तू समईतील मंद ज्योत, मी
सभोवतीचा फडफड वारा
अविरत तू तेजस्वी तेवता
श्रान्त उभा मी मिणमिणणारा
बाभळीतला काटा मी अन
काट्यातील तू ग़ुल गोजिरा
वळवळतो मी सुरवंटासम
पतंग दंग तू भिरभिरणारा
नवी पालवी तू वासंतिक
सुकून अंति मी ओघळणारा
धूर कोंडता मी वणव्याचा
तू गंध मृदेचा दरवळणारा
लपाछपीची तू श्रावणसर
मी आषाढी कोसळणारा
ग्रीष्म तप्त मी तहानलेला
वर्षेतील तू हिरवपसारा
लाटेसम मी उसळी घेतो
स्थिरावता तू शांत किनारा
धराव्यापी मी विशालसिंधू
भागीरथी तू जीवनधारा
तू काव्यातील 'भाव' हवासा
नकोनकोसा 'अर्थ' मी गहिरा
तू शब्दाचे 'महत् मोल' मी
'गढूळ' अक्षर उमटविणारा
- इति'श्री'
प्रतिक्रिया
11 Nov 2015 - 7:41 am | मितान
खूप छान ! अस्सल प्रेमकविता !
13 Nov 2015 - 11:31 pm | एस
चांगलीये कविता!
26 Nov 2015 - 1:44 pm | चांदणे संदीप
आशय चांगला आहे!
पण माफ करा अशा बर्याच कविता/गाणी वाचली-ऐकली असल्याने तेवढी प्रभावी नाही वाटली. शिवाय जड शब्द मनात घोळत नाहीत.
सहज-साध्या शब्दांनी चांगली खुलविता आली असती कविता. अर्थात, ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत!
धन्यवाद,
Sandy