body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
.inwrap {
border: 0.5em solid transparent;
-webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Safari 3.1-5 */
-o-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round; /* Opera 11-12.1 */
border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/p...") 10 round ;
}
मला आणि नवर्याला भटकायची खूप आवड आहे. त्यात नवरा एकदम रेल्वेने भारावलेला आहे. अगदी एन्सायक्लोपीडिया म्हणायला हरकत नाही त्याला. आणि एवढ्या वर्षांच्या सहवासात आता ते वेड मलाही लागलंय. त्यामुळे वर्षातून एक मोट्ठी आणि किंवा २-४ छोट्या सहली ह्या होतातच आमच्या. एखाद्या ठिकाणी जाताना तिथली "टूरिस्ट अट्रॅक्शन्स" पाहतोच पण वेगळ्या/अनवट जागा पाहणे, त्या लोकांशी संवाद साधणे किंवा असच निसर्गाच्या सानिध्यात "टूरिस्ट अट्रॅक्शन्स" सोडूनच्या जागांमध्ये साधे चालणेही खूप आनंद देऊन जाते. त्यामुळे आम्ही जिथे कुठे फिरायला जातो तिथे थोडं गिरकीच्या मिस्टरी कुकिंग टाइप "सरप्राइज सहल" करतो. त्यामुळे आम्ही शक्यतो गाइडेड टूर्स करत नाही. सारं काही स्वतःच्या मनाप्रमाणे मन मानेल तसं भ ट का य चं.
सरप्राइज सहल आळीपाळीने ठरवली जाते. म्हणजे प्रवास कसा करायचा, काय पाहायचं वगैरे प्रत्येक सहलीला आमच्यापैकी एकजण ठरवतो व दुसर्याला ते शेवटच्या क्षणी सांगतो. घडाभर तेल ओतत नाही, डायरेक्ट माझा अनुभवच सांगते. म्हणजे बघा हं, आम्ही २-३ वर्षापूर्वी उटीला गेलो होतो तर तिथली सरप्राइज ट्रेल मी ठरवली होती. हॉटेलातून काहीही न ठरवता पायी पायी भटकलो होतो उटी.. असंच भटकत भटकत तिथल्या छान छान चर्चेस पाहिल्या होत्या, तिथली शेकडो वर्ष जुनी सिमितरी, आजूबाजूची घनदाट झाडी, तिथली शांतता ही मुख्य शहरातील कोलाहलापेक्षा खूप आवडली होती. तिथली घरही किती सुंदर!!!! घराभोवती फुलबागा पाहून डोळे निवलेच होते अगदी.
ऊटीतील काही जुन्या इमारती (आता शासकीय कार्यालये आहेत या इमारतीमध्ये)
उटीतील शेकडो वर्ष जुनी ईगर्ज(चर्च) आणि सिमितरी
हौशीने बांधलेली घरे आणि निगुतीने सजवलेल्या बागा!!
त्यानंतरच्या वर्षी मैसूर-बंगळूर केलं. तेव्हा नवर्याने ठरवली होती ट्रेल. मैसूर स्टेशन ला चामराजनगर ची तिकिटं काढताना कळलं की कुठे जातोय. चामराजनगर मैसूरपासुन अंदाजे ६० किमी दूर आहे. मैसूर चे महाराज चामराज वडेयार -९ यांच्या नावावरून या गावाचे नामाभिधान झालेय. मैसूरहून लोकल ने इथे पोचायला सुमारे २ तास लागतात. अनेक पाहण्यासारखी ठिकाणे या गावापासून जवळ आहेत. लोकलमधला प्रवास ही मस्तच होता. आल्हाददायक वातावरणातली गाव, तिथली शेती आणि लोक हे सगळं पाहता आलं. चामराजनगर ला पोचल्यावर चामराजेश्वराच दर्शन घेतलं अन बाकी काही न पाहता नवर्याच्या आदेशाप्रमाणे तिथल्या बस स्टॅण्डला गेलो.
चामराजेश्वराच मंदिर आणि आवार.
मंदिराच्या आवारातल्या लाकडी प्रतिमा. जाणकारांनी याबद्दल जास्ती माहिती द्यावी.
स्टॅंड वर बी. आर. हिल्स ची तिकिटं काटली. मधल्या काळात नेट मरत मरत का होईना थोडाफार जीव धरून होत. त्या जीवावर थोडं गुगलिंग केलं तर कळलं की बी. आर. हिल्स म्हणजे बिलिगिरी रंगनाथ हिल्स हे एक अभयारण्य आहे. तिथे आधी बुकिंग करूनच जावं लागतं आणि आम्ही तर कोणतंही बुकिंग केलं नव्हतं. म्हटलं बघू काय प्लान आहे तो. बस प्रवास सुरू झाल्यावर रेंज मेलीच. बेस्टच झालं एकदम. दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडी. मधूनच दर्शन देणारे वन्य प्राणी अस सुंदर दृश्य होत सार. मध्येच केम्मन्गुडी किंवा के.गुडी नावाची जागा लागली तिथे उतरलो.
अहो स्वर्गतुल्य जागा होती ही...
फोटो पहा बरं.
हत्ती, हरिण असे प्राणी फिरत होते तिथे. जंगल ट्रेल मात्र बंद ठेवली होती त्यांनी. इतकं माणसांची भिती न वाटणारी तरीही न माणसाळलेली जनावर पहिल्यांदीच पाहिली. जनावरांच्या जवळ जायचं नव्हत. तरीही मी हरिणाच्या पाडसाला हात लावून जीवाची के. गुडी केली.
तिथल्या रिसॉर्ट मध्ये जेवण केलं आणि खूप भटकलो त्या जंगलात. असंख्य आठवणी आणि वेगळाच अनुभव जवळ घेऊन आम्ही जायच्या तयारीत होतो. पण अहो तिथे बस चे येणे जाणे काही खरे नव्हते. बस येते तेव्हा खरं. पण मग तिथे एक स्वामींचं मंदिर होत त्या पारावर बसून बस ची वाट पाहणं ही एन्जॉय केलं. पुढल्या वेळेस ह्या भागात टायगर सफारीला नक्की येऊ अस ठरवून बस पकडून परतलो. श्रींरगपट्टण मधल्या रंगनाथाच मंदिर पाहणं ह्याच्याइतकाच किंबहुना अधिकच आवडला हा ही अनुभव :)
माझ्या सासूबाईंचं आजोळ यल्लापूरला आहे. यल्लापूर हे कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातलं तालुक्याच ठिकाण. काही ना काही कारणामुळे आमचं तिकडे जाणं होतच असत. दरवेळेस आम्ही नॅशनल हायवे - १३ - अरबैल घाटमार्गे यल्लापूर ला जातो. एकदा असच पणजीसाबांना भेटायला जात होतो तर हेरंब रूट बदलून घेऊन गेला. तसाही अरबैल घाट महाबोर आहे त्यात त्या रस्त्यात भरपूर ट्राफिक असते हेवी लोडेड वाहनांची. म्हटलं बघू. तर हा इतका नयनरम्य रस्ता होता!!! काळी नदी रस्त्याला समांतर वाहते कदरा पर्यंत. कदरा गावात एक महामाया देवीच मंदिर आहे. मंदिर भव्य वगैरे नाही पण इथली एक पद्धत मात्र रोचक आहेत. इथे काम होण्यासाठी देवीच्या दारात तोरणं/कमान बांधण्याचा नवस बोलतात. आणि यामुळे या देवीच्या दारात खूप सारी तोरणं आहेत.
थोडंसं पुढे गेल्यावर काली नदीवर बांधलेलं कदरा धरण आणि जलविद्युत वीज प्रकल्प आहे.
कदरा प्रकल्प जरासा मागे जात नाही तोवर कैगा आणि NPCI ( Nuclear Power Corporation of India) ची हद्द सुरू होते.
तिथल्या गेटवरचे फोटो काढू दिले नाही सुरक्षा रक्षकाने. KGS समोरच्या छोटुश्या पोलीस चौकीत रीतसर तपासणी आणि नोंदी होऊन गाडीला पुढे जाऊ देतात. मग समोरचा घाट चढल्यावर एक पॉइंट येतो जेथून अणू ऊर्जा प्रकल्प अगदी नीट दिसतो आणि ठीक तुमच्या डोक्यावरून हाय टेन्शन पावर ट्रान्स्मिशन केबल जातो त्यावर मॉइश्चर असेल तर एक क्रॅकिंग आवाज येतो तोही मस्त वाटतो ऐकायला.
रस्त्यात अनेक छोटे मोठे धबधबे लागतात.
अरुंद घाटरस्ता.
यल्लापुर च्या छोट्या खेड्यात. (नाव विचारू नका बॉ. नाही समजत अजून)
गावातल्या वीरभद्र मंदिरातील मूर्ती
आवारातला जुनाट खांब. आता पाण्याच्या नळाचा आधार झालाय.
साबांच्या आजोळच्या घरच्या दरवाज्यावरची कलाकुसर.
यल्लापुरला यक्षगान नावाचा एक लोकनाट्याचा प्रकार प्रसिद्ध आहे. दिवाळी आधी ८ दिवस तिथे यक्षगानाचा उत्सव असतो. आज्जेसासरे अगदी सत्तरीतही यक्षगानात काम करायचे. त्यांची खूप जुनी सामग्री.
हे नैसर्गिक रंगांनी रंगवून खांद्याला बांधतात
हे गळ्यातलं.
हे मनगटाला बांधायचं. हे तिरफळाच्या झाडाच्या काट्यांपासून बनवतात.
ही सांस्कृतिक शिदोरी आणि अनुभव यांनी समृद्ध होऊन घरी आले त्या ट्रीप मधून.
हल्लीच म्हणजे गेल्या सप्टेंबरात अमृतसरात जाणं झालं. ह्याला कारणीभूत सर्वसाक्षी काकांचा हा धागा. हा धागा आल्यापासून प्लॅन बनवून फायनली आम्ही अमृतसरात पोचलो. इथली सरप्राइज सहल मी ठरवणार होते. म्हणजे भटकंती + खादाडी + खरेदी असा जंगी प्लान मनात ठरवूनच आले होते मी. मस्त निवांत अमृतसर पाहून, सुवर्णमंदिरात माथा टेकून आणि मुख्य म्हणजे खरेदी आटोपून आम्ही हॉटेलवर परततच होतो की एका सायकलरिक्षावाल्याला सायकलरिक्षा चालवण्यासाठी रस्ता पुरेनासा झाल्याने माझ्या नवर्याच्या पायावर सायकलरिक्षा घालावी लागली. याला चालता येईनासे झाले. मग कसेबसे डॉककडे जाऊन आलो. महान डॉक ने फ्रॅक्चर बिक्चर नाही असे सांगितले. मलमपट्टी केली, पेन किलर्स दिल्या अन २४ तास रेस्ट घ्या म्हणाले. तरच वाघा बॉर्डर ला जाऊ शकाल. माझे मनचे मांडे मनातच उरले अन सगळी इतर भटकंती रद्द केली. किमानपक्षी अटारी-वाघा बॉर्डर बघून यावे ही इच्छा होती.
मग नवर्याला संचारबंदी लागू करून मी अजून थोडी खरेदी केली ;) . मी येईस्तोवर इकडे "बदला" घ्यायचे ठरले होते म्हणून दुसर्या दिवशी मी लागू केलेली संचारबंदी रद्दबातल ठरवून मला लोकल ने फिरायचंय आणि आपण जायचं असा खलिता माझ्यापर्यंत आला. मी विचार केला स्टेशनपर्यंत कारने जाऊ, काय ते लोकलने फिरू अन परत कार ने वापस. पायाला कमीतकमी त्रास. घाटे का सौदा नही हय. म्हणून मग हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
स्टेशनवर याने डेरा बाबा नानक ची तिकिटे काढली आणि लोकलमध्ये बसून आणि लोकल सुटल्यावर मला दाखवली. पायाला भिंगरी लागलेला हा माणूस माझं न ऐकूनही माझं ऐकणार होता आणि मला फक्त याच्या पायाच्या चिंतेमुळे नको होत. असो. आता उपायच नव्हता. गाडी सुटली होती. तर मग हा माझाच प्लान असल्याचे त्याच्यापासून लपविण्याचे ठरवून मी प्रवास एन्जॉय करायचे ठरवले.
डेरा बाबा नानक ला पोचेस्तोवर ही लांबच्या लांब भातशेती, त्याचा एक वेगळाच ओळखीचा सुगंध आणि गर्द नीलगिरीची झाडी पाहून डोळे गार्गार होतात.
ही रेलवे लाइन (अमृतसर-पठाणकोट लाइन) ब्रिटिशकालीन आहे. फाळणी नंतर डेरा बाबा नानक ला स्टेशन बनवण्यात आलं.
डेरा बाबा नानक मधील संध्याकाळ
आम्ही स्टेशनला उतरून इकडे तिकडे बघेस्तोवर तिथली एकुलती एक ऑटो खच्चून भरून निघालीसुद्धा. मग आम्ही आमच्या पायांना कामाला लावून असच एका पायवाटेने फिरत जाऊ लागलो. दूरवरून लोक आम्हाला पाहत होते आणि आम्हाला ते विचित्र वाटत होत. मग एक आजोबा आम्हाला त्या वाटेत भेटले म्हणाले "गुरुद्वारासाहिब जाने का रास्ता उस तरफ है पुत्तरजी. त्या रस्त्याला फक्त तिकडे शेती असणार्या गावकर्यांना जायची परवानगी आहे". मग त्यांच्याकडून कळलं की या गावाने १९६५ आणि १९७१ अशी दोन युद्ध पाहिलीत. त्याच्या खुणाही जागोजागी दिसतात. (फोटो नाही घेऊ शकले). आणि मग त्या गावातल्या निरव शांततेच रहस्य ही कळला. (इच्छुकांनी डेरा बाबा नानक बदल गूगल बाबाला विचारल्यास युद्धाची इत्थंभूत माहिती मिळेल.) आम्ही त्यांचे आभार मानून गुरुद्वारासाहिब ला निघालो.
गावातले काही प्रचि
तिथे पोहोचेपर्यंत हेरंबचा पाय ऑलमोस्ट डब्बल सुजला होता आणि तरीही या बाबाला आराम करायचा नव्हता. गुरुद्वारात माथा टेकवून त्याला हट्टाने तिथेच बसवून आजूबाजूला काही वाहन दिसते का याचा मी शोध घेतला तर त्याचा ही पत्ता नव्हता. शेवटी एका दुकानात एक पंजाबी मुंडा होता, त्याने त्याच्या लहानग्या बहिणीची सायकल दिली. त्या सायकल लाही ब्रेक नव्हते. पण काही तरी साधन मिळाल होतं. प्रत्येक क्षणाला हा प्रवास अजून उत्कंठावर्धक होत होता.
(त्या सायकल आणि त्या वीरजीचे फोटो वगैरे काढायचं सुचलंच नाही :( ) ह्या सायकल ने आम्ही डेरा श्री चोलपूर पर्यंत गेलो. बॉर्डर जवळ खाजगी वाहन नेऊन देत नाही. चालत जावे लागते. पण BSF चे जवानांनी आमची स्पेशली हेरंबची हालत पाहून आम्हाला थेट बॉर्डरपर्यंत सायकल नेऊ दिली. मी पाहिलेली पहिली भारत-पाक सीमा!!!! BSF च्या एका जवानाने आम्हाला (त्याच्या) बायनोक्युलर ने पलीकडे पाहू देखील दिले. अंगावर नुसते काटे आले. नक्की काय वाटलं हे शब्दातीत आहे.
आपल्याकडलं
पलीकडलं
फाळणीच्या वेळी, भारत-पाक सीमेजवळ ३ गुरुद्वारा होते ज्यांना ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व होत. त्यातील २ आज भारतात आहेत तर एक पाकिस्तानात. ह्या पाकिस्तानातील गुरुद्वारात गुरु नानक देवांनी त्यांच्या आयुष्यातील अखेरची काही वर्षे व्यतीत केली. डेरा बाबा नानक आणि डेरा चोलसाहिब ह्या २ गुरुद्वारा भारतात आहेत. श्री करतारपूरसाहिब ही गुरुद्वारा करतारपूर ह्या पाकिस्तानातल्या गावात असून, Army ने ही गुरुद्वारा किमान पाहता यावी म्हणून डेरा बाबा नानक-करतारपूर बोर्डर वर १९९८ साली एक viewpoint उभारून दिलंय. अनेक भाविक येतात आता दर्शन घेण्यासाठी.
