंगणातच थंडगार पाण्याने आंघोळ केली सर्वांनी. मालवणी भाषेतच आमची प्रेमाने विचारपूस होत होती. मालवणी जेवण आणि सोलकढी.... यथेच्च ताव मारला. किमान एका एका व्यक्तीने चार-पाच कप सोलकढी रिचवली.
जय भवानी प्रासादिक मंडळ
एवढ्या दुर्गम भागात कडाक्याची थंडीत जय भवानी प्रासादिक मंडळाच्या आमच्या मित्रांनी आम्हाला रांगण्यापासून घोट्गे गावापर्यंत मोलाची मदत केली,रुचकर जेवण दिले. त्यासाठी त्यांचे श्रीफळ देऊन आभार मानले. जड अंतकरणाने निरोप घेतला जातो आम्ही तर जड शरीरानेच (जेवणावर आडवा हात मारल्यामुळे) निरोप घेतला. घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या ट्रेकची यशस्वी सांगता झाली.
सामानगड - गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करायचा. गडावर राहण्याची, जेवणाची सोय नाही. विहिरीतील अथवा तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही.
रांगणा - कोल्हापूरहून गारगोटी - कडगाव मार्गे पारगाव गाठायचे. पाटगाव पासून तांब्याचीवाडी मार्गे भटवाडी गाठायची. पाटगाव ते भटवाडी १० - १२ किमीचे अंतर असावे. भटवाडी पासून पुढे ४५ किमी वर चिक्केवाडी आहे. मोठी गाडी तांब्याच्या वाडी पर्यंत जाते, पण छोटी गाडी असेल तर ती चिक्केवाडी पर्यंत जाऊ शकते. अन्यथा तांब्याची वाडी ते चिकेवाडी अंतर पायीच कापावे लागते.
भटवाडीत पोहोचल्यावर गावाच्या मधून जाणार्या रस्त्याने आपण धरणाच्या भिंतीजवळ पोहोचतो. येथून उजव्या हाताने लाल मातीचा गाडी रस्ता सुरु होतो. या रस्त्याने आपण तळीवाडी मार्गे चिक्केवाडीला पोहोचायचे. चिक्केवाडीतून एक ठळक पायवाट रांगण्यास जाते. वाटेत एक दगडी उंबरठा व चौकीचे अवशेष दिसतात. यापुढे येणारी खिंड पार करुन उतरल्यावर आपण रांगण्यासमोरील पठारावर येतो. रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे पण जेवणाची सोय आपण स्वत: करावी. गडावरील तलावात पिण्यायोग्य पाणी आहे.
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 1:38 pm | कंजूस
आवडलं.
4 Mar 2016 - 1:46 pm | प्रचेतस
वर्णन आणि छायाचित्रे आवडली.
4 Mar 2016 - 1:53 pm | स्पा
भारीच झाली मोहीम
मस्त फोटो
4 Mar 2016 - 2:12 pm | पद्मावति
फारच सुंदर लेख आणि फोटो.
4 Mar 2016 - 2:26 pm | नाखु
आणि मस्त मुशाफिरी...
उघड्या जागेवर विना तंबू राहिला होतात काय?
4 Mar 2016 - 3:24 pm | जगप्रवासी
हो फक्त स्लीपिंग ब्याग होती आणि सर्वजण एकमेकांना खेटून झोपले होते पण बेफाम वाऱ्यामुळे खुप थंडी वाजत होती.
4 Mar 2016 - 3:08 pm | शान्तिप्रिय
अतिशय सुंदर सहल.
सर्व छायाचित्रे आणि फोटो आवडले.
4 Mar 2016 - 3:28 pm | चलत मुसाफिर
गेल्याच महिन्यात आंजिवडे (सिंधुदुर्ग) ते पाटगाव (कोल्हापूर) असे लघु-पदभ्रमण केले! भटवाडी - घोटगे या मार्गाच्या तीसएक किमी दक्षिणेला.
4 Mar 2016 - 3:56 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच ट्रेक आणी फोटोही.
संतोषची भेटपण झाली हेही झकास. माझी आणी त्याची भेट मानगड दुर्गसंवर्शनाच्या वेळी झाली. फार दिलखुलास आणी प्रसन्न व्यक्तीमत्वाचा माणूस. असा दुर्गांविशयी निखळ आणी राजकारणविरहीत आस्था असलेला माणूस माझा मित्र आहे ह्याचा मला आनंद आहे.
तुम्ही रांगणा किल्ल्यावरून खाली नारूर घोटग्याला उतरलात का? त्यालाच घोटग्याची पाज म्हणतात (कोकणात सरीला पाज म्हणतात). ह्या घोटग्याच्या पाजे व्यतीरीक्त रांगण्यावरून उतरायला अजूनएक घाटवाट आहे त्याला हणुमंते घाट म्हणतात.
पुटेशु. असेच ट्रेक करा
4 Mar 2016 - 4:16 pm | एस
छान वृत्तांत.
4 Mar 2016 - 4:51 pm | वेल्लाभट
अत्तिशय उत्तम सफर आणि वृत्तांत. तितक्याच उत्तम लोकांची भेट. संतोष आणि सगळेच दुर्गवीर फार निष्ठा बाळगून असलेली मंडळी आहेत. त्यांचं काम अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच शिवशौर्य वाले, एकदम छान माणसं.
जय शिवराय !
पुट्रेशु