आलतडीन जिरें पलतडीन जिरें, कां गो जिऱ्या रुजेना, रुजेना,
मज गायी तुडीवतात, तुडीवतात, कां गो गायांनो तुडीवतात, तुडीवतात,
आमांस राखणा राखेना, राखेना, कां रे राखण्या राखेना, राखेना,
मज शेत पिकेना पिकेना, कां गो शेता पिकेना, पिकेना,
मज पाऊस पडेना, पडेना, कां रे पावसा पडेना, पडेना,
आमचे दिवस आलेच नाही...
‘अशें आमची आई आमां ल्हान असतना म्हणून निजोवीत हती, जाणे मगो?’ मज भाऊ सांगीत हते. भाऊ आपणच कितके जाणटे असणार. त्यांची आई त्यांस हें म्हणून दाखवे म्हणून त्यांस याद हाय हीच मोठी गोष्ट. नाय जाल्यार कोणा इतके खबर हाय आता ‘पद्ये’ भाषेतली गाणी बी..
पण हें खबर नाय म्हणून काय आमां भाषा बलावया येत नाय अशें बी न्हवें हां. आमांस आमच्या भाषेचा बेस बरा अभिमान हाय. आमां आमची भाषा बलावया मातय कमीपणा दिसत नाय. फक्त गोव्यांतलें काय ब्राह्मण बोलता ती आमची ‘पद्ये’ भाषा. आमी तीस मायेन ‘भटी’ अशेय म्हणटात. तीस पद्ये कशा म्हणप म्हटल्यार, पद्यांत बोलतात तशे आमी हेळ काडून बोलतात म्हणून, अशें म्हणटात . पण पयलींच्या काळात अशेच बोलीत हते न्हवें लोक? जुनी मराठी बी बोलतात बघा त्या सिरीयलांनी, आमची तशीच जुनी मराठी म्हणावी पडली. आता ती सिरीयलांतली भाषा तुमांस कृत्रिम कशी दिसत अशेल. पण त्या सिरियली काडप्यांस कोठें खबर हाय ती कशी बोलत हतें ते? आता आमच्याभितरला कोणी भुरगा आमचे अनुनासिक स्वर आणि हेळ काडेनसतना बोल्ला, तर तें आमासंय कृत्रिम दिशेल. पण आमच्या घरांनी आमचीच भाषा बोलतात, म्हणटकच हा प्रश्नच आमच्याफुडें येणार नाय हें माज्यान तुमांस सामके आत्मविश्वासान सांगू येतें.
तर, आमी पद्ये लोक(आमांस आमच्या भाषेच्याच नावान वळखितात) येथें गोव्यांत कधी र्हावया आले, त्याचा अजून निर्णय झाला नाय म्हणटात. पण आमी येथें कितकीशीच शतकां हाय, ह्यात मात्र कायच दुबाव नाय. आमची भाषा बघा, मराठीच ती, पण इतकी वर्षां येथें हाय म्हणटकच तिचेर कोंकणीचे संस्कार हणारच न्हवें. आमी गोव्यांत खूप गावांनी ऱ्र्हायतात. पण प्रत्येक कडची आमची बलावयाची पद्धत वेगळी हां. कोंकणी, कन्नड भाषांचा प्रभाव पडतो न्हवे वेगवेगळ्या कडांनी. पुर्तुगेजांच्या काळांत पुर्तुगेज शब्दय पावले आमच्या भाषेंत. पण आमी भाषा सोडली मात्र नाय. आमच्या घरांनी आमचीच भाषा बलावी म्हणून आमचा सदीच आग्रह असतो. नाय जाल्यार कशी टिकणार आमची भाषा? आमांस जपवयाची हाय. आमांस तिची मातय लज दिसत नाय. भायर गरज पडटे ती कोंकणी, ऑफीसांनी बलावया इंग्लिश आमांस काय बरी येते. मराठी आता सामकी पुणेरी नाय, पण बऱ्यापैकी येतेच आमांसय. मग आमी घरी आमची मायेची भटी बोलवया कशा लजावें? माझे तर सामके स्पष्ट मत हाय की आपली आपली भाषा बलावया कोणेय लजू नये. घरांतली कुकुली भुरगीं आपल्या भाषेत बोलतात तेधवा कितके बरें दिसतें म्हणून जाणे तुमी? घरातल्या खोल्यांस हॉल, किचन आणि हें आणि तें म्हणोवच्यापेक्षा वासरी, रांदपघर, कोठये खोली, न्हाणी अशें शब्द म्हटल्यार घर घर कशें दिसते. आमच्या घरांतली भुरगी कोठे दूर रहावया जातात तेथें त्यांस आमची भाषा बोलपी कोणेय मेळ्यार कितकें बरें दिसते. आता आमची असली गाणीं बी भाउंसारक्या जाणट्यांसच याद हाय. पण हईल तितकी आमची सदी बलावयाची भाषा आमांस जतन करोवची हाय. आजच्या या सामक्या फाष्ट जगांत आपली भाषा सोडून आपले म्हणावे अशें दुसरें हाय काय, तुमीच सांगा बघूया मज..
