संत एकनाथांच्या अभंगामध्ये प्रतिमा पुजा अथवा मुर्तीपुजा विषयी त्यांची मते व्यक्त झाली असावीत. संत एकनाथ खालील एका अभंगातून काही टिकाही करताना दिसतात तर एकनाथी भागवतात बर्याच ठिकाणी मुर्तीपुजेचे समर्थन आणि साद्यंत वर्णन करत असावेत. त्यांच्या संबंधीत अभंगांचे सरळ गद्य अनुवाद आणि या निमीत्ताने त्यांच्या मुर्तीपुजा विषयीच्या मतांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा आहे.
यातील बहुतांश अभंग मी मराठी विकिस्रोतावरून घेतले आहेत अद्याप ज्याचे मुद्रित शोधन बाकी असावे (चुभूदेघे). संत एकनाथांच्या मूळ साहित्यासोबत त्यात कुठे त्रुटी आढळल्यास मराठी विकिस्रोत प्रकल्पात आपल्या साहाय्याचे स्वागत असेल. मी खाली सर्वच अभंग आणले आहेत असे नाही जे आणले आहेत ते अंदाजाने आणले आहेत. अनुवादकांनी मूळ अभंगातून इतर सबंधीत अभंग आणून त्याचा अनुवाद उपलब्ध करण्याचेही स्वागत असेल.
वेषधार्यांच्या भावना ~ संत एकनाथांच्या गाथा (संदर्भ: ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग -- दिनांक:५/१०/२०१५ सायं १९.३२ वाजता जसे पाहीले--वर अभंग गाथा क्रमांक २५९९)
येउनी नरदेहा भूतातें पूजिती । परमात्मा नेणती महामुर्ख ॥१॥
दगडाच्या देवा सेंदुराचा भार । दाविती बडीवार पूजनाचा ॥२॥
रांडापोरें घेती नवासाची बगाड । नुगवे लिगाड तयाचेनि ॥३॥
आपण बुडती देवा बुडविती । अंतकाळी होती दैन्यावाणें ॥४॥
एका जनार्दनीं ऐसिया देवा । जो पूजी गाढवासम होय ॥५॥
एकनाथी भागवत/अध्याय सत्ताविसावा
माझी प्रतिमा पूजाविधान । तें प्रथम माझें पूजास्थान ।
तें प्रतिमाक्रियालक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥९७॥
एकनाथी भागवत - श्लोक १२ वा
शैली दारुमयी लौही, लेप्या लेख्या च सैकती ।
मनोमयी मणिमयी, प्रतिमाष्टविधा स्मृता ॥१२॥
अष्टधा प्रतिमास्थिती । ज्या पूजितां सद्यःश्रेय देती ।
ऐशिया प्रतिमांची जाती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९८॥
गंडक्यादि ’शिळामूर्ती’ । कां दारु मांदार ब्रह्म ’काष्ठमूर्ती’ ।
अथवा सुवर्णादि ’धातुमूर्ती’ । सद्यः फळती साधकां ॥९९॥
मृत्तिकाकापडकीटणमूर्ती । या नांव ’लेप्या’ म्हणिजेती ।
कां स्थंडिलीं लिहिल्या अतिप्रतीं । त्या ’लेख्या’ मूर्ती पूजकां ॥१००॥
वाळुवेची जे केली मूर्ती । ती नांव ’सिकतामूर्ति’ म्हणती ।
तेही पूज्य गा निश्चितीं । सुवर्णमूर्तीसमान ॥१॥
मूर्ति ’रत्नतमयी’ सोज्ज्वळ । हिरा मरकत इंद्रनीळ ।
पद्मराम मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥२॥
मूर्तींमाजीं अतिप्राधान्य । ’मनोमयी’ मूर्ति पावन ।
जिचें करितां उपासन । समाधान साधकां ॥३॥
तेंचि प्रतिमापूजाविधान । स्थावरजंगमलक्षण ।
तेही अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥४॥
एकनाथी भागवत - श्लोक १३ वा
चलाचलेति द्विविधा, प्रतिष्ठा जीवमन्दिरम् ।
उद्वासावाहने न स्तः, स्थिरायामुद्धवार्चने ॥१३॥
