लाल भोपळ्याची बाकर भाजी

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
18 Nov 2015 - 3:13 am

पानगळीचा ऋतु आला, लाल भोपळा मिळाला आणि लगेच ही अत्यंत आवडणारी भाजी करण्यात आली. विदर्भात लग्नकार्यात, सणावाराला ही भाजी केली जाते. या भाजीचेही बरेच व्हेरिएशन्स आहेत. जर घरात काही धार्मिक कार्याच्या दिवशी केली, तर फक्त लसूण यातून वगळला जातो, बाकी वेळा लसूण घालून केली जाते. लाल भोपळा अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींनाही ही भाजी हमखास आवडते असा अनुभव आहे. तेव्हा अवश्य करून बघा.

साहित्य -
लाल भोपळा चिरून - अर्धा किलो (बरेचदा सालासहित घेतात, मी सालं काढली आहेत)
सुके खोबरे - ३ टे.स्पून.
खसखस - ३ टे.स्पून.
तेल - पाऊण वाटी (लग्नात करतात तेव्हा यात प्रचंड तेल असते, जे मी बरेच कमी घेतले आहे. पण तरीही नेहमीच्या भाज्यांपेक्षा तेल जास्तच हवं, तरच खरा फील येतो.)
कढीपत्ता - ७-८ पानं
मेथीदाणे - चमचाभर
चिंचेचा कोळ - २ टे.स्पून.
गूळ - २ टे.स्पून.
हळद - १ छोटा चमचा
तिखट - ३ छोटे चमचे
गरम मसाला - २ छोटे चमचे
आलं किसून - २ टेबलस्पून
हिरवी मिरची बारीक वाटून/चिरून - २-३
लसूण - ५-६ पाकळ्या ठेचून किंवा लसूण पेस्ट
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर

कृती

खोबरं आणि खसखस वेगवेगळं भाजून घ्या आणि नंतर कोरडंच वाटून घ्या.
तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, मेथीदाणे घाला, आलं किसून यातच घाला, म्हणजे स्वाद जास्त छान येतो. लसूण पेस्ट घाला. (आलं लसूण पेस्टही वापरु शकता किंवा आलं-लसूण-हि.मिरची याचे वाटणही चालेल) आता यात वाटलेलं खोबरं खसखस घाला. भरपूर परता. तेल सुटायला लागलं की मग हळद, तिखट घाला. लाल भोपळ्याच्या फोडी घाला, चिंच गुळ घालून झाकण ठेवा. गरम मसाला घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालावे. भाजी शिजत आली की मीठ घाला, वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

तळटीप -
१. हवा असल्यास दाण्याचा कूटही घालू शकता पण खोबरं-खसखस हे वाटण पुरेसं आहे.
२. ही भाजी जेवढी मुरते, तेवढी अजून छान लागते. त्यामुळे थोडीशी मुद्दाम बाजूला ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा. :)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2015 - 3:42 am | श्रीरंग_जोशी

लाल भोपळ्याची किंवा माझ्या गावच्या भाषेत कोहळ्याची भाजी मला अत्यंत प्रिय आहे.

फोडी सालांसकट शिजवल्यास चुकून अधिक शिजवले गेले तरी फोडींचा आकार शाबुत राहतो.

अरे वा ! नवरा खुश होईल माझा. त्याला लाल भोपळा अत्यंत प्रिय आहे आणि मला तितकाच अप्रिय. पण व्हरायटी मिळाली जरा. नक्की करुन बघेन.

रातराणी's picture

18 Nov 2015 - 5:14 am | रातराणी

मस्त दिसतेय!

मितान's picture

18 Nov 2015 - 5:43 am | मितान

मस्त दिसतेय भाजी !
आमच्याकडे लसूण घालत नाहीत या भाजीत. बाकी कृती अशीच.

मदनबाण's picture

18 Nov 2015 - 6:53 am | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- David Guetta - Dangerous Drum & Bass Cover by Anna Sentina, Miki Santamaria, and Coop3rdrumm3r

फोटू मस्त आलाय. मलाही ही भाजी आवडते. सासरी नेहमीच्या करण्यात चालते पण माहेरी शक्यतो श्राद्धालाच करतात.
पुरानी यादें ताजा.
सध्या माझ्याकडे एक बटरनट स्क्वाश व दोन लाल भोपळे हॅलोविनचे आहेत. ते संपवण्यासाठी पाकृंची यादी करतिये. आता ही भाजी त्यात लिहिते. ;)

तुमच्या पाकृंच्या यादीत थोडा आगाऊपणा करुन माझ्याकडून थोडी भर घालते.

लाल भोपळ्याचा गाजराच्या हलव्यासारखाच हलवा करता येतो. छान लागतो, पण साखर अती लागते.