प्रतिक्रिया
24 Feb 2016 - 7:07 am | अजया
नवीच माहिती.छान लेख.
24 Feb 2016 - 7:12 am | यशोधरा
अगदी हेलांसकट ऐकू आली वाचताना. गोव्यात पोहोचवले.
24 Feb 2016 - 7:50 am | प्रीत-मोहर
ब$रेंSSS लिहले हाय गो तुवें. जेधवां केधवां, तुज वेळ मिळतो तेधवां, जमतें तशें ह्या भाषेंत लिहाव्याचें बघ!!! बSSरीSSSS लिहते तू
24 Feb 2016 - 8:48 am | बोका-ए-आझम
ही दोन्ही नावे छान आहेत. भाषा पण समजायला एकदम सोपी वाटली.
24 Feb 2016 - 9:07 am | जेपी
लेख आवडला.
24 Feb 2016 - 10:22 am | भीडस्त
मोठ्याने, हेल काढत वाचायला मजा आली.
24 Feb 2016 - 10:31 am | नीलमोहर
छान गोड वाटतेय ही भाषा.
24 Feb 2016 - 10:37 am | भुमी
वाचायला फारच गोड वाटला.
24 Feb 2016 - 11:19 am | llपुण्याचे पेशवेll
लिहीलेय छान. जरा हेल रेकॉर्ड करून ऐकवा पण . कथाकथनासारखे वाचून अपलोड करा.
24 Feb 2016 - 11:57 am | पैसा
या बोलीचे डॉक्युमेंटेशन कुठे झाले आहे असे वाटत नाही. तुला अजून छान लिहायचे होते हे माहीत आहे, पण मिपाकरांना या बोलीची ओळख करून दिलीस हे फार उत्तम झाले. बोलीभाषा सप्ताहाची वाट बघू नको. या बोलीत लिहीत रहा. आम्हाला समजते आहे. जुनी मराठी या बोलीला खूप जवळची आहे.
पद्ये नावावरून आठवले. मला उपजातींबद्दल विशेषसे कळत नाही. पण आमच्या ओळखीत काही पाध्ये आडनावाचे लोक आहेत. ते कर्हाडे बहुतेक. पंचांगातही पद्ये कर्हाडे अशी नावे एकत्र दिलेली असतात काय? पद्ये आणि कर्हाडे यांचा परस्पर संबंध काय?
24 Feb 2016 - 12:14 pm | प्रीत-मोहर
पद्ये आणि कर्हाडे ह्या ब्राह्मणांच्या वेगवेगळ्या पोटजाती आहेत. भटी भाषाच बोलली जाते दोन्हींच्या घरात विथ मायनर वेरिएशन.
म्हणजे उदा. माझी मोठी बहिण पद्यांकडे दिलीय तिथे ही पद्ये/भटी भाषा बोलतात पण माझ्या सासरचे लोक्स कर्हाडे आहेत. आमच्या घरीही भटी भाषा विथ मायनर वेरिएशन बोलली जाते.
जसे
हे वाक्य आमच्या घरी पण आमच्या घरांनी आमचीच भाषा बोलतात, म्हणटकच हा प्रश्नच आमच्याफुडें येईना हें माज्यान तुम्हां सामके आत्मविश्वासान सांगा हतें/येतें. अस होतं
हे वाक्य आपली भाषा बलास कोणेय लजा होईना. असे होते
24 Feb 2016 - 1:58 pm | बोका-ए-आझम
जरा इस्कटून सांगा.
24 Feb 2016 - 2:55 pm | प्रीत-मोहर
गोव्यात ब्राह्मणांच्या ४ उपजाती आहेत. चित्पावान, पद्ये, कर्हाडे आणि देशस्थ.
नक्की काय इस्कटून हवय हे समज्ल्यास तसे सांगता येईल
24 Feb 2016 - 12:07 pm | बबन ताम्बे
नवीन भाषेची ओळख झाली.
24 Feb 2016 - 12:26 pm | अंतरा आनंद
आवडलं . अजून लिहीत रहा मजा येते अर्थ लावत वाचायला
24 Feb 2016 - 12:30 pm | बॅटमॅन
माझेही सामके स्पष्ट मत हेच. एक नंबर लिवलंय तेच्यायला.
25 Feb 2016 - 1:31 pm | नाव आडनाव
लै वेळा +
24 Feb 2016 - 1:45 pm | कंजूस
माहिमला आमच्या नितेवाइकाचे शेजारी आजगावकर म्हणून होते ते असं काही तरी हेल काढून गोssड बोलायचे.
नावातले अबोली थोडे तिकडचेच वास्तव्य दाखवते.
24 Feb 2016 - 2:40 pm | सूड
आमासंय तुमचा लेख सांमकां बरां दिसला. वेळ मिळतो तेधवा आणि लिहाव्याचें बघा!! ;)
24 Feb 2016 - 2:41 pm | प्रीत-मोहर
आवय्स.. सामकीच कळ्ळी मरे तुज भटी भाषा!!!!
24 Feb 2016 - 2:51 pm | सूड
हय तर!! कोकणींसार्खिल्लीच आसा मगो. :)
24 Feb 2016 - 3:33 pm | सस्नेह
पद्ये बोलीचा इतिहास रोचक आहे.
पद्ये बोल ऐकायला कुठे जावे ?
24 Feb 2016 - 8:19 pm | राही
गोड आहे भाषा. याचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवे.
24 Feb 2016 - 8:47 pm | इशा१२३
मस्तच ग! गोड वाटली वाचायला !!
24 Feb 2016 - 10:23 pm | नूतन सावंत
पिशे,गोड भाषा हां.बरेंssss बरयलास.आणखी बरय गो.
24 Feb 2016 - 10:38 pm | राघवेंद्र
हे पटले.
25 Feb 2016 - 11:16 am | मित्रहो
गोव्यातच मराठीच्या चार ते पाच बोलीभाषा आहे हे ऐकून आश्चर्य वाटले.
25 Feb 2016 - 1:40 pm | पिलीयन रायडर
ह्या सगळ्या भाषांना आम्ही अडाणी लोक कोकणीच म्हणलो असतो. त्यात एवढे वैविध्य आहे हे ठाऊक नव्हते.
फार गोड लिहीलयस ग पिशे!
25 Feb 2016 - 1:42 pm | निशांत_खाडे
लेख आवडला!
25 Feb 2016 - 2:25 pm | पियुशा
मस्त लिवलेस.
25 Feb 2016 - 7:44 pm | पिशी अबोली
सर्वांना धन्यवाद.
ही माझी बोली नाही. पण याचं काही प्रमाणात डॉक्यूमेंटेशन मी केलेलं आहे आणि लहानपणापासून ऐकलेली आहे म्हणून हा प्रयत्न. मला नीट हेल काढता येत नाहीत आणि नीट नाकात बोलता येत नाही असं ही बोली बोलणाऱ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं स्पष्ट मत आहे. ;)
त्यामुळे वर आलेल्या रेकोर्डिंगच्या सूचनेबद्दल, ते मनात असूनही या कारणासाठी टाकायची हिम्मत केली नाही.
पद्ये बोली ऐकण्यासाठी गोव्यात यावं लागेल. केरी, रिवण, काणकोण, डिचोली अशा अनेक भागांमधे ही बोली बोलतात. या वेगवेगळ्या भागांतील बोलीमधेही फरक आहे. काही ठिकाणी कोंकणीचा प्रभाव फार दिसून येतो.
कऱ्हाडे ही एक ब्राह्मणांची पोटजात आहे. असे म्हणतात की यांना शिलाहारांनी ब्राह्मणाचा दर्जा दिला. सह्याद्रीखंडात कऱ्हाड़यांबद्दल उल्लेख आहे(तो फारसा स्तुतिपर नाहीये, पण उल्लेख आहे एवढंच ;))
कऱ्हाडे आणि पद्ये यांच्या संबंधांबद्दल दोन मते वाचली आहेत. एक, शिलाहारांनी ब्राह्मण म्हणून दर्जा दिल्यावर जे कऱ्हाडे गोव्यात येऊन स्थायिक झाले, ते पद्ये. दुसरा, सगळे कऱ्हाडे गोव्याचे, जे इथे राहिले ते पद्ये आणि बाहेर पडले ते कऱ्हाडे.
