गुलाबजाम!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
18 Nov 2015 - 6:57 pm

.

चितळेंचे भारतातून आणलेले इन्टंट गुलाबजामचे पाकिट संपले. गिट्स चे मला आवडत नाहीत आणि दुधापासून खवा करायचा तर आटवताना त्या दुधालाही कंटाळा येतो तर मला कुठचा उत्साह असायला? पण दिवाळीपाडव्याला गुलाबजाम तर हवेच होते आणि घरचेच हवे होते. म्हणून मग पेढ्यांकरता केला तसा सारखा इन्स्टंट खवा केला. पण मिल्क मेड खूप गोड असते ना, पेढ्यांना ते चालले पण इथे जरा वेगळी परिस्थिती होती म्हणून मग जरा वेगळा खवा प्रयोग केला. तर ह्या गुलाबजाम साठी गुलाबजामचा खवा लागणार होता - पाव किलो गुलाबजामचा खवा, आता 'आमच्या' देशात खवाच मिळत नाही तर गुलाबजाम स्पेशल खवा कुठून मिळायला? मग त्याकरता १ कप मिल्कपावडर, १कप फ्रेश क्रिम आणि २-३ चमचे साजूक तूप असं सगळं एकत्र केलं आणि आधी २ मिनिट आणि मग एक एक मिनिट असं एकूण ७ ते ८ मिनिटे हाय पॉवरला (८०० वॅट) मायक्रोव्हेव केलं आणि खवा तयार झाला. तो फ्रिझमध्ये साधारण अर्धा तास ठेवला.
मैदा साधारण अर्धी वाटी घेतला त्यात चिमूटभर सोडा घातला आणि २-३ चमचे रवा थोड्या दुधात भिजवला.
३ वाट्या साखरेचा दुप्पट पाणी घालून कच्चा पाक केला म्हणजे साखरेत पाणी घालून साखर विरघळून पाक थोडा गरम होईपर्यंतच आचेवर ठेवला.त्यात केशरकाड्या आणि वेलची पूड घातली.
खवा फ्रिझमधून बाहेर काढून मिक्सरमधून फिरवला, मग तो चांगला मऊ आणि मोकळा झाला. त्यात साधारण अर्धी वाटी मैदा+चिमूटभर सोडा घातला, दुधात भिजवलेला रवा घातला. दोन चमचे पिठीसाखर घातली आणि कणकेप्रमाणे गोळा बनवून साधारण १५-२० मिनिटे झाकून ठेवला.
तळणीसाठी तूप, रिफाइण्ड तेल कि एअरफ्रायर असा मोठ्ठा प्रश्न उद्भवला. मागे दसर्‍याला इन्टंट गुलाब जाम केले होते ए फ्रा मधून पण किती वेळ लागला होता त्याची ष्टोरी तर माहिती आहेच सर्वांना.. तर तेवढा वेळ घालवायचा नव्हता. म्हणून मग एक द्विसदस्य मिटिंग झाली. मंद आचेवर तळतात गुलाबजाम पण अगदी १४० अंश से. न ठेवता १६० अंशावर ए फ्रा ठेवून पाहू असे त्या मिटींगमध्ये निश्चित झाले. एव्हाना १५/२० मिनिटे होऊन गेली होती. मग त्या खव्याचे लंबगोलाकार गोळे बनवायला घेतले, एकेका गोळ्यात वेलची दाणा घालून गुळगुळीत चिरा न पडलेला गोळा बनवायचा होता. तो झाल्यावर त्याला टूथ पिकने बारीक भोके पाडली आणि सगळे असे गुलाब जाम ओलसर फडक्याखाली झाकून ठेवले. एकीकडे एफ्रा १६० अंशावर ५ मिनिटांसाठी प्रिहिट करत ठेवला. मागच्या वेळी जाळीचे इंप्रेशन गुमाबजामांवर आले होते ते आठवून जाळीवर बेकिंग पेपर घातला आणि एफ्रा ५ मिनिटांनी उघडल्यावर आतला बेकिंग पेपर 'हवा के साथ साथ..' झिम्मा खेळत असल्याचे आढळले. नुसताच कागद आत ठेवला तो वार्‍याने उडला असेल म्हणून त्यावर गुलाबजामचे वळलेले गोळे अंतरा अंतरावर ठेवले आणि ए फ्रा १६० अंशावर ५ मिनिटे लावला.
पाच मिनिटांनंतर... एक पॉझ... सगळे गुजाम एकमेकांना चिकटून एक मोठ्ठा गोळा झाला होता, कागद परत 'हवा के साथ साथ..' दंगामस्ती करू पाहत होता. कपाळाला हात लावून ते गुजाम वेगळे करून कढईत टाकून तळले. पण आता पुढे अजून एक प्रयोग करून तर पाहू अशा विचाराने बेकिंगपेपरचे लहान तुकडे केले आणि एकेका तुकड्यावर एकेक गुलाबजामचा गोळा असे अंतराअंतरावर ठेवले. त्याला थोडे रिफाइण्ड तेल ब्रश केले.
१६० अंशाला ५ मिनिटे ठेवले मग जरा घाबरतच उघडून पाहिले तर आता ते एकमेकांची गळाभेट घायला आतूर न झालेले दिसले, थोडक्यात, बरी परिस्थिती होती. मग पलटून परत ३ मिनिटे ठेवले. ब्राउनिंग आलेले दिसले मग ते पाकात घातले.
म्हणजेच ए फ्रा मध्ये १६० अंशावर ५ मिनिटे प्रिहिट, मग गु जाम ठेवून ५ मिनिटे मग पलटून ३ मिनिटे. लागल्यास अजून एखादे मिनिट ठेवले की मस्त गुलाबजाम होतात असा शोध लागला आणि १४० अंशावर अर्धापाउण तास ए फ्रा करण्याचे वेळखाऊ काम वाचले.
तेव्हा एफ्रा असेल तर हा प्रयोग करून पहा किवा मग मंद आचेवर तेलात अथवा तुपात गुलाबजाम तळा. शेजारच्या शेगडीवर पाकाचे पातेले ठेवा आणि गरम गुलाब जाम पाकात घाला. एकीकडे थोड्या थोड्या वेळाने गॅस ऑन करा, आच मंदच ठेवा. पाक गरम राहिला म्हणजे गुलाबजाम मध्ये पाक आतपर्यंत मुरेल. पण पाक सतत आचेवर ठेवू नका, तो पक्का पाक होण्याची शक्यता आहे.
उद्या दुपारच्या जेवणात गुलाबजाम हवे असतील तर आज रात्रीच करून ठेवा म्हणजे ते पाकात छान मुरतील.
तर अशी ही दिवाळीच्या गुलाबजामची कहाणी सुफळ संप्रूण.

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Nov 2015 - 7:05 pm | रेवती

ए. फ्रा. गुजा आवडले.

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2015 - 7:06 pm | दिपक.कुवेत

प्लीज प्लीज....गुलाबजाम असं पुर्ण लिहीत जा किंवा गु आणि जाम मधे अंतर नको ठेवूस. वाचताना एवढ्या चांगल्या कलाकृतीचा खुपच रसभंग होतोय. हे सांगण अनिवार्य वाटत आहे म्हणून. बाकी गुलाबजाम खुपच टेम्टींग दिसत आहेत.

सुहास झेले's picture

19 Nov 2015 - 3:36 pm | सुहास झेले

सहमत ....

अरे काय छळ आहे आताच एकीकडे प्रतिक्रया नही दिली की दुसरी पाकृ हजर =) टेम्प्टिंग दिस्तायेत् :)

सुबोध खरे's picture

18 Nov 2015 - 7:54 pm | सुबोध खरे

कसले जबरदस्त दिसत आहेत गुलाबजाम.
उपाशीपोटी तर फारच तोंपासू

पैसा's picture

18 Nov 2015 - 7:59 pm | पैसा

मस्त एकदम! एअर फ्रायरवरचे प्रयोग लै भारी सुरू आहेत!

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 8:02 pm | मांत्रिक

झकास!!! बनवण्याची कथाही रोचक आहे...

कविता१९७८'s picture

18 Nov 2015 - 8:07 pm | कविता१९७८

मस्तच ग

ए फ्राची धूळ झटकायला लावणार ताई तू!!

चतुरंग's picture

18 Nov 2015 - 8:19 pm | चतुरंग

एकतर गुलाबजाम अतिप्रिय त्यातून मी अहमदनगरचा असल्याने बन्सीमहाराजचे अप्रतिम गुलाबजाम खाऊन लहानाचा 'मोठा' झालेलो!;) हे जाम म्हणजे जामच त्या गुलाबजामच्या जवळ जाणारे दिसताहेत! :)
स्वातीतै तुझ्या पाककौशल्याला __/\__

(बन्सीमहाराजच्या आठवणीने हळवा)गुलाबरंग

नाव आडनाव's picture

18 Nov 2015 - 8:36 pm | नाव आडनाव

पहिली ओळ मला पण एकदम हीच लिहायची होती :)

विलासराव's picture

18 Nov 2015 - 11:10 pm | विलासराव

आम्हीही नगरचेच.
बॉम्बे मिठाइवाल्याचे गुलाबजाम आणी रुचिराची जिलेबी हे आमचे फेवरेट.
रुचिरात तर कॉलेजच्या काळात माझी उधारी असायची.
रेवतितै आमच्या रॉयल कॅफेसाठी ही रेसेपी ढापली तर चालेल काय?

मीही नगरचीच. पण मी जास्त "महेंद्र पेडावाला"चे गुलाबजाम खाउन मोठी झाले. :)

रेवतीतै हा स्वातीतैचा डुआयडी असल्याचे आजच कळले! ;)

बाकी फोटोतले गुलाबजाम अतिशय सुंदर दिसत आहेत, अगदी उचलून तोंडात टाकावे असे!

स्वातीताईची परवानगी असल्यास काही हरकत नाही. ;)

विलासराव's picture

19 Nov 2015 - 9:33 am | विलासराव

गलतिसे मिस्टेक हो गया.
गुलाबजामचा फोटौ पाहिल्यावर इतका लोभ जागला की सब गड़बड़ हो गया.
रूपितै मी १९८६ ते १९९२ आधी नगर कॉलेजला व मग विळद घाटामधे ई.कॉलेजला होतो.
त्याकाळात हेच फेमस होते बहुतेक.
मानिकचौकातला बटाटावडा आणि गंजबाजारात कुणाचितरी लस्सी फेमस होती.असो.

चतुरंग's picture

19 Nov 2015 - 8:58 pm | चतुरंग

काय आठवण दिलीत राव विलासराव, माणिकचौकातला अप्पाचा तळलेल्या हिरव्या खार्‍या मिरचीसह बटाटेवडा आणि गंजबाजारातली दुर्गासिंगची लस्सी एकदम तोंपासु! :)

रेवती's picture

19 Nov 2015 - 9:47 pm | रेवती

रुपितै?

खवा वैगरे घरीच करायच्या पाकृ सांगताय ते फार बरंय!!

मितान's picture

19 Nov 2015 - 7:02 am | मितान

लाजवाब गुलाबजामुन !

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2015 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर

गुलाबजाम पाककृती बरीच क्लिष्ट दिसते आहे.
दिवाळी अंकात मी देणार होतो पण वेळे अभावी राहून गेले.
आता एक दोन दिवसांत गुलाबजामची एक पारंपारीक पाककृती देतो. इथे.

रुस्तम's picture

19 Nov 2015 - 5:11 pm | रुस्तम

लवकरच टाका...प्रतिक्षेत.....

स्वाती दिनेश's picture

19 Nov 2015 - 8:01 pm | स्वाती दिनेश

ह्यात क्लिष्ट काय वाटले? गुलाबजामचा खवा बाजारातून आणला आणि तळले की ही पारंपरिक पाकृ च आहे.
त्याऐवजी मी खवा मिल्कपावडर व फ्रेशक्रिमपासून ७-८ मिनिटात मायक्रोवेव्मध्ये केला व गुजाम ए फ्रा केले हाच फक्त पारंपरिक भाग नव्हता.
असो, तुमच्याही पाकृच्या प्रतीक्षेत,
स्वाती

नितीन पाठक's picture

19 Nov 2015 - 5:15 pm | नितीन पाठक

नमस्कार मंडळी,
अहो गुलाबजाम म्हणजे जीव कि प्राण.
रहावत नाही अजिबात. आणले की लगेच खायला सुरूवात. नगरच्या बन्सीमहाराज यांचे गुलाबजाम तर एकदम मस्त. गरमागरम आणि एकदम ताजे. ऑर्डर दिल्यानंतर बन्सीमहाराज च्या दुकानात १०० ग्राम गरमागरम गुलाबजाम द्रोणात मिळायचे आणि सोबत फरसाण घेतले की तबियत एक्दम खूष.
मी नगरचाच. बन्सीमहाराज, बंम्बइवाला यांचे गुलाबजाम खाउनच आयुष्य चाललय. आज मला पहिल्यांदा कळले की आपल्या नगरचे म्हणजे अहमदनगर ची इतकी मंड्ळी मिपा ची सभासद आहे. चतुरंग, नावआडनाव, विलासराव, रूपी इ इ . अजून किती जण आहेत माहीत नाही. खरे तर आपण नगरच्या मंडळींनी एक "कट्टा" करायला हरकत नाही. करायचा का ?

नाव आडनाव's picture

19 Nov 2015 - 5:46 pm | नाव आडनाव

तुमच्या खरडवहीत खरड लिहिली आहे.

विलासराव's picture

19 Nov 2015 - 10:56 pm | विलासराव

कट्टा करू ना.
रॉयल कॅफे मधेही करता येईल.
मुक्कामी कट्टा केला तर रहाण्याची सोयही आहे.
इकडे नसेल जमत तर तुम्ही ठरवा.मी येईल.

नूतन सावंत's picture

19 Nov 2015 - 7:27 pm | नूतन सावंत

काय दिसताहेत ग स्वाती गुजा.एक लंबर.
ए.फ्रा.असल्याने लैच आवडले.
____/\____

स्मिता_१३'s picture

20 Nov 2015 - 1:27 am | स्मिता_१३

असेच म्हणते !

पद्मावति's picture

19 Nov 2015 - 11:17 pm | पद्मावति

खूपच मस्तं दिसताहेत गुलाबजामून.

रातराणी's picture

20 Nov 2015 - 12:44 am | रातराणी

खूप गोड खाल्लं. ताई आता एक चटपटीत पाक्रु पाहिजे.

सानिकास्वप्निल's picture

20 Nov 2015 - 4:35 am | सानिकास्वप्निल

गुलाबजाम अप्रतिम दिसत आहेत, पाकृही सोपी, सुटसुटीत वाटतेय. एयरफ्रायरमध्ये आता बनवून बघतेच.
फोटो कैच्याकै जीवघेणा आलाय.

त्रिवेणी's picture

20 Nov 2015 - 9:28 am | त्रिवेणी

धन्य आहात तुम्ही बायका. घरच्या घरीच इतके काय काय करता आणि आम्हाला काम्प्लेक्स देता.
बाकी तै आता तुमच्यामुळे मी ही ए फ्रा घेणार हे नक्की. बाकी घेवून झाला की किती वापरेंन ते बघू.

Maharani's picture

20 Nov 2015 - 10:04 am | Maharani

Tempting....