संपादकीय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in दिवाळी अंक
3 Nov 2015 - 9:09 am

'सा मिपाया विमुक्तये'

नमस्कार.
मिसळपावचा चौथा दिवाळी अंक सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. दिवाळी म्हटलं की एक उत्साह आणि आनंदाचा सण. दिवाळीचा सण केव्हा सुरू झाला हे सांगता येणार नाही. पण विद्येचा आणि बुद्धीचा दीप सतत प्रज्वलित करणारा सण म्हणजे दिवाळी. मिपावर असा दीपोत्सव अनेकविध उपक्रम आणि विविध विशेषांकांमुळे सतत दिसतच असतो. आनंदाने देहभान विसरून जावं अशी एक जागा म्हणजे मिसळपाव डॉट कॉम. मराठी भाषेत मराठी माणसांनी लिहिणं आणि वाचणं यासाठी आंतरजालावर प्रसिद्ध झालेलं आणि स्वत:चा एक खास असा ठसा उमटवलेलं मराठी संकेतस्थळ म्हणजे मिसळपाव डॉट कॉम. दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे केवळ शब्दातून व्यक्त होण्याचा नव्हे, तर रोजच्या जगण्यातही अशी दुर्दम्य इच्छा दिसली पाहिजे, असा आशावाद उभा करणारा सण म्हणजे दिवाळी.

निरनिराळ्या दिवाळी अंकांतील लेखनाची प्रत्येक दिवाळीत अगदी रेलचेल असते. कथा, कविता, वैचारिक लेखन, विनोदी लेखन, व्यंगचित्र अशा सर्व प्रकारचं लेखन मिसळपाववर नेहमीच दिसून येत असतं. मिपाच्या आभासी जगातील लोकमंचावर एकमेकांना दृक-श्राव्य स्वरूपात कधीही न भेटलेले अथवा क्वचितच भेटलेले लेखक-लेखिका दिवाळी अंकाच्या निमित्ताने एकोप्याने, सहकार्याने आणि सामंजस्याने एकत्र येऊन सलग चौथ्या वर्षी काही अक्षर साहित्यनिर्मिती करताहेत, ही मिपाकरांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. समाजातील विविध घटना आणि त्यांचं चित्रण लेखनात मिपावर दमदारपणे दिसून येतं. समाजमनातील पारंपरिक ते आधुनिक विचारांचा संघर्षही लेखनात समर्थपणे जसा येऊ लागला आहे, त्याचबरोबर माणूसपणाची जाणीव अतिशय तरलतेने लेखनात दिसून येते. ज्ञानोबा-तुकारामांपासून ते डॉ. कलबर्गीपर्यंतचा वैचारिक संघर्ष आणि उत्तम समन्वयही लेखनात येत आहे. मिसळपाववर मराठी लेखनाची उत्तम पावलं शोधायची असतील, तर गाथासप्तशतीपासून ते कालपर्यंत प्रकाशित झालेल्या कोणा नवकवीची कविताही वाचायला मिळत आहे. लेखनात तितकी समृद्धी आली आहे का हा चिंतनाचा आणि वादाचा विषय होऊ शकेल; परंतु आंतरजालावरील लेखन आता मंदगतीनेही असेल पण ते समृद्ध होत आहे, असं म्हणावं लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि त्याचं प्रतिबिंब लेखनात उमटलंच पाहिजे. अशी प्रतिबिंबं जालावरील विविध लेखनात उमटू लागली आहेत. मिपावरील लेखनाच्या बाबतीत आणि एकूणच जालावरील लेखनाबाबत बालपण, तरुणपण आणि प्रौढ अशी रूपकंही सुचू लागतात. लेखन आशयाच्या बाबतीत एक असा चढता आणि उतरता आलेख आणि क्रमवारीही लेखनात नाही. भाषा, अस्मिता, परंपरा, जीवनातील विविध संघर्ष आणि आधुनिकता याचा प्रचंड ताण लेखनात दिसून येतो. उद्देश मात्र उत्तम अभिव्यक्तीचा आणि आनंदाचा आहे. जालावरील लेखनाच्या बाबतीत सकसपणा येईलही, पण त्यासाठी समाजाचा हरतर्‍हेने विकास व्हायला हवा. जीवनसंघर्ष करणार्‍या वर्गाकडून अतिशय कसदार लेखनाची अपेक्षा करता येणार नाही, हे सत्य आहे. भरल्या पोटाने अगा जर आम्हीही चंद्र पाहतो, तर आम्हीही चांगलं लेखन करू शकलो असतो असंही कोणी म्हणू शकतो. कोणत्याही लेखनाचा मंच हा ललित आणि पारंपरिक लेखनाबरोबर आधुनिक विचारांचा मांडणी करणारा असला पाहिजे, असं वाटतं.

मिसळपाव या पदार्थाच्या नावातच अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. मिसळपाव मराठी संकेतस्थळही त्याला अपवाद नाही. मिसळपाव दिवाळी अंकात अशी मिसळ नक्की वाचायला मिळणार आहे. कविता, ललित-विनोदी लेखन, कथा, मुलाखती, मनोगतं, सत्यकथा, प्रवासवर्णनं, रसग्रहण, खेळ आणि पाककृती अशा विविध लेखांनी नटलेला हा दिवाळी अंक आहे. काही मैलाचे दगड कुठेतरी रोवलेले म्हणून सांगायचे, तर दिवाळीत श्रीमंती मिरवणार्‍यांची दिवाळी संपली की उरलंसुरलं ताटात पडेल अशांच्या आयुष्यातील एक 'उशिरा' आलेल्या दिवाळीचं चित्रण दिवाळी अंकात आहे. प्रचंड ताणतणावासहित आपले स्वत:चे 'हॅपी अवर्स’ शोधणारी स्त्री दिवाळी अंकात डोकावते. मध्यमवर्गीय माणसाची घराची शोधाशोध अतिशय मिश्कील शैलीत ’स्वारीची तयारी’ कुठे घेऊन जाते, हेही लेखनात वाचायला मिळेल. मिपावरच्या काही खास व्यक्ती आणि वल्लींची गाण्यांची फर्माईश काय असेल ते वाचतांनाही मजा येईल. असे विविध लेख, तशाच काही गंभीर कथाही वाचायला मिळतील. कवितांमध्ये जशा पारंपरिक कविता आहेत, तशा काही विनोदी, विद्रोही कविता आणि थोडा चावटपणाही कवितेत वाचायला मिळेल. मुलाखतीत सुरेखा पुणेकर आणि इतिहासाचार्यांशी मिपाकरांच्या गप्पा वाचायला मिळतील. समाजजीवनातील अनुभव आणि इतिहासातील थोर पुरुषांची ओळख अंकात असेल. खेळात बुद्धिबळाच्या पटावरचं आणि क्रिकेटच्या मैदानातलंही आपण दिवाळी अंकात काही वेगळं वाचाल. मराठी चित्रपटाबद्दल वाचायला मिळेल. या अंकात झकास पाककृतीही आहेत, त्याचबरोबर मार्मिक व्यंगचित्रंही आहेत. अशा अनेक प्रकारच्या उत्तम लेखनाची मिसळ म्हणजे मिपाचा दिवाळी अंक.