पद्ये लोक गोव्यातील बऱ्याच देवस्थानांमधे पुजारी आहेत. बागायती व्यवसायामधेही आहेत. त्यांची एकूण सामाजिक स्थिती चांगली आहे. शिक्षणही आहे.
ही बोली फारशी कुणाला माहीत नाही कारण ती या समाजापुरतीच मर्यादित आहे. पण ती खूप गोड आहे म्हणून या सप्ताहानिमित्त पोहचवण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा एकदा, धन्यवाद!:)
25 Feb 2016 - 7:44 pm | पिशी अबोली
सर्वांना धन्यवाद.
ही माझी बोली नाही. पण याचं काही प्रमाणात डॉक्यूमेंटेशन मी केलेलं आहे आणि लहानपणापासून ऐकलेली आहे म्हणून हा प्रयत्न. मला नीट हेल काढता येत नाहीत आणि नीट नाकात बोलता येत नाही असं ही बोली बोलणाऱ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं स्पष्ट मत आहे. ;)
त्यामुळे वर आलेल्या रेकोर्डिंगच्या सूचनेबद्दल, ते मनात असूनही या कारणासाठी टाकायची हिम्मत केली नाही.
पद्ये बोली ऐकण्यासाठी गोव्यात यावं लागेल. केरी, रिवण, काणकोण, डिचोली अशा अनेक भागांमधे ही बोली बोलतात. या वेगवेगळ्या भागांतील बोलीमधेही फरक आहे. काही ठिकाणी कोंकणीचा प्रभाव फार दिसून येतो.
कऱ्हाडे ही एक ब्राह्मणांची पोटजात आहे. असे म्हणतात की यांना शिलाहारांनी ब्राह्मणाचा दर्जा दिला. सह्याद्रीखंडात कऱ्हाड़यांबद्दल उल्लेख आहे(तो फारसा स्तुतिपर नाहीये, पण उल्लेख आहे एवढंच ;))
कऱ्हाडे आणि पद्ये यांच्या संबंधांबद्दल दोन मते वाचली आहेत. एक, शिलाहारांनी ब्राह्मण म्हणून दर्जा दिल्यावर जे कऱ्हाडे गोव्यात येऊन स्थायिक झाले, ते पद्ये. दुसरा, सगळे कऱ्हाडे गोव्याचे, जे इथे राहिले ते पद्ये आणि बाहेर पडले ते कऱ्हाडे.
पद्ये लोक गोव्यातील बऱ्याच देवस्थानांमधे पुजारी आहेत. बागायती व्यवसायामधेही आहेत. त्यांची एकूण सामाजिक स्थिती चांगली आहे. शिक्षणही आहे.
ही बोली फारशी कुणाला माहीत नाही कारण ती या समाजापुरतीच मर्यादित आहे. पण ती खूप गोड आहे म्हणून या सप्ताहानिमित्त पोहचवण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा एकदा, धन्यवाद!:)
25 Feb 2016 - 8:30 pm | प्रीत-मोहर
पिशे हें बघ!!
कोकणी वाचा येतें अणि समजतें झाल्या हें वाचल्या थोडी माहिती कळणा तुम्हांस
https://wikisource.org/wiki/Page:Konkani_Viswakosh_Vol1.pdf/388
https://wikisource.org/wiki/Page:Konkani_Viswakosh_Vol1.pdf/389
25 Feb 2016 - 8:06 pm | स्वामी संकेतानंद
गोड आहे ही बोली. या आधी कधी नावही ऐकले नवह्ते. पद्यमय आहे. आणि वर आलेल्या सूचनेनुसार पद्ये मातृभाषा असणार्या कोणाचातरी ऑडियो अपलोडायला पाहिजे. ऐकायला मज्जा येईल.
25 Feb 2016 - 9:14 pm | सुमीत भातखंडे
नवीन-नवीन भाषांची ओळख होत्ये ह्या लेखमालेमुळे.
26 Feb 2016 - 12:50 am | अभ्या..
अरे वा पिशा, मस्त लिहिलेस की बहिणाबै.
छानेय भाषा. पध्ये असा उच्चार की पद्दे असा उच्चार करता ह्या भाषेच्या नावाचा? म्हणजे मुद्दे टाईप की मध्ये टाइप?