शाळेत गणवेष असावा की नसावा?

लिखाळ's picture
लिखाळ in काथ्याकूट
11 Sep 2008 - 8:17 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
शाळेत (काही अपवादात्मक कॉलेजातसुद्धा) जाणार्‍या विद्यार्थ्यांना गणवेष असावा का? असा माझा प्रश्न आहे.

गणवेषाची गरज नक्की काय असते? समुहभावना ही गणवेषामुळे तयार होते असे काही जण म्हणतात तर ते आपल्याला कितपत योग्य वाटते? मुले घरात असताना, इतर वेळी मित्रांसोबत खेळताना वेगवेगळ्या कपड्यात असूनही समुहभावात असतात. तसेच कुठे सहलीला गेली (शाळेबाहेरील मित्रांसोबत तर तेव्हा सुद्धा समुहभावानेच असतात. मग शालेय जीवनात गणवेषाला महत्व द्यावे का? समुहभाव हा मुद्दा असेल तर तो कसा तयार होतो हा सुद्धा उहापोहाचा चांगला आयाम ठरेल.
(खेळाडु, कंपनीतले कामगार, सैनिक यांचे सुद्धा गणवेष असतात. पण मला प्रामुख्याने लहान मुले आणि त्यांची मानसिकता याबद्दल बोलायचे आहे.)

गणवेषामुळे एक तर्‍हेची बांधिलकी मुलावर येते असे मला वाटते. लहानवयापासून एका चाकोरित राहण्याची, चौकटीमध्येच वावरण्याची वृत्ती तयार करायला गणवेष हातभार लावतो असे मला वाटते. महाविद्यालयात गेल्यावर गणवेष नसतो (अपवाद वगळुन) तर तेव्हा आपण स्वतंत्र आहोत अशी भावना माझ्या तरी मनात येत असे. शाळेत त्या एकसारख्या कपड्यात सर्वांना रोज पाहून मला तरी आपण कोंडवाड्यात सक्तीने आहोत असेच वाटत असे. कपड्यांचा आणि अश्या स्वतंत्र-परतंत्र वाटण्याचा संबंध आहे असे तुम्हास वाटते का?

गणवेष संबंधी आपले मत काय? का? ते जरूर लिहा.

शाळेच्या सहलीत हरवलेले मुल शोधणे आणि दहावीतली शाळेतून पळून जाणारी मुले टिपणे या व्यतिरिक्त गणवेषाचा उपयोग काय ! :)

--लिखाळ.
या आधी वरील प्रस्तावात गणवेष शेंडीफोड्या श वापरुन लिहिले होते. ते चूक आहे हे काहिंनी लक्षात आणुन दिले त्यानुसार संपादन केले आहे. आभार -लिखाळ.

प्रतिक्रिया

विकास's picture

11 Sep 2008 - 9:30 pm | विकास

अमेरिकन पब्लीक स्कूल्स मध्ये गणवेष नसतो. पण जे काही थोडेफार लांबून पाहीले आहे ते बघता मुलंमुली जसजशी मोठी होत जातात तसे त्यांचे पोषाखपण मग काहीच्या काही होवू लागतात, तसेच त्यातून 'पिअर प्रेशर" वाढू लागते. लहान मुलांच्या बाबतीत व्यावहारीक पातळीवर अनुभव घेताना पाहीले तर लक्षात येते की दरोज वेगवेगळे कपडे देण्यापेक्षा गणवेष कधीपण सोयीस्कर असतो.

चाकोरीची सवय ही गणवेषापेक्षा शिक्षणपद्धतीत आहे असे वाटते. - तुर्तास इतकेच :-)

अनामिक's picture

11 Sep 2008 - 10:43 pm | अनामिक

मला वाटतं समुहभावनेपेक्षा समानतेची भावना गणवेशामुळे रुजू होते. शाळेत हे अधिक महत्वाचे असावे असे माझे मत आहे. गणवेशामुळे कोण श्रीमंत, कोण गरीब हा भेद बर्‍याच प्रमाणात दुर होतो. लहान वयात आपल्यापेक्षा श्रीमंत मुलाजवळ असलेल्या गोष्टींचा हेवा वाटणे सहाजीक आहे. कुणी कितीही श्रीमंत असला तरी शाळेतमात्र गणवेशामुळे सगळे समान पातळीवर येतात. गणवेशाने माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं असं मला कधीच वाटलं नाही. अन चाकोरीत रहायचच नसेल तर शाळेच्या वेळा तरी का पाळा, नको ती भानगड, नको ते दररोज १० ते ५ चं शाळेच बंधन... अन कॉलेजात गेल्यावर गणवेश जातो, पण वेळेच बंधन तर असतच ना?

यशोधरा's picture

11 Sep 2008 - 10:41 pm | यशोधरा

अनामिक यांनी मांडलेल्या मताशी सहमत.

प्रियाली's picture

11 Sep 2008 - 10:54 pm | प्रियाली

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर बरेचसे अवलंबून आहे. ज्या शाळेत श्रीमंत आणि गरीब विद्यार्थी एकत्र शिकत असतील तेथे गणवेश नसल्यास लहानसहान गोष्टींवरून स्पर्धा निर्माण होऊ शकेल आणि याचा भुर्दंड गरीब पालकांना पडेल आणि छानछौकीच्या गोष्टी विकत घेणे शक्य झाले नाही तर विद्यार्थी खट्टू होईल.

जिथे श्रीमंती आणि गरीबीतील तफावत मोठी आहे तिथे गणवेश असावा असेच मी म्हणेन. जिथे अशी तफावत कमी असेल तिथे फारसा फरक पडू नये.

अमेरिकेत बर्‍याचशा शाळांत गणवेश नाही हे खरे असले तरी गणवेश असणार्‍या पब्लिक स्कूल्सही आहेत. येथील गणवेश विविधप्रकारे निश्चित केले जातात. जसे,

एका शाळेत मुलांना लाल, निळे आणि खाकी कपडे वापरण्याची मुभा आहे. परंतु हे कपडे गणवेशासारखेच दिसायला हवे. मुलींना पिनो किंवा पँट आणि मुलांना अर्धी किंवा पूर्ण पँट आणि सफेत शर्ट.

दुसर्‍या शाळेत कपड्यांवर पाबंदी नव्हती परंतु मुलांनी कोणतेही ब्रँडेड कपडे वापरू नयेत अशी सूचना होती.

गणवेशाने चौकटीत वावरण्याची वृत्ती होत असेल असा विचार चटकन पटला नाही. वर विकास म्हणतात तसे, गणवेश लहान पोरांसाठी व्यावहारिक वाटतो.

माझ्या मुलीच्या आताच्या शाळेत अशी कोणतीही पाबंदी नाही. परंतु तोकडे कपडे वापरता येत नाहीत, टोप्या वापरता येत नाहीत. अर्थात, याचा गणवेशाशी संबंध नाही. ;) आणि गणवेश नसल्याने आणि दर तीन महिन्यांत उंची वाढत असल्याने आमच्या खर्चाचा आकडा उगीच फुगत असतो.

(त्रस्त पालक)प्रियाली

विकास's picture

12 Sep 2008 - 1:24 am | विकास

माझ्या मुलीच्या आताच्या शाळेत अशी कोणतीही पाबंदी नाही. परंतु तोकडे कपडे वापरता येत नाहीत, टोप्या वापरता येत नाहीत.

आमच्याकडेदेखील तेच आहे. तोकड्या कपड्यांची कंडीशन माहीत नाही, पण किमान प्राथमिक/माध्यमिक शाळेत कोणी घालताना दिसले तरी नाही #:S टोप्यांच्या बंदीबरोबर (विशेष करून मुलांसाठी) हूड असलेले स्वेटशर्ट घालायची पण बंदी आहे.

रेवती's picture

12 Sep 2008 - 12:06 am | रेवती

माझ्या मुलाच्या शाळेत गणवेषाची सक्ती नाही.एखादे वर्ष बरेही वाटले. मुले लहान असताना हौसही असते वेगवेगळे कपडे खरेदी करण्याची. नंतर मात्र कपड्याच्या वाढत्या किमती हा विचार करण्याचा विषय होऊन बसतो. दर दोन चार महीन्यांनी शॉपिंग असतेच कपड्यांचे (सुदैवाने आई आणेल ते कपडे चालतात माझ्या लेकाला अजूनतरी, नाहीतर हेच हवे तेच हवे असे नंतर चालू होते, ही ऐकिव माहिती). काही शर्टस् मापात असतात तर काही पँट्स. मग परत खरेदीच्या फेर्‍या. चपला, बूटांच्या खरेद्या हवामानाप्रमाणे नेहमी चालू. त्यापेक्षा गणवेष असावा व त्यावर फार विचार करायची वेळ येऊ नये असे वाटते. फार तर महीना पंधरादिवसातून एकदा इतर कपडे घालण्याची मुभा असावी. केस मोठे असल्यास बांधायची सक्ती असावी, नाहीतर डोळ्यावर असलेल्या झिपर्‍यातून (मुलांनाही असतात मोठे केस) कसे काय दिसते कोणास ठाऊक?

रेवती

देवदत्त's picture

12 Sep 2008 - 12:15 am | देवदत्त

माझ्या मते गणवेष (श की ष?) असावा.
सविस्तर उद्या लिहिन.

ऋषिकेश's picture

12 Sep 2008 - 12:26 am | ऋषिकेश

मुलांचे लक्ष शालेय अभ्यासा वरून इतरत्र भटकू नये तसेच सगळ्यांना सारखीच वागणूक मिळावी यासाठी गणवेश हे साधन उपयुक्त आहे असे वाटते.
इयत्ता दुसरीमधे एक नव्या गणवेशातील मुलगा केवळ तो माझा गणवेश जुना असल्याने चिडवत होता म्हणून मी मुद्दामहून शाई उडवली होती ते आठवले ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 12:53 am | विसोबा खेचर

गणवेश संबंधी आपले मत काय? का? ते जरूर लिहा.

शाळेत गणवेष हा हवाच! माझ्या मते तो खूप महत्वाचा आहे!

आपला,
(खाकी अर्धी चड्डी अणि पांढरा शर्ट असा गणवेष असणारा)
तात्या अभ्यंकर,
इयत्ता दहावी - ड , मो ह विद्यालय, ठाणे.

संदीप चित्रे's picture

12 Sep 2008 - 2:19 am | संदीप चित्रे

आई-वडिलांचा खर्च खूप कमी होतो :)

वैशाली हसमनीस's picture

12 Sep 2008 - 12:12 pm | वैशाली हसमनीस

शाळा व कॉलेजेसमधून गणवेष सक्तीचा असावा असे मला वाटते.त्यामुळे एकसंधत्वाची भावना निर्माण होते व समानता वाढ्ण्यास मदत होते.आणि मुख्य म्हणजे एक प्रकारची शिस्त लागते.सैन्यातही गणवेष असण्याचे हेही एक कारण असू शकते.दुसरे म्हणजे एक शिक्षक म्हणून माझा अनुभव असा की सहलीला,मेळावे इ.ठिकाणी गणवेषामुळे आपले विद्यार्थी ओळखणे सोपे जाते.अनेकवेळा शाळा चुकवून बाहेर भटकणारी मुले केवळ गणवेषामुळे ओळ्खून काढण्याचे अनेक अनुभव मजजवळ आहेत.(सगळे सांगणे येथे उचित ठरणार नाही.)

सुनील's picture

12 Sep 2008 - 12:25 pm | सुनील

अनेकवेळा शाळा चुकवून बाहेर भटकणारी मुले केवळ गणवेषामुळे ओळ्खून काढण्याचे अनेक अनुभव मजजवळ आहेत

अजून एक उदाहरण. आसपास शोधा, म्हणजे सापडेल!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

12 Sep 2008 - 12:13 pm | मनस्वी

गणवेश असावाच.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2008 - 12:27 pm | स्वाती दिनेश

शाळेत गणवेष हवाच.एकसंघत्वाची भावना तर आहेच पण कुमारवयात आरशासमोर जरुरीपेक्षा जास्त वेळ रेंगाळणे, अभ्यासापेक्षा आपल्या आणि मित्रमैत्रिणींच्या कपड्यांमध्येच जास्त लक्ष गुंतून फ्याशनवरच्या चर्चा करणे आणि नवनव्या कपड्यांवर आणि चपलाबूटांवर पालकांच्या पैशाचा चुराडा करणे ह्यासारख्या गोष्टींना थोडा आळा बसतो.
स्वाती

जैनाचं कार्ट's picture

12 Sep 2008 - 12:30 pm | जैनाचं कार्ट (not verified)

शाळेत गणवेष नसावा ह्या मताचा मी आहे !

एकसंघत्वाची भावना तर आहेच पण कुमारवयात आरशासमोर जरुरीपेक्षा जास्त वेळ रेंगाळणे, अभ्यासापेक्षा आपल्या आणि मित्रमैत्रिणींच्या कपड्यांमध्येच जास्त लक्ष गुंतून फ्याशनवरच्या चर्चा करणे आणि नवनव्या कपड्यांवर आणि चपलाबूटांवर पालकांच्या पैशाचा चुराडा करणे ह्यासारख्या गोष्टींना थोडा आळा बसतो.

ह्याच्या शी मात्र १००% सहमत आहे मी !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सहज's picture

12 Sep 2008 - 12:45 pm | सहज

गणवेश असावा. तो देखील सर्व मुलांना [गरीब किंवा श्रीमंत] अतिशय स्वस्त दरात व उत्तम प्रतीचा.

अवांतर मत - जमल्यास दोन, तीन वेगवेगळे [प्रकार / रंग] गणवेश असावे, जसे सफेद, नीळा, इ. प्लेन रंगाचे [डिझाइन नाही] अर्ध्या बाह्या किंवा पूर्ण लांब हाताचे, अर्धी किंवा लांब चड्डी जिथे शाळा तिथल्या हवामानावर अवलंबून असल्यास उत्तम. शालेय शिक्षणाची सर्व वर्षे एकाच रंगाच्या, प्रकारच्या गणवेशात नको. अर्थात एका दिवशी एकाच रंगाचा गणवेश एका वर्गाला असल्यास शिक्षकांना पोर सांभाळायला सोयिस्कर.

लिखाळ's picture

12 Sep 2008 - 3:56 pm | लिखाळ

चर्चेत सहभागाबद्दल सर्वांचे आभार.

आपण मांडलेल्या मतांमध्ये पुढील काही मते ठळकपणे समोर आली.
१. अर्थिक समानता भासवणे. ज्यामुळे कुणाला गंड येणार नाही. -
मला हा मुद्दा थोडा पटला. पण वह्या, पुस्तके, दप्तर, डब्यातले पदार्थ, आणि गप्पा (माझ्या काकांनी युएस वरुन चॉकलेट आणले. आम्ही इकडची चॉकलेटे खतच नाही इत्यादी तर्‍हेच्या) या वरुन अर्थिक-सामाजिक स्तर शालेय जीवनात आपओआपच मनात ठसत असतात आणि साधाराण कुणाच्या शेजारी कुणी बसावे याची निवड असल्यास त्यानुसार वागणे सुद्धा होते. तसेच गणवेष एकाच प्रतिचे जर पुरवले गेले नसतील तर गणवेषाच्या स्थितीकडे आणि प्रतिकडे पाहून सुद्धा मुलांना अर्थिक स्तर समजत असावेत. त्यामुळे समानता ठेवून गंड कमी करणे हा उद्देश फार सफल होत असेल असे वाटत नाही.

>>इयत्ता दुसरीमधे एक नव्या गणवेशातील मुलगा केवळ तो माझा गणवेश जुना असल्याने चिडवत होता म्हणून मी मुद्दामहून शाई उडवली होती ते आठवले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश<<
ही प्रतिक्रिया काय सांगते ? मजा सोडुन द्या. (ऋषिकेश व्यक्तिगत घेउ नका) पण काही पालक प्रत्येक वर्षी नवे कपडे घेउ शकत नाहित तर काही घेउ शकतात. मग सामनतेचे काय करावे बरे? (उत्तम प्रतिचे गणवेष वाटप किती शाळा करु शकतात?)

२. पालाकांना खर्चाचा बोजा कमी - हा मुद्दा चांगला आहे. पालकांच्या दृष्टीने व्यवहार्य असावा.

३. मुलांचे छानछोकीकडे लक्ष जाउ नये - हा मुद्दा सुद्धा योग्य वाटतो. नट्टापट्टा करण्याची हौस भागवण्यासाठी त्यामुळे अंगावर कमी जागा राहते :) . लक्ष विचलित होत नाही. हेखरे. आणि तसेही ज्या वयात खेळायचे, मजा करायची आणि थोडे शिक्षण घ्यायचे त्या वयात स्पर्धा डोळ्यासमोर ठेउन चार भिंतीत बसवून ठेवणारी शिक्षणपद्धती मुलांना वेगळी मोकळीक ती काय देणार !

