पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in काथ्याकूट
11 Sep 2008 - 2:03 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच. तर करू या सुरुवात.
========================================================================
पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोषआजचा आपला विषय आहे, पं. श्री. पन्नालाल घोष यांच्याविषयी.

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष. एक अतिशय प्रतिभावान कलाकार. प्रतिभावान अश्यासाठी की पन्नालालजींना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता. पन्नालालजींचा जन्म आताच्या बांगलादेशातल्या बारीसाल ह्या गावी झाला. त्यांच्या जन्माबद्दल बरीच गडबड आहे असं खुद्द पन्नालालजी सांगायचे. पण इतिहासकारांनी ज्या तारखा सांगण्यात आल्या त्यातील ३१ जुलै हा दिनांक व १९११ हे वर्ष ठरवलं. पन्नालालजींचा जन्म सांगितीक घरातच झाला. त्यांचे आजोबा हरिकुमार घोष हे प्रख्यात धृपदिये व पखवाज वादक होते. पन्नाबाबुंनी स्वरांचे काही ज्ञान आजोबांकडुन लहानपणीच घेतलं होतं. पन्नाबाबुंचे वडिल अक्षयकुमार घोष हे प्रख्यात सितारिये होते. त्यांनी ढाक्याचे प्रख्यात सतार वादक गुरु भगवान चंद्रदास ह्यांच्याकडून विद्या मिळवली होती. पन्नाबाबुंची आई सुकुमारी ह्या प्रख्यात गायिका होत्या तर काका भवरंजनजी हे संगीतकार होते.

