हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते. गेल्या रविवारी भाजी स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली. साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला. त्याचीच कृती खाली देत आहे.
साहित्य: निवडलेले मटार २ वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर -अर्धा वाटी, हिरवी मिरची -२-४ (इच्छेनुसार), तिखट २-३ छोटे चमचे, जिरेपूड १ छोटा चमचा,, मिरे पूड १ छोटा चमचा, हळद १ छोटा चमचा आणि चाट मसाला (१ मोठा चमचा ) [चाट मसाला टाकला कि इतर मसाले टाकायची आवश्यकता नसते आणिक स्वाद हि मस्त येतो], मीठ स्वादानुसार [ चाट मसाल्यात हि मीठ असते, हे लक्षात ठेवावे]. तेल २ चमचे.
कणिक चार वाटी परांठ्यांसाठी आणि देसी तूप किंवा तेल परांठ्यांना लावण्यासाठी.
कृती: गॅसवर कढई ठेऊन २ चमचे तेल घालून, त्यात मटार आणि हिरवी मिरची परतून, २ मिनिटासाठी झाकण ठेऊन एक वाफ काढून घ्यावी. नंतर थंड झाल्यावर मटार मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. बारीक वाटलेल्या मटार मध्ये तिखट, जिरे, मिरे पूड, हळद , चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालून मिश्रण एकजीव करून परांठ्यांत भरण्यासाठी गोळे मळून घ्यावे.
आता मळलेल्या कणकीची पारी बनवून त्यात त्यात वरील मिश्रणाचे गोळे भरून परांठा लाटून, तव्यावर चारीबाजूने तूप सोडून खरपूस भाजून घ्यावे.
ज्याना तूप कमी खायचे असेल त्यांच्या साठी - तव्यावर पोळीसारखा परांठा भाजून नंतर गर्मागरम परांठ्यावर थोडे तूप लाऊन गर्मागरम परांठा वाढवा.
टीप: तुपा एवजी तेल हि वापरू शकतात.
हा परांठा दही आणि हिरव्या चटणी सोबत मस्त लागतो. सौ. ने दही आणि आवळ्याच्या हिरव्या चटणी सोबत परांठा वाढला.
प्रतिक्रिया
25 Dec 2015 - 11:44 am | पियुशा
यम्मी दिसतोय पराठा :)
25 Dec 2015 - 1:08 pm | उगा काहितरीच
मस्त आणि सोप्पा !
25 Dec 2015 - 1:18 pm | मनीषा
छान आहे पाककृती ...
25 Dec 2015 - 3:53 pm | पद्मावति
वॉव...मस्तं दिसतोय पराठा. छान पाककृती.
25 Dec 2015 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा!
25 Dec 2015 - 6:50 pm | Maharani
तोंपासु..
25 Dec 2015 - 6:59 pm | अजया
छान पाकृ. करुन पाहीन.
25 Dec 2015 - 11:37 pm | नूतन सावंत
झकास दिसतोय पराठा.आयता मिळाला तर अजूनच झक्कास
26 Dec 2015 - 3:43 am | रेवती
मस्त पाकृ व फोटू. पराठ्यांचा फोटू व मटारच्या पदार्थांची नावे वाचून दिल्लीकरांचा या सिझनसाठी हेवा वाटला (उन्हाळ्यात भाज्या मिळत नसल्याने त्या सिझनसाठी वाटणार नाही). ;)
26 Dec 2015 - 8:00 am | यशोधरा
मत्त! मत्त!
26 Dec 2015 - 8:44 am | पिंगू
मस्त पोटभरीचा नाश्ता..
थोडीशी उपयुक्त माहिती सर्वांसाठी:
मटारच्या सीझन मध्ये मंडईत जेंव्हा मुबलक मटार अतिशय स्वस्त उपलब्ध असतो तेंव्हा एकदम ५-१० किलो रसरशीत असा सिमला मटार खरेदी करून आणावा. तो वर्षभर टिकावा म्हणून त्यावर फ्रोजन पद्धतीची प्रक्रिया करून जर तो प्लॅस्टिकच्या दुधाच्या २५० मी.ली. पिशव्यात हवाबंद करून फ्रीजच्या डीप-फ्रीज कप्प्यात मध्ये ठेवला तर वर्षभर छान टिकतो. जेंव्हा हवा असे तेंव्हा एकावेळी एक २५० मी.ली.चे पाकीट वापरासाठी काढले तर त्यातील लागेल तेव्हढा ताजा (फ्रेश) मटार वापरता येतो व उरलेला मटार पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास २-४ दिवस छान रहातो.
मटार वर्षभर टिकवण्यासाठी त्याच्यावर जी फ्रोजन प्रक्रिया करतात ती खाली देत आहे.
कृती : मंडईतून आणलेला सिमला मटार सोलून त्यातील टपोरे मोठे एकाच मापाचे दाणे निवडून घ्यावेत. फार कोवळे,किडके,किंवा अर्धवट कुरतडललेले,खूप लहान,पोचट दाणे,अळीने भोके पाडलेले दाणे घेऊन नयेत. दाण्याला असलेले कोंब काढून टाकावेत. व निवडलेले दाणे पाखडून घ्यावेत.
गॅसवर एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात हे निवडून घेतलेले मोठे एकाच आकारातले टपोरे मटारचे दाणे घालून २-३ मिनिटे खळखळून उकलण घेऊन नंतर चाळणीवर उपसून निथळत ठेवावेत. आता दुसर्याे एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात बर्फाचे थंड पाणी घ्यावे व त्यात ते मटारचे दाणे घालून दोन मिनिटांनी चाळणीवर उपसून पाणी काढून टाकावे व एका सूती राजापुरी पंचावर पसरून पूर्ण कोरडे करून घ्यावेत.
2-3 मोठ्या प्प्लस्टिकच्या पिशव्यां ऐवजी दुधाच्या २५० मी.ली. च्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशव्यात हे कोरडे झालेले मटारचे दाणे भरून मेणबत्तीवर प्लॅस्टिकच्या पिशव्या सील कराव्या आणि फ्रीजच्या डीप-फ्रीज कप्यात ठेवाव्यात. वर्षभर हा मटार छान टिकतो व आपणास हवा तेंव्हा ताजा मटार मिळू शकतो.
टीप : याच पद्धतीने आपण गाजर,फरसबी (श्रावण घेवडा) ,मक्याचे दाणे,फ्लॉवर इत्यादी भाज्या सुद्धा साठवून ठेऊ शकता.
कॉपी पेस्ट
26 Dec 2015 - 9:27 am | नाखु
ही आयडीया भारी म्हंजे लै भारी !!
प्र. मात्र (भाजीपाला गवार) नाखु
26 Dec 2015 - 9:33 am | यशोधरा
असंच करुन ठेवते मी.
30 Dec 2015 - 9:41 pm | रेवती
किती दिवस मटार अशा पद्धतीने टिकले?
मी एकदा केले होते व ते तीन महिन्यात खराब झाले, म्हणजे बुळबुळीत झाले. टाकून दिले.
30 Dec 2015 - 8:51 pm | सूड
हे भारी
26 Dec 2015 - 10:53 am | नूतन सावंत
मी पूर्वी असे साठवून ठेवत असे.आता फक्त सोलून हवाबंद फूड ग्रेड डब्यात ठेवते.प्रत्येक वेळी लागेल तसे हवे तेवढेच बाहेर काढते
30 Dec 2015 - 4:25 pm | नितिन नितिन
मस्त अनि फस्त
30 Dec 2015 - 8:48 pm | सूड
पाच किलो? असो. पराठे आवडले.
31 Dec 2015 - 12:39 pm | मुक्त विहारि
एकदा करून बघायला पाहिजे.