अचेतनाचेतनप्रकार । जडातें जीववी साचार ।
’जीव’ शब्दें चिन्मात्र । मुख्य परमेश्वर बोलिजे ॥५॥
भक्तभावार्थें साचा । त्या जीवाचें निजमंदिर ।
प्रतिमा जंगम-स्थावर । आगमशास्त्रसंमतें ॥६॥
तेथें स्थावरमूर्तिपूजन । साधकें करितां आपण ।
न लगे आवाहनविसर्जन । तेथ अधिष्ठान स्वयंभ ॥७॥
एकनाथी भागवत - श्लोक १४ वा
अस्थिरायां विकल्पः स्यात्, स्थण्डिले तु भवेद्द्वयम् ।
स्नपनं त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥१४॥
जंगम प्रतिमांच्या ठायीं । आवाहन विसर्जन पाहीं ।
एकीं आहे एकीं नाहीं । ऐक तेही विभाग ॥८॥
शालग्राममूर्तीसी जाण । स्वयंभ माझें अधिष्ठान ।
तेथ आवाहनविसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥९॥
शालग्रामाचा कुटका । ज्याचे पूजेसी आहे फुटका ।
तेथ परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नांदत ॥११०॥
इतर मूर्ती जंगमा जाण । तेथ आवाहनविसर्जन ।
साक्षेपें करावें आपण । हें विधिविधान आगमोक्त ॥११॥
स्थंडिलीं मूर्तिआवाहन । सवेंचि पूजांतीं विसर्जन ।
हें उभय भावनाविधान । स्थंडिलीं जाण आवश्यक ॥१२॥
आपले हृदयींचा चिद्धन । मूर्तीमाजीं कीजे आवाहन ।
पूजांतीं करुनि विसर्जन । देव हृदयीं जाण ठेवावा ॥१३॥
एथ आपणचि ब्रह्म परिपूर्ण । हेंचि व्हावया निजस्मरण ।
आवाहनविसर्जनें जाण । निजात्म आठवण साधका ॥१४॥
हा आगमींचा निजात्मभावो । आपणचि आपला देवो ।
आपला आपण पूजक पहा हो । हा निजात्म-आठवो निजपूजे ॥१५॥
’देव होऊनि देव पूजिजे’ । हें निजात्मता गोड खाजें ।
उपासनाकांड-व्याजें । उद्धवासी दीजे श्रीकृष्णें ॥१६॥
हे निजात्मता निजगोडी । प्रतिपदीं न लभतां रोकडी ।
उपासना-तडातोडी । कोण कोरडी सोशील ॥१७॥
हें आगमींचें निजगुह्य जाण । प्रतिपादीं सुखसंपन्न ।
साधक स्वयें होती चिद्धन । तें हें उपासन उद्धवा ॥१८॥
ऐसें ऐकतां कृष्णवचन । उद्धव स्वानंदें झाला पूर्ण ।
धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । म्हणे समूळ निरुपण मज सांग ॥१९॥
तंव देव म्हणे स्थिर राहें । जें हें आगमोक्त गुह्य आहे ।
तें माझे कृपेंवीण पाहें । प्राप्त नोहे साधकां ॥१२०॥
आगमोक्त गुह्य गहन । असो हें माझें गुप्तधन ।
तुवां पुशिलें पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥२१॥
लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसीं करावेंना स्नान ।
इतरां मूर्तीसी स्नपन । यथाविधान करावें ॥२२॥
....
जेथ माझा सद्भाव दृढ । तेथ उपचारांचा कोण पाड ।
भक्तांचा भावचि मज गोड । तेणें सुख सुरवाड मद्भक्तां ॥२७॥
बाह्य उपचार जे कांहीं । ते प्रतिमामूर्तिपूजेसी पाहीं ।
मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाहीं उपचारां ॥२८॥
तेथ मनचि होय माझी मूर्ती । मनोमय उपचारसंपत्ती ।
निर्लोभें जें मज अर्पिती । तेणें मी श्रीपती संतुष्ट ॥२९॥
प्रतिमादि अष्टौ पूजास्थान । यथोक्त पूजेचें विधान ।
तुज मी साङग सांगेन । ऐक सावधान उद्धवा ॥१३०॥
...
जे लोकीं उत्तम प्रकार । कां आपणासी जे प्रियकर ।
जे जे अनर्घ्य अळंकार । तेणें श्रद्धा मी श्रीधर पूजावा ॥३२॥
स्नान भोजन अलंकार । साङग पूजा सपरिकर ।
हा प्रतिमा पूजाप्रकार । ऐक विचार स्थंडिलाचा ॥३३॥
स्थंडिलीं जें पूजास्थान । तेथ तत्त्वांचें धरोनि ध्यान ।
करावें तत्त्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥३४॥
आत्मतत्त्वादि तत्त्वविवंच । स्थंडिलीं विवंचूनि साच ।
हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंच निजपूजा ॥३५॥
अग्नीचे ठायीं जें पूजन । तेथ माझें करुनि ध्यान ।
आज्यप्लुत हविहवन । हें पूजाविधान अग्नीचें ॥३६॥
अग्नि देवांचें वदन । येणें विश्वासें संपूर्ण ।
हविर्द्रव्य करितां हवन । ’अग्निपूजन’ या हेतू ॥३७॥
सूर्याच्या ठायीं प्रकाशमान । मंडळात्मा सूर्यनारायण ।
तेथ सौरमंत्रें उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥३८॥
विचारितां श्रुतीचा अर्थ । ’आपोनारायण’ साक्षात् ।
येथ पूजाविधान यथोक्त । जळीं जळयुक्त तर्पण ॥३९॥
’हृदयीं ’ जें माझें पूजास्थान । तेथें मनें मनाचें अर्चन ।
मनोमय मूर्ति संपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥१४०॥
माझें मुख्यत्वें अधिष्ठान । ब्रह्ममुर्ति जे ’ब्राह्मण’ ।
तेथील जें पूजाविधान । आज्ञापालन दासत्वें ॥४१॥
ब्रह्मासी ज्याचेनि ब्रह्मपण । तो ’सद्गुरु’ माझें पूजास्थान ।
सर्वार्थीं श्रेष्ठ पावन । तेथील पूजन तें ऐसें ॥४२॥
जीवें सर्वस्वेंसीं आपण । त्यासी रिघावें अनन्य शरण ।
त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥४३॥
गुरुची नीचसेवा सेवन । आवडीं करणें आपण ।
हेंचि तेथील पूजाविधान । येणें सुखसंपन्न साधक ॥४४॥
सद्गुरुसेवा करितां पाहीं । ब्रह्मसायुज्य लागे पायीं ।
गुरुसेवेपरतें कांहीं । श्रेष्ठ नाहीं साधन ॥४५॥
सद्गुरुस्वरुप तें जाण । अखंडत्वें ब्रह्म पूर्ण ।
तेथें आवाहन विसर्जन । सर्वथा आपण न करावें ॥४६॥
निष्कपटभावें संपूर्ण । सद्गुरुसी जो अनन्य शरण ।
त्याचे मीही वंदीं चरण । येथवरी जाण तो धन्य ॥४७॥
निर्लोभभावें सहज । पूजितां तोषे अधोक्षज ।
त्या भावाचें निजगुज । स्वयें यदुराज सांगत ॥४८॥
....
उद्धवा मी नाहीं ऐसें । कोणीही ठिकाण रितें नसे ।
परी प्राण्यांचें भाग्य कैसें । त्या मज विश्वासें न भजती ॥६९॥
जो जेथ मज भजों बैसे । त्या मी तेथ तैसाचि असें ।
हें उपासनाकांडविशेषें । गुप्त अनायासें प्रकाशिलें ॥३७०॥
उपासनाकांडींचा निर्वाहो । मी सर्वांभूतीं देवाधिदेवो ।
हा ज्यासी न कळे मुख्य भावो । त्यासी मूर्तिनिर्वाहो द्योतिला ॥७१॥
हो कां माझी प्रतिमामूर्ती । तेही मी चिदात्मा निश्चितीं ।
तेथ करितां भावें भक्ती । भक्त उद्धरती उद्धवा ॥७२॥
* त्यांचे सर्व संबंधीत अभंग येथे उधृत करण्यास जरासा कालावधी लागेल त्यामुळे विषयात रस असलेल्यांनी या धाग्यास काही कालावधी नंतरसुद्धा पुन्हाही भेट देण्याचे करावे.
