नमस्कार
मिसळपाव.कॉम "मराठी भाषा दिन २०१६" चे निमित्तान मराठी बोलीभाषा सप्ताह साजरो करीतसे, अणि हें सप्ताहांत माज्या बोली भाषांत कितां तरी ल्हेंणार हें येवजोनीच आंगावर काटो फुलसे. पण एठा माजो हो चित्पावनी भाशांतलो पयलोच लेख म्हणटकत ह्या भाशाबद्दल थोडांसाच ल्हेंणार असां मनात सलां पण आदी ठरयलां माजे पणजीआज्याबद्दल ल्हेन पण त्याचेबद्दल में महिलादिन अंकात ल्हेला से मराठ्यांत तशी मग दिसलां माजे मामात्यांच्यो गजाली तुमला सांगेव्यो. तसां तुमी बालकांड वाचलां सेल ते तुमला थोडो नमुनो बघे गावलो सनार. तुमला हो लेख आवडलो जाले अजुनीय ल्हेंव शकसां.
हो लेख माज्या स्व. पणज्याच्या स्मृत्याला अर्पण. केंथीनतरी ती माला बघीत सनारच.
धन्यवाद.
माजे मामात्यांच्यो गजाली
चित्पावनी भाशा ही आमची चित्पावन ब्राह्मणांची भाशा. आमचे पुर्वजांना खे भगवान परशुरामान चितात्थीन पावन केलेले म्हणीं आमी चित्पावन अणि आमी बोलसों ती भाशा चित्पावनी. चित्पावनीला लोक मराठीची बोली भाशा म्हणसत , विकिपीडिया कोकणीची बोलीभाशा म्हणसे खे, पण आमला शेंटभरय फरक पडत नाय. आमी त्याला वेगळी भाशा मानसों अणि त्याला पुढल्या पिढ्यापावत न्हेनार.
चित्पावनांचा मुळ स्थान कोकण. पण कोकणात कार्रोय जरी सोदे गेलात तर चित्पावनी येत सलेलां एकय बोडुक गाववेचां नाय तुमला. मात त्याहांथीन स्थलांतर करनी भायेर सरलेले लोकांनी मात्र बहुत करनी आपल्या भाशाला जपलेनी. आमचे गोवेंत, कर्नाटकांत, त्या हिमाचलांत, मध्य प्रदेशांत हेंच कितेला सातां समुद्रापेलतडीसुद्दा लोक आपली भाशा जपोनी सत. माजेच खूप मित्र सत मा़जेशी ह्या भाषांत बोलणारे. माजी एक चुलत सासू शिरश्याची. त्याला कन्नड येयल हें मत्यांत सलां. पण ही चित्पावनी बोलेल म्हणी में येवजलाच नतलां अणि त्याणीय बी चितलां नाय माला चित्पावनी येयल म्हणीं. त्याचेशीं भटी भाशांतच बोलत सल्यां पूरी दोन वर्खां. गेले डिसेंबरांत त्याची आई आमचेत्यां आयली सली. त्यो दोघी चित्पावनी बोलों लागतकच कांखांतलो कळसो गावलो असां जालां माला. एतां आमी दोघीय चित्पावनीतच बोलसों. ती कर्नाटक वर्जनांत अणि में गोवेंचें वेष्टनांत. :) बघितलां नी, सांगनार सल्यां कितां अणि पावल्यां कें ती?
तर आज में माज्या मामात्यांच्यों गजाली सांगनार सां. पण ही हरदासाची कथा कारीय पावली जाले मूळपदावर हाडा हां.
मामात्यां जाणां हो जास्तीसे भुरगेंच्या ल्हानपणातलो एक आनंदाचो भाग ससे. माज्याय सलो- अजुनीय से. आईन खे माजी नाळ मामाचे दारातले पायर्यांत पुरलीन से म्हणीं बाकीचे लोकांपेक्षा माजो मामाहारीं जास्ती ओढो असां आजी म्हणसे.
मामान तां घर विकूनी नवा घर बांधलान तांही चखोट से पण मामाचां घर म्हणतकच जुनां घरच येसे पुढेंत.
