इथे नास्तिकवादी लेख लिहितो त्या संदर्भातील भूमिका थोडक्यात अशी:
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे
. म्हणून लिहितो. त्यात कुणाला हिणवण्याचा हेतू नसतो. प्रसिद्धीचाही नाही.
"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत." हे जरी सत्य असले तरी याला व्यावहारिक मर्यादा आहेत. माझी क्षमता अगदीच तोकडी, तुटपुंजी आहे. केवळ मराठी भाषेत थोडे-फार लिहू शकतो. महाराष्ट्रातील अनेक दैनिकांना वाचकपत्रे पाठवितो. "आजचा सुधारक "(नागपूर) या मासिकात लेख लिहितो. इंटरनेटवर लिहितो. या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. दुसरे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. एवढेच माझे प्रयत्न.
कोणी म्हणतील ,"प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे श्रद्धा बाळगण्याचे, उपासनेचे घटनादत्त स्वातंत्र्य आहे. त्यांना--फलज्योतिष हे थोतांड आहे. वास्तुदिशाभूल, प्राणिक हीलिंग ही भंपक(स्यूडो) शास्त्रे आहेत. श्रीयंत्रे, रुद्राक्षे या निरुपयोगी वस्तू आहेत. बुवा, बापू, आध्यात्मिक गुरू यांच्यापाशी दैवी शक्ती नसते. मंत्रांत कोणतीही शक्ती सामर्थ्य नसते.--. असे सांगण्याचा तुम्हाला अधिकार काय? " याचे उत्तर वर दिले आहे. माझ्या देशबांधवांच्या सामाजिक आचरणाची (वागण्याची ) चिकित्सा करण्याचा आणि माझ्या दृष्टीने त्यांतील योग्य-अयोग्य काय ते सांगण्याचा अधिकार मला घटनेने दिला आहे. धूम्रपान करणे अवैध नाही. पण शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून धूम्रपान करू नये असे आपण सांगतोच ना? तसेच हे आहे.
वर उल्लेखिलेल्या निरुपयोगी वस्तू खरेदी करणे, तसेच होम-हवन-अभिषेक ,ग्रहशांती, नागबळी विधी इ.कर्मकांडे करणे यामुळे श्रद्धाळूंचा वेळ, ऊर्जा आणि पैसा वाया जातो. भाबड्या भाविकांच्या श्रमा-घामाची कमाई पुरोहितांच्या खिशांत जाते. श्रमिकांची आर्थिक स्थिती सुधारत नाही. प्रगती खुंटते. याची मला खंत वाटते.
काहीजण म्हणतात तुम्ही आमच्या श्रद्धांना हिणवता. त्याने आमच्या भावना दुखावतात. म्हणजे जे लिहिलेले असते ते त्यांच्या बुद्धीला पटते. यात आपल्या मर्मावर नेमके बोट ठेवले आहे हे कळते. हे विधान सत्य मानले पाहिजे असे बुद्धीला वाटते. पण भावना ते सत्य स्वीकारण्यास धजत नाही. बुद्धीपुढे भावना हतबल होते म्हणून ती दुखावते. असे तर नव्हे? (याविषयीं इथे एक लेख लिहिला आहे.)
श्रद्धाळू भाविकांनी वैज्ञानिकांना, बुद्धिप्रामाण्यवाद्यांना, निरीश्वरवाद्यांना कितीही दूषणे दिली, कांहीही म्हटले तरी विवेकवाद्यांना किंचितही वाईट वाटणार नाही. भावना दुखावणे तर दुरापास्तच. कारण त्यांच्या मेंदूत भावनेवर बुद्धीचे सदैव नियंत्रण असते.
................................................................................................
प्रतिक्रिया
23 Nov 2015 - 9:02 pm | संदीप डांगे
तुम्ही चर्चेसाठी तयार आहात?
23 Nov 2015 - 9:04 pm | मयुरMK
नागबळी की नरबळी.
24 Nov 2015 - 8:43 am | योगी९००
त्यांना नारायण नागबळी म्ह्णायचे आहे...!!
23 Nov 2015 - 9:09 pm | भाऊंचे भाऊ
मला तर तुम्ही पक्के श्रध्दाळु वाटता हो. अन हे काय विपरीत स्पश्टीकरण देता ? आँ ?
23 Nov 2015 - 9:09 pm | मांत्रिक
पाहुनी विज्ञानाच्या बला...
जाऊ देत. तुम्हाला खरा वेदांतिक धर्मच कळलेला नाहीये.
कुठे गेला बाहुबली!!!!!!!!!!!!
तोवर चना जोर गरम खात धाग्यावरील गंमत बघूया!!!!
23 Nov 2015 - 9:18 pm | गवि
खोचक नव्हे निव्वळ प्रामाणिक गंभीरपणे प्रश्न:
एकतरी व्यक्ती हे विचार ऐकूनवाचून मूळ ठाम श्रद्धा सोडून वस्तुनिष्ठ विचारांची बनली आहे का?
हो. नक्कीच काही थोड्या व्यक्ती बदलत असतीलही. पण इज ऑल द एफर्ट वर्थव्हाईल?
डज इट रियली वर्क? का इतके पोटतिडकीने मांडत राहता. चिकाटीला सलाम करतो, पण फरक पडतो / पडेल असं वाटतं हे असे विचार आस्तिकांसमोर मांडून? नेमका फायदा काय? अगदी खोटं असलं तरी ते लोकांनी केल्याने काय नुकसान आहे? असे लोक बदलतील असं तुम्हाला का वाटतं? बदलतील म्हणजे प्रयत्नवादी होतील असं वाटतं का? आत्ता हे लोक प्रयत्नवादी नाहीयेत?
बहुसंख्य लोक रुद्राक्ष, वास्तुशास्त्रासहित प्रयत्न करतातच असंच दिसतं. व्हाय स्ट्रिप देम ऑफ ऑफ देअर बिलीफ ?(तुम्हाला तो खोटा आभासी असल्याची खात्री झाली म्हणून?)
23 Nov 2015 - 9:22 pm | मांत्रिक
धन्स गविअण्णा! आम्ही भ्रामक भ्रमवादी नक्कीच नाही. मानवी प्रयत्न नक्कीच करतो. पण जिथे साला त्याच्यायायला आपली चालत नाही तिथे त्या ईश्वराला नक्कीच शरण जातो. पण चनावालांना हेच तर समजेना. उगाच जिल्ब्या पाडून राहिलेत!!
23 Nov 2015 - 9:26 pm | भाऊंचे भाऊ
नेमकं बोललात.
23 Nov 2015 - 9:18 pm | मयुरMK
पुस्तकाचे शिर्षक आणि कोरे पत्र पाठवणाऱ्या चांगदेवाला विश्वाचे ज्ञान देणाऱ्या मुक्ताबाईंचे पुस्तकाच्या प्रारंभी दिलेले छायाचित्र विषय स्पष्ट करते.
लेखक डॉ. आर. एन. शुक्ल यांनी या पुस्तकातून वैश्विक चैतन्यमय उर्जेचे स्वरूप उलगडले आहे. उत्पत्ती, स्थिती, लय यामागची शक्ती कोणती असते, त्याचे विज्ञान काय आहे, याचा मागोवा त्यांनी घेतला आहे.
कुंडलिनी जागृती, पिरॅमिडलॉजी, नाडीशास्त्र, ज्योतिर्लिंगे व राशी, नाडी ज्योतिष असे विषय त्यांनी पुस्तकातून हाताळले आहेत. विज्ञान व अध्यात्म, अतिंद्रिय शक्ती व विज्ञान अशी तुलनाही त्यांनी केली आहे. अध्यात्मावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. गायत्री मंत्राचा महिमाही सांगितला आहे.
23 Nov 2015 - 9:21 pm | प्रचेतस
मी जरी नास्तिक असलो तरी तुमचे हे मनोगत मात्र पटले नाही.
23 Nov 2015 - 9:31 pm | परिकथेतील राजकुमार
सर तुम्ही ते शब्दकोडी लिहीता तेच ना?
