नागराजाच्या राज्यात.. अगुंबे

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in भटकंती
8 Nov 2015 - 11:18 pm

|| श्री गुरवे नम: ||

नागराजाच्या राज्यात.. अगुंबे

पश्चिम घाट – विषुववृत्तीय दाट पावसाळरान. जागतिक वारसा प्रभाग म्हणून नोंद झालेला हा प्रदेश म्हणजे वन्यजीवप्रेमींसाठी मोठी पर्वणीच. गुजरातमधल्या डांगपासून थेट तामिळनाडूपर्यंत, पश्चिम किनारपट्टीला साधारण समांतर पसरलेला डोंगरप्रदेश. कोकणातून घाटावर जायला याच डोंगररांगांमधून काढलेल्या घाटरस्त्यांनी आपण अनेक वेळा प्रवास केलेला असतो. त्यातच कधीतरी एखाद्या वन्य प्राण्याने अवचित दर्शन दिलेल असतं. माझ्यासारखा जंगली (जंगलप्रेमी) माणसाने एकदा या प्रदेशाला भेट दिल्यावर त्याच्या प्रेमात पडणं अगदी साहजिकच आहे. त्यात पावसाळा म्हटलं की पश्चिम घाटात किमान एक भ्रमंती केलीच पाहिजे असं प्रलोभन - व्यसनच म्हणा ना - खुणावत असतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सह्याद्रीमध्ये आंबोलीत भ्रमंती केली होती. (उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात – भाग १, भाग २). आता या वर्षी एका मित्राने आयोजन केल्यामुळे दक्षिणेकडच्या कर्नाटकात अगुंबे भ्रमंतीचा योग आला.

मुंबई ते अगुंबे : जवळजवळ १३०० कि.मी. ट्रेनने (मत्स्यगंधा एक्स. १२६१९, सोळा-सतरा तास,) उडुपी रेल्वे स्टेशनपर्यंत. तिथून बस डेपोपर्यंत प्रीपेड तीन आसनी रिक्षा (सुमारे अर्धा तास, ८० रु.), तिथून बसने अगुंबे बस डेपो (दीड तास, ६० रु.). इथून मुक्कामाच्या जागेपर्यंत (ARRS) रिक्षा (अर्धा तास, १०० रु.).
आपला जीव मुठीत धरून, डोळे गच्च बंद करून आणि दोन्ही हातांना जे काय लागेल ते घट्ट धरून उडुपी ते अगुंबे हा घाटातून बस प्रवास करायचा असतो. ४ या आकड्यासारख्या अनेक चढउतारांवरून गाडी चालवताना गाडीचा वेग ६०-७०पेक्षा कमी असला तर ड्रायव्हरला कामावरून काढून टाकायचा नियम असावा, किंवा ड्रायव्हरला कमीपणा (इज्जत का इडली-डोसा) वाटत असेल अशी शंका येते. अशाच वळणांवरून विरुद्ध दिशेने येणार्‍या गाड्यांशी गळाभेट चार वेळा जेमतेम दोन-तीन इंचाने चुकली. ड्रायव्हरने कानडीत सडसडून काहीतरी उद्गार काढले. बहुधा कानडीतून ‘अम्मा-आक्कां’ची ‘भ’कार-‘म’कारयुक्त आठवण असावी, कारण बसमधल्या कानडी अम्मा-आक्कांच्या चेहर्‍यावर ‘मेल्याच्या जिभेला काही हाड.. बायकांसमोर असं काही बोलतात का..’ असे नाराजीचे भाव उमटले.

मग अगुंबेला (परतीच्या प्रवासात उडुपीला) उतरल्यावर अंग झाडून आपली सर्व हाडं शाबूत असल्याची आणि असली तर ती सर्व योग्य जागी असल्याची खातरी करून घ्यायची. आम्ही बसमधून उतरल्यावर मला ड्रायव्हर-कंडक्टरचे पाय धरायचे होते, पण बहुधा कमरेतल्या मणक्यांनी जागा सोडल्यामुळे मला वाकताच न आल्यामुळे शेवटी नुसतेच (कोपरापासून) हात जोडून त्यांना नमस्कार केला. असो.

अगुंबे हे नागराजाच्या विणीचं प्रमुख ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतंच. नागराज (King Cobra Ophiophagus hannah) हा भारतातला सर्वात मोठा साप. जवळजवळ साडेचार-पाच मीटर लांब असतो. आपल्या अंड्यांच्या संरक्षणासाठी घरटं बनवणारा हा जगातला एकमेव साप आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मिलन झाल्यावर एप्रिल-मेमध्ये मादी वाळक्या पानांचा ढीग बनवून त्यात अंडी घालते. पावसाळा सुरू होईपर्यंत त्यातून पिल्लं बाहेर येतात. डोंगरारांगांमधलं दमट, ओलसर आणि माणसाने वाट न लावलेलं अनाघ्रात पावसाळरान हे त्याचं वसतिस्थान आणि इतर साप (मुख्यत: धामण, दिवड इ.) हे प्रमुख अन्न या सर्व गोष्टी अगुंबेला जमून आल्या आहेत. त्यामुळेच नागराजांनी इथे आपलं साम्राज्य स्थापन केलंय.

जंगल परिसर - ३६० अंशात एक अवलोकन

रॉम व्हिटेकर आणि ए.आर.आर.एस.

सरपटणार्‍या प्राण्यांचे अभ्यासक रॉम व्हिटेकर यांनी काही वर्षांपूर्वी मद्रासला (आताच्या चेन्नईला) सुसर संशोधन आणि प्रजनन केंद्र स्थापन केलं. नागराजाबरोबरच एकूणच पावसाळरानाविषयी सखोल संशोधन व्हावं, यासाठी मूलभूत सुविधा असलेलं एक संशोधन केंद्र - Agumbe Rainforest Research Station - ARRS - त्यांनी इथे २००५मध्ये स्थापन केलं.

अगुंबे परिसरातल्या काही स्थानिक आदिवासी जमाती सर्प हाताळण्यात अत्यंत कुशल आहेत. त्यांच्या साहाय्याने नागराज आणि इतर विषारी सर्प पकडून, सर्पविषविरोधी लस (Anti snake venom) बनवण्यासाठी त्यांचं विष काढून ते संशोधन संस्थांकडे पाठवलं जायचं. पूर्वी इथे साप बर्‍याच प्रमाणात मारले जायचे, ते या उपक्रमामुळे खूपच कमी झालं. नॅशनल जिओग्राफिकने यावर एक माहितीपटही बनवला आहे. त्यामुळेच रॉम आणि ए.आर.आर.एस. खर्‍या अर्थाने प्रकाशात आले.

ARRS     ARRS

दोन-तीन वर्षांपूर्वी इथे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला. नागराजांना पकडून त्यांच्या शरीरामध्ये एक छोटीशी चिप बसवायची, म्हणजे त्यांचा मागोवा घेता येतो आणि त्यांच्या सखोल अभ्यासासाठी बरीच माहिती मिळते. त्यापासून मिळणार्‍या माहितीची छाननी सुरू आहे.

संशोधन केंद्रात शिरल्यावर “काय, कसा झाला प्रवास?” असं खास क्वल्लापुरी ढंगातलं स्वागत कानावर पडलं आणि कर्नाटकच्या मधोमध असलेल्या दाट जंगलात, मुंबईपासून हजारभर कि.मी. अंतरावर मायमराठीतले शब्द आयकून क्षनभर घ्येरीच आली बगा.. धीरज हा कोल्हापूरचा शेतकी पदवीधर, सहा वर्षांपूर्वी कुठल्यातरी संशोधन प्रकल्पनिमित्त इथे आला आणि तेव्हापासून इथेच राहतोय, इथलं संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतोय. अत्यंत मितभाषी धीरजला बोलतं केल्यावर मात्र इथली अनेक रहस्यं उलगडत जातात.

नागराज आणि पावसाळरान यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन करण्यासाठी इथे अनेक विद्यार्थी, संशोधक येतात. त्यांच्या भोजन-निवासाची सोय इथे केली जाते. झोपायला गाद्या-उशा-पांघरुणं आहेत. दाक्षिणात्य पद्धतीचं (म्हणजे मुख्यत: भात. इथे तिन्ही त्रिकाळ भात खाल्ल्यामुळे, परत आल्यावर महिनाभर भात वर्ज्य केला.) शाकाहारी साधंसं जेवण, नाश्ता असतं. मात्र हे ‘हॉलिडे रिसॉर्ट’ नाही, त्यामुळे इथे कोणत्याही ‘लक्झरी’ नाहीत. सौर प्रणालीद्वारे वीज मिळते, त्यामुळे टीव्ही-फ्रीज-एसी-गिझर सोडाच, पंखेही नाहीत. फक्त दिवे आणि बॅटरी चार्जिंग (आणि केंद्रातला कॉम्प्युटर, महाजाल जोडणी) यासाठी वीज आहे. (आपल्याला आणखी काय पाहिजे म्हणा!) इथे फक्त बीएसएनएलचं मोबाइल नेटवर्क चालतं. माझं डॉल्फिन नेटवर्क मुंबईत नीट चालायची मारामार, पण तिथे मात्र ते आपोआप बीएसएनएलमध्ये गेल्यामुळे फक्त माझा आणि आणखी एकाचाच मोबाइल चालत होता.

ARRS Guest huse
आम्ही इथे राहिलो.

आमच्या राहायच्या खोलीच्या बाहेरच जंगलातली जीवविविधता दिसायला स्रुरुवात झाली. आंबोलीला बघितलेले जीव इथे बघायला मिळालेच, त्याशिवाय इतरही अनेक जीव दिसले. संशोधन केंद्रात पाऊल टाकल्यावर या मलबार चापडाने (Malabar pit viper Trimeresurus malabaricus) स्वागत केलं. दरवाजातच आडव्या बांबूला शेपटीचा वेढा घालून बसला होता. हातासारखा उपयोग करून शेपटीने पकड घेता येते, या शेपटीला Prehensile tail म्हणतात.
DSC04181

इथे खूप उंचच उंच वृक्ष आहेत. या उंच वृक्षांमधून सहजतेने वावरण्यासाठी, भक्ष मिळवण्यासाठी आणि भक्षकापासून संरक्षणासाठी जमिनीवरच्या काही प्राण्यांनी हवेत ‘तरंगण्याची’ क्षमता विकसित केली आहे. आंबोलीला दिसलेल्या उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाप्रमाणे इथे तरंगणारा सरडा, साप आणि खार आहेत. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या दोन्ही बाजूंना पातळ पडदे असतात. ते पसरून हे प्राणी उंच जागेवरून खालच्या जागेवर तरंगत येऊ शकतात. आम्हाला तरंगणारा सरडा (Gliding lizard, Draco dussumieri) आणि साप (Ornamental flying snake Chrysopelea ornata) दिसले, पण कॅमेर्‍यात काही टिपता आले नाहीत.

सोनेरी बेडूक (Golden Frog Hylarana aurantiaca). आंबोलीला पाहिलेल्या कास्यबेडूक ( Bronze Frog Hylarana temporalis) आणि दुरंगी बेडूक (Bicoloured frog Clinotarsus curtipes) यांचा हा भाईबंद.
Golden frog

जवळच एक डबकं होतं, तिथे रोज रात्री दोन नर सोनेरी बेडकांची जुगलबंदी चालायची.

