गणू शाळेतून हरवतो. (मराठी भाषा दिन २०१६) (पुणे जिल्ह्यातील ग्रामीण बोली)

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in लेखमाला
22 Feb 2016 - 6:01 pm

संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी गणूचा घरी पत्ता नव्हता. शाळा सुटून एक तास झाला होता. गणूच्या आईने तायडीला विचारले तुला त्याने काय सांगीतले का तर ती "नाय" म्हणाली.
जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी गणूच्या आईला काळजी वाटायला लागली. ती आणि तायडी गणूची दारातच वाट बघत उभी राहीली. गणूची आई बराच वेळ दारात चिंताग्रस्त चेह-याने उभी असल्याचे पाहुन शेजारपाजारच्या बायकां विचारपूस करायला आल्या. तायडीने त्यांना सांगीतले की शाळा सुटून दीड तास झालाय पण गणू अजून घरी आला नाही.
गणूच्या आईचा आता धीर सुटू लागला. तिला नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. तिला चुटपुट लागून राहीली की त्यादिवशी त्याला बिन्नूच्या आईच्या सांगण्यावरून मारले म्हणून तर रागावून कुठे गेला नाही? " बिच्च्या-याला उगाच मारले हो..." ती म्हणू लागली, " त्या लेकराची कनव आली म्हणून त्यानी दार उघडून देऊन त्याला जेवायला दिलं हो. पण शांतीला ते दिसलं न्हायी.तिला तिच्या डोरल्याची काळजी." असं तिने म्हणताच जानकीबाईने गरगरा डोळे फिरवले. "शांती ना? अगं बया बया. नव-याला चिक्कूपणाबद्द्ल एव्ह्ढं बोलती, त्ये बिचारं इळंमाळं काम करतं आन यांना गिळायला घालतं. हीचे गुण काय कमी न्हायीत. दर सा म्हयन्यांनी मंगळसूत्र मोडती. काय धाड भरलीली असती त्याला सा सा म्हयन्यांनी? दाराची कडी नीट करायला हीच्याकं पैसा नायी, पण मंगळसूत्र सा सा म्ह्यन्यांनी बदलायला पैसा हाये. त्या पोराला बिच्या-याला उगंच मार बशिवला सटवीनं ! पण तुझं बी चुकलच आन्शे. चांगलं खडसवायला पायजे व्हतं तू शांतीला त्या दिवशी....". सगळ्या बायकांनी शांतीची यथेच्च टवाळी सुरू केली . शेवटी विषय पुन्हा मुळ मुद्द्यावर आला.

सुंदराबाईने आता चार्ज घेतला. हीचा नवरा मुंबईला गोदीत कामाला आहे. हीचं अधीमधी मुंबईला जाणं येणं असतं. म्हणून इतर बायकांमध्ये ही भाव खात असते. "आपल्या गावात पोरंधरी तर नाय आल्यात? मागच्या म्हयन्यात मी मंबयला गेले व्हते , तव्हा आमचे मालक म्हणत व्हते ", मिश्रीचा तोबरा तोंडात भरता भरता सुंदराबाई सांगू लागली, " ते मंबयचे मवाली असत्यात ना, त्ये म्हणं पोरांना धरत्यात आन मंबयला पळवून नेत्यात. त्यानला लय तरास देत्यात, तेंच्या आंगावर चटके देत्यात. मंग पोरांना मंबईच्या रस्त्यांवर भीक मागायला लावत्यात......"
"का म्हणतीस सुंदरे ? " सगळ्या बायकांनी भीतीने पदराचा बोळा तोंडात कोंबला. सगळ्यांचे मत पडले की गावात मंबयचे पोरं पकडणारे आलेत आणि आता पोरांना जपायला पायजे.
"काय मंबयचं कौतीक सागती सुंदरे...." , हिराबाई भडकली. " ह्या आडगावात कुत्रं फिरकत नाही, तं मंबयचे मवाली यायाला बसलेत. आनशे तू आत जा बाई. ह्या काय, उचालली जिभ न लावली टाळ्याला. काय नको काळजी करू तू. यील लेकरू. जरा कळ काढ." हिराबाईने गणूच्या आईला आतल्या खोलीत नेले.

"ए गपा ए बायांनो " पार्वतीबाईने आता सुरुवात केली. ही थोडीशी वयस्क म्हणून इतर बायका तिचा थोडा मान ठेवतात.
पार्वतीबाईने सांगायला सुरुवात केली. " आपल्या जत्रंच्या येळला आमच्याकडं एक पाव्हणी आली व्हती. अकोल्याच्या पुढं तिचं गाव हे. तर ती सांगत व्हती का तेंच्या भागात सरकार मोठं धरण बांधतय. त्या धरणाची भित काही केल्या उभी राहीना. अशी बांधली का अशी ढसळत व्हती. मंग सरकार भगताकडं गेलं. भगत म्हणला का बळी द्यायला पायजे तरच भित हुबी राहील. मंग त्यांच्या गावातल्या एका म्हतारीला फसवून भीतीच्या खाली गाडलं आन मंग सरकारनी बांधकाम सुरू केलं. पण काह्याचं काय. भित परत परत ढसळायची. परत सरकार भगताकडं गेलं. भगत म्हणला त्या म्हतारीला जिथं पुरलय ते उकरायला पायजे. तिला जिथं पुरलं व्हतं तिथं उकारलं, तव्हा तिच्या मुठीत तिळ दिसले. भगतानी ते तिळ मोजले तर ते एक लाख एक्कावन्न हजार एकशे एक भरले. भगत सरकारला म्हणला का येव्ह्ढे बळी पायजेत तव्हाच धरण व्हईल. मंग काय, सरकारनी कायदाच केला. त्या पाव्हणीच्या गावातली लय पोरं गायब झाली. पण एक गाव पुरतय व्हय. एक एक गाव करत आता आपल्या गावाची बारी आलीय".

पार्वतीबाईने बोलणं संपवताच सगळ्या बायका मोठ्ठा आ वासून बघत राहील्या. जी बाळं अंगावर पित होती त्यांना आयांनी अजून घट्ट धरले. सगळ्या बायकांनी एकच कालवाकालव करत सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली. शेवटी सरकारनी हा कायदा करून कसा अन्याव केलाय आणि तो बंद करायला पायजे यावर सर्वांचे एकमत झाले.

तेव्ह्ढ्यात तायडी दारातून ओरडली, "आई तो बघ गण्या आला ". रानबानी गण्याला बखोटीला धरले होते आणि त्याला तो ओढत ओढतच आणत होता. घरात शिरल्यावर रानबानी धापा टाकत सांगायला सुरवात केली. " अवो हे कार्टं पांदीतल्या वडाच्या झाडाजवळून जाताना पघातलं म्या. माहा जीव पार वरखाली झाला ना. परवाच न्यानबाला तिथं हाडळीनी धरलं व्हतं .गडी दोन दिवस तापानी फण्फणला व्हता. जव्हा भगतानी काँबडं कापलं तव्हा कुढं नीट झाला. लगेच पळत पळत गण्याला धरलं आन इकडं घिऊन आलो. "
"अगं बया" ... सगळ्या बायका एका सुरात ओरडल्या. तेवढ्या गण्यानी "ए सोड ,सोड मला " असे ओरडत रानबाकडून सुटका करून घेतली. "कुठं गेला होता बाळा तू? " गण्याच्या आईने मायेने विचारले.
"अगं मागं तू शित्या ठाकराला नव्हतं का सांगीतलं का तुला दम्याचा त्रास हाये म्हणून जंगलात मध मिळालं का पाठवून दे म्हणून ? त्याचा पोरगा आमच्याच वर्गात हाये. तो म्हणला तेच्या बापानी मध न्यायला बोलवलंय. मंग मी शाळा सुटल्यावर गेलो तेच्याबरोबर. हे बघ मी मध आणलंय " गण्यानी दप्तरातून बाटली काढून दाखवली.
"अरे देवा " गणूची आई म्हणाली. तिने गणूला पोटाशी धरले. मग ती म्हणाली, " अरे बाळा पण कुणाला तरी सांगून नाय जायचं का? "
"सांगीतलं व्हतं की तायडीला मधल्या सुट्टीत ? " गणू म्हणाला.
गणूच्या आईने तायडीकडं बघितलं.
"मी मुलींबरोबर टिपरीपाणी खेळत व्हते. माहं नव्हतं लक्षं! " तायडी म्हणाली.
गणूच्या आईने कपाळावर हात मारला. कुणी तरी गण्याच्या आईला गण्यावरून लिंबू उतरवायची सुचना केली आणि सगळ्या बायका हळूहळू पांगल्या.
---------- समाप्त ----------

लेखातील भाषा ही पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भाषा आहे.
काही शब्द :
इळंमाळं = उन्हातान्हात दिवसभर
भगत = मांत्रिक

गणूच्या याआधीच्या कथा ..
परोपकारी गणू
बिल्ला
गणू नाट्यस्पर्धा गाजवतो.