ती चान चान असतात. तिथेच लक्ष द्या जरा.
23 Nov 2015 - 9:34 pm | संदीप डांगे
बाकी सगळे ठिक आहे. ओके.
पण घोळ बघा इथेच होतो:
जर तुम्ही खरंच चर्चेला तयार असाल तर कळवा. वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणार्याने विचारकलह व प्रयोग-आवाहनाला का घाबरावे? घाबरणे ही भावना वैज्ञानिकांच्या, बुद्धिप्रामाण्यवाद्यांच्या, निरीश्वरवाद्यांच्या बुद्धीला हरवते का?
प्रकाश घाटपांड्यांनी इथे वेळोवेळी अंधश्रद्धाळूंच्या सोबत्/साठी काम करतांना विवेकवाद्यांनी, बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी, अंनिसकार्यकर्त्यांनी कुठली नीती/भावना जपली पाहिजे याबद्दल लिहिले आहे. तुमच्या कुठल्याही लेखातून ती भावना जाणवत नाही हेच नेहमी तुमच्या समोरे मांडले गेले आहे. तुम्हास ते समजत नाही असे दिसते. मीच तो शहाणा बाकी सर्व वेडे असा सूर असेल तर कुणाच्याही भावना दुखावणार. लोकांना मूर्ख म्हटलेलं आवडत नाही हे इतके बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत वैगेरे असून तुम्हाला इतक्या वर्षांत कळले नाही हे एक आश्चर्यच आहे.
23 Nov 2015 - 9:53 pm | मांत्रिक
श्रद्धाळू भाविकांनी वैज्ञानिकांना, बुद्धिप्रामाण्यवाद्यांना, निरीश्वरवाद्यांना कितीही दूषणे दिली, कांहीही म्हटले तरी विवेकवाद्यांना किंचितही वाईट वाटणार नाही. भावना दुखावणे तर दुरापास्तच. कारण त्यांच्या मेंदूत भावनेवर बुद्धीचे सदैव नियंत्रण असते. साहेब तुमच्या मेंदुत भावनेवर बुद्धीचे मुळीच नियंत्रण नाहीये. कारण जर ते असतं तर तुम्ही असले टुकार जिलब्यापाडू लेख लिवलेच नसते. तुम्हाला माहीते तुम्ही अर्धवट ज्ञानावर शेखी मारताय. कारण थोडासुद्धा अनुभव येण्याइतकी तुम्ही साधना केली नाहीये. जर केली असतीत तर इथे निरर्थक लेख पाडत बसला नसता. पण काय आहे, तुम्हाला विज्ञान काय आहे हे पण कळलेलं नाहीये. बाकी चालू दे स्वस्तातला चिखलफेक धंदा!!!!
23 Nov 2015 - 9:59 pm | गॅरी ट्रुमन
प्रस्तुत लेखकाची नास्तिकतेवरील गाढ श्रध्दा वादातीत आहे.आणि ज्या विचारांचा जे तर्कनिष्ठ विचार म्हणून पुरस्कार करतात त्याचा पोटतिडकीने प्रसार करतात याबद्दलही त्यांना १०० पैकी ११० मार्क. तरीही या लेखाचे प्रयोजन अजिबात समजले नाही.
१. मंत्रोपचार म्हणजे एक नंबरचे थोतांड आहे असा दावा लेखकांनी मंत्रसामर्थ्य हा लेख लिहून केला. ते थोतांड आहे की नाही याविषयी मला काहीच भाष्य करायचे नाही. तरीही ज्यांचा मंत्रोपचारांवर विश्वास आहे त्यांना या लेखामुळे हिरवेपिवळे व्हायची काही गरज आहे असे वाटत नाही.
समजा आपल्यापैकी कोणालाही एखाद्याने म्हटले--अरे काय तू बिनडोक लेका--तू तर १० वी पण पास होऊ शकणार नाहीस!! आपण सगळेच त्या टप्प्यापासून बरेच पुढे आलेलो असल्यामुळे असे कोणीतरी काही बोलू लागला तर त्याचा राग यायची काहीच गरज नाही. फार तर "काय हा मूर्खासारखा बरळत आहे" असे म्हणून त्याकडे आपण दुर्लक्ष करू की नाही? त्याचप्रमाणे समजा एखाद्याचा मंत्रोपचारांवर विश्वास असेल तर त्यात काही दम नाही, ते सगळे थोतांड आहे इत्यादी इतर कोणी म्हटल्याचा राग यायचेही काही कारण आहे असे मला व्यक्तिश: वाटत नाही. अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे अधिक सयुक्तिक नाही का?
२. मंत्रसामर्थ्य या लेखावरील सगळी चर्चा मी काही वाचली नाही.पण जी काही वाचली त्यावरून काही सदस्यांना काही प्रमाणात तरी याचा राग आला असे मानायला वरकरणी तरी जागा आहे. कदाचित मी हे अनुमान काढण्यात पूर्णपणे चुकलेलो असेन.पण भावना दुखावणे या लेखातून लेखकांनी काही मुद्दे मांडले आणि आपली बाजू स्पष्ट केली. लेखकाची नास्तिकता मला स्वत:ला पटत नसली तरी अन्य कोणी काहीतरी बोलले म्हणून लगेच दुखावल्या जाणाऱ्या कचकड्याच्या भावना असू नयेत हा मुद्दा मला योग्य वाटतो आणि म्हणून मी त्या मुद्द्यावर लेखकाला इतर अनेक मिपाकरांप्रमाणे समर्थनही दिले.
जर का यनावालांचा त्यांच्या मार्गावर पूर्ण विश्वास असेल तर खरं तर स्पष्टीकरणाचा दुसरा लेख लिहायचीच गरज मुळात कळण्यापलीकडची आहे. ठिक आहे. दुसरा लेख त्यांनी लिहिला. आता त्याउपर तिसरा लेख लिहून परत तेच मुद्दे लिहायचे प्रयोजन समजले नाही.
विशेषत: या लेखातील
हे वाक्य आले म्हणजे लेखक इतरांनी केलेल्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यात कुठेतरी कमी पडला आहे आणि त्याची काही प्रमाणात खंत त्याला आहे असे मला पामराला वाटते.समजा इतर सदस्यांनी दूषणे दिली किंवा काहीही बोलले असेल (if at all तसे केले असल्यास) आणि त्याचे तुम्हाला काहीही वाटत नसेल तर परत "मला वाईट वाटले नाही" हे सांगायची गरज काय? म्हणजे "मी किती साधा" याची जाहिरात उत्तर भारतातील एक युगपुरूष वारंवार करत असतात त्यातलाच प्रकार म्हणायचा का हा? हे युगपुरूष स्वत: साधे असतील तर त्याची जाहिरात करून लोकांना सांगायची गरज काय तद्वतच तुम्हाला खरोखरच राग आला नसेल तर परत परत "मला राग आला नाही हो" असे सांगायची गरजच काय?
23 Nov 2015 - 10:21 pm | ट्रेड मार्क
वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणे बरोबर आहे. एखादा माणूस (भटजी, साधू ई सोडून) बाकी प्रयत्न न करता फक्त देवाकडे रोज मागणे मागत असेल तर ते चुकीचंच आहे, सगळेच त्याला बोलतात. रोजची सर्व कामे जबाबदाऱ्या सांभाळून जर कोणी देवधर्म करत असेल, तेही दुसऱ्या कोणाला त्रास न होता, तर काय अडचण आहे?
तुम्ही नास्तिक आहात तर ते तुमचे विचार झाले. तुम्ही ते जाहीरपणे सांगू सुद्धा शकता. तुम्हाला दुसऱ्याला समजवायचे असेल कि तो आस्तिक का आहे तर त्याची कारणमीमांसा करा. नुसतेच आरोप करून, दुसऱ्याला मूर्ख ठरवून काय साध्य होणार आहे? प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आणि त्यावर आधारीत प्रत्येकाची मते बनतात. लेख जर का असा असता की तुम्ही बाकीच्यांचे अनुभव समजून घेताय आणि त्यावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून तो अनुभव कसा असेल हे सांगताय तर ठीक आहे. नुसतंच फक्त तुम्हाला वाटतंय ते बरोबर आणि बाकीचे चूक हे कसं मान्य होईल सगळ्यांना?