* यातील अनुवाद विषयक प्रतिसाद विकिप्रकल्पातून वापरले जाऊ शकतील म्हणून आपले या धाग्यास येणारे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिक्रिया
20 Nov 2015 - 8:09 pm | भाऊंचे भाऊ
आपले हात वर आपल्या काही कळतं नाही. पण एक नक्कि, एकनाथी भागवत हे संपुर्ण भागवत नाही तर भागवताच्या फक्त ११व्या स्कंदावरच एकनाथ महाराजांनी केलेली टीका ( जशी ज्ञानेश्वरी गितेवरील टीका) आहे. मुळ भागवत शुकाचार्यांनी सांगीतले तरी ते व्यांसानी लिहले आहे (नेमके लिखाण कोणी केले आठवत नाही जाणकार प्रकाश टाकतील).
परीणामी एकनाथांचे स्वतःचे विचार अन मुळ अतिशय जुन्या भागवतावर टीका रचताना त्यातील लेखकाचे विचार यात काळानुसार तफावत येणे गैर नसावे. ही तफावत समाजाच्या कर्मांमधेही काळाप्रमाणे आलेली असतेच. परीणामी संतजन प्रचलीत काळातील रुढींना धरुन भाष्य करत असावेत.
20 Nov 2015 - 10:15 pm | प्रचेतस
भागवत सरळ सरळ उत्तरकालीन आहे. व्यासच काय व्यासपरंपरेतल्या कुणीही ते लिहिलेलं असं शक्य नाही. बेसनगरचा गरुडध्वज शिलालेख जमेस धरता भागवतपुराणाचा काळ साधारणत: जास्तीत जास्त ३०० बीसी इतका जावा. बाकी भागवतातील बहुसंख्य भर ही नंतर पडली आहे हे ते पुराण वाचताना सहजी लक्षात येते.
बाकी नाथांच्या अभंगांचे संकलन आवडले.
22 Nov 2015 - 3:59 pm | माहितगार
खालील शब्दांचे अर्थ हवेत १
* कोटंबा
* कषाट
* गव्हार
* आन धर्मा
* निरुते
22 Nov 2015 - 6:12 pm | माहितगार
* कोंदे
* खद्योतकोडी
* आयतन
* आगमनिगम
* स्थंडिलीं
* शठत्वाचा व्यवहार
* अमायिक
* गंडक्यादि
* दारु मांदार
* मृत्तिकाकापडकीटणमूर्ती
* लेप्या
* लेख्या
* मरकत
* स्थावरजंगमलक्षण
* स्नपन
* सुरवाड
* सपरिकर
* तुकें उतरलीं
* श्वेतकंबल
* चैलाजिन
* प्रौक्षण
* श्यामाक
* एका वाला जातीफळ
* कंकोळ
* देशिक
* जंव फुटेना अव्हासव्हा
23 Nov 2015 - 9:14 am | प्रचेतस
आगमनिगम- येणे जाणे
स्थंडिलीं- बहुधा शेंदूर
शठत्वाचा व्यवहार - मूर्खांच्या व्यवहार
गंडक्यादि- नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी आहे. तिच्या पात्रात सापडणारे काळेभोर दगड हे मूर्तींसाठी उत्तम प्रतीचे मानले जातात. शिवाजीराजेंनी प्रतापगडावरची भवानी मातेची मूर्ती हे गंडकी शिळेपासून घडवली होती.
दारु मांदार- देवदार वृक्षाचे लाकूड. हे सुद्धा काष्ठशिल्पांसाठी उत्तम मानले जाते.
मृत्तिकाकापडकीटणमूर्ती- मातीचा लेप चढवलेली कापडी मूर्ती किंवा माती हेच कापड असलेली मूर्ती.
लेप्या - लेपन करणे
मरकत - माणिक
श्वेतकंबल - शुभ्र वस्त्र
प्रौक्षण - बहुधा ओवाळणे आणि (अक्षता / फुले) अर्पण करणे /फेकणे.
स्थावरजंगमलक्षण - मूर्तींची एकंदरीत सर्व लक्षणे
जातीफळ - बहुधा जायफळ
6 Nov 2018 - 5:58 pm | चौथा कोनाडा
उद्धवा मी नाहीं ऐसें । कोणीही ठिकाण रितें नसे ।
+१