चेहरापुस्तकावर कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो आले होते त्यात दुधसागर धबधब्याचे फोटो होते. याचे शुभ्र दुधाच्या रंगाचे पाणी पाहून दुधसागर हे नाव शोभत होते. ज्याने कोणी हे नाव ठेवलं त्याच्या बुद्धीला सलाम. दुधा सारखा असणारा त्याचा रंग पाहून मनात म्हटलं होत कि राव एकदा तरी हा बघावा, नंतर चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटात परत याची झलक दिसली. हा चित्रपट फक्त त्या एका दृष्यापुरता पाहायचो. नोव्हेंबर महिन्यात दुधसागर ला जायचा योग जुळून आला. परत शिवशौर्य संस्थेसोबत दुधसागर ट्रेक करायचा प्लान केला. ट्रेक फी भरून नोंदणी केली आणि दुधसागर बद्दल जितकी माहिती जमवता येईल तितकी जमवायला सुरुवात केली. त्या धबधब्याचे मनमोहक फोटो पाहून "जयंत कुलकर्णी" सरांच्या फोटोची आठवण होत होती.
(जालावरून साभार)
गुगल वर चुकीची माहिती दिली आहे कि क्यासल रॉक नंतर दुधसागर स्टेशन येते पण त्या नंतर करंजोल स्टेशन लागते मग १० मिनिटांनी दुधसागर स्टेशन येते. बसने जाण्यासाठी मडगाव गाठावे तिथून शेअर जीप भेटतात. दुधसागर धबधबा हा मांडवी नदीवर आहे. भारतातील उंच धबधब्यांमध्ये याची गणती होते. ३१० मीटर उंचावरून हा कोसळतो (तब्बल १०१७ फुट). पणजी पासून या धबधब्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे. हा धबधबा भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात आहे. इथे जेवण्याची व राहण्याची सोय नाही आहे.
चेहरापुस्तकावर शिवशौर्य त्या धबधब्याचे फोटो आणि विडीओ उपलोड करून उत्सुकता अजून वाढवत होते. त्यात एक खबर मिळाली की त्या धबधब्याला उतरायला रेल्वे पोलिसांनी मनाई केली आहे. बाजूने जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यावर प्लास्टिकच्या बॉटल्स फेकणे, बोगद्यात गैरप्रकार करणे या प्रकारांमुळे पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे थोडी धाकधूक होती की ट्रेक रद्द करावा लागतोय की काय पण तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्क साधून काही प्रोब्लेम नसल्याच कळाल आणि जीव भांड्यात पडला. हे संकट दूर होतेय न होतेय तेच अजून एक खबर आली की कोकणातून जाणाऱ्या कुठल्याच गाडीच रिजर्वेशन उपलब्ध नाहीये. पण रिजर्वेशन व्हाया मिरज हुबळी एक्स्प्रेसने उपलब्ध होते मग काय लगेच डन करून तिकिटे कन्फर्म केली.
२१ नोव्हेंबरला सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून आमची गाडी सुटणार होती त्यामुळे सकाळी लवकर उठून तयारी करून वेळेत पोचलो. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाड्या तिथून असल्यामुळे पूर्ण प्ल्याटफोर्म वर भय्ये दिसत होते. त्या प्ल्याटफोर्म वर लादीकरणाचा काम चालू होते त्यात ते कसेही अस्ताव्यस्त त्यात पडून होते. रेल्वे गाड्यांचा महत्वाचा थांबा असल्यामुळे जाम दुर्गंधी सुटली होती, कधी एकदाची गाडी सुटतेय अस वाटत होत.
बाजूलाच आलिशान अशी "महाराजा एक्स्प्रेस" दिमाखात उभी होती. बाहेरूनच गाडीचे रूप पाहून समाधान मानले कारण त्या गाडीची तिकीट ही आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नाहीये. नाकाला लावलेला रुमाल गाडी हलल्यावरच काढला आणि एकदाचा मोकळा श्वास घेतला.
(महाराजा एक्स्प्रेस बाहेरून - जालावरून साभार)
(महाराजा एक्स्प्रेस आतून - जालावरून साभार)
रेल्वेने पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करणार असल्यामुळे थोडासा एक्साईटेड होतो. वाटेत लागणारे उसाचे मळे, दूरवर दिसणाऱ्या पवनचक्की पाहत कधी मिरजला पोचलो ते कळलंच नाही.
एका स्टेशनच मजेशीर नाव
गाडी पुणे, सातारा दरमजल करत एकदाची मिरजला पोचली, तिथे एका खानावळीत जेवणाची सोय केली होती. तिथले साध जेवण अप्रतिम होत. शिवशौर्य संस्थेसोबत केलेल्या प्रत्येक ट्रेक मध्ये कधीच हॉटेल मध्ये खाण झाल नाही, एकतर घरगुती खानावळीत, किंवा त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या घरी जेवण झालं. त्यामुळेच ट्रेक मध्ये कधी पोटाने त्रास दिला नाही.