४. शिस्त ! - या बाबात दुमत आहे म्हणूनच चर्चेचा प्रस्ताव. चौकटीमध्ये कोंडणे, व्यक्तीसाठी मोकळीक न ठेवणे, चाकोरीमध्ये कोंबणे आणि 'तसा विचार करणे हेच योग्य आहे' असे मुलांवर पिढ्यानपिढ्या बिंबवणे याचे गणवेष हे एक प्रतिक वाटते.

मुलांना शोधायचे असेल त्यांच्या खिशात रेडिओ ट्रान्समिटर द्या.. गणवेष हा काही उपाय वाटत नाही :) (ह.घ्या.)

शाळा कश्या असाव्यात असाच चर्चा विषय जास्त योग्य ठरेल. सगळी सुरुवात तर तेथेच आहे. त्यातूनच मोठ्या झालेल्या लोकांनीच पुढे गणवेष, समानता या कल्पना आणलेल्या असणार.

-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2008 - 4:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाळेत तर गणवेश असावाच.
त्याबरोबर तो उच्च शिक्षण संपवेपर्यंत गणवेशातच असावा ,एकात्मकता ही गोष्ट आम्हाला महत्वाची वाटते.

केशवसुमार's picture

12 Sep 2008 - 9:19 pm | केशवसुमार

लिखाळशेठ,
गणवेष असावा! सहमत आहे.
एकसंघत्वाची भावना आणि शिस्त हेच म्हणतो..
माझ्या मित्राचा पुण्यातील रजनिश आश्रमातला अनुभव इथे सांगावासा वाटतो..
तो जेव्हा रजनीश आश्रमात ध्यान शिकण्यासाठी गेला, तेव्हा सगळ्यांना तिथली कफनी घालायला लावली.. तुमची जात/धर्म/समाजातली पत/पैसा इ.इ. ह्या कशाची ही आपल्याला जाणीव होईल अशी कुठली ही वस्तू वापरण्यास तीथे बंदी आहे..त्यासाठी ते सर्वांना एकसारखी (रंग/पोत/कापड)कफनी देतात..पहिले काही तास लोकांना त्याचा त्रास झाला पण थोड्याच वेळात सगळे त्या वातावरणाशी एकरूप झाले..एक वेगळीच सांघिक भावना तेथे निर्माण झाली.
यावरून असे वाटते की शाळेत / सैन्यात / काही करखान्यात गणवेष ठेवण्या मागचे एकता/समानता एक मुख्यकारण असावे.
(गणवेष आवडणारा) केशवसुमार
स्वगतः आजकाल कॉलेज मधे गणवेष सोडा निदान अंगभर कपडे घाला अस सांगायची वेळ आली अहे.. #:S
रंग्याला विचारायला हवं विडंबनकारांना गणवेष असावा का?

लिखाळ's picture

12 Sep 2008 - 9:27 pm | लिखाळ

गणवेषाच्या बाजुनेच जास्त मते आहेत असे दिसते. म्हणजे जगातल्या काही व्यवस्था बहुसंख्यांना पटत देखील असतात तर ! :)

कॉलेजात कपडे घालणे हीच समानतेची पातळी असावी ;)

>>रंग्याला विचारायला हवं विडंबनकारांना गणवेष असावा का?<<
विडंबन वाचणार्‍यांनासुद्धा गणवेष द्या आता :)
-- (शाळेत गणवेष नसावा या मताचा) लिखाळ.

म्हणजे गणवेष!
वयाच्या ४-५ वर्षापासून साधारण१०-११ वर्षांपर्यंत (म्हणजे साधारण बालवाडी ते ५ वी पर्यंत) गणवेष नसावा. त्यानंतर मात्र असावा असं मला वाटतं.
एकतर लहानपणी मुलं वेगवेगळ्या रंगीबेरंगी कपड्यात बघायला छान वाटतात. आई-वडिलांचीही हौस होते. (खर्च असतो पण हौस मुलांची नाही तर कोणाची करायची!)
एकदा समजत्या वयाकडे सरकू लागली की मुला-मुलींना शिंगं फुटू लागतात आणि त्यावेळी एका दोरीत आणायला गणवेषाचा उपयोग काही अंशी तरी होतो असे मला वाटते.
आठवड्यातून एक दिवस गणवेषाला सुट्टी द्यावी म्हणजे मुलांनाही जरा मोकळीक आणि थोडे वेगळेपण.
माझा मुलगा माँटेसरीमधे जातो खाजगी शाळा आहे. तिथे गणवेष नाहीये. त्या शाळेचा एकूण ढाचाच पब्लिक स्कूलपेक्षा वेगळा आहे.