करतारपूरसाहिब ला माथा टेकवला, आणि श्री चोलसाहिब ला आलो. तिथून बाहेर पडताना तिथल्या १-२ काकांशी बोलणं झालं. त्यातून त्या लोकांचे आणि BSF चे एकमेकांशी किती छान संबंध आहेत हे कळलं. त्या काकालोक्स नी आम्हाला मस्त चिडवून घेतलं आणि आम्ही परतीला निघालो. पुढची स्टोरी नाही सांगत, पण यार आपली BSF आणि जवान खूप काही करतात सीमांचं आणि लोकांच संरक्षण करण्यासाठी हॅट्स ऑफ... (या स्टोरीज एका जवान मित्रामुळे समजल्या. त्या कुठेही पब्लीश / स्प्रेड न करण्याच्या अटीवर सांगितल्या असल्याने मी इथे लिहीत नाहीये)
हा अत्युच्च क्षण होता माझ्यासाठी त्याला तसाच ठेवण्यासाठी माझं सहलपुराण इथेच थांबवते. पुढली सहल कुठे घडते ते बघूच.
(नवर्याच्या पायाला फ्रॅक्चर होत हे घरी आल्यावर पुन्हा चेकप केलं तेव्हा कळलं. त्यामुळे ह्या आणि एकूणच ट्रीप चं पूर्णं श्रेय हे हेरंबला आणि म्हणून हा लेख हेरंबला आणि त्याच्या सोशिकपणाला डेडिकेटेड. )
(चित्र- किलमाऊस्की)
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 1:02 am | नूतन सावंत
प्रीमो,तुझ्या हेरंबाला साष्टांग नमस्कार.
8 Mar 2016 - 8:58 am | अजया
मस्तच आहे सरप्राइज सहल!
8 Mar 2016 - 9:13 am | प्राची अश्विनी
वा! कल्पनासुद्धा किती सुंदर आहे!
8 Mar 2016 - 9:24 am | प्रचेतस
मस्त भटकंती.
ती चामराजेश्वर मंदिरातील लाकडी प्रतिमा दशाननाची दिसते.
15 Mar 2016 - 1:51 pm | प्रीत-मोहर
तिथे अजुन ही भरपूर लाकडी प्रतिमा होत्या. थोड्या खराब अवस्थेत तर काही चांगल्या. एक ओळखता आली ती पक्षीराज गरुडाची होती
8 Mar 2016 - 11:10 am | सुबक ठेंगणी
मी ढपणार आहे :)
grass is greener on the other side म्हणतात खरं पण फोटो पाहून grass is greener on our side म्हणावंसं वाटतंय. :)
8 Mar 2016 - 2:25 pm | पद्मावति
प्रीमो, अप्रतिम जमलाय लेख.
आपल्याकडलं आणि पलीकडलं.....शतश्: आभार फोटो आणि अनुभव शेअर केल्याबदद्ल.
8 Mar 2016 - 8:19 pm | Mrunalini
मस्त झालाय लेख. अमृतसरला मलाही जायचे आहे. खास करुन खादाडी अणि खरेदीसाठी ;)
8 Mar 2016 - 8:36 pm | विवेकपटाईत
सुंदर फोटो आणि प्रवास वर्णन.
10 Mar 2016 - 2:41 pm | मधुरा देशपांडे
वर्णन, फोटो सगळंच छान. तुझ्या लेखाने अंकाचा श्रीगणेशा झाला होता. पहिला लेख लगेच पाठवला होतास अगदी. तेव्हा हे पाय फ्रॅक्चर प्रकरण वगैरे पण ऐकलं होतंच. आता त्या डेडिकेशनसाठी म्हणून नवर्याला पुढची सरप्राईज सहल घडवून आण. :)
13 Mar 2016 - 3:32 am | किलमाऊस्की
+१
10 Mar 2016 - 2:50 pm | सस्नेह
सुरेख फोटो आणि वर्णन.
10 Mar 2016 - 4:05 pm | पिशी अबोली
खूप भारी आयडिया!
लिहीलंयस पण मस्त! असंच नेहमी नेहमी नवनवीन ठिकाणी फिरत रहा..
11 Mar 2016 - 3:31 pm | पैसा
दोन्ही सहलींबद्दलचे लिखाण आणि फोटो प्रचंड आवडलेत! हेरंब अतिशय सहनशील मुलगा आहे यात काही संशय नाहीच्च!
10 Apr 2016 - 10:53 pm | एस
हेरंबराव आपल्या प्रीमोडीला सहन करतात हां बाकी! ;-)
11 Mar 2016 - 3:38 pm | बोका-ए-आझम
छान भटकंती!
11 Mar 2016 - 4:04 pm | गिरकी
आयडिया फार मस्त आहे :) मजा येत असेल खूप …
11 Mar 2016 - 4:37 pm | भुमी
आवडला.
11 Mar 2016 - 4:54 pm | मी-सौरभ
आता अमृतसर ला जायची ईच्छा अजून तीव्र झालीये
11 Mar 2016 - 5:04 pm | रंगासेठ
अशा सरप्राइज सहली कायमस्वरुपी लक्षात राहतात.
अशा आणखी सहलींसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!
11 Mar 2016 - 5:35 pm | सविता००१
पै ताईने जे हे लिहिलंय " दोन्ही सहलींबद्दलचे लिखाण आणि फोटो प्रचंड आवडलेत! हेरंब अतिशय सहनशील मुलगा आहे यात काही संशय नाहीच्च!" त्याच्याशी सहमत मी.
पळा आता. हाणतीये प्रीमो
पण लेख खरचंच छान
11 Mar 2016 - 5:45 pm | पिलीयन रायडर
ही उच्च्च आयडीया दिल्याबद्दल धन्यवाद!! पोराला घेऊन एवढी कल्पनाशक्ती इच्छा असुनही चालवता येत नाही. पण २ दिवसाची दोघांपुरती सरप्राईज सहल काढायला अजिबात हरकत नाही. मी तर म्हणते की ही अशीच गिफ्ट्स द्यायला हवीत नवरा बायकोने एकमेकांना..! आयडीया जरुर ढापण्यात येईल!!!
फोटो पाहुन गार गार वाटलं ग!!
11 Mar 2016 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा
फोटुज भरपूर आवडल्या गेले आहेत!
उस हरिण कु हाथ लगाने कु जी करता है|
11 Mar 2016 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्नाट आयडियाची कल्पना !
सहलीत अगोदर माहित नसताना काही वेगळंच अचानक दिसलं की सहलिची मजा एका वेगळ्या उंचीवर जाते !
13 Mar 2016 - 3:33 am | किलमाऊस्की
मस्त आयडीया! दोन्ही सहली आवडल्या. पण अमृतसर ट्रीप जास्त आवडली. फोटोही सुंदर.
14 Mar 2016 - 6:34 pm | अनन्न्या
निसर्ग वेड लावतो तिथला, बागा तर अप्रतिम आहेत. अमृतसर ट्रीपही छान. आता सगळी माहिती वाचून यावर्षी लेकाच्या बारावीमुळे घरातच बसावे लागणार म्हणून जास्त वाईट वाटतेय.
14 Mar 2016 - 8:50 pm | मितान
आयडिया आवडल्या गेली आहे !
लेख मस्त !!
फोटो सुंदर !!! :)
14 Mar 2016 - 11:06 pm | स्वाती दिनेश
सरप्राइझ सहलीने अंकाच्या श्रीगणेशा झाला आणि आपला अंक हे सरप्राइझ पॅकेज ठरला आहे, :)
लेख आणि आयडिया पहिल्यांदा वाचले तेव्हाच आवडला होता.
स्वाती
15 Mar 2016 - 2:54 pm | वैदेहिश्री
किती मस्त. आयडिया आवडली. फोटोस खूप मस्त आहेत.
18 Mar 2016 - 10:12 pm | इशा१२३
वा ! मस्त आयडिया अगदी.
फोटो तर अप्रतिमच !उटि सुंदरच आहे.