जेवण आटोपल्यावर मिरज वरून दुधसागर ला जाणारी ट्रेन पकडायची होती त्यामुळे प्ल्याटफोर्म वर आलो तर तिथे पंढरपूरला जाणारे वारकरी गाडीची वाट पाहत कुडकुडत बसले होते. लहान-थोर मंडळी त्या विठूरायाला पाहण्यासाठी चालली होती. आम्ही गोवा निझामुद्दीन एक्स्प्रेसने दुधसागर साठी रवाना झालो. क्यासल रॉक नंतर लागणाऱ्या दुधसागर या छोट्या स्टेशन वर आम्हाला उतरायचं होत. तिथे कुठलाच प्लाटफोर्म नाहीये आणि गाडी अवघी २/३ मिनिटे थांबते. मोबाईल मध्ये २.३० चा गजर लावून झोपी जायचा प्रयत्न केला पण सतत हलत असल्यामुळे झोपच येईना. एकदाचा दुधसागरला उतरलो, गाडी थोडा वेळ थांबणार असल्यामुळे सर्वजण पटापट उतरले. रात्रीचे ३ वाजले होते. तिथे स्टेशन मास्तरांशी बोलून त्या काळोखातून चालायला सुरुवात केली, त्यांनी सांगितल्या प्रमाणे रुळाच्या एका बाजूने सर्वजण चालत होते.
रात्रीच्या त्या काळोखात ब्याटरीच्या उजेडात रेल्वेच्या बोगद्यातून चालायला खूप मजा येत होती. दुधसागर धबधब्याचा बोर्ड असलेल्या ठिकाणी थोड फोटो सेशन करून पुढे चालू लागलो
तिथे धबधब्याच्या समोर एक मचाण बांधल आहे. तिथे थोडावेळ बसलो आणि थोड उजाडताच खाली धबधब्याला जाण्यासाठी खाली उतरायला लागलो.
मचाण, वरच्या माळ्यावर जाणाऱ्या पायऱ्या तुटल्या आहेत
सकाळच्या नाश्त्याची तयारी
मचाणा जवळून दिसणारा धबधबा
उतरताना असलेली घसाऱ्याची वाट
जो धबधबा आपण फोटोत पाहतो त्यापेक्षा थोडा वेगळा दिसल्यामुळे थोडासा हिरमोड झाला. पाणी इतके जास्त नव्हते पण वरून पडणारे पाणी नावाप्रमाणे एकदम शुभ्र धवल होते.
(टीप: धबधब्याखाली जाण्यास मनाई आहे. त्या पाण्यात उतरण्या आधी लाइफ ज्याकेट घालणे बंधनकारक आहे.)
खालून दिसणारा धबधबा
सकाळचा नाश्ता
तिथे नाश्ता करून थोडावेळ थांबून निघालो. आम्ही निघालो आणि परदेशी पर्यटक, देशी पर्यटकांची रांग लागली. मनात म्हटलं लवकर आलो आणि लवकर निघालो त्याचा फायदा झाला. उगाच गर्दी नाही भेटली. आता धबधब्यापासून चेक पोस्ट पर्यंत ११ किमी चालायचं होत. जनरली लोकं गाड्यांनी ते अंतर येत होते आणि आम्हाला चालताना पाहून आश्चर्य करत होते. धबधब्यापासून निघालेली ती वाट थंड सावलीतून असल्यामुळे चालायला मजा येत होती. जवळ जवळ ५ किमी अंतरापर्यंत आम्हाला ऊन लागलच नाही, नंतरही ऊन अस म्हणाव इतक लागलच नाही.
हसत मजा मस्करी करत अंतर पटापट कापल जात होत, आणि हुरूप वाढवणारी एक बातमी कळाली की पुढे चेक पोस्टच्या आधी १.२५ किमी वर छोट्या धरणावर आंघोळ करायला मिळणार, त्या पाण्यात डुंबायला मिळणार आहे. मग काय चालण्याचा स्पीड अजून वाढला. एकदाचा त्या डुंबायच्या जागेवर येताच कपडे काढून लगेच पाण्यात प्रवेश केला. वाह स्वर्ग सुख म्हणजे अजून काय!! एकदम मस्त वाटल. मागाहून येणारा आमचा ग्रुप येईपर्यंत पाण्यात मनसोक्त मजा केली.