निळ्या डोळ्यांचा बेडूक (Raorchestes Luteolus??). याला मराठीतून नाव सुचलं – ‘नीलाक्ष’.
Blue Eyed Frog

आपला नेहमीचा बेडूक (Indian bull frog Hoplobatracus tigerinus) याच्या शरीरावरची हिरवी नक्षी हळूहळू नाहीशी होते.
Indian Bull Frog

परिसराशी सरूपतेची (chemoflageची) दोन उदाहरणं

Cricket frog     Ramanella
क्रिकेट फ्रॉग (Cricket frog Zakirana sp.) आणि आखूडतोंड्या रामानेल्ला (Narrow mouth frog Ramanella mormorata)

काही कीटक, विंचू वगैरे
Catterpiller    Pupa in bark
पान खाणारी, पतंगाची अळी, झाडाच्या पोकळ खोडात लपलेला हा एका पतंगाचा कोष

Katydid    Round Headed Katydid
कॅटायडिड (Katydid) आणि हिरवा कॅटायडिड (Round Headed Katydid Holochlora albida)

Stick Insect    DSC04184
वाळक्या काटकीसारखा काडीकिडा (Stick insect, Indian walking stick Carausius morosus) आणि गवतावर बागडणारा नाकतोडा

DSC04186     Scorpion
चॉकलेट पॅन्झी फूलपाखरू (Chocolet Pansy Junonia iphita), विंचू (Scorpion Palemnaeus sp.)

अशा दाट पावसाळरानात उंचच उंच वाढलेल्या झाडांमुळे जमिनीपासून पन्नास-साथ फुटांवर एक ‘जंगलछत’ (कॅनोपी) तयार होतं. या छतामध्ये मोठ्या झाडाच्या आधाराने वाढणार्या> छोट्या वेली-वनस्पती (एपिफाइट्स), त्यावर आकर्षित होणारे कीटक, इतर छोटे-मोठे जीव, फांद्यांच्या बेचक्यात साचलेलं पाणी यांनी मिळून इतक्या उंचावर फांद्यांच्या बेचक्यात एक वेगळीच स्वतंत्र छोटीशी परिसंस्था तयार होते. ती पाहण्यासाठी उंच झाडाच्या एखाद्या फांदीवर झोल टाकून जाड दोरी टाकून, त्याला जुमार्ससारखी साधनं लावून वर चढायचं, याला म्हणतात कॅनोपी क्लाइंबिंग.. खरं तर मला रॉक क्लाइंबिंग, जुमारिंग, रिव्हर क्रॉसिंग, पर्वतारोहण अशा प्रकारांमध्ये रस नाही. पण इतक्या उंचावरून खाली, चहूबाजूना बघायचं हा एक वेगळाच, अगदी पक्ष्याला सगळ जग कसं दिसत असेल असा (बर्डस आय व्ह्यू) अनुभव असतो.

कॅनोपी क्लाइंबिंग करताना सुरक्षिततेसाठी हारनेस, हेल्मेट, जुमार्स वगैरे जामानिमा करावा लागतो.

कॅनोपी क्लाइंबिंगसाठी तयार
Canopy climbing

वर जाताना

खाली येताना

एका वेळेस दोघं किंवा तिघंही

Canopy climbing    Canopy climbing

या वेळी काही कारणांनी मी फार उंच चढू शकलो नाही, पण पुन्हा संधी मिळाली की थेट वरपर्यंत नक्की चढेन.

रात्री भटकंतीला बाहेर पडल्यावर आभाळ निरभ्र होतं, तेव्हा अगणित तारे चमचमत होते. (मुंबईत हे दृश्य तसं दुर्मीळच! मुंबईत तर प्रकाशाचंही प्रदूषण!!) मध्येच थोडासा मोकळा, शेतासारखा गवताळ भाग लागला. धीरजने सर्वांना टॉर्च बंद करायला सांगितलं, आणि.. ओहो, काही सेकंदांतच एक अलौकिक दृश्य बघायला मिळालं! गवतातले असंख्य काजवे (अळ्या आणि माद्या) लुकलुकायला लागले. ‘तारे जमींपर..’ जणू आकाशातले लक्ष लक्ष तारे जमिनीवर अवतरले आहेत असं ते दृश्य! कॅमेर्‍यात टिपता आलं नाही, तरी मनात मात्र साठवून ठेवलंय.