मामाचां घर सह्याद्रीचे कुशीत वसलेल्या सुंदरसे गावांत से. गावांतले एका टोकाला , भटवाड्यांत आमचां घर. रस्तेवेल्ल्यां खालतो उतरुं लागलो का एक कौलारू घर दिससे. नळेंवर कांबी घालनी बेडे सुके घायले सत. पुढेंत मोठांसा सारयलेला खळां. तेचे मेराला तरातरांची फुलझाडां. अणि खळेवर माटव. माटवावर सुकवणां. त्याहांच बाजूला मोठ्या पेड्याचां तुळशी वृंदावन . तेला लागोनी प्राजक्त. सकाळी पुढां तेचो पडणारो सडो अणि तीं फुलां वेचणार्यो दोन चेडी. में अणि शुभुताई - माजी मावसभेणिश. खळेपुढां विहीर अणि तेला लागोनीच न्हाणी अणि लाकडां थेव्वेचो मांगर/ खोप. घराचे उजव्या वाटान थंडगार ठिकाण. माजे आज्यान, दादान, मावश्यान अणि आईन कसलेलां!!!!
हें घरात केडलाच गरमी हत नाय. एक तर नित्यानि शिपणी हत सलेलां ठिकाण अणि दुसरा म्हणजे नित्यानि शेण-पाणी केलेली जमीन.घरांत भीतर सरताना डाव्या वाटाला लांबच्यालांब पडवी लागसे. मग मुख्य साल, तेलाच लागोनी जेववेचां साल अणि मग तेला लागोनी अणि दोन सालां अणि आत्वार. मागीलदारा सुंदर स्वच्छ गोठो. तेंत मायान पोसलेली गोरवां. अणि असे हे घरांतली मायाळू मनशां.
में शाळाची रजा सुरू हयवेचे आधी आईबाबांशी हट्ट करनी मामात्यां जाववेची तारीख आधी पक्की करनी घेव्वेची अणि मग धूम ठोकेची मामात्यां. बशीत्थीन प्रवास करताना ते दोन तास केडला एकदा सोपसत असां हत सलां. घराशी पावतकच आद्दी पयली आज्याचे कुशीत जाववेचां मग खायल्या खोल्यांत पणजीआजीशीं. आजी-दादा (दादा म्हणजे माजो मोठो भाउश बी न्हूय हां, माज्या आईशीचो बापूय तो) कडथीन "राणी" आणि पणजीआजीचे तोंडात्थीन "आयलीस का गो गंगू" अशी साद आईकतकच कान निवोनी जात.
मग आजीन केलेली गुळेणी - चपाती नाय ते खोबरेची कापां असां कितांयतरी आजी स्पेशल खाणां खायवेचीं , माजरां, कुत्रीं गोरवां हेंचेबराबर बागडेचा. शुभुताई र्हेव्वे आयली का मग भातुकली , लपाछपी, क्रिकेट, नाटक असले कसलेय खेळ खेळेचेच पण सक्काळी केर-वारो जालेनंतर प्राजक्ताचीं फुलां पुंजावनी रांगोळी घालतानाय मजाच येत सली. मामात्यांची सकाळ उजाडे मनुमुळां. मनु आमचो बोकलो. ६ वाजलेउप्रांत निदव्वेच देत नसे. मग उठोनी तोंड-पाणी धोवनी पणजी आजीकडा जावनी बेसेचां. ती चित्पावनीत माला गजाली सांगे, माला खूप ल्हान सताना चित्पावनी येत नतली. आई-बाबा मराठीत बोलत सलीं माजेशी. पण ती जां कितां बोले तां कसां कोण जाणे समजत सलां अणि में मराठीत उत्तरां देत सयन. हळू हळू त्याचे कडा बोलनी बोलनी माला चित्पावनी येंव लागली. सद्या हो मुद्दो नाय म्हणे सो तेडा. सांगत कितां सल्यां में? पणजी आजी तिच्यो गोष्टी सांगे, कई त्याची जीवनकथाय सांगे. त्या वयावर कळत नतलां पण एतां मोठी होतकच कळसे ती केडला कितां अणि कितेला सांगत सली तां. मग खाववेची वेळ होतकच तांदळाची भाकरी, नासणेंची भाकरी, गव्हांची भाकरी, जोंधळेंची भाकरी अणि तेचे बरोबर भाजी किंवा दहीं किंवा लोणचां असां किंतायतरी अथवा उसळे, पानगे, पहु असां कितातरी खावनी घरचे जाणटे लोक कामाला जात. आमीयबी तेंचेबरोबर ठिकाणात जाले ठिकाणात नायते काजीनी.
