माताय, मिपावर एवढे रथीमहारथी असताना लिहायचं म्हटलं की प्रश्न पडतो. कविता लिहावी, तर अजूनपर्यंत कधी ठरवून लिहू म्हटलं आणि लिहिली असं झालं नाही. लेख? तो सुचेना. मग म्हटलं, आता होम पीचवर उतरावं. बरं, त्यातही व्याप कमी नाहीत. मिपाचा मुदपाकखाना सुगरणी आणि बल्लवाचार्यांनी परिपूर्ण! सणासुदीची म्हटल्यावर रेशिपी थोडी हटकेही पाह्यजे ना राव!! म्हैसूरपाकाची रेशिपी देऊ म्हटलं, पण तो द्राविडी प्राणायाम आपल्याने झेपणे नाही. एक-दोन करता करता ह्या रेशिपीवर शिक्कामोर्तब झालं. तर, आता पटापटा साहित्य बघा:
गाईचं दूध दीड लीटर अर्धा किलो खवा दीड मध्यम आकाराच्या वाट्या साखर पाऊण वाटी पिठीसाखर (मी घरातलीच साखर मिक्सरवर दळून घेतली) एक वाटी ग्रेटेड कोकोनट पत्री खडीसाखर साधारण एक टेबलस्पून कॉर्नफ्लोर एक टीस्पून नारिंगी आणि पिवळा खाण्याचा रंग वेलदोडे पूड केशराच्या काड्या तुरटीचा खडा
कृती:
खीरकदम करायला आपल्याला सगळ्यात आधी रसगुल्ले लागतील. तेव्हा त्यांची कृती आधी!! सगळ्यात आधी गायीचं दूध तापत ठेवायचं आणि एकीकडे तुरटीची साधारण दोनेक टीस्पून पूड करुन घ्यायची. दुधाला नीट उकळी आली, की चिमूट-चिमूट तुरटीची पूड टाकून ढवळत राहायचं. पाणी आणि पनीर वेगळं झालं की ही पूड टाकणं थांबवायचं. चाळणीत एक सुती फडकं टाकून त्यावर हे पनीर ओतायचं. थोडं निथळलं की चाळण नळाखाली धरून पनीर नीट धुवून घ्यायचं. फडक्याची पुरचुंडी करायची आणि ते टांगून ठेवायचं. साधारण अर्ध्या तासाने ते उतरवून घ्यायचं आणि परातीत घेऊन नीट मळायचं. मळताना त्यात एक टीस्पून कॉर्नफ्लोर आणि खाण्याचा नारिंगी रंग घालायचा. मळताना नीट एकजीव झालं की मग त्याचे साधारण लहान सुपारीएवढे गोळे वळायचे. (मी केलेले अंमळ मोठे झाले). कारण नंतर ते दुप्पट होतात. गोळे वळताना त्यात मध्यभागी एकदोन खडे पत्रीखडीसाखर ठेवायची. म्हणजे पाक आतपर्यंत जातो. गोळे तयार झाले की पाक करायला घ्यायचा, म्हणजे तेवढा वेळ ते नीट सेट होतात.
पाकासाठी कुकरच्या भांड्यात दीड वाटी साखर आणि त्याच्या दुपटीपेक्षा किंचित जास्त पाणी घ्यायचं. पाकाला उकळी आली की गॅस मंद करून एकेक रसगुल्ला अलगद सोडायचा. सगळे गोळे टाकून होईपर्यंत पाण्याची उकळी बंद होते. परत हळूहळू मुंगेरी आधण सुरू झालं की कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवून झाकण लावायचं. तोवर मोजून दोन वेलदोडे बत्त्यात कुटून घ्यायचे. पंधरा मिनिटांनी झाकण उघडून ही वेलदोड्याची पूड घालायची आणि झाकण बंद करून पाच सात मिनिटं ठेवायचं. हे सगळं करत असताना गॅसची आच मंदच ठेवायची.
रसगुल्ले तयार होतील. हे रसगुल्ले पाकात साधारण तीनेक तास ठेवून मग एका चाळणीत किंवा सुती कापडावर हे असे निथळत ठेवायचे. रसगुल्ल्यातला जास्तीचा पाक निघून जायला हवा. त्याला आणखी तीन-चार तासाचा वेळ लागेल.
त्यानंतर एका कढईत खवा मंद आचेवर परतायला घ्यायचा. साधारण रंग बदलला आणि खमंग वास यायला लागला की केशराच्या काड्या टाकून थोडं परतायचं आणि गॅस बंद करायचा. पिठीसाखर आणि पिवळा रंग मिसळायचा. खरं तर अर्धी वाटीसुद्धा पिठीसाखर पुरेल. पण आपापल्या गोडाच्या आवडीनुसार ठरवावं. पिठीसाखर मिसळल्यानंतर पातळसर झालेला खवा बघून गंडलं की काय अशी शंका येईल. पण धीर धरावा. किचनमध्ये अर्धा तास फिरकूच नये. रूम टेंपरेचरला आला की खवा त्याचे 'खीरकदम' वळण्यालायक होईल.
इथून पुढे अगदी सोपं आहे. खव्याच्या दोन वेगवेगळ्या पार्या करून घ्याव्यात. एका पारीवर पाक निथळून गेलेला रसगुल्ला ठेवून त्यावर दुसरी पारी ठेवून बंद करावं आणि त्याचा लाडू वळावा. आता हा लाडू ग्रेटेड कोकोनटमध्ये घोळवला की खीरकदम तयार!!
तळटीपः १) पाक निथळून जाणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा खव्याच्या आवरणात तो झिरपून खवा पातळ होऊन आकार बदलू शकतो २) बाहेरून ग्रेटेड कोकोनट लावण्याऐवजी पनीर किसून खरपूस परतून त्यातही घोळवू शकता. ३) रसगुल्ला आधीच बर्यापैकी गोड असल्याने खव्यात साखर टाकताना गोडाची वैयक्तिक आवड लक्षात घेऊन प्रमाण ठरवावं.
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 2:38 am | स्रुजा
एक नंबर पाकृ आणि सादरीकरण. पुण्यात असताना खुप दा हा प्रकार आवर्जुन आणायचो , आता इथे निदान करुन पाहण्याचं धारिष्ट्य करता येईल.
बाकी सूड भौ, ग्रेटेड कोकोनट म्हणजे खवलेलं ओलं नारळ घ्यायचं की किसलेलं सुकं खोबरं ?
10 Nov 2015 - 3:03 am | चतुरंग
पनीर आणि खवा या सुगरिणींनीच हात लावायच्या पदार्थातून तू हे बनवले आहेस, तेव्हा तुझ्या बल्लवगिरीची निम्मी खातरी पटली (आमची उरलेली निम्मी खातरी फक्त पदार्थ खाऊनच पटते ;) )!
लाजवाब दिसतोय पदार्थ. एकदम राजेशाही दिवाळीला साजेसा! __/\__
-रंगाकदम
10 Nov 2015 - 5:41 am | श्रीरंग_जोशी
अप्रतिम दिसत आहे खीर कदम. माझा अत्यंत आवडता पदार्थ.
पुण्यात पद्मावतीला बिकानेर स्वीट्समध्ये खूप छान मिळतं.
खीर कदमची पाककॄती प्रथमच वाचायला मिळाली. तुमच्या पाककौशल्याला सलाम.
10 Nov 2015 - 6:22 am | प्रीत-मोहर
अप्रतिम!!!!
10 Nov 2015 - 6:50 am | कविता१९७८
वाह मस्तच
10 Nov 2015 - 8:25 am | स्वप्नांची राणी
हलदिरामचे खूप फेमस म्हणून खाऊन पाहिले एकदा...पण खरच अगदी सुड-घेऊ गोड प्रकार असतो हा.
मस्त सोप्पी पाककृती आणि दिलखेचक मांडणी..!!!
10 Nov 2015 - 8:29 am | सतिश गावडे
जबरा. आता सहज म्हणून तुमच्या घरी येणे आले. :)
10 Nov 2015 - 8:31 am | मुक्त विहारि
धन्यवाद.....
10 Nov 2015 - 9:34 am | नूतन सावंत
सूड,_/\_ _/\_ _/\_
10 Nov 2015 - 10:36 am | पियुशा
अप्रतिम झालय :)
10 Nov 2015 - 2:04 pm | सूड
@स्रुजातै: सुक खोबरं किसलेलं!!
धन्या, दोन आठवड्यांपूर्वी भेटणार आहे का कोणी हे विचारायला फोन केला होता तो तेवढ्यासाठीच!!
10 Nov 2015 - 3:08 pm | दिपक.कुवेत
आता एक काम कर....मला लकडीपुलावरुन परत पाठवण्याआधी तु भेटायला येताना हे आणण्याचे कष्ट करावेत (रेडीमेड नाहित...तू स्वःत बनवलेलेच). खजूर चॉकलेट्स त्या बदल्यातच मिळतील नाहीतर चॉकलेट्स नुसती बघून समाधान मानावं लागेल. क्लास रेसीपी. रसगुल्लांच्या कलर खत्रा आलाय. पहिल्या फोटोतील चमचे कुठुन आणलेस? मला एक सेट घेउन ठेवशील का? "मुंगेरी आधण" हा शब्द प्रयोग खुप आवडल्या गेल्या आहे.
10 Nov 2015 - 3:10 pm | मधुरा देशपांडे
पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. इंटरेस्टिंग आहे. फोटो आणि सादरीकरण झक्कास.
10 Nov 2015 - 3:46 pm | बॅटमॅन
मायला, बंगाल्यात हा पदार्थ प्रथम पाहिलेला. पण खाऊन कै बघितला नव्हता. अता मात्र खाऊन बघावाच वाटायलंय. एक नंबर सादरीकरण अन पाकृ.
तो क्लर्क पिच्चरमध्ये अशोककुमार बेडवरच कदमताल करू लागतो तसे करावे वाटू लागले आहे. एकच नंबर!
10 Nov 2015 - 7:08 pm | भुमी
सादरीकरण सुरेख
10 Nov 2015 - 8:41 pm | स्वाती दिनेश
खीरकदम मस्तच!
स्वाती
10 Nov 2015 - 8:56 pm | पद्मावति
वॉव...अमेझींग पाककृती.
खीरकदम आवडीचा पदार्थ आहे पण घरी कधी करण्याचा मी विचारही केला नव्हता.
सुंदर सादरीकरण. पाककृतीसाठी धन्यवाद.
10 Nov 2015 - 9:22 pm | सत्याचे प्रयोग
खीरकदम पुण्यात मिळते (की मिळतो) माहित नव्हते. मित्राला नागपूर हून आणायला सांगीतले होते. वाट बघत होतो. अन मिपावर रेसिपी अाली बघू जमतोय का प्रयोग
11 Nov 2015 - 2:25 pm | Mrunalini
अप्रतिम. एक नंबर. कधी खाल्ले नाही. करुनच बघायला पाहिजे आता.
11 Nov 2015 - 2:44 pm | नाव आडनाव
पाककॄतींचं कळत काही नाही, पण कधी कधी वाचत असतो. भारी पाककॄती आणि फोटो तर त्यापेक्षा पण लैच भारी.
11 Nov 2015 - 2:52 pm | आदूबाळ
या टीपसाठी आभारी आहे.
----
शेवटच्या फोटोतल्या खीरकदमचं बाहेरचं आवरण (खव्यापासून केलेलं) हिरवं कसं झालं?
16 Nov 2015 - 2:58 pm | सूड
पिवळंच आहे रे, फोटोत काय गंडलं असलं तर माहीत नाही.
या टीपसाठी आभारी आहे.
ती टीप सानिकातैंच्या रसगुल्ल्याच्या रेसिपीजमधनं उचलली आहे, तेव्हा त्यांचे आभार!! ;)
11 Nov 2015 - 3:20 pm | एस
जबराट!
11 Nov 2015 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेका, खिरकदमची पाककृती खुप आवडली. मांडणी,कृती आणि छायाचित्र एकदम सुंदर आलेत. जियो. दिवाळी अंकासाठी तुम्हाला ही पाककृती द्यावी वाटली. माझ्या भाषेत म्हणायचं तर हा सर्व कूटाना तुम्हाला करावा वाटलं. लॉट ऑफ़ थ्यांक्स ! :)
-दिलीप बिरुटे
12 Nov 2015 - 11:52 am | दमामि
जबरा पाकृ. अन् ती देखील सूडकडून! I am impressed!!!!
12 Nov 2015 - 11:55 am | अभ्या..
सूडक्या अस्ले अवघड आयटम पण करणे म्हण्जे भारीच. फोटो पण भारी आलेत.
एक चटणीपाकीट काढून ठेवलेय रे.
12 Nov 2015 - 12:08 pm | प्रास
सुंदर, अतिसुंदर....
लाजबाब पाकृ!
19 Nov 2015 - 7:32 pm | सुबोध खरे
+१००
12 Nov 2015 - 12:41 pm | संदीप डांगे
एकिच मारा पर सॉल्लिड मारा... _/\_
12 Nov 2015 - 1:58 pm | पैसा
ग्रेटेड कोकोनटसाठी अर्धा मार्क कापला.
12 Nov 2015 - 5:29 pm | सानिकास्वप्निल
भन्नाट!!
परवाच रसकदम/ खीरकदमबद्दल पाकृत म्हटले आणि आज अंकात पाकृ बघायला मिळाली :)
अप्रतिम सादरीकरण, देखणी झाली आहे पाकृ.
तू अगदी सहजतेने केले आहेस त्याबद्दल विशेष कौतुक :)
पुढल्यावेळी कॉर्नफ्लार न घालता बनवून बघ तूला नक्कीच जमेल.
पाकृ फार-फार आवडली, डिसीकेटेड कोकोनटमध्ये घोळवण्याची कल्पना आवडेश.
या खास पाकृसाठी धन्यवाद __/\__
12 Nov 2015 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतका किचकट आणि इतका चवदार आणि इतका आकर्षक पदार्थ बनवायचा, आणि वर म्हणायचं...
माताय, मिपावर एवढे रथीमहारथी असताना लिहायचं म्हटलं की प्रश्न पडतो.
म्हणजे "काहीही हा सू... " :)
(तुमच्या हातचा खीरकदम खायला कधी बोलवताय ? ;) )
12 Nov 2015 - 10:28 pm | इडली डोसा
खूप छान सादरीकरण.
माझ्यासाठी हि मिठाई नविन आहे. कधिच नाव ऐकलं नव्हतं. पण करुन बघायला मन धजत नाहिये. एवढी छान काही आपल्याकडुन होणार नाही. तुम्हीच कधी भेट झाली तर खायला घाला.
12 Nov 2015 - 11:13 pm | सखी
सुरेख सादरीकरण आणि पाकृ. लगेच करुन बघाविशी वाटतेय.
"पिठीसाखर आणि पिवळा रंग मिसळायचा." इथे पिस्ता/हिरवा रंग पाहीजे होतं का?
12 Nov 2015 - 11:52 pm | रेवती
हा पदार्थ पहिल्यांदाच पाहिला. झकास दिसतोय.
13 Nov 2015 - 7:37 am | मदनबाण
वाह्ह... सुरेख ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
13 Nov 2015 - 2:10 pm | विशाल कुलकर्णी
पदार्थ तर सेक्सी दिसतोय राव. मी पहिल्यांदाच ऐकलं हे नाव. ट्राय करायला पाहिजे एकदा...
धन्यवाद !
14 Nov 2015 - 9:36 am | नाखु
हे सार जबराच आहे.
बाळबोध शंका "ग्रेटेड कोकोनट" म्हणजे काय?
14 Nov 2015 - 9:58 am | मांत्रिक
खिसलेलं खोबरं
14 Nov 2015 - 9:52 am | मांत्रिक
सूडसाहेब..
पदार्थ अगदी झकास बनवलाय. हे नाव यापूर्वी ऐकलं नव्हतं. पण एकंदरीत मस्तच आहे पाकृ. फोटोही खासच..
14 Nov 2015 - 9:53 am | मांत्रिक
सूडसाहेब..
पदार्थ अगदी झकास बनवलाय. हे नाव यापूर्वी ऐकलं नव्हतं. पण एकंदरीत मस्तच आहे पाकृ. फोटोही खासच..
14 Nov 2015 - 9:55 am | सस्नेह
अनवट पाकृ ! नावही भारीये.
सूडही शेफश्री झाला तर !
16 Nov 2015 - 2:59 pm | सूड
भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. :)
17 Nov 2015 - 5:37 pm | तिमा
हा पदार्थ नुकताच खाल्ला होता. पाकृ अप्रतिम. एकच शंका नांवाबद्दल. याला खीरकदम असे का म्हणतात ? त्याचा अर्थ काय असेल ? भाषाप्रभूंनी उत्तर द्यावे.
17 Nov 2015 - 6:04 pm | नीलमोहर
खीर कदम यातील कदम हा 'कदंब' चा अपभ्रंश असावा, कदंबाचं झाड आणि फुलं यावरून.
या पदार्थाला रसकदम असेही म्हणतात.
बाकी भाषाप्रभू अजून सांगतीलच.
17 Nov 2015 - 6:47 pm | सूड
तुम्ही काय रेकी वैगरे करता का हो? अगदी हेच लिहायला आलो होतो. म्हटलं नेहमीच काय भोचकपणा करायचा म्हणून लिहीलेलं खोडून टाकलं.
18 Nov 2015 - 2:45 pm | दिपक.कुवेत
हे मान्य करतोस तर!!!
17 Nov 2015 - 7:37 pm | त्रिवेणी
मस्त distey पाककृती.
पण खव्याचे पदार्थ नाही पचत सो नुसते पाहून समाधान मानेन.
18 Nov 2015 - 3:43 pm | वेल्लाभट
वल्लाह! क्या रेसिपी होती !
19 Nov 2015 - 6:59 pm | नया है वह
छान सादरीकरण