आम्ही नागराजाच्या राज्यात गेलो होतो. पण नागराजांचं दर्शन झालं नाही. लाजवंती (लोरिस Slow Loris Nycticebus coucang), नकटा / नाकाड्या चापडा (Hump nosed pit viper Hypnale hypnale) असे अनेक प्राणी दिसले नाहीत. पण तरीही जंगलाचं आकर्षण कमी न होता वाढतच जातं. कारण..

समुद्र, आकाश, पर्वत, जंगल - निसर्गाची ही विविध रूपं. या तिन्ही रूपांनी निसर्ग आपल्याला भव्यतेची, विशालतेची अनुभूती देत असतो. समुद्रकिनार्‍यावर बसून समुद्राकडे पाहणं, त्याची गाज ऐकणं, जंगलात आजूबाजूच्या दाट वृक्षराजीकडे पाहणं, एखाद्या निर्जन ठिकाणाहून आकाशाचं, तार्‍यांचं दर्शन.. भव्यतेच्या, विशालतेच्या या दर्शनाने मनातली सगळी मरगळ, नैराश्याची भावना, नकारात्मक विचार दूर होतात. रोजच्या जीवनसंघर्षाला सामोरं जायला नव्याने उभारी येते, नवं बळ मिळतं. नव्या कल्पना सुचतात, नवं काहीतरी बघायला मिळतं. म्हणून तर वेळ काढून अधूनमधून जंगलभ्रमंती केली पाहिजे, समुद्रकिनारी निवांत फेरफटका मारला पाहिजे, डोंगर-दर्‍यांत, पर्वताच्या कुशीत विसावलं पाहिजे ...

..पुढच्या जंगलभ्रमंतीचे बेत आखायला सुरुवात केली पाहिजे आता..

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Nov 2015 - 11:27 pm | मुक्त विहारि

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

वाखूसा आहे.

एक एकटा एकटाच's picture

8 Nov 2015 - 11:29 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहे लेख

एस's picture

8 Nov 2015 - 11:53 pm | एस

वाखुसाआ. सविस्तर प्रतिसाद देणार आहे. तूर्तास पोच.

धावता वाचला लेख.प्रतिक्रिया उद्या.फोटो पाहिले मस्त आहेत.

प्रचेतस's picture

9 Nov 2015 - 12:19 am | प्रचेतस

निव्वळ अफाट.
आपले लेख म्हणजे पर्वणी असतात.

शलभ's picture

9 Nov 2015 - 12:23 am | शलभ

खूप मस्त..

लेखन , फोटू व व्हिडिओज आवडले.
परिसराशी एकरूप झालेल्या दोन फोटूतील डावीकडील चित्रात कोणी दिसले नाही. उजवीकडील चित्रात मात्र भिजलेल्या दगड्यांच्या बेचक्यात बेडूक बसलाय ते पाहिले.

पद्मावति's picture

9 Nov 2015 - 2:09 am | पद्मावति

अतिशय सुंदर लेख.

आदूबाळ's picture

9 Nov 2015 - 2:41 am | आदूबाळ

जबरदस्त! जॅक डॅनिएल्सला रोम्युलस व्हिट्टेकर यांच्याबद्दल भक्तिभावाने बोलताना ऐकलं आहे.

पुभाप्र!

(व्हिडियो उघडला नाही. बाकी कोणाला हा प्रॉब्लेम येतो आहार का?)

मी सगळ्या चित्रफिती पाहू शकले.

शिव कन्या's picture

9 Nov 2015 - 3:36 am | शिव कन्या

अप्रतिम!काजव्यांचे झाड परत पाहील्यासारखे वाटले.

जॅक डनियल्स's picture

9 Nov 2015 - 6:24 am | जॅक डनियल्स

खूप सुंदर लेख आणि फोटो.
मलबार चापड्या च्या प्रेमातच पडलो मी. आपण खूप भाग्यवान आहात की आगुंबे ला जायची संधी मिळाली. माझे पण ते स्वप्न आहे, की तिकडे जाऊन १-३ महिना राहायचे.(बघू कधी पूर्ण होते ते ..) किंगला जंगलात बघण्यासाठी तुम्हाला खूप मुक्काम करायला लागेल.

मी तर भारतात खरे तीनच सर्पतज्ञ मानतो -- १. आण्णा (निलीमकुमार खैरे ) २. रोम व्हिटेकर ३. दीपक मित्रा , या ३ लोकांनी जेंव्हा काम चालू केले तेंव्हा सापांसाठी काम करणे म्हणजे पाप करण्याजोगे होते, तरी त्यात पण त्यांनी जबरदस्त काम केले आहे.

असेच लिहित जा. (आणि तो विंचू नसून इंगळी आहे, विंचवाच्या नांग्या बारीक असतात.)

जॅक डनियल्स's picture

9 Nov 2015 - 6:27 am | जॅक डनियल्स

त्या विंचवाचे नाव Heterometrus longimanus आहे.

मुक्त विहारि's picture

9 Nov 2015 - 6:46 am | मुक्त विहारि

ह्यातला फरक आणि प्रजातीचे नांव सांगीतल्याबद्दल धन्यवाद....

बादवे,

आता अमेरिकेतल्या सापांविषयी माहिती कधी देताय?

(स्वगत : गारूडी, सापांना भुलवायला, पुंगी वाजवतो....तसेच जॅक डॅनियलला, मिपावर बोलवायचे असेल तर, सापांवर लेख टाकायचा. जॅक डॅनियल हलकेच घेतील, ह्याची कल्पना आहे.)

जॅक डनियल्स's picture

9 Nov 2015 - 7:27 am | जॅक डनियल्स

आधीचीच लेखमाला पूर्ण करायची आहे आधी...मग अमेरिकेचे बघू...
मी नेहमीच मिपावर आहे पण लेख लिहायला एक आख्खा दिवस काढणे शक्य होत नाही.

रोज थोडा-थोडा लेख लिहायचा आणि आपणच आपल्याला व्यनि करत साठवायचा.

मग एक दिवस तास-भर वेळ काढला की झाले...

गेले १५-२० दिवस मी पण एका लेखमालेची तयारी ह्याच रीतीने करत आहे.

अजया's picture

9 Nov 2015 - 8:55 am | अजया

अप्रतिम लेख.
मलबार पिट व्हायपर खोलीतच ! मी बघून काय केलं असतं वाटून लाज वाटल्या गेली आहे!
तुमच्यासोबत जंगल भ्रमंती करण्याची इच्छा आहेच हो तरीही! नाहीतर फक्त मुविंना न्याल!

पियुशा's picture

9 Nov 2015 - 11:38 am | पियुशा

++ ११११११ टु अजया ताई,

जगप्रवासी's picture

9 Nov 2015 - 11:45 am | जगप्रवासी

अप्रतिम लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2015 - 11:53 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण लेख आणि चित्रे ! एकदा भटकायची इच्छा आहे तुमच्याबरोबर.

नाखु's picture

9 Nov 2015 - 2:51 pm | नाखु

हजेरी पटावर आमचे नाव घेणे ही विनंती..

वाखु साठवली आहे. मस्त मुशाफिरी..

दिवाकर कुलकर्णी's picture

9 Nov 2015 - 2:19 pm | दिवाकर कुलकर्णी

भन्नाट---

सस्नेह's picture

9 Nov 2015 - 3:13 pm | सस्नेह

अफाट सफर आणि दिलकी धडकन बढानेवाले फोटो !

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 10:29 am | कविता१९७८

खूप सुंदर लेख आणि फोटो.

भ ट क्या खे ड वा ला's picture

25 Jul 2017 - 12:14 pm | भ ट क्या खे ड वा ला

परवा भेट झाली तेव्हा या धाग्याबद्दल समजले. फारच छान आणि एकदम अपरिचित ठिकाण. यादी वाढत चालल्ये..