मंडळी, मिपा दिवाळी अंक संपादकपदाची जबाबदारी 'नको नको किती म्हणू' आणि 'नाही कसं म्हणू तुला म्हणते रे गीत' असं म्हणता म्हणता येऊनही पडली. "आम्ही सर्व मदत करतो, तुम्ही फक्त सांगत राहा" असा दिलेला शब्द सर्व मिपाकर, मिपासंवादातील सदस्य, साहित्य संपादक, मुख्य संपादक, सल्लागार यांनी पूर्णपणे पाळला. किती नावं घ्यावी आणि कोणाकोणाची घ्यावी आणि कोणाकोणाचं किती कौतुक करू? ते शक्य नाही, म्हणून नावं घेणं टाळतो. सर्वांचं काम एकापेक्षा एक सरस असंच होतं. अनेकांना दिवाळी अंकात काम करायचं होतं, पण त्यांची मदत घेता आली नाही. मिसळपाव ड्रुपलवर चालतं, त्यात विविध परवानग्या हा विषय किचकट असतो. अनेकांचे निरोप येत गेले, काही मिपाकर नाराज झाल्याचीही शक्यता आहे, त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मिपा व्यवस्थापन पाहणारे नीलकांत यांच्या मदतीने हा अंक पूर्णत्वास गेला, त्यांच्याबरोबर तांत्रिक काम करणारे प्रशांत, अभ्या, सुंदर सुलेखन करणारे एस, लेखनात चित्रांची सजावट करणार्‍या निलमोहर, प्रतिमा खडके, पियुशा यांचेही आभार मानतो. शेवटच्या क्षणापर्यंत लेख येत होते आणि न थकता, न कंटाळता ज्यांनी मुद्रितशोधनाचं काम केलं, त्या सुधांशुनूलकर यांचे आभार मानतो. रसिकहो, विद्येशिवाय कोणी राहू नये हे जसं बरोबर आहे, तसं मिपाशिवाय कोणीही अलिप्त राहू नये, म्हणून 'सा मिपाया विमुक्तये' असं म्हणावंसं वाटतं.

सर्व मिपाकरांना दिवाळी अंकासाठी जाहीर लेखनाबाबत हाक दिली आणि त्यांनी आपलं लेखन पाठवलं. खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आपले सर्वांचे मन:पूर्वक आभार. दिवाळी अंकातील लेखन निवडीसाठी दिवाळी अंक समितीने खूप मेहनत घेतली. काही कारणास्तव लेखन दिवाळी अंकात समाविष्ट झालं नसेल, त्यांनी आपलं लेखन मुख्य बोर्डावर दिवाळीनंतर प्रकाशित करावं. आपल्या सर्वांच्या मदतीबद्दल आपल्या ऋणात राहू इच्छितो. दिवाळी अंकात त्रुटी वा उणिवा असतील, त्या माझ्या आहेत, त्यासाठी उदार मनाने आपण मला क्षमा करावी.

फोडिले भांडार । धन्याचा हा मालमी तो हमाल । भारवाही

या तुकोबांच्या उक्तीप्रमाणे शब्दधन तुमचंच आहे, मी केवळ शब्दवाहक आहे, ते भाग्यही आपल्यामुळेच मिळालं, म्हणून.
न्य़ून ते पुरते । अधिक ते सरते ।
करुनि घ्यावे तुमते । विनंती माझी ॥

सर्व मिपाकर रसिक, मिपाकर वाचक या दिवाळी अंकाचं स्वागत करतील, आपले रोखठोक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो. आपणास ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो, अशी शुभेच्छा देतो....!

मुख्य संपादक
(मिपा दिवाळी अंक २०१५)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

10 Nov 2015 - 1:16 am | श्रीरंग_जोशी

बिरुटे सर, हे संपादकीय खूपच भावले.
एकाच लेखनात मराठी आंतरजालापासून मिपाच्या वैशिष्ट्यांचा चांगला परामर्श घेतला आहे.
तसेच अंकाच्या निर्मितीबाबतही उत्तम विवेचन केले आहे.

नीलमोहर's picture

12 Nov 2015 - 3:19 pm | नीलमोहर

अतिउत्तम संपादकीय आणि दिवाळी अंकही !!
अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचेच मनापासून आभार...

चतुरंग's picture

10 Nov 2015 - 1:26 am | चतुरंग

प्राडॉ. एकदम डब्बल बॅरल! :)

-रंगा

रामदास's picture

11 Nov 2015 - 4:39 pm | रामदास

एक्स्ट्रा बॅरल पण द्यायला हरकत नाही.

एक एकटा एकटाच's picture

10 Nov 2015 - 1:35 am | एक एकटा एकटाच

मस्त

सुरुवातच इतकी जबरदस्त आहे.
तर अख्खा अंकच कसा असेल ह्याची उत्सुकता वाढली आहे.

आदूबाळ's picture

10 Nov 2015 - 2:04 am | आदूबाळ

ये बात!

पद्मावति's picture

10 Nov 2015 - 2:19 am | पद्मावति

खूप सुंदर संपादकीय.
आता दिवाळी अंक वाचायची उत्सुकता लागली आहे.

स्रुजा's picture

10 Nov 2015 - 2:52 am | स्रुजा

फार आवडलं संपादकीय, सर्वसमावेशक.

मित्रहो's picture

10 Nov 2015 - 5:52 am | मित्रहो

जालावरील लेखन, मिसाळपाववरील लेखन, दिवाळी अंकाची ओळख साऱ्याचाच सुंदर आढावा घेतला. जालावरील लेखन हे वाचकातील लेखकांचे असते त्यामुळे ते स्वीकारताना सर्वसमावेशकता गरजेची असते. मिपाचा दिवाळी अंक आणि हे संपादकीय त्या सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी अंकावर बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येते त्यासाठी संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार.

प्रीत-मोहर's picture

10 Nov 2015 - 5:57 am | प्रीत-मोहर

Sundar sampadakiya

प्रचेतस's picture

10 Nov 2015 - 5:59 am | प्रचेतस

उत्तम संपादकीय.
मनापासून आवडले.

बहुगुणी's picture

10 Nov 2015 - 7:23 am | बहुगुणी

उत्तम संपादकीय

आतिवास's picture

10 Nov 2015 - 9:51 am | आतिवास

आवडले. आता निवांत अंकाचा आस्वाद घेते.
'टीम मिपा'चे अभिनंदन.

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 6:59 am | विशाल कुलकर्णी

मनापासून आलेलं संपादकीय !
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा _/\_

मितान's picture

10 Nov 2015 - 7:24 am | मितान

उत्तम संपादकीय !
मिपाच्या प्रांजळपणाला अगदी साजेसे !!!

तुस्सी ग्रेट हो सर..उत्तम अंक.
शुभ दिवाळी.

उत्तम अंक आणि साजेसे संपादकीय.
मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा.

मनापासून आलेलं उत्तम संपादकीय!

पिचकू's picture

10 Nov 2015 - 8:02 am | पिचकू

>>>> जीवनसंघर्ष करणार्या वर्गाकडून अतिशय कसदार लेखनाची अपेक्षा करता येणार नाही, हे सत्य आहे. >>>>

असं असतं ???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 12:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ उदरनिर्वाहासाठी जीवन संघर्ष करणार्‍याला वेळ तरी कसा असेल ? माझं बोट, कामगारांकडे होतं. मोलमजुरी करणार्‍यांकडे होतं. उदाहरणार्थ, वर्षातील सहा महिने रानावनात काढायचे आणि उरलेले सहा महिने उसतोडणीसाठी कारखान्यावर काढायचे अशा कुटुंबाच्या मुलांचे शिक्षण होत नाही. शिक्षण मिळालं तरी बेकारी असते, चांगलं जीवन जगता येत नाही. तेव्हा लिहायला वेळ कसा मिळणार आणि मिळालं तरी ते तितकं कसदारपणे येईल का या अर्थाने तसं म्हणालो.

-दिलीप बिरुटे

स्वामी संकेतानंद's picture

10 Nov 2015 - 8:02 am | स्वामी संकेतानंद

अतीशय सुरेख अंक! अभिनन्दन!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुहास झेले's picture

10 Nov 2015 - 8:13 am | सुहास झेले

वाह... मस्तच हो बिरुटे सर _/|\_

सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा :)

सतिश गावडे's picture

10 Nov 2015 - 8:20 am | सतिश गावडे

उत्तम दिवाळी अंक आणि त्याला साजेसेच संपादकीय !!

अमृत's picture

10 Nov 2015 - 8:34 am | अमृत

आता अंक वाचतो

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 9:00 am | बोका-ए-आझम

एकदम मनापासून लिहिलेलं आहे!

अस्मी's picture

10 Nov 2015 - 10:00 am | अस्मी

छान संपादकीय, आवडलं!
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

उत्तम दिवाळी अंक आणि त्याला साजेसेच संपादकीय !!

संपदकिय मंडळाच्या कष्टाला सलाम. निवड चांगलीच असणार. आता एक एक लेख वाचते. दिवाळीच्या शुभेच्छा

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 2:39 pm | मधुरा देशपांडे

दिवाळी अंकात सहभागी झालेल्या सर्व लेखक-लेखिका आणि तो अंक वाचकांपर्यंत पोचवण्यात महत्वाची कामगिरी निभावणार्‍या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. अंकातील लेख सवडीने वाचून प्रतिसाद देईनच.
शुभ दीपावली !!

स्वाती दिनेश's picture

10 Nov 2015 - 8:32 pm | स्वाती दिनेश

संपादकीय आवडले. आता अंक वाचते.
स्वाती

आनंदराव's picture

11 Nov 2015 - 7:29 pm | आनंदराव

आवडेश.
तसेच तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला मनापासून सलाम!
अंक वाचणार .

सर्व मिपाकरांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा !

सस्नेह's picture

11 Nov 2015 - 8:24 pm | सस्नेह

यथायोग्य संपादकीय !
मुखपृष्ठ, देखणी चित्रे, अलंकारिक शीर्षके आणि विविध उत्तम लेख यांनी नटलेल्या अंकाचे रुपडे मनोहर आहे.

बॅटमॅन's picture

11 Nov 2015 - 10:15 pm | बॅटमॅन

संपादकीय एकदम टकाटक.

सुंदर अन संतुलित संपादकीय. आवडले.
.
विशेष कौतुक करायचे असेल तर स्वॅप्स बुवा (सध्याचे एस) यांचे करावे लागेल. अत्यंत सुरेख अन अप्रतिम कॅलिग्राफी या अंकाला त्यांनी बहाल केलीय. विषयानुरुप अक्षरलेखन करुन त्यासाठी जी मेहनत त्यांनी घेतलीय त्याला तोड नाही. रशिअन जनरलच्या कथेला वापरलेली रशिअन अल्फाबेटस असो वा मुक्ताचे प्रवाही लेखन. रंगाकाकांच्या कथाशीर्शकातली सोंगटी असो की शेअरड्या बापलेकातला आलेख. सगळे काही अप्रतिम आणि प्रोफेशनल.
ग्रेट जॉब एस मास्टर.

प्रचेतस's picture

11 Nov 2015 - 11:46 pm | प्रचेतस

अगदी.
सुलेखन खूपच उत्कृष्ट झालंय.

धन्यवाद अभ्या.. आणि प्रचेतस!

आतिवास's picture

12 Nov 2015 - 11:02 pm | आतिवास

उत्तम सुलेखन केलं आहे एस यांनी.

नीलमोहर's picture

13 Nov 2015 - 4:17 pm | नीलमोहर

एस यांचे सुंदर विषयानुरुप सुलेखन..
कॅलिग्राफीने दिवाळी अंकाला सुरेख साज चढवला आहे !!

नाव आडनाव's picture

21 Nov 2015 - 5:58 pm | नाव आडनाव

+१

नाव आडनाव's picture

21 Nov 2015 - 5:58 pm | नाव आडनाव

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Nov 2015 - 1:41 am | निनाद मुक्काम प...

मिपाच्या परंपरेला साजेसा दिवाळी संपादकीय लेख
मुक्ता आणि अंकातील इतर सत्य कथा आवडल्या. सगळ्या मुलाखती अप्रतिम झाल्या आहेत.

शिव कन्या's picture

12 Nov 2015 - 1:17 pm | शिव कन्या

सॉरी .... मला उशीर झाला.
सर्वसमावेशक संपादकीय आवडले.
आमच्या अगदी ऐनवेळी पाठीवलेल्या कवितेला सामावून घेतलेत. आभार. :)

मोदक's picture

12 Nov 2015 - 3:24 pm | मोदक

सुंदर संपादकीय..!!!

धन्यवाद सर.