आता पोटात कावळेच काय हत्ती डान्स करू लागले होते म्हणून ब्यागेतला नाश्ता करून परत पदयात्रा चालू केली. चेकपोस्टला पोचतोय तोच जेवणासाठी बोलावण आलं, चेकपोस्ट च्या बाजूलाच वन भोजनाची सोय केलेली होती. गोवन स्टाइल जेवण जेवायला खूपच मजा आली. डाळीची खीर, भाज्यांचं लोणच, सोलकढी एकदम मस्त. भुकेमुळे फोटो काढायचं भान राहील नाही. परतीची रेल्वे तिकिटे कन्फर्म नसल्यामुळे अर्धेजण ट्रेन ने तर अर्धेजण लक्झरी बसने मुंबई कडे रवाना होणार होते. आमचा नंबर लक्झरी बस मध्ये होता म्हटलं एकदम मस्त निदान झोप तरी नीट काढता येईल. येताना ट्रेन मध्ये झोपेच खोबर झाल होत. मग तुडुंब पोटाने गाडीत बसून मडगाव रेल्वे स्टेशन ला पोचलो. सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही लक्झरी बसने मुंबईला आलो.
अजून एका छानशा ट्रेकची सांगता झाली, ४ तासाच्या ट्रेक साठी ४४ तासांचा प्रवास केला होता.
ट्रेक : दुधसागर धबधबा
दिनांक : २१-२२ नोव्हें २०१५
प्रतिक्रिया
27 Jan 2016 - 6:05 pm | एस
छान झाला की ट्रेक!
27 Jan 2016 - 6:06 pm | वेल्लाभट
पाणी हवे तितके नव्हते... हरकत नाही. ट्रेक मजेदार झाला असावा असं मानतो.
शिवशौर्य अतिशय उत्तम ग्रूप आहे. अमित, शार्दुल ओळखतात. गुड गाइज.
27 Jan 2016 - 7:41 pm | प्रचेतस
फोटो आणि लेखन मस्तच.
पावसाळ्यात स्वर्ग असेल इथे.
28 Jan 2016 - 11:07 am | गणामास्तर
पावसाळ्यात खरचं स्वर्ग असतो हा परिसर. मागच्या ऑगस्ट मध्ये केला होता हा ट्रेक.
सतत पाउस चालू असल्यामुळे जास्त फोटो नाही काढता आले, तरी पण वेळ मिळाला कि जेवढे काढू शकलो ते टाकतो.
27 Jan 2016 - 8:06 pm | मुक्त विहारि
आता गोव्याला गेलो की हा धबधबा नक्कीच बघणार.
28 Jan 2016 - 3:16 pm | gomateshwar
फोटो कसे टाकावे
28 Jan 2016 - 4:07 pm | नाखु
अगदी लहान मुलेसुद्धा(फोटोतल्या छोट्या ताईला पाहून असे म्हणतोय) जाऊ शकतात म्हणजे करायला हरकत नाही.
प्रचेतस अता तरी ऐकताय ना??
साध्या सोप्या ट्रेकचा अभिलाषी नाखु
28 Jan 2016 - 5:57 pm | मयुरMK
आम्ही मित्राची कार घेऊन गेलो होतो कार खाली पायथ्याशी लावून रेल्वे रूळ मार्गी १२ किलोमीटर चालत गेलो होतो खुपच छान झाली होती ट्रीप. फक्त कॅमेरा तेवढा पाण्यात पडून खराब झाला :(
28 Jan 2016 - 9:13 pm | लिओ
जुन एन्ड / जुलै च्या मुसळधार पावसात जर १२७८० गोवा एक्स्प्रेस उशीरा धावत असेल व दुधसागर धबधबा स्टेशनला सुर्योदयानन्तर लगेच पोहोचत असेल तर
पहाटेच्या पांढऱ्या शुभ्र हलक्या धूक्यात व कोसळणाऱ्या पावसात (हलका / मध्यम) दुधसागर धबधबा बघण्यात व धबधब्याचे तुषार चेहऱ्यावर अनुभवणे एक स्वर्गीय अनुभव.
29 Jan 2016 - 4:08 am | श्रीरंग_जोशी
फोटोज अन वर्णन आवडलं.
या ठिकाणी ट्रेक करता येतो हे प्रथमच कळलं...
29 Jan 2016 - 6:43 am | जुइ
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले!
29 Jan 2016 - 1:42 pm | बोका-ए-आझम
वर्णनही छान. काही फोटो दिसत नाहीयेत हो. तो महाराजा एक्सप्रेसचा आणि स्टेशनच्या मजेशीर नावाचा.
29 Jan 2016 - 4:04 pm | जगप्रवासी
महाराजा एक्स्प्रेस - फोटो दिसत नसेल तर मग "महाराजा एक्स्प्रेस" अस गुगलून बघा.
अदारकी - हुबळी एक्स्प्रेसने मिरजला जाताना लागणारे एक स्टेशन