माझ्या मंत्रसामर्थ्य या धाग्यावरील प्रतिसादावर तुम्ही काहीच बोलला नाहीत.
23 Nov 2015 - 10:22 pm | मांत्रिक
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टीकोन पत्करून दुःख पूर्णपणे दूर होऊ शकते? भ. येशू ख्रिस्त म्हणाले होते:
अहो दुःखी व भाराक्रांत जनहो तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन.
तुम्ही स्वमतांध विवेकवादी हे म्हणू शकता? दुःखाने पोळलेल्या जीवाचे मस्तक मांडीवर घेऊन थोपटू शकता? नाही! कारण विज्ञान म्हणते प्रत्येकाचा डीएनए वेगळा आहे, तर अध्यात्म म्हणते प्रत्येकाच्या अंतरंगात तोच परब्रह्म परमात्मा आहे.
योग्य कोण? क्रेडिटेबल कोण? आम्ही त्या येशू म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा! त्यालाच दुःखात हाक मारतो! कुठल्याही स्वमतांध दांभिक विज्ञानवाद्याला नाही.
नोट दी पाॅईंट!!!
24 Nov 2015 - 2:18 pm | यनावाला
"भारताचे संविधान " (मराठी) हा ग्रंथ मजजवळ आहे. त्यांतील भाग 4, अनुच्छेद 51क मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये दिली आहेत. त्यांतील एक असे:
...यावरून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे आणि शक्य होईल तेवढा प्रसार करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे हे स्पष्ट होते.
24 Nov 2015 - 2:57 pm | संदीप डांगे
ह्यावरून 'विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन' नसणार्यांना तुच्छ, कमी बुद्धीचे म्हणून हिणवावे असा अर्थ कुठे निघतो जो तुमच्या प्रत्येक लेखात आहे?
द्या की उत्तर काका, असा पलायनवाद खर्या वैज्ञानिकांस शोभत नाही बुवा?
23 Nov 2015 - 11:08 pm | गामा पैलवान
यनावाला,
तुम्ही म्हणता की वैज्ञानिक दृष्टीकोन सर्वांनी स्वीकारायला हवा. पण हा दृष्टीकोन म्हणजे नेमकं काय आहे ते जरा स्पष्ट करणार का? तुम्हाला आधुनिक विज्ञानाची फारशी माहिती नाही. अर्थात हा काही गुन्हा नव्हे. पण स्वत:ला विज्ञानाची जाण नसतांना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार करणे कितपत उचित आहे?
आ.न.,
-गा.पै.
23 Nov 2015 - 11:08 pm | मोदक
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या सार्यांच्या प्रगतीत देशाची प्रगती गुंफलेली आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे. असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना, वैध मार्गांनी- योग्य शब्दांत- परोपरीने समजावून सांगण्याचे मला घटनादत्त स्वातंत्र्य आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे
बाकी जावूद्या.. तुम्ही घटना आणि संविधान वगैरे बोलत आहात तसेच मी सर्वोच्च न्यायालयाचा रेफरन्स देवून मत मांडले होते. त्यावेळी "अज्ञानमूलक आणि अशोभनीय" अशी शब्दयोजना केलीत ते शब्द योग्य होते का?
राजेश कुलकर्णींची शाळा घेणे सुरू आहे इतकेही तुम्हाला कळाले नसेल तर अवघड आहे.
23 Nov 2015 - 11:34 pm | pacificready
नास्तिक नेमका कोण आहे?
मिपावरचा यनावाला आयडी,
या आयडी मागच्या माणसाचें नाव जसं आधी लिहिलं होतं,
त्याचं शरीर,
यनावालाचा भेजा,
की आणखी कुणी?
कोण नास्तिक आहे?
24 Nov 2015 - 12:52 am | कवितानागेश
मिपण भारतीयच आहे. पण तरीही
यनावाला आजोबा माझा एकपण प्रतिसाद वाचत नाहीत!
आमी नै ज्जा!!
24 Nov 2015 - 9:13 am | प्रसाद१९७१
यनावाला - मी नास्तिक आहे, पण मला असली हुच्च भ्रू भुमिका घेउन दुसर्यांना मूर्ख समजणे अजिबात मान्य नाही. मी नास्तिक असण्यात माझे कौतुक करण्यासारखे काही नाही, किंवा कोणी आस्तिक असण्यात त्यांना मूर्ख समजण्यासारखे पण काही नाही.
मी पावणे सहा फूट उंचीचा आहे म्हणजे मनुष्यजातीला पावणे सहा फुट उंचीच बरोबर आहे आणि तशी उंची ज्यांची नसेल ते मूर्ख / कम-अस्सल आहेत असली काहीतरी चमत्कारीक भुमिका आहे तुमची.
एक तर, कोणी मदत मागायला, प्रश्न विचारायला तुमच्या कडे आले नाही. प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यातील सुख-दुख त्यांना जसे जमेल तसे जगत आहे. तुम्हाला कोणी विचारत नाही आणि तुम्हाला कॉमेंट करण्याचा पण अधिकार नाही.
ज्यांना तुम्हाला अक्कल शिकवायची आहे त्यांना खिषातुन १० हजार , एक लाख काढुन द्या बरे आधी आणि सांगा त्याला की तू मुर्ख आहेस म्हणुन. हे चालेल.
24 Nov 2015 - 9:21 am | नाखु
तेच असल्याने जुन्या गिरणीतील खालील डबे पहा आणि विचार करा:
मी ही उत्सुक आहे
चौकटराजा - Thu, 19/11/2015 - 13:05
हे दिव्य अनुभव ऐकायला व त्यापेक्शाही अनुभवायला मी उत्सुक आहेच. बाकी नास्तिक याचा रूढ अर्थ देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा असा आहे ना ? शाळेत असताना अर्ध्या मार्कासाठी असाच अर्थ पाठ केल्याचे आठवतेय. मग मंत्र सामर्थ्य याला आव्हानात्मक विरोध व देव यान्चा काय संबंध ? एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. जप केल्याने माझ्या कोणत्याही मित्राला वा आप्ताला मनोविकारावर ताबा मिळाल्याचे दिसत नाही. धर्म पाळणारा माणूस नास्तिक असू शकतो. असे जर मी विधान केले तर इथे त्याला कुणाचा विरोध आहे का ? असल्यास कळवा मग पुन्हा कळफलक बडवायला मोकळा मी .
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा
संदीप डांगे - Thu, 19/11/2015 - 22:52
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,
काका
नाद खुळा - Sat, 21/11/2015 - 09:13
उगाच नाही आम्ही पंखे तुम्चे !!!!
बाकडा क्रमांक ८
24 Nov 2015 - 10:55 am | गॅरी ट्रुमन
चौरा आणि संदीप डांगे यांच्याशी सहमत आहे.
स्वयंघोषित विज्ञाननिष्ठ मंडळी बहुतांश वेळा आस्तिक आणि कर्मकांडावर विश्वास असणे या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरतात आणि तिथेच गंडतात.
यनावालांसारखे स्वतःला मोठे विज्ञाननिष्ठ मानतात. विज्ञाननिष्ठ असल्याचे सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे कुठलीही गोष्ट गृहित न धरणे आणि प्रत्येक गोष्टीची व्हॅलिडिटी तपासणे. तसे असेल तर अशे विज्ञाननिष्ठ मंडळी ज्या गृहितकावर त्यांच्या लेखांचा आणि सर्व्हेंचा सगळा डोलारा उभा करतात त्या मुळातल्या गृहितकाची व्हॅलिडिटी तपासून बघतात का?
24 Nov 2015 - 2:31 pm | अनुप ढेरे
तुमचे लेख आवडतात. लिहीत रहा!