ठिकाणात माड्यो, नारळ, पणस, आंबे, पेरां ,भिंडां, हेंचेबराबर जायफळ , वेलची, मिरवेली, पानवेली, तरातराच्यो जास्वंदी, गोकर्णां, अगस्त अणि अनेक औषधी झाडांय सली. तेंचो उपयोग आमचो दादा जाणे सलो. कोणालाय कितांय जाला जाले प्रथमोपचार करताना पयली लोक दादाशीं येय. दादान सांगलेली ओखदां करनी लोकांना गुण पडे. दादान सांगलान अमके एका रोगाला माजेलागी ओखद नाय जाले लोक रोग्याला हास्पीटलांत न्हेत.
मे मासाचे सुट्यांत चंगळ हय. माणकुराद आंबे, घोंटा, मुट्टे, पणस, काण्णां असो तरातराचो रानमेवो खायवे मिळे , मज्जाही खूप करे गावे. एरवी चवतीशीं नायते नाताळाची सुटी रोकडीच सरोनी जासे .
साधारण बारा वरांवर आजी आमला न्हावनी घ्या म्हणी पाठी लागी. आमला आमचे ठिकाणातले कोंडींत न्हाववे जाववे आवडे पण ह्याला काळजी पोरांना कितांय जालां जाले? तोरेचां पाणी बादलां जाले? मग ती जांव देत नतली . ती शापच आईकत नाय जाली जाले मग स्प्रिंक्लरांचे पाण्यान न्हाव्वेची मांडवली हवनी आमी ठिकाणात न्हात सलों. २-३ तास आरामात पाण्यात मजा करेची, मग थाळीशी जांवनी गरम पाण्यान न्हावनी घरांत सरेचां. जर नशीब बरां सेल जाले बांदावर न्हाव्वे गावे, तेडला मज्जाच मज्जा. (बाबु) मामा, बाबीमाउ, शुभु ताई, बाबु अणि में इतकी सगळी जणां बांदातले कोंडीत खेळत सलों. मामान ह्या कोंडीतच पव्वे शिकयलान माला. :)
दुपारी आजी बरांसा रांधोनी थेवी अणि आमला गरम गरम वाढी. बरांसा रांधी म्हणजे हाय-फाय खाणां न्हूय हां. जां सामान घरात से तेचां साबांरा-भात भाजी रांधेची. त्याचे हातांत त्याच्या आईची चव से. त्याणीन पाण्याला जरी फोडणी दिली अणी तां पाणी सांबारा म्हणी घेतलां जाले अप्रतिम लागनार असां माला दिससे. जेवतकच सगळेंनी ओग्गी निदववेचां तासभर. तो तास सोपतच नसे. मग सगळीं निदवलीं काय हळूच भायेर सरोनी खळेंत खेळेंचा. केडला केडला ठिकाणांत लोकाची गोरवां बी येत सली शक्यतो चिचाहारली वय मोडणी. मग घरातलेंना जागी करनी गोरवांना आंबडे धाव्वेचीं सगळींच. मग सरली नीज सगळेंची. सांचे मायतेन ती वय कुडोनी घेव्वेची. मग घराशी येसों जाले पणजी आजीचे दोणे, पानां, वाती वेगवेगळे वेष्टनांनी बांधनी तयार तेंना सकाळी बाजाराला धाडेची तयारी ती. मग हात-पाय धोवनी परवचा म्हणेची. मग आजीकडथीन काणी आयकत आयकत जेयताना ताट केडला निवळ हय अणि नीज केडला येय हेंच कळत नसे. दुसरे दिवसाच जागी हवनी "अरे केडला निदवल्यां मे? बाबु तू जागो सलोस रे सगळी काणी सोपेसर?" बाबुय निदवलो खे. आजीची काणी इतके लांब!! सोपतच नतली केडला. केंथीन हाडी ती इतक्यो काण्यो म्हणी नकळे. ते काण्यांनी गाणीं सत सलीं. एक दोन गाणी अजुनीय येवजसत. एतां ती ८० वर्खांची आजी माजे मामाचे ५ वर्खांचे बोड्येना सांगसे काण्यो.
एतां हे दिवसांची आठवण येसे, कारण तां घर एतां आमचां नाय हें एक जाला अणि नोकरी -घर संभाळनी मामात्यां खूप खेपो हत नाय. पण पणजीआजी, आज्जी-दादाची आजन्म ऋणी सां तेंचेमुळां इतके मजाचां बालपण मिळ्ळां माला.
कठीण शब्दांचे अर्थः
सलां = होतं.
सांगेव्यो= सांगाव्यात
सनार=असणार
शकसां= शकेन
केंथीन=कुठुन
कार्रोय =कुठेही
सत =आहेत
शिरश्याची=शिरशीची(शिरशी या गावची)
येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता
वर्खां=वर्षे
आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इ.
हाडा =आणा
बेडे=सुपार्या
खळां= अंगण
माटव=मांडव
भेणिश=बहिण
भाऊश=भाउ
आत्वार=स्वैपाकघर
सोपसत =संपतात
र्हेव्वे =रहायला त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला
केडला = कधी
तेला =त्याला, तसच हेला=ह्याला. माला=मला
खायल्या =खालच्या
सयन=असेन
कई =कधीतरी
कितां =काय
पहु=पोहे
ठिकाण=कुळागर
माड्यो=माडी च बहुवचन. माडी=पोफळीच झाड
पणस=फणस
पेरां= पेरू
भिंडा=कोकम
ओखद्=औषध
तोरेचां पाणी = गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळ वापरतात. त्यामुळे ती फळं वापरली की पाणी बाधत. तश्या पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात
सांबारां=आमटी
चिचाहारली = चिंचेकडली
__हारी=__कडे
वय =झाड्या-काट्या-कुट्यांच कुंपण
आंबडणे=हाकलणे
बोड्यो=मुलगा
प्रतिक्रिया
25 Feb 2016 - 7:04 am | अजया
अतिशय सुंदर लिखाण.लेख आवडलाच.
25 Feb 2016 - 7:15 am | कविता१९७८
मस्त लिखाण आणि भाषेची माहीती
25 Feb 2016 - 10:05 am | पियुशा
झ्क्कास लैहिलय प्रिमो :)
25 Feb 2016 - 8:04 am | जयंत कुलकर्णी
आता काही वर्षांनंतर ही भाषा कोणाला येत नसेल...याची कल्पना करुन फार वाईट वाटले..
25 Feb 2016 - 8:14 am | प्रीत-मोहर
काका भाषा कोणालाच येत नसेल अस नाई होणार. निदान गोव्यात तरी कित्येक कुटुंबांमधे मुलांना मराठी नीट बोलता याव म्हणून जशी मराठी भाषा बोलणं सुरु झाल होत, तसच आता सगळ्यांनी चित्पावनी बोलणं सुरु केलय. लहान लहान मुल बोलताहेत चित्पावनीत . तेच का, माझ्या बाबांनी हल्ली त्यांच्या चाळीशीत बोलणं सुरु केलं चित्पावनीतआणि कर्नाटकातल्या चित्पावनाण्नी च्त्पावनी सोडली कुठे होती!!! ते अजुन बोलतात. माझे काही मित्र सिंगपूर-हामेरिकेत सुद्धा आपल्या घरात चित्पावनीत बोलतात. :)
25 Feb 2016 - 8:38 am | नाखु
आणि +१११ बोलीभाषा टिकवण्याच्या आणि पुढील पिढीला सुपुर्त करण्याच्या जिद्दीला+चिकाटीला.
याबाबत मारवाडी लोक आवर्जुन स्थानीक भाषा शिकुन घेतात पण एक्मेकांशी आणि घरी कटाक्षाने मारवाडी बोलीत बोलतात न लाजता न न्युनगंड बाळगता आणि म्हणूनच ती टीकून आहे .
25 Feb 2016 - 10:22 am | यशोधरा
हेच म्हणते! मस्त गो प्रीमो! :)
25 Feb 2016 - 8:16 am | एस
अतिशय छान! गजाली आवडली.
25 Feb 2016 - 8:44 am | स्पा
क्या बात आंबेमोहोर, लय भारी :)
25 Feb 2016 - 8:49 am | मुक्त विहारि
मस्त..
25 Feb 2016 - 9:29 am | प्रचेतस
खूपच गोड भाषा. बालकाण्डमधे चित्पावनी बोलीशी परिचय झाला होता.
बाकी चित्पावनी ब्राह्मणांचे मुसलमानपूर्व त्यातही १५/१६ व्या शतकाआधीचे उल्लेख जवळपास आढळत नाहीत किंवा खूपच कमी सापडतात. मला वाटते चित्पावन आडनावाचा सर्वात प्राचीन ज्ञात उल्लेख हा दिवेआगरच्या ११ व्या शतकातील ताम्रपटात येतो. घैसास हे त्यातील उल्लेखित आडनाव.
