मुंबईतली एक नेहमीचीच सकाळ उजाडते.
खरे तर तिची ही दुसरी सकाळ असते. पहिली तो फिरायचा पोशाख चढवून उतरतो ती आणि ही दुसरी. तिची सकाळ.
आळस झटकत रेडिओ बंद करत ती उठतॆ.
तो खाली फिरायला गेलेला असतो, एव्हाना तो वर यायची वेळ झालेली असते.
आवरून आटपून ती बाहेर येते, मोबाईल चार्जरला लावते.
दुधाची पिशवी आत आणते, चहा टाकते. तिच्याबरोबर तिचा रेडिओपण स्वयंपाकघरात येतो.
तो येतो. ती चहा घेण्यासाठी त्याची वाट पाहत बसलेली असते. ती छोटीशी भेट संपते.
तो आंघोळीला जाताच ती स्वयंपाकाला लागते. त्याचा आणि तिचा डबा तयार करायचा असतो.
घड्याळाच्या काट्याशी झुंजत, घामाघूम होत ती डबा घेऊन येते. तोही तयार होऊन आलेला असतो.
गडबडीत जमेल तसा नाश्ता करून, नाहीतर नाश्ता डब्यात भरून तो बाहेर पडतो.
तिला बाहेर पडायला वेळ असतो. पण कामे हजर असतात. स्वयंपाकघर आवरणे, न लागलेल्या भाज्या फ्रीजमध्ये टाकणे, मध्येच एखादा फोन.... घड्याळ बघत ती अंदाज बांधते - आज आपण श्रीमंत आहोत, अजून पंधरा मिनिटे हातात आहेत. मध्येच कामवाल्या बाई येतात. बाईंशी संवाद होतो. बाई कामाला लागतात, ती जरा यू-ट्यूबवर आपल्या आवडत्या हस्तकलेची प्रात्यक्षिके शोधते, गाणी पाहते, खूण करून ठेवते. तिचा मोबाईल गजर करतो- 'ऊठ, वेळ झाली'. ती आवरायला घेते. आंघोळ, कपडे वगैरे पार पडते. ती बाहेर येते, नाश्ता करते. डबा भरते. आपली बहुसमावेशक पिशवी आणते. या पिशवीत डबा, पाणी, संध्याकाळी ग्रंथालयातून बदलायची पुस्तके, परवाच घेतलेला आल्टर करायचा ड्रेस, कचेरीतल्या मैत्रिणीला वाढदिवसानिमित्त घॆतलेले भेटपत्र, चश्मा, खाऊची डबी, कचेरीची कामाची संदर्भ पुस्तके वगैरे संसार भरलेला असतो.
घड्याळ धावत असते. तीही धावत असते. शर्यतीचा निकाल कचेरीत पोहोचल्यावर समजणार असतो. रिक्षा मिळणे, सिग्नल मिळणे, स्टेशनचा जिना मोकळा मिळणे, वाटेत कुणी ओळखीचे न भेटणे, गाडी वेळेवर येणे आणि वेळेवर पोहोचणे...
अडथळ्यांची शर्यत संपवत ती कचेरीत पोहोचते. कोण आलाय, कोण नाही याचा आढावा घेते. कालची राहिलेली कागदपत्रे घेऊन काम सुरू करते. फोन घणघणत असतात. लोक येत असतात. ती लगबगीने कामाला लागते. एक एक कागद हातावेगळा करते. ऊन-उकाडा; शिवाय वातानुकूलन नाही. सर्व खिडक्या उघड्या. डोके बधीर करणारा रस्त्यावरच्या रहदारीचा आवाज. ती केवळ सवय म्हणून चहा घेते. पुन्हा काम सुरू. अचानक एखादी सहकारी चेहरा पाडून येते. तिची सासू घरात पाय घसरून पडलेली असते, जाणे अनिवार्य असते. इकडे कचेरीत ऑडिट जाहीर झालेले. महत्त्वाचे काम आहे असे म्हणत ती मैत्रीण तिला ते संपवायची गळ घालते. कामाचा भार थोडा वाढतो. जेवणाची वेळ कधी होते समजत नाही. धबडग्यातले चार विश्रांतीचे क्षण. चार जणी एकत्र बसतात. डब्यातल्या पदार्थांची देवाणघेवाण होते. जरा गप्पा होतात, मुलाबाळांची चौकशी होते. पुन्हा काम सुरू.
आता सूर्य पूर्ण तापलेला असतो.
कचेरीतले राजकारण. कंपूबाजी.
अपुरी माणसे.
दिशाहीन बदल्या.
नवखे अधिकारी - फर्मान वाचा आणि आम्हालाही सांगा
अखेर काटा पार होतो.
ती लगबगीने आवराआवर करते. पुन्हा स्टेशन-गाडी-स्टेशन. बाहेर पडल्यावर भाजी, ग्रंथालय, जंत्री असतेच. सगळे झाल्यावर रिक्षाची आराधना. पुन्हा दाटलेली भयानक वाहतूक. धुरांचे लोट, धूळ, कर्कश्श आवाज. सिग्नलवरचे भिकारी, खासकरून हिजडे. गजरेवाल्या. केविलवाणी भिकारी मुले. एकदाचे घर येते. खाली उतरताच मस्त झुळुक अंगावरून अलगद स्पर्श करत जाते. हिरवाई डोलत असते. कुणी शेजारीण पाहिल्यावर "काय, कसं काय..?" शेजारणीच्या संकुलात होऊ घातलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा आग्रह. आवारात खेळणारी लहान मुले. सगळे मोह सोडून ती लिफ्टमध्ये शिरते.
घरात आल्यावर टीव्हीचे काही चॅनल दिसेनासे झाल्यामुळे मोठ्यांची चिडचिड कानावर पडते. ती फोन फिरवते. चॅनल थोड्या वेळात सुरळीत होतात. ती कपडे बदलते. भाजीची पिशवी रिकामी करते. सगळ्या भाजांची विगतवारी करून फ्रीजमध्ये टाकल्यावर ती थोडा वेळ स्वस्थ बसते. मध्येच उठते, कपडे मशीनमध्ये टाकते. मग नकळत स्वयंपाकघराचा ताबा घेते.
पुन्हा फोडण्यांचे वास.
घामाच्या धारा.
संपत आलेल्या तेलाची, पोह्यांची, ओट्सची, चीजची नोंद घेतली जाते.
नीट न पेटणारा पुढचा बर्नर.
कॅबिनेटच्या दाराची एक बिजागरी अत्यवस्थ ...हॆ सगळे तो आला की सांगायला पाहिजे, लवकरात लवकर माणसे बोलावून नीट करून घ्यायला.
तो आज वेळेवर येणार असतो. आल्यावर उगाच डबे उघडत राहील, तेव्हा थेट जेवायचाच प्रस्ताव ठेवायचे योजते. जेवताना त्याच्याबरोबर न विसरता काय काय बोलायचे, याची यादी मनात ठरते... पुढच्या महिन्यात जवळचे लग्न असते, त्याचे आहेर, रजेचे नियोजन, बर्याच दिवसात माहेरी चक्कर झालेली नसते ती ठरवायला त्याचा पुढच्या आठवड्याचा कार्यक्रम विचारायचा - हो, जर दौरा असेल, तर त्याचे कपडेही बघायला हवेत, इन्व्हेस्ट्मेंटचे बॊलायचे असते, घरच्या कॉम्प्युटरसाठी त्याला माणूस पाठवायला सांगायचा.., आईंना हल्ली अशक्तपणा जाणवतो, त्यांना डॉक्टरांकडे न्यायला सांगायचे.....
तो येतो. आल्यावर आई-बाबांशी संवाद. मग समोर चालू असलेल्या मालिकेचा उद्धार. तो कपडे बदलून येतो. त्याच्याबरोबर दिवसभराचा आढावा.. तो थोड्या वेळाने जेवू म्हणतो. मग तिचाही जरा विरंगुळा. ती मोबाईल उघडते. वॉट्स अॅप तुंबलेले असते. बहुतेक ग्रूप्समध्ये तेच ते संदेश आणि उपदेश फिरत असतात. बहुतेक जागा चिमटी, अंगठा, मुद्रा यांनी व्यापलेली असते. तरीही कचेरीचा ग्रूप, माहेरचा ग्रूप, इमारतीचा ग्रूप, सगळ्यांची दखल घेतली जाते. मग जेवणे. मग पुन्हा आवराआवर. मोठी माणसे आत गेलेली असतात. तो अजूनही टीव्हीपुढे रेंगाळत बातम्या ऐकत असतो. ती त्याला हाकाटते. बसेल बसेल... उशीर होईल, उद्या सकाळच्या वॉकला दांडी.. तो दाराबाहेर दुधाची पिशवी लावतो, दरवाजा आणि काचा बंद करतो. दिवे बंद करतो. एव्हाना दहा वाजून गेलेले असतात.
दिवसभराचा कामाचा धबडगा संपलेला असतो. हुश्श करत ती आत तिच्या खोलीत येते, अलगद दार लावून घेते.
आणि अचानक जादूची कांडी फिरते.
एका कष्टकरी मुलीची क्षणात सिंड्रेला होते.
बेडवर सुरेख पांढरी चादर येते.
तिचा ध्वनिसखा तिला रिझवायला शेजारी येऊन बसतो.
समोर नाना छंदांचे सामान भरलेली बास्केट येते.
आवडीचे पुस्तक, मासिक, टॅब समोर येतात.
आरामखुर्ची घडी सोडून अलगद पसरते.
जड जाड कपडे जातात आणि आवडता मोकळा सुती नाईट गाऊन अंगावर येतो.
गुणगुणतच ती स्वत:ला आरामखुर्चीत झोकून देते.
ती रिमोट दाबते आणि ए.सी. चालू करते.
सुखावणारा गार झोत मंदपणे अंगावर येतो.
सुखद गारव्याने प्रसन्न होत ती संगणकावर मग्न असलेल्या त्याच्याकडे बघते.
तोही संगणकापुढे बसून तिच्याकडेच पाहत असतो.
दोघेही दिलखुलासपणे हसतात.
मग तो नेहमीच्या वाक्याची वाट पाहत तिच्याकडे पाहत थबकतो.
आपले लाडके पुस्तक जवळ घेते, मग ती त्याला हात हलवून टाटा करते आणि म्हणते,
"आता माझे 'हॅपी अवर्स' सुरू झाले."
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 1:39 pm | पलाश
चित्रदर्शी लेखन!! धावपळीच्या दिवसामधे लाभणारे हे हॅपी अवर्स आवडले.
10 Nov 2015 - 7:49 pm | एस
असेच म्हणतो.
10 Nov 2015 - 6:33 pm | बोका-ए-आझम
ध्वनिसखा - काय शब्द आहे!
10 Nov 2015 - 9:35 pm | पैसा
खूप सुंदर लिहिलंय! मुंबईत नसले तरी या सगळ्याचा पुरेपूर अनुभव आहे!!
10 Nov 2015 - 11:28 pm | इडली डोसा
सगळ्यांनाच असे हॅपी अवर्स हवे असतात.
11 Nov 2015 - 4:55 pm | बहुगुणी
साध्याच दिनक्रमाचं किती नेमकं वर्णन! दिवसाअखेरचा नाजूक क्षण अलगद् चिमटीत पकडला आहे, वाचता-वाचता नकळत कथानायिकेबरोबर आपणही मोकळा श्वास घेतो आहोत असं वाटलं!
11 Nov 2015 - 5:29 pm | स्वाती दिनेश
खूप छान! गोष्ट आवडली.
स्वाती
11 Nov 2015 - 6:44 pm | यशोधरा
हॅपी अवर्स आवडले!
11 Nov 2015 - 7:12 pm | आतिवास
कथा आवडली.
11 Nov 2015 - 7:14 pm | प्रभाकर पेठकर
सुपरवुमनचा दिनक्रम वाचतानाच दमछाक झाली. त्या मानाने 'तो' कांहीच करीत नाही. त्याने बदलले पाहिजे.
12 Nov 2015 - 5:37 pm | मुक्त विहारि
+१
12 Nov 2015 - 11:27 am | Maharani
छानच..कथा आवडली
12 Nov 2015 - 12:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
तिच्या दिवसाभराच्या धबडग्यातून फरपटत नेते कथा, वाचकपण दमून जातो ना !
12 Nov 2015 - 12:29 pm | मीता
हॅपी अवर्स सुरु झाल्यावरच मोकळा श्वास घेतला गेला . मस्त कथा
12 Nov 2015 - 4:24 pm | मुक्त विहारि
पहिल्या वाक्या-पासून ते शेवटच्या "हॅपी-अवर्स" पर्यंत खिळवून ठेवणारी कथा.
12 Nov 2015 - 10:33 pm | पद्मावति
आहा..मस्तं फील गुड कथा. आवडली.
12 Nov 2015 - 10:50 pm | सानिकास्वप्निल
किती गोड कथा आहे, हॅपी अवर्स खूप आवडले :)
12 Nov 2015 - 10:55 pm | रेवती
एका स्त्रीच्या दिनक्रमातून फिरवून आणलेत. कथा छान झालिये..........दमवणारी आहे.
14 Nov 2015 - 2:26 pm | नाखु
संसाराचे ते एक भक्कम चाक आहे आणि नोकरीवाली गृहीणी तर एकाच वेळी डबल रोल.
भावला
प्रापंचीक नाखु
14 Nov 2015 - 8:06 pm | सस्नेह
असे हॅपी अवर्स अनुभवल्यामुळे लेखन फारच पटले !
14 Nov 2015 - 8:17 pm | तुमचा अभिषेक
मस्त .. विकेंडला आमच्याकडे हे हॅपी अवर्स स्पेशल असतात, अगदी पहाट ऊजाडेपर्यंत :)
15 Nov 2015 - 2:50 pm | स्मिता.
कथा नक्कीच आवडली. शेवट आला तसा 'हॅपी अवर्स' चा भास झाला.
वाचताना फक्त एकच प्रश्न पडला तो म्हणजे तिच्या दिवसाला किती तास आहेत? म्हणजे ८-९ तासाची नोकरी, येण्या-जाण्याच्या प्रवासाला लागणारा वेळ, हे सगळं वगळून उरलेल्या वेळात सकाळी फिरायला जाणं, यु-ट्युबवर व्हिडिओ बघणं आणि रात्री १० पर्यंत सगळं आवरून होणं हे किमान माझ्याकरता तरी अशक्यकोटीतलं आहे.
27 Nov 2015 - 2:54 pm | arcsaw
Yat mulancha abhyas , dorivarche kapde kadne, mulani kelela pasara avarne , hey add nahich ahe tari :( smita...agdi maji life vatli mala...fqt maja happy hours nastoch...10 la direct batti gul n swapnat tunn....!
15 Nov 2015 - 8:01 pm | विजुभाऊ
भोज्येषु माता.शयनेषु रंभा ,......
राज्येषु मंत्री.किती रोल्स करणार आहे कोण जाणे.
15 Nov 2015 - 8:33 pm | जव्हेरगंज
आहाहा!
हॅपी अवर्समध्येच कथा वाचली आणि अगदी मनावर मोरपीस फिरल्यासारखं वाटलं!
-हॅपीअवर्सप्रेमी जव्हेरगंज
22 Nov 2015 - 5:52 pm | सोत्रि
सुरेख!
- (ह्या हॅपीअवर्सची परिभाषा आवडलेला) सोकाजी
27 Nov 2015 - 8:38 am | सौन्दर्य
नायिकेच्या मागोमाग सावली सारखा फिरून तिची लगबग अनुभवतोय असं वाटलं. इतक्या घाई गडबडीच्या दिवसाक्रमातून पुस्तकं वाचण्यासाठी वेळ काढला जातो हेच कौतुकास्पद. खूप छान लिहिलेय गोष्ट, आवडली.
2 Dec 2015 - 3:18 pm | नीलमोहर
रोज असे थोडे जरी हॅपी अवर्स मिळाले तरी केलेल्या कामांचं सार्थक होतं.