पन्नाबाबूंबाबत दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पन्नाबाबू ९ वर्षांचे असताना शाळेतून येताना गावाबाहेर पडक्या मंदिरामध्ये एक साधु त्यांना मुरली वाजवताना दिसला. पन्नाबाबूंचं ते ऐकताना भान हरपलं. तो साधु भानावर आला पण पन्नाबाबू तसेच होते. साधुला मोठं कौतूक वाटलं. म्हणुन त्याने मग पन्नाबाबुंना ती बासरी भेट दिली. दुसरी आख्यायिका अशी की पन्नाबाबू गंगेकाठी फिरायला गेले असताना त्यांना गंगेत काहीतरी वहात येताना दिसले. म्हणुन पन्नाबाबूंनी गंगेत बुडी मारुन जाऊन पाहीलं तर ती एक बासरी होती. गंगेचा प्रसाद म्हणुन ती बासरी त्यांनी ठेऊन घेतली आणि तेव्हाच ठरवलं की आता जीवन बासरीसाठी अर्पण करायचं.
पन्नाबाबूंनी ३६ व्या वर्षांपर्यंत स्वतःच रियाज करुन विद्या मिळवली होती. त्यांची प्रतिभाइतकी होती की बडे बडे लोक त्याचवेळी त्यांना ओळखू लागले होते. ह्याचं एक कारण हेही होतं की तोपर्यंत बासरीवादन इतकं मागे पडलं होतं की अभिजात संगीतामध्ये तीचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. पन्नाबाबूंमूळे तिला परत संजिवनी मिळाली आणि लोकांनी पन्नाबाबूंचं बासरीवादन पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली. शिवाय ह्याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पन्नाबाबूंचं उमदं, सात्त्विक, निरहंकारी, प्रेमळ व्यक्तिमत्व कारणीभूत होतं. ते म्हणायचे सुद्धा की आयुष्याच्या उत्तरार्धात ही कला परमेश्वरासाठीच अर्पण करणार.
पन्नाबाबूंना व्यायामाची खूप आवड होती. ते म्हणायचे सुद्धा कलाकारानं नेहमी व्यायामाकडे लक्ष दिले पाहीजे. ते स्वतः लाठीकाठी, बॉक्सिंग व मार्शल आर्टचे खेळाडू व प्रशिक्षक राहिले आहेत.
मंडळी, पन्नालाल घोष हे पहिले शास्त्रीय संगीतकार आहेत की जे १९३८ साली युरोप दौर्‍यासाठी गेले होते. पण जागतिक युद्धामूळे त्यांना दौरा अर्धवट टाकुन परतावे लागले. त्यानंतर १९३६ पासून पन्नाबाबूंनी 'न्यु थिएटर' चे रायचंद्र बोराल यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास यांची बहीण 'पारुल घोष' ह्या पन्नाबाबूंच्या पत्नि होत. चलत/बोलत चित्रपटांच्या त्या पहिल्या गायिका होत.
त्यानंतर पन्नाबाबू मुंबईला स्थायिक झाले व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम करु लागले. मुंबईमध्येच त्यांनी प्रख्यात 'बॉम्बे फिल्म स्टुडियो' मध्ये काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध 'बसंत','आंदोलन','पोलिस' सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.
पन्नाबाबू १९४६ साली पहिल्यांदा प्रसिद्ध सितारवादक उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब यांना भेटले. उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब हे पं. रविशंकर यांचे गुरु. पन्नाबाबूंनी मग खाँसाहेबांना (बाबांना) विनंती केली पण बाबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की तुम्ही आधिच इतके मोठे आहात तुम्हाला गरज नाही. पण पन्नाबाबूंनी पाठपुरावा केल्यावर मानले आणि मग पन्नाबाबूंनी बाबांच्या बरोबर ६ महिने कठोर शिक्षण घेतलं आणि पन्नाबाबूंचं तेज लखलखीत झालं. त्यानंतर पन्नाबाबू दिल्ली आकाशवाणी साठी काम करु लागले. एक खास गोष्ट म्हणजे पन्नाबाबूंवर उस्ताद करीम खाँसाहेब यांचा मोठाच प्रभाव होता.
पन्नाबाबूंनी बरेच प्रयोग केले. ३२ इंच लांबीची लांब बांबूची बासरी बनवून घेतली. त्यांना त्यातुन घनगंभीर स्वर हवे होते. म्हणुन मग पन्नाबाबूंनी बासरीला ७ वे भोक पाडून घेतले व एक नवा अध्याय लिहीला. याशिवाय ६ तारी तानपुरा, तीव्र स्वरांची तानपुरी व सुरपेटी यांचा पण शोध लावला. या व्यतीरिक्त त्यांनी दीपावली, पुष्पचंद्रिका, हंसनारायणी, चंद्रमौळी व आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्युच्या दु:खाने व्यथित होउन तिच्या नावाने तिची आठवण म्हणुन 'नुपुरध्वनी' अश्या रागांची रचना केली. पन्नाबाबूंच्या ज्या संस्मरणीय मैफिली झाल्या त्यातली संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्याबरोबरची एक. त्यावर्षी कलकत्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पं. ओंकारनाथ ठाकुरांबरोबर संयोजकांनी जुगलबंदी ठेवलेली. पण पन्नाबाबूंनी पंडितजींच्या घनगंभीर आवाजाला शोभेल अशी ३६ इंच लांबीची लांब बांबूची बासरी काढली आणि सगळी सभा विस्मयात बुडाली. पण पुढच्याच वेळात पंडितजींच्या बरोबर पन्नाबाबूंची मुरली सुद्धा ताना सही सही घेऊ लागली आणि सगळी सभा आश्चर्याचे एक एक धक्के खाऊ लागली. मैफिलीनंतर खुद्द संगीतमार्तंडांनी पाठीवर शाबासकी देऊन गौरव केलेला. असा हा अजातशत्रु, अतिशय धार्मिक, सात्त्विक, प्रेमळ व लिजंड्री कलाकार २० एप्रिल १९६० ला अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन ह्या विश्वातून निघुन गेला. पण जाताना ह्या दुनियेला बासरी देऊन गेला व अगणित शिष्य परिवार देऊन गेला.

अश्या ह्या मोठ्या कलाकाराला व मोठ्या माणसाला शतशः प्रणाम !!!

आपला
मुकुल.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.

छायाचित्र : जालावरून साभार. पन्नाबाबूंच्या काही चिजा इथे ऐकता येतील.

प्रतिक्रिया

मुशाफिर's picture

11 Sep 2008 - 3:30 am | मुशाफिर

पन्नालाल घोष यांच्याविषयीची माहिती वाचून फार आनंद झाला. माझ्या लहानपणापासून मी त्यांच्या बासरीवादनाचा चाहता आहे. विशेषतः त्यांनी निर्माण केलेला राग चन्द्रमौळी तर फारच सुंदर आहे. तुमच्याकडून अजुन बर्‍याच कलाकारांविषयी वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

मुशाफिर.

घाटावरचे भट's picture

11 Sep 2008 - 5:17 am | घाटावरचे भट

पं. घोषबाबूंच्या अजून काही चिजा इथे ऐकता येतील -
राग हंसनारायणी
दादरा
राग हंसध्वनी
राग सारंग - हा वृंदावनी सारंग आहे (वृंदावनी सारंग हाच मूळ सारंग. मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियां की सारंग, लंकादहन सारंग, बडहंस सारंग वगैरे त्याचे डेरिव्हेटिव्हज आहेत. अधिक माहितीसाठी हे वाचा.)
राग शुद्ध भैरवी
राग भूपाल तोडी
खमाज ठुमरी

पं. घोष यांच्या पूरिया रागाचे पण एक ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे असे कळते. पूरिया रागातील मंद्र निषादापासून निघून थेट मध्य सप्तकातील तीव्र मध्यम गाठणार्‍या 'नी -म्' या मींडमुळे बासरीवादक सहसा या रागाच्या वाटेला जात नाहीत. पण पन्नालाल बाबूंची बातच और आहे. ते ध्वनिमुद्रण मिळाल्यास जरूर टाकीन.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्रमोद देव's picture

11 Sep 2008 - 9:36 am | प्रमोद देव

पन्नालाल घोष ह्यांचे वादन आकाशवाणीवरून भरपूर ऐकलंय पण त्यांच्याबद्दल इतकी माहीती नव्हती. आपल्यामुळे ती मिळाली. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
अवांतर: पन्नालाल घोष हे आमच्या मालाडमध्ये बरीच वर्षे मुक्कामाला होते असे ऐकलंय. मी त्यांना पाहू शकलेलो नाही कारण ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मी केवळ आठ वर्षांचा होतो. मालाडमधल्या(पश्चिम) एका रस्त्याला पन्नालालजींचे नाव दिलेले आहे. आज मी जिथे राहतोय तिथले एक मूळ रहिवासी डॉक्टर चंद्रकांत जोशी हे पन्नालालजींचे शिष्य होते. आज वयाच्या ८५+ वर्षातही ते उत्तम बासरी वाजवतात.

यशोधरा's picture

11 Sep 2008 - 9:58 am | यशोधरा

छान लेख. आवडला.

रामदास's picture

11 Sep 2008 - 10:00 am | रामदास

आपला लेख आवडला.पु.ले.शु.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 11:40 am | विसोबा खेचर

उत्तम लेख....

आम्हाला रघुनाथ सेठ यांची बासरी फार आवडते!

तात्या.

सहज's picture

11 Sep 2008 - 11:48 am | सहज

लेख आवडला.

मुकूल व भट दोघांना दुव्याबद्दल धन्यवाद.

वाटाड्या...'s picture

11 Sep 2008 - 6:20 pm | वाटाड्या...

तात्या, रामदासजी, भट साहेब, देवसाहेब, सहजशेठ, यशोधरा ताई व इतर मित्रांनो आपाल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. मला अपेक्षित होते त्यापेक्षा जास्तच प्रतिक्रिया आल्यात. मला माहित आहे की ह्या लेखाला फारशी प्रतिक्रिया मिळणार नाही. मुळात शास्त्रीय संगीताबद्दल आपल्याच समाजात मोठाच गैरसमज व अनास्था आहे. त्यामुळे नाउमेद होउन चालणार नाही.

पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?

आपलाच,

मुकुल

सर्किट's picture

11 Sep 2008 - 10:01 pm | सर्किट (not verified)

नक्की लिहा !! वाट पाहतो.

