फुलांवर करायचे फोटोग्राफिचे किडे

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in मिपा कलादालन
4 Feb 2016 - 3:45 pm

सध्या फुल ह्याविषयावार छायाचित्रण स्पर्धा चालू आहे. तिथं कुठला फोटो टाकावा हे काही झेपेना आणि स्पर्धेसाठी नाही म्हणून प्रतिक्रियत टाकायाला पण फार जास्त फोटो झाले. म्हणून हा लेख. फोटोबरोबर काही तांत्रिक गोष्टींचीही चर्चा करण्याचा प्रयत्न. तसा मी होशी आणि चुका करून शिकलेलो आहे. काही त्रुटी राहिल्यास दाखावून द्याव्यात.

फुलं हा अनादिकाळापासून अनाहितांच्या शृंगारासाठी हक्काचा आणि प्रेमासाठी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यांना पुष्पांजली वाहून लेखाची सुरूवात करतो.
फोटो क्रं १
DSC_0429

खरिखुरी मॉडेल न मिळाल्यामुळी लालबाग येथील फ्लॉवर शो मधील मॅनेक्वीन चा फोटो काढला आहे. गोड मानून घ्या.

संत व्हॅलेंटाईन जन्मतिथिसारखे अपवाद सोडले तर पुरुषांना फुलांशी फारसं देनंघेनं नसायच. ह्याला काही अपवाद होते चाचा नेहरूंसारखे रंगेल किंवा मनगटावर माळ बांधून त्याचा वास घेत लावणीचा आनंद घेणारी मंडळी. गेले ते दिवस. असो.
पण जसजसे डिएसलार लोकप्रिय झाले तसं थोडं चित्र बदलल. कारण फोटोग्राफीमध्ये व्हाईट बॅलन्स, कलर मोड, डेप्थ ऑफ फिल्ड आणि काम्पोझिशन शिकण्यास फुलं अत्यंत योग्य.

फुलांचे फोटोग्राफी काढातानी कोणते नियम पाळावे लागतात का? तर उत्तर नियम पाळणे फारसं गरजेचं नाही, प्रयोग करत रहा., पण काही गोष्टींची काळजी मात्र जरूर घ्या. सुरुवात करण्याआधी, तीन गोष्टी पाहिजे तश्या सेट करून घ्या.
१. व्हाईट बॅलंस : फुलांचे नैसर्गिअक रंग पकडण्यासाठी हे जरून आहे. ग्रे कार्ड वापरणे अतिशय फायद्याचं ठरत. इथं थोड चिटिंगही करता येत. उदा. भर दुपारी भडक रंगाच्या फुलं काढताना कधी फ्लुरोसंट व्हाईट बॅलंस सेट करून पहा. डोळ्याला शांत वाटणारे रंग मिळतात.
२. कलर मोड : हा एक कमी चर्चलेला विषय आहे. बर्याच कॅमेरांम्ध्ये डिफॉल्ट मोड व्हिव्हिड असतो. गडद रंगाच्या फुलांचे फोटो काढताना हा मोड त्रासदायक ठरतो. रंग अति भडक दिअतात. न्युट्रल किंवा स्टंडर्ड मोड मला सोईस्कर वाटले आहेत.
३. एक्स्पोजर : व्हाईट कार्ड वापरून हे बरोबर सेट करता येतं. जर व्हाईट कार्ड नसेल तर वापरायचे काही ठोकताळे. जर फुल फि़कट रंगाचे असेल तर थोडसं अंडर एक्स्पोज करून पाहा. फुल जर गडद रंगाचे असेल तर थोडसं ओव्हर एक्स्पोज करून पाहा.

अक्सेसरीज :
१. लेन्स :
लेन्स हा एक महत्वाचा घटक मॅक्रो लेन्स आणि टेलिफोटो लेन्सेस फुलांच्या फोटोग्राफीसाठी जास्त उपयुक्त ठरतात. बॅकग्राउंड ब्लर आणि बोखेच्या द्रुष्टीने जास्त फायद्याच्या. या लेखातील बहुतांशी फोटो nikon D3100 , 60mm f2.8 macro lens वापरून तर एखादा 70-300mm lens वापरून काढले आहेत. मॅक्रो लेन्स नसेल तर क्लोज अप फिल्टर हा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. काही लोग एक्स्टेंशन ट्युब आणि लेन्स रिव्हर्सल रिंगचाही उपयोग करतात.
३. थ्री इन वन कार्ड - ग्रे, व्हाईट आणि ब्लॅक कार्ड एकत्र येतात. ग्रे आणि व्हाईटचा उपयोग वर पाहिला आहे. ब्लॅक लाईट अ‍ॅब्सॉर्बंट म्हणून किंवा बॅकाड्राप म्ह्णून ही वापरता येते.
३. फ्लॅश - रींग फ्लॅश वापरून बॅकग्राउंड पूर्ण घालवता येते (मी कधी वापरला नाही). हेच काम काही अंशी नेहमीचा एक्स्टर्नल फ्लॅश वापरून ही करता येते. जवळून फ्लॅश मारा, आणि पोस्टप्रोसेसिंग्मध्ये क्वाँट्रास्ट आणि शॅडो़ज एड्जस्ट करून काहीसा रींग फ्लॅश सारखा इफेक्ट मिळवता येतो.

आता फुलांचे फोटो काढण्याचे वेगवेगळे प्रकार.
१. गुच्छ, ताटवा व अनेक फुले एकत्र-
ह्या प्रकारच्या फोटोत, बॅकग्राउंडचा काँट्रास्ट आणि ब्लर ह्या दोन गोष्टींवर प्रयोग करता येतात. क्ल्टर किंवा गर्दीमुळे फोटोची शोभा जाणार नाही ह्याची काळजी घ्या. काही उदा.

फोटो क्रं २
DSC_0770

फोटो क्रं ३
DSC_0725

फोटो क्रं ४
roses

२. खाली पडलेलं फुल - असा फोटो काढताना आजूबाजूची परिस्थिती फोटोत दिसू द्या. फुलाचा रंग ऊठावदार असेल तर असे फोटो चांगले येतात. जमीनीवर पडलेल्या गुलमोहराचा फोटो.

फोटो क्रं ५
orphened beauty

३. बॅकग्राऊंड आयसोलेशन (ब्लर): हा सर्वात जास्त लोकप्रिय प्रकार आहे. ह्यात फुलाचा रंग बॅकग्राऊंडपेक्षा वेगळा आणि शॅलो डेप्थ ऑफ फिल्ड वापरून बॅकग्राऊंड एक्दम ब्लर करून टाकायचा.

फोटो क्रं ६ भडक फूल आणि हिरवी बॅकग्राऊंड
DSC_0727

फोटो क्रं ७
DSC_0224

फिकट फूल आणि फि़कट बॅकग्राऊंड

फोटो क्रं ८
flower1

पांढरे फुल आणि रंगतार भडक बॅकग्राऊंड

फोटो क्रं ९
1-DSC_0624

३. बॅकग्राऊंड डीफ्युजन - हा माझ्या सर्वात आवडीचा प्रकार. फुल अलगदपने बॅकग्राऊंडशी एकनिष्ट होण्याचा किंवा त्यातून बाहेर पडात असण्याचा होणार भास. येथे फूल आणि बॅकग्राऊंड ह्यांचा रंग एक असावा लागतो आणि डेप्थ ऑफ फिल्ड अत्यंत कमी ठेवावी लागत. काही वेळा पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लर घालावा लागतो.

फोटो क्रं १०
Hibiscus

फोटो क्रं ११
DSC_0807

बॅक लाइट वापरून इथे छान इफेक्टस मिळवता येतात. त्याची काही उदा.

फोटो क्रं १२
DSC_0755

फोटो क्रं १३
DSC_0184

रेनलिलिसारखी फुलं जी दाटीवाटीनं लावतात तिथे पार्शियल डिफ्युजन मिळवता येत. दोन उदा.

फोटो क्रं १४
white1

फोटो क्रं १५
DSC_0829

४. मॅक्रोज आणि क्लोजअप.
फुलांच्यात आत एक अदभुत जग दडलेलं आहे, मॅक्रो लेन्सने ते प्रभावीरित्या टिपता येत. काही उदा.

फोटो क्रं १६ जर्बेरा
DSC_0487

फोटो क्रं १७ लाजाळू
DSC_0922

पा़कळी आणि त्यावरील पाण्याचे थेंब अथवा दवबिंदु हा एक रम्य देखावा. मक्रो लेन्स येथे प्रभावी ठरते.
फोटो क्रं १८
DSC_0569

फोटो क्रं १९
DSC_0586

फोटो क्रं २०
1-DSC_0571

५. फ्लॅश आणि मॅक्रो लेन्स वापरून काढलेले काही फोटो

फोटो क्रं २१ दोन कळ्या आणि फुल मिळून मस्त घड्याळ तयार झाल आहे.
DSC_0872

फोटो क्रं २२ उजव्या बाजून एक्स्टर्नल फ्लॅश
DSC_0819

फोटो क्रं २३ गुलाब
DSC_0317_1

फोटो क्रं २४ ब्रह्मकमळ
brahma_kamal2

फोटो क्रं २५ हे एक मेलेलं फुल. सर्व पा़कळ्या गळून पडल्या आहेत. बीया तयार होण्याचा मार्गावर आहे. पुनर्जन्म तो हाच.
DSC_0300

फोटो क्रं २६ वॉटर लिलि.
lilli3

६. मोनोक्रोम: रंग काढून घतले तरी फुलांच सौंदर्य कमी होत नाही ह्याचं एक उदा

फोटो क्रं २७
DSC_0488

७. प्रोसेसिंग - ह्यात अनेक किडे करता येतात.
इथे बॅकग्राउंड पूर्णतः काढून टाकता येत. गिम्प मध्ये फोरग्राऊंड सिलेक्शन टूल ह्यासाठी उपयुक्त आहे. उद.

फोटो क्रं २८ अजून एक वॉटर लिलि. इथे बॅकग्राउंड प्रोसेसिंगमध्ये काढून टाकले आहे.
lotus
खालील दोन फोटोतील ट्रिक वाचकांनी ओळखायची आहे.

फोटो क्रं २९ जास्वंद

Negative Thinking

फोटो क्रं ३० गुलाब
DSC_0279_1

फोटो स्टॅकिंग हा एक प्रकार अजून करून पाहिला नाही. तसं करायला किडे बरेच आहेत आणि एका पोस्टसाठी इतके फोटो पुरे झाले. :) तुमची मते, टिका आणि सुधारणांच प्रतिक्रियेमध्ये स्वागत आहेच :)

प्रतिक्रिया

अन्नू's picture

7 Feb 2016 - 7:11 pm | अन्नू

हा धागा कसा सूटला बघायचा?
डॉले भरुन आले सगळे फोटु बघून. प्रत्यक्ष फोटुतच गेलोय कि काय असं वाटतंय. :=))
अगदी जिवंत आहेत..