25 Feb 2016 - 9:45 am | भुमी
कथा आणि भाषा ,दोन्ही वाचायला आवडली.
25 Feb 2016 - 9:53 am | मितान
सुरेख प्रीमो :)
25 Feb 2016 - 11:04 am | राही
मस्तच वाटलं वाचल्यावर.
यात बाराची वरां म्हणजे बाराचे अवर(hour) किंवा hourच्या पोर्तुगीज़ समानशब्दावरून आलं असावं का?
आमचेत्यां हे अगदी गुजराती 'अमारत्यां'-(आमच्याइथे) प्रमाणे आहे. कोंकणी आणि चित्पावनी 'ओ'कार सुद्धा गुजरातीशी साम्य दाखवतात.
भावुश-भेणीश हे उत्तर-कोंकणी मामीस, आईस-आय्स, याच्यासारखे वाटते.
ठिकाण हा शब्द कसलेले शेत अथवा परडे या अर्थी सिंधुदुर्गातसुद्धा वापरतात.
25 Feb 2016 - 11:33 am | पिशी अबोली
नुसता तो शब्दच नाही, तर वेळ विचारायची पद्धतसुद्धा गोव्याच्या बोलींमधे पोर्तुगीज आहे. 'किती वाजले' ऐवजी 'किती वरां झाली' हा शब्दश: पोर्तुगीज अनुवाद आहे.
गुजराती आणि कोंकणीमधे प्रचंड साम्य आहे. तो 'से' पण गुजरातीसारखाच आहे. तसंही कोंकणी, मराठी गुजराती इंडोआर्यन मधे एक ग्रुपच समजला जातो. मराठीमधे संस्कृतीकरण झाल्याने मराठी आजच्या अवस्थेला आली असावी. कोंकणी आणि गुजरातीने प्राकृतच्या जवळ जाणारं रूप जपलंय असं वाटतं.
25 Feb 2016 - 3:42 pm | राही
इंडोआर्यन गट खरा, पण त्यात आणखी अनेक भाषा येतात. पण या गटातल्या गुजराती, कोंकणी मराठी यांच्यात विशेष साम्य आहे. तिन्ही जरी महाराष्ट्री प्राकृतापासून (मिडल इंडोआर्यन भाषा) उगम पावल्या असल्या तरी गुजरातीवर शौरसेनीचा आणि सौराष्ट्रीचा (सोरठीला कित्येक लोक वेगळे प्राकृत मानत नाहीत पण कच्छी आणि सिंधी गुजरातीपासून वेगळ्या झाल्या आहेत त्या सोरठीच्या प्रभावामुळे) थोडा अधिक प्रभाव आहे. गुजरातीत फारसी, उर्दू शब्द मराठीहून कितीतरी अधिक आहेत आणि प्रतिष्ठित आहेत. पाचशे वर्षांचा सुलतानी अंमल तसेच झरतुश्ट्रीयांचे गुजरातेतले प्रदीर्घ वास्तव्य या दोन गोष्टी याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. गुजरातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती व्यवहारभाषा आहे. उद्यम-व्यापार, सुतारकी-लोहारकी-विणकर-तांबट-कासार यांचे व्यावसायिक शब्द गुजरातीत भरपूर आहेत आणि ते उपेक्षित नाहीत.
'ओ'कारान्त शब्द एकेकाळच्या मराठीतही विपुल होते. उदा. कान्हो, विठो, ठावो, भावो वगैरे.
मराठीने प्राकृताची साथ सोडली आणि ती पुन्हा संस्कृताकडे वळली असेच मलाही वाटते.
असो. लेख आवडला हे पुन्हा एकदा.
25 Feb 2016 - 7:23 pm | पिशी अबोली
हो हो, अर्थात. पण या तीन भाषांचा त्यातही वेगळा ग्रुप मानला जातो..त्याला काही विशेष नाव ऐकलेले नाही, पण त्यांच्यातलं साम्य बऱ्यापैकी नोटिस होतंच.
25 Feb 2016 - 11:22 am | पिशी अबोली
प्रीमो, मस्त गं..खूपच सुन्दर लिहिलंय..मी ज्या भागात राहते तिथे माझ्या 2 कर्नाटकी मैत्रिणी सोडल्यास दुसरं कुणी बोलत नसे ही भाषा..तिच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा होती..भारी वाटलं. ती वर्णने, कोंडी, प्राजक्त, अंगण सगळेच भारी से..