-- सर्किट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2008 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नक्की लिहा !! वाट पाहतो.

घाटावरचे भट's picture

12 Sep 2008 - 3:01 am | घाटावरचे भट

नक्कीच लिहा!!!
आणि जमल्यास पं. ओंकारनाथ ठाकुरांपासून सुरुवात करुन विष्णु दिगंबर पलुसकर, कृष्णराव शंकर पंडित, विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, वामनराव पाध्ये, बापूराव पलुसकर आणि अगदीच मागे जायचे झाले तर इचलकरंजीकर बुवांबद्दल पण लिहा...आणि सगळी ग्वाल्हेर सीरिज कव्हर करा. मग बाकीच्या घराण्यांकडे वळा आणि त्यांच्याबद्दलही लिहा...

बस्स!!! एवढंच....लै नाही मगणं...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 10:04 pm | चतुरंग

जवळजवळ सगळीच माहिती नवी होती!
मुकुल, तुम्ही नक्की लिहा. पुढच्या लेखाची वाट पहातोय.
(अजून थोडे विस्ताराने लिहिले तर आणखीन आवडेल.)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 1:36 am | विसोबा खेचर

पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?

आँकारनाथ ठाकूर यांच्या गाण्यात काही ग्रेट गोष्ट आहे असे मला वाटत नाही!

असो, व्यक्तिगत मत. आपला लेख अवश्य येऊ द्या!

आपला,
(ओंकारनाथांच्या गाण्यात काहीही 'राम' न दिसलेला!) तात्या.

प्रमोद देव's picture

11 Sep 2008 - 7:32 pm | प्रमोद देव

पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?

येऊ द्या बिनधास्त.

प्राजु's picture

11 Sep 2008 - 8:11 pm | प्राजु

पन्नाबाबूंचे नाव खरंतर मी प्रथमच ऐकले. इतकी सुंदर माहीती दिली आहेत तुम्ही की, त्यांच्याबद्दल आणखी यापेक्षा वेगळी माहीती कुठे मिळेल असे वाटत नाही.
सुरेख लेख. अभिनंदन. आणि धन्यवाद इतक्या मोठ्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

11 Sep 2008 - 9:28 pm | संदीप चित्रे

'बासरी' हे माझं अतिशय आवडतं वाद्य. पन्नालाल घोष आणि हरिप्रसाद चौरासिया म्हणजे देवस्थानी.
हौस म्हणून बासरी शिकायला सुरूवात केली तेव्हा जाणवलं हे फारच अवघड काम आहे. दिसायला सोपं पण वाजवायला अवघड !
(असाच अनुभव नंतर 'गोल्फ' ह्या खेळाबाबत आला :) टीव्हीवर पाहताना वाटायचं -- त्यात काय अवघड आहे? खेळायला लागल्यावर समजलं की अवघड तर आहेच पण खिशालाही चुना आहे ! शहाण्यासारखा परत गोल्फ टीव्हीवर बघायला लागलो :)

खूप खूप धन्स ह्या लेखासाठी.

वाटाड्या...'s picture

11 Sep 2008 - 10:55 pm | वाटाड्या...

मायबाप मि.पा. कर आणि संगीत रसिक व जाणकार मंडळींनो,

आपला हा सांगितीक वारसा आपण जपणे गरजेचे आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळेच आपल्यासारख्या मित्रांच्या प्रतिक्रियेमुळे थोडा उत्साह वाटला.

शतशः धन्यवाद प्राजु ताई, संदिप शेठ, सर्किट शेठ, डॉ. साहेब आणि चतुरंग जी तुम्हा सगळ्यांना...

जाता जाता, मी तुमच्याएवढाच आहे वयाने. तेव्हा अरे म्हटलं तरी चालेल किंवा तसच असुद्या..

आपलाच,

मुकुल

यशोधरा's picture

11 Sep 2008 - 11:11 pm | यशोधरा

>>पुढचा लेख हा संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्यावर लिहीन असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं?>>

अरे वा! लिहा लवकर! लेखाची वाट बघते.