प्रतिक्रिया

अजया's picture

24 Feb 2016 - 7:07 am | अजया

:)कथा आवडली.

यशोधरा's picture

24 Feb 2016 - 7:14 am | यशोधरा

छाने कथा.

सस्नेह's picture

24 Feb 2016 - 8:02 am | सस्नेह

मजेदार कथा.

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2016 - 8:08 am | प्रीत-मोहर

छान कथा!!

जेपी's picture

24 Feb 2016 - 8:37 am | जेपी

कथा आवडली.

नाखु's picture

24 Feb 2016 - 8:43 am | नाखु

वेगळा गणू झालाच पाहिजे !!!!

आता सकाळ मुपि मधे त्या कॉमेंट दिसत नाहीत. त्याऐवजी "अंकीता" नावाच्या आय डी. ने धुमाकुळ घातलाय.

उगा काहितरीच's picture

24 Feb 2016 - 8:47 am | उगा काहितरीच

छान ! आणी तो पहिला संदर्भ पण झकासच .

मस्त हलकीफुलकी कथा!

भीडस्त's picture

24 Feb 2016 - 10:39 am | भीडस्त

मंबयच्या मवलाटाच्या भ्यानि लयीच पानि तापावलं व्हतं न क्काय.
बाकी तुम्च्याइकाल्लं भगत चांग्लंच ह्येत. दोन पायाचं चालातं त्यान्न्हा म्हयी. आमच्याकं च्यार पायाचं लागाय्चं आम्हि बारकान्लं व्हतो तव्हा.

बबन ताम्बे's picture

24 Feb 2016 - 11:18 am | बबन ताम्बे

पण ते नवसाचं असायचं !

पियुशा's picture

24 Feb 2016 - 11:17 am | पियुशा

मस्त !

पैसा's picture

24 Feb 2016 - 11:29 am | पैसा

मस्त! मजेशीर कथा!

मीता's picture

24 Feb 2016 - 12:26 pm | मीता

कथा आवडली.

कंजूस's picture

24 Feb 2016 - 1:49 pm | कंजूस

मध गोड आहे.

भुमी's picture

24 Feb 2016 - 4:37 pm | भुमी

कथा आवडली.

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 7:56 pm | नूतन सावंत

हल्कीफुल्की मजेदार कथा!

पिशी अबोली's picture

24 Feb 2016 - 8:09 pm | पिशी अबोली

मस्त!!!

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:19 am | रातराणी

कथा आवडली!

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2016 - 10:34 am | चौथा कोनाडा

गणूकथा खुपच सुंदर ! गणु, तायडी अन इतरांची निरागसता आवडली.
वाचताना द.मा. मिरासदारांच्या शैलीची आठवण झाली
धरणातल्या बळीचा किस्सा लै भारी !

वेमुल्ला, देशद्रोहप्रेम असल्या काथ्याकुटी फुफाट्यात गणु ची निरागस कथा म्हंजे शितल झुळुकच !

लिहित -हावा बबन ताम्बे !

वगिश's picture

25 Feb 2016 - 6:09 pm | वगिश

छान आहे कथा

मित्रहो's picture

25 Feb 2016 - 6:50 pm | मित्रहो

साधी सरळ हलकी फुलकी कथा आवडली.
धरणातल्या बळीचा किस्सा तर खासच

गणूची कथा आवडली हे वाचून आनंद झाला.संधी दिल्याबद्द्ल मिपाचा खूप आभारी आहे.
एकंदर सर्व बोली भाषेतील कथा छान आहेत.

स्वामी संकेतानंद's picture

25 Feb 2016 - 8:18 pm | स्वामी संकेतानंद

आवडली..

ganeshg's picture

25 Feb 2016 - 10:23 pm | ganeshg

Chanay

जव्हेरगंज's picture

25 Feb 2016 - 10:46 pm | जव्हेरगंज

भारी!