25 Feb 2016 - 1:44 pm | पैसा
किती सुंदर लिहिलंस! काही ठराविक शब्द आहेत ते कसे वेगळे आहेत हे लक्षात आले की सहज समजते आहे!
25 Feb 2016 - 1:57 pm | भीडस्त
येक्दम भारी. जस्काय कीर्तानच आयकत व्हतो यखान्द्या ब्वॉचं.
बाकी
गुळवनी तुमच्याकंबि आस्तंय का.
आम्च्या बार्क्यापनात तेल्च्या गुळवनी म्हयी लयी मोठा थाट आसाय्चा. आन त्या तेल्च्या बि बायान्नि पिठाचा ग्वोळा गुड्घ्यावं थापुनसनि बनावलिल्या आसाय्च्या. थाप्टुन झाल्या का डायरेक त्येलामधि तळाया.
25 Feb 2016 - 2:05 pm | पिलीयन रायडर
अगं किती काय काय वेगळेपणा आहे.. मला पै ताई, तू आणि पिशी एकच भाषा बोलता आणि ती म्हणजे कोकणी!! असं वाटायचं..
मराठीत एवढे प्रकार आहेत हे खरंच माहित नव्हतं.
हे लेख वाचायला खुपच मस्त वाटत आहे!!
25 Feb 2016 - 8:13 pm | प्रीत-मोहर
पिरे कोकणी आम्हा तिघींनाही येतेच. त्याशिवाय हे सगळ. :)
25 Feb 2016 - 2:06 pm | मित्रहो
सुंदर लिखाण
भाषा टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करताय त्याबद्दल खरच कौतुक.
25 Feb 2016 - 2:46 pm | सस्नेह
आगळ्या बोलीची मस्त ओळख !
25 Feb 2016 - 2:55 pm | बॅटमॅन
एक नंबर लेख. बाकी
अधोरेखित वाक्य अश्लील नाही का? शेंटभरय ला मराठीत शाटमारी म्हटले तर प्रतिसाद डिलीट करायचे. =))
25 Feb 2016 - 3:17 pm | सूड
में बालकांड वाचलां सें, तेत्थीन नमुनो बघवें गावलों सलों. पण एठा हो लेख वाचनी आणि बरां दिसलां. ;)
25 Feb 2016 - 5:25 pm | मितभाषी
हि तुडतूडी भाशा आवाल्डी ब्वाॅ मपल्याला.
25 Feb 2016 - 7:04 pm | सुमीत भातखंडे
खूप गोड भाषा आहे.
25 Feb 2016 - 7:54 pm | स्वामी संकेतानंद
वा! मस्त भाषा आहे. चित्पावनी वाचायची एक जुनी इच्छा पूर्ण झाली. मस्त. टिकवून ठेवा रे.. ( मराठेंचे 'बालकांड' अजून वाचलेले नाही.)
26 Feb 2016 - 4:49 pm | नूतन सावंत
मजा आली वाचायला.मीपण पोचले माझ्या मामात्यांत.माझीही नाळ मामाच्या दारात पुररेली आहे नि त्यावर कोणाचा पाय पडू नये म्हणून सोनचाफ्याचं झाड लावलेले आहे.
29 Feb 2016 - 12:24 pm | बॅटमॅन
नाळ पुरणे इ. स्पेसिफिक विधी असतो का? मी कधी ऐकले नाय म्हणून विचारतोय.
29 Feb 2016 - 5:44 pm | सूड
बहुतेक बारशाला बाळाची नाळ तुळशीत वैगरे पुरतात....जाणकारांनी प्रकाश टाकावा...
26 Feb 2016 - 9:13 pm | जेपी
मस्त लेख..
26 Feb 2016 - 11:23 pm | पॉइंट ब्लँक
वाचायला थोडा प्रयत्न करवा लागला, पण वाचून छान वाटलं. खाली अर्थ दिलेत हे चांगल केलत. धन्यवाद :)
26 Feb 2016 - 11:58 pm | रातराणी
सुरेख लिहलय! या सर्व लेखांच रेकॉर्डिंग करून ते ऐकायला मजा येईल.
27 Feb 2016 - 7:08 pm | अनन्न्या
काही शब्द माहित होते बरेच नविन कळले.
29 Feb 2016 - 1:10 am | पद्मावति
खूपच छान.
29 Feb 2016 - 10:09 am | सुहास झेले
मस्तच... आवडले :) :)