(विडंबनकारांना गणवेष असावा असे वाटते. ज्या कवितांचा पाककृतींसाठी वापर केला आहे त्या मूळ कविता आणि त्यांचे विडंबन ह्यांचे कोलाज प्रिंट असलेले शर्ट घालावेत. म्हणजे गणवेष म्हणाल तर आहे आणि म्हणाल तर नाही कारण प्रत्येकाचा कच्चा माल वेगळा! लांबून सुद्धा आपल्यातला 'गण्या' आला रे असं ओळखायला बरं! ;) निवृत्त विडंबकांनी तशाच प्रकारच्या चड्ड्या घालाव्यात म्हणजे ओळख पटेल! :D
आणि विडंबन वाचणार्‍यांना दोन प्रकारचे गणवेष द्यावे लागतील - प्रतिक्रिया देणार्‍यांना :)) किंवा =)) अशा स्माईलींचा आणि वाचूनही प्रतिक्रिया न देणार्‍यांना L) असा!)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2008 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विडंबनकाराला कोलाज प्रिंट असलेला शर्ट
आणि मुळ कवीला पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी :)

खुद के साथ बाता : चतुरंगाचे प्रतिसाद मस्तच असतात

चतुरंग's picture

12 Sep 2008 - 11:17 pm | चतुरंग

अहो तुम्ही आमच्या गुर्जींची पंचाईत करताय! :T
त्यांनी स्वत:च्याच काही कवितांचे विडंबन केले आहे त्यामुळे त्यांच्या शर्ट पूर्ण पांढरा आणि चड्डी अर्धी खाकी व अर्धी कोलाज अशी ठेवावी लागेल! :O

(खुद के साथ बातां : बरं झालं रंग्या तू कविता करत नाहीस ते, थेट विडंबनंच बरी! B) )

चतुरंग

लिखाळ's picture

12 Sep 2008 - 10:01 pm | लिखाळ

>>वयाच्या ४-५ वर्षापासून साधारण१०-११ वर्षांपर्यंत (म्हणजे साधारण बालवाडी ते ५ वी पर्यंत) गणवेष नसावा.<<
वा वा..
>>आठवड्यातून एक दिवस गणवेषाला सुट्टी द्यावी म्हणजे मुलांनाही जरा मोकळीक आणि थोडे वेगळेपण.<<
ह्म्म मोकळीक गणवेषाने जाते असेच सुचावये आहे ना ! मी तेच म्हणतो हो !

विडंबकांचे गणवेष फारच उत्तम आहेत. मजा आली.
>>निवृत्त विडंबकांनी तशाच प्रकारच्या चड्ड्या घालाव्यात म्हणजे ओळख पटेल! <<
बरं बरं आजच निरोप पोहोचवतो :)

--लिखाळ.

सर्वसाक्षी's picture

12 Sep 2008 - 11:06 pm | सर्वसाक्षी

नोकरीत देखिल गणवेश असावा (आणि तो मालकाने द्यावा)

धनंजय's picture

13 Sep 2008 - 2:34 am | धनंजय

मला बालवाडी-१०वी गणवेष होता, ११-१२वी नव्हता, कॉलेजमध्ये गणवेष होता.

११-१२वीत काही कमी गण-भाव वाटला नाही, आणि कॉलेजात काही फार गण-भाव वाटला नाही. त्यामुळे माझे "मूलभूत" असे कुठलेच मत नाही. वर प्रियाली आणि विकास म्हणातात तितपत वेष-संहिता असली तरी पुरे, असे वाटते.

पण तरी मला गणवेष तसा आवडायचा. त्याचे कारण माझा "फॅशन सेन्स" नगण्य आहे. ११वी-१२वीत मित्र मला दिवसभर गबाळा म्हणत, आणि कॉलेजमध्ये वर्गाबाहेत भेटत असू तेचा मित्र गबाळा म्हणत.