18 Mar 2016 - 10:12 pm | इशा१२३
वा ! मस्त आयडिया अगदी.
फोटो तर अप्रतिमच !उटि सुंदरच आहे.
25 Mar 2016 - 4:11 am | जुइ
25 Mar 2016 - 11:02 am | सुधीर कांदळकर
आवडले. एकदा (किंवा अनेकदा) गोवा - लोन्डा - बेळगाव प्रवास करा. शक्यतो केआरएसटीसी बसने. जोईडा बस स्टॅन्डकडे मुख्य रस्त्यावरून नेणारा रस्ताच पावसाने गायब होतो.
आरबेल घाट मला तरी बोअर वाटला नाही. साग आणि बांबूची मस्त लागवड ऐन जंगलात केलेली दिसते. यल्लापूर कारवार रस्त्यावर मस्तीकट्ट्याच्या मंदिरात पहाटे भीमसेन आणि लताच्या आवाजात एकदा कन्नड अभंगवाणी ऐकली होती. आपल्या मराठी चालीवरचीच. ऐन जंगलात गावे आहेत आणि संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या मोसमात धुक्याच्या महालातल्या जंगलातल्या रस्त्यावर आदिवासी/गांवकरी स्त्रिया/मुली पहाटेपासून रस्त्यालगत फुलांचे गजरे विकायला उभ्या असतात, तर काही स्त्रिया लखलखीत पितळी घागरीने पाणी नेतांना दिसतात. अशी काही अवर्णनीय दृश्ये मनावर कोरलेली आहेत.
सुंदर लेखाने माझ्या आठवणी जागवल्या, धन्यवाद.
25 Mar 2016 - 1:22 pm | पूर्वाविवेक
लेख मस्त. फोटो फार सुंदर. अमृतसर भटकंती आवडली. दुखऱ्या पायांनी एवढा पल्ला मारला, कौतुकच आहे हो. तेथील खाद्य भ्रमंतीवर पण लिहायला हव होत. ते विरभद्र काळभैरवासारखे दिसतात नाही?
4 Apr 2016 - 8:17 pm | प्रीत-मोहर
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार :)
सुरंगीताई ,, हेरंबला प्रतिक्रिया कळवली आहे ;)
@ सुधीर कांदळकर
अनेकदा केलाय प्रवास. अरबैल घाट नेहमीचाच झाला आहे प्रवास करकरुन त्यामुळे तो मला बोर वाटतो. आणि कर्नाटकात गावांमधे कीसाआरटीसी बस ने प्रवास करायच धाडस माझ्यात नाही हो. पण लोंडा रुट चा रस्ता मस्तच आहे. आम्ही बरेचदा जातो त्या रस्त्याने.
@पुर्वाविवेक
अग हो दुखर्या पायाने ४-५ किमी चालणे , त्याशिवाय सायकल चालविणे हे महान आहे. आणि त्यासाठीच हेरंबला डेडिकेट केलाय हा लेख,. ह्याचा पाय मोडल्यामुळे खाद्य भ्रमंती काय न अमृतसरी दुपट्ट्यावर काम करणार्या बायांना भेटणे काय काहीच जमल नाही . त्याकरता परत एकदा जाईनच अमृतसरला.
बाकी त्या लोकांच्या खाण्याच्या आणि खिलवण्याच्या आवडीबद्दल काय बोलु मी? एका दिवशी तर आम्ही असच एका प्रसिद्ध हाटिलात जेवायसाठी बाहेर पडलो होतो. त्या दिवशी काय होत कोण जाणे, लोकांनी आम्ही अनोळखी असूनही आम्हाला हात धरधरुन घरात/ दुकानात नेउन इतक प्रेमाने खाउ घातल की आम्ही १०० मी. मधेच परत रुम वर परतलो होतो. पूरी - चना, लस्सी, समोसे, सरसों का साग आणि मक्के की रोटी ..यम्म होत सगळं . हा लोकांच्या घरचा लंगर आणि सुवर्णमंदिरातला लंगर बेस्टंबेस्ट होता अगदी :)
9 Apr 2016 - 10:50 pm | Maharani
मस्त झालाय लेख..फोटो पण झक्कास.