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 4:53 pm | सानिकास्वप्निल

उत्तम संपादकीय __/\__
मिपा दिवाळी अंक छानच झालाय, आता वाचून सविस्तर प्रतिक्रिया देते.
एस यांची कॅलिग्राफी फार-फार आवडली.
अंकांसाठी योगदान देणार्‍या सर्वाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन :)

मित्रहो's picture

12 Nov 2015 - 8:28 pm | मित्रहो

एस यांची कॅलिग्राफी फार-फार आवडली.

१०० टक्के सहमत. ते फाटक या कथेतले फाटक असो किंवा रशियन अक्षर असो किंवा पुस्तकातले पान १५ असो सर्वच सुलेखन कल्पक.

नाव आडनाव's picture

12 Nov 2015 - 5:24 pm | नाव आडनाव

दिवाळी अंक जबरदस्त झाला. लिहिणार्‍यांईतकीच / त्यापेक्षा जास्त मेहनत घेणार्‍या पडद्यामागच्या सदस्यांना खास धन्यवाद.

संपादकीय आवडले... या अंकासाठी मेहनत घेणार्‍या तसेच अंकासाठी लेखन करणार्‍या सर्व मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)

@अभ्या
मुखपॄष्ठ सुरेख आहे रे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

रेवती's picture

12 Nov 2015 - 10:54 pm | रेवती

संपादकीय आवडले. प्रा. डॉ. लिहिणार म्हणजे काही प्रश्न नव्हताच!

दिवाळी अंकाची संतुलित संपादकीयाने सुरूवात होणं हे पुढच्या साहित्यिक मेजवानीच्या दृष्टीने उत्तम योग म्हणायचा.

तेवढं 'सा मिपाया विमुक्तये'चं प्रयोजन काही कळलं नाही. मिपा हे संकेत स्थळ असेल तर नपुंसकलिंगी व्हावं, ते इथे या वाक्यात स्त्रीलिंगी का आहे ते कळेना. ती डिश म्हण्टली तरी पुन्हा कशापासून मुक्ती ते स्पष्ट होईना.

मुद्दलात चांगल्या लिखाणाला संस्कृतातले 'कोट' मूळातून वेगळे काढून मोडून-तोडून वापरण्याची काही आवश्यकता दिसत नाही.

ती ओळ उडवली तर उत्तमच....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2015 - 12:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मिपा हे संकेत स्थळ असेल तर नपुंसकलिंगी व्हावं, ते इथे या वाक्यात स्त्रीलिंगी का आहे ते कळेना.

संस्कृतातलं व्याकरण जर नीट माहिती नसेल तर कशाला असली वाक्य लिहिली पाहिजेत असं आपलं म्हणनं असेल तर ते मान्य. संस्कृत आणि मराठीतले व्याकरण माझा नावडता विषय आहे.

>>>> संस्कृतातले 'कोट' मूळातून वेगळे काढून मोडून-तोडून वापरण्याची काही आवश्यकता दिसत नाही.
विद्येने माणुस जसा विविध गोष्टीतून मुक्त होतो तसेच मिपावर वावरल्याने राग, लोभ, मत्सर, द्वेश आणि तत्सम गोष्टींपासून मुक्ती मिळते अशाच अर्थाने ते वापरले होते. आता आवश्यकता नव्हती या आपल्या मताचा आदर करतो.

>>> ती ओळ उडवली तर उत्तमच....
सॉरी, लिहुन झालं आता विषय संपला. आता ते चूक असलं काय आणि बरोबर असलं काय. हं आता मिपाचं संपादकीय शीर्षक एखादं मराठमोळं भन्नाट सुचलं असायला पाहिजे होतं, असं मला नंतर वाटलं होतं.

आपल्याप्रमाणेच शीर्षकाच्या बाबतीत सर्वात जास्त डोक्याला तान कोणी दिला असेल तर आपले गवि. शीर्षकावर आठेक दिवस तरी त्यानी माझ्याशी उठसुठ काथ्या कुटला होता गुड मॉर्निंग आणि गुड नाईटच्या ऐवजी सर, शीर्षक बदला, सर शीर्षक बदला. असा धोशा लावला होता. सॉरी गवि. :)

प्रतिसादाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे