नमस्कार मिपाकरांनो !!
तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!! ही दिवाळी आपल्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान, यश, भरभराट घेऊन येवो हिच मंगलमयी शुभेच्छा!!
दिवाळीनिमित्त एक छानशी गोड पाककृती घेऊन आलेय, चला तर साहित्य बघुया :)
साहित्यः
अर्धा लिटर दूध
४०-५० ग्राम खवा
दीड टेस्पून लिंबाचा रस
३/४ वाटी साखर
दीड वाट्या पाणी
१/२ टीस्पून वेलचीदाणे
पिवळा खाण्याचा रंग
गुलाबी खाण्याचा रंग
पत्रीखडीसाखर
२ टेस्पून पिठीसाखर
पिस्त्याचे काप सजावटीसाठी
एडिबल पर्ल्स सजावटीसाठी (ऐच्छिक)
पाकृ:
जाड बुडाच्या पातेल्या दूध उकळायला ठेवावे.
दूधाला उकळी आली की त्यात हळू-हळू लिंबाचा रस घालणे व सतत ढवळणे.
दूध फाटायला/फुटायला/नासायला लागले व त्याचे पाणी (व्हे) वेगळे होऊ लागले की त्यात बर्फाचे खडे टाकून गॅस बंद करावा.
बर्फ पूर्ण वितळला की दूध मलमल किंवा सूती कापड्यात ओतून, गाळून घेणे.
कापडाला घट्ट पिळून पनीरचे पाणी काढून टाकणे.
थंड पाण्याच्या नळाखाली पोटली धुवावी म्हणजे लिंबाचा वास जाईल.
१/२ तास पोटली टांगून ठेवावी म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल.
१/२ तासानंतर पनीरला ताटात काढून चांगले ७-८ मिनिटे मळावे. पनीर अगदी मऊसूत झाले पाहिजे.
थोडे पनीर तळहातावर घेऊन चपटे करावे व त्यात पत्रीखडीसाखर ठेवून हलक्या हाताने वळा, एकही चीर नको.
(खडीसाखरचा वापर ऐच्छिक आहे, ती घातल्याने रसगुल्ले आतून पोकळ व हलके होतात तसेच पनीर चांगले मळले तरी ते हलके होतात)
पॅनमध्ये दीड वाट्या पाणी, वेलचीदाणे घालून उकळी काढावी.
उकळी आली की त्यात ३/४ साखर घाला व ढवळा.
साखर विरघळली की त्यात तयार केलेले पनीरचे गोळे सोडा व झाकण लावून १०-१५ मिनिटे शिजवा. रसगुल्ले शिजल्यावर आकाराने दुप्पट झाले पाहिजे.
रसगुल्ल्यांच्या बाऊल मध्ये खाण्याचा पिवळा रंग घालून, मिक्स करुन पूर्ण गार होऊ द्यावे.
(तुम्ही हे रसगुल्ले कुकरला ही शिजवून शकता, कुकरला २-३ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करुन नळाखाली कुकर धरायचा म्हणजे वाफ निघून जाईल)
एका ताटात खवा कुसकरून घ्यावा.
त्यात खाण्याचा गुलाबी रंग, पिठीसाखर व १/४ टीस्पून वेलचीपूड घालून चांगले मिक्स करावे. (पिठीसाखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यावे)
रसगुल्ले हलके दाबून पाक निथळून घ्यावे. त्यांचे दोन भाग करावे.
प्रत्येक अर्ध्या भागावर खव्याचे मिश्रण पसरावे.
वरुन पिस्त्याचे काप व एडिबल पर्ल्स लावावे.
गार करुन रसमाधुरी मिठाई सर्व्ह करावी.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__
नोटः
* पनीर चांगले मळावे म्हणजे रसगुल्ले मऊसूत व लुसलूशीत होतात.
* खाण्याचा रंग आवडीप्रमाणे घालावे, नाही घातला तरी चालेल.
* खवा शक्यतो घरचाच व ताजाच असावा. (मिल्क पावडर घालून खवा बनवू नये चवीत फरक पडतो)
* पनीरमध्ये बाईंडिंगसाठी रवा, मैदा, कॉर्नफ्लार अजिबात मिसळू नये, रसगुल्ले गार झाल्यावर वातड होतात किंवा चवीत फरक पडतो.
* अर्धा लिटर दूधाच्या पनीरमध्ये मध्यम आकाराचे सहा रसगुल्ले तयार होतात.
* याप्रमाणेच खवा जरा परतून घ्यायचा व त्यात पिठीसाखर मिसळून घ्यायची. मिश्रण गार झाल्यावर खव्याच्या पारीत पाक निथळून घेतलेला रसगुल्ला स्टफ करुन गोळा वळायचा. हा गोळा ड्रायफ्रुट्सच्या पावडरमध्ये घोळवून घ्यायचा. रसकदम मिठाई तयार होते.
* एडिबल पर्ल्सऐवजी चांदीचा वर्ख ही लावू शकता.
प्रतिक्रिया
9 Nov 2015 - 4:55 pm | पियुशा
वॉ व ...... ऑस्स्सम तुलाही दिपावलीच्या गोगोड् शुभेच्छा :)
9 Nov 2015 - 4:55 pm | टवाळ कार्टा
कस्ले भारी दिस्तेय :)
यम्मी
9 Nov 2015 - 4:55 pm | मुक्त विहारि
सुंदर फोटो आणि व्यवस्थित पा.कृ.
मी पहिला पाट अडवून बसत आहे.
9 Nov 2015 - 5:13 pm | अक्षया
वाह सुंदर पाकॄ !
नेहमीप्रमाणेच.. :)
9 Nov 2015 - 5:13 pm | अजया
अ प्र ति म.
तुझी पाकृ आली दिवाळी सुरु झाल्यासारखं वाटलं!
9 Nov 2015 - 5:31 pm | दिपक.कुवेत
काय कलर कॉम्बीनेशन आहे!! जीव गेला. ते शेवटचं हार्टचं डिझाईन कसं केलस ते पण सांग. अप्रतिम झालयं सगळं.
9 Nov 2015 - 5:35 pm | मितान
किती भारी !!!
त्या मोत्यांमुळे एकदम दिवाळी झालीये रसमाधुरी !
हे नाव तू ठेवलंस की आधीच होतं?
9 Nov 2015 - 5:42 pm | स्मिता_१३
रसमाधुरी जितकी तोंपासु, तिचे नाव आणि सादरीकरण ही तेवढेच कल्पक.
सानिकाच्या लौकिकाला साजेसे.
9 Nov 2015 - 6:43 pm | रेवती
खासच! नवीन प्रकार पाहून मस्त वाटले. सादरीकरणाबद्दल नेहमीचेच म्हणते.
9 Nov 2015 - 6:51 pm | सूड
रेशिपी नेहमीप्रमाणेच मस्त!!
ह्यासाठी दंडवत. निदान एक टीस्पून कॉर्नफ्लोर शिवाय रसगुल्ल्यांचा विचारच करु शकत नाही मी. असे रसगुल्ले कुकरमध्येच व्यवस्थित राहतात. तिथून कुठे न्यायचे झाले की कॉर्नफ्लोरशिवायच्या रसगुल्ल्यांची बासुंदी ठरलेली! ;)
9 Nov 2015 - 6:54 pm | सर्वसाक्षी
रंग, रुप, स्वाद आणि गंध या पैकी पहिले दोन खाद्यगुण अप्रतिम उतरले आहेत! उरलेले दोन खाद्यगुण प्रत्यक्ष अनुभवायची उत्सुकता या पाकृने चाळवली आहे.
9 Nov 2015 - 7:21 pm | चतुरंग
काय ते सादरीकरण? काय ते अत्याचार? :)
(खुद के साथ बातां : रंगा, या तैंचा आयडी एखाद्या महिन्यासाठी गोठवता येईल का? ....पण नकोच, महिन्याभराने एवढ्या रेसिपीज एकदम टाकतील की जास्तच त्रास व्हायचा! :( )
-रंगा
10 Nov 2015 - 1:57 am | लाल टोपी
एक एक शब्दाशी सहमत.
9 Nov 2015 - 7:49 pm | पैसा
काय जबरदस्त पाकृ आहे!
9 Nov 2015 - 8:01 pm | मधुरा देशपांडे
सहसा कुणाकडे जाताना त्यांनी विचारलं की 'काय करु' तरीही उगाच मनात येईल ते सांगु नये असे सांगितले जाते. पण तुझ्याकडे येताना मात्र ट्रिपच्या प्लॅनिंग इतकाच वेळ तुला काय काय करायला सांगायचे यात घालवणार आहे आणि तुला भरीस पाडणार आहे. :)
पाकृ आणि सादरीकरण आवडले हेवेसांन.
9 Nov 2015 - 8:37 pm | स्वाती दिनेश
क्लास... मस्त मस्त!! दिवाळी स्पेशल पाकृ सह्हीच आहे.. नावही त्या पदार्थाला साजेसे ..
स्वाती
9 Nov 2015 - 9:57 pm | नूतन सावंत
वा!वा! सानिका.क्या बात है.तोंडातून शब्द फुटेनासा झाला आहे.महापूर आलाय तोंडात.
9 Nov 2015 - 11:58 pm | शब्दबम्बाळ
जबरदस्त!
सुंदर, सुरेख, सुमधुर आणि काय काय असेल ते सगळे!!!!
10 Nov 2015 - 12:29 am | प्रभाकर पेठकर
आज पर्यंत अनेकदा प्रयत्न करूनही मला दाद न दिल्या पदार्थांपैकी रसगुल्ला हा एक आहे. आता पुन्हा एकदा तुमच्या टिपांनुसार रसगुल्ले करून पाहीन मगच सविस्तर प्रतिसाद देईन.
10 Nov 2015 - 2:25 am | पद्मावति
वॉव....मस्तं. पाककृती आणि सादरीकरण नेहमीप्रमाणेच एक्सलंट.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सानिका.
10 Nov 2015 - 6:45 am | कविता१९७८
वाह मस्त, काय काय चविष्ट आणि वेगवेगळ्या पाकक्रुती देतेस ग
10 Nov 2015 - 10:34 am | अत्रुप्त आत्मा
10 Nov 2015 - 10:44 am | परिकथेतील राजकुमार
पनीर वैग्रे काय :(
काहीही खात असतात लोकं.
11 Nov 2015 - 2:16 pm | प्रीत-मोहर
=)) =)) अजुन थर्माकोलचे तुकडे वगैरे म्हंटले नाहीत ते!!!
सान तुझ्या पाकृला प्रतिसाद देताना, काय प्रतिसाद देउ असा विचार करावा लागतो बै नेहमी इतक्या एक से बढकर एक पाकृ टाकते तु. त्यामुळे आता ह्यापुढे तुझ्या प्रत्येक पाकृ ला __/\__ हा प्रतिसाद
10 Nov 2015 - 6:55 pm | Mrunalini
अप्रतिम आहे पाकृ सानि. फोटो सुद्धा भारी आहेत.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! :)
10 Nov 2015 - 7:13 pm | उगा काहितरीच
काय सुंदर दिसत आहे शेवटचा फोटो ! अप्रतिम .
10 Nov 2015 - 7:18 pm | एस
धागा पाहिला नाहीये.
प्रतिसादही दिलेला नाहीये.
अशी मनाची समजूत घालून पाहण्यात आली आहे.
व्यर्थ हेवेसांनल...!
10 Nov 2015 - 11:55 pm | Maharani
जबरदस्त!!!
11 Nov 2015 - 4:05 am | कौशी
अप्रतिम पाकक्रुती.. आवडली..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
11 Nov 2015 - 11:29 pm | चिंतामणी
मार डाला मार डाला गाणे कानात घुमु लागले.
बाकी प्रतिक्रीया तुला माहीत आहेच.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__
12 Nov 2015 - 12:51 pm | मनीषा
सुंदर! अतिसुंदर !
रंग आणि रूप तर छायाचित्रात दिसतेच आहे .
रस आणि गंध सुद्धा खास असणार.
12 Nov 2015 - 1:22 pm | सुमीत भातखंडे
सुंदर पाकृ.
12 Nov 2015 - 6:31 pm | मदनबाण
शब्दच संपले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam