तिळगुळ (संक्रांतीचा हलवा)

प्रवास's picture
प्रवास in पाककृती
15 Jan 2016 - 12:49 am

Tilgul

साहित्य:

  • अर्धा कप साखर
  • पाव कप पाणी
  • ३-४ छोटे चमचे दूध
  • १ चहाचा छोटा चमचा तीळ,खसखस (जितके मोठे तिळगुळ हवेत तितके मोठे दाणे असलेली वस्तू घ्यावी. उदाहरणार्थ: बडीशेप,चारोळे, ई. मला छोटे तिळगुळ आवडतात म्हणून मी खसखस आणि तीळ घेतले होते.)

कृती:

१. साखर,पाणी आणि दूध एकत्र करून पाक करून घ्यावा.
(गुलाबजाम साठी करतो त्यापेक्षा घट्ट पाक असावा. मी मऊ गोळी करून पाहते.)

२. दूध नासून जाते म्हणून पाक झाल्यावर एका कापडातून गळून घ्यावा.
(यात दूध पांढऱ्या रंगासाठी घालतात असा असं आज्जी म्हणाली. पण पाक घट्ट झाल्यावर त्याची साखरच होते आणि ती पंढरीच असते.मग दूध कशासाठी? मला कळलं नाही. पण मी दूध घातलं. उगाच तेवढ्याश्या गोष्टीने चुकायला नको म्हणून.)

३. पाक कोमट झाला कि एका पसरट आणि जाड बुडाच्या भांड्यात खसखस आणि तीळ घ्यावेत. भांडे मंद आचेवर ठेऊन अगदी पाव चमचा पाक घालावा आणि हाताने तो सगळ्या खसखस आणि तिळाच्या दाण्यांना चोळावा.

४. हा झाला पाकचा पहिला थर. तो साधारण पाने अर्धा तास थंड होण्यासाठी ठेवावा.

५. आपल्याला हवे आहेत तितक्या मोठ्या आकाराचे तिळगुळ होईपर्यंत ३ आणि ४ पायरीची क्रमाने पुनरावृत्ती करत राहावी.
हव्या असलेल्या आकाराप्रमाणे १ ते २ दिवस लागू शकतात तिळगुळ पूर्ण करायला.

इतका सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा तिळगुळ दुकानातून आणणे सोपे आहे. पण सध्या जिथे राहतो तिथे ते मिळत नसल्याने आणि तिळगुळशिवय संक्रांत साजरी करणे चांगले न वाटल्याने घरीच करून पहिले.

तिळगुळ करायचा आणि मिपावर पाककृती टाकायचाही पहिलाच प्रयत्न आहे. गोड मानून घ्याल अशी आशा आहे.

Tilgul

तिळगुळ घ्या..गोड गोड बोला..!!!

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 1:01 am | श्रीरंग_जोशी

सर्वप्रथम संक्रांतीच्या शुभेच्छा!! मिपावर स्वागत आहे.

हा हलवा घरीही करता येतो हे प्रथमच कळले. आजवर केवळ दुकानातून विकत आणलेला पाहिला असल्याने तो कारखान्यात बनत असावा असा अंदाज होता.

तपशीलवार पाककृती आवडली.

एक जुनी आठवण - माझ्या पहिल्या नोकरीत हा हलवा एका सहकार्‍याने संक्रांती निमित्त तीळगुळ म्हणून हापिसात वाटला तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. तीळगुळ म्हंटल की तीळगुळाच्या वड्या किंवा लाडू बनवण्यासाठी जे मिश्रण वापरले जाते ते किंवा प्रत्यक्ष वड्या किंवा लाडू असेच खायला मिळाले होते तोवर.

एक प्रश्न - देवस्थानांमध्ये प्रसादासाठी जे चिरंजीवचे दाणे वापरले जातात ते याच पद्धतीने बनत असावेत का? चवीला अन दिसायला जवळपास असेच असतात केवळ आकारमानाने जरा मोठे असतात.

प्रवास's picture

15 Jan 2016 - 1:19 am | प्रवास

आमच्या घरी संक्रांतीला तिळाच्या वड्या/ लाडूंसह हा हलवा सुद्धा असे. :)

आपल्या प्रश्नाचे उत्तर नाही माहिती मला. पण ह्याच हलव्यावर आणखी बरेच साखरेचे थर चढवल्यास तसाच दिसेल हे खरं !

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 1:23 am | श्रीरंग_जोशी

तीळगुळाबरोबर हा हलवा आमच्याकडेही असतोच.

पण केवळ हा हलवा तीळगुळ म्हणून कुणी हातावर प्रथमच ठेवला तेव्हा आश्चर्य वाटलं :-) .

चिरंजीव दाणे बनवण्याच्या कॄतीबाबत तुम्ही म्हणता तसे होत असावे बहुधा.

प्रवास's picture

15 Jan 2016 - 1:25 am | प्रवास

:)

हलव्याचा फोटो व कृती आवडली.
पंत, मगे एकदा आत्मुगुर्जींनी मिपासाठी म्हणून खास हलवा बनवण्याच्या कारखान्यात जाऊन वृत्तांत तयार केला होता.

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 1:51 am | श्रीरंग_जोशी

आत्मुगुरुजींच्या लेखाबाबत दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.

बराच प्रयत्न केला पण त्यांच्या खूप सार्‍या लेखांमधून तो लेख शोधण्यात आतापावेतो यश मिळाले नाही.

त्यांचा या प्रकारचा दुसरा लेख माझ्या स्मरणात आहे - गुर्‍हाळ लावलय गुर्‍हाळ....

हा आहे आत्मुशेठचा काटेरी हलव्याचा लेख

http://www.misalpav.com/node/23653

श्रीरंग_जोशी's picture

15 Jan 2016 - 7:57 am | श्रीरंग_जोशी

हा लेख तेव्हा वाचला नव्हता. तीन वर्षांपूर्वीच्या संक्रांतीच्या मुहूर्तावर बुवांनी प्रकाशित केला होता असे दिसते.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2016 - 8:16 am | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद रे पिंगू.
अत्ता च लेख वर काढला,आणि इकडे बघतो तर हा दुवा तू दिलेलास!

असा करतात का हलवा! कष्टाचं काम आहे.पण घरी केलेला खायची मजा औरच!

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 12:18 pm | पद्मावति

वाह, मस्तं. जिकीरीचं काम आहे. खरंच सुगरण आहात. खूप छान.

पैसा's picture

15 Jan 2016 - 12:54 pm | पैसा

माझी आई असा हलवा कोळशाच्या शेगडीवर परात ठेवून करायची. हलव्याचा काटा मोडू नये म्हणून तो कालथ्याने नव्हे तर हलक्या हाताने हलवत रहायचा. हाताला किती चटके बसत होते देवजाणे.

नंतर आई, आजी असा वेगवेगळ्या आकाराचा (खसखस, तीळ, चुरमुरे) हलवा तयार करून त्याचे दागिने तयार करायच्या. कोणा नव्या लग्न झालेल्या मुलीसाठी मंगळसूत्रापासून सगळे दागिने नाहीतर लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीसाठी त्यालाही हार बिंदल्या वगैरे.

आम्ही नुसतेच दमतो!

सप्तरंगी's picture

15 Jan 2016 - 5:12 pm | सप्तरंगी

अगदी , मलाही हेच आठवले

प्रवास's picture

15 Jan 2016 - 7:46 pm | प्रवास

हलवा करताना पाक हातानेच लावावा लागतो.
मी सुद्धा हातानेच लावलाय.

हाताने लावायचा पाक? दंडवत घ्या. छान दिसतोय हलवा.

हाताने हलवताना थंडीमुळे नाही भाजत हात. माझी आई करून विकायची, आणि तेव्हा मी तिला बय्राऐकी मदत करत असे. रंगीत हलवा करताना त्यावर हळूहळू गडद होत जाणारा रंग मस्त वाटतो.

नीलमोहर's picture

15 Jan 2016 - 5:52 pm | नीलमोहर

छान !!

अनन्न्या's picture

15 Jan 2016 - 5:54 pm | अनन्न्या

साखरेत मळी असते त्याने रंग काळपट येतो, ताक किंवा दुधाबरोबर ही साखरेतली मळी बाजूला होते आणि स्वच्छ पांढरा हलवा तयार होतो.

प्रवास's picture

15 Jan 2016 - 7:49 pm | प्रवास

बरोबर आहे. तसेच असावे म्हणून दूध घालत असावेत.

नूतन सावंत's picture

15 Jan 2016 - 6:03 pm | नूतन सावंत

हलवा आवडला.मिपावर स्वागत.

मस्त पाककृती आणि मिपावर स्वागत आहे. हलवा करताना तो रुमालाने हलवतात असेही पाहिलेय, काटा मोडू नये म्हणून.

बादवे, आजचं 'ढिंगटांग' कोणी वाचलंय का? आवर्जून वाचा.

करुन बघायचा जाम मोह होतोय, पसरट भांडं म्हण्जे एखादा तवा वैगरे चालेल का?

पसरट म्हणजे परातीसारखे भांडे ज्याला काठ आहेत. जेणेकरून आपल्याला हात घालून तिळगुळ हलवता येतील पण हलवताना बाहेर सांडणार नाहीत.
मी sauce pan वापरला होता.

विवेकपटाईत's picture

15 Jan 2016 - 8:35 pm | विवेकपटाईत

आमची आहे पूर्वी अर्थात ४० एक वर्ष आधी हिवाळ्यात रात्री शेकोटी वर करायची. आम्ही मुले हि चारी बाजूला बसून उब घेत असू. नंतर शेकोटी गेली आणि काल हि बदलला. जुनी आठवण ताजी झाली.

बहुगुणी's picture

15 Jan 2016 - 9:57 pm | बहुगुणी

लेख आवडला. धन्यवाद!

स्मिता_१३'s picture

16 Jan 2016 - 5:49 pm | स्मिता_१३

हलवा आवडला

उगा काहितरीच's picture

17 Jan 2016 - 1:44 pm | उगा काहितरीच

एवढा जिकीरीचा पदार्थ बाजारात बऱ्यापैकी कमी किमतीला कसा काय मिळतो ? मोठ्या प्रमाणावर करायची काहितरी ट्रिक असावी रच्याकने कृती अन् फोटो छान आहेतच . हेवेसांनलगे !

दिपक.कुवेत's picture

17 Jan 2016 - 6:19 pm | दिपक.कुवेत

एवढे हाल होतात हलवा करताना. मी ईथुनच दंडवत घालतो तुम्हाला.

प्रवास's picture

17 Jan 2016 - 10:36 pm | प्रवास

प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद !!!!