बटरनट स्क्वाशचे अतिशय चवदार सूप मी मैत्रिणीकडे प्यायले होते. स्क्वाशचे तुकडे / चकत्या करुन तव्यावर थोड्याशा तुपात मंद आचेवर खूप वेळ परतून घ्यायच्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करुन तूप-जिर्याच्या फोडणीत घालायची. मग नारळाचे दूध घालायचे. दालचिनी, लवंग, विलायची, मिरे वगैरे जे आवडत असेल त्याची पूड, मीठ घाला. थंडीच्या दिवसांत या सूपची लज्जत घ्याच. ती परतून घ्यायची स्टेप आणि नारळाचे दूध अजिबात वगळायचे नाही. मी असेच सूप समर स्क्वाशचेपण करुन पाहिले, तेवढेच छान झाले.

रेवती's picture

20 Nov 2015 - 2:31 am | रेवती

धन्यवाद.

अजया's picture

18 Nov 2015 - 10:09 am | अजया

मस्तच दिसतेय भाजी.

वेल्लाभट's picture

18 Nov 2015 - 11:32 am | वेल्लाभट

अरे ही क्लास लागते. आई करते कधीतरी; पण सालासकट. जबरदस्त आवडते.

बाकी पाकृ मस्त ! फोटोही छान. वाह.

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2015 - 12:20 pm | दिपक.कुवेत

बघुन ह्र्द्यात (गोड) कळ उठली आहे. फारच टेम्टींग दिसतेय ब्वॉ. आता करावीच लागणार. पण खसखस ला पर्याय सांग. ईथे (मिडल ईस्ट) मधे बॅन आहे आणि सालांची चविष्ट चटणी होते. करतेस की फेकून देतेस?

पैसा's picture

18 Nov 2015 - 12:26 pm | पैसा

माझीही आवडती भाजी! आजच केळफूल+वाटाणा भाजी केली आहे त्यामुळे असल्या फोटोबद्दल जाओ, तुमको माफ किया!

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2015 - 12:56 pm | स्वाती दिनेश

भाजी मस्तच दिसतेय.
आदल्याच दिवशी करून ठेव ग, मुरलेली भाजी खायला येते. कधी येऊ तिकडे? तेवढं सांग.. मी तुझ्यासाठी ढेमसं घेऊन येईन फ्राफु हून.. :)
स्वाती

मस्त दिसतीये भाजी. सद्ध्या भोपळे आहेतच बाजारात. तर नक्की करुन बघते.

नक्की करून बघते. भाजीचा रंग सुरेख दिसतोय

वाह लाल भोपळा, थोडं आधी पाह्यलं असतं तर आजच केली असती. असो, विकांतासाठी करेन..

पियुशा's picture

18 Nov 2015 - 7:19 pm | पियुशा

भाजी चविष्ट दीस्तेय

पद्मावति's picture

19 Nov 2015 - 6:58 pm | पद्मावति

वॉव....मस्तं दिसतेय भाजी.
पाककृती आणि फोटो दोन्हीही जबरदस्त!

नूतन सावंत's picture

19 Nov 2015 - 7:29 pm | नूतन सावंत

छानच दिसतेय भाजी,अनायासे थंडी सुरु झाल्याने तेल जास्त असले तरी करून पाहण्यात नक्की येईल.

फार छान दिसत आहे भाजी. नक्की करुन पाहणार!

सानिकास्वप्निल's picture

20 Nov 2015 - 4:32 am | सानिकास्वप्निल

लाल भोपळ्याचे सर्व प्रकार आवडतात. बाकरभाजी एक-दोनदा खाल्ली आहे. तुझ्या पद्धधतीने बनवून बघेन कधी.
मस्त पाकृ व देखणा फोटो :)

सूड's picture

19 Feb 2016 - 2:23 pm | सूड

मधुरा देशपांडे's picture

19 Feb 2016 - 3:24 pm | मधुरा देशपांडे

वाह!! मस्त दिसते आहे. करून आवर्जून कळवले आणि तेही फोटोसहित यासाठी विशेष धन्यवाद. Danke sehr!! :)

पूर्वाविवेक's picture

19 Feb 2016 - 2:37 pm | पूर्वाविवेक

मस्त दिसतीये भाजी. मी पण गेल्या आठवड्यातच केली होती पण तेरी भाजी मेरी भाजीसे लाल कैसे? (तेरी साडी मेरी साडीसे च्या चालीवर) :)
भाजीला रंग आणि तवंग मस्त आलाय.

विवेकपटाईत's picture

19 Feb 2016 - 6:34 pm | विवेकपटाईत

तोंडाला पाणी आले. भाजी करून बघेन. घरात खसखस आणि खोबर आहेतच. आजकाल मी दररोज गाजर टोमाटो आणि लाल भोपळ्याचे मिक्स